काही तुरळक अपवाद वगळता, एका निरीक्षणानुसार आजच्या तरुण पिढीच्या मेंदूचा बराचसा भाग ईमेल्स, ट्वीटर्स, चॅट्स, स्टेटस् अपडेट्स इत्यादींनी व्यापलेला असल्यामुळे बहुतेक वेळा त्यांच्यात एकाग्रतेचा अभाव असतो व चित्त विचलित झालेले असते. अमेरिकेतील कॉलेजमधील 80 टक्के विद्यार्थी मॅसेजेस, फेसबुक, न्यूजफीड व इतर गोष्टी ताशी एकदा तरी, 10 टक्के ताशी सहा वेळा तरी वापरत असतात. व इतरांच्या बाबतीत ताशी किती वेळा याचा हिशोबच ठेवता येत नाही.
निकोलस कार या पत्रकाराने गूगल आपल्याला मूर्ख बनवत आहे का? या विषयी 2008 साली एक लेख लिहिला होता. गूगल सर्च इंजिनच्या सततच्या वापरामुळे सातत्याने आपले लक्ष बदलत असते. त्यामुळे आपल्या मेंदूचे रीवायरिंग होत असावे अशी त्याला दाट शंका होती. या रीवायरिंगमुळे आताची तरुण पिढी कुठल्याही गोष्टीचे जास्त खोलात जाऊन विचार करू शकत ऩाही. आपल्यातील उपजत शहाणपणाचा वापर आता उपयोजित गोष्टीसाठीच होत आहे. अनेक वेळा ताबडतोबीच्या समस्यांकडे लक्ष देत असल्यामुळे ध्यानपूर्वक, चहूबाजूने विचार करण्याची बुद्धीमत्ता हळू हळू कमी होत आहे. तुकड्या तुकड्याने माहिती गोळा करण्याच्या नादात खोलात जाऊन विचार करण्याची बुद्धीशक्ती हरवून जाईल की काय याची चिंता लेखकाला वाटत आहे.
परंतु गूगलचे समर्थक मात्र या गोष्टीशी सहमत नाहीत. त्यांच्या मते मेंदूत माहिती भरण्यात व तेथून माहिती काढून घेण्यात वेळ घालविण्यापेक्षा इतर महत्वाच्या गोष्टींसाठी मेंदूचा वापर करत राहणे इष्ट ठरेल. गूगलवर सहजपणे मिळणारी माहिती डोक्यात ठेऊन घेणे हे काही बुद्धीमत्तेचे लक्षण नाही. फार फार तर याला बुद्धीमत्तेची एक बाह्य बाजू म्हणता येईल. माहितीबद्दलची स्पष्ट कल्पना एकदा आल्यानंतर त्याच्या विश्लेषणातून समस्येला उत्तर शोधणे यासाठी बुद्धीमत्तेचा वापर करणे योग्य ठरेल. 14 -15 वर्षे वय असलेल्या एखाद्यानी तोंडपाठ केलेले पाय या अपरिमेय संख्यातील शंभरेक आकडे अचूकपणे फाडफाड सांगणे कदाचित गंमतीदार असू शकेल. परंतु पायचे आकडे शोधण्यासाठी सॉफ्टवेअर लिहिणाऱ्यापेक्षा तो सरस ठरत नाही. चाइल्ड प्रॉडिजी शकुंतलादेवीसारखे 40 – 50 आकड्यांचा गुणाकार वा भागाकार काही क्षणात करून दाखविण्यापेक्षा गणित विषयात काही नवीन भर घालणे ही खरी प्रतिभा असेल.
माहिती तंत्रज्ञानाचा विकास होण्यापूर्वीची पिढी जास्तीत जास्त 20 -25 गोष्टी लक्षात ठेवत असे. परंतु आताच्या दुसऱ्या सहस्रकाच्या पिढीत हजारो गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण त्यांच्यासाठी गूगल आता त्यांच्या मेंदूचाच एक भाग बनू पाहत आहे. एका चाचणीमध्ये कॉलेज विद्यार्थ्यांचा एका गटाला चाळीसेक पशु – पक्ष्यांची नावे लिहून काढण्यास सांगितले होते. त्यातील काही विद्यार्थ्यांना आपण लिहिलेली नावे संगणकाच्या हार्ड डिस्कवर सेव्ह करता येईल व इतर काही जणांना संगणकाच्या हार्ड डिस्कवरून डिलीट केले जाईल असे सांगण्यात आले. काही दिवसानंतर याच विद्यार्थ्यांची तीच चाचणी घेतल्यानंतर ज्यांना संगणकावर माहिती उपलब्ध होईल असे सांगितले होते त्या विद्यार्थ्यानी तुलनेने फारच कमी नावे लक्षात ठेवण्याचे कष्ट घेतले होते. कारण संगणकावर माहिती उपलब्ध असल्यामुळे लक्षात ठेवण्याचा त्रास त्यांनी घेतला नव्हता. झेरॉक्स कल्चरचा अनुभवही याहून वेगळा नाही.
