अरिष्टांच्या काळात माणसाला सुस्पष्ट आत्मविश्वासाची आणि डोळस आशावादाची गरज असते. कोविड-१९ अरिष्टाने आपल्या पूर्वश्रद्धा, विश्वास आणि समजुतींमध्ये आमूलाग्र बदल घडविला आहे. प्रत्येक अरिष्टाप्रमाणेच कोविड-१९ अरिष्ट हे सुद्धा ‘मानवी कृतीमागच्या प्रेरकशक्तीं’तून (Spring of human action) उद्भवले असून, मानवाने आपल्या ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या जोरावर भौतिक जगावर आणि निसर्गसृष्टीवर मिळविलेल्या आणि उत्तरोत्तर वाढतच जाणाऱ्या वर्चस्वाचे ते फलित आहे. या अरिष्टाच्या दीर्घकालीन व विशेषतः आर्थिक परिणामांविषयी तज्ज्ञांमध्ये विचारमंथन सुरू झाले असून, संभाव्य उपायांची मांडणी केली जात आहे. भारतात, अल्पकाळात लोकांना रोजगार देऊन दीर्घकाळात त्यांची क्रयशक्ती/मागणी वाढवणारे अर्थधोरण स्वीकारावे की आधी लोकांच्या जीविताला प्राध्यान्य द्यावे, हा एक मोठाच पेचप्रसंग आहे. हा प्रश्न राज्यसंस्थेच्या व अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाचा आहे. कोरोना महामारीनंतर जगात सामाजिक पुनर्रचना करताना अर्थव्यवस्थेचे कोणते ‘प्रारूप’ (model) स्वीकारावे याचा विचार सुरू आहे, यासंदर्भातच आता आपण प्रमुख व्यवस्थाप्रकार व त्यांचा व्यक्तीच्या मनोरचनेवर होणारा परिणाम अभ्यासूया आणि अगदी संक्षेपात त्यांची तपासणी करूया.
• भांडवलशाही आणि मानसिकता •
भांडवलशाहीतील प्रत्यक्ष अरिष्टांविषयी बरीच मांडणी झालेली आहे, त्याचे श्रेय बहुधा कार्ल मार्क्स यांनाच दिले जाते. भांडवलशाहीच्या मानसिक परिणामांची चर्चा करताना मार्क्सनी “भाांडवलशाहीत व्यक्ती स्वत:पासूनही दुरावते.” हा निष्कर्ष काढला होता; पण मार्क्सला या विधानातून काय म्हणायचे आहे? समाजसंस्थेचे स्वरूप म्हणून भांडवलशाहीचा मनोरचनेवर जो परिणाम होतो, त्याकडे अभियांत्रिकी दृष्टिकोनाने प्रभावित आधुनिक अर्थतज्ज्ञांचे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. यासंदर्भात आपण श्री.एरिक फ्रोम यांच्या समीक्षेद्वारे मार्क्सच्या विधानाचा मथितार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या ‘स्वातांत्र्याचे भय’ (Fear of freedom) या जगप्रसिद्ध ग्रंथात श्री.एरिक फ्रोम लिहितात, “अर्थव्यवस्थेचे व्यक्तिवादी स्वरूप हे एक वादातीत सत्य आहे. व्यक्तीचा एकाकीपणा, मानसिक ताण, निराशा, भयग्रस्तता वाढविण्याच्या बाबतीत या आर्थिक व्यक्तिवादाचा जो परिणाम झाला आहे, तो तेवढा संशयास्पद भासू शकतो. भांडवलशाहीतील प्रचलित सिद्धांतात असे गृहीत धरतात की आधुनिक समाजामध्ये मानव हा सर्व क्रियांचे केंद्र आणि उद्दिष्ट बनला आहे. तो जे काही करतो, ते स्वत:साठी करतो आणि स्वहिताचे तत्त्व व अहंमन्यता या गोष्टी मानवाच्या क्रियाशीलतेमागच्या समर्थ अशा प्रेरणा बनल्या आहेत. भांडवलशाहीमुळे व्यक्तीच्या स्वतंत्र अस्तित्वाचे सुस्पष्ट निर्धारण तर झालेच, परंतु त्याबरोबरच भांडवलशाहीने आत्मनकार आणि विरक्त वृत्तीही निर्माण केली.” श्री.फ्रोम पुढे म्हणतात, “भांडवलशाहीत आर्थिक घडामोडी, यश आणि भौतिक फायदे ही स्वत:च ध्येये (End-in-itself) बनतात. अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लावणे आणि भांडवलाचा संचय करणे (Accumulation of capital) हे माणसाचे नशीब बनते. या गोष्टी स्वत:च्या सुखासाठी केल्या जात नाहीत, तर त्या गोष्टी त्या गोष्टींसाठीच केल्या जातात. मनुष्य हा एका प्रचंड अशा आर्थिक यंत्रातील एक दात बनतो. आर्थिक उद्दिष्टांचे साधन बनल्यामुळे व्यक्तीला गौणत्व येते.”
