मूळ लेखक: पी. साईनाथ
मुंबईमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १८०हून अधिक लोक ठार झाल्यानंतर दहशतवादाला रोखण्यासाठी जे अनेक प्रकारचे युक्तिवाद केले जात आहेत, त्यांपैकी सर्वांत चुकीचा व घातक युक्तिवाद आहे तो असाः
अशा प्रकारच्या दहशतवादास कसे प्रत्युत्तर (response) द्यायचे याचे धडे अमेरिकेकडून भारताने घेतले पाहिजेत. “जरा अमेरिकेकडे पहा- सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत एकही दहशतवादी हल्ला झाला का?”
अशा प्रकारचा युक्तिवाद अनेक जणांकडून ऐकायला मिळतो. थोडक्यात त्यांचे म्हणणे असे असते की त्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या बुश प्रशासनाने जे उपाय केले त्यांमुळे पुन्हा दहशतवादी हल्ला करायचे धाडस कुणीही केलेले नाही. परंतु ह्या प्रकारचा युक्तिवाद हा मूर्खपणाचा कळस आहे असे म्हणायला हवे. अमेरिकेचे दहशतवादाविरुद्धचे प्रत्युत्तर का चुकीचे होते त्याचा हा ताळेबंद.
अमेरिकेने जे उपाय केले त्यांतून मोठ्या प्रमाणात अमेरिकन कंपन्यांबरोबर अल-कायदाचाही फायदा झाला. तसेच नुकसान काय झाले, किती झाले याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यात जवळपास ३००० लोकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याला अमेरिकेचे प्रत्युत्तर होते – युद्ध (war on terror). एक नाही, दोन युद्धे अमेरिकेने केली. त्यांपैकी एका युद्धाचा ११ सप्टेंबरच्या हल्ल्याशी काहीही संबंध नव्हता. या प्रत्युत्तर-हल्ल्यामुळे जवळपास १० लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये खुद्द अमेरिकेचे ४००० जवान इराक युद्धामध्ये मारले गेले आहेत, तर १००० जवान अफगाणिस्तान युद्धामध्ये मारले गेले आहेत. या युद्धामध्ये इराकमधील हजारो निरपराध लोकांचे प्राण गेले आहेत. अफगाणिस्तानात अजूनही दर महिन्याला अगणित लोक मरत आहेत. त्यामुळे जगातील हा सर्वांत गरीब देश आणखीनच खाईत लोटला जात आहे. या भागातील लाखो लोकांचे स्थलांतर झाले आहे तर तेवढेच लोक पुरेसे अन्न व निवारा ह्यांपासून वंचित आहेत.
दीड लाख अब्ज रुपयांचे युद्ध
नोबेल पारितोषिक विजेते जोसेफ स्टिग्लिझ यांनी इराक युद्धाच्या किमतीचा जो अंदाज काढला आहे त्यानुसार हे युद्ध अमेरिकेला दीड लाख अब्ज रुपयाला (भारतीय जीडीपी च्या तीन पट) पडले आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक ठार होताहेत, तेवढ्याच प्रमाणात अमेरिकन कंपन्यांना या युद्धाचा फायदा होतो आहे. परंतु अमेरिकन सामान्य नागरिकांना याचा काहीही फायदा होत नाही. अमेरिकन अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना ह्या युद्धाच्या किंमतीची त्यात भर पडून अमेरिकन अर्थव्यवस्था आणखी डबघाईला आली आहे. ‘इराकमध्ये मोठ्या प्रमाणात नाश घडवण्याइतपत रासायनिक अस्त्रांचा साठा करण्यात आलेला आहे’, या गुप्तहेर संघटनेने पुरविलेल्या बातमीवर विसंबून राहून इराकवर युद्ध लादले गेले. बगदादचा आणि ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचाही संबंध आहे असे सांगितले गेले. परंतु हे दोन्ही दावे चुकीचे आहेत हे सिद्ध झाले. याच वेळेस अमेरिकन प्रसारमाध्यमांनी अशी आवई उठवली की खरोखरीच इराकमध्ये मोठ्या प्रमाणात नाश घडवणारा रासायनिक अस्त्रांचा साठा आहे. यामुळे युद्ध करायला अमेरिकन सरकारला बळकटीच मिळाली. जखमी झालेल्या व आजारी पडलेल्या हजारो अमेरिकन जवानांचा समावेश, जोसेफ स्टिग्लिझ यांनी काढलेल्या या युद्धाच्या किंमतीमध्ये केलेला आहे. एक लाख अमेरिकन जवान जेव्हा युद्धाहून परत येतील तेव्हा त्यांतील बहुतांश जवान मानसिक आजारांनी ग्रस्त असतील तर कित्येक दीर्घ शारीरिक आजारांनी ग्रस्त असतील. याशिवाय युद्ध करायचे म्हणजे देशांतर्गत खर्चाला आळा घालावा लागतो. कॅलिफोर्निया या अमेरिकेतील सर्वांत मोठ्या राज्याने आपल्या प्रचंड खर्चाला कात्री लावली आहे. या राज्याने ११ अब्ज डॉलरचे (अंदाजे ५५ अब्ज रुपये) तुटीचे अंदाजपत्रक मांडले आहे. ही रक्कम म्हणजे अफगाणिस्तान व इराकमधील एका महिन्याच्या युद्धाच्या खर्चाइतकी आहे.
२००६ च्या शेवटापर्यंत म्हणजे दहशतवादाच्या प्रत्युत्तरास सुरुवात झाल्यानंतरच्या साडेतीन वर्षांच्या काळात साडेसहा लाख इराकी लोकांना प्राण गमवावा लागला आहे. युद्धाच्या अगोदर म्हणजे मार्च २००३ पूर्वी मृत्यूची सर्व कारणे – हिंसा व हिंसे-व्यतिरिक्त – जरी धरली तरी हा आकडा वर्षाला १,४३,००० मृत्यू एवढा जातो. म्हणजेच इराकचा सर्वसाधारण मृत्युदर युद्धापूर्वी जो हजारी ५.५ होता तो युद्धानंतर (२००६ सालापर्यंत) हजारी १३.३ म्हणजेच दुपटीहून अधिक झालेला आहे. ११ सप्टेंबरच्या दहशतवादास अमेरिकेने जे ‘प्रत्युत्तर’ दिले त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. युद्धापूर्वी इराक हा अरब देश म्हणून गणला जात असे व त्यांचे प्रशासन धर्मांधवादी इस्लामविरुद्ध कठोरपणे वागत होते. आज त्यांच्यावर कोणतेच नियंत्रण नसल्याने धर्मांधता पसरविण्यासाठी इराक हे नवीन भरतीचे केंद्र बनले आहे व यास अमेरिकेच्या कट्टर हिंसात्मक धोरणामुळे आणखीच खतपाणी मिळत आहे. त्यामुळे अमेरिकेने दहशतवादास दिलेल्या प्रत्युत्तरातून बरेच शिकण्यासारखे आहे
१. ११ सप्टेंबरच्या दहशतवादास दिलेल्या प्रत्युत्तरामुळे अमेरिकन कंपन्यांच्या फायद्यासोबत सर्वांत जास्त फायदा अल-कायदा या संघटनेस झाला आहे. ‘दहशतवादाविरुद्ध युद्ध’ (war on terror) या अमेरिकेच्या कृतीमुळे जगभर दहशतवादात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, जी पूर्वी कधीही एवढी नव्हती. २. अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध मुकाबला करण्यासाठी बरोबर घेतल्याने आज प्रत्येक आठवड्याला पाकिस्तानातील कुठल्या ना कुठल्या भागात अमेरिका बॉम्ब टाकत असते. यामुळे सामान्य नागरिकांचे मृत्यू हा नेहमीचा प्रकार झाला आहे. त्यामुळे धर्मांधवादी शक्तींकडे लोकांचा कल आणखी वाढून अशा शक्ती दहशतवादाची कास धरू लागल्या आहेत. अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील लष्करी शौर्याला पाकिस्तानने जो श्रद्धापूर्वक पाठिंबा दिला त्याचे हे ‘बक्षीस’ पाकिस्तानला मिळत आहे. अमेरिकेबरोबरच्या सैनिकी डावपेचात्मक गटबंधनामुळे अनेक पाकिस्तानी नागरिकांना यातनामय दुःख भोगावे लागत आहे आणि तोच मार्ग भारतानेही वापरावा अशी इच्छा धरून भारतातील श्रीमंत-उच्चभ्रू वर्ग व सत्ताधारी वर्ग अमेरिकेशी संधान ठेवण्यात धन्यता मानत आहे. अमेरिकन गटबंधनामुळे पाकिस्तानचा पाया ठिसूळ होत आहे व ही भारतासाठी वाईट बातमी आहे. अधिक धर्मांध शक्तींची वाढ होणे म्हणजे अधिक दहशतवादाची वाढ होणे असे समीकरण आहे आणि हे दोन्ही देशांकडून होत आहे.
