लोक फलज्योतिषाकडे धाव का घेतात?
अनेकदा लोक ज्या कारणांसाठी फलज्योतिषाकडे जातात ती कारणं जीवनातल्या नेहमीच्या अनिश्चितीततांमुळे निर्माण झालेली असतात. अनिश्चितता खरंतर सगळ्यांच्या जीवनात असतात; पण काही लोकांना त्यांचा जास्त त्रास होतो किंवा काही लोकांच्या बाबतीत त्या अनिश्चिततांची परिणती काही विशिष्ट घटनांद्वारे जास्त एकांगी वाटते. उदाहरणार्थ, घटस्फोट, कुटुंबातील अकाली मृत्यू किंवा अपंग करणारा एखादा अपघात. हे असं माझ्याच बाबतीत का व्हावं असा विचार आला की आपण अनेकदा सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून नको त्या गोष्टींच्या नादी लागू शकतो. अशावेळी खरं तर लोकांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. भारतात तो एक ठपका असल्यामुळे पंचाईत होते. या धर्तीच्या अनेक प्रसंगांमध्ये पुढील घटना टाळण्यासाठी ओळखीतल्या अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास त्यानेही मदत होऊ शकते. अर्थात ते स्वतः अंधविश्वासू नसतील तर.
IGNOUच्या अभ्यासक्रमाबाबत
सरकारने फलज्योतिषावर योग्य असे पर्याय बनवायला हवेत; जेणेकरून लोकांना कठीण परिस्थितीतही मानसिक स्थैर्य मिळवायला मदत होईल. शाळा–कॉलेजेसमधून अशी मदत उपलब्ध हवी. याउलट सरकारी अनुदानाने विद्यापीठांमधून फलज्योतिषाचे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय खुल्या विद्यापीठाने इतक्यातच असाच एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक लोक “काय हरकत आहे” असं म्हणून त्या अभ्यासक्रमाला पाठिंबा देत आहेत. “इतर अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात, त्याप्रमाणे हाही एक आणि हा तर विज्ञानशाखेत नसून कलाशाखेत आहे; त्यामुळे असाही दावा नाही की ते एक शास्त्र किंवा विज्ञान आहे” असा त्यांचा युक्तिवाद असतो. कलाशाखेत जरी हा असला तरी अभ्यासक्रमाच्या विवरणात एक वाक्य असं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांना त्यांच्या उपजीविकेचे एक साधन या अभ्यासक्रमाद्वारे देऊ करणार आहोत. तसं असल्यामुळे असा अभ्यासक्रम कोण शिकवू शकेल, त्या अभ्यासक्रमामध्ये काय हवं, हे प्रश्न साहजिकच निर्माण होतात. अशा प्रश्नांना एक सरधोपट असं उत्तर नसतं कारण त्यात अनेक मिती असतात. अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक असलेल्या अनेक बाबींचा अंतर्भाव न केल्यामुळे हे अभ्यासक्रम घातक ठरतात. यासंबंधीच्या एक-दोन आवश्यक पण कदाचित अपुऱ्या बाबी पाहूया.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रमात जे शिकवले जाणार आहे त्याविरुद्ध असलेले सिद्धांत आणि मतप्रवाहसुद्धा नमूद केले जायला हवे. तसे नसल्यास जे शिकवले जाणार ते एकांगीच ठरणार. अभ्यासक्रमात जे काही शिकवले जाते त्याबद्दल संख्यात्मक विश्लेषण देता यायला हवे. ज्योतिषाचा अभ्यासक्रम भाकितांबद्दल असल्यामुळे ‘कोणत्या घटकांवर आधारित किती भाकितं केली? केली त्यातील किती खरी ठरली? ती किती अंशी खरी ठरली? किती खोटी ठरली?’ वगैरे या सर्व बाबी यायला हव्यात. हा कलाशाखेत जरी असला तरी कलाशाखेतील इतर अभ्यासक्रमांमध्ये जशा परीक्षा असतात तशा इथे होतील याची काहीच चिन्ह नाहीत. उदाहराणार्थ, रंगचित्राच्या परिक्षेस बसलेला विद्यार्थी रंगचित्रे काढतात. त्या रंगचित्रांना परीक्षक गुण देतात. त्याचा जगात होऊ घातलेल्या घटनांशी संबंध नसतो. फलज्योतिषात तसा असल्याने त्याची तपासणी कशी केली जाणार? वर्ष–दोन वर्ष किंवा भकितात असतील तेवढी वर्षे थांबून?
