पत्रसंवाद/प्रतिक्रिया

अनंत बेडेकर, ४७, शांतिसागर सोसा., भारतनगर, मिरज ४१६४१०, मो.९४२१२२१७८२
‘गुंडोपंत’ या नावाने सायबरावकाशात काही अन्य संदर्भात आलेल्या प्रतिक्रियेत ‘आसु हिंदुत्वविरोधी व परधर्मधार्जिणा असण्याबाबत’ आक्षेप घेण्यात आला आहे. (जून २०१०, अंक २१.३) असे नमूद करून नंदा खरे यांनी आसुचे संस्थापक दि.य.देशपांडे यांनी मागे या आक्षेपाला जे उत्तर दिले होते त्याचा त्यांना समजलेला गाभा म्हणून जी भूमिका स्पष्ट केली आहे ती पुढीलप्रमाणे ‘वाचकांपैकी, वाचक ज्या क्षेत्रातून येतात त्या क्षेत्रापैकी ८५% किंवा अधिक लोक हिंदू धर्मात जन्मलेले आहेत. त्यांना जागे करण्याने इतर १५% किंवा कमींनाही जाग येईल. या धारणेतून मुख्यतः हिंदुधर्माच्या प्रत्यक्ष व्यवहारातील विकृतींवर आसु चा रोख असतो.’ या विधानाची/भूमिकेची वस्तुनिष्ठ चिकित्सा करणे हा या लिखाणाचा हेतू आहे.
रा.स्व.संघ ही उघडपणे आपण हिंदुहितासाठी काम करतो असा दावा करणारी संघटना आहे. त्यांच्या मान्यवर वरिष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करताना “तुम्ही हिंदुहित यापुरतेच सीमित का राहता?’ असा प्रश्न केला असता त्यांनी उत्तर दिले की – “या देशात जे ८५% हिंदू आहेत त्यांची प्रगती झाली, हित साधले (त्यांच्या कल्पनेप्रमाणे असणारे) म्हणजे या देशातील बहुसंख्यांना लाभ मिळेल. असे झाले म्हणजे या संपूर्ण देशालाच वैभव प्राप्त होईल आणि पर्यायाने देशातील उर्वरित १५% सह सर्वांनाच त्याचा लाभ मिळेल.”
आसु ही म्हणतो की ८५% हिंदूंना जाग आली म्हणजे उरलेल्या १५% हिंदू नसलेल्यांनाही जाग येईल. अर्थातच हिंदूंना जाग आणणे हा आसु च्या विषयपत्रिकेवरील एक विषय किंवा स्वीकारलेल्यांपैकी एक उद्देश/हेतू/ध्येय/काम आहे. अन्यथा आसु ने हा आपला विषय/प्रांतच नाही असे म्हणून या चर्चेस पूर्णविराम दिला असता.
नंदा खरे (का.सं.) यांच्या वर नमूद विधानाचे (वाचकांपैकी ….. आसुचा रोख असतो) सोईसाठी ५ भाग पाडू – भाग – १ : वाचकांपैकी, वाचक जेथून येतात त्या क्षेत्रापैकी ८५% किंवा अधिक लोक हिंदुधर्मात जन्मलेले आहेत. भाग – २ : त्यांना जागे करण्याने भाग – ३ : इतर १५% किंवा कमींनाही जाग येईल. भाग – ४ : या धारणेतून भाग – ५ : मुख्यतः हिंदुधर्माच्या प्रत्यक्ष व्यवहारातील विकृतींवर आसुचा रोख असतो.
या विधानकर्त्यांचे म्हणणे असे की भाग-१ अंतर्गत समूहावर भाग-५ ची कृती केल्यास भाग-२ चा परिणाम साधला जाईल. म्हणजेच भाग-१ अंतर्गत समूहावर भाग-२चा परिणाम साधण्यासाठी भाग-५ ची कृती आवश्यक आहे. गेली किमान १५० वर्षे हिंदू समाजात त्या त्या वेळच्या समाजसुधारकांनी केलेले कार्य व त्याचा झालेला परिणाम याचा अनुभव विचारात घेता हे धोरण व हा तर्क ग्राह्य आहे, अनुभवसिद्ध आहे.
