गाडगे महाराजांना संत का म्हटले गेले हेच कोडे आहे. रूढार्थाने आपण ज्यांना संत म्हणतो, त्या संतांसारखी एखादीही कृती गाडगेबाबांनी केली नाही. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसाला आपण ‘बाबा’ म्हणतो या अर्थाने खेडुतांनी, गोरगरिबांनी त्यांना बाबा म्हटले आणि ते त्यांनी सहर्ष स्वीकारले असावे. पण महाराज ? हे काय प्रकरण आहे? कुणी आपल्या सोयीसाठी त्यांना महाराज बनविले ? कारण त्यांनी स्वतःच अनेक वेळा सांगितले आहे ‘मी कोनाचा गुरु नाही अन् माझे कोनी शिष्यई नाहीत-‘ आपल्या भोवतीच्या सामाजिक दुःस्थितीचे अवलोकन करीत, त्यातून मार्ग शोधीत गाडगेबाबांचे लोकोत्तर आणि इहवादी तत्त्वज्ञान आकारले आहे, हे कुणी लक्षातच घेत नाही.
गो.नी.दांडेकरांच्या चरित्राचे पूनर्मूल्यांकन व्हावे:
गो.नी.दांडेकरांनी आपल्या ‘खास’ रसाळ शैलीत गाडगे महाराजांचे चरित्र लिहून महाराष्ट्रावर मोठे उपकार केले असे बाबांचे भक्तच जाहीर व्याख्यानातून सांगतात, तेव्हा त्यांची कीव येते. गाडगेबाबांना गृहत्याग केल्यानंतर एक सत्पुरुष भेटला आणि त्यांनी अनुग्रह केल्यामुळे गाडगे महाराज, ‘महाराज’ बनले हा दांडेकरांचा शोध त्यांच्या कामाची प्रेरणाच विकृत बनवितो याकडे कुणी कसे लक्ष देत नाही? गाडगे महाराजांनी स्वतः कधीही असे कुणी भेटल्याचे सांगितले नाही. उलट पायाला स्पर्श करणाऱ्या भाविकांना त्यांनी वारंवार काठीने बदडले आहे.
आपल्या भोवतीच्या प्रचंड आर्थिक आणि सामाजिक शोषणाच्या दर्शनातून हे प्रतिक्रियात्मक व्यक्तिमत्त्व कसे उभे झाले, हे दाखविणे ज्यांना समाजाची जातिप्रणीत चौकट कायम ठेवायची आहे त्यांना अडचणीचे वाटते. म्हणून मग कुण्यातरी साधुबुवाचा अनुग्रह होऊन गाडगेबाबा कार्यरत झाले असे सांगणे त्यांच्या दृष्टीने सोयीचे असते. गाडगेबाबांनी ‘कीर्तना’द्वारे प्रबोधन केले यामुळेही त्यांना ‘महाराज’ बनविणे सोयीचे गेले. पण त्यांच्या कीर्तनपद्धतीकडे जरा चिकित्सकपणे पाहिले की, बाबांचे क्रांतिकारकत्व अधिक प्रकर्षाने जाणवते. नारदीय कीर्तनपद्धती, वारकरी कीर्तनपद्धती, राष्ट्रीय कीर्तनपद्धती यांमध्ये त्यांच्या कीर्तनाचा समावेश करता येत नाही. त्यांचे कीर्तन म्हणजे एका तळमळीच्या कर्त्या सुधारकाचे मुक्त आणि प्रगट चिंतन आहे. गाडगेबाबा निरक्षर होते. या निरक्षर माणसाने समाजाचे उद्बोधन आणि त्यातही ग्रामीणांचे करताना, कोणते माध्यम निवडावे? व्याख्यान ? कोण आले असते त्यांच्या व्याख्यानाला? कुठलीही कृती करायला घाबरणारा आणि आत्ममग्न असलेला मध्यमवर्ग ? आणि खेडूत तर व्याख्यान म्हटल्याबरोबर दोन हात दूर राहतो. आपले तळमळीचे विचार मांडण्यासाठी लोक जमविणाऱ्या कीर्तनाचा आधार घेण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. त्यांनी आपल्या सोयीची कीर्तनपद्धती बनविली. पण तीच प्रबोधनाच्या दृष्टीने परिणामकारक ठरली. आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे “सिंहाला पहावे वनात आणि गाडगेबाबांना पहावे कीर्तनात!”
