आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. शेतीसारख्या मूलभूत क्षेत्रामध्येही तंत्रज्ञानाचे योगदान काही नवीन नाही. कुदळ आणि नांगर यांपासून पिढ्यान्पिढ्या शेतीला सुलभ आणि लाभदायक करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.
गेल्या शतकात रासायनिक खते, अनुवंशशास्त्र वापरून तयार केलेले बी-बियाणे, ठिबक सिंचन इत्यादी तंत्रज्ञान शेतीतून मिळणारे उत्पन्न व पिकाचा कस वाढवण्यासाठी वापरले गेले. औद्योगिक प्रमाणावर शेती होऊ लागली. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी विशिष्ट पिकांची मागणी वाढत होती. त्यामुळे त्या पिकांचा दरही वाढत होता. तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक आणि पुरवठा साखळीत झालेल्या प्रगतीमुळे विशिष्ट प्रदेशातील पिकांची मागणी जगभरात होऊ लागली. साहजिकच प्रत्येक शेतकऱ्याला महागड्या दरात विकले जाणारे पीक लावायची ओढ लागली. एका शेतात एकच प्रकारचे पीक वारंवार घेतले जाऊ लागले. त्यामुळे पिकांतील जैवविविधता ढासळू लागली. जमिनीची धूपही होत होती. पण ही धूप भरून काढायला रासायनिक खते होतीच. लवकरच रासायनिक खते विकणाऱ्या उद्योगसमुहांनी कृषिक्षेत्रावर संपूर्णपणे पगडा बसवला. रसायनांच्या आणि बियाण्यांच्या उद्योजकांनी पांघरूण घालण्याचे प्रयत्न करूनही शेवटी गेल्या काही दशकांत वरील प्रकारच्या शेतीव्यवस्थेमुळे जमिनीची व वातावरणाची होणारी अपरिमित हानी उघडकीला येत गेली. परिणामी, जगभरातील गरीब शेतकरी गेली कित्येक वर्षे होरपळत आहेत.
कोणत्याही क्षेत्रात सतत प्रगती होत राहण्यासाठी गरज असते नवीन कल्पनांची व तरुण रक्ताची! जगभरातील अनेक तरुण-तरुणी हवामानबदलांचा शेतीवर होणारा वाईट प्रभाव कसा कमी करावा आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा कशा भागवाव्यात अश्या समस्या सोडवण्याचा कसोटीचा प्रयत्न करीत आहेत. या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी तेही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू बघत आहेत. गरज ही शोधाची जननी असते. त्याच अनुषंगाने तंत्रज्ञ त्यांच्यासमोरील शेतीविषयक प्रश्नांची उत्तरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, आय.ओ.टी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. इंटरनेटच्या प्रसारामुळे जगभरातील होतकरू तंत्रज्ञ व नवउद्योजक एकमेकांशी कल्पनांचे आदान-प्रदान सुलभपणे करू शकत आहेत.
पिकांवर कीड तर पडली नाही ना? पिकांना अधिक पाण्याची गरज आहे का? कापणीसाठी सर्वांत योग्य वेळ काय असावी? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अनेक सेन्सर्सना इंटरनेटद्वारे जोडून आय.ओ.टी. म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स हे तंत्रज्ञान सहज प्रसवू शकते. हवामानखात्याने सेन्सर्सच्या सहाय्याने गोळा केलेली माहिती, पिकाला घातलेल्या खतांचे प्रमाण इत्यादी अनेक गोष्टींचा आढावा घेऊन शेतीविषयक भाकिते करण्यासाठी अनेक जण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. दाट लोकसंख्या असलेल्या अनेक शहरांना त्यांचा खुराक मिळवण्यात स्वावलंबी करण्यासाठी अनुलंब शेतीचे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. जैवविज्ञान व जैवतंत्रज्ञान वापरून समुद्रातील शेतीसुद्धा विकसित केली जात आहे. एवढ्यातच प्रकाशित झालेल्या जगभरातील १०१ सर्वोत्तम नवउद्योगांच्या यादीत तब्बल १८ भारतीय नवउद्योगांचा समावेश असणे ही अत्यंत उत्साहवर्धक व अभिमानाची बाब आहे.
तंत्रज्ञांसमोर उभ्या असलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळाची गरज असते. त्यामुळे कोणत्या आणि कोणाच्या प्रश्नांसाठी उत्तरे शोधली जातील हे गुंतवणूकदार कोणाला आर्थिक पाठबळ द्यायला तयार आहेत यावर विसंबून असते. अर्थातच, ज्यातून अधिक आर्थिक परतावा मिळेल अशाच तंत्रज्ञानाच्या विकासात गुंतवणूकदारांना रस असतो. हे कटू सत्य केवळ कृषी तंत्रज्ञानालाच नाही तर सर्वच तंत्रज्ञानांना लागू असते. जसे संरक्षण किंवा अवकाश संशोधनासाठी अधिक भांडवल उपलब्ध असल्याने त्या या तंत्रज्ञानांचा आधी विकास होतो आणि मग हळूहळू ते तंत्रज्ञान रोजच्या वापराच्या क्षेत्रात झिरपते. तसेच काहीसे कृषिक्षेत्रातही पाहायला मिळते. कोणत्या द्राक्षांच्या वेलींना किती पाणी हवे? द्राक्षातील साखरेचे प्रमाण सर्वांत योग्य कधी असेल? व त्यावरून त्यांची कापणी करण्यासाठी योग्य वेळेचे भाकीत कसे करता येईल? या वाईन उद्योजकांच्या प्रश्नांना उत्तरे मिळणे म्हणजे त्यांना सोन्याची खाण सापडल्याजोगे असते. म्हणूनच या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी त्यांच्या आर्थिक पाठबळाने इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा कृषिक्षेत्रातील उपयोग विकसित करण्यात आला. हळूहळू या शोधांचा उपयोग इतर पिकांच्या लागवडीतही आढळू लागला. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये कॅनबिस म्हणजे भांग कायदेशीर होताच अनुलंब शेतीसाठी लागणारे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे.
