आजचा सुधारक ह्या आमच्या मासिकाच्या गेल्या अंदाजे चार वर्षांच्या वाटचालीत आम्ही तीन परिसंवाद विशेषांकांच्या स्वरूपात प्रकाशित केले. वा. म. जोशी ह्यांचे विवेकवादी लिखाण ह्यावर पहिला विशेषांक, धर्मनिरपेक्षता ह्यावर दुसरा आणि निसर्ग आणि मानव ह्या विषयावर तिसरा. ह्या तीनही विशेषांकांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता थोड्या वेगळ्या प्रकारच्या विशेषांकांची योजना केली आहे.
या विशेषांकांचे एक वैशिष्ट्य असे राहील की त्यांच्या संपादनाचे काम आम्ही महाराष्ट्रातील प्रथितयश मंडळीकडे सोपविले असून त्यांला अनुकूल प्रतिसादही आहे.
तूर्त आमच्या नजरेसमोर असलेले काही विषय पुढीलप्रमाणे आहेत.
* समान नागरी कायदा
* शिक्षण पद्धतीतील आवश्यक बदल .
* पर्यावरणाची हानी भरून काढण्याचे उपाय
* स्त्रियांचे प्रश्न आणि भावी कुटुंबाची रचना
* हिंदु-मुस्लिम संबंध
* घटनेचे ३७० वे कलम
पूर्वास्पृष्टांचे सद्यःकालीन प्रश्न
ह्या विशेषांकांची सुरवात स्थूलमानाने आजपासून सहा महिन्यांनी करण्याची आमची योजना आहे. दोन किंवा तीन महिन्याआड हे विशेषांक प्रकाशित होतील. विशेषांक साहजिकच दुप्पट पानांचे असतील. त्यामुळे मासिकाचे इतर अंक रोडावतील. परंतु ते दर महिन्याला प्रसिद्ध होतील याची काळजी घेऊ.
या विशेषांकांकरिता लेख लिहिण्याकरिता व्यासंगी अभ्यासकांना निमंत्रित करण्यात येणार असले तरी आपल्या सर्व वाचकांना त्यात भाग घेण्याची विनंती आहे. –संपादक