‘आजचा सुधारक’चा जानेवारी २०२१ चा अंक शेतीविषयक
(‘आजचा सुधारक’च्या अंकात लेख, निबंध, कविता, कथा, चित्र, व्यंगचित्र सगळ्याचे स्वागत आहे.)
आवाहन:
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन, नवीन कायद्याला होत असलेला विरोध, त्याविषयी उपस्थित झालेले प्रश्न यांवर भूमिका घेण्याविषयी राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष ह्यांच्यात एक प्रकारचा संभ्रमच दिसून येतो आहे.सरकारने बनवलेले कायदे नेमके कोणाच्या फायद्यासाठी आहेत हे जितके (अ)स्पष्ट आहे तितकेच आपल्या हलाखीच्या परिस्थितीवर नेमक्या उपाययोजना कोणत्या ह्याविषयी शेतकर्यांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत.
आज अल्पभूधारक किंवा शेतमजूरी करणारा शेतकरी एका विचित्र कोंडीत अडकला आहे. शेतीउत्पादन वाढवणे किंवा शेतमालाला रास्त भाव मिळवून देणे कितीही आवश्यक असले तरी शेतकऱ्याचे राहणीमान उंचावण्यासाठी ते पुरेसे आहे काय याचा विचार बरोबरीने होणे आवश्यक आहे. कारण पावसाच्या अनियमिततेमुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे उत्पादन कमी झाले तर शेतकरी कुटुंबांची आर्थिक बाजू सांभाळायची कोणी हा प्रश्न अजून तरी अनुत्तरीतच आहे.
मुळात सुरू असलेले आंदोलन शेतकरी हिताशी संबंधित आहे की हा निव्वळ एक राजकीय चित्रपट आहे हेही वरवर पाहता कळण्यासारखे नाही आणि आतपर्यंत शिरून त्यातील बारकाव्यांकडे जाणे कदाचित माध्यमांना पेलणारे नाही.
शेती हा ‘सतत’ लाभ देणारा व्यवसाय नाही हे समजून घेतले तरच शेतकरी वर्गाच्या उत्कर्षासाठी आपल्याला इतर काय पावले उचलावी याचा विचार सुरू होईल. रोगाचे मूळ समजून घेऊन ते स्विकारले तरच चिकित्सेचा पुढचा मार्ग सुकर होतो.
‘आजचा सुधारक’च्या जानेवारी २०२१च्या अंकात शेतीविषयक नवीन कायद्याचा, शेतीतील दीर्घकालीन समस्यांचा आणि उपायांचा अनेकांगांनी ऊहापोह करू या. तसेच शेतकरी वर्गाला सामजिक स्थैर्य कसे देता येईल यावरचे विचारही समोर आणू या.
आपला लेख, निबंध, कविता, कथा, चित्र, व्यंगचित्र २७ डिसेंबरपर्यंत खालील ई-मेल वर पाठवा. लिखित साहित्य युनिकोडमध्ये नसल्यास ते शक्यतोवर २२ डिसेंबरच्या आधी पाठवावे.
ई-मेल : aajacha.sudharak@gmail.com
WhatsApp : 9372204641
प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक