डोकं कसं चालतं? (मेंदू आणि मन याबद्दल)
प्रकाशक आकार फाऊंडेशन, सांगली. प्रथमावृत्ती मे २००७. पृष्ठे १०४. किं.१०० रु.) डॉ. उल्हास लुकतुके
लेखक डॉ. प्रदीप पाटील स्वतः वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी एम.ए. (क्लिनिकल सायकॉलॉजी) ही पदवी घेतली आहे. मानसिक आरोग्याची सामाजिक जाण वाढावी यासाठी काम करणाऱ्या आकार फाऊंडेशनचे ते संस्थापक आहेत. वैद्यकीय सेवा, शिक्षकी कार्य, सामाजिक उद्बोधन, लेखन, व्याख्याने यामध्ये ते कार्यमग्न असतात. त्यांचा मुक्काम सांगली येथे असतो.
माणसे जशी वागतात तशी का वागतात हे एक कोडे आहे. शायर अकबर इलाहाबादी म्हणतात ख्याल दौडा निगाह उठी क़लम ने लिखा ज़बान बोली मगर वही दिल की उलझनें किसी ने इसकी गिरह न खोली । विचार धावला, नजर उठली (नजरानजर झाली), लेखणीने लिहिले, जीभ बोलली, पण मनाची (हृदयाची) तीच कोडी, त्यांची गाठ कोणी सोडवली नाही.] माणसे अशी का वागतात याचा शोध घेणे हा मानसशास्त्राचा मुख्य हेतू आहे. आणि मेंदू काम कसे करतो हा चेताशास्त्राचा (न्यूरोसायन्स) अभ्यासविषय आहे. माणूस अमुक प्रकारे वागतो या प्रश्नाचे उत्तर श्रद्धा, अंधश्रद्धा, धर्म, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक प्रकारांनी शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आधुनिक विज्ञान असे मानते की मनाला वेगळे अस्तित्व नाही, मनाचे स्थान मेंदूमध्ये आहे. मेंदू काम कसे करतो हे जितपत समजेल तितपत ‘माणूस असे का वागतो?’ हेही समजेल. मेंदूचे काम कळले तर माणसाचे वागणे कळेल. म्हणून मेंदू काम कसे करतो हे समजावून घेतले पाहिजे. डॉ. प्रदीप पाटील यांचे ‘डोकं कसं चालतं?’ हे पुस्तक हे या दिशेने टाकलेले भरीव पाऊल आहे. सामान्य माणसाला मन आणि मेंदू याबद्दल कुतूहल असते. त्याबद्दल अद्ययावत माहिती वैज्ञानिक दृष्टिकोनातून देणे आणि निरनिराळे गैरसमज सत्यनिष्ठ पण हलक्या हाताने दूर करणे असे दुहेरी महत्त्वाचे काम लेखकाने कौशल्याने केले आहे.
सुरुवात मन म्हणजे काय या प्रश्नापासून केली आहे. ती माहिती देताना मेंदूबद्दल प्राथमिक माहितीही दिली आहे. पुढे मनाचा शोध भारतात कसा घेतला होता हे उल्लेखून पाश्चात्त्य मानसशास्त्राचा इतिहास थोडक्यात मांडला आहे. मेंदूची उत्क्रांती कशी झाली आणि मेंदूबद्दलचे शास्त्रीय ज्ञान कसे टप्प्याटप्प्याने वाढले हे वर्णिले आहे. मग मेंदूची रचना आणि कार्य हे समजावून सांगण्यासाठी एक पूर्ण प्रकरण दिले आहे. त्यामध्ये बुद्धी, आठवण, बोधन, वर्तनाचा मेंदूशी असलेला संबंध, झोप, स्त्री-पुरुष मेंदूमधील फरक केला अशी सर्व माहिती सांगून प्रेम, शृंगार, लैंगिकता इत्यादींबाबत उद्बोधन केले आहे.
स्वभाव कसा घडतो? त्याचे घटक ? स्वभाव बदलता येतो का? हे प्रश्न आणि स्वभाव व आहार हे मुद्दे मांडले आहेत. स्वभावदोष कसे ओळखावेत याबाबत काही मार्गदर्शन केले आहे. त्यावरून गाडी पुढे मानसिक रोगांवर येते. चिंता, भीती, औदासीन्य, छिन्नमनस्कता, व्यसनाधीनता यांची माहिती देऊन त्यावर केले जाणारे उपचार सांगितले आहेत. वेड म्हणजे काय आणि विजेच्या शॉकचे इलाज यांची माहिती सांगितली आहे.
शेवटचे प्रकरण धर्म, देव, दैव, श्रद्धा, अंधश्रद्धा, गुरु, बाबा-महाराज, भूत लागणे, अंगात येणे हे सांगत सांगत ध्यानधारणा, संमोहन या मुद्द्यांवर येते. आत्मा, साक्षात्कार, अनुभूती यांची माहिती देता देता, जाहिरात केले जाणारे निरनिराळे मानसिक कोर्सेस करावेत की नाही याचा उल्लेख केला आहे. असे अनेक मुद्दे.
जा गोजागी विशेष चौकटी घातल्या आहेत. उदा. मेंदूची उत्क्रांती, चेतनावाहक रसायने, मानसिक स्थितीचे मोजमाप. या चौकटी उपयुक्त आहेत. शेवटी संदर्भसूची आणि मराठी-इंग्रजी शब्दसूची आहे. सहा प्रकरणांमध्ये मिळून सुमारे पाऊणशे ‘वारंवार विचारले जाणारे प्रश्न, फ्रिक्वंटली आस्क्ड क्वेस्चन्स, एफ.ए.क्यू.’ यांची उत्तरे सोप्या भाषेत दिली आहेत. चित्रे, फोटो, आकृत्या, आलेख यांचा भरपूर व छानदार वापर केला आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचण्याबरोबरच बघण्याचेही आहे. वाचून व बघून शिकण्याचे आहे. छपाई, सजावट व निर्मिती दर्जेदार आहे.
काही सूचना कराव्याशा वाटतात. मराठी-इंग्रजी शब्दसूचीबरोबर त्याच किंवा तसल्या शब्दांची इंग्रजी-मराठी शब्दसूची द्यावी. विषयसूची (इंडेक्स) द्यावी. संदर्भसूची दिली आहे त्यातील पुस्तकांबद्दल प्रत्येकी एकदोन वाक्यांत माहिती द्यावी. इतर वाचनीय पुस्तके आणि उपयोगी पडणाऱ्या संस्थांच्या नावे व पत्त्यांची यादी द्यावी. आकार फाऊंडेशनबद्दल माहिती द्यावी. आणि खुद्द लेखकाबद्दलची माहिती दिली आहे त्यापेक्षा जास्त द्यावी.
सारांश, अगदी स्वागत करावे आणि वाचकांनी स्वत: विकत घेऊन वाचावे असे हे पुस्तक आहे. पुढची आवृत्ती लवकर निघो ही शुभेच्छा. (टीप: दुसरी आवृत्ती सप्टेंबरात प्रकाशित झाली आहे.) ३५३/२, नारायणपेठ, लक्ष्मी रोड, विजय टॉकीजजवळ, पुणे ३०. फोन २४४५७७९८.
पुस्तक-परिचय
तीन आत्मकथा:
लेखिका : राससुंदरी दासी, विनोदिनी दासी, बीना दास, अनुवादः वीणा आलासे दमयन्ती पांढरीपांडे
तीन आत्मकथा हे तीन वंगकन्यांच्या आत्मकथनांचे संकलन असलेले, मराठी भाषेत अनुवादित झालेले एक महत्त्वाचे व उत्कृष्ट पुस्तक आहे. प्रा. वीणा आलासे यांनी या ‘कथा’ची निवड करून त्यांचा मराठीत अनुवाद केला आहे. प्रा. वीणा आलासे या साक्षेपी, संवेदनशील आणि चिकित्सक अभ्यासक आहेत. बंगालमध्ये अनेक वर्षे राहिल्यामुळे, बंगसंस्कृतीशी त्याचे नाते जुळले आहे, त्या मूळच्या मराठी असल्यामुळे त्यांचे मराठी अनुवाद अतिशय सरस असतात.
