मानवी इतिहासात डोकावून पाहिल्यास आजच्या सतत वाढत जाणाऱ्या गोंगाटाच्या व गोंधळाच्या सामाजिक स्थितीस कीड लागण्यास नेमकी कधीपासून व कोणत्या शोधापासून सुरुवात झाली, ह्याचे जर आपण तटस्थपणे चिंतन केले तर काय दिसते ? मोबाईल फोन्स्, दूरचित्रवाणी, जैविक अभियांत्रिकी आणि सुपरमार्केट्स ह्या सर्व गोष्टी आपल्याला एका मोठ्या आगीच्या ठिणग्या आहेत असे जाणवेल. मग मोठ्या आगीचे, सामाजिक नाशाच्या स्थितीचे खरे कारण शोधण्यासाठी मानवी इतिहासातील सुरुवातीच्या शोधांपासून सुरुवात करावी लागेल.
काहीजण म्हणतील की मानवाच्या नाशास अणुबॉम्बचा शोध किंवा औद्योगिक क्रांती कारणीभूत आहे. इतर काहीजण म्हणतील की भांडवलशाही किंवा पैसा किंवा बंदुकीची दारू (gun powder) कारणीभूत आहे. परंतु आणखी काहीजण असेही म्हणतील की, नाही कोणताही शोध नव्हे, तर त्याचा वापर करणारे लोक नाशास कारणीभूत आहेत. तंत्रज्ञान हे तटस्थ असते. तंत्रज्ञान चांगल्यासाठी वापरायचे की वाईटासाठी हे आपणावर अवलंबून आहे. काहीजण असाही युक्तिवाद करतील की शोध चांगलाही असू शकतो व वाईटही असू शकतो. काही तंत्रज्ञाने चांगल्या हेतूने किंवा वाईट हेतूने प्रेरित असतात. परंतु तंत्रज्ञानाचे भावी परिणाम काय होतील हे महत्त्वाचे नाही तर आज काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे पाहणे गरजेचे आहे. आल्फ्रेड नोबेल ह्यास पूर्ण खात्री पटली होती की, डायनामाईट ह्या त्याच्या शोधाने पुढील युद्धे ही अतिशय भीषण, हिंसात्मक आणि भीतीने गांगरून टाकणारी होतील. आणि आश्चर्य वाटायला नको, असेच घडले. अतिशय कमी वेळात डायनामाईटमुळे असंख्य लोक मारले गेले. अधिक चांगल्या त-हेने ऊर्जा मिळविण्यासाठी अणुबॉम्बच्या शस्त्रास्त्रनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्याविषयीचे आपले कायदेशीर प्रयत्न अधिक उत्तम त-हेची वीजनिर्मिती व ऊर्जा मिळविण्याच्या नावाखाली नेहमीच विफल झालेले आहेत, कारण कोणत्याही देशाला अणतंत्रज्ञान किंवा ऊर्जेच्या नव्या शोधापासन मिळणाऱ्या फायद्यास नाकारणे परवडणारे नाही. एखादे तंत्रज्ञान अत्यंत घातक जरी असले तरी त्यातून काही ना काही फायदा होतच असतो. उदाहरणार्थ मानवजातीचा सर्वनाश करणारे अणुतंत्रज्ञान आणि त्या तंत्रज्ञानामुळे दोन किंवा अनेक देशांना मिळणाऱ्या फायद्यासाठी होणारा त्यांच्यामधील समझौता; संसर्गजन्य अँग्रंक्सच्या (anthrax) विषाणूंचा साठा आणि देवीच्या रोगावरील प्रतिबंधक लसींचा साठा; तंत्रज्ञानामुळे होणारे नुकसान आणि फायदा ह्यांचा हिशोब आपल्या हितामध्ये आहे की नाही हे ठरविण्यात खरी अडचण येत आहे. ज्यामुळे मानवाचे अतोनात नुकसान झाले आहे असा एखादा सर्वांत वाईट शोध मानवी इतिहासात असू शकेल काय ? होय, असा शोध आहे. रूढ परंपरेनुसार ह्या शोधाला सर्वांत महान, सर्वांत नावीन्यपूर्ण व महत्त्वाचे मानले गेले आहे. शेतीच्या शोधाकडे निसर्ग आणि मानव ह्यांच्यामधली दरी मिटविण्याचा भाग म्हणून पाहिले जाते. परंतु ज्या वेगाने बदलणाऱ्या पद्धतीने आपण अन्न मिळवत आहोत व ज्या पद्धतीने शेतीचा विकास होत आहे त्यामुळे पूर्वी कधीही जगलो नव्हतो अशा स्थितीत आपल्याला जगायला भाग पडत आहे. आपल्याला पूर्वीसारखा फुरसतीचा वेळ मिळेनासा झालेला आहे; आणि खाण्याची पद्धत पूर्वीपेक्षा वाईट आहे; स्वास्थ्य बिघडत चालले आहे आणि आपण स्वातंत्र्य हरवून बसलो आहोत. एवढेच नाही, मोठ्या प्रमाणात युद्धाच्या खाईत लोटण्याच्या अनेक घटना प्रथम शेतीमुळेच घडल्या आहेत. विषमता, साम्राज्यशाही, अधिकारशाही, गरिबी, गुन्हेगारीकरण, दुष्काळ, मानवी हस्तक्षेपामुळे होणारा हवामान बदल आणि त्यामुळे कायमच्या नष्ट होणाऱ्या प्राणी, पक्षी, पेशींच्या जाती ह्यास शेतीचा शोध जबाबदार आहे. कीड लागायला कुठून सुरुवात झाली?
१९६० ते १९७० च्या दशकात रिचर्ड ली आणि येहुदी कोहेन ह्या मानववंशशास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की पूर्वीच्या जमातींची अन्नोत्पादन करण्याची पद्धत आणि त्यांची सामाजिक-राजकीय रचना ह्यांमध्ये एक प्रकारचा घट्ट संबंध आहे. काही वर्षांच्या संशोधनानंतर ह्या मानववंशशास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले की ज्या जमाती शिकार करून जगत होत्या, त्यांच्यामध्ये समानतेने आणि एकमताने जगण्याची प्रवृत्ती अधिक होती. शिकार करणारे लोक अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून होते. अन्नाच्या गरजेतून सहकार्य आणि आपापसांतील समजूतदारपणा ह्यांवर त्यांची संस्था उभारलेली होती. टोळीतील अनेकांना शिकार करण्याच्या अनेक संधी मिळत असतील, परंतु त्यांपैकी एखादाच शिकार करण्यात यशस्वी होत असेल ; इतरांना शिकार मिळाली नसेल; परंतु जी शिकार मिळेल तिची वाटणी करून घेतल्याने अनेकजणांना अन्नाच्या पुरवठ्याबद्दल खात्री होती. ज्या प्रदेशातील अन्नसाठा (शिकार) संपत होता, तेथून जेथे अन्नाचा साठा मुबलक प्रमाणात आहे, तेथे ह्या टोळ्या आपले बस्तान हलवत होत्या. दक्षिण अफ्रिकेतील कुंग आणि हाङ्जा ह्या जमाती दिवसातील केवळ ३ ते ५ तास अन्न मिळवण्यासाठी घालवत होत्या. नागरी समाजापूर्वीचा शिकारी मानव रानटी जरी असला तरी त्याचे जीवन जास्त निरोगी होते. वाळवंटातील खडतर जीवन पाशवी आणि तिरस्करणीय जरी वाटत असले तरी व्यक्तींव्यक्तींमधील तंट्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या जमातीमध्ये हुकूमशाही पद्धत आवश्यकच होती. ह्या समाजाचे वर्णन मूळचा समृद्ध समाज (original affluent society) असे जे करण्यात येते ते अगदी योग्यच आहे. परंतु दुर्दैवाने आताच्या सभ्य गणल्या जाणाऱ्या समाजाच्या मनात ‘सर्वांविरुद्ध सर्वांचे युद्ध’, आणि जे निसर्गाशी संघर्ष करून जीवन जगत आहेत त्यांच्याविरुद्धचा रानटीपणा फार घट्टपणे रुजलेला आहे. जेव्हा भटक्या जमातींनी कुठेतरी स्थिरस्थावर होऊन वस्ती करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा जुलमी कारभाराला सुरुवात झाली. जेव्हा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यात मतभेद होत तेव्हा ही भटकी जमात दोन-तीन किंवा अनेक गटांत विभागत असे. प्रत्येक गट मग त्यांनी घेतलेल्या सर्वांत चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या परीने झटत असे. परंतु स्थिरावलेली शेतकरी जमात मात्र त्याच ठिकाणी एकत्र राहून बहुमताची जुलूमशाही लादून शक्य ती चांगल्या प्रकारची लोकशाही अमलात आणत असे. जास्त उत्पादन स्थिरस्थावर झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गरजेपेक्षा जास्त धान्योत्पादन केल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिघडली. काही लोकांनी उत्पादन करणे बंद केले आणि इतर धंद्यात ते विशेषज्ञ बनले. ह्या विशेषज्ञ बनण्याच्या प्रकारामुळे असमान संपत्तीला सुरुवात झाली. काही कौशल्ये इतर काही कौशल्यांपेक्षा श्रेष्ठ दर्जाची मानली जाऊ लागली, आणि त्याप्रमाणात ती वापरणाऱ्यांकडे अधिक संपत्ती जमा होऊ लागली. भटक्या जमातींकडे जर मालमत्ता जमा झाली तर त्या मालमत्तेचा त्यांच्यावर बोझा होत असे. सांपत्तिक स्थितीने समान असलेल्या समाजात जी संपत्ती जमा होते त्याला विशेष महत्त्व नसते. त्यामुळे मालमत्तेबद्दलचे गुन्हेही अशा समाजात होत नाहीत. परंतु शेतीवर आधारलेला समाज हा सांपत्तिक स्थितीने असमान असल्याने तेथे गुन्ह्यांचे प्रमाण साहजिकच वाढले. शेतीवर आधारलेल्या समाजात काही जण धातूच्या कामातील विशेषज्ञ बनले; काही कुंभारकामात विशेषज्ञ झाले, तर काही जनतासंपर्कामध्ये विशेषज्ञ बनले. काहीजण गुन्हे रोखण्याच्या नावाखाली, हिंसात्मक कृतींमध्ये विशेषज्ञ बनले. हे शेवटचे लोक आपला वेळ असमान संपत्तीमुळे समाजात जे फरक पडलेले होते, ते टिकून राहावे यासाठी खर्च करीत आणि श्रीमंत लोकांची संपत्ती सुरक्षित राहील ह्याची हमी देत.
ब्रिटनमधील पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननातून निओलिथिक काळातील घरांसंबंधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उतरंडीविषयीची माहिती दाखवते की मोठी घरे ही नेहमी धान्याच्या कोठाराजवळ असत. जेव्हा श्रीमंत लोकांना त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त संपत्तीचे नियंत्रण व सुरक्षा करता येत नसे तेव्हा समाजातील जे ब करण्यासाठी ठेवले जात असे. अशा प्रकारे श्रीमंत लोक हिंसेवर मक्तेदारी प्रस्थापित करून सत्ता आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होत असत. आपल्या समाजातल्या भौगोलिक परिघात शिक्षा होण्याची भीती नसल्याने हे श्रीमंत लोक हिंसेचा वापर करत. अशा रीतीने जुलूमशाही रुजायला सुरुवात झाली. जेव्हा हिंसा भौगोलिक परिघाच्या बाहेर, दुसऱ्या जमातीबरोबर होत, तेव्हा त्याला युद्धाचे व राजेशाहीचे स्वरूप आले. अतिरिक्त अन्नाच्या साठ्याचा उपयोग सुरक्षेसाठी ठेवलेल्या सैन्यांचे पोट भरण्यासाठी होत असे. सैन्याचा उपयोग जवळच्या इतर लोकांकडील जमीन व धान्य बळकावण्यासाठी होत असे. अतिरिक्त धान्याशिवाय कायमचे लष्कर बाळगणे केवळ अशक्यच होते. अतिरिक्त धान्यसाठ्यामुळे एकाच ठिकाणी अधिकाधिक लोकसंख्या घडू लागली. दाटीमुळे लोक आजारी पडण्याच्या घटनांतही वाढ झाली. छोट्या लोकसंख्येमध्ये रोगाने ठराविक दिवसाचा क्रम पूर्ण केल्यानंतर तो रोग नाहीसा होत असे; परंतु मोठ्या लोकसंख्येमध्ये रोगाचे जंतू इतरांमध्ये संक्रमित होताना त्यांत बदल होऊन अनेकांना पुनःपुन्हा संसर्ग होत असे. सर्दी, गोवर, कांजिण्या आणि इन्फ्लूएन्झा हे आजार बिगर शेतीच्या समाजामध्ये अजिबात अस्तित्वात नव्हते. त्यापेक्षाही वाईट म्हणजे, शेतकरी पाळीव प्राण्यांच्या संपर्कात राहत होते. त्यामुळे पाळीव प्राणी हा सतत नवीन रोगजंतू निर्माण होण्याचा स्रोत राहिला.
