‘मराठी’ ची चर्चा आणखी एकदा; पुन्हा पुन्हा

एक वांद्रे कॉलनी,’ म्हणून कंडक्टरना तिकीट मागितले की ते आणि अन्य सहप्रवाशीही चमत्कारिकपणे आपल्याकडे पाहताहेत असे वाटते. ‘हे घ्या बांद्रा कॉलनी’ म्हणत कंडक्टर मला दुरुस्त करतात. कोणीतरी ‘बँड्रा’ उच्चारुनही तिकीट मागतात. ते मात्र तितकेसे त्यांना चमत्कारिक वाटताना दिसत नाही. गंमत म्हणजे बसचा फलक ‘वांद्रे वसाहत’ असताना हे चालत असते. मी फक्त ‘वांद्रे’ म्हणत असतो. ‘वसाहत’ म्हणत नाही. ‘कॉलनी’ असेच म्हणतो. कंडक्टरना ‘कंडक्टर’ किंवा ‘मास्तर’ म्हणतो. ‘वाहक’ म्हणत नाही. ड्रायव्हरना तर ‘चालक’ म्हणण्याची मला हिंमतच होत नाही.
तरीही माझा हा किमान मराठीचा आग्रह जवळच्यांना जास्तीचा वाटतो. बांद्रा किंवा बँड्रा म्हटल्याने काय फरक पडतो, असे त्यांना वाटते. मराठीत ज्या शब्दाचा जो उच्चार असेल, तोच उच्चारला जायला हवा, हा साधा आग्रह माझा असतो.
पण या साध्या उच्चारांच्या नेटकेपणावर मराठीचे भवितव्य अवलंबून आहे का?
खरे म्हणजे नाही. भाषा ही विकसित होत असते. जसे नद्यांचे संगम होतात, तसेच भोवताली बोलल्या जाणाऱ्या भाषांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. नवे शब्द, नवे उच्चार परस्परांत मिसळत असतात. आजची मराठी ही चक्रधरांची किंवा ज्ञानेश्वरांची नाही. शिवाजी महाराजांचीही नाही. महाराजांच्या काळातील मराठीत सुलतानी राजवटीच्या अमलामुळे कितीतरी फारसी शब्द मिसळले गेले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, महाल, तपशील हे मूळ फारसी शब्द असल्याचे कोणाला सांगूनही पटणार नाही, इतके ते आज मराठीत रुळले आहेत. उच्चारांच्या सुलभीकरणाच्या प्रवृत्तीनेही शब्द बदलतात. चंद्रकांतला ‘चंदर’ म्हणून तर सुरेशला ‘सुरेस’ म्हणून हाक मारणे हे आमच्या गावी आजही चालते. मी शाळेत सुरुवातीला ‘सुरेस’ असेच नाव सांगत असे. आमच्या बाईंनी ते दुरुस्त केल्यावर मग ‘मीलन’मधल्या सुनीलदत्तच्या ‘अरे बाबा, शोर नहीं सोर’ चालीवर मी ‘सुरेस नाही, सुरेश..’, ‘..स नाही श..श..’ असे मला हाक मारणाऱ्यांना दुरुस्त करु लागलो.
शब्द ही ध्वनिचिन्हे आहेत. हे शब्द उच्चारल्यावर त्याचा काही एक अर्थ ऐकणाऱ्याला लागतो. तोच महत्वाचा असतो. स किंवा श याला स्वतःचे मूल्य काही नसते. पाली भाषेतील ‘सरणं’ व संस्कृतमधील ‘शरणं’ यांचा अर्थ एकच. काही वेळा एकाच शब्दाचे दोन भाषांतील अर्थ वेगळे असू शकतात. लिंग वेगळे असू शकते. मराठीत ‘व्यक्ती’ स्त्रीलिंगी तर हिंदीत पुल्लिंगी. अलिकडे मराठीतही अनेकजण ‘मला एक व्यक्ती भेटला’ असे बोलू लागले आहेत. माझ्यासमोर असे बोलणाऱ्यांना मी दुरुस्त करायचा आधी प्रयत्न करत असे. आता तो सोडून दिला आहे. या लिंगबदलाने अर्थात काही फरक पडत नसतो. उत्तरप्रदेशातील हिंदीत ‘दुकान’ स्त्रीलिंगी, तर छत्तीसगडी हिंदीत ‘पुल्लिंगी’ उच्चारले जाते.