याशिवाय या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की यात तीन स्त्रियांची स्व-कथने आहेत. एक आहे राससुंदरी. इ. स. १८०९ साली या स्त्रीचा बंगालच्या एका लहान गावात जन्म झाला. रामदिया हे त्या गावाचे नाव. वयाच्या बाराव्या वर्षी तिचे लग्न होऊन ती पोताजिया या दुसऱ्या आडभागातल्या खेड्यात आली. दीर्घायुष्य लाभलेल्या या स्त्रीचे आत्मचरित्र १८७५ साली प्रकाशित झाले. गृहिणी म्हणून आयुष्य घालवलेल्या या स्त्रीच्या आत्म्याचा संघर्ष होता साक्षर होण्याचा. दुसरी आहे विनोदिनी नावाची नटी. इ.स. १८८३ साली तिचा जन्म झाला. आणि तिचे आत्मचरित्र १९१२ साली प्रकाशित झाले. ऐन तारुण्यातच तिला समाजातील पुरुषांच्या वासनामय मनोवृत्तीचा सार्वत्रिक सामना करावा लागला. स्वतःचे सौंदर्य, नटी म्हणून जगण्याची ऊर्मी आणि मुख्य म्हणजे स्वतःचे बाईपण यामुळे जी मानसिक घुसळण तिला भोगावी लागली, त्यांचे दर्शन तिच्या आत्मकथनात आढळते. तिसरी आत्मकथनकार आहे बीना दास. इ.स. १९११ साली हिचा जन्म झाला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन ताठ मानेने तिने बंदिवास स्वीकारलेला! सामाजिक आणि राजकीय वातावरणाचे तिने प्रत्ययकारी आलेखन केले आहे. हे आत्मचरित्र १४ ऑगस्ट १९४७ ला प्रसिद्ध झाले. एकोणिसावे शतक आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध असा जवळजवळ दीडशे वर्षाचा काळ या तीन आत्मचरित्रांनी जिवंत केला आहे. या काळामधील स्त्री-जीवन आणि कौटुंबिक जीवन यापेक्षा आजचे जीवन बरेच बदलले आहे. दोन काळांतील समाजाच्या मानसिकतेत मात्र फार मौलिक बदल झाले असे म्हणवत नाही. राजकारणातील गढूळपणा मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वाढतच गेला असे दिसते. काळाच्या या वाहत्या त्रिवेणी प्रवाहात ही आत्मकथने नुसता मनाचा ठावच घेत नाहीत तर खूप काहीतरी सांगू लागतात.
‘आमार जीवन’ लिहिणारी राससुंदरी दासी ही, आजच्या काळात पुरुषार्थाच्या वाटांवर आगेकूच करणाऱ्या स्त्रियांची कुणीतरी खापर-खापर पणजीच वाटू लागते. म्हटले तर साधे गृहस्थाश्रमी जीवन जगणारी ही मुलगी, भित्री, संकोची आणि रडूबाई. मात्र तिच्या आत जिद्द तेवत असते. त्या जिद्दीमुळे ती साक्षर होते, चैतन्य-प्रभुंची पोथी वाचू शकते. रामायण-महाभारताच्या कथा वाचून दाखवू शकते आणि मुलाला पत्रही लिहू शकते. देवाची कवने लिहिते. अखेरीस तर आत्मचरित्र लिहून स्त्री-जीवनाचा तिला गवसलेला अर्थ ती शब्दांमधून व्यक्त करते. भोवतालच्या परिस्थितीचे जाळे तोडून तिने जो आत्मविकास केला, तो सारा प्रवास वाचून आज मन थक्क होते आणि या आपल्या खापर-खापर पणजीविषयी अभिमानाची भावना निर्माण होते.
