हवामानबदलाबाबत आपण काय करावे, हा नैतिक प्रश्न आहे. विज्ञान, त्यात अर्थशास्त्रही आले, हे आपल्याला हवामानबदलाची कारणे आणि परिणाम सांगू शकेल. आपण काय केल्याने काय होईल, हेही विज्ञान सांगू शकेल. पण काय करणे इष्ट आहे, हा मात्र नीतीच्या क्षेत्रातला प्रश्न आहे.
अशा प्रश्नांच्या विचारी उत्तरांत वेगवेगळ्या मानवसमूहांच्या इच्छा-आकांक्षांमधल्या संघर्षांचा विचार करावा लागतो. जर हवामानबदलाबाबत काही करायचे असेल तर आजच्या माणसांपैकी काहींना (विशेषतः सुबत्ता भोगणाऱ्यांना) त्यांच्यामुळे होणारी हरितगृहवायूंची (यापुढे GHG उर्फ ग्रीनहाऊस गॅसेस) उत्सर्जने कमी करावी लागतील नाहीतर भावी पिढ्यांना सध्यापेक्षा गरम जगात भकास जिणे जगावे लागेल.
एकूणच हवामानबदलामुळे अनेक नैतिक प्रश्न उभे राहतात. भावी पिढ्यांतील माणसांकडे भौतिक उपयोगाच्या आणि उपभोगाच्या वस्तू बहुधा जास्त असतील, ह्याची दखल घेऊन त्या लोकांच्या सुखसमाधानाचे मोजमाप आजच्या माणसांनी कसे करावे? हवामानबदलामुळे आज हयात असलेली व जन्माला येणारी अनेक माणसे मरतील. सर्वच मृत्यू सारखेच अनिष्ट मानायचे का? एकूण किती मृत्यू अनिष्ट ठरतील? हवामानबदलामुळे अनेक व्यक्ती प्रजोत्पादन करण्याआधीच मरतील. यामुळे जन्मालाच न आलेल्यांचे ‘नसणे’ चांगले की वाईट? GHG उत्सर्जनांद्वारे श्रीमंत लोक गरिबांवर अन्याय करत आहेत का? हवामानबदलाने जागतिक आपत्ती येण्याची शक्यता आहे, भले ती अगदी कमी असेल ; हा धोका पत्करावा का?
बरेचदा नैतिक प्रश्न तरल तत्त्वज्ञान न वापरता साध्या धादांत शहाणपणाने, कॉमन सेन्सने, सोडवता येतात. आणि आपण सारेच कॉमन सेन्स बाळगत असतो. उदाहरणार्थ, इतरांचे नुकसान करून स्वतःचे भले करू नये, हे प्राथमिक तत्त्व सगळे जाणतात. पण कधीकधी इतरांचे नुकसान टाळता येत नाही. अशावेळी ते नुकसान सोसणाऱ्यांना भरपाई मिळायला हवी.
हवामानबदलाने नुकसान होईल. उष्मालहरी, वादळे आणि पूर येऊन अनेक लोक मरतील, तर अनेकांचे नुकसान होईल. विषुववृत्तीय क्षेत्रातील रोग इतर क्षेत्रांत पोचून मारकता वाढेल. काही क्षेत्रांत पाऊस कमीजास्त होऊन अन्नपाण्याचे तुटवडे उपजतील. माणसे निर्वासित होऊन इतरत्र जातील. समुद्राची पातळी वाढण्यानेही हे प्रकार घडतील. आज अशा घटनांचे परिणाम आकडेवारीच्या रूपात मांडले गेलेले नाहीत. पण युरोपातील २००३ मधल्या उष्मालहरीने पस्तीस हजार माणसे मेल्याचा अंदाज आहे. १९९८ मध्ये चीनमधील पुरांचा परिणाम चोवीस कोटी लोकांनी भोगला. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार २००० साली दरवर्षी हवामानबदलामुळे मरणाऱ्यांची संख्या दीड लाखावर गेली होती.
आपण सगळेच दैनंदिन जीवन जगताना GHG हवेत सोडतो. इंधनचलित वाहने चालवताना, वीज वापरताना, ऊर्जा वापरून घडवलेल्या वस्तू विकत घेताना CO2 हवेत नेतो. या आपल्या फायद्याने इतरांचे नुकसान होतच असते. एकेकाळी हे आपल्याला माहीत नव्हते, आणि आज आपण सवयींनी ‘मजबूर’ आहोत. पण कॉमन सेन्स नैतिक तत्त्वे सांगतात, की आपण हे बंद करावे, व यामुळे ग्रासलेल्यांना नुकसानभरपाई द्यावी.
हेच तत्त्व आपल्याला नुसता फायदा-तोटा, कॉस्ट-बेनिफिट पाहू नका, असेही सांगते. तोही भाग आहे, पण तेवढाच नव्हे. तुम्ही आणि तुमच्या स्नेह्यांनी रात्रभर ‘पार्टी’ केल्याने तुम्हाला मिळणारे सुख हे तुमच्या शेजाऱ्यांच्या झोपमोडीच्या त्रासापेक्षा जास्त आहे असे ठरले, म्हणून मेजवानी घालणे इष्ट ठरत नाही. तात्कालिक हिशेबात खर्चापेक्षा जास्त फायदे देणारा औद्योगिक प्रकल्प राबवून हवेत CO2 सोडत राहू नये. ते अनैतिक ठरेल. एकाच्या फायद्यासाठी दुसऱ्याला तोटा होऊ देऊ नये. सुखाच्या किंमतीची नैतिकता पण हवामानबदलाबाबत काय करावे ह्या प्रश्नाच्या उत्तरात फायद्या-तोट्याचा हिशोबही आहेच. GHG उत्सर्जने कमी करून हवामानबदलाचे परिणाम सौम्य करण्यासाठी आजच्या माणसांना काहीतरी त्यागावेच लागणार. प्रवास कमी करावा लागणार. घरे तापवणे-थंड करणे याच्या गरजा कमी कराव्या लागणार. मांसाहाराचे प्रमाण कमी करावे लागणार. चैनी कमी कराव्या लागणार. यामुळे भावी पिढ्यांची आयुष्ये जास्त सुखकर होतील. वाळवंटांचा प्रसार मंदावेल. वाढती समुद्रीपातळी त्यांची घरेदारे नष्ट करणार नाही. अतिवृष्टी, पूर, अवर्षण व एकूण निसर्गाचा हास हे कमी होतील.
काहींचा लाभ आणि इतर काहींचा तोटा, यांची तुलना नैतिक पातळीवरच करता येते. हवामानबदलाबाबत बरेच लाभ, बरीच नुकसाने, ही आर्थिक स्वरूपांत पुढे येतात आणि अर्थशास्त्राने व्यामिश्र परिस्थितीत लाभहानी यांचे मोजमाप करायची तंत्रे घडवली आहेत. नीतिविचार या अर्थशास्त्रीय तंत्रांची मदत घेऊ शकतात. इंग्लंडच्या अर्थमंत्रालयात (U. K. Treasury) काम करणाऱ्या निकलस स्टर्न या अर्थशास्त्रज्ञाने अहवाल सादर केला, हवामानबदलाच्या अर्थशास्त्रावर (केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, २००७). स्टर्न अहवालाचा निष्कर्ष असा की GHG उत्सर्जने कमी करण्याचे फायदे त्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चापेक्षा बरेच जास्त आहेत. इतर अर्थशास्त्र्यांनी या अहवालावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक मुद्दा हा, की अर्थशास्त्रीय निष्कर्ष काढण्यात नैतिक विधानांचा वापर व्हायला नको. दुसरा मुद्दा उपाययोजना ताबडतोब व जोमाने करण्याबाबत आहे. येल विद्यापीठातील विल्यम नॉर्डहाऊसच्या व तसल्या इतर अभ्यासांचा निष्कर्ष असा की जोमदार व तात्काळ उपाययोजनांची गरज नाही. हे दोन मुद्दे एकमेकांशी संलग्नच आहेत. उद्याच्या खर्चासाठी किंवा उत्पन्नासाठी आजच्या उत्पन्नात किंवा खर्चात किती वजावट करायची, discount द्यायचा, यात स्टर्न आणि नॉर्डहाऊस यांच्या भूमिकांमध्ये फरक आहे, व तो नैतिक भूमिकांमधल्या फरकांमुळे आलेला आहे.
