कवीची कैद

इथे या आटपाट नगरात कवीलाही होऊ शकते कधीही कैद
तशी कवीची कैद फार सामान्य झाली सांप्रतकाळी
कदाचित म्हणून कविता लिहिताना कवीला
तोल सांभाळत लिहावं लागतं मन आणि लेखणीचा,
जाम कसरत करावी लागते कवितेचा एकेक शब्द कागदावर उतरवतांना

त्याला जपून लिहावे लागतात शब्द प्रतिमा-प्रतीकं म्हणून
त्याला जपून वापरावे लागतात कवितेच्या पोस्टरचे रंग
चुकून कधीतरी लाल, निळा, हिरवा इ. इ.
किंवा तत्सम रंग वापरला तर होऊ शकते त्याची पंचाईत
कवीला शब्दकोशही रचावा लागतो नव्याने
ज्यात काही शब्द नसावे म्हणून करावी लागते धडपड
उदा. प्रतिकार, प्रेम, परिवर्तन, क्रांती, उत्क्रांती किंवा शांती वगैरे.

कवीची कैद टळावी म्हणून कवीने टाळावे
परिवर्तनक्रांतीउत्क्रांतीनैतिकताइत्यादीचे रिकामचोट स्वप्न
कवीने टाळावे रोखठोक बोलण्याचे धंदे
कवीने टाळावे लिहिणे व्यथा अन्याय अत्याचाराच्या
कवीची कैद टळावी म्हणून कवीने माराव्या बोंबा
सर्वत्र सर्वकाही आलबेल असल्याच्या

त्यापेक्षा हस्तिदंती मनोऱ्यात बसावं कवीने
लिहाव्या गुडीगुडी अन् अलंकारिक कविताबिविता
त्याने लिहावं शेतीमातीमायमाणूसनातेदेशधर्मजातीपातीवर
मात्र लिहिताना अजिबात तोल जाऊ नये कवीचा
अन्यथा दरबारी टोले खाण्यास असावे सादर

तद्वतच कवीने लिहावे कशिदे,
कवीने वाहावी स्तुतिसुमने
पुरस्काराचा भाकरतुकडा फेकणाऱ्यांवर..
अशा या व्यवस्थेच्या चरणी कवीने गाळावी लाळ सन्मानाने
कवीचा लाळघोटेपणा कवीनेच विकावा इमानेइतबारे
राज्यकर्त्यांच्या बाजारात चारदोनपैसेपुरस्कारपदं मिळावे म्हणून

कवीने चुकूनही असू नये सामाजिकराजकीयसांस्कृतिक
कवीने चुकूनही करू नये सामाजिकराजकीयसांस्कृतिक बाता
आखीव अशा साहित्यचौकटीत त्यानं जगावंमरावं त्याच्या मौतीनं

तरी काही कवी कैदेच्या भीतीने लिहिणंवाचणंबोलणं बंद करतनै
कोणतीही भीड न ठेवता ते जगत राहतात शांतिपूर्ण कोलाहलात
शांततेने कविताबिविता लिहून शांतता भंग केली म्हणून
लोकांना आवडणारी कविता ऐकवण्याऐवजी
कवी बोलतो मनातलं काहीबाही कवीकट्ट्यावर म्हणून
किंवा तशी कैदेचे निकष पूर्ण करणारी लेबलं लावून
किंवा कोणत्याही भलत्यासलत्या मार्गाने

इथे या आटपाट नगरात कवीलाही होऊ शकते कधीही कैद
आणि कवीच्या कैदेने कुणालाही झ्याट फरक पडत नसतो.

°°°
1.http://www.dailymirror.lk/news-features/The-Mannar-Poet-Behind-Bars/131-203262

2.http://www.ft.lk/news/Poetic-injustice–Another-writer-languishes-in-prison-under-PTA/56-710172

3.https://mypoeticside.com/featured/behind-bars

4.https://www.google.com/amp/s/www.nationalheraldindia.com/amp/story/india%252Fvarvara-rao-a-poet-in-prison-why-is-the-govt-scared-of-him

अभिप्राय 1

  • Rahool Khandagle yanchi hee kavita cmunist country aatil kavine lihili asavi ase vatate. Aapalya deshat abhivyakti swatantryavar bandi asati tar evhadya ashil bhashetil kavita chhapalich geli nasati. Malavatate Aajacha Sudharakcha darja khalavla asava. Indira Gandhinchya kalatil Aani Banichya kalat abhivyakti svatantrya var nirbandha ladale gele hote aani anek sahittyik turungat takale hote. Pan bhrashtacharavar aala ghalun deshat vikas kela jat asatana jyanchya nadya aavalalya gelya aahet tech lok bombabomb karatana disat aahet ase vatate. Swatatrya prapti pasunchya bahattar varshat garib shetkaryanchya paristhitit kahi sudharana zali nahi, tenvha he kavi kuthe gele hote? Baghanyacha drushtikon,dusare kay?

    राहुल खंडागळे यांची कविता कम्युनिस्ट देशातील कवीने लिहिली असावी असे वाटते. आपल्या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बंदी असती तर एवढ्या अश्लील भाषेतील कविता छापलीच गेली नसती. मला वाटते `आजचा सुधारक’चा दर्जा खालावला असावा. इंदिरा गांधींच्या काळातील आणिबाणीच्या काळात अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध लादले गेले होते आणि अनेक साहित्यिक तुरूंगात टाकले होते. पण भ्रष्टाचारावर आळा घालून देशात विकास केला जात असताना ज्यांच्या नाड्या आवळल्या गेल्या आहेत तेच लोक बोंबाबोंब करताना दिसत आहेत असे वाटते. स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच्या ७२ वर्षांत गरीब शेतकऱ्यांच्या परिस्थितीत काही सुधारणा झाली नाही, तेव्हा हे कवी कुठे गेले होते? बघण्याचा दृष्टिकोन, दुसरं काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.