शिकारी समाजाच्या मानाने नवीन बस्तान बसलेल्या शेतकऱ्यांचा आहार मर्यादित व विविधता नसलेला होता. त्यामुळे अशा आहारावर शेती करणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक संस्था (immune system) काम करीत असल्याने शिकारी जमातींच्या मानाने ती लवकर रोगांना बळी पडत असे. शिकारी समाजाच्या आहारात शेतकऱ्यांच्या मानाने विविधता होती. आपल्या हानिकारक जीवनशैलीमुळे शेती करणाऱ्यांचे आयुर्मान कमी होते आणि केवळ गेल्या शंभर वर्षातील वैद्यकीय ज्ञानामुळे आताच्या शेतकऱ्यांचे आयुष्यमान पूर्वीच्या शिकारी जमातींएवढे झाले आहे.
पुरातत्त्वशास्त्रज्ञ रिचर्ड ली जेव्हा बोट्सवाना देशातील कलाहारी वाळवंटातील आदिवासी लोकांना १९६० साली भेटला, तेव्हा त्यास तेथील १० टक्के लोक ६० वर्षांहूनही अधिक वयाचे आढळले. ग्रेट ब्रिटनमध्ये सध्या हे प्रमाण २० टक्के आहे. परंतु कलाहारीच्या असह्य वातावरणातील खडतर जीवनाशी ह्याची तुलना करता ग्रेट ब्रिटनपेक्षा कलाहारी येथील जीवनशैली जास्त चांगली आहे असे म्हणावे लागेल. परंतु हे आदिवासी लोक १९६० साली त्यांच्या पूर्वजांनी जीवनशैली आनंदाने वापरली, तसे आज जगू शकत नाहीत. बोट्सवानाचे सरकार ह्या आदिवासींची जमीन ताब्यात घेऊन त्यांना आधुनिक बनवण्याच्या प्रयत्नात आहे, आणि हीच पद्धत जगभर अस्तित्वात असलेल्या आदिवासींबाबत त्यांना (hunter gatherers) ब्लँकेट, रोग, दारू आणि निराशावादी जीवन देऊन अवलंबली जात आहे.
मानवी समाज ज्या ठिकाणी आहे तेथील शेतजमिनीशिवाय जंगलातील आदिवासींच्या जमिनीही शेतीखाली आणल्या जात असल्यामुळे केवळ आदिवासींचे जीवन दुःखमय होत आहे असे नव्हे तर पर्यावरणावरही त्याचा परिणाम होत आहे. जास्तीत जास्त परिणामकारकतेने जास्तीत जास्त जमीन उत्पादनाखाली आणली जात आहे. तेवढ्याच प्रमाणात काही क्षेत्रफळाचे बिगर शेतजमिनीत रूपांतर होऊन अशा जमिनी वाळवंटी, बर्फाळ व टंड्रा प्रदेशाप्रमाणे बनत आहेत. ह्यामुळे समृद्ध व अगदी भिन्न असे असलेले आदिवासींचे जीवन आणखीनच खडतर होत आहे. जेव्हा १० अब्ज हेक्टर वन्य-जमीन १० अब्ज हेक्टरच्या गहू, सोया व कुरणे (गुरे चरण्यासाठी) यांत परिवर्तित होईल, तेव्हा त्याचा परिणाम काय होईल ह्याचे भविष्य वर्तविता येते. ह्या १० अब्ज हेक्टर जमिनीत गवा (बैलासारखा रानटी प्राणी-इळीप), अस्वल, रानटी बोकड (ibex) ह्यांना खाद्यान्न मिळणार नाही. हे सर्व प्राणी नाहीसे होऊन त्यांचे अस्तित्वच संपल्याचे (mass extinction) आपल्याला बघावे लागणार आहे. ज्या जमिनीत हजारो प्राणी-पक्षी वनस्पतींच्या जाती जगत होत्या, त्याच जमिनीचा उपयोग आता एका जातीला (मानव) जगण्यासाठी होणार आहे. अक्षरशः मानव सोडून सर्व जाती उपाशी मरून त्यांचे अस्तित्वच राहणार नाही. सृष्टितज्ज्ञ पॉल इहरलिच ह्यांच्या अभ्यासानुसार, पृथ्वीच्या एकूण जमिनींपैकी अंदाजे ४० टक्के जमीन मानवाच्या उपयोगासाठी वापरण्यात येते. ह्या नासधुशीत आणखी भर पडते आहे ती इतिहासकाळात जंगल जाळून पीक काढण्यासाठी बनवलेल्या जमिनीबाबत. प्रोफेसर बिल रुडिमन ह्यांच्या संशोधनातून असे दिसते की, पिकांसाठी जमीन मिळवण्यासाठी जे जंगल जाळले त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्साईड व इतर हरितगृह वायू वातावरणात सोडले जाऊन जागतिक तापमानाच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे शेती चालू ठेवण्यासाठी काही ठिकाणी कृत्रिमरीत्या तापमान ठरावीक पातळीपर्यंत ठेवावे लागत आहे. कार्यालयीन मनुष्य आणि शिकारी समाज जर आपण मागच्या काही मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले आणि फक्त सुखवादी दृष्टिकोणातून विचार केला तर असे दिसते की पूर्वीच्या, अगदी सुरुवातीच्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बोजड व अनुत्साहाने, हाताने, कशाबशा केल्या जाणाऱ्या शेतीपासून सुधारणा करत करत आजच्या आधुनिक यंत्रशेती करण्याच्या पद्धतीपर्यंत आपण पोहचलो आहोत. आपले विशेषज्ञ बनण्याचे क्षेत्रही विस्तारत जाऊन आपण केवळ शेतकरी किंवा सैनिक राहिलेलो नाही. विशेषज्ञांमध्ये संगणक अभियंता, कार्यालयीन कामगार आणि स्वच्छतागृह साफ करणारे असे बरेच काही विशेषज्ञ समाविष्ट आहेत. ह्या विशेषज्ञांचे एक नवेच जग आहे. परंतु आपणाला ही कामे आवडत आहेत काय? की केवळ पैसे मिळतात म्हणून आपण ती करत आहोत? ज्यांनी पूर्वी शेती केली त्या आपल्या पूर्वजांपेक्षा आपण निश्चितपणे सुखात आहोत. परंतु शेती करण्यासाठी पहिल्यांदा नांगर वापरला त्याहीपेक्षा इतिहासात थोडे पाठीमागे जाऊ या. आजचे दररोजचे कार्यालयीन मनुष्याचे जीवन आणि पूर्वीचा शिकारी समाज ह्यांच्या जीवनामध्ये भरपूर फरक आपणास आढळेल. कार्यालयीन मनुष्य दिवसातले आठ तास कार्यालयीन कामकाजात घालवतो. कामाचे स्वरूप एकसारखे असल्यामुळे कंटाळवाणे असते. इतर मानवांशी संपर्क होत असल्यामुळे त्यात थोडा हलकेपणा येतो. आता घरून काम करण्याच्या प्रकारामुळे तोही हलकेपणा नाहीसा होत आहे. राहिलेल्या वेळात येणेजाणे व दुकानातील खरेदी यामध्ये काही तास घालवल्यानंतर कार्यालयीन मनुष्य बाजारात तयार असलेले अन्न विकत घेतो. घर स्वच्छ करण्यासाठी नोकराला नियुक्त करतो आणि दूरचित्रवाणीसमोर बसून थंडावतो. अशी ही बैठे काम करण्याची जीवनशैली फारशी सुखदायक नसून ती आपले स्वास्थ्यही खराब करते. बिघडत चाललेली तब्येत दुरुस्त करण्यासाठी औषधांचा व व्यायामाचा आधार घ्यावा लागतो. कार्यालयातील निष्फळ व कंटाळवाण्या जीवनाचा परिणाम अपरिहार्यपणे ताण आणि उदासीनता येण्यात होतो. सूट-बूट घालून व सौंदर्यप्रसाधनांचा मारा करून स्वतःला टापटीप ठेवण्यात पैसा खर्च करून इतरांची बरोबरी करायचा प्रयत्न होतो. समाजाने कार्यालयीन कामगारासाठी तयार केलेले हे जीवन त्याला आनंदी बनवते का ? आणि त्याबद्दल त्याने विचार करायला हवा की नको? त्याचा राजकारणातील भाग केवळ एक निरीक्षक, जो कित्येक लाखांपैकी एक निरुपयोगी मत दर पाच वर्षांनी देत असतो, असे आहे. ह्याच्या उलट आपला पूर्वज शिकारी समाज दिवसातील फक्त ३ ते ५ तास काम करत होता. तेही आपल्या मित्रांबरोबर मौजमस्ती करत आणि राहिलेला दिवस खाणे, मित्रांकडे जाणे, संगीत निर्माण करणे, नाचणे, चिंतन करणे, मुलांबरोबर खेळणे, आराम करणे आणि झोपणे असा घालवत होता. असे हे जीवन आपण गमावून बसलो आहोत.
