स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल ?

असं काही सांगा.. ज्यावर
खरंच विश्वास बसेल
स्वातंत्र्याचा मुक्काम सांगा
हल्ली कुठं असेल?

‘भगतसिंग’वाल्या गोळीत
रेशनवाल्या पोळीत
दिवा नसलेल्या घरात 
की.. वंचितांच्या स्वरात?

कष्टकऱ्यांच्या घामात
‘शबरी’वाल्या ‘रामा’त
फांदीवर लटकणाऱ्या प्रेतात
की.. डुकरं घुसलेल्या शेतात?

‘बापू’च्या प्रसिद्ध चरख्यात
आपल्यासोबत परक्यात
विद्यार्थ्यांच्या नव्या चळवळीत
की.. ‘भीमरावा’च्या जुन्या तळमळीत?

कुठं असेल स्वातंत्र्याचा कॅम्प 
की.. ‘क्वारंटाईन’वाला स्टॅम्प ?
भेदरलेल्या ‘मुंग्यां’च्या बिळात
की.. ‘सापां’च्या खानदानी पिळात?

सांगा कुणी पाहिलं का स्वातंत्र्याचं घर
किंवा त्याचा आनंदानं गुणगुणणारा स्वर
ऐकल्याच्या, पाहिल्याच्या काहीतरी टिप्स
किंवा त्याच्या रडण्याच्या केविलवाण्या क्लिप्स ?

दंग्यामधे, तिरंग्यामध्ये
किंवा कुठं दिसेल..?
स्वातंत्र्याचा मुक्काम सांगा
नेमका कुठं असेल ?

अध्यक्ष
लोकजागर अभियान

dwakudkar@gmail.com

अभिप्राय 1

  •  ज्ञानेश वाकुडकर यांची कविता विचार करायला लावणारी आहे यात शंका नाही. 
    माझ्या मनातील प्रश्न: 
    स्वातंत्र्याचा मुक्काम खरंच कोठे असेल? 
    कसे मिळेल असे स्वातंत्र्य? 
    महिलांच्या सबलीकरणासाठी केलेल्या  कार्यक्रमात?  
    की गृहिणींच्या घरच्या कामाची दखल  घेऊन? 
    की महिलांना  नोकरी वा अन्य मार्गाने  मिळणाऱ्या आर्थिक स्वातंत्र्यात? 
    की मुलींच्या शिक्षणात? की मुलींसाठी सुरु केलेल्या  व्यवसाय शिक्षण उपक्रमात? 

    येणाऱ्या पिढीला अनेक समस्यांचा मुकाबला करावा लागणार आहे.  त्यातील एक महत्वाची समस्या रोजगाराची असेल माझ्या मते महिलांचं सबलीकरण कसे होणार यावर आजच्या मुलांचे भविष्य ठरणार आहे.   

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.