कम्युनिस्टांचे दुय्यम-तिय्यम नेते गिरणीच्या गेटावर पिंजारलेल्या केसांनी ‘मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटचे भडवे’ यांना शिव्या देत; पण भांडवलशाहीबद्दल बोलत नसत. धर्म ही अफूची गोळी आहे असे सांगणाऱ्या कम्युनिझमचे हे सेनापती गिरणीत सत्यनारायणाला परवानगी दिली नाही म्हणून एक दिवसाचा संप करीत. कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली कामगारांना बोनस मिळाला; पण बोनस म्हणजे काय आणि त्याच्यासाठी का भांडायचे हे कधी कळले नाही. पगाराच्या वर पैसे मिळाले म्हणून बिचारे खुष झाले. इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत ८.३३ टक्के बोनस झाला तेव्हा हात स्वर्गाला लागल्यासारखे वाटले.
नेतृत्वाच्या सर्वांत वरच्या थराच्याखाली अंतिम उद्दिष्टांबाबत जे अज्ञान होते ते पुढे कामगारांना नडले. पण असे अज्ञान का राहिले ? माझ्या असे लक्षात आले, की ते पहिल्या श्रेणीचे नेते, मग काँग्रेसचे असोत की कम्युनिस्टांचे, पांढरपेशा जातीतले होते आणि या जातींना खालच्या थरात ज्ञान झिरपावे असे कधीच वाटले नाही. किंबहुना असे म्हणता येईल, की ज्ञान किंवा अधिकार वरच्या जातींनी खालच्या जातींना देण्याची परंपराच आपल्या देशात नव्हती आणि अर्वाचीन नेतृत्व कितीही पुरोगामी असले तरी सवय नसल्याने त्यांच्याकडून ते झाले नसावे. पण ही गोष्ट कामगार चळवळीला फार नडली. ज्यांनी चळवळीमागचे तत्त्वज्ञान कामगाराला समजावून सांगायचे तेच या बाबतीत अज्ञानात असल्याने कामगार अज्ञानात राहिला.
मालकाविरुद्ध लढण्याचे अखेरचे उद्दिष्ट काय हे त्याला माहीत नसल्याने, जी संघटना जास्त मिळवून देण्याच्या गोष्टी करते तिच्या आणि तिच्या नेत्याच्या मागून धावायला कामगाराने सुरुवात केली. [पंढरीनाथ सावंत ह्यांच्या मी पंढरी गिरणगावचा (मनोविकास प्रकाशन, २००८) या ग्रंथातून.]