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असे अभ्यासक्रम शिकवायला प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षक हवेत. म्हणजे जे स्वतः केवळ पुस्तकातून शिकले ते का? तसे असतील तर कोणत्या पुस्तकांमधून? की व्यावसायिक ज्योतिषी हवेत? हे दोन्ही गट तसे कुचकामी. येथे असेच शिक्षक हवेत ज्यांना या प्रकारात कोणतेतरी प्रमाणपत्र मिळाले आहे, पदवी मिळाली आहे. आणि हे प्रमाणपत्र किंवा पदवी अशा दुसर्या एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून नसावी जिथले शिक्षक पदवीधर नव्हते. कोणी म्हणेल की हे तर कोंबडी आधी की अंडे याप्रमाणेच होईल. याचे कारण असे की जर अभ्यासक्रम सुरू होऊ शकणार नसेल, अभ्यासक्रम फक्त पदवीधर शिक्षक देऊ शकणार असतील तर ही पदवी ते शिक्षक मिळवतीलच कसे? विज्ञानात किंवा इतर ठिकाणी ते कसे होते ते पाहूया.
एखादं क्षेत्र जेव्हा नवीन असतं तेव्हा आधी त्यातील संशोधनाकरता काही लोक प्रस्तावांद्वारे अनुदान मिळवतात. तो प्रस्ताव एखादी विवक्षित गोष्ट करण्यासाठीचा असतो. संलग्न क्षेत्रातील तज्ज्ञ अशा प्रस्तावाची तपासणी करतात आणि मग अनुदान द्यायचं की नाही ते ठरवतात. अनुदान ज्या प्रयोगासाठी मिळाले आहे तो जाहीर केल्या जातो आणि प्रयोग झाल्यानंतर त्यातून काय निष्पन्न झालं ते पण जाहीर केलं जातं. असे काही प्रकल्प जेव्हा यशस्वी होतात तेव्हा यशस्वी गट एकत्र येऊन एखादी संघटना बनवू शकतात. त्या संघटनेद्वारे आधीचे प्रकल्प/प्रमेय जास्त काटेकोरपणे तपासून परिपूर्ण केले जाते. अशा या सर्व अग्निपरीक्षेतून गेल्यानंतर जे लोक तयार होतात ते अशा गोष्टी शिकवू शकतात.
फलज्योतिष कशावर आधारित आहे?
पत्रिका मांडणं हे पूर्णपणे गणिती आहे. पंचांगात जी ग्रहस्थिती दिलेली असते ती वापरून खरं तर कोणीही काही मिनिटांमध्ये पत्रिका मांडणं शिकू शकतो. पंचांगातली ग्रहस्थिती ही खगोलशास्त्रीय निरीक्षणांवरूनच मिळवलेली असते आणि ते तंत्र इतकं प्रगत आहे की ती स्थिती अचूक असते. पत्रिका ही खऱ्या ग्रहांची स्थिती वापरून मांडली गेली असल्यामुळे त्याचा खगोलाशी संबंध नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. त्यामुळे पत्रिकेतील ग्रह जर खगोलीय असतील तर त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम का होऊ शकत नाही ते आधी आपण पाहूया की.
पत्रिकेतील नवग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे ग्रह, त्याचप्रमाणे सूर्य हा तारा, चंद्र हा उपग्रह आणि राहू आणि केतू हे पृथ्वी आणि चंद्र यांच्या सावल्यांपासून निर्माण झालेले काल्पनिक छेदनबिंदू. यातील मंगळ आणि शनी फलज्योतिषात वाईट समजले जातात. ग्रहांचे गुणधर्म लक्षात घेऊ लागलो तर सर्वात महत्त्वाचे ठरावेत ते त्यांचे वस्तुमान आणि त्यांचे आपल्यापासूनचे अंतर. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच इतर ग्रहही फिरतात आणि त्यांची गती वेगवेगळी असते त्यामुळे त्यांचे आपल्यापासूनचे अंतर सदोदीत बदलत असते. त्यामुळे त्यांचा परिणाम हा ते सूर्याशी किती अंशांचा कोन करतात यापेक्षा त्यांचे आपल्यापासून अंतर किती आहे यानुसार ठरायला हवा. भौतिकशास्त्राला ज्ञात चारच बलं आहेत. त्यातील एकच बल अर्थात गुरुत्वाकर्षणशक्ती ही लांब पल्ल्यावर काम करते. म्हणजेच जर शनी, मंगळ, गुरू यांचं एखादं बल आपल्यावर काम करत असेल तर ते गुरुत्वीय बलच असू शकतं. गुरुत्वीय बल हे वस्तुमानाप्रमाणे वाढतं. वस्तुमान दुप्पट झालं तर बलही दुप्पट होतं. त्याउलट अंतर वाढलं की बल कमी होतं आणि तेही वर्गाप्रमाणे. म्हणजेच अंतर जर दुप्पट झालं तर बल चतुर्थांश होतं.
या गणितानुसार जर आपण मंगळाचा आपल्यावर किती परिणाम होऊ शकतो हे पाहिलं आणि त्याची तुलना १०० किलोग्राम वजनाच्या, एका मीटरवर असलेल्या एका व्यक्तीच्या बलाशी केली तर ती दोन्ही बले जवळजवळ सारखीच असतात हे दिसतं. मंगळाचे वस्तुमान एकावर २४ शून्य इतके किलोग्राम आहे आणि त्याचं सरासरी अंतर साधारण एकावर ११ शून्य इतके मीटर आहे. म्हणजेच १०० किलोच्या पहलवानापेक्षा एकावर २२ शून्य इतकं बल वजनामुळे जास्त, पण अंतर एकावर ११ शून्य इतकी मीटर कमी असल्यामुळे त्याचा वर्ग अर्थात एकावर २२ शून्य इतक्या प्रमाणात कमी आणि हे दोन घटक सारखेच असल्यामुळे एकमेकांना रद्द करतात. आता जर फक्त ५० किलोग्राम वजनाचा डॉक्टर एखाद्या व्यक्तीपासून अर्ध्या मीटरवर असेल तर वस्तुमान अर्धे झाले म्हणून बल अर्धे होणार पण अंतर अर्धे झाले म्हणून बल चौपट होणार. म्हणजेच मंगळाच्या दुप्पट. या गणितानुसार एका व्यक्तीचं शेजारच्या दुसऱ्या व्यक्तीवर असलेले गुरुत्वीय बल हे दूर असलेल्या मंगळापेक्षा जास्त असतं. यामुळेच मुलाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या डॉक्टरचे किंवा सुईणीचे गुरुत्वीय बल बालकावर जास्त असतं.
या निर्विवाद युक्तिवादामुळेच अनेकदा फलज्योतिषी म्हणतात की पत्रिकेतले ग्रह फक्त त्यांच्यामधील कोनांपुरते. बाकी मात्र त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. क्षणभर ते खरं आहे असं मानलं, तरीदेखील त्यांचे गुणधर्म कोणते हे सांगायला हे फलज्योतिषी तयार नसल्यामुळे पुढे सगळं अडतं. थोडक्यात काय तर, फलज्योतिष हे पूर्णपणे निराधार आहे. जादूगार ज्याप्रमाणे पोतडीतून हवं तेव्हा हवं ते काढतो त्याचप्रमाणे फलज्योतिषी वाटेल तेव्हा वाटेल ते गुणधर्म या ग्रहांच्या माथी मारतात आणि त्यांच्याद्वारे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या कपाळी काहीबाही थोपतात. खरं तर फलज्योतिषांची हि स्थिती ग्रहांनी ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं‘ अशी केलेली आहे. तरी पण लोक साधारण कोणत्यातरी परिस्थितीमुळे अगतिक झाल्यावरच ज्योतिष्यांकडे जातात. वर दिलेल्या युक्तिवादाची त्यांना माहिती नसते, किंवा त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे काहीही खरं मानण्याची त्यांची मनस्थिती असते, आणि त्यामुळेच फलज्योतिषांचे फावते.
लग्नासारखी नातीसुद्धा सामंजस्यावर, प्रेमावर न बेतता दूरवर असलेल्या निर्जिव आणि त्यामुळे निर्बुद्ध ग्रहांवर सोपवून लोक अजाणता आपल्या (व आपल्या पाल्यांच्या) पायावर कुऱ्हाड मारून घेतात. अनेकदा यातील विजोड लग्न घटस्फोटाच्या दुसऱ्या टॅबूमुळे त्रासदायक संसाराला कारणीभूत होऊ शकतात.
त्यामुळे गरज आहे ती प्रबोधनाची, वरील युक्तिवाद सगळ्यांपर्यंत पोचवण्याची. कार, कंप्युटर वगैरे घेतल्यावर जशी हमी मिळते तशी फलज्योतिषी देऊ लागले तर बहुतांश भाकिते कशी निराधार असतात हे आपसूकच सिद्ध होईल, त्याचा एक संख्याशास्त्रीय पडताळासुद्धा येईल.
खगोलशास्त्राची प्रगती
काही शतकांपूर्वीपर्यंत विजा, वादळे, पूर वगैरे दैवी प्रकोप समजले जायचे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे ठरावीक महिन्यांमध्ये ठरावीक नक्षत्रं दिसतात. पावसाळ्यात दिसणाऱ्या नक्षत्रांचा आणि पावसाचा संबंध जोडला जाणे साहजिक होतं. पण ती नक्षत्रं दिसतात तेव्हा पाऊस पडतो याऐवजी त्या नक्षत्रांमुळेच पाऊस पडतो अशी धारणा जुन्या काळी होती. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे रात्री दिसणारे तारे ठरावीक वेगाने त्यांची स्थानं बदलत. याउलट आपल्याच सौरमालेतील ग्रहांचे खगोलातील भ्रमण अनियमित वाटे. त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं. डोळ्यांनी पाच ग्रह दिसत असल्यामुळे त्यांनाच पत्रिकेत डांबलं. सोबतीला सूर्य–चंद्र होतेच. नंतर सापडलेले युरेनस नेपच्यूनसारखे ग्रह लोकांच्या पत्रिकेत फार काही उच्छाद मांडतांना दिसत नाही. पंधराव्या शतकाच्या सुमारास सौरमालेबद्दलच्या विज्ञानाच्या कल्पना नवीन ज्ञानामुळे उत्क्रांत झाल्या. पृथ्वीसकट इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात हे लक्षात आलं. तेव्हापासूनच खरंतर खगोलशास्त्राची आणि फलज्योतिषाची फारकत झाली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला लागलेल्या दुर्बिणीच्या शोधामुळे गुरू आणि शनीभोवती अनेक चंद्र आहेत हे कळलं. मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान असलेल्या लाखो लघुग्रहांबद्दल कळलं. त्याहीपलीकडे असलेल्या आणि धूमकेतूंना जन्म देणाऱ्या ऊर्ट क्लाउडबद्दल कळलं. धूमकेतू विनाशाचे प्रेषित न राहता वैज्ञानिक कुतूहलाचे विषय बनले. विसाव्या शतकात मानव पृथ्वीभोवती उपग्रह स्थापू लागला. मानवाने अवकाशात भरारी घेतली. तो चंद्रावर जाऊन पोचला. मानवनिर्मित याने मंगळावर तर उतरलीच पण दूरच्या एका धुमकेतूवर*, तसेच एका लघुग्रहावर** देखील जाऊन पोचली. व्हॉयेजर*** याने तर सौरमालेच्या वेशीपर्यंत जाऊन पोचली आहेत. हे सर्व आपल्या सौरमालेतील. ह्यापलीकडे देखील अनेक सुरस शोध मानवाने लावले.
भारतानेही अनेक उपग्रह पृथ्वीभोवती स्थापले, चंद्र–मंगळावरील मिशन्स साध्य केल्या, आणि लवकरच भारतीय मानवालापण अवकाशात पाठवणार आहे. असं सर्व असताना भारतीयांनी, भारतीय समाजाने खगोलीय प्रगतीला प्राधान्य द्यायला हवं कि जुन्या तर्कहीन समजुतींमध्ये अडकून राहून पुढच्या पिढीला अज्ञानात लोटावे हे सुज्ञास सांगणे न लगे. पण अशा सुज्ञ लोकांनी इतरांपर्यंत हे विचार पोहोचवणे अतिशय आवश्यक झाले आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.
* https://en.wikipedia.org/wiki/Philae_(spacecraft)
** https://www.nasa.gov/osiris-rex
*** https://voyager.jpl.nasa.gov/
या लेखाचा काही भाग इतक्यातच दिलेल्या दोन भाषणांवर आणि त्यांच्यावर आलेल्या काही प्रतिक्रियांवर तसेच लोकायत ग्रुपवरील काही चर्चांवर आधारित आहे.
नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक प्रकाशन (१ ऑगस्ट २०२१) https://tinyurl.com/6vrhmj42 (मिनीट २७ पासून)
ब्राइट्स सोसायटी (७ मार्च २०२१) https://tinyurl.com/85stfbpd (मिनीट ८ पासून)
ईमेल: mahabal.ashish@gmail.com
आपणास माहित असावे की, ज्योतीष शास्त्र खगोल शास्त्रावरच आधाररलेले आहे, आणि आपले ऋषि-मुनी हे निष्णात वैषज्ञानिक होते व ते खगोल शास्त्रात पारंगत होते. आपण म्हटल्याप्रमाणे पंधराव्या शतकात खगोलशास्त्राची जास्त प्रगती झाली; पण आपल्या ऋषि-मुनिंनी वैदिक काळापासून म्हणजे हजारो वर्षांपूर्वी पासून खगोल शास्त्रिचा सखोल अभ्यास केलेला होता. ऋग्वेदातील ऋचा १०-१४९-१ मध्ये उल्लेख आहे की, सूर्याने प्रुथ्वी आणि ग्रह-गोलांना आकर्षणाद्वारे (येथें गुरुत्वाकर्षण अभिप्रेत असावे) बांधलेले असून त्यांना, अश्व शिक्षक जसा लगामाच्या सहाय्याने घोड्यांना आपल्या भोंवती फिरत ठेवतो, तसे फिरत ठेवलेले आहे. ऋग्वेदातील षऋचा १-३५-९ मध्ये उल्लेख आहे की, सूर्य स्वतःभोंवती फिरत असून त्याने आकर्षणाच्या (येथेंही गुरुत्वाकर्षण अभिप्रेत असावे) सहाय्याने ग्रह-गोलांना आपल्याभोंवती असे फिरत ठेवलेले आहे की, ते फिरताना एकमेकांवर आदळणार नाहीत. वैदिक काळातील ऋषि-मुनिंना सूर्यग्रहणाचेही ज्ञान होते. ऋग्वेदातील ऋचा ५-४०-५ मध्ये ऋषि महणतात, हे रविराज तुझ्याच प्रकिशाने प्रकाशित झालेल्या चंद्रामुळे तूं झाकला जातोस तेव्हा अचानक होणाय्रा अंधारामुळे (प्रुथ्वी वरील) जीवस्रुष्टी घाबरते. या वरुन चंद्र परप्रकाशित असल्याचे ज्ञान सुध्दा वैदिक काळातील ऋषि-मुनिंना होते हे सिध्द होते. या वरून आपल्या ऋषि-मुनिंनी खगोल शास्त्राचा सखोल अभ्यास केला होता हे दिसून येते. ज्योतिषांनी वर्तवलेल्या भाकितांची प्रचिती आल्यामुळेच लोकांचा ज्योतीष शास्त्रावर विश्वास आहे. आता आपण ज्योतीष शास्त्राच्या विद्यापिठातील अभ्यासक्रमाबद्दल लिहिले आहे त्यात तथ्य आहे. त्या संबंधात तांत्रिक द्रुष्ट्या निर्णय घेऊन प्राध्यापक नेमणे गरजेचे आहे. पण ज्योतीष शास्त्राला नाकारणे योग्य वाठत नाही. फ्रेंच ज्योतीषी अमस्टरडँम याने ४६५ वर्षांपूर्वी १५५५ मध्ये वर्तवलेली हजारो भाकित आज सत्य ठरताना दिसत आहेत. त्याने जरी ती भाकितं काव्यात लिहिली असली आणि त्यात रुफकिंचा वापर केलेला असला; तरी विद्वानांनी त्या रुपकांची केलेली उखल सत्य घटनांशी मिळती जुळती असल्याचे दिसून आले आहे. नास्तीक लोक देवाचे अस्तित्व नाकारत असले तरी देवावर विश्वास ठेवणाय्रांना देवाची प्रचिती येत असते त्याच प्रमाणे अनेक लोकांना ज्योतिषाचीही प्रचिती येत असल्यामुळेच लोकांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे हे मान्य व्हावे.