प्रसारमाध्यमांनी अमेरिकेच्या या युद्धखोर प्रत्युत्तरवादी कृतीतून शिकण्यासारखे बरेच आहे. अमेरिकेतील काही बड्या वृत्तपत्रांनाही यामुळे बदनाम व्हावे लागले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या क्षीण आवाजात का होईना जरी युद्धविरोधी प्रसार केलेला असला तरी हे वृत्तपत्र रासायनिक शस्त्र-साठ्याची खरी नसलेली गोष्ट सोडायला तयार नाही. जी प्रसारमाध्यमे जॉर्ज बुशला युद्ध लादायला प्रवृत्त करीत होती तीच आता युद्ध कसे भयानक आहे, लोकांमध्ये त्याबद्दल कशी तीव्र नापसंती आहे, बुश कसा मूर्ख आहे, याचे पाढे मोजत आहेत. परंतु युद्धाने जे नुकसान व्हायचे ते घडून गेले आहे. त्याची भरपाई आता कशानेही होणे शक्य नाही. खुद्द अमेरिकेमध्येही या प्रत्युत्तराचा भाग म्हणून पसरवल्या गेलेल्या उन्मादामुळे नुकसान झालेले आहे. ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेतील शीखांना अमेरिकन लोकांच्या द्वेषाचा फटकारा बसलेला आहे. फेटा आणि दाढी असलेल्या शिखांना सूडाचे लक्ष्य बनवले गेले होते. तीनशेहून अधिक गुन्हे शीखांविरुद्ध अमेरिकेत नोंदवण्यात आले आहेत.
ग्वांटानामो येथील क्रूर-रानटी छळ-छावणीतून निरपराध कैद्यांचा पाशवी छळ केल्याच्या घटना प्रकाशित झाल्यानंतर अमेरिकेवर जगभरातून टीकेचा भडिमार करण्यात आलेला होता. आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांमध्ये सर्वांत जास्त तिरस्करणीय अध्यक्ष म्हणून जॉर्ज बुशची गणना खुद्द अमेरिकेत होत आहे. कधी नव्हे इतकी नागरी स्वातंत्र्याची गळचेपी ११ सप्टेंबरच्या ‘प्रत्युत्तरादाखल अमेरिकेत आज होत आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांच्या भीतियुक्त संतापालाही प्रत्युत्तर देण्याची तीव्र व शीघ्र गरज आहे. परंतु हे प्रत्युत्तर संघटनांचे जाळे सुधारून सुरक्षा यंत्रणांची पुनर्रचना करून व धार्मिक तेढ न वाढवता मुंबईतील समाज एकत्र कसा राहील याबद्दलच्या उपाययोजना करून द्यायला हवे. ‘प्रत्युत्तर’ देण्याच्या नादात निरपराध लोक मारले जाणार नाहीत किंवा त्यांना ‘धमकावले’ जाणार नाही हे पाहणे गरजेचे आहे. १९९२-९३ च्या धार्मिक दंगलीसारखा प्रकार होणार नाही हेही पाहिले पाहिजे. या दंगलीमुळे जवळपास २५ लाख लोकांनी स्थलांतर केले आहे. नागरी स्वातंत्र्याच्या व लोकशाहीच्या हक्कांना धक्का लागणार नाही हेही पाहिले पाहिजे. स्वदेशाबद्दलचा आंधळा अभिमान व इतर देशांविषयीचा तिरस्कार यांचा त्याग करावयास हवा; भारतीय संविधानाचा नव्हे. मुंबईच्या घटनेबद्दल अमेरिकेच्या दहशतवादाच्या प्रत्युत्तराचे अनुकरण करणे म्हणजे दुःखदायक भयानक इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासारखे होईल.
[हिंदू च्या सौजन्याने-अनुवादः टी. बी.खिलारे]