गूगलची ही आक्रमकता आपल्या स्मृतीपटलावर काही परिणाम करत असावे.कारण मेंदूपेक्षा आपला जास्त भरवसा कीबोर्डवर आहे. काही तज्ञांच्या मते स्वत:च्या हस्ताक्षरातून उमटलेले शब्द (व आशय) कीइंग – इन् केलेल्या शब्दांपेक्षा व्यवस्थितपणे मेंदूपर्यंत पोचू शकतात. कीइंगमुळे काही महत्वाचे मुद्दे मेंदूत ध्वनित होत नाहीत. यासंबंधीची एक चाचणी घेण्यात आली. काही विद्यार्थ्यांना हस्ताक्षरात एक परिच्छेद कागदावर उतरवून घेण्यास सांगण्यात आले. व इतर काहींना टाइप करून प्रिंट घेण्यास सांगण्यात आले. काही दिवसांनी या विद्यार्थ्यांना परिच्छेदातील माहितीबद्दल काही जुजबी प्रश्न विचारल्यानंतर ज्यांनी (जुनाट पद्धतीप्रमाणे) हस्ताक्षरातून परिच्छेद उतरवून काढले होते त्यांना इतरांपेक्षा जास्त गोष्टी आठवत होत्या. कित्येक शतकापासून जोपासलेली ही आठवणीत साठवण्याची क्षमता हळू हळू कमी होत आहे. या नंतरची पिढी हस्ताक्षराची सवय पूर्णपणे विसरून कीइंग – इन् वरतीच भरवसा ठेवतील.
खरे पाहता स्मृती बद्दल येवढे हळवे व्हायची काही गरज नाही व काळजी करण्याचे कारण नाही. तरीसुद्धा कुठल्याही गोष्टीचा फार खोलात जाऊन, समस्येकडे लक्ष केंद्रित करून विचारपूर्वक निर्णय घेण्यापेक्षा वरवरच्या माहितीच्या आधारे उत्स्फूर्तेतेने निर्णयापर्यंत पोचण्याची सवय घातक ठरणार आहे, हे मात्र निश्चित. एका तज्ञाच्या मते हातानी लिहिण्याच्या वा हार्ड कॉपी वाचण्याच्या सवयीमुळे एका प्रकारचे बुद्धीमत्तेचा तरंग उमटत लेखकाच्या आशयाचे नीटपणे आकलन होऊ शकते. गूगल/ संगणक वरील त्रोटक माहिती मुळे मूळ आशय हरवून जाण्याची शक्यता आहे.
ट्वीटर्स, स्मार्ट फोन्स, सातत्याने टेक्स्टिंग वा चेकिंगच्या जमान्यापूर्वीचा होता. गेल्या 4 – 5 वर्षात हे सर्व माहितीचे स्रोत मोठ्या प्रमाणात विकसित झाले असून आपले जीवन व्यापून टाकत आहेत. पुढील काही वर्षात केवळ लॅपटॉपच नव्हे तर मोबाइल व टॅब्लेट्स प्रत्येक क्षणाला आपले चित्त विचलित करणार आहेत. तुम्ही कुठेही जा, त्या तुमचे पाठलाग करणार आहेत – कारमध्ये, रस्त्यावर, ऑफिसच्या ठिकाणी, महत्वाच्या मीटिंग्सच्या वेळी…… अगदी तुम्ही बाथरूममध्ये असतानासुद्धा! शांतपणे एखाद्या ठिकाणी विचार करण्याससुद्धा तुम्हाला यानंतर शक्य होणार नाही. कदाचित असली ठिकाणं काळाच्या उदरात नष्ट होऊन जातील. वॉटरप्रूफ आयपॉड वापरत शॉवर घेणाऱ्या महाभागांची संख्या आताच कमी नाही! कारच्या लेखाचा प्रतिवाद करणारा एक लेख जमाइस कास्किओ (Jamais Cascio) या संशोधकाने लिहिला आहे.
