विवाहाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’!

अलीकडे एक चर्चा अचानक उफाळून आली, ती अशी की, विवाह अंतर्गत पतीची शरीरसंबंधाबाबत असणारी पत्नीवरची जबरदस्ती हा ‘बलात्कार’ समजायचा का? मात्र पतीच्या या जबरदस्तीच्या मुद्दय़ावर बोलण्यापूर्वी, पहिल्या प्रथम विवाहाविषयी थोडं प्राथमिक जाणून घ्यायला हवं. स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या साथीने आणि पुढे आधाराने सहजीवन जगता यावे, म्हणून तरुणपणातच त्यासाठी जी निष्ठेची आणि प्रेमाची बैठक घातली जाते, तिला ‘लग्न’ म्हणतात.

तसं म्हटलं तर, मानवाच्या बाबतीत लग्न म्हणजे फक्त शरीरसंबंध असा अर्थ असू नये. कारण तसे संबंध प्राचीन काळापासून विवाहाशिवायच होत होते आणि आजही होऊ शकतात. ते नैतिक की अनैतिक हा खरंतर निव्वळ ‘मानण्याचा’ भाग आहे. कारण विवाहांतर्गत असोत किंवा विवाहपूर्व असोत, खुशीच्या शरीर संबंधांची स्त्री-पुरुषांची कृती ही एकसारखीच असते. त्यामुळे हे संबंध पापमय आणि ते संबंध पुण्यकारक असं वेगळं काही नसतं, हे आपल्याला माहीत आहे.

Photo by Dương Hữu on Unsplash

स्त्री-पुरुष संबंधांतून पुनरुत्पत्ती होणे, हा निसर्गनियम आहे. सजीव जाती या पुनरुत्पतीतूनच जिवंत राहतात आणि त्यातून निसर्ग जिवंत राहतो. त्यानुसार निसर्गाकडून सर्व प्राणीमात्रांचे जीवनचक्र निश्चित केले जाते. त्यामध्ये प्राण्याचा आहार, निवारा, त्यांच्या प्रणयाराधनेच्या पद्धती, प्रजोत्पादन, अपत्य संगोपनाच्या पद्धती, बाल्यावस्थेचा काळ, मातृ-अवस्थेचा काळ, हे सर्व काही निसर्गाकडून जैविक (biological) यंत्रणेद्वारा नियंत्रित केलेले असते. त्यामध्ये प्राणीमात्रांना स्वतच्या इच्छेने काही बदल करता येत नाहीत. तसे केल्यास त्या प्रजातीचा विनाश ओढवतो. उदा. कावळ्याने पाण्यात अंडी घालण्याचा प्रयत्न करणे, किंवा सशाने झाडावर निवारा शोधणे, यामध्ये त्यांचा विनाश आहे. माणसाबाबतही हेच निसर्ग नियम आहेत. निसर्गाचे ते नैतिक नियम म्हणावे लागतात, आणि त्याचा भंग मानवजातीने केल्यास हा विनाशाचा नियम मानवजातीलाही आहे.

निसर्गाने विशेषतः सस्तन प्राण्यात माता-मादीकडे प्राणीवंशाचे संवर्धन, संरक्षण करण्याचे आपले महत्त्वाचे कार्य सोपवलेले आहे. नरामध्ये हा विचार नाही. सस्तन नर-मादीमध्ये शरीर संबंध त्याकरिताच निसर्गाने मुक्त ठेवलेले असतात. म्हणजे प्रजोत्पादनातील भूमिका दोघांनाही सहजतेने पर पाडता येतात. ना कुणाला कामभावना मारून ठेवून जगावे लागत ना कुणावर संबंधाची जबरदस्ती होत! माता-मादी जेव्हा मातृत्व काळात असते, तेव्हा तिला अपत्यांचे संगोपन करण्यास स्वस्थता मिळावी, वेळ मिळावा, म्हणून त्या काळात पुरेसा हिंस्रपणा तिच्यामध्ये आलेला असतो. ज्यायोगे ती तिच्या नराला तिच्या कुटुंबापासून दूर ठेवून पिल्लांचे रक्षण व संगोपन करीत असते. पण त्या सस्तन नरामध्ये कामवासनेचे हार्मोन (testosterone) हे माता-मादीपेक्षा जास्त प्रमाणात असते. अर्थात मग नराची अतिरिक्त कामभावना त्याला शमविता येण्यासाठी, मुक्त लैंगिक पद्धतीचा त्याला उपयोग होत असतो. जी मादी प्रसवा नसते, तिच्या समवेत तो कामभावना भागवू शकतो. त्यामुळे नरासाठी इतर मादींपर्यंत पोहोचणे हे निसर्गतत्त्व साध्य होते. यामागे एका माता-मादीची पिल्ले काही कारणाने दगावली तर दुसरीकडे पुनरुत्पत्ती होत राहावी आणि त्याकरिता नर हा जास्त कामभावनेचा असण्याची ही निसर्गाची किमया असावी, असं वाटतं.

स्त्री-पुरुष हे सस्तन प्राण्यातून उत्क्रांत झालेले आहेत. शिवाय इतर पशूंमध्ये असणारा समागमासाठीचा ‘हिट पीरियड’ उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर माणसामधून नष्ट झालेला दिसतो. माणूस हा बुद्धीवर चालणारा प्राणी आहे. ही बुद्धी विचाराने वापरल्यासच माणसाची प्रगती आहे, आणि अविचारात माणसाचा विनाश आहे. पण दुर्दैवाने माणूस तसा विचाराने वागलेला नाही किंवा वागत नाही, हे वास्तव आहे. त्याने अनेक निसर्गनियमही धुडकावलेले आहेत. विशेषतः विवाहप्रथा आणून माणसाने स्त्री-पुरुष मुक्त संबंधाचा निसर्गनियम पहिल्याप्रथम धोक्यात आणला. सस्तन पशू मातेप्रमाणे अपत्य संगोपनाचे, संरक्षणाचे काम पुरुषापेक्षा स्त्रीवर जास्त निर्भर असते. त्या मातृत्वाच्या महत्त्वाच्या काळात progesterone, prolactin, oxytocin ही हार्मोन्स स्त्रीमधील अपत्याविषयीची मानसिक-भावनिक गुंतवणूक वाढवतात. मुळात कामभावनेचे हार्मोन कमी असणाऱ्या स्त्रीमध्ये कामवासना त्यामुळे मंदावते. नवजात पिढीसाठी निसर्गाच्या अशा वेगवेगळ्या प्राणीजातीत भिन्न तरतुदी आपल्याला दिसतात. स्त्री ही सस्तन पशू मातेसारखी हिंस्र होऊन पुरुषाला दूर ठेवत नाही. पण तिच्यातील कामभावना मंद करून, तिला अपत्य संगोपनाला वेळ देता यावा अशी सोय निसर्ग करतो. पण पुरुषामधील कामभावनेचे हार्मोन सस्तन नराप्रमाणे, स्त्रीपेक्षा सुमारे वीस पटीने जास्त असते आणि अपत्य त्याचं स्वतःचं म्हणून त्याला समजत असलं तरी पुरुषामध्ये स्त्री इतके हार्मोनल फरक होत नाहीत. त्यामुळे त्याची कामभावना तशीच तीव्र राहते, आणि सस्तन प्राण्याच्या नैसर्गिक नियमानुसार पुरुषसुद्धा पत्नीकडून भागवल्या न जाणाऱ्या कामभावनेसाठी अन्य पर्यायाच्या शोधात राहतो. मात्र अन्य कुणा स्त्रीशी विवाहबाह्य़ संबंध हा व्यभिचार, फसवणूक म्हणून समाजाने ते पाप ठरविले आहे. ते विवाह करणाऱ्यांसाठी योग्यच आहे. परंतु त्यामुळे पुरुषाचा प्रश्न सुटत नाही आणि मग विवाहित पुरुषाला त्याची अतिरिक्त कामभावना शमविण्यासाठी पत्नीवर बळजबरी केल्याशिवाय अन्य मार्ग राहत नाही. या परिस्थितीवर समाज जर कोणताही पर्याय देऊ शकत नसेल, तर मग विवाहांतर्गत स्त्रीवर होणाऱ्या जबरदस्तीला ‘बलात्कार’ म्हणायचा का? अशा रीतीने विवाह हे मानवी समाजात जणू कशाही पद्धतीच्या आणि जबरदस्तीच्या शरीरसंबंधाचे एक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ झालेलं आहे. जे पुरुष पत्नीवर जबरदस्ती करीत नाहीत, आणि ज्यांचे अन्य कुठेही संबंध नाहीत, ते पुरुष ‘नॉर्मल’ किंवा ‘सभ्य’ अशा विविध व्याख्या आपण करून ठेवलेल्या आहेत.