हा काहीसा तांत्रिक मुद्दा जरा तपशिलात पाहू. मला वर्षभरानंतर शंभर रुपये उत्पन्न मिळण्यासाठी मी आज किती रुपये खर्च करायला तयार आहे, या प्रमाणाला वजावटीचा दर, डिस्काऊंट रेट, म्हणतात. मला भविष्य महत्त्वाचे वाटत असेल, तर मी आज जास्त खर्च करेन. जर ‘कशाला उद्याची बात’ अशी वृत्ती असेल, तर मी आज कमी खर्च करायला तयार होईन. आणि हे चक्रवाढीने घडत राहील, प्रत्येक वर्षी असा हिशोब केला जाईल. स्टर्न भविष्याला महत्त्व देत दरवर्षी १.४% वजावट धरतो, तर नॉर्डहाऊस आजच्या स्थितीला महत्त्व देत ६.०% वजावट धरतो. काही गणिती नियमांमुळे वर्षानंतरच्या शंभर रुपये उत्पन्नासाठी स्टर्न रु. ९८, पैसे ६२ खर्चाला तयार आहे, तर नॉर्डहाऊसला आज रु. ९४, पैसे ३४ पेक्षा जास्त खर्च मान्य नाही. हे वारंवार होत असल्याने शंभर वर्षांनंतरच्या शंभर रुपये उत्पन्नासाठी स्टर्न आज सुमारे पंचवीस रुपये खर्च करणे इष्ट मानतो, तर नॉर्डहाऊस अडीच रुपयांपेक्षा जास्त खर्च करायला तयार नाही! वजावटीच्या दराला कोणताही वस्तुनिष्ठ आधार नाही. केवळ भविष्यासाठी आजची काटकसर, असा नैतिक पायाच आहे.
श्रीमंत भविष्यकाळ
पण वजावट करायची कशाला? हवामानबदलाबाबतचे बहुतेक अभ्यास जगाची अर्थव्यवस्था वाढतच राहील, आपल्या भावी पिढ्या आपल्यापेक्षा जास्त ऐहिक सुबत्ता भोगतील असे दाखवतात. मुळात भरपूर सुबत्ता असलेल्यांना सुबत्तेत आणखी वाढ करणे फारसे मोहवत नाही. घरात न्हाणीघर नसण्यापेक्षा एक न्हाणीघर असणे फार सुख देते. पण एक न्हाणीघर असताना दुसरे न्हाणीघर फार गरजेचे वाटत नाही. हा ‘घटत्या मूल्या’चा प्रकार, diminishing marginal value चा प्रकार, सर्व सुस्थितीतले अर्थशास्त्रज्ञ मान्य करतात.
पण याला एक नैतिक अंगही आहे, जे वजावट आणि वजावट करणाऱ्याची श्रीमंती यांचा विचार करते. याबाबतची नैतिक विचारप्रणाली अग्रक्रमवाद, prioritarianism या नावाने ओळखली जाते. या विचारानुसार श्रीमंत व्यक्तींना मिळणाऱ्या एखाद्या लाभाचे सामाजिक मूल्य तोच लाभ गरीब व्यक्तींना मिळण्याच्या मूल्यापेक्षा कमी मानावे लागते. हा वाद उपयोगितावादाला, utilitarianism ला पर्याय म्हणून मांडला जातो. उपयोगितावादानुसार लाभ कोणाला मिळतो आहे याप्रमाणे त्या लाभाचे सामाजिक मूल्य बदलत नाही. एकूण प्रजेचे सुखसमाधान वाढण्यावर उपयोगितावादाचा भर असतो, वितरणावर नव्हे. आता आपण वजावटीच्या दराचा नव्याने विचार करू.