जागतिक स्तरावर स्त्री-मुक्तीचा विचार विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाला. पण मुक्तीची आकांक्षा तर स्त्रीच्या मनात कधीचीच तेवती असली पाहिजे. त्याच्या खुणा …. अशा स्त्रियांच्या आत्मकथनांमधून सापडतात. भारतामधील निरनिराळ्या प्रांतांमधील साहित्याचा असा शोध घेता येऊ शकतो. वीणा आलासे यांच्या अभ्यासात त्यांना वंगकन्यांची तीन आत्मकथने गवसली. त्याचे सांस्कृतिक आणि वाययीन मोल लक्षात घेऊन त्यांचा मराठीत अनुवाद करण्याचे काम वीणा आलासे यांनी केले. त्यामुळे वाययाच्या अभ्यासकांना तर फायदा झालाच पण संस्कृतीच्या प्रवाहाचा आणि स्त्री-मुक्तीचा विचार करणाऱ्यांच्या हातीदेखील एक विश्वासार्ह दस्तावेज आला. अनुवादिकेच्या मते या आत्मचरित्रांमधून स्त्रियांना कशापासून मुक्तता हवी होती आणि ती कशासाठी या दोन्ही गोष्टी कणखरपणे नोंदलेल्या आढळतात.
आमार जीवन या राससुंदरीच्या आत्मचरित्रातील ‘राससुंदरी ही एकोणिसाव्या शतकातली स्त्री’ आपल्यासमोर प्रगट होते तेव्हा तिचे पहिले वैशिष्ट्य नजरेत भरते ते हे की ती परिस्थितीविषयी तक्रार करत नाही. कुठले गा-हाणे मांडीत नही. पण साक्षर होण्याचा ध्यास घेऊन जगत जाते आणि त्यात यशस्वी होते. ती चार वर्षांची असतानाच तिचे वडील निर्वतले. एकत्र कुटुंबात विधवा आई, दोन भाऊ, काका, आत्या वगैरे मंडळी होती. ती दिसायला सुंदर होती, सर्वांची लाडकी होती, पण घर कर्मठ. आणि स्त्री-शिक्षणाचा विचार तर कुणाच्या मनातही नव्हता. हाती कागद घेतला, लिहिणे वाचणे शिकले तर बाई विधवा होते अशा लोकसमजती! बारा वर्षांची असताना राससंदरीचे लग्न झाले आणि चौदाव्या वर्षीपासून घरातील रामरगाड्याचा भार तिच्यावर पडला. घरची माणसे स्वभावाने खूप प्रेमळ, घर श्रीमंत, नोकर चाकर भरपूर ! आठ अपत्यांपैकी पढे चार अपत्ये वाचली, मोठी झाली असे लौकिकार्थाने कृतार्थ जीवनच होते. पण लिहिण्यावाचण्याचे काय ?… मनीं वसे तें स्वप्नी दिसे असे म्हणतात. राससुंदरीला स्वप्न पडले की ती ‘चैतन्य भागवताची पोथी उघडून वाचते आहे.’ तिला जाग आली. मनाला ‘अनमोल रत्न’ गवसल्याचा आनंद झाला. आणि ती वाचायला शिकली. हा तिच्या ‘आत्मोपलब्धीचाच प्रवास होता.’ अतिशय रसाळ भाषेत, सहज आणि प्रासादिक शैलीत ती हे सगळे वर्णन करते. जीवनातले निवडक प्रसंगही त्यात आहेत. बालपण, बालपणात झालेले लग्न, संसार, मुलेबाळे, या साऱ्या वर्णनात आपल्या मनावर ठसत जाते ते राससुंदरीचे साक्षर होणे, तिच्या नवऱ्याचे फारसे वर्णन नाही. पण ‘नवरा आणि मालक’ एकच असतात हेही आपल्याला सहज कळते. जनरीतीच्या बाहेरचे त्यात काहीच नसते. नवऱ्याचा मृत्यू झाल्यावर केशवपनही होणारच हे ती गृहीत धरते. असे एका गृहिणीचे प्रातिनिधिक चित्रण या आत्मचरित्रात बघायला मिळते. भुतेखेते, तसेच पुढे घडणाऱ्या घटनांविषयी अगोदरच साक्षात्कारासारखी जाणीव होणे अशा प्रकारची दोन तीन वर्णने यात येतात. परमेश्वरावरही तिचा लहानपणापासून विश्वास असतो… या श्रद्धेपोटी तिने काही कवनेही केली. मंगलाचरण आणि ह्या रचना यांनी तिने आपले आत्मचरित्र सजवले. जणू परमेश्वराचा आशीर्वादच ती मधून मधून मागते. या सर्व प्रांजळ वर्णनामुळे हे आत्मचरित्र आजही महत्त्वाचे वाटते. एकोणिसाव्या शतकातली भारतीय स्त्री, आहे त्या परिस्थितीत स्वतःच्या आत्म्याच्या ‘आरोहणा’ ची इच्छा करते त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करते. जीवनाकडे ईश्वरशरण राहून का होईना पण सकारात्मक दृष्टीने बघू शकते. आपल्या संस्कृतीचे हे संचित आपल्या हाती लागते. वाययीनदृष्ट्या विचार केला तर ‘आत्मचरित्र’लेखनाचे वाण आपण पाश्चात्यांकडून घेतले नाही तर ते आपल्या मातीतूनच वर आले हेही जाणवते.
इ.स. १९१२ साली विनोदिनी नावाच्या बंगालमधील सुप्रसिद्ध नटीचे आत्मकथन प्रसिद्ध झाले. एका कलावंताचे जीवन ती जगली. पण ती स्त्री होती, सुंदर होती आणि नटी होती. त्यासाठी, सिनेमासाठी पैसा पुरवणारे धनिक आणि याच विश्वातील अन्य पुरुषांशी तिचा संबंध आला. साहजिकच अशा जीवनात प्रेम, स्थैर्य, कौटुंबिकता यांचा अभाव राहणारच.
विनोदिनीचा जन्म इ.स. १८६३ मध्ये कलकत्त्यात झाला. त्या काळात बंगालमध्ये स्त्री-शिक्षण व समाजसुधारणा यासाठी समाजसुधारकांचे प्रयत्न सुरू होते. सिनेक्षेत्रात स्त्रियांचे पदार्पण हीही तेव्हा नवखी बाब होती. लहानपणापासून विनोदिनी अशा परिस्थितीत वाढली की ‘नटी’ होण्याचा मार्ग तिच्यासाठी आयताच चालत आला. घरी वडील नाहीत, आई आणि आजी अशी फक्त बाईमाणसेच घरात होती. घराच्या एका भागात भाडेकरू म्हणून ‘गंगाबाई’ नावाची गाणारी राहात असे. तिच्याकडे येणाऱ्या मंडळींच्या नजरेला ही कोवळी संवेदनशील, सुंदर मुलगी पडली आणि त्यांनी तिचे कोडकौतुक करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की, वयाच्या अकराव्या वर्षी ती ग्रेट नॅशनल थिएटर नावाच्या नाटक-कंपनीत दाखल झाली. नंतर तिने मागे वळून बघितलेच नाही. ह्यानंतर बंगाल थिएटर व पुन्हा नॅशनल थिएटर असा तिचा प्रवास होतच राहिला. पैसा, यश, प्रसिद्धी हे सर्व तिच्या पायाशी चालत आले. तिच्या मनात दोन आशा फार तीव्र होत्या. पहिली ही की एका पुरुषाबरोबर राहून सुंदर संसार करावा व दुसरी म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात स्वतः अर्थार्जन करून राहावे. देहविक्रय तिला मनातून आवडत नव्हता… परंतु या दोन्ही इच्छा कधीच फलद्रूप झाल्या नाहीत. कलेच्या प्रांतात, शेवटी शेवटी तिला ‘चैतन्य लीला’ या नाटकातील ‘चैतन्याचे’ पात्र साकार करण्याचे भाग्य लाभले. या काळाचे लेखिकेने छान वर्णन केले आहे. तिच्या स्वतःच्या मनाचे मालिन्य व चैतन्यप्रभू या पात्राचे अलौकिकत्व यांतील द्वंद्व फार चांगले रेखाटले आहे. हे नाटक अप्रतिम वठत असे. अनेक मान्यवर मंडळींनी हे नाटक बघितल्याची नोंद आत्मचरित्रात आहे. या मान्यवरांमध्ये ‘अमृत बझार पत्रिके’ चे संपादक, वैष्णव चूडामणी, श्रीयुत शिशिरबाबू यांचा समावेश होता. त्यांनी तिला अनेक उपयुक्त सूचना केल्या. फादर लाफो हेही या मान्यवरांपैकी एक होते. प्रत्यक्ष स्वामी रामकृष्ण परमहंस हेही ते नाटक बघण्यास जात असत. त्यांनी तर तिला ‘माँ, तुला चैतन्यप्राप्ती होवो’ असा आशीर्वाद दिला. स्वामी विवेकानंद यांची गीते थिएटरमध्ये बसून ऐकल्याची आठवणही या लेखनात आली आहे. परंतु… विनोदिनी नटी ही अखेरपर्यंत नटीचेच आयुष्य जगली, या जीवनातून ती बाहेर आली नाही… हे सगळे विनोदिनीने प्रांजळपणे लिहिले आहे. समाजाने नटी म्हणून तिला डोक्यावर घेतले पण ‘माणूस’ म्हणून तिच्याकडे बघितले नाही ही खंतही या लेखनात आहे. स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोणात आज यापेक्षा किती आणि कसा बदल झाला आहे ? असा प्रश्न हे आत्मचरित्र वाचल्यावर मनात घोळत राहतो. याखेरीज, सरळ निवेदन करणारी भाषा आणि तत्कालीन समाजाचे चित्रण करण्याची शक्ती ही देखील वैशिष्ट्ये मनात घर करतात.
गृहिणी आणि नटी यांची चरित्रे वाचल्यावर आपण बीना दास यांच्या आत्मचरित्राच्या निमित्ताने आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास निर्माण करणाऱ्या व स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अथक परिश्रम करणाऱ्या काळात जाऊन पोहचतो.
‘आपल्या मातृभूमीच्या प्रेमाखातर, कुठलाही व्यक्तिगत आकस नसताना आपण गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या’ हे कबूल करून कारावास स्वीकारणारी बीना दास ही आघाडीची स्वातंत्र्यसेनानी होती. तिचे आत्मचरित्र शृंखल झंकार या नावाने १९४७ साली प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्यासाठीचा लढा, सामाजिक वास्तव आणि राजकीय वास्तवाचे प्रत्ययकारी दर्शन यात आहे. बीना दास यांचा जन्म इ.स. १९११ साली झाला. आणि १९२८ साली कलकत्त्यात भरलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुभाषचंद्र बोसांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांच्या पथकात ही अवघ्या सतरा वर्षांची तरुणी सामील झाली होती. त्यानंतरच्या ज्वलंत घडामोडींशी तिचा संबंध येत गेला. तिचे वडील वेणीमाधव दास हे ब्राह्मो समाजी म्हणजे ओघाने पुरोगामी विचारांचे होते. तिची आई समाजसेविका होती. घर सुसंस्कृत आणि वातावरण मोकळे. त्यामुळे बीना दास यांच्या वाट्याला कष्ट, विरोध, आर्थिक चणचण असले काही आले नाही, परंतु घरात मात्र स्वातंत्र्यसंग्रामाची लाट शिरलेली होती. १९२१ सालच्या चळवळीत एक भाऊ सत्याग्रहात भाग घेऊन जेलमध्ये गेला होता. लौकिक अर्थाच्या शिक्षणापेक्षा स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग वातावरणात तेवत होते. त्यात, बीना दास या तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच शिरल्या. आणि संपूर्ण जीवन भारलेपणाने जगल्या.
त्यांच्या आत्मचरित्राच्या शेवटी त्या लिहितात. ‘आपल्या स्वातंत्र्य-संग्रामाचा अखेरचा अध्याय अजूनही बाकी आहे. अजूनही प्रदीर्घ मार्ग चालायचा आहे. प्रवास संपलेला नाही’…. ‘आणि ८ जुलैला पुस्तक लिहायला बसले, आज दहा ऑगस्ट. लेखन पूर्ण होत आले आहे.’
पुस्तक १४ ऑगस्ट १९४७ ला प्रसिद्ध झाले. आत्मचरित्रात येथपर्यंतचा काळ आलेला आहे.
वीणा आलासे यांनी आपल्या प्रस्तावनेत बीना दास यांच्या पुढल्या आयुष्याबद्दल लिहिले आहे. त्यामुळे एका स्वातंत्र्यसेनानी स्त्रीचे पूर्ण आयुष्य आपल्या डोळ्यांसमोर साकार होते. बीना दास अलीकडे म्हणजे १९८७ साली… हृषिकेश येथे मरण पावल्या. त्या पस्तीस वर्षांच्या असताना देशाला स्वातंत्र्य मिळाले. नंतर त्यांनी यतीशचंद्र भौमिक नावाच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाशी लग्न केले. त्यांचे वैवाहिक जीवन तसे सुखी होते पण त्यांना अपत्य झाले नाही. त्यामुळे १९८६ साली प्रा. भौमिकांचा मृत्यू झाल्यावर त्या एकाकी झाल्या. वर्षभरात त्याही गेल्या. मात्र त्यांच्या आयुष्यातील १९२८ ते १९४७ अशी एकोणवीस-वीस वर्षे अतिशय स्फूर्तियुक्त आणि झंझावाती ठरली. या काळाचे आत्मचरित्रातील वर्णन अतिशय रोमांचकारी आहे. कॉलेज, गुप्त बैठका, खल, गटात मैत्रिणींना सामील करून घेण्याचे प्रयत्न, कॉलेज सोडावे लागले याची यत्किंचितही खंत नाही तर त्याचा अभिमान, हे सर्व मुळातूनच वाचले पाहिजे. पारतंत्र्याची चीड, स्वातंत्र्याची आकांक्षा आणि त्यासाठी जिवाची पर्वा न करता वाट्टेल ते करण्याची तयारी, यांतूनच कॉन्व्होकेशन हॉलमध्ये गव्हर्नरला पिस्तुलाच्या गोळ्यांनी मारण्याचे धाडस त्या करू शकल्या. हा प्रयत्न असफल राहिला आणि बिना दासची रवानगी कारागृहात झाली. कलकत्ता, मेदिनीपूर आणि अन्यत्रही त्यांना हलविण्यात आले. सुरुवातीला सात वर्षे आणि नंतरही १९४२ ते १९४५ अशी मिळून दहा वर्षे त्या कैदेत होत्या. तेथील अधिकाऱ्यांची उद्दाम वर्तणूक, सोबतच्या मुलींच्या सहवासात आनंद मानण्याची वृत्ती, तरीही जाणवणारे तुटलेपण या सर्वांचे वर्णनही रोमांचक आहे. कारावासात त्रास होतो म्हणून माफी मागून सुटण्याचा प्रयत्न मात्र कुणी करीत नाही. एवढे धैर्य आणि आत्मिक बळ त्या सर्वांजवळ होते.
बीना दास यांनी सुरुवातीला आणि आयुष्यात फक्त एकदाच हाती पिस्तूल घेतले तरी पुढे त्या काँग्रेसमध्ये सामील झाल्या. म. गांधींच्या प्रभावाखाली आल्यामुळे जेव्हा नोआखलीत दंगली उसळल्या तेव्हा गांधीच्या नेतृत्वाखाली पुनर्वसनाच्या कामात त्या सामील झाल्या. मजुरांचे संप, स्त्रियांचे प्रश्न, स्त्री-शिक्षण, खेड्यापाड्यातील अनेक प्रश्न… या कामांत त्या गुंतून गेल्या. देशाचे स्वातंत्र्य आणि देशांतर्गत प्रश्न हातात हात घालूनच असतात याचे भान त्यांना त्यांच्या ऐन तारुण्याच्या काळातच आले होते. ‘हिंसा की अहिंसा’ हा त्या काळात प्रश्न नव्हता. सुभाषचंद्र बोसांना त्यांनी प्रश्न विचारला होता की, ‘आपला देश स्वतंत्र होईल तो हिंसेच्या मार्गाने की अहिंसेच्या?’ यावर सुभाषचंद्र म्हणाले होते, … एखादी गोष्ट मिळवायची म्हटली की त्यासाठी ते वेड लागावं लागतं. स्वातंत्र मिळण्याचं असं वेड संपूर्ण देशात पसरायला हवं. त्यानंतर हिंसे अहिंसेचा प्रश्न इतका मोठा वाटणार नाही.’