तरीही स्वतःच्या कामभावनेवर नियंत्रण ठेवू शकणारे अपवादात्मक पुरुष सोडले तर अन्य सभ्य वाटणारे पुरुष घराबाहेर पडल्यावर स्वतःला किती आवरू शकतात, हा मोठा संशोधनाचा विषय ठरावा. गर्दीत पुरुषांकडून होणाऱ्या विनयभंगाला बहुसंख्य स्त्रियांना सामोरे जावे लागते. वास्तविक कामप्रवृत्ती ही एक सहज, स्वाभाविक, नैसर्गिक प्रेरणा आहे आणि या ऊर्मीचे नियंत्रण प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या मेंदूकडून होत असते. अत्यंत गुंतागुंतीची असणारी ही कामयंत्रणा बदलून टाकण्यात माणसाला अजून यश आलेले नाही, आणि त्यात भर म्हणून या नैसर्गिक यंत्रणेत अडथळा करणारी विवाहप्रथा माणसाने आणून उभी केलेली आहे. बरं, एवढय़ावरच हे थांबलेलं नाही. तर विवाहामुळे पुरुषाच्या मुक्त कामेच्छेच्या होणाऱ्या कोंडीचा गैरफायदा घेणारी एक पुरुषप्रवृत्ती पुढे सरसावलेली दिसते. मग जे प्रत्यक्षात मिळविण्यात पुरुषाला त्याच्या जीवनात अपयश आहे, त्याला वाट करून देण्यासाठी सेक्स सीन्स, बेडसीन्स, बलात्कार वगैरे प्रसंगांचा चित्रपटांतून वाढत्या प्रमाणात उपयोग केला जातो, जे पाहण्यास पुरुषवर्ग गर्दी करतो. पोर्नफिल्म तयार करण्याचे व पाहण्याचे पुरुषांमधील प्रमाण वाढत चाललेले आहे. आणि आता तर हातात आलेल्या स्मार्टफोनमधल्या इंटरनेटमुळे असे चित्रपट सीन्स बघणं, एकमेकांना क्लिपिंग्सची देवाणघेवाण करणं याचंही प्रमाण वाढलं आहे.

विवाहचौकटीतील संबंध तेव्हढे नैतिक या संस्कारामुळे विवाहपूर्वसुद्धा काही करता येऊ शकत नाही आणि दुसरीकडे, ही सार्वजनिक कामुक दृश्ये पुरुषांना चिथावत राहतात. त्यातून मानसिक अस्वस्थ झालेले पुरुष (अपवाद वगळता) अन्य स्त्रीच्या मोहात पडतात. पण बरोबरीच्या सन्मान्य स्त्रियांनादेखील समाजाने विवाहाच्या बंधनामध्ये ठेवलेलं असतं. म्हणून मग संधी मिळेल त्याप्रमाणे व तिथे, एकट्या सापडलेल्या स्त्रीवर बलात्कार करू पाहणे, किंवा वेश्येकडे जाणे, संबंधांची दृश्ये पाहणे, किंवा समिलगी संबंधातून लैंगिक समाधानाचा हेतू साध्य करू पाहणे, असे प्रयत्न पुरुषांकडून असहाय्यपणे होत राहतात. मग यापकी नैतिक कशाला म्हणायचं? किंबहुना हे सर्व समाजाच्या भीतीने चोरून चालल्यामुळे, गुन्हेगारी निर्माण होते. त्याबाबत खऱ्या कारणांना सामोरं न जाता आपल्या समाजात ‘स्त्रियांना जबाबदार धरणे’ हा तर काहीही न करता, कारणे देण्याचा सोपा मार्ग आहे. अशा दिशाभूलीतून गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत राहाते आणि गुन्ह्य़ांच्या वारंवारतेमुळे त्यात वैविध्य आणण्याची एक विकृती समाजात उद्भवते. म्हणजे एकाच वेळेला परिस्थितीचा राग, सूड, वैफल्य शमवता येऊन दुसऱ्याच्या वेदनेतून, अपमानातून आनंद किंवा समाधान मिळविण्याचा प्रयत्न, अशी ती भयानक विकृती असते. उदा. प्रेमभंगातून प्रेयसीला विद्रूप करणे, लहान मुला-मुलींशी शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न करणे, स्त्रियांच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरे लावून ब्लॅकमेलिंगचा आनंद घेणे, छेडछाडीला विरोध करणाऱ्यांची हत्या करणे, अनाथ, अपंग वा मतिमंद स्त्रीच्या स्थितीचा फायदा उठवून तिच्याशी संबंध करू पाहणे अशा प्रकारे काही पुरुषांकडून होणारे क्रौर्य आणि विकृती हे त्यांचे मनस्वास्थ्य बिघडल्याचे स्पष्ट पुरावे आहेत.

यापैकी काहीही न करणाऱ्या सरळमार्गी पुरुषांची मन:स्थिती सतत तणावाखाली असू शकते. कामभावनेची पूर्तता, अर्धवट पूर्ण होण्यामुळे प्रक्षुब्धता आणि बेचैनीतून त्यांचे चिडचिड करण्याचे प्रमाण वाढू शकते. एकप्रकारची अस्वस्थता त्यांना ग्रासून राहते, जी कशामुळे आहे हे त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना उमगत नाही. थोडक्यात, विवाहप्रथेने निसर्गाच्या स्वयंस्फूर्त कामभावनेला जे आव्हान दिलेलं आहे, त्यामुळे एकतर स्त्रीवर विवाहांतर्गत पतीकडून ‘बलात्कार’ होत राहतील, नाहीतर पुरुषाचे मनस्वास्थ्य बिघडल्याचे परिणाम कुटुंबाला, समाजाला भोगावे लागतील. दोहोंपैकी कोणता दुष्परिणाम आपण पत्करायचा की दोन्ही थोडे थोडे सहन करायचे, हे पूर्णतः आपल्या नाकर्तेपणावर अवलंबून आहे. याबाबत टीव्हीवर वा अन्यत्र होणाऱ्या चच्रेत नेहमीच ‘पुरुषाची मानसिकता बदलली पाहिजे’ असं आवर्जून सांगितलं जातं. ती सूचना जरी रास्त असली तरी, त्याआधी पुरुषाची मानसिकता बिघडविण्याचे प्रयत्न थांबवायला नकोत का? त्याशिवाय ती मानसिकता बदलणार कशी ?

मग यावर उपाय काय? विवाह पद्धतच रद्द करायची का? तर याचे उत्तर ‘नाही’ असं द्यावं लागेल. यापेक्षा समाजाने स्वतःच्या करून घेतलेल्या नैतिकतेच्या कृत्रिम काटेकोर कल्पना थोडय़ा सौम्य आणि सैल करायच्या ठरवलं तरी पुरुषांना मोकळा श्वास घेता येईल आणि त्याबरोबरीने स्त्रियांची, त्यांच्या अवहेलनेतून मुक्तता होण्यास सुरुवात होईल. विवाहाचं वय वाढल्यामुळे आणि वय वर्षे १५ ते ३० या कालखंडात कामभावना तीव्र असल्यामुळे, समजा मुला-मुलींमध्ये विवाहपूर्व शरीरसंबंध जर झालेच तर फार आकांडतांडव न करता त्याकडे बघण्याची दृष्टी ‘सहज’ होईल, असा प्रयत्न समाजाकडून हवा. ज्यावेळेस तरुण मंडळींना आपल्याला विवाहपूर्व हे स्वातंत्र्य मिळू शकते, त्यात काही विशेष साहस किंवा थ्रिल नाही, अशी खात्री वाटू लागेल, तेव्हा त्यातला चोरटेपणा लयास जाईल आणि अशा संबंधांचं प्रमाण आजच्या दडपलेल्या स्थितीत जितकं जास्त आहे, त्यापेक्षा ते आपोआपच कमी होत जाईल. कारण एकतर त्या संबंधांची जबाबदारी मुला-मुलींवर पडेल आणि दुसरे म्हणजे, एखादी गोष्ट करायला मिळणार नाही, या भावनेतून ती चोरून-मारून करून पहावीशी वाटण्याची भावनाच शिल्लक राहणार नाही. तरुणांच्या कामभावनेवर करडी नजर ठेवण्यापेक्षा मुलग्यांनी अधिक जबाबदारीने वागण्यासाठी काय करता येईल, इकडे समाजाने लक्ष दिलं पाहिजे. मुलींच्या शिक्षणावर आणि आर्थिक स्वातंत्र्याबाबत अधिक जागरूक राहिलं पाहिजे. लैंगिक शिक्षणाचा समाजाने सरकारकडे आग्रह धरला पाहिजे. संततीनियमनाचे आणि पालकत्वाचे शिक्षणही दिलं गेलं पाहिजे.

खरंतर, माणसाला त्याच्या स्थैर्यामुळे प्रगती साधता येत असते आणि हे स्थैर्य आपल्याला विवाह करण्यामधून मिळत असते. विशेषतः पुरुषांना मानसिक स्थिरतेसाठी विवाहाइतका चांगला पर्यायच नाही. विवाहाशिवाय मातृत्व मिळण्याचे वरदान स्त्रीला असल्यामुळे, मुलांच्या संगोपनाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तिला मानसिक एकग्रता साधता येऊन, ती आवश्यक ती स्थिरता मिळवू शकते. विवाह पद्धतीने गेल्या ३-४ हजार वर्षांत पुरुषांमध्ये खूप चांगले बदल आणलेले आहेत. पितृभावनेमुळे तो त्याच्या क्रूर मानसिकतेतून प्रेमळ पालकत्वाच्या भूमिकेत बदललेला आहे. तेव्हा विवाह पद्धत ही चूक नसून तिच्या पावित्र्याचे स्तोम करून विवाहपूर्व संबंधांना अडथळा करणे, त्यांना अनैतिक ठरविणे, इथे ती चूक आहे.

याबाबत पाश्चात्त्य प्रगत देशांनी या परिस्थितीला कसं तोंड दिलं ते मुद्दाम अभ्यासायला पाहिजे. भारतासारख्या जाती, धर्म, प्रदेश अशा भिंती तिथे नसल्यामुळे, आणि शैक्षणिक, आर्थिक समता तिथे बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे, तिथे बदल आणणं भारताच्या तुलनेने खूप सोपं आहे. शिवाय शरीरशास्त्र, मानसशास्त्र याचा सांगोपांग अभ्यास तिथे झाल्यामुळे, जुन्या परंपरांना ‘आमची उच्च संस्कृती’ म्हणून डोक्यावर न घेता, तिथल्या समाजाने नव्या संशोधनानुसार पहिल्या प्रथम विवाहपूर्व संबंध मान्य केले. त्यासाठी लैंगिक शिक्षण आणि संतती नियमन शिक्षण चालू केलं. अशा संबंधांतून स्त्रीला मूल झाल्यास ते तिला एकटीला सांभाळता येणे शक्य व्हावे म्हणून स्त्रियांसाठी नवे कायदे व सुविधा तिथल्या सरकारांनी आणल्या. थिओडोर रुझवेल्ट सारखे प्रागतिक विचाराचे अध्यक्ष त्या काळात अमेरिकेला लाभले. ‘मदर्स ओन्ली फॅमिली’ ही कल्पना मध्यवर्ती धरून अमेरिकेमध्ये १९३२ च्या काळात ‘मदर पेन्शन लॉ’ आणताना परित्यक्त मुले-मातांबरोबर अविवाहित मातांनाही त्यांच्या मुलांसमवेत सामील करून घेतलं गेलं. अमेरिकी समाजानेसुद्धा आणि त्यांच्या मुलांवर ‘अनैतिक’ असा शिक्का न मारता त्यांचा स्वीकार केला. साहजिकच स्त्रियांबद्दलच्या योनिशुचीतेच्या कल्पना आणि स्वतःच्या बीजाचे मूल किंवा कुळाला वारस अशा जखडलेल्या कल्पना पुरुषांना सोडून द्याव्या लागल्या. (यालाच पुरुषांमधील मानसिक बदल म्हणावे लागतील.) अशा प्रकारचे मुक्त संबंध किंवा ‘लिव्ह इन रिलेशन’ तिथे साधारणपणे वयाच्या चाळीशीपर्यंत सर्व स्त्री-पुरुषांमध्ये होत राहतात. पण म्हणून विवाहाचे महत्त्व ते कमी लेखत नाहीत. चाळिशी ओलांडणाऱ्या पुरुषांमध्ये (अपवाद वगळता) हळूहळू कामभावनेच्या हार्मोनचा प्रभाव किंवा जोर कमी होऊ लागतो. १५व्या वर्षांपासून पुढील वीस-पंचवीस वर्षे मुक्त जीवनाचा अनुभव घेतल्यानंतर पाश्चात्त्य पुरुषांना प्रौढ जीवनात स्थैर्याची आस लागते. स्त्रियांनासुद्धा आपली मुले सांभाळण्यासाठी मदतीच्या गरजेतून पुरुषाची साथ हवीशी वाटते. मग त्यावेळी आपल्या आंतरिक सुरांशी सूर जुळणारे स्त्री-पुरुष एकत्र येऊन लग्न करतात. ‘लिव्ह इन’चे पूर्वीचे अनुभव तेव्हा कामी येतात. अशा वेळेस त्या स्त्रियांची मुले लहान असल्यास त्यांच्यासह पुरुष त्यांचा स्वीकार करतो. विवाहानंतर या स्त्री-पुरुषांनी निष्ठेचे आयुष्य जगणे अभिप्रेत असते. कारण पाश्चात्य संस्कृतीत पती-पत्नीपैकी कोणीही दुसऱ्याला फसवून ‘अफेअर’ करणे, हे फार आक्षेपार्ह समजलं जातं, त्यापेक्षा घटस्फोट हा प्रामाणिक आणि उचित समजला जातो. म्हणूनच प्रौढविवाह जेव्हा विचारपूर्वक होतात, तेव्हा ते टिकवण्याचा प्रयत्न तिथे जास्त असतो.

अशा रीतीने विवाहपूर्व स्त्री-पुरुष संबंधांबाबत नैसर्गिक दृष्टिकोन स्वीकारल्यानंतर युरोप-अमेरिकेतील पहिल्या तरुण पिढीला आणि त्यांच्या पालकांच्याही पहिल्या पिढीला जुन्या नैतिक मानल्या गेलेल्या परंपरा सोडतांना अडचणी आल्या, त्यांच्या चिंता वाढल्या. पण सुमारे वीस वर्षांनी त्याचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले. याचा अर्थ युरोपात आता कोणतेच गुन्हे नाहीत किंवा प्रत्येक कुटुंबात अगदी आलबेल आहे, असं नाही. परंतु लैंगिकगुन्हे, त्यांची वारंवारता, आणि त्यासंदर्भातील सामाजिक विकृती याचे प्रमाण तिथे खूप घटलेले आढळते. स्त्री शरीराचे आकर्षण असणे आणि म्हणून त्यातून त्यांची छेडछाड करण्याचा आनंद घ्यावासा वाटणे, असे वास्तव तिथे दिसत नाही, ते मुक्त स्त्री-पुरुष संबंधांच्या मान्यतेमुळे, असे आता म्हणावे लागेल. मुक्त शरीर संबंधांचा परवाना अगदी तरुण वयातच त्यांना उपलब्ध झाल्यामुळे, विवाहानंतर प्रथमच मुलगे-मुली शरीरसंबंधांना सामोरे जात आहेत, असेही तिथे नाही आणि मग इतके वर्ष मी कामपूर्तीपासून वंचित आहे, तेव्हा घाईने आणि कशाही प्रकारे तो आनंद मी आता मिळवीन, अशी परिस्थिती तिथे आता राहिलेली नाही. आधीच्या संबंधांच्या अनुभवातून आणि सेक्स एज्युकेशनमुळे स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा सन्मान करण्याचे महत्त्व त्यांना समजलेले असते. त्यामुळे विवाह हे नाते तिथे असे उरलेले नाही की शरीरसंबंधाबाबत सरसकटपणे ते जबरदस्तीचे किंवा अन्यायाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र ‘ म्हणून वापरले जावे.
भारतात ‘लिव्ह इन’ द्वारे असे विवाहपूर्व संबंध उच्च शिक्षित किंवा उच्च आर्थिक वर्गात चालू झालेले आहेत. पण एकूण समाजात शैक्षणिक, आर्थिक, जातीय आणि स्त्री-पुरुष विषमता तीव्र असल्यामुळे असे विवाहपूर्व संबंध मान्य होण्यात खूप अडचणी आहेत, हेही तितकंच खरं!

लोकसत्ताच्या सौजन्याने(३० मे २०१५)

mangala_samant@yahoo.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.