मुद्दा असा, हे बदल, हे स्वीकार हे मूळ भाषेत सहजासहजी त्याचे प्रत्यय लावून स्वीकारले जातात, तेव्हा प्रश्न नसतो. ‘ड्रायव्हरने गाडी साईडला घेतली’ यात ने, ला प्रत्ययांमुळे ड्रायव्हर, साईड हे शब्द मराठीत सामावले जातात. जगातल्या सगळ्याच भाषा अशा बदलत असतात. जिचा व्यवहारात अधिक वापर होतो, जितक्या विविध क्षेत्रातले लोक तिचा वापर करतात, तितकी ती अधिक समृद्ध होत जाते. इंग्रजी त्यामुळेच समृद्ध होत गेली आहे.
मग माझा बांद्रा-बँड्राला विरोध का? मी अचूकवादी नाही. माझा शब्दांना विरोध नाही. अन्य भाषकांनी तसे ते उच्चारण्यासही माझी हरकत नाही. वास्तविक मराठी माणसांनीही उच्चारण्यास हरकत असणार नाही. पण आज हे उच्चार करणारी मराठी माणसे वांद्रे, बांद्रा, बँड्रा असा तिन्हींचा सहज एकाच प्रतिष्ठेने उच्चार करत नाहीत, तर ‘वांद्रे’ म्हणणे त्यांना कमीपणाचे वाटते व इतर दोन त्यांना प्रतिष्ठितपणाचे वाटते. माझा आक्षेप याला आहे. बहुजनसमाजातील खास मराठी घरातील बीडीडी चाळीतील मुले कॉलेजमध्ये गेल्यावर कोठे राहता असे विचारल्यावर ‘मी बीडीडी ‘चॉल’ मध्ये राहतो’ असे सांगू लागतात. कारण त्यांचे इंग्रजी माध्यमातून आलेले अमराठी सहाध्यायी तसा उच्चार करत असतात. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेत आपल्यापेक्षा पुढारलेला समूह जी भाषा बोलतो, ती प्रतिष्ठित मानली जाते. त्यांनी आपल्या भाषेची मोडतोड केली तरी ते आपल्याला खुपत नाही. उलट ती तोडफोडच आपण शिरावर घेऊन चालू लागतो.
एका जोशी नावाच्या मुलीने शिंदे नावाच्या मुलीची फेसबुकवरील एक शब्द लिहितानाची चूक जाहीरपणे व कटाक्षाने काढली. तिने नोंदवले- अगं ‘विशिष्ठ’ नाही ‘विशिष्ट’. तिने ‘ट’ वर जोर देताना ‘ही बहुजन समाजातली ‘आनिपानी’वाली माणसं, यांना धड मराठी शुद्ध बोलता येत नाही.’ असे काहीतरी तिचे स्वगत चालू असावे, असे माझ्या मनात आले. अशा अनेक मराठी जोशी ‘अशोक’चा ‘अशोका’, ‘सिद्धार्थ’चा ‘सिद्धार्था’ असा उच्चार करताना सेमिनारमध्ये मला आढळतात. त्यांना ते चुकीचे किंवा ‘अशुद्ध’वाटत नाही. कारण सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेत त्यांच्यापेक्षा वरचढ असणारे इंग्रजी भाषक इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे तसाच उच्चार करत असतात. ‘गांधी मला भेटला’तील वसंत गुर्जरांच्या भाषेला अश्लील म्हणताना यांच्या आपसातील इंग्रजी संवादात मात्र दर चार वाक्यांनंतर ‘Fuck’ शब्द येत असतो.
