मनोगत

‘आजचा सुधारक’च्या माध्यमातून वेगवेगेळे सामाजिक विषय आपण हाताळत असतो. ह्या सर्वांच्या मुळाशी तर्क आणि विवेकवाद असावा अशी ‘सुधारक’ची आग्रही मागणी असते. एप्रिल २०१० मध्ये ‘आजचा सुधारक’चा ‘अंधश्रद्धा विशेषांक’ प्रकाशित झाला होता. आज तब्बल १० वर्षांनी साधारण त्याच अंगाने जाणारा विषय आपण घेतो आहोत, हे खरेतर मरगळलेल्या समाजाचे लक्षण आहे. तरी असे विषय घेतल्यानेच वाद-संवाद घडतात, विचारचक्र सुरू राहते. अंकाचा मूळ विषय जरी नास्तिकेशी जोडलेला असला तरी त्या अनुषंगाने काही इतर आजूबाजूचे विषय आणि काही वेगळ्या बाजूच्या मतांनासुद्धा ह्यात समाविष्ट केले आहे.

विज्ञानयुगात मानवाला वेगवेगळे तंत्रज्ञान अवगत होत आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पुरेसे अन्न उत्पादित आणि उपलब्ध होत आहे. पण असे असतानासुद्धा देशातील देवभोळेपणा, अंधश्रद्धा, धार्मिकता टिपेला पोहोचली असल्याचे दिसत आहे. भारतीय राज्यघटनेत व्यक्तिस्वातंत्र्याबरोबर वैयक्तिक धर्मस्वातंत्र्याला मान्यता आहे. परंतु धर्म, अध्यात्म आणि देव-देवता, श्रद्धा (अंधश्रद्धा), भक्ती, संस्कृती ह्या सार्‍यांचीच एक विचित्र सरमिसळ झालेली आहे.

ही एका आजाराची लक्षणे आहेत असे मान्य केले तर मूळ आजार काय आहे याकडे लक्ष दिले जाईल. मुळात, समाजाची बौद्धिक मशागत कमी पडते आहे आहे असे प्रकर्षाने जाणवते. बौद्धिक मशागतीत मनन, चिंतन, लेखन, संभाषण अशा सर्व स्तरांवर जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवे असतात. आधी गप्पाटप्पा, अफवा, कंड्या अशी सहजगत्या सर्वदूर पसरणारी तर आज सोशल मीडियावरून भरमसाठ आणि अतिशय वेगाने उपलब्ध होणारी माहिती खरीच असते असं मानणारा एक मोठा वर्ग समाजात आहे. अशा वर्गात तर्कबुद्धीची अधिक गरज आहे. अतार्किक विचार करणे, त्यायोगे कृती करणे हे मानवी समाजाला, एखाद्या राष्ट्राला अनुकूल नाही. विवेकवादी विचारपद्धतीच सुदृढ मानवी समाज घडवते.

एकाबाजूस अवैज्ञानिक दावे करून, देवाच्या, धर्माच्या नावाने शोषण होत असतानाच समाजातील एक विवेकी वर्ग अशा विषयावरील विशेषांकाचे स्वागत करतो, त्यासाठी लिहिता होतो हे निश्चितच कौतुकास्पद आहे. अनुकूल परिस्थितीत एखादा विषय हाताळणे तुलनेने सोपे असते. तरी करोना संसर्गाच्या ह्या भयग्रस्त पार्श्वभूमीवर अशी वैचारिक चर्चा घडू शकली हे नक्कीच आशादायी आहे. ह्या विशेषांकात बुद्धिप्रामाण्याला आपण कायदा, न्याय, राज्यघटना, विज्ञान, धर्म, अंधश्रद्धा, विवेक अशा सगळ्याच बाजूंनी स्पर्श केला आहे. हा विषय ह्या अंकापुरता मर्यादित न राहता पुढेही ह्यावर संवाद सुरू रहावा ही अपेक्षा.

हा अंक जगभरातील सर्व विवेकवादी व्यक्तींना आणि कृतिशील संघटनांना समर्पित.

ह्या अंकाची कल्पना तसेच ह्या विषयावर वेगवेगळ्या लोकांकडून लेख मागवण्याची धडपड ह्या सगळ्याचे श्रेय कुमार नागे ह्यांना जाते.

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.