मूर्तिपूजेचा निषेधः
दगडधोंड्यांची पूजा करण्यात काळाचा आणि पैशाचा व्यय करू नका, त्याच्यापुढे बकरा आणि कोंबड्या मारू नका, तीर्थक्षेत्रांना जाऊ नका. गंगास्नानाने पापे जातात असे म्हणणे हा धर्माचा शुद्ध काळाबाजार आहे, असे त्यांनी प्रत्येक कीर्तनात सांगितले. श्रोत्यांशी ते प्रत्यक्ष संवाद साधीत. ते विचारीत, “देव किती?” श्रोते म्हणत ‘एक’. तुमच्या गांवी खंडोबा आहे का? आहेना, मग देव किती झाले, ‘दोन’ अशी वाढवीत वाढवीत देवांची संख्या ते दहाबारावर न्यायचे. श्रोत्यांच्या डोक्यात आपोआप प्रकाश पडू लागायचा. पुढे ते म्हणायचे, “देव सोन्याचा केला तर त्याचा बाप सोनार झाला. लोखंडाचा केला तर त्याचा बाप लोहार झाला. या दगडधोंड्यांच्या नादी लागू नका आणि वेळ बर्बाद करू नका.’ असे ते आवर्जून सांगत. देवांवर, त्यांच्या मूर्तिपूजेवर हल्ला चढविताना ते तुकाराम आणि कबीर यांचे पुरावे घेत. आणि आपले म्हणणे सामान्य खेडुतांच्या गळी उतरवीत.
एखाद्या गावी ते कीर्तन लावीत. खेडुतांना विचारीत ‘तीर्थाला गेलात नाई?’ श्रोते : होय, बाबा बाबा : बोलला काई तुमचा देव ? श्रोते : नाई. बाबा : इतक्या दुरून गेले तं जेवले-गिवले का, असं काईच नाई विचारलं ? वारे! तुमचा देव ?
देवांची आणि मूर्तिपूजेची गाडगेबाबांनी अतिशय त्वेषाने टिंगल केलेली दिसते. खेड्यापाड्यांमध्ये दगड-धोंड्याला शेंदूर माखून देव बनविले जाते. अशा शेंदूरमाखल्या देवांना त्यांनी नदीत उचलून फेकले. केवढे हे क्रांतिकारकत्व !
एका कीर्तनात ते म्हणतात, ‘कसा बापा तुमचा देव? महादेवाच्या पिंडीवर कुत्रं अभिषेक करते तं तो ‘हाडई’ म्हणत नाही.’ यापेक्षा कोणत्या शब्दांत मूर्तिपूजेवर आणि कर्मकांडांवर हल्ला करता येईल?
जगात जाती दोनचः
अस्पृश्यता केवळ कायद्याने जाणारी नसून मतपरिवर्तनाने जाईल, हे ओळखून अस्पृश्यतेसंबंधी आपले स्पष्ट विचार त्यांनी कीर्तनाद्वारा खेड्यापाड्यांतून आणि शहरांतूनही जनतेपुढे मांडले. ते म्हणायचे ‘जगात जाती फक्त दोनच आहेत. एक पुरुष व दुसरी स्त्री. तिसरी जातच नाही. जो कोणी जात विचारीत असेल तो महामूर्ख होय. कोणी जात विचारील तर त्याला मी ‘माणूस’ आहे असे सांगा. जनावरात जसे गाढव, बैल, म्हैस, कुत्रा इत्यादी जाती आहेत तशा मानवप्राण्यात नाहीत. तसे असते तर जनावरात जसा हा गाढव – हा बैल असे ओळखता येते, तसेच मनुष्यजातीत हा महार, हा कुणबी, हा ब्राह्मण असे ओळखता आले असते… पुढे त्यांनी म्हटले आहे, ‘आपल्या देशातच फक्त “शिवाशीव’ हा शब्द आहे, शिवाशीव हा शब्द रशियात नाही, अमेरिकेत नाही, चीनमध्ये नाही. फक्त हिंदुस्थानातच आहे बाप्पा!’ जातिभेद निर्मूलनासाठी असे प्रभावी प्रबोधन त्यांनी खेड्यापाड्यांमधून दिले.
गाडगेबाबा खेडुतांच्या मनातील अंधश्रद्धेचा मळ जसा खरडीत होते तसेच भोवतीचा कचराही साफ करीत होते. सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी रस्ते झाडले, नाल्या साफ केल्या. खेड्यातले अनेक आजार, व्याधी ह्या अस्वच्छ राहणी आणि कुपोषण यांतून निर्माण होतात हे गाडेबाबांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी स्वच्छतेवर भर दिला. या ‘खराटाधर्माने’ त्यांनी ‘सार्वजनिक आरोग्य’ आणि ‘श्रमप्रतिष्ठा’ अशा दोन साध्यांची प्राप्ती केली. महात्मा गांधींनी ‘चरख्यातून स्वराज्य’ दिले तसे गाडगेबाबांनी ‘खराट्यातून सुराज्य’ सांगितले.
खेड्यातली माणसे अस्वच्छ राहणीमुळे अनेक साथीच्या रोगांना बळी पडतात. आणि आजारी झाली की मांत्रिक, देवऋषी यांचा आश्रय घेतात हे गाडगेबाबांनी हेरले होते. ‘आजारपणात डॉक्टरकडे जा. अंगारे-धुपारे, नवसतापास करू नका’ असा कळकळीचा सल्ला खेडुतांना द्यायला ते कधी विसरले नाहीत. ‘अंगात येणे’ या ढोंगाचा तर त्यांनी अनेकवेळा आपल्या कीर्तनात नक्कल करीत-करीत निषेध केला.
इहवादी दृष्टिकोणः
गाडगेबाबांच्या चरित्रातली एक घटना अतिशय उद्बोधक आहे. महाराष्ट्रभर त्यांनी भ्रमंती केली. नासिकला ते गेले. तिथे एक पुरोहित पाण्यात उभा राहून मंत्र म्हणत होता. त्यांची चेष्टा करण्याची इच्छा गाडगेबाबांची झाली. ते नदीच्या पात्रात उतरले. नदीचे पाणी ओंजळीत घेऊन ते किनाऱ्याकडे फेकू लागले. तो पुरोहित संतप्त होऊन म्हणाला, ‘अरे वेड्या! हे काय करतो आहेस ? बाबा म्हणाले ‘काई नाई, माझ्या वावराले पानी घालतो.’ वावर म्हणजे शेत. ‘कुठे आहे तुझे शेत?’ ‘जी व-हाडात, मूर्तिजापूरपाशी दापुरा हाये तथी’ – पुरोहित म्हणाला ‘हे पाणी इतक्या दूर कसे जाणार ?’ बाबा म्हणाले, ‘तुम्ही पितृमोक्ष अमावश्येला आपापल्या पितरांना अन्न स्वर्गात पाठवता मंग आम्हाला व-हाडात पानी नाई पाठवता येनार काय ?, अशा बुद्धिवादी युक्तिवादाच्या विनोदाची डूंगरे बाबांच्या चरित्रात अनेक ठिकाणी निनादताना दिसतात. गो.नी. दांडेकरांसारख्या चरित्रकारांना ती का दिसू नयेत ?
सत्यनारायणासारख्या पोथ्यांचाही गाडगेबाबांनी कडाडून निषेध केला आहे. ते म्हणतात. साधुवाण्यानी सव्वा रुपयाचा प्रसाद वाटला आणि पोथी वाचली तर कलावती का लीलावतीची बोट पाण्यात तरंगली. ‘असं अशीन तं मंग सारे भटजी सैन्यात पाठवा. शत्रूच्या बंदुकीच्या गोळ्या परतावा म्हणा सत्यनारायणाची पोथी वाचून’. असे परखड विचार एका निरक्षर माणसाने मांडावे याचे कौतुक वाटते.
शिक्षणावाचून माणूस म्हणजे धोंडाः
भारतातल्या रोख दारिद्र्याचा शोध घेताना त्यांच्या लक्षात आले. शिक्षणाशिवाय आमचा उद्धार नाही. यासंबंधी बोलताना त्यांनी अनेकवेळा म्हटले आहे ‘हे लोक का गरिबीत? ज्याले इद्या नसीन त्याले खटाऱ्याचा बैल म्हटले तरी चालेल! आता तरी सुधरा. मुलाले शिक्षण द्या. इव्हायाले पाहुणचार करू नका. पण मुलाले शाळेत घातल्याशिवाय राहू नका.’
सामाजिक तळमळीतून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. महाराष्ट्रभर शिक्षणसंस्था काढल्या. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याला सक्रिय पाठिंबा दिला. स्वतः निरक्षर असलेल्या या माणसाने महाराष्ट्रातील खेडुताच्या हाती ‘लेखणी’ दिली. कशासाठी? त्यांना वाटले होते, शिक्षणानंतर समाजातील सामाजिक, आर्थिक विषमता कमी होईल, देव आणि देवाचे नावाने चालणारे कर्मकांड कमी होईल, जातिभेद आणि पशुहत्या थांबेल. पण काय झाले ? शिकलेल्या आजच्या माणसांनी या सर्व गोष्टींना खतपाणी घातले आहे. जी गोष्ट निरक्षर माणसाला समजली ती आम्हा सुशिक्षितांना समजू नये हे केवढे आश्चर्य ?
आपले कोणी शिष्य नाही. आपल्या कुटुंबीयांना कोणतीही सवलत मिळू नये हे आपल्या मृत्युपत्रात गाडगेबाबांनी आवर्जून लिहायला लावले. त्यांच्या कुटुंबीयांनी बाबांची त्यागीवृत्ती निष्ठेने जोपासली. त्यांच्या शिष्यांनी मात्र मिशन स्थापन केले. या मिशनने काय केले? जेवणाची सदावर्ते काढली. आश्रमशाळा काढून सरकारी अनुदाने मिळविली. गोरक्षणे काढून धनिकांची मर्जी संपादन केली. पण त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे मिशन स्थापन करता आले नाही. तसे करणे गैरसोयीचे असावे. कारण धनिकांना भिकाऱ्यांविषयी, प्राणिमात्रांविषयी दया दाखविणे आवडते पण मुळात या विषमतेची चिकित्सा केलेली आवडत नाही. देववाद, दैववाद, अज्ञान, आरोग्यविषयक बेपर्वाई हे सर्व गेल्याशिवाय बहुजन ग्रामीणसमाज प्रगती करूच शकणार नाही. असंख्यांच्या अज्ञानी राहण्यातच मूठभरांचे शहाणपण टिकून असते. अशा मूठभरांना गाडगेबाबांच्या नावाने अशा ‘मलमपट्टया’ करणे सोयीचे वाटते, त्यांनी दाखविलेल्या मार्गाने मुळावर आघात घालणे नाही.
महाराष्ट्रात एका निरक्षर माणसाने आपल्या सर्व ताकदीनिशी अंधश्रद्धेवर आघात केले. आणि ‘बुद्धिवाद’ हा शब्दही माहीत नसून बुद्धिवादी विचारांचे लोण आपल्या परीने पोहचविण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट समविचारी माणसांनी कृतज्ञतेने स्मरणात ठेवावी.
[ तिमिरभेद, संपादक अंजली सोमण, या पुस्तकातून. ]