भांडवलशाही समाजरचनेवर व तिच्या मनोरचनेवर होणाऱ्या परिणामांचा हा एक गंभीर खुलासा आहे. श्री.एरिक फ्रोम यांच्या विश्लेषणातून मार्क्सच्या विधानाचा मथितार्थ स्पष्ट झाला आहे. भांडवलशाहीत व्यक्ती स्वत:पासून दुरावते, ती एकाकी, निराश आणि आत्ममग्न बनत जाते, हे मार्क्स आणि फ्रोम यांच्या कथनाचे सार आहे.
आदरणीय बर्ट्रांड रसेलांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, मानवातील सरजनशील प्रेरणांना (Creative impulses) कमी करून किंवा त्यांना वर्चस्वप्रेरणेचे (Possessive impulses) रूप देऊन भांडवलशाही अर्थव्यवस्था व्यक्तीच्या जैविक प्रेरणेवर दुसऱ्यांच्या इच्छेनुसार बंधने लादते, अश्यावेळी एक व्यक्ती दुसऱ्याच्या इच्छेचे साधन बनते. ह्या साधन बनलेल्या व्यक्तींच्या श्रमात ‘जैविक प्रेरणेच्या आवडी’ (Instinctive Liking) तर नसतातच; पण व्यक्तिवादी स्वरूपामुळे ‘समान उद्देश’सुद्धा (Common purpose) शक्य नसतो. या दोन गोष्टी माणसामाणसांतील चांगल्या संबंधांचे आधार असतात. पण जेव्हा व्यक्ती अशाप्रकारे ‘साधन’ बनते, तेव्हा सामाजिक ऐक्य तर धोक्यात येतेच, त्याबरोबरच ती व्यक्तीही गुलाम होत जाते.
‘व्यक्तिस्वातंत्र्य’ हा भांडवलशाहीचा गाभा समजला जातो; परंतु भांडवलशाहीत स्वातंत्र्याचा उपभोग कोण घेत असते? ते स्वातंत्र्य कुणाचे असते? हा खरा प्रश्न आहे. औद्योगिक निर्णयप्रकियेत मालकांएवढेच श्रमिकांनासुद्धा निर्णयस्वातंत्र्य, निवडीचे स्वातंत्र्य असते काय? त्यांना उत्पादनविषयक, वेतननिश्चितीविषयक निर्णयप्रकियेत सहभागी केले जाते काय? याचे उत्तर निराशाजनक आहे. खरेतर, वसाहतवादाविरुद्ध लढताना राजकीय लोकशाहीच्या स्थापनेसाठी अगणित स्त्री-पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली; परंतु जेवढे प्रयत्न राजकीय लोकशाहीचा डोलारा उभा करण्यासाठी झाले, तसेच प्रयत्न औद्योगिक क्षेत्रात आर्थिक लोकशाही (Economic Democracy) आणण्यासाठी झाले आहेत काय? सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक लोकशाहीच्या (Social Democracy) मार्गावर किती सरकारे चालली? आपल्याजवळ पळवाटा आहेत; पण या प्रश्नांची विश्वासार्ह उत्तरे नाहीत. त्यामुळे, अजूनही जेथे प्रचंड दारिद्र्य, उपासमार, बेरोजगारी, शैक्षणिक मागासलेपणा यांसारख्या समस्या सुटलेल्या नाहीत; परंतु ज्यांना आपले लोक व निसर्गसृष्टी यांस कुणाच्याही इच्छेचे साधन होऊ द्यायचे नाही, अशा अर्धविकसित व विकसनशील देशांसाठी भांडवलशाही कधीच आदर्श, हितकर व स्वीकारार्ह व्यवस्था असणार नाही.