असे असता भाग ३ अंतर्गत समूहास जाग येण्यासाठी त्यांच्या धर्माच्या प्रत्यक्ष विकृतींवर भाग-५ सारखीच कृती करणे आवश्यक आहे असे न म्हणता व न मानता भाग-२ साध्य झाल्याने भाग-३ (आपोआप) साध्य होईल ही तथाकथित धारणा (भाग-४) तर्कसंगत नाही. एका रोगग्रस्त माणसाच्या रोगाचे योग्य निदान करून त्याच्यावर योग्य औषधोपचार केल्याने तो खडखडीत बरा होईल आणि ते पाहून दुसरा रोगग्रस्त माणूस आपोआप बरा होईल असे घडणे अशक्य आहे. असे म्हणणे म्हणजे असा दुसरा रोगी औषधोपचाराशिवायच बरा होईल असे म्हणण्यासारखे आहे.
पाकिस्तान, बांगला देश तसेच आपल्या काश्मिर खोयात हेच हिंदु-मुस्लिम प्रमाण थोड्याफार फरकाने उलट-सुलट आहे तेथील हिंदुधर्मीयांच्यात सुधारणा होण्यासाठी, त्यांना जाग येण्यासाठी हाच तर्क आसु सांगणार का ? महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल जिल्ह्यांमध्ये हा तर्क सिद्ध करून देण्यास आसु ला भरपूर वाव आहे. २० वर्षे या धारणेतून काम केल्यानंतर आता शास्त्रशुद्ध अभ्यास करून तिच्या परिणामकारकतेची पडताळणी करण्याची वेळ आली आहे. आणि ती जबाबदारी आसु चीच आहे. जर ८५% ना जागे करण्याची इच्छा व प्रयत्न आसु चे आहेत तर उरलेल्या १५% नी काय घोडे मारले आहे ? ते आपोआप जागे होतील म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकून मोकळे होणे हे योग्य नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की मूळ प्रश्नाला हात घालण्याची तयारी आणि मानसिकता समाजसुधारकांची, समाजकारण करणाऱ्यांची नाही. राज्यकर्त्यांनी मताच्या राजकारणासाठी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १५% च्या धार्मिक व्यवहारातील विकृतींबद्दल काहीच न करण्याचे धोरण हळूहळू स्वीकारले आणि आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये ते दृढ झाले आहे. परिणामी समाजसुधारकांच्या पातळीवरही या १५% ना जागे करण्यासाठी काही होत नाही (नियम सिद्ध करण्यासाठी असणारे अपवाद वगळता) आणि राजकीय पातळीवर कायद्यांमार्फतही काही सुधारणा केल्या जात नाहीत.
सुरुवातीच्या काळात सुधारकांनी उघडपणे हिंदुधर्मातील दोष दाखविले, सुधारणेसाठी डोळस प्रयत्न केले. पण दोष दाखविताना ‘हिंदुधर्मीयांचे’ म्हणायचे आणि चांगले काही सांगताना ‘भारतीय संस्कृती’चे नाव घ्यायचे ही दुटप्पी नीती अलिकडे आली. अन्य १५% चे दोष दाखविण्याचे, त्यांना सुधारण्याचे आह्वान घेऊन तरी पद्धतशीर प्रयत्न कोणी केले नाहीत. त्या १५% पैकी बहुतेकांना आपल्यात दोष आहेत, असू शकतात हे मान्यच नाही आणि आता इतका काळ गेल्यावर म्हणायचे की ८५% हिंदू सुधारले की उरलेले १५% आपोआप सुधारतील हा कोणता न्याय ?