रागात पाठीमागे जरा पाहा!
शिकारी समाजाकडून मिळालेली कमाई शेतीमुळे आपल्याकडून हिरावली गेली आहे. त्यामुळे समानता व एकमत ह्या आधारावरील आपला पूर्वीसारखा समाज अशक्य बनला आहे. एका नव्या सामाजिक रचनेवर आपल्याला ढकलले गेले आहे. शेती सुरू राहिल्याने आणि तिचा विस्तार झाल्याने दुजाभाव आणि उच्चनीचभाव ह्या दोन्ही गोष्टींना पुष्टी मिळत आहे. भविष्यातील कल्पनारम्य आदर्श असे यूटोपिअन चित्र आपण रंगवतो, ते वास्तवात येणे अशक्य आहे. माणूस त्याचे चातुर्य व तांत्रिक सामर्थ्य ह्याच्या जोरावर सध्याच्या समस्येपासून दूर जाण्याचा देखावा करत आहे. परंतु असे आदर्श जग वास्तवात येणे फार कठीण आहे. आपण अगोदरच एक महान चूक केलेली आहे आणि गेली १०,००० वर्षे सर्वांत घातक असा शेतीचा शोध परिपूर्ण करण्यात घालवली आहेत आणि आणखी त्यावरच अवलंबून राहात आहोत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी आपणाला आपल्या पूर्वजांच्या वागणुकीची झलक दाखवली आहे, आणि मानववंशशास्त्रज्ञांनी आपल्या जवळच्या चुलतभावाची तोंडओळख देऊन आपल्याला दाखवून दिले आहे की आपण ज्याची स्वप्ने पाहतो ते का करू नये. ज्याची आपणाला उत्कंठा आहे ते आपल्या कल्पनेतले भविष्य नसून तो खरोखरचा आपला भूतकाळ आहे.
(“Ecology’ ह्या मासिकातील सर्वांत घातक शोध’ ह्या विषयावरील २००६ सालच्या निबंधस्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा निबंध)
[समता, स्वास्थ्य, पर्यावरणसुरक्षा, या साऱ्यांमुळे शिकार-संकलकांचे जीवन आदर्शवत् होते, आणि शेती व पुढे उद्योग यांनी तो स्वर्ग हिरावून घेतला ! सर्वोदयींपासून साम्यवाद्यांपर्यंत अनेकांना मोहवणारा हा दृष्टिकोण आहे. पण पृथ्वीचे सागरांवरचे क्षेत्रफळ आहे १३,३८,७५,००० चौरस किलोमीटर. शिकार-संकलनाने जगायला माणशी सुमारे २.५ चौरस कि.मी. क्षेत्र लागते. म्हणजे आजची जमीन फारतर ५.३५ कोटी लोकांना त्या जीवनशैलीने जगू देईल. प्रत्यक्षात आज सुमारे ६५० कोटी माणसे अस्तित्वात आहेत. त्यामुळे यूटोपियन भविष्य घडवणे जितके फसवे आहे तितकेच निसर्गाकडे परत जाणेही! मग उपाय काय?]
मूळ लेखक : क्लाईव्ह डेनिस
अनुवादक : टी. बी. खिल्लारे
संपर्क : RH-४, राजविमल टेरेस, रामनगर कॉलनी, बावधन, पुणे ४११ 0२१