• समाजवादात दडलेले धोके •
जशी भांडवलशाही ही मर्यादित प्रमाणात का होईना; पण व्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करणाही एक व्यवस्था आहे, तसे समाजवादाचे नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न हा समाजवादात गौण असतो. येथे व्यक्तीच्या व्यक्तिगत निवडीपेक्षा संपूर्ण समाजाची ‘सामूहिक निवड’ (collective choice) महत्त्वाची ठरते. येथे व्यक्ती ही समाजासाठी असते, स्वत:साठी नसते. भांडवलशाही एक आत्यंतिक टोक असेल, तर समाजवाद दुसरे टोक आहे. प्रत्येक व्यवस्थेची स्वत:ची साध्ये आहेत. येथे आपण ही काळजी घ्यायला हवी की एक साध्य प्राप्त करताना तितकीच महत्त्वाची अन्य साध्ये नष्ट होता कामा नयेत. समाजवाद आपणांस ‘समतेची व सामूहिक ऐक्याची’ शाश्वती देईल; पण स्वातंत्र्याच्या अभावी व्यक्तीच्या जैविक प्रेरणांवर सामाजिक निर्बंध येऊन समाज एका नव्या रूढीप्रिय रूपात बदलण्याची शक्यता कधीच नाकारता येत नाही. समाजवाद व्यक्तीच्या मतस्वातंत्र्यास, प्रगतीस प्रोत्साहन देऊ शकेल काय? की मग राज्यसंस्थेला प्रश्न न विचारणारे, राज्यसंस्थेचे रात्रंदिन गोडवे गाणारे नागरिक निर्माण करायला शिकवेल? हे प्रश्न समाजवादी म्हणवणाऱ्यांना अंतर्मुख करतील, असे आहेत. “विविध राजकीय गटांत अंतर्गत स्वायत्तता आणि या गटांतील समस्यांवर, प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ‘तटस्थ’ अधिसत्ता” या तत्त्वाचे रक्षण समाजवाद करू शकेल काय? समाजवादाची समाजसंस्थेच्या रूपात स्थापना करण्याअगोदर ह्या प्रश्नांचा विचार करावा लागेल.
• स्वातंत्र्य-समतेचा पेच (Dilemma of Liberty-Equality) •
आजपर्यंत जग हे नव-उदारमतवादाच्या झगमगाटाने प्रभावित होऊन, मुक्तबाजारपेठी अर्थकारणाकडे वाटचाल करत होते. कोरोना अरिष्टामुळे हा झगमगाट क्षणार्धात निस्तेज झाला. कोविड-१९ अरिष्टाने आपल्यासमोर एक पेच निर्माण केला आहे, तो म्हणजे- ‘स्वातंत्र्य-समतेचा पेच’ (Dilemma of Liberty-Equality). यासंदर्भात, आपण पुढील प्रश्नांचा विचार करूया.
आम्हां भारतीयांचा जीवनविषयक दृष्टिकोन काय आहे? तो व्यवहार्य आहे काय?
भारतीय रूढींविषयी आत्यंतिक दुरभिमान बाळगणारे एक महाशय एकदा मला म्हणाले, “जगभरात क्रांत्या झाल्या, व्यवस्था पालटल्या; पण भारतच केवळ असा देश आहे की ज्याने सर्व क्रांत्या पचवल्या. त्यामुळेच भारत आजही टिकून आहे. हे केवळ येथील परंपरांमुळेच शक्य झाले आहे.”
आपल्या बौद्धिक अडगळीची ओळख न झालेल्या त्या महाशयास काय उत्तर द्यावे? आज कोविड-१९ अरिष्टाच्या काळात भारतीय रूढींची सर्वत्र प्रशंसा सुरू आहे; पण या वागण्यात एक व्याघात आहे. तो असा की आपला सभ्यपणा दाखविण्यासाठी पाश्चात्य पद्धतीचे हस्तांदोलन (Hand shaking) करणारी भली माणसं, आज भारतीय पद्धतीने ‘नमस्कार’ करणेच किती शास्त्रीय व वैज्ञानिक हे पटवून देण्यात धन्यता मानत आहेत. एकूण, सर्वच पुरातन देशांपैकी भारतच असा एक देश आहे की जो आजपर्यंत टिकून राहिला आहे, अशी आमची ठाम समजूत असते. या समजुती इतक्या प्रबळ असतात की सहजासहजी त्यांपासून सुटका करून घेणे शक्य होत नाही. ह्या समजुती खऱ्या की खोट्या ह्याचा विचार मी येथे करू इच्छित नाही; पण ‘क्रांत्या पचविणे’, ‘टिकून राहणे’ या शब्दसमूहाच्या अर्थाविषयी थोडा खुलासा करू इच्छितो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “टिकून राहण्याचे अनेक मार्ग आहेत आणि ते सर्वच सारखेच प्रशंसा करण्यायोग्य नाहीत. शक्यता तर अशीही आहे की, रणाांगणात पराजय स्वीकार करून कमजोर लोकांना जिवंत राहण्याची संधी मिळू शकेल. असेही असेल की शूरपणे युद्ध करण्यासारखीच जेत्याच्या पायी लोळण घालण्याची ‘क्षमता’सुद्धा एखाद्या कमजोरासाठी टिकून राहण्याची अट बनेल. त्यामुळे, सामान्य समजुतींप्रमाणे हे मानता येणार नाही की, एखाद्या देशातील लोक युगानुयुगे टिकून आहेत, म्हणजेच ते युगानुयुगे प्रगत आणि समृद्ध होत आले आहेत. महत्त्व टिकून राहण्याला नाही, तर ‘टिकून राहण्याच्या गुणवत्तेचा स्तर’ कोणता? याला खरं महत्त्व आहे.”
यादृष्टीने आपण जर आपल्या ‘टिकून राहण्याची’ गुणवत्ता तपासली व केवळ आपण युगानुयुगे टिकून राहिलो यावरच संतुष्ट न राहाता, आपण स्वत:चे आत्मपरीक्षण केले; तर आत्मविश्वासाने हे म्हणता येईल की आम्हां भारतीयांना आपल्या जीवनमूल्यांचे पुनर्मूल्यांकन करण्याची नितांत गरज दिसून पडते. भारताचा उत्कर्ष भाबड्या कल्पनारम्यतेतून होणार नाही; त्यासाठी सकारात्मक कृतिप्रवणतेचीच गरज आहे. कोणतेही राष्ट्र ‘आत्मनिर्भर’ तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा ते आपल्या अस्तित्वाच्या स्तराचे ‘आत्मपरीक्षण’ करेल. आत्मपरीक्षणाविना आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे दृष्टीविना दृष्य पाहण्यासारखेच नाही काय?
कोविड-१९ अरिष्टाचा परिणाम म्हणून बरेच जण अशाप्रकारे खऱ्या ‘स्वातांत्र्यापासून पलायन’ करून जुन्या परंपरांचे गोडवे गाण्यात मशगूल होऊ शकतात. हे पलायन एकाधिकारशाहीसाठी पोषक ठरत असते. एका अर्थाने ही ‘शरणागती’ होय. याउलट, काहीजण दुसऱ्या टोकाला जाऊन आत्यंतिक व्यक्तिवादी बनू शकतात. हा स्वातंत्र्याचा अतिरेक आहे. आपल्याला स्वातंत्र्यापासून पळूनही जायला लागू नये किंवा मग त्याचा अतिरेक होईल अशाप्रकारे आपण व्यक्तिवादाच्या आहारीही जाऊ नये, अशी स्थिती जेव्हा उत्पन्न होते, तेव्हा त्या स्थितीस ‘स्वातंत्र्य-समतेचा पेच’ म्हणता येईल. त्यामुळे, या पेचातून सुटकेचा मार्ग आपणास शोधावा लागेल.
• सुटकेचा मार्ग •
लाखो लोकांच्या बलिदानानंतर आपण हे स्वातंत्र्य आज उपभोगत आहोत, तसेच समतेच्या महत्त्वाची जाणीवही आपल्याला हळूहळू होते आहे. त्याची गुणवत्ता उंचावण्याची जबाबदारी आपलीच आहे. हे स्वातंत्र्य ‘व्यक्ती विरुद्ध समाज’ किंवा ‘व्यक्ती विरुद्ध निसर्ग’ असा संघर्ष निर्माण करणारे असायला नको. ‘स्वातंत्र्य-समतेचे मूल्य’ आपण जाणले पाहिजे. भांडवलशाहीत समाज व त्याअंतर्गत येणाऱ्या सामाजिक संस्था (कुटुंब, राष्ट्र, धर्म इ.) यांच्या विघटनास सुरुवात होते, तर समाजवादी व्यवस्थेत समाज बंदिस्त, निर्जीव, पोथीनिष्ठ व मृत होण्याकडे वाटचाल सुरू करतो. भांडवलशाही व समाजवाद यांत निर्माण झालेल्या ‘स्वातंत्र्य-समतेच्या पेचातून’ (Dilemma of Liberty-Equality) सुटकेचा मार्ग आहे काय?
आदरणीय श्री.बर्ट्रांड रसेल यांच्या लेखनात मला हा संभाव्य मार्ग दिसतो, ते म्हणतात, “सामाजिक ऐक्य अगदी आवश्यक आहे, हे खरेच आहे आणि केवळ बौद्धिक युक्तिवादांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यात मानवजातीला अद्याप तरी यश प्राप्त झालेले नाही. प्रत्येक समाजापुढे दोन परस्परविरोधी धोके असतात. एका बाजूला शिस्तीचा अतिरेक आणि परंपरेसंबंधी आत्यंतिक पूज्यभाव. यामुळे इकडे अस्थिपंजरवत होण्याचा धोका; तर दुसऱ्या बाजूला व्यक्तिवादाचा व वैयक्तिक स्वातंत्र्याचा असा विकास की ज्यामुळे सहकार्यच अशक्यप्राय व्हावे आणि त्यातून लयाला जाणे किंवा परकीय आक्रमणाला बळी पडणे, अनिवार्य ठरू लागणे. सर्वसाधारणपणे महत्त्वाच्या संस्कृतीची सुरुवात होते ती ताठर आणि अंधश्रद्ध प्रणालीने. तीत हळूहळू शिथिलता येते आणि एका विशिष्ट अवस्थेत ती अशा चमकदार प्रज्ञापूर्ण कालखंडात परिणत होते, की ज्याच्या मुळाशी असलेले दुरित मात्र अद्याप विकसित झालेले नसते. पण ते दुरित जेव्हा आपले अस्तित्व प्रगट करु लागते, तेव्हा माजते अराजक व त्यातून अनिवार्यपणे पुढे येते नवी जुलमी सत्ता! त्यातूनच नव्या दुराग्रही प्रणालीने सुरक्षित केलेला असा नवा समन्वय उत्पन्न होतो. उदारमतवादाचा सिद्धांत हा या अंतहीन हेलकाव्यांतून निसटण्याचा एक प्रयत्न आहे. उदारमतवादाचे सार म्हणजे एकतर अशी सामाजिक रचना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे की जी तर्कविसंगत मताग्रहावर उभी नसेल, आणि दुसरे समाजसातत्यासाठी जेवढी बंधने आवशयक त्यापेक्षा जास्त बंधनात न अडकता समाजस्थैर्याची खात्री देणे! हा प्रयत्न सुफलसंपन्न होऊ शकेल काय ते भविष्यकाळच ठरवू शकेल.”