मूळ सुधारककार आगरकरांनी त्या काळी नेमक्या ठिकाणी निर्भीडपणे मर्मभेदक घाव घालण्याऐवजी बोटचेपेपणाची आणि कचखाऊ भूमिका स्वीकारली असती तर जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहण्याची आणि दारिद्र्य-क्लेश-कुचेष्टा-मानहानी सोसण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. अशा लोकोत्तर पुरुषाने हे सर्व सोसून केलेल्या कार्यामुळे तयार झालेल्या पार्श्वभूमीवर आपण आता आसु चालवतो आणि पुन्हा त्याच ८५% वर रोख ठेवण्यात समाधान मानून उर्वरित १५% आपोआप जागे होतील म्हणतो यालाच काही निराळ्या दृष्टिकोनातून पाहणारे लोक ‘मऊ लागले म्हणून कोपराने खणणे’ म्हणत असतील! त्यांचा दृष्टिकोन निकोप नाही आणि त्यांच्या आक्षेपातील तिरकसपणा आणि रोख याच्याशी मी सहमत नाही हे मुद्दाम स्पष्ट करतो. परंतु या आक्षेपाकडे स्वतंत्र व निराळ्या दृष्टिकोनातून विवेकीपणाने आसु ने पाहणे आवश्यक आहे.
आसु चे हे एकमेव काम/कार्यक्षेत्र नाही हे मला मान्य आहे व तसे सुरुवातीस मी नमूद केले आहे. परंतु प्रश्न व्याप्तीचा नसून भूमिकेचा, धारणेचा आहे आणि त्याची तर्कनिष्ठ चिकित्सा व चर्चा होणे आवश्यक आहे.
बेडेकरांची भूमिका मला (का.सं.) बऱ्याच अंशी मान्य आहे. पण काही मुद्दे नोंदणे आवश्यक आहे. १) हिंदुसमाजात त्या त्या वेळच्या समाजसुधारकांनी केलेले कार्य … विचारात घेता…. हिंदुधर्मातील प्रत्यक्ष व्यवहारातील विकृतींवर आसुचा रोख असतो. आणि त्यामुळे हे धोरण व हा तर्क ग्राह्य आहे. अनुभवसिद्ध आहे, असे बेडेकर नोंदतात. या संदर्भात एक प्रतिक्रिया नोंदतो –
जी.आय.पी. रेल्वेकडे जातिनिहाय रेल्वे डबे (बोग्या) ठेवण्याची मागणी केली गेली होती. रेल्वे कंपनीने मात्र फर्स्ट, सेकंड, इंटर, थर्ड असे सोईंनिहाय व भाडेनिहाय वर्गीकरणच वापरायचे ठरवले. रेल्वे प्रवास त्यावेळच्या (व आजच्याही) पर्यायी व्यवस्थांपेक्षा स्वस्त, सोपा असल्याने त्यावेळी कठोर जातिभेद असलेल्या भारतीय समाजाने रेल्वे वापरणे सुरू केले. सरमिसळ जातींच्या डब्यांतून प्रवास केल्यानंतर आंघोळ केली, की जातीची शुद्धता टिकते, असे मानले. कालांतराने हा उपचारही गळून पडला. काहींचे (ज्यांत मीही आलो) मत असे आहे, की रेल्वे कंपनीच्या एका निर्णयाने जातिभेद मोडण्यात जे योगदान दिले, ते समाजसुधारणेच्या इतर प्रयत्नांपेक्षा मोठे होते!
सामाजिक संस्था (धर्म, राज्यशासनयंत्रणा, इत्यादि) जे कार्य करतात, ते नेहेमीच त्या त्या काळच्या जीवनपद्धतीवर अवलंबून असते. समाजसुधारणा, तीसाठी प्रबोधन, हे तर हवेच; पण एक तंत्रज्ञान, एक व्यापारी पद्धत, यांतून जे सामाजिक बदल होतात, ते बरेचदा सुधारणेसाठीच्या प्रयत्नांमुळे होणाऱ्या बदलांपेक्षा मोठे असतात. यामुळे माझ्या कार्यकाळात मी जीवनशैलीबाबत विज्ञान-तंत्रज्ञानाबाबत मुद्दे मांडण्यातून सुधारणा होतील, असे मानून चालतो. ही मर्यादा आहे, की जास्त मूलभूत व अनुभवसिद्ध वाट आहे, यावर मतभेद असतीलही. २) आगरकरांनीही याची दखल घेतली होती, हे त्यांच्या सुधारक काढण्याचा हेतु या सुधारकाच्या पहिल्याच संपादकीयात स्पष्ट होते. ते लिहितात. अनेक देशांतील उद्योगी पुरुषांनी अहर्निश परिश्रम करून पदार्थधर्माचे केवढे ज्ञान संपादिले आहे, विपद्विनाशक व सुखकारक किती साधने शोधून काढिली आहेत, व राज्य, धर्म नीति वगैरे विषयांतील विचार किती प्रगल्भ झाले आहेत….”