त्याच्या मते गूगलमुळे आपण, ढ, मूढ वा मूर्ख असे काही होत नाही. उलट वेबच्या जंजाळातून नेमकी माहिती शोधून आपल्या फायद्याच्या गोष्टीसाठी वापर करण्याची कुशलता आपल्या मेंदूत येऊ घातलेली आहे. खरे तर आपण आता मागच्या पिढ्यांपेक्षा जास्त चाणाक्ष आहोत. एकपाठी, एकाग्रता, फोकस्ड, वा लक्ष केंद्रित करणे आता आपल्याला जमत नसले तरी आपली बुद्धीमत्ता जास्त तरल, तल्लख, सक्षम, हजरजबाबी होत आहे. गडबड – गोंधळातून मार्ग काढणे, गुंतागुंतींची उकल करणे, नवीन समस्यांना धडाडीने सामोरे जाणे, धोका पत्करणे इत्यादी गोष्टी या बुद्धीमत्तेची देणगी आहे.
अलिकडेच काही नसतज्ञ गूगलसॅव्हींच्या मेंदूतील बदलाकडे लक्षपूर्वक अभ्यास करत आहेत. fMRIची सुविधा वापरून गूगलसॅव्हींचा मेंदू कसा काम करतो याचा शोध ते घेत आहेत. त्यासाठी 55 ते 77 वयोगटातील 24 जणात 12 जण गूगल व तत्सम सुविधांचा गेली 10 वर्षे सातत्याने वापर करणा्यांची व इतर12 जण कधीच गूगल न वापरलेल्यांची अभ्यासासाठी निवड केली. हे दोन्ही गट जेव्हा पुस्तक वाचत होते तेव्हाच्या त्यांच्या मेंदूंच्या एमआरआय स्कॅनमध्ये मेंदूतील temporal, parrietal व occipital lobe हे भाग क्रियाशील झालेले आढळले. साधारणपणे भाषा, स्मृती वा काही तरी निरखून पाहताना हे भाग क्रियाशील होत असतात.
नंतरच्या चाचणीत या सर्वांना गूगलवर चॉकोलेट खाल्यामुळे आरोग्याला काय फायदा मिळतो? याचा शोध घेण्यास सांगितले. व त्यांच्या मेंदूंचे एमआरआय स्कॅनिंग करण्यात आले. गूगलवर सर्फिंग करणाऱ्यांच्या काहींच्या बाबतीत वाचनाच्या वेळी क्रियाशील असलेल्या मेंदूच्या पृष्ठभागाव्यतिरिक्त आणखी काही पृष्ठभाग सर्फिंग प्रक्रियेत भाग घेत असलेले एमआरआय स्कॅनिंगमध्ये चित्रित होऊ लागले. हे अतिरिक्त पृष्ठभाग सामान्यपणे गुंतागुंतींच्या प्रश्नांचा विचार करताना, महत्वाचे निर्णय घेत असताना वा दृश्य संकलन करताना कार्यरत होत असतात. गूगलशी अपरिचित असलेल्यांचे मेंदू मात्र जुळवून घेण्याच्या मार्गावर होत्या व त्यांच्या मेंदूच्या fMRI मध्ये फार बदल आढळला नाही.
नसतज्ञांच्या मते गूगलवरील वेबचा शोध मेंदूतील काही सर्क्यूट्सना उत्तेजित करत असावे. व ही सर्क्यूटरीची प्रक्रिया हळू हळू विकसित होत गेली असावी. वृद्धाप्यकाळात जाणीवांचे आकुंचन होण्याच्या प्रक्रियेला थोपवू शकणारी ही क्षमता आहे, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढला गेला. तरुण पिढीच्या मेंदूतही असेच काही तरी घडत असावे, असे त्यांना वाटू लागले.
अत्यंत प्राथमिक स्वरूपात ही चाचणी असली तरी गूगल आपल्याला ढ करू पाहते यास प्रतिवाद करण्यास पुरेसे आहे, असे तज्ञांना वाटते. नेटिझन्सच्या मेंदूत वेगळे बदल करण्याची क्षमता गूगलमध्ये आहे, असेही आपल्याला म्हणता येईल. आपल्या मेंदूत आमूलाग्र बदल करण्याची क्षमता कीबोर्ड व डोळ्यासमोरील स्क्रीन वर आहे, याबद्दल दुमत नसावे. फक्त हा बदल सुखावह की ….आणखी काही तरी हे पुढील काळच ठरवू शकेल!
pkn.ans@gmail.com