अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष श्रीयुत सूरजभान यांच्या काही कल्पना विचित्र आहेत. भारतीयांना इतिहासाशी काही घेणेदेणे नाही, या मताला त्या कल्पना दुजोरा देतात. सूरजभान सांगतात की सर्व पुस्तकांमधून दलितांची हेटाळणी करणारे उल्लेख काढून टाकायला हवेत. याची सुरुवात म्हणून संत तुलसीदासांच्या रामचरितमानसातील प्रसिद्ध ओळी
“ढोल, गवार, शूद्र, पशु, नारी ये सब ताडन के अधिकारी” गाळाव्या, असे सूरजभान सुचवतात.
आता वरील ओळी खेडूत, दलित, पशू आणि स्त्रियांना अपनामास्पद आहेत, हे तर खरेच आहे. ढोल बडवावा तसे या साऱ्यांना बडवावे, असे त्या सांगतात. बऱ्याच जणांची असली मते सोळाव्या शतकात होती. पण त्या ओळींचा एक वेगळाही अर्थ सांगितला जातो. जसे, ढोल बडवला जातो, तो ताल रचण्यासाठी, नुसताच विसंगत आवाज काढण्यासाठी नव्हे. आणि ढोलातून सांगीतिक ताल फक्त कुशल ढोलियाच काढू शकतो. यामुळे ‘ताडन’चा अर्थ नुसताच बडवणे असा नसून पशूच्या प्रशिक्षणासारखा, किंवा माणसाच्या शिक्षणासारखाही घेता येतो.
पूर्वीची एक इंग्रजी म्हणही तुलसीदासाच्या ओळींसारखी आहे – A spaniel, a wife and a walnut tree the more you beat them, the better they be. इथे शिक्षण-प्रशिक्षण, सुधार, ही भावना जास्त स्पष्ट केलेली आहे. पण सूरजभानना तुलसीदासाचे म्हणणे कोणत्या संदर्भ-चौकटीत बसवायचे नाही आहे; ते फक्त मिटवून टाकायचे आहे.
असाच प्रकार एकोणिसाव्या शतकात थॉमस बाउड्लरने (Thomas Bowdler) केला होता. त्याने शेक्सपियरच्या कृतींमधील त्याला (बाउड्लरला) अनैतिक व धर्मविरोधी वाटणारे संदर्भ सुधारून शुचिर्भूत करायचा प्रयत्न केला. सामान्य लोकांना हा संक्षेपाचा प्रकार आवडला नाही. इंग्रजी भाषेला मात्र यातून दोन शब्द मिळाले, बाउड्लरिझम आणि बाउड्लरायझेशन (बाउड्लर-कृतिवाद आणि बाउड्लरीकरण). जर सूरजभान त्यांच्या भारतीय इतिहासाच्या शुद्धीकरणात यशस्वी झाले, तर भावी पिढ्या क्रमिक पुस्तकांच्या सूरजभानीकरणावर बोलतील.
परंतु याने प्रश्न उभे राहतील. जर सूरजभान तुलसीदासांचा व दलितांचा अवमान करणाऱ्या इतरांच्या इतिहास, साहित्य व मानव्यशास्त्रांतल्या अवतरणांचा सफाया करतील, तर भावी पिढ्यांना अनुसूचित जाती-जमातींसाठी राष्ट्रीय आयोग का नेमावा लागला, हे कसे कळेल? या जाती-जमातींसाठी आरक्षणाची तरतूद संविधानात का करावी लागली, हे कसे समजेल? या जाती जमातींची अवहेलना करणारे संदर्भ जर कुठे सापडले नाहीत, तर त्या इतर समाजघटकांपेक्षा मागे का पडल्या? शूद्रांना वेद ऐकायचीही परवानगी नाही, असे वचन जर सापडलेच नाही, तर भावी पिढ्यांना आपले दलित पूर्वज औपचारिक शिक्षणात मागे का पडले, आणि ब्राह्मण पुढे का गेले, हे कळणार कसे?
शिक्षणात आकडे आणि टक्केवाऱ्यांना महत्त्व आहेच. परंतु केवळ त्यांतून शिक्षणाचा हेतू स्पष्ट होत नाही. शिक्षणातून एक समग्र दृष्टिकोण घडावा लागतो. ते जर झाले नाही, तर हत्ती आणि सात आंधळ्यांच्या कथेची पुनरावृत्ती होते. इतिहासातून प्राचीन दस्तऐवजांतील शूद्रांची अवहेलना करणारे संदर्भ गाळले, तर आपला समाज कसा चालत होता, कोणत्या बाबतींत नीट चालत नव्हता, हे कळणारच नाही.
या दृष्टीने पाहता इतिहास हा सतत लिहिला जात असलेला ग्रंथ आहे. भूतकाळाचा सतत नव्याने अर्थ लावला जात असतो. सोबतच पूर्वी कुठेकुठे वाट चुकली, हेही सांगितले जात असते. पूर्वी जे दमन झाले तसे पुन्हा होऊ नये, हे इतिहास सकारण सांगत असतो. जातिव्यवस्था कशी विकृत होऊ शकते, हे दाखविण्यासाठी दलितांची अवहेलना नोंदायला हवी. नाही तर आजही जातिव्यवस्थेचे समर्थक आहेतच, आणि ते पुन्हा प्रतिगामी होऊन अत्याचार करतील हा धोकाही आहेच. उदाहरण पाहू. आपल्या ‘द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ’ या पुस्तकात डॉ. एस. राधाकृष्णन म्हणतात, “जातिसंस्था हिंदू मनोधारणेची सर्वंकष एकत्रीकरणाची वृत्ती दाखवते. ती (विभिन्न) वंशांच्या आणि संस्कृतींच्या सहकार्यावरील हिंदूंच्या श्रद्धेची निदर्शक आहे. जातिव्यवस्था सहिष्णुता व परस्परांवरील विश्वासातून उपजली, हे विरोधाभासी वाटेल.” पुढे राधाकृष्णन म्हणाले, “(जातिव्यवस्था) दमन आणि असहिष्णुतेच्या हत्यारात परिवर्तित झाली” पण तरीही “प्रत्येक वांशिक गटाला इतर गटांच्या प्रगतीत अडथळा न आणता स्वतःचा सर्वोत्तम विकास करू देणे” — हे मूलतत्त्व राधाकृष्णनना समर्थनीयच वाटते.
हा युक्तिवाद दक्षिण आफ्रिकेतल्या गोऱ्या वंशवादी ॲपार्थेड (रििीहशळव)वाद्यांना पटला असता. तेही वांशिक गटांच्या सुट्यासुट्या विकासाबाबत सश्रद्ध होते.
पण (तरीही) अशी मते पुसून टाकायला नकोत. जातिसंस्था का अस्तित्वात आली, कोणत्या स्थितीत हे घडले, याचा अभ्यास विद्वानांना करता यायलाच हवा. जातिसंस्थाच कशाला, नरबळी, चेटकिणींना जाळणे, सती, साऱ्याच धर्माधारित पण घृणास्पद संस्थांचा अभ्यास करता यायलाच हवा. एखादे राष्ट्र आपल्या इतिहासाकडे स्वच्छ, निरंजन दृष्टीने पाहू शकले, तरच त्या राष्ट्रातून पूर्वग्रह आणि अंधश्रद्धा बाद होऊ शकतील. सूरजभानांचे इतिहास मिटवण्याचे सूत्र मानले, तर जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. परंतु इतिहासाकडे कानाडोळा करणारे ते एकटेच नाहीत. मानवी संसाधनमंत्री असताना डॉ. मुरली मनोहर जोशींनीही इतिहासाचे पुनर्लेखन करायचा प्रयत्न केला होता. रोगाची लागण विस्तृत क्षेत्रात पसरली आहे.
मु. म. जोशींचे हेतु राजकीय होते. त्यांना त्यांच्या पक्षाचा सांप्रदायिक कार्यक्रम रेटणाऱ्या रूपात इतिहास ढाळायचा होता. त्यामुळे गांधीजींच्या हत्येचा उल्लेख शालेय क्रमिक पुस्तकांमधून स्थळकाळाभावी गाळला गेला, असे पुस्तकाचे लेखक हरिओम सांगते झाले. ही गंभीर चूक होती, असेही ते म्हणाले. या चुका सहसा अनवधानातून घडत नाहीत. त्यांमागे मानसिक कारणे असतात. एका ऋषितुल्य व्यक्तीच्या हत्येमागे हिंदुत्ववाद होता, ह्याचा उल्लेख टाळणे क्रमिक पुस्तकांच्या भगवीकरणासाठी आवश्यकच होते. भाजपने याकडे पाठ फिरवणे सहज समजू शकते.
सूरजभानना दलितांच्या अवमानाकडे पाठ फिरवावेसे वाटते, यामागे संताप आणि शरम असू शकेल. परंतु इतिहास व इतर सर्व शास्त्रे भावनाप्रधानता टाळून स्पष्टपणे विषयवस्तूकडे पाहायला सांगतात. आपण भारतीय एखादेवेळी फार हळवे असू, आणि यामुळे तटस्थ शास्त्राभ्यास आपल्याला जड जात असेल.
परलोकावर लक्ष केंद्रित करणाऱ्या धारणाही इहलोकाकडे दुर्लक्ष करायला उद्युक्त करत असतील. या स्वभावधर्मामुळेच आपण आपला उज्ज्वल भूतकाळ विसरलो, आणि तो ब्रिटिशांनी नव्याने आपल्यापुढे आणला. सूरजभान यांनी जीवनाच्या सर्व अंगांबाबत सत्य शोधणे महत्त्वाचे मानायला हवे, झाकपाक नव्हे.
[Tribuneindia.com/2005/20050901/edit.htm या वेबसाईटवरील अमूल्य गांगुली यांच्या (Tampering with texts : Perils of Rewriting History (2 Sept. 2009) या लेखाचे हे भाषांतर. आसुचे वाचक हर्षवर्धन निमखेडकर यांनी निदर्शनास आणून दिले. – सं.]