कोविड-१९ अरिष्टानंतरचे नवक्षितिज म्हणून स्वातंत्र्य-समतेचा समन्वय साधणाऱ्या सामाजिक-उदारमतवादी (Socio-Liberal) जीवनप्रणालीकडे आपल्याला सहानुभूतीने बघता येईल. नवविचार आणि नवकल्पनांचा सामना करण्याची क्षमता ज्यांच्याजवळ आहे, अशा सर्वांच्या श्रद्धा, समजुती, अनुभव, विश्वास आणि भविष्यापासूनच्या आशा-अपेक्षा यांमध्ये कोविड-१९ अरिष्टाने खूप बदल घडवून आणले आहेत. हे बदल काय आणि कसे असतील, त्यांची दिशा काय असेल व त्यांचे परिणाम कसे होतील, हे पूर्णपणे ज्या सामाजिक संस्थांच्या अंतर्गत आपण जीवन जगत आहोत आणि त्यांचाच मानसिक परिणाम म्हणून, आपली जीवनविषयक जी वृत्ती असेल, त्यावरून ठरणार आहे. यात राज्य, संपत्ती, धर्म, विवाह, शिक्षण यांसारख्या सामाजिक संस्था जेवढी विधायक भूमिका पार पाडतील तेवढे आपले भविष्य उज्ज्वल असणार आहे. तरीही, संकटाच्या काळात नवानुभवांतून शिकत आपल्या पूर्वश्रद्धांमध्ये आवश्यक ते बदल करून नव्या परिस्थितीतून उद्भवलेल्या नवीन आव्हानांना सामोरे जात आपल्याला पुढे चालावे लागेल आणि असे करण्यातच आजच्या एकविसाव्या शतकातील आधुनिक मानवाचा खराखुरा पराक्रम दडलेला आहे.
(तृतीयवर्ष (कला) – अर्थशास्त्र) फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे.