माझ्या मनावर लहानपणी ‘सुरेस’ ला प्रतिष्ठा नाही, एवढेच नव्हे, तर ते मागासलेपणाचे, अडाणीपणाचे आहे असेच बिंबले गेले. कारण असा उच्चार करणारे आमचे लोक हे जातीने खालचे, संपत्ती-सत्तेपासून वंचित होते. ते अप्रतिष्ठित होते. माझ्या बाई (ज्या खूप चांगल्या, प्रेमळ व आमच्याविषयी आत्मीयता असणाऱ्या असल्या तरी) या निकषांवर वरच्या होत्या. त्यांचे अनुकरण हेच प्रतिष्ठा मिळवायचे, प्रगती करण्याचे गमक मी मानू लागलो. शक्यतो आई-वडिलांनी शाळेत येऊ नये, बाईंशी ‘अशुद्ध’ बोलून आपली इज्जत घालवू नये, असेच वाटायचे. आम्ही कोकणी ‘ळ’चा उच्चार ‘ल’ असा करत असू. माझा एक मामेभाऊ शुद्ध बोलण्याच्या प्रयत्नात सगळे ‘ल’ ‘ळ’ असेच उच्चारायचा. वकिलालाही ‘वकिळ’ असेच म्हणायचा. मी मात्र ब्राम्हणी (चित्पावनी) मराठी (जी आज प्रमाण मराठी भाषा मानली जाते) आत्मसात केली. अगदी ‘श’ व ‘ष’ यातील उच्चारभेदांसहित. सगळ्या पारंपरिक शिव्या टाकून दिल्या. अगदी मनातही उच्चारत नाही. या शुद्ध-अशुद्धच्या फेऱ्यातून मी आज बाहेर असलो, तरी माझी भाषा प्रमाण मराठीच राहिली. माझी व्यक्त होण्याची, सांस्कृतिक व्यवहाराची भाषा आज तीच आहे. केवळ विद्रोहासाठी म्हणून माझी मूळ भाषा वापरणे, हे आता कृत्रिम असणार आहे.
भाषा ‘शुद्ध’ नसते. ती ‘प्रमाण’ असू शकते. अनेक बोली बोलणाऱ्या समूहांचा प्रादेशिक व्यवहार होण्यासाठीची ती गरज असते. बोलीतून प्रमाणभाषेकडे सरकणे हे शाळेत व्हायला हवे असते. पण या शुद्धतेने गडबड केली. सरसकट प्रमाण भाषा (तीही संस्कृतप्रचुर) स्वार झाली. अशुद्धता ही व्यक्त होणाऱ्याच्या मनात, वृत्तीत असते. ‘रांडच्या’ संबोधनात मायेचा ओलावा असू शकतो, तर बिगरशिवीचे संबोधन ठार कोरडे असू शकते.
एकेकाळच्या प्रमाण मराठीच्या प्रतिष्ठेची जागा आता इंग्रजी घेत आहे. समाजातला प्रमाण मराठीचा आग्रह धरणारा वर्ग आता इंग्रजीकडे सरकला आहे. तिच्या आधारे त्याने नव्या काळातील सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा मिळवली आहे. त्याचेच अनुकरण बहुजन व तथाकथित तळचे समुदाय करु लागले आहेत. त्यातूनच वांद्रेऐवजी बांद्रा-बँड्राला प्रतिष्ठा मिळत आहे.
सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा किंवा सांप्रत अन्य मानकांनी निर्देशित प्रगती आम्ही करत असू तर आपली भाषा टिकली पाहिजे, हा आग्रह का?