वजावटीच्या दराला, आज खर्च करून उद्या उत्पन्न वाढवण्याच्या प्रमाणाला न-नैतिक अंगे आहेत. भविष्यातली माणसे आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असणार, असे सांगता आले, तर त्यांच्या ‘सुखवृद्धी’चे मूल्य आजच्या ‘सुखऱ्हासा’च्या मूल्यापेक्षा कमी असेल. त्यामुळे सुबत्तेतली अपेक्षित वृद्धी जर जास्त वेगवान असेल, तर वजावटीचा दरही जास्त मानावा लागणार हे झाले घटत्या उपयोगितेचे अर्थशास्त्रीय सूत्र, नैतिकतेचा विचार नसलेले. नैतिक विचार करताना मात्र अग्रक्रमवाद आणि उपयोगितावाद यांच्या विचारात वेगळ्या अंगाने, नैतिक अंगाने फरक करावा लागतो. जर भविष्यातली माणसे आपल्यापेक्षा श्रीमंत असली, तर त्यांच्या सुखवृद्धीचे मूल्य आपल्या सुखव्हासाच्या मूल्यापेक्षा कमी मानावे, हा झाला अग्रक्रमवाद. त्यांची सुखवृद्धी आपल्या सुखऱ्हासाच्या मापानेच मोजावी, हा झाला उपयोगितावाद. येथे घटत्या मूल्याचा अर्थशास्त्रीय विचार मुळीच नाही फक्त श्रीमंती-गरिबीच्या तुलनेचा विचार आहे.
या मुद्द्यावर अग्रक्रमवादी-उपयोगितावादी वाद एक विचित्र, आर्त (poignant) वळण घेतो. विषमतेबाबतचे बहुतेक वाद तुलनेने श्रीमंत लोकांमध्ये झडतात. श्रीमंतांनी गरिबांसाठी किती त्याग करावा, किती सुख-हास सोसावे, यावर ते वाद असतात. इथे मात्र आजचे आपण, तुलनेने गरीब लोक, यांना भविष्यातल्या श्रीमंतांसाठी त्याग करायचे सुचवले जात आहे. एरवी अग्रक्रमवादी लोक श्रीमंत देशांना गरीब देशांसाठी त्याग करायचे सुचवत असतात, तर उपयोगितावादी लोक श्रीमंत-गरीब यांना एका मापाने मोजत सारख्याच त्यागाची अपेक्षा करत असतात. इथे मात्र उलटे घडते. उपयोगितावादी श्रीमंतांनी जास्त त्याग करावा असे म्हणतात, तर याउलट मत अग्रक्रमवाद्यांचे असते.
काळः दूरचा, जवळचा
एक वेगळाही नैतिक मुद्दा उपस्थित होतो. काही तत्त्वज्ञ म्हणतात की आपण नजीकच्या भविष्यातल्या लोकांची जास्त काळजी वाहावी, आणि दूरवरच्या भविष्यातल्या लोकांची कमी काळजी करावी. जर हे मत ग्राह्य धरले तर आज एखादे दहा वर्षांचे मूल मरणे हे शंभर वर्षांनी दहा वर्षांचे मूल मरण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. इथे वजावटीचा दर वाढवणे [नॉर्डहाऊसचे म्हणणे बरोबर, तर स्टर्नचे म्हणणे चूक मानणे. सं.] इष्ट मानले जाते. कालनिरपेक्ष विचार मात्र कमी वजावट करावी, असे सांगतो.
आता अर्थशास्त्र्यांपुढे दोन नैतिक प्रश्न आहेत अग्रक्रमवाद मानावा की उपयोगितावाद, आणि कालसापेक्ष विचार करावा की कालनिरपेक्ष. दोन्ही बाबतीत पहिले पर्याय जास्त वजावट करायला सांगतात, तर दुसरे पर्याय कमी.
नीतिशास्त्राच्या दृष्टीने हे सोपे, नवशिक्यांचे प्रश्न नाहीत. नीतीच्या तत्त्वज्ञानातल्या कठीण समस्या मांडणारे हे प्रश्न आहेत. नीतिशास्त्रज्ञ काटेकोर विश्लेषणाला नीतीबाबतच्या अंतःप्रेरणांची संवेदनशील जोड देतच असल्या प्रश्नांची उत्तरे शोधतात. नीतिशास्त्रातले असले वाद कधीच निर्णयापर्यंत नेता येत नाहीत, कारण वेगवेगळ्या माणसांच्या अंतःप्रेरणा वेगवेगळ्या असतात. तत्त्वज्ञ या नात्याने मी माझ्या दृष्टीला दिसणारे सत्य शक्यतो काटेकोर युक्तिवादामधून मांडू शकतो, येवढेच. जागेच्या अभावी मी माझे सर्व युक्तिवाद मांडू शकत नाही, पण मला वाटते की अग्रक्रमवाद चुकीचा आहे, आणि आपण कालनिरपेक्ष राहायला हवे. [नॉर्डहाऊसऐवजी स्टर्नला ग्राह्य धरायला हवे. सं.] माझ्या वेइंग गुड्स (Weighing Goods १९९१) आणि वेइंग लाइव्हज (Weighing Lives २००४) या पुस्तकांमधून मी माझे युक्तिवाद मांडले आहेत.