छान
very good sridhar
आजच सुधारक एप्रिल २०२१ च्या अंकातील कोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे हा लेख काहिसा भारतीय विचारसरणी आणि परंपरांविषयी नाराजी व्यक्त करणारा वाटला. वैदिक कळा पासून आपला देश वैज्ञानिक, शैक्षणिक आणि अर्थिकद्रुष्ट्याही खूपच प्रगत होता. त्यामुळेच संपत्तीची लूट करण्यासाठी आखाती देशांतून आपल्या देशावर पुरातन काळापासून अतिक्रमणं होत होती. दुर्दैवाने त्या काळात आपल्या देशात अनेक राज्यं होती व त्या राज्यांमध्ये वैमनस्य असल्यामुळे परकीय आक्रमणाच्या वेळी ती अलिप्त रहात असल्यामुळे परकीय आक्रमकांचे फावत असे. त्यामुळेच साधारणतः बाराव्या शतकापासून मोंगली सत्ता दिल्लीत प्रस्थापित होऊ शकली व काही प्रमाणात ती फैलावली सुध्दा. पण संपूर्ण देशावर कब्जा करणे त्यांना शक्य झाले नाही. पुढे एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित झाला, आणि यालाही आपसातील फूटच कारणीभूत ठरली. मोंगल परकीय आक्रमकांनी तलवारीच्या जोरावर आणि पुढे ब्रिटिशांनी आपल्या भोळेपणाचा लाभ उठवून हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण शेकडो वर्ष परकीय सत्तेखाली राहूनही हिंदू धर्म नष्ट झाला नाही. याला कारण हिंदुंचा आपल्या परंपरांवरील द्रुढ विश्वासच कारणीभूत आहे. त्यामुळेच आपण पुन्हा स्वातंत्र्य मिळवू शकलो हे नाकारता येणार नाही. // लेखकाने नकारात्मक पध्दतीने ज्या भारतीय रुढिंविषयी ( परंपरांविषयी) दुरभिमान बाळगणाय्रा व्यक्तीचा उल्लेख केला आहे, अशा अनेक व्यक्ती आपल्या देशात असल्यामुळे आपल्या देशात भारतीय संस्क्रुती, कुटुंब पध्दती टिकून आहे जिचे पाश्चात्य देशही गौरवपूर्वक उल्लेख करतात. … … // डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी “टिकून राहण्याचे अनेक मार्ग आहेत आणि ते सर्वच सारखेच प्रशंसा करण्या योग्य नाहीत” असे जरी म्हटले असले तरी धर्मांतर करतांना त्यांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म न स्वीकारता हिंदू धर्मांतूनच निर्माण झालेला हिंदू धर्म सद्रुश्य बौध्द धर्माचाच अंगिकार केला. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आपल्या दुर्दैवाने इस्लाम धर्माला झुकते माप देणारा आणि हिंदू व्देश करणारा पक्ष सत्तेवर आला. त्यामुळेच गेल्या बहात्तर बहात्तर वर्षांतील जवळ जवळ साठ वर्षात आपल्या देशाची व्हायला हवी होती तशी प्रगती होऊ शकली नाही. आता विद्यमान सरकार त्या द्रुष्टीने प्रयत्न करत आहे, पण भ्रष्टाचाय्रांच्या नाड्या आवळल्या गेल्याने त्या सरकारला विविध मार्गाने विरोध करण्याची कारस्थाने चालू आहेत. हिंदू धर्म जरी परंपरावादी असला तरी आपल्या धर्माने अनेक जुन्या परंपरांचा त्याग करून अधुनिकतेचा स्वीकारही केलेला आहे. त्यामुळेच हिंदू धर्मियांनी पोथीनिष्ठ न रहाता लेखकाने अपेक्षित केलेल्या धर्म, विवाह, शिक्षण यासारख्या सामाजिक संस्थाच्या बाबतीत विधायक भूमिका अंगिकारलेल्या आहेत हे मान्य व्हावे.
मी एक विद्यार्थी आहे आणि ‘विद्यार्थी’ म्हणूनच हे प्रत्युत्तर असणार आहे:
*श्री.र.ना.वेदक यांची गृहीततत्वे(postulates):
१) भारतीय म्हणजे हिंदू लोक.
२) प्राचीन भारतात ‘राज्ये’ होती.
३)बौध्द धर्म व हिंदू धर्मांत सादृश्य आहे.
४) रूढीवादी लोकांमुळेच आज भारतीय संस्कृती जीवंत आहे.
*माझी भूमिका*
१) भारतीय संविधानानुसार जे जे लोक भारताचे कायदेशीररित्या नागरिक आहेत,ते ते सर्व भारतीय.यानुसार,सर्व हिंदू भारतीय आहेत;पण सर्वच भारतीय हिंदू नाहीत ही ‘वेनच्या तर्कशास्त्रातुन निगमित होणारी विधाने’ सत्य माननेच विवेकशीलपणा ठरेल.
२) ‘राज्य’ ही आधुनिक संकल्पना आहे;प्राचीन भारतात ‘महाजनपदे’ व ‘गणराज्ये’ होती.