पदार्थधर्माचे ज्ञानच राज्य, धर्म, नीति वगैरे विषयांतील विचारांना प्रगल्भ करते! (पूर्ण लेख आसु अंक १७.९, डिसें.२००६ मध्ये प्रकाशित केला आहे.) ३) बेडेकर लिहितात की मूळ प्रश्नाला हात घालण्याची तयारी आणि मानसिकता समाजसुधारकांची, समाजकारण करणाऱ्यांची नाही. हे खरे आहे. मूळ प्रश्न कोणते यावर मात्र मोठाले मतभेद आहेत. आजही सतत वाढणारी लोकसंख्या समाजावर ताण आणते आहे, असह्य ताण आणते आहे, याकडे आणीबाणी नंतर कोणी लक्ष वेधले आहे ? मुक्त बाजारपेठ विषमतेलाच जन्म देते, हे अनुभवसिद्ध सत्य किती नेटाने उल्लेखले जाते ? बंधुभावाच्या पार्श्वभूमीवरच समता, आणि समतेच्या अंगाने संकोचितच स्वातंत्र्य, हे आंबेडकरांनंतर कितीदा मांडले गेले आहे ? (संदर्भ : आसु १८.७, ऑक्टो.२००७) बंधुभावाच्या अभावातून मंडल-कमंडल व त्याची उपप्रमेये समाजाच्या ठिकऱ्या उडवत आहेत, त्यामुळे बंधुभाव जोपासणे निकडीचे आहे, हे कितीदा सांगितले जाते? (संदर्भ : आसु १७.११, फेब्रु. २००७) (पान ३ (५०७) पाहा) तापमान वाढीने हिमालयातील हिमनद वितळत आहेत. लवकरच हिमालयीन नदांचे पाणी आटून भारतात दुष्काळ पडतील. खायचे वांधे, हा तर खराच मूळ प्रश्न आहे. तर आसु जमेल तेवढे आम्हाला मूळ वाटणारे प्रश्न हाताळत असते.
४) धोरण आणि व्याप्ती हे संलग्न प्रश्न आहेत मासिकाच्या पृष्ठमर्यादेतच धोरणातले अग्रक्रम ठरणार. काही इतरांना मूळ वाटणारे प्रश्न कमी प्रमाणात हाताळले जाणार, किंवा त्यांकडे दुर्लक्ष होणार. यावर बोटचेपेपणा व मऊ लागले की कोपराने खणणे अशा टीका होणार. पण धर्मविषयक चर्चा ज्या सहजतेने फाटे फुटून कात्रजच्या घाटात जातात, ते पाहता त्या विषयात शिरण्याची माझी तरी तयारी नाही. ५) पण बेडेकरांनी ज्या संयतपणे त्यांचे म्हणणे मांडले, त्या संयतपणे कोणी या विषयांवर लिहील, तर त्याचे स्वागत आहेच.
खरे तर संपादकाने आपले म्हणणे पत्राखाली टिपणाच्या रूपात देणे, यावरही टीका होते! पण संपादकीय अग्रक्रमांनुसार, वाचकांच्या प्रतिक्रियांची मात्र टिपणांतून दखल घेणे, हेही पृष्ठमर्यादेतूनच येते. – कार्यकारी संपादक.