देश महासत्ता होतो तेव्हा
नांगरं चालवावीच लागतात
शेतं पेरावीच लागतात
जागली कराव्याच लागतात
आदिमानवाने सुद्धा हेचं केलं
बलाढ्य काळ लोटूनसुद्धा आपणही तेच करत आहोत
मग देश महासत्ता झाला कसा ?
उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या जमाती
सत्तेला पुरवत असतात रसद
बंदुकीचा चाप ओढून
डांबू पाहतात काळ्याकुट्ट अंधारात
जगवणाऱ्या मातीला वांझ संबोधून
पोशिंद्याला करू पाहतात हद्दपार
ते गोचीडासारखे बसतात चिटकून
आणि पिढ्यानपिढ्या शोषत असतात रक्त
बांधावरील शेवटच्या झाडाला कापून
ते दाखवू लागले महानगराचे स्वप्न
मातीवर करू लागले बलात्कार
उभारू लागले हायटेक ग्रीन सीटी
बैलं हद्दपार झाली केव्हाचीच
कदाचित कसणाराही होईल गहाळ
उरेल फक्त सावकारी हुकुमशाही
हायफाय दफ्तरात बसून
ते रानं पिकवतील
दाम ठरवतील
सोयीनुसार फासावर लटकवतील
ते बदलू लागतील वर्तमान आणि भविष्य
उठणारे हात छाटू लागतील
तेव्हा उजेडाला पेरण्यासाठी
पिकवणाऱ्या मातीने आता पेटलं पाहिजेत
उगवणाऱ्या हाताने आता पेटलं पाहिजेत
आस्तित्व टिकवण्यासाठी
माणसाने आता पेटलच पाहिजेत…!