३) डॉ.आंबेडकरांनी आपल्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात ‘धर्म’ व ‘धम्म’ यातील भेद (तात्त्विक व व्यावहारिक या दोन्ही पातळ्यांवर)दाखवून दिला आहे.
४) संस्कृतीला जन्म घालणारा मानव असला तरी ; संस्कृतीसुद्धा मानवी स्वभावाची जन्मदात्री असते.परिवर्तन हा सृष्टीचा नियम असल्याने संस्कृतीत परिवर्तन होणे अपरिहार्यच असते.ती कायम ‘सनातनच’ राहू शकत नाही. तरीही संस्कृती ‘ज्ञान’ व ‘कर्म’ या क्षेत्रात योगदान देत असल्याने स्वत:ची मूल्ये व त्यांचा आशय असलेल्या विधानांना तार्किक व नैतिक आकारही देत असते.संस्कृतीचे स्वत्व कशात सामावले असते? तिने स्विकारलेली विधाने सत्य कशाच्या आधारे मानावी? याचा विवेकबुद्धीने विचार करून परिवर्तनीय काळाशी तिला अनुरूप कसे ठेवता येईल? हा ‘संस्कृतीपुत्रां’समोरील प्रश्र्न असला पाहिजे. भारतीय नैतिक-आध्यात्मिक परंपरेतील मूल्यांची आधुनिक नैतिक विचारांशी तुलना केली असता , आधुनिक नैतिक विचारांतील कोणती तत्वे,मूल्ये अभिनव व प्रमाण मानावी ? कोणती आत्मसात करावी? हे करत असताना आपल्या संस्कृतीचे जे ‘स्वत्व’ आहे,त्याचे समग्र विश्र्वातील स्थान काय? त्यातले त्याज्य काय? स्विकारार्ह काय? या प्रश्नांना धिटपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आले आहे काय? हे सामर्थ्य केवळ ‘रूढीवादी’ असून चालणार नाही; तर त्यासाठी ‘मुक्त विचारांची’ गरज असते.त्यामुळे संस्कृती जेवढी उदार होईल,तेवढी ती समृद्ध होईल व तिला समृद्ध करणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे .या सगळ्यासाठी विवेकवादी चिंतनाची गरज असते.
तुम्ही म्हणटल्या प्रमाणे वैदिक काळापासून शैक्षणिक,आर्थिक,वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती होती तर वैदिक काळात कोणते शोध लागले, शिक्षण व्यवस्था कशाप्रकारे होती हे स्पष्ट करा. मुळात जातीव्यवस्थेवर आधारित हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्माचे मुळे ही जातीव्यवस्थेत आहेत. आंबेडकर यांचे Riddles In hinduism , cast in india, Anihilation of cast या ग्रंथामध्ये त्यांनी हिंदू धर्माबद्दलचे विवेचन केले आहे. हिंदू धर्मातील जातीव्यवस्थे मूळे, असामानतेमूळे भारतात अनेक धर्म उदयाला आले आहेत.
हा लेख वाचल्यावर माझ्यासारख्या सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तीला प्रकर्षाने जाणवले ते असे की आजही भांडवलशाही, समाजवाद, लोकशाहीचा संकोच आणि भविष्यातील आव्हाने वगैरे विषयावर या लेखकासारखे महाविद्यालयातील तरुण विद्यार्थी ( भले त्यांची संख्या मर्यादित का असेना) चर्चा करत आहेत. ही परिस्थिती नक्कीच आश्वासक आहे. माझे अशा विद्यार्थी समूहाला एक आवाहन आहे की मुक्त चर्चा करा. दुसऱ्याचा विचार समजून घेण्याची निकड जाणून घ्या. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठल्याही राजकीय प्रणालीचा ती सर्वोत्तम आहे म्हणून आंधळेपणे स्वीकार करू नका.