जेफ्री साक्स हे आजचे आघाडीचे अर्थतज्ज्ञ आहेत. अनेक देशांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे आणि रशियासारख्या देशांना आर्थिक संकटातून बाहेरही काढले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे ते विश्वासू मित्र. त्यांनीच ब्लेअर यांना निराळा ‘आफ्रिका निधी’ उभारायला लावला. या पैशातून गरिबी आणि अज्ञानात रेंगाळलेल्या आफ्रिकन देशांना सावरण्यासाठी मदत होते.
जेफ्री साक्स यांना यंदा बीबीसीची अतिशय प्रतिष्ठेची अशी रीथ व्याख्यानमाला गुंफण्याचा मान मिळाला. एण्ड ऑफ पॉव्हर्टी या पुस्तकामुळे साक्स जगभर परिचित आहेतच. अर्थशास्त्र हा केवळ घडणाऱ्या घटनांचा ताळा मांडण्याचा बौद्धिक खेळ नाही. माणसांच्या भल्यासाठी काय घडायला पाहिजे. हेही अर्थशास्त्र्याने सांगायला हवे. त्यासाठी शास्त्राची चौकट वापरून योग्य ते उपायही सुचवायला हवेत. असे त्यांचे म्हणणे. त्यामुळेच जगातली गरिबी संपवण्यासाठी काय करता येईल. एड्सच्या रुग्णांना समाजात सामावून कसे घेता येईल याची ते चर्चा करत असतात. ही चर्चा साक्स यांनी रीथ व्याख्यानमालेत पुढे नेली. त्यांचे म्हणणे असे की, साऱ्या जगाने एकत्र येऊन जगाची लोकसंख्या आणखी किती? वाढू द्यायची याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. हा विचार एकेका देशाने करण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे. आज आपण आहोत उणेपुरे साडेसहा अब्ज. अनेक देश झपाट्याने विकसित होत आहेत. लोकसंख्या वाढायला विकासाची मदतच होते. या शतकाच्या मध्यावर आपण पोहोचू तेव्हा झालेली असू कदाचित नऊ अब्जदेखील!
पृथ्वीवर माणसांची फारच दाटी झाली तर साऱ्याच साधनांवर कमालीचा ताण येईल आणि विशेषतः हवामान माणसे निरोगी राहण्याइतके स्वच्छ, मोकळे राहणारच नाही. असा इशारा साक्स यांनी दिलाय. त्यातच अमेरिकेसारखा धनाढ्य देश जगातल्या कुटंबनियोजनासाठी देत असलेली मदत कमी कमी करत चालला आहे. हा निर्णय म्हणजे पायावर पाडून घेतलेला धोंडाच आहे. जो
पैसा कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी, जगाचे वातावरण शुद्ध राखण्यासाठी, रोगांच्या साथी थोपवण्यासाठी वापरायचा, तो इराकी युद्धासारख्या बेमतलबी गोष्टींवर खर्च होतो आहे, याचे साक्स यांना दुःख वाटते. कोणत्याही भूमीवर लोकसंख्येचा ताण कमालीचा वाढला की जगण्याची कसरत कशी अवघड होते आणि माणसे जगण्यासाठी कशी भटकू लागतात हे आपण पाहतोच. वाढत्या लोकसंख्येचा विचार साऱ्या जगाने एकत्र येऊन करायला पाहिजे असे साक्स सांगतात. ते स्थलांतरित घुसखोर, निर्वासित या सर्वांच्या वाढत्या प्रमाणामुळेही खरे ठरते आहे. माणसे जिवावर उदार होऊन देश सोडून कसे प्रगत देशांमध्ये ‘घुसत’ आहेत. याचे उदाहरण पाहायचे तर अई किन लिन या चिनी मुलीची कथा ऐकायला पाहिजे. अई अवघ्या एकविसाव्या वर्षी चीनमधून चोरट्या मार्गाने देशोदेशी प्रवास करत लंडनमध्ये येऊन थडकली आणि तेथेच स्थायिक झाली. तिला हवी होती चांगली नोकरी. त्यासाठी ती वाटेल तो धोका पत्करायला तयार होती. . अईकडून माणसे ‘स्मगल’ करणाऱ्या टोळक्याने १३ हजार पौंड घेतले. तिला लंडनमध्ये पोचवले मात्र सुखरूप. अईला लंडन केवळ चित्रात पाहून माहीत होते. आणि तिथे काम करून खूप पैसा मिळवता येईल, असे वेडे स्वप्न हाका घालत होते. चेक रिपब्लिकमध्ये पोचले की लंडनचा निम्मा प्रवास सरणार होता. तिथे दलालाला निम्मे पैसे द्यायचे ठरले आणि निम्मे लंडनमध्ये पोचल्यावर. चीनमधून लंडनमध्ये पोचायला अईला लागले तब्बल सहा महिने. अईबरोबर एक अख्खा गटच चोरून देशांतर करत होता. प्रत्येक देशाची सीमा ओलांडली की या ‘प्रवासी पक्ष्यांची’ जबाबदारी नव्या टोळीकडे. रशियात गेल्यावर या गटाला एका हॉटेलात दहा दिवस काढावे लागले. खायला केवळ नूडल्स आणि प्यायला बिअर. तिथून पुढचा मुक्काम युक्रेनमध्ये पडला तेव्हा रेल्वेतून प्रवास करताना पोलिसांनी पकडलेच. पण पकडले तसे सोडूनही दिले! पोलिस असे वागले, याचे अईला फारच नवल वाटले!
नंतरचा एक महिना झेक रिपब्लिकमध्ये घाणेरड्या घरात. त्यानंतर सर्वांना लॉरीत कोंबून मग हॉलंडच्या दिशेने. मळलेले कपडे, तहानलेले घसे आणि गुदमरणारा श्वास अशा अवस्थेत बसायला जागा नाही म्हणून एकमेकांना खेटून उभे सगळे. कुणाला नैसर्गिक विधीसाठीही उतरायची परवानगी नाही. टोळीचा म्होरक्या कुठून चाललो आहोत, केव्हा पोचणार हे काहीच सांगत नाही. अखेर लॉरीतून रेल्वेत रवानगी होऊन एक दिवस अचानक लिव्हरपूल स्टेशन दिसते. संपला एकदाचा प्रवास..
लंडनमध्ये उतरल्यानंतर अईला सारी कर्जे फेडायला लागली सहा वर्षे. नशीब, कर्जे देणारे सारे तिचे नातेवाईकच होते. ते व्याज घेत होते तरी इतर सावकारांसारखे मारायला अंगावर माणसे नव्हते घालत. अईला कामे पटापट मिळाली. कपड्यांच्या कारखान्यात नाहीतर रेस्तराँमध्ये. इंग्रजी मुळीच येत नव्हते. कोणी बोललेले कळत नव्हते. इतकेच नाही तर लंडनचा विस्तारही समजत नव्हता. अई दिवसाचे ११ तास काम करायची. आठवडाभर असे काम केले की मिळायचे १५० पौंड. घरच्या आठवणींनी डोळे सतत वाहात असायचे. आई-वडील, भावंडांना सोडून आपण चूक तर नाही ना केली, असे वाटत राहायचे. पुढे या दुःखाची सवय झाली अईला. तिने दागिन्यांचे काम शिकून घेतले. जास्त पैसे मिळण्यासाठी मनःशांती मिळावी, यासाठी मग अई चर्चमध्ये जायला लागली.
‘गोस्ट’ या सिनेमामुळे अईच्या जगण्याला निराळीच कलाटणी मिळाली. पेस्टर लॉरेन्स या दिग्दर्शकाने तिला शिंपले वेचणाऱ्या चिनी बाईची भूमिका दिली. २००४ मध्ये मोरकॅम्ब किनाऱ्यावर शिंपले वेचणारे २३ चिनी मरण पावले होते. त्यांच्यावरचा हा चित्रपट. अईने कधी शिंपले वेचले नव्हते. पण तिथे जगणे त्यांच्यासारखेच. पडक्या खोलीतली अर्धीमुर्धी खाट, ‘गोस्ट’मधली भूमिका करायची म्हणजे अईला केवळ कॅमेऱ्यासमोर जगून दाखवायचे होते. वांशिक शिव्या तर तिलाही खायला लागल्या होत्या. पगार बुडाल्याबद्दल कोर्टात जावे लागले होते. शिंपले वेचणारे जे समुद्रात मरण पावले त्यांच्या नातलगांच्या मागे आता सावकारांचा ससेमिरा लागला आहे. पौंड न् पौंड वसूल केल्याशिवाय ते सोडणार नाहीत. मात्र अई बचावली.
निर्वासित म्हणून लंडनमध्ये लपतछपत आलेली अई आता स्थिरावली आहे. आठवड्यातून तीन दिवस ती इंग्रजी शिकायला जाते. एव्हाना ती एका मुलाची आईही झाली आहे. तिला वेध लागले आहेत ते मुलाला वाढवण्याचे. त्याच्यासाठी पैसे साठवण्याचे. