इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली (इग्नू) जुलै २०२१पासून दूर-शिक्षणाद्वारे तरुणाईला नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एम.ए.(ज्योतिष) अभ्यासक्रम सुरू करीत आहे. सदर अभ्यासक्रमामध्ये पंचाग, मुहूर्त, कुंडली, ग्रहणवेध, ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आदींचा समावेशअसणार असल्याची माहिती विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेली आहे. सन २००१मध्ये यूजीसीच्या माध्यमातून ज्योतिष अभ्यासक्रम सुरू करण्याचानिर्णय तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता. परंतु ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, प्रो. यशपाल आणि इतर अनेक वैज्ञानिकांनीविरोध केल्याने सदर प्रस्ताव रद्द करावा लागला होता. ही पार्श्वभूमी असतानादेखील २०२१मध्ये कोरोनाच्या भीषण परिस्थितीत पुन्हा एकदा हाच विषय आणण्याच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते. कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश, बेरोजगारीचा प्रश्न, उद्योगविश्वात आलेली मरगळ, शेतीविषयक आंदोलन, इत्यादी विषयांवरून लक्ष विचलित करण्यासाठीचे हे प्रयोजन असण्याची दाट शक्यता वाटते. सर्वसामान्यांवर प्रचंड पगडा असलेला हा अवैज्ञानिक विषय स्वत:च्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी उपयुक्त ठरेल असा सत्ताधाऱ्यांचा होरा असावा. संस्कृतीच्या आणि परंपरेच्या नावाखाली हा अवैज्ञानिक विषय आजही आपले अस्तित्व टिकवून आहे, हे भीषण वास्तव आहे.
यापूर्वीच अमेरिकेतील ‘द ह्युमॅनिस्ट’ मासिकाच्या सन १९७५मधील अंकात डॉ.एस.चंद्रशेखर आणि इतर अठरा नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांसहित १८६ प्रतिथयशशास्त्रज्ञांनी स्वत:च्या स्वाक्षऱ्यांनिशी फलज्योतिषविरोधी निवेदन प्रसिद्ध केले होते. अती दूर असणारे तारे किंवा ग्रह मानवी जीवनावर प्रभाव टाकतात, हे असत्यअसून फलज्योतिषाच्या भाकितांना कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे त्यांनी निवेदनात स्पष्टपणे नमूद केले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) तरुणाईला बरोबर घेत चंद्राला अथवा मंगळाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असताना इग्नूसारखे विद्यापीठ त्याच तरुणाईला बरोबर घेत, खगोलविज्ञानासमोर बिलकूल न टिकणारी ज्योतिषाची पदवी बहाल करीत आहे. पदवी प्राप्त करून हीच तरुणाई तमाम समाजाला कडक मंगळात आणि शनीच्यासाडेसातीत अडकवत त्याचे मानसिक, आर्थिक आणि शारीरिक शोषण करणार हे निर्विवाद सत्य आहे. शिक्षणातून शहाणपण येते असे म्हणतात; परंतु अशा प्रकारचेशिक्षण समाजाला अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत ढकलून देर्इल यात तिळमात्रही शंका नाही.
‘ज्योतिष’ आणि ‘फलज्योतिष’ या दोनही शब्दांचे अर्थ एकच असल्याचा सर्वसामान्यांचा समज आहे. रात्री आकाशात दिसणाऱ्या चांदण्यांचा म्हणजेच ज्योतींचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ‘ज्योतिष’ या शाखेची निर्मिती केली. पिढ्यानुपिढ्यांच्या निरीक्षणानंतर आकाशातील खगोलीय वस्तुंमधील गणितीय संगती शोधून काढण्यात मानवाला यश आले. असंख्य चांदण्यांच्या पार्श्वभूमीवर काही चांदण्या आपली जागा बदलतात असे निदर्शनास आले. सदर चांदण्यांना पाश्चात्यांनी ‘भटके’ अर्थात ‘प्लॅनेट’ तर भारतीयांनी ‘ग्रह’ म्हणून संबोधले. आकाशामध्ये आपले स्थान न बदलणाऱ्या चांदण्यांना तारे म्हणून ओळखले गेले. आकाशातील या ताऱ्यांचे पाश्चात्यांनी राशींच्या रूपाने १२ समूह, तर भारतीयांनी नक्षत्रांच्या रूपाने २७ तारकासमूह तयार केले. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र आणि राशी यांचापरस्परसंबंध सांगणारे शास्त्र म्हणून ‘ज्योतिष’ ओळखले जात होते. आजचे तथाकथित ‘फलज्योतिष’ या व्याख्येमध्ये बिलकूल बसत नाही.
राजेशाहीच्या कालखंडामध्ये ज्योतिष्यांनी मानवी जीवनावर ग्रह-ताऱ्यांचा प्रभाव पडतो, असे सांगण्यास सुरुवात केली आणि ज्योतिषाची जागा फलज्योतिषाने घेतली. ज्योतींच्यामुळे मानवास मिळणारे ‘फल’ म्हणून ‘फलज्योतिष’. मानसन्मानाबरोबरच आर्थिक फायदा होतो असे लक्षात आल्यानंतर फलज्योतिष्यांनी आपलेबस्तान बसवण्यास सुरुवात केली. आजचे भविष्य सांगणारे भविष्यवेत्ते स्वत:ला ज्योतिषी समजतात. प्रत्यक्षात ते फलज्योतिषी आहेत हे वास्तव लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
एकविसाव्या शतकात शालेय अथवा महाविद्यालयीन स्तरावर मिळणारे ग्रह-ताऱ्यांचे ज्ञान ज्योतिष्यांना असलेल्या ज्ञानाच्या तुलनेत अत्यंत आधुनिक आहे. आजचे विद्यार्थी दीर्घिका, कृष्णविवर, सुपरनोव्हा, गुरुत्वीय लहरी, इत्यादी विषयांचा अभ्यास करीत आहेत. असे असले तरी सर्वसामान्यांना मात्र पंचांग आणि ज्योतिष याविषयात प्रचंड रस आहे. ज्योतिषामध्ये वापरण्यात येत असलेल्या संकल्पना अवैज्ञानिक आहेत आणि त्यांचा उहापोह केल्याशिवाय फोलपणा लक्षात येणार नाही. वानगीदाखल काही संकल्पनांचा वेध घेऊया.
- ज्योतिषाचा अभ्यास नवग्रह संकल्पनेशी निगडीत आहे. नवग्रह म्हणजे नऊ ग्रह. त्यांचा अभ्यास बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, सूर्य, चंद्र, राहू आणि केतू या नऊग्रहांभोवती फिरतो. यांच्या ग्रहांच्या संकल्पनेत पृथ्वी नाही. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह, तर सूर्य हा तारा असूनही ग्रह म्हणून त्याची मान्यता! राहू आणि केतू हे ग्रहनसून काल्पनिक बिंदू आहेत, पण यांच्या दृष्टीने ग्रहच! व्यक्तीचे भरणपोषण करणाऱ्या पृथ्वीला ग्रहाचा दर्जा यांनी दिलेला नाही. युरेनसला आणि नेपच्युनला तेग्रहांच्या व्याख्येत घेत नाहीत. शाळेत असताना आठ ग्रह शिकणारा मुलगा ज्योतिषी झाल्यानंतर समाजाला नऊ ग्रह शिकवणार. तेपण मूळ ग्रहांहून वेगळे! ज्योतिष विषय विद्यापीठात शिकवण्याचे समर्थन करणारे असे म्हणतात की, कलाशाखेत हा विषय शिकवला तर काय बिघडले? विज्ञानात आठ ग्रह असतील, तर कलाशाखेत ते नऊ होतात, असे तर त्या समर्थकांना यानिमित्ताने सुचवायचं नसेल ना!
- युरेनस, नेपच्यून हे ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. दुर्बिणीच्या शोधानंतर या दोन ग्रहांचा शोध अनुक्रमे सन १७८१ आणि सन १८४६ मध्ये लागला. त्यानंतरज्योतिष्यांनी यांना पत्रिकेत स्थान दिले. पाश्चात्यांनी शोधलेल्या ग्रहांचा वापर करण्याचा अधिकार यांना संस्कृतीने दिला की परंपरेने? आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रपरिषदेने प्लुटोचे ग्रहपद सन २००६मध्ये काढून घेतलेले असून त्याला ‘बटू-ग्रह’ म्हणतात. स्वत:चे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी ज्योतिष्यांनी अजूनही त्यालापत्रिकेमध्ये ठेवलेले आहे. हे नवग्रहांची संकल्पना मांडतात; पण प्रत्यक्षात बारा ग्रहांचा वापर करतात. बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, सूर्य, चंद्र, राहू, केतू, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. यात पृथ्वी नाही हे लक्षात घ्या. मुख्य म्हणजे विज्ञानाने ग्रहाचा दर्जा दिलेल्या पृथ्वीवर राहून ते त्यांनी ठरवलेल्या बारा ग्रहांचा वापर करत आहेत. धन्य त्यांचा ग्रहांचा अभ्यास!
- रास ही संकल्पना पाश्चात्यांची आहे, तर नक्षत्र ही संकल्पना भारतीयांची आहे. भारतीयांचे सर्व सण आणि उत्सव नक्षत्रांवर अवलंबून आहेत, हे त्याचे द्योतक आहे, नव्हे वास्तव आहे. असे असताना व्यक्तीची पत्रिका तयार करताना मात्र ज्योतिषी ती बारा घरांची करतात. बारा घरे बारा राशींसाठी असतात. ज्योतिष्यांना आपल्या अभ्यासाचा अभिमान असेल, तर त्यांनी पत्रिका २७ घरांच्या करायला हव्या होत्या. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी ठरवले तर नवीन अभ्यासक्रमात ते तसे टाकू शकतात.
- रास किंवा नक्षत्र म्हणजे आकाशातील ताऱ्यांचे समूह. तारे म्हणजे दुसरे सूर्य. आकाशातील बारा स्टॉप म्हणजे बारा राशींच्या पार्श्वभूमीवर ग्रह फिरतात. सर्वात दूरचा बटू-ग्रह, प्लुटो आपल्यापासून सहाशे कोटी तर मंगळ ग्रह बावीस कोटी किलोमीटर अंतरावर आहे. शेजारच्या घरात काय चाललेले आहे, ते आपल्याला समजत नाही. तर इथे ज्योतिषी बावीस कोटी किलोमीटर अंतरावरील मंगळाचा हवाला कसा देत असतील? भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेपर्यंत पोहोचायला तीनशे दिवसलागले, हे कडक मंगळवाल्यांनी लक्षात घ्यायला हवे.
- तारे प्रचंड दूर आहेत. पंधरा कोटी किलोमीटर अंतरावरील आपल्या सूर्यापासून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला जवळपास आठ मिनिटे लागतात. याचा अर्थ आपण नेहमी आठ मिनिटांपूर्वीचा सूर्य पाहात असतो. आठ मिनिटे जुना. ज्येष्ठा नावाच्या ताऱ्यापासून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला नऊशे वर्षे लागतात. याचा अर्थ आज रात्री आपण पाहिलेला ज्येष्ठा तारा नऊशे वर्षांपूर्वीचा असणार. तीन ज्येष्ठ आले की लग्न करीत नाहीत. पण ते ज्या ताऱ्याशी निगडीत आहे तो ज्येष्ठाचा तारा सन ११२१ मधला आहे. तो कशाला विघ्न आणेल? आणि १९२१ पूर्वी काय विघ्ने येत नव्हती काय? आली तर तेव्हा ती कोणामुळे आली असणार? मुलगा आणि मुलगी ज्येष्ठ म्हणजे मोठे आणि ज्येष्ठ महिना असा योग आला, तर त्याला ‘त्रिज्येष्ठा’ म्हणत लग्नाला परवानगी न देणारी ही व्यवस्था! यातील ज्येष्ठ महिना तेवढा ज्येष्ठा ताऱ्याशी संबंधित आहे. आणि तोही सन ११२१ मधील. इतर दोन ज्येष्ठ हे सर्वात मोठा या अर्थाने आहेत. तीन ज्येष्ठांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसताना केवळ समाजाला आपल्या मुठीत ठेवण्यासाठीचे योगांचे प्रयोजन. समर्थन करणारे म्हणतात ज्योतिषाचा अभ्यास नसेल, तर बोलण्याचा अधिकार नाही. हा असला अतार्किक अभ्यास न केलेलाच बरा!
- धुव ताऱ्याकडून प्रकाश आपल्यापर्यंत यायला तीनशे पंचाहत्तर वर्षे लागतात. याचा अर्थ आज रात्री ध्रुव तारा आपण पहिला, तर तो तीनशे पंचाहत्तर वर्षापूर्वीचा असणार. आज ऑगस्ट २०२१ मध्ये पाहिलेला ध्रुव तारा प्रत्यक्षात सन १६४६ सालातला आहे. अचंबित झालात ना! थोडक्यात रात्रीच्या वेळी आकाशातदिसणारे तारे हजारो वर्षांपूर्वीचे आहेत. ज्योतिषी मंडळीनी या हजारो वर्षांपूर्वीच्या ताऱ्यांचा संबंध मानवी सुख-दु:खाशी लावलेला आहे. रात्रीच्या आकाशातील हे फार-फार वर्षांपूर्वीचे तारे आपल्या आयुष्यात डोकावण्याची बिलकूल शक्यता नाही.
- दैनंदिन जीवनात रात्री बारा वाजून गेल्यांनतर नवीन दिवसाची सुरुवात होते. ज्योतिषाच्या दृष्टीने दिवसाची सुरुवात सूर्योदय झाल्यानंतर होते. सूर्योदय ते सूर्योदय असा त्यांचा दिवस असतो. हा अभ्यास व्यवहारात अमलात आणणे ज्योतिषाचे समर्थन करणाऱ्यांना तरी झेपेल काय? एवढेच नाही, भारतामध्ये पूर्वेकडेसूर्योदय लवकर होतो, तर पश्चिमेला उशिरा. पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, राजस्थान, मध्यप्रदेश अशा सर्वच राज्यांतील ज्योतिष्यांच्या दिवसाची सुरुवात वेगवेगळया वेळी होणार. हे विचित्र वाटत नाही का?
- ज्योतिष्यांच्या संशोधनानुसार सूर्यमालेचा केंद्रबिंदू सूर्य नसून पृथ्वी आहे. शालेय मुले सूर्य केंद्रबिंदू आहे असे शिकतात. ज्योतिषी झाल्यानंतर हाच मुलगा पृथ्वीकेंद्रबिंदू आहे असं सांगत फिरणार. सूर्य केंद्रबिंदू आहे असे सांगणाऱ्या गॅलिलिओला सतराव्या शतकात तुरूंगवासाची शिक्षा झालेली होती. एकविसाव्याशतकात भारतात कदाचित ही परिस्थिती निर्माण होऊ शकते.
- ज्योतिषाला महत्त्वपूर्ण ठरणारी जन्मवेळ ही सापेक्ष आहे. डॉक्टरचे वा नर्सचे घड्याळ, दवाखान्यातील घड्याळ, टीव्हीमधील वा रेडिओचे घड्याळ, आई-वडिलांचे घड्याळ यांपैकी कोणती वेळ ग्राह्य धरणार? तसे पाहिले तर बाळाचा जन्म नऊ महिन्यांपूर्वीच झालेला असतो. तसेच मूल रॉकेटने उड्डाण केल्यासारखेक्षणार्धात पृथ्वीवर प्रवेश करत नाही. बराच कालावधी त्यासाठी लागतो. जन्मवेळ कोणती गृहीत धरायची? मुलाचे पाय बाहेर आल्यानंतर? की डोके बाहेर आल्यानंतर? काहीवेळा मातेच्या आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सिझरीन करावे लागते. ते केव्हा करायचे हा निर्णय पूर्णपणे डॉक्टरांवर अवलंबून असतो. असेअसेल तर, डॉक्टरांनी मुलाच्या जन्माची वेळ स्वत: ठरवली असा होतो. जन्मवेळेवर पत्रिका काढून भविष्य सांगणाऱ्यांनी याबाबत काही विचार केल्याचे ऐकिवात नाही. कारण पालकमंडळी जी जन्मवेळ सांगतात त्यावरच पत्रिकेचा डोलारा उभा केला जातो, हे वास्तव आहे.
- शालेय अभ्यासक्रमामध्ये ग्रह-ताऱ्यांचा आणि ग्रहणांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही, असे शिकवले जाते. तर ज्योतिषशास्त्र समाजमनावर याच्या अगदी उलट, म्हणजे, मानवी जीवनावर ग्रहांचा व ग्रहणांचा परिणाम होतो, असे बिंबवणार. शाळेत एक आणि विद्यापीठात दुसरेच! विज्ञानशाखा वास्तव सांगणार आणि कलाशाखा वेगळेच! ज्या वयात चिकित्सकवृत्ती आणि जिज्ञासा ठासून भरलेली असते त्या शालेय वयात मुले ग्रह-ताऱ्यांचा वास्तव अभ्यास करणार. ज्यावेळी ती आपल्या चरितार्थाचा विचार करणार, त्यावेळी चिकित्सेला तिलांजली देत समाजाला आभासी दुनियेत नेणार, तेही विद्यापीठाच्या सहकार्याने, हा विरोधाभास आहे!
फलज्योतिषाचा अभ्यास नसताना त्याला विरोध करणे योग्य नव्हे, असे काही जणांचे मत असते. त्यांच्यासाठी पत्रिका जुळवण्याचा प्रकार थोडासा उलगडून दाखवतो. छत्तीस गुणांच्या या परीक्षेत अठरा गुण पडले की उत्तीर्ण. पन्नास टक्क्याला उत्तीर्ण. यासाठी मुलामुलींना लेखी, तोंडी अथवा सीईटी अशा कोणत्याही परिक्षेला समोर जावे लागत नाही. पत्रिका दिली की, ज्योतिषी आपल्या हिमतीवर परीक्षा घेतात आणि गुण देऊन रिकामे होतात. सदर परीक्षा आठ विभागांमध्ये विभागलेली आहे. त्यापैकी ‘वर्णगुण’ विभागानुसार मुलामुलींची चार वर्णात विभागणी केलेली आहे. विप्र, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र. या निराधार विभागणीचे शुद्राला वाईट वाटेल की नाही? विप्र म्हणजे ब्राम्हण! हे सुज्ञाला सांगायला नको. वरच्या वर्णातील मुलाने त्याच्या अथवा खालच्या वर्णातील मुलीशी लग्न केल्यास एक गुण. मुलीने असे केले, तर मात्र शून्य गुण. शुद्र मुलाला त्यांनी पर्यायच ठेवलेला नाही. शुद्र मुलाला फक्त आणि फक्त शुद्र मुलगीच. वर्णागुणाचे टेबल पंचांगात अधिकृतपणे दिलेले आहे. ते पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकालाच भिडायला पाहिजे, विचार करणाऱ्यांच्या! पण हे होत नाही कारण गुण कसे जुळवतात याची काडीचीही कल्पना समाजाला नाही.
मुलगी | मुलगा | |||
विप्र | क्षत्रिय | वैश्य | शुद्र | |
विप्र | १ | ० | ० | ० |
क्षत्रिय | १ | १ | ० | ० |
वैश्य | १ | १ | १ | ० |
शुद्र | १ | १ | १ | १ |
संस्कृतीच्या अधिकारामुळे वरिष्ठ जातीतील मुलाने कनिष्ठ जातीतील मुलीशी लग्न केले तर चालते, पण मुलीला मात्र तशी परवानगी नाही. आर्ची आणि परश्याचासैराट! सर्वसामान्यांच्या मनात सैराटने जे घर करून ठेवले आहे, ते केवळ या एका गुणामुळेच. लिखित साहित्य समाजमन कसे कायमस्वरूपी बधीर करून टाकते, याचा हा उत्तम नमुना! पुरूषांमध्येही ब्राह्मण मुलाला उच्चस्थान! इग्नू विद्यापीठातून बाहेर पडणारे भावी ज्योतिषी संस्कृतीच्या नावाखाली भारतामध्ये वर्णव्यवस्था घट्टकरणार! वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था आणि स्री-पुरुष असमानतेचे समर्थन करणारा हा प्रकार संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरूद्ध आहे. ज्योतिषाचे समर्थनकरणाऱ्यांना ही गुणव्यवस्था मान्य आहे का? हा मुख्य प्रश्न आहे.
ग्रहांची, ताऱ्यांची आणि नक्षत्रांची पूर्वजांनी जमा केलेली माहिती निश्चितच वैज्ञानिक होती. मात्र काही स्वार्थी लोकांच्या मनात सदर माहितीचा दुरूपयोग करण्याची उर्मी आली आणि फलज्योतिषाने जन्म घेतला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. सत्तावीस वजा नऊ किती? असा प्रश्न कोणालाही विचारला, तर उत्तर अठराच येणार. परंतु हाडाच्या शेतकऱ्याचे या प्रश्नासाठीचे उत्तर मात्र शून्य असते. याचे कारण दडलेले आहे नक्षत्रांशी! शेतकऱ्याच्या दृष्टीने मृग नक्षत्र लागले की, पावसाळा सुरू आणि हस्त लागले की, पावसाळा समाप्त. मृग ते हस्त या दरम्यान नऊ नक्षत्रे येतात. सत्तावीसमधून पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली, याचा अर्थ पाऊसच पडणार नाही. मग पिकणार काय? म्हणून शेतकरी शून्य म्हणतो. हे शेतकऱ्याचे गणित त्याच्या दृष्टीने बरोबरच आहे. अर्थात पाऊस नक्षत्रावर अवलंबून नाही, परंतु त्याने शेतीचा संबंध आकाशातील ताऱ्यांशी जोडला. पेरणी कधी करायची, कापणी कधी करायची, पाऊस कधी पडणार आणि कधी संपणार हे आडाखे तो आकाशातील तारे बघून बांधत होता. हे भान त्याला ऋतुचक्राचे ज्ञान देत होते. शेतीसाठी ते आवश्यक होते. दुसऱ्याला फसवण्यासाठी त्याने या माहितीचा कधीही वापर केला नाही. शेतकऱ्याचा ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास फारच चांगला होता. परंतु लेखणी त्याच्या हातामध्ये नव्हती. लेखणी ज्यांच्या हातामध्ये आली त्यांनी या ग्रह-ताऱ्यांचा दुरूपयोग केला आणि समाजाला फसवण्याचे काम केले. आजही मुहूर्त बघायला शेतकरी त्यांच्याकडे जातोय. खरे म्हणजे जाण्याची गरज नव्हती. अहो एवढेच काय, म्हैस हरवली तरी त्यांच्याकडे जातात. “कुठे गेली” म्हणून विचारायला? ते महाशय इकडची तिकडची पाने उलगडत “उत्तर दिशेला गेलेली आहे, शोधा म्हणजे सापडेल”, असे सांगतात. वास्तविक पाहता म्हैस काय त्यांना सांगून जाते का, की मी उत्तरेला निघालेली आहे, ते आले की त्यांना सांगा! विचारच करायचा नसेल, तर असे पर्याय सुचतात. उत्तर देणारे पण न गडबडता उत्तर देतात, कारण मामला आर्थिक असतो. विना कष्टाचा!
अंतराळात झेप घेत, दुर्बिणीच्या सहाय्याने शोध लावत, नोबेल पारितोषिक पटकावत, भारतीयांचा उर अभिमानाने भरून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी तरुणाई आपणाला निर्माण करायची आहे की, समाजाचे शोषण करणारी? याचा विचार पालक म्हणून आपणाला करावाच लागेल. “काय बिघडले ज्योतिष विषय शिकवला म्हणून?” असे म्हणणाऱ्यांनी भावी पिढ्यांचा विचार करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा त्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत.
अभ्यासक्रम ठरवताना संशोधनाला, विश्वासार्हतेला आणि सत्यतेला महत्त्व दिले जाते. ज्योतिष या पातळीवर अजिबात टिकत नाही. अवैज्ञानिक ज्ञान तरूणाईला देऊन आपण काय साध्य करणार आहोत? शैक्षणिक धोरणाच्या गाभ्यातच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश केलेला आहे पण प्रत्यक्षात मात्र नेमका उलट व्यवहार! आर्थिक विवंचनेतून आणि बेरोजगारीतून मार्ग काढण्यासाठी समाजाला पुन्हा एकदा त्याच खाईत लोटण्याचे हे षडयंत्र आहे. संस्कृतीतून आणि पंरपरेतून आलेलं ज्ञान समाजाला उन्नत करणारे आणि पुढे घेऊन जाणारे असेल, तर ते देण्याला कोणाचीच हरकत नाही. अंधश्रद्धेचा प्रसार करणारे ज्ञान समाजाला अविवेकी बनवेल यात तिळमात्र शंका नाही. म्हणून माणसाला गुलामीत ढकलणारा आणि शोषणावर आधारलेला हा अभ्यासक्रम समाजानेच नाकारला पाहिजे.
खगोल अभ्यासक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मोबाईल: ९८६०४३८२०८
छान माहिती
धन्यवाद