वजावटीचे बाजारभाव?
स्टर्न उपयोगितावाद आणि कालनिरपेक्ष विचार ग्राह्य मानतो, व त्यामुळे वजावटीचा दर कमी ठेवून पुढील विचार करतो. यामुळे त्याचे उत्तर येते, “हवामानबदलावर कठोर उपाय तातडीने करायला हवेत.”
स्टर्नचे विरोधक त्याचे निष्कर्ष त्याच्या नैतिक भूमिकेशी सुसंगत आहेत, हे मान्य करतात. ते त्याच्या नैतिक भूमिकेलाच विरोध करतात. पण असे करताना ते स्वतःची नैतिक भूमिका स्पष्टपणे मांडत नाहीत. मग ते वजावटीचा दर जास्त मानण्याचे समर्थन कसे करतात ? ते आर्थिक बाजारपेठेतले ‘उद्यासाठी आज’चे, व्याजाचे दर वापरतात. बरे, व्याजदरांमागे काही नैतिक कारणे असतात का? मला नाही वाटत, तसे. पण एक मात्र जाणवते की जेव्हा लोक कर्जे देतात किंवा घेतात, तेव्हा उद्याच्या सुखापेक्षा आजचे सुख जास्त महत्त्वाचे मानतात. आपण आपल्याच वृद्धापकाळातल्या सुखशांतीला तारुण्यातल्या सुखशांतीपेक्षा हलके मानण्याइतके मूर्ख नसतो. आपली वागणूक आजच्या सुखासाठीच्या उताविळीतून येते. भविष्याचे हिशेब मागे पडतात. असेच आपण भविष्यातल्या पिढ्यांच्या सुखशांतीविषयीही उतावीळ होऊ.
पण वादाकरता माणसांची बाजारपेठांमधील वागणूक खरेखुरे मूल्यांचे आकलन आणि निष्कर्ष दाखवते, असे मानू. मग अर्थशास्त्रज्ञ कोणतीही नैतिक भूमिका न घेताच वजावटीचे दर बाजारपेठेकडून कसे घेऊ शकतील? पण अर्थशास्त्रज्ञ असा दावा करतात की ते लोकशाही तत्त्वावर भूमिका घेतात, आणि मूल्यांचा विचार बाजारपेठेवर सोडतात. स्टर्न मात्र गर्विष्ठपणे आपली नैतिक भूमिका लोकांवर लादतो.
या युक्तिवादात लोकशाहीचे नीटसे आकलन झालेले दिसत नाही. लोकशाहीला चर्चा, विचारमंथन, असे सारे अवश्यकच असते, मतदानाइतकेच आवश्यक. कोणताही अर्थशास्त्रज्ञ आपल्या भूमिका इतरांवर लादू शकत नाही अगदी स्टर्नही असे करू शकत नाही. सूचना करणे, त्यांचे समर्थक युक्तिवाद मांडणे, येवढेच अर्थशास्त्रज्ञ करू शकतात. वजावटीचा दर काय धरावा हा तरल, तांत्रिक प्रश्न आहे; आणि त्याबाबत सामान्यजनांना तज्ज्ञांची मदत लागते. अशी मदत देणे, ही अर्थशास्त्रज्ञांची जबाबदारी आहे. तसे करताना प्रत्येकाने आपापले युक्तिवाद मांडणे, त्यांमागील नैतिक भूमिका मांडणे, हे करावेच. मग आम्ही सामान्य माणसे त्यांच्या वादांचा विचार करून आमचे निर्णय घेऊ. या मदतीशिवाय आम्ही निर्णय घेतले, तर ते अडाणी, मूल्यहीन ठरतील.
निर्णय घेणे,त्यांच्यानुसार कृती ठरवणे, हे लोकशाही प्रक्रियेचे अंग आहे अर्थशास्त्रज्ञांचे ते काम नाही. त्यांनी प्रक्रियेला निविष्टा (inputs) पुरवायच्या असतात, निष्कर्ष (outputs) नव्हे.
भीषण परिणाम पण हवामानबदलाशी निगडित नैतिक मुद्द्यांमध्ये वजावटीचा दरच फक्त नाही. भीषण परिणामांची, catastrophic outcomes ची शक्यता, हाही एक मुद्दा आहे ; एखादेवेळी वजावट-दरापेक्षा जास्त महत्त्वाचा. खझउउ (इंटर-गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज) सांगते की काही दशकांमध्ये हवेतील हरितगृहवायूंचे प्रमाण दर दशलक्षात ५५० वर जाईल. अशा स्थितीत पृथ्वीचे सरासरी तापमान आठ अंश सेल्सियसने किंवा जास्त वाढण्याची ५ टक्के शक्यता आहे. आणि असे झाल्यास मानवी लोकसंख्या भस्कन खाली येईल, अशी शक्यता आहे ती शक्यता किती आहे हे मात्र कोणीही आज सांगू शकत नाही एखादेवेळी मानवजात नष्टही होऊ शकेल. अशी शक्यता टक्केवारीने कमी असली तरी तो धोका पत्करावा का? अत्यंत कठीण व ताबडतोबीचा, निकडीचा नैतिक प्रश्न आहे हा.
जसे, एखाद्या माणसाच्या अकाली मृत्यूचे नैतिक मूल्य किती? हा प्रश्न पाषाणहृदयी वाटत असेल, तर लक्षात ठेवावे की असे मूल्यमापन आजच सार्वजनिक धोरणाचा भाग आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आजच आजाराचा भार (burden of disease) मोजते. यात आजाराचे दिवस व अकाली मृत्यू हे दोन्ही घटक धरले जातात. हवामानबदलाचा भार ही आज थकज मोजत आहे.
भीषण परिणाम आणखी एक नैतिक प्रश्न उभा करतात. जर भविष्यात माणसांची संख्या अत्यंत कमी होणार असेल, तर कोणाचे काय नुकसान होते, असे मानायचे ? अस्तित्वच नसणे जर अनिष्ट असेल, तर ते कोणाला अनिष्ट आहे यावर तत्त्वज्ञांमध्ये दोन विरोधी विचारप्रवाह आहेत. काहींना लोकसंख्येतली तीव्र घट किंवा सर्वनाश अनिष्ट वाटतात, तर काहींना ते तसे वाटत नाहीत. पण हा प्रश्न सोडवायचे समाधानकारक मार्ग सापडेपर्यंत हवामानबदलाची इष्टानिष्टता नीट जोखता येणार नाही.
समारोप
वजावटीच्या दराचा विचार नैतिक विचारांवरच बेतता येतो. भीषण परिणामांच्या विचारांचा पायाही नैतिकच आहे. हवामानबदलाबाबतच्या विचारमंथनाला वैज्ञानिक अंगे आहेत तशीच नैतिक अंगेही आहेत. लेखक जॉन ब्रूग (John Broome) ऑक्सफर्ड विद्यापीठात नैतिक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत, व कॉर्पस् ख्रिरटी कॉलेजात संशोधक आहेत. याआधी ते ब्रिस्टल विद्यापीठात अर्थशास्त्र शिकवीत. ते अनेक ख्यातनाम संस्थांचे फेलो आहेत. त्यांच्या एथिक्स ऑफ क्लायमेट चेंज या सायंटिफिक अमेरिकन या मासिकाच्या भारतीय आवृत्तीतील (जून २००८) लेखाचा हा संक्षेप.
[या लेखावर अर्थशास्त्रीय मत श्रीनिवास खांदेवाले देत आहेत. तत्त्वज्ञानाच्या अंगाने लेखाचे विश्लेषण करायला दि.य.देशपांडे किंवा मे.पुं. रेगे हवे होते पण त्यांच्याऐवजी कोणी विश्लेषण केल्यास स्वागत होईल. सं.]