आर्थिक फायद्याच्या हेतूने का होईना, तंत्रज्ञानाचा विकास झाला की समाजातील अनेकांचा फायदा होतो. कोणतेही तंत्रज्ञान असो, ते साधारणतः समाजाच्या भल्यासाठीच जन्माला येते. पण मग मानवी लोभ त्या सद्हेतूवर कुरघोडी करू लागतो. गेल्या शतकाच्या आणि अगदी आत्ताच्या अनुभवांवरूनही हे सहज दिसून येते. वातावरण जतन करण्याची दीर्घकालीन गरज तर भांडवलदारांचीदेखील आहे. असे असूनही अल्पकालीन आर्थिक लोभापायी ते त्याकडे दुर्लक्ष करतात. मग असे लोभाने आंधळे झालेले भांडवलदार शेतकऱ्यांच्या किंवा उपाशी जनतेच्या गरजांचा विचार करायला कसे तयार होणार?
गेल्या शतकातील आर्थिक लोभाचे परिणाम आपले वातावरण, आपली जमीन, आपले गरीब शेतकरी आणि आपले स्वास्थ्य या साऱ्यांनाच भोगावे लागत आहेत. या समस्यांची उत्तरे केवळ तंत्रज्ञानाच्या भिंगातून शोधली तरी पुन्हा काही वर्षांनी हेच लोभचक्र सुरू राहील आणि त्यावेळेस कदाचित आपल्या वातावरणास आणि परिणामी मानवी सभ्यतेस वाचवणे अशक्य होऊन बसेल.
त्यामुळे या खेपेस तंत्रज्ञानासोबत समाजशास्त्राच्या व नीतीशास्त्राच्या भिंगांतूनही ही उत्तरे शोधायला हवी आहेत. या खेपेस तंत्रज्ञानाला व आर्थिक व्यवहारांना कवेत घेऊन गरीब शेतकऱ्यांना बाजूला सारले तर त्या परिणामांचा बळी केवळ गरीब शेतकरी नव्हे तर आपण सर्वच असू. आणि म्हणूनच या खेपेस सगळा भर केवळ आपल्या प्रश्नांच्या उत्तरांवर न देता योग्य प्रश्न विचारण्यावर दिला पाहिजे.
लॉंग बीच, कॅलिफोर्निया
Yogya Prashana
Dhanyawaad!!
शेती संदर्भात नवी उगवती पिढी इतका सखोल अन् योग्य दिशेने विचार करु लागली हे खरोखरीच कौतुकास्पद आहे. शेती आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून शेतकरी समृद्ध होणे अपेक्षित होते.पण निदान भारतातील गरीब शेतकऱ्यांपर्यंत ही समृद्धी म्हणजे अजूनही दिवास्वप्नच आहे.सुयोग्य विचार या लेखातून अधोरेखित केले आहेत.
Aapan sarvannich ya vishyaavar jaagruk raahane mahatwaache aahe. Suruvat yogya dishene aahe ani yogya margaavar kayam rahane garajeche aahe.
फार सुंदर लेख आहे स्वप्ना !!
Thank you!
Very interesting and brainstorming article, swapna 👌
Thank you!
सद्य परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करणारा लेख. पण स्वार्थी धनदांडग्या लोकांमुळे सुधारणांची फळं गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. एकच पीक वारंवार घेतल्याने जमिनीचा कस कमी होतो, हे सर्वसाधारण शेतकऱ्यांना सुध्दा माहित असते. पण धनाचा हव्यास असणारे, खासकरुन राजकीय पुढारी गरीब शेतकय्रांना स्वतःस लाभदायक पिकं घेण्यास भाग पाडतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात सिंचन व्यवस्था समाधानकारक नसूनही साखर कारखाने काढून राजकीय पुढाय्रांनी शेतकऱ्यांना उसाची शेती करण्यास भाग पाडले. उसाच्या शेतीमुळे इतर पिकं घेणाय्रा शेतकय्रांना पाण्याची कमतरता उत्पन्न होऊन त्यांच्या पिकावर विपरित परिणाम झाला. राजकीय पुढारी साखर सम्राट झाले, पण गरीब शेतकरी गरीबच राहिला. कोणत्याही क्षेत्रात होणाय्रा सुधारणांची फळं तळागाळातील माणसापर्यंत पोहोंचली तरच सर्वांगीण प्रगती होऊन गरिबी नष्ट होऊ शकेल.