‘सुभाषचंद्र बोस’ हे त्या काळातील तरुणांचे हिरो होते. विशेषतः बंगालमध्ये सुभाषचंद्र आणि रवीन्द्रनाथ यांच्या विचारांचा व व्यक्तित्वाचा प्रभाव होता… बीना दास यांनी एकदाच पिस्तुल हाती घेतले होते…. या आत्मचरित्रात या संबंधातील त्यांचे चिंतन विचार करायला लावणारे आहे. ‘देशाला स्वातंत्र्य मिळाले ते ठिकठिकाणच्या उत्स्फूर्त उठावांमुळे… म. गांधींचे अहिंसक नेतृत्व मिळाल्याने स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग सुकर झाला ही गोष्ट खरी असली तरी गांधींना या देशातील हिंसक असो की सनदशीर असो अगणित प्रयत्नांच्या वाऱ्याचे बळ मिळाले… त्या वाऱ्याला पुढे नेण्याचे काम गांधींनी केले हे नाकारता येत नाही. अशा आशयाचे चिंतन बीना दास यांनी मांडले आहे. त्यातून तो काळ, त्या काळातील विचारशील आणि कृतिशील तरुणांची मानसिकता यांचे फार चांगले चित्र मनावर ठसते.
देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या आधीच हे आत्मचरित्र संपते. एका स्त्रीने लिहिलेले आत्मचरित्र या नात्याने या लेखनाचे मोल मोठेच आहे. स्वकेंद्रित विचारांच्या वर उठून देशांचे स्वातंत्र्य हे जीवनाचे ध्येय मानल्याने याला एक ‘स्वातंत्र्याचे’ व्यापक परिमाण लाभून गेले. त्यामुळे केवळ ‘स्त्री’ आहे म्हणून… या गृहीताला यात थारा राहत नाही. समाज, देश, राजकारण आणि संस्कृती याविषयीचे बीना दास यांचे चिंतन फार बोलके आहे. ‘लोकांचा विकास म्हणजे देशाचा विकास हे समीकरण त्यांनी अनुभवाने जाणले आहे. हिंसा, कम्युनिझम, यातून त्या बाहेर पडतात आणि या मातीच्या प्रश्नांशी त्या भिडतात हेही लक्षात येते. लेखनाची शैलीही व्यक्ती व प्रसंग जिवंत करणारी आहे. त्या काळातील तरुण मनाची स्पंदने यात उमटलेली आहेत, ती प्रातिनिधिक आहेत.
अशी ही तीन वाचनीय आत्मचरित्रे वीणा आलासे यांनी एकत्रित रूपात व एका सूत्रात गोवली हे वीणा आलासे यांचे कसब आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना मौलिक आहे. आजच्या ‘स्त्री’संबंधीच्या विचाराला या मातीचा आधार देणारे या तीन आत्मचरित्रांचे त्यांनी केलेले विवेचन निश्चितच वाचकांच्या विचारांना चालना देते. आणि अनुवाद तर इतका सुरेख झालेला आहे की मूळ मराठीतूनच आत्मचरित्रे लिहिली गेली आहेत असे वाटावे. एक ‘उत्तम पुस्तक’ म्हणून ते मराठी भाषिकांनी वाचावे. विशेषतः स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करणाऱ्यांनी तर ते वाचलेच पाहिजे. (तीन आत्मकथा, लेखिका राससुंदरी, विनोदिनी, बीना दास, अनुवाद वीणा आलासे, प्रकाशक पद्मगंधा प्रकाशन, प्र. आवृत्ती २ फेब्रु.२००७, मूल्य १८० रुपये)
६०, अंबाझरी ले आऊट, नागपूर ४४० ०३३.