यावर खूप तज्ज्ञांनी लिहिले आहे. त्या सगळ्यात मी जात नाही. एकच सांगतो, भाषा ही फक्त संवादाचे माध्यम नसते. ते ती भाषा बोलणाऱ्या समूहाचे सांस्कृतिक संचित असते. त्यात त्या समूहाच्या माणूसपणाच्या विकासाचा इतिहास असतो. त्याचे भावविश्व, त्याची मूल्ये, मानसिक आंदोलने त्यात असतात. त्याच्या जीवनाचे सौंदर्य त्यात असते. लोकगीते, नाटक, कथा इ. साहित्याद्वारा ते सौंदर्य आविष्कृत होत असते. हो, त्या समूहाचे पारंपरिक ज्ञानही त्यात असते. म्हणी, वाक्प्रचारांनी त्या भाषेचे सौंदर्य तर वाढतेच; पण आशयही अधिक प्रभावीपणे व नेमकेपणाने व्यक्त होतो. चळवळीत लगेच यश मिळत नाही, सतत लढावे लागते, हे सांगताना मी ‘पी हळद अन् हो गोरी’ असे होत नसते, अशी म्हण वापरतो. हे ऐकल्यावर लोक हसतात. त्यांना तो मुद्दा बरोबर पोहोचतो. ज्या संस्कृतीत हळदीचा आणि गोरेपणाचा हा संबंध जोडलेला नसतो, त्या संस्कृतीतील भाषेतून हा आशय कसा व्यक्त करणार? ती भाषा बोलणाऱ्या समूहांत दुसरी कोणतीतरी म्हण असू शकते. समजा ती म्हण मला ठाऊक असली व ती मी उच्चारली, तरी समोरचे त्या संस्कृतीशी परिचित नसतील, तर त्यांना तिचा बोध कसा होणार? तिची गंमत कशी कळणार?
परिसरात बोलली जाणारी बोलीभाषा, मग प्रमाण भाषा व नंतर अधिक व्यापक समुदायांशी संवादासाठी इंग्रजी भाषा असाच शैक्षणिक माध्यमाचा क्रम असायला हवा. हा प्रमाण भाषेच्या किंवा इंग्रजीच्या दुस्वासाचा प्रश्न नसतो. त्यासाठी ती भाषा ‘हटाओ’ची मोहीमही घ्यायची नसते. केवळ भौतिक प्रगतीने माणूसपण विकसित होत नाही. तुमच्या माणूसपणाचे झरे तुमच्या मूळ संस्कृतीतूनच वाहत येऊन पुढे विस्तारावे लागतात. मराठी माणसाला हे समजावून सांगावे लागेल. त्याच्या न्यूनगंडाला आवाहन करुन पुन्हा भौतिक बाबींवरच सत्ता प्रस्थापित करायचे आवाहन त्याला केले जाते. यात संधिसाधू राजकारणाचा मोठा भाग असतो, हे तर उघडच असते. हटाव लुंगी-बजाव पुंगी पासून भय्यांना मारहाणीपर्यंतच्या उपक्रमांतून या न्यूनगंडाचे विरेचन झाल्याचा केवळ खोटा दिलासा मिळाला. पण काही काळाने ही नशा उतरल्यावर मराठी माणूस पुन्हा न्यूनगंडाच्या खाईत फेकला गेला. हाच क्रम सध्या चालू आहे. या मराठी माणसाला माणूसपण विकसित करण्यासाठी, जीवनाचे सौंदर्य टिकविण्यासाठी मराठीची जोपासना आवश्यक आहे, हे पटल्याशिवाय हा क्रम थांबणार नाही. हे पटविण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही, हे वारंवार म्हणून झाले. सरकारवर दबाव आणण्यासाठी ते एका बाजूला म्हणतही राहू. पण हे म्हणत असताना समाजातल्या जाणत्यांनी त्यांना शक्य ते प्रयत्न करत राहायला हवेत. ‘अगं अगं म्हशी’ म्हणत लघुदृष्टीच्या या स्वार्थशर्यतीत आपणही धारेला लागणे थांबवावे लागेल. असे थांबून विचार करु लागलो, तर यातून बाहेर निघण्याचे मार्गही दिसू शकतील. अनेक तज्ज्ञ ते सुचवितही आहेत. पण धोक्याचे गांभीर्य समजणे व त्यावर मात करण्याची इच्छाशक्ती असणे हे सर्वप्रथम आहे.

साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, जून २०१५

sawant.suresh@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.