पत्रचर्चा

अर्थ असा नाही की या मंडळींचे विचार प्रत्येकाने मान्य केले पाहिजे. परंतु विचारांवर बंदी नको. धर्मनिष्ठांना धार्मिक जशा भावना असतात तशाच तीव्र भावना धर्मावर विश्वास न ठेवणारांच्याही असू शकतात याची जाणीव प्रत्येक प्रगतिशील शासनाने ठेवली पाहिजे.
धर्मावर टीका केली म्हणून मारा; आम्ही अमुक अमुक बक्षीस देऊ अशा प्रकारचे काही फतवे भारतातही निघाले होते. भारतात असे फतवे काढणाऱ्यांत जसे इस्लाम धर्मातील लोक आहेत तसेच हिंदू कट्टरपंथीयही आहेत. आणि असे फतवे काढणाऱ्यांवर काही विशेष कार्यवाही झाल्याचे माझ्या तरी माहितीत नाही. जर असे फतवे काढणारांवर कार्यवाही करायची नसेल तर भारतातील न्यायालये बंद करावी व न्यायव्यवस्था मुल्ला-पंडित यांच्यावरच सोपवावी हेच बरे.
वास्तवात धर्मसंस्थापकांनीसुद्धा तत्कालीन धर्मव्यवस्थेवर टीका केली होती. तत्कालीन धर्मातील उणिवा त्यांनी जनतेला सांगितल्या होत्या आणि नवीन धर्माची संस्थापना केली होती. मग जे स्वातंत्र्य राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, येशू, महम्मद आदि धर्मसंस्थापकांनी घेतले तेच स्वातंत्र्य त्या धर्माचे अनुयायी आज इतरांना कसे नाकारू शकतात?या सर्व महापुरुषांना त्यावेळी जे ज्ञान उपलब्ध होते त्यापेक्षा आजच्या पिढीला अधिक ज्ञान उपलब्ध आहे. कृष्णाला गीता उपलब्ध नव्हती, येशूला बायबल उपलब्ध नव्हते, महम्मदाला कुराण उपलब्ध नव्हते. आज आम्हाला हे ग्रंथ उपलब्ध आहेत. शॉच्या शब्दांत सांगायचे तर आही आमच्या पूर्वसुरींच्या खांद्यावर उभे आहोत म्हणून आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक दूरवर पाहू शकतो. त्यामुळे आज आपली पिढी विचक्षणपणे धर्मांकडे पाहत असेल तर त्याला विरोध करण्यात येऊ नये. त्यातील जे चांगले असेल ते टिकेल, जे टाकण्यासारखे असेल ते नष्ट होईल. केवळ मतांच्या राजकारणासाठी पुरोगामी म्हणविणाऱ्या पक्षांनी तरी धर्मावर टीका करणारांची मुस्कटदाबी करणारांना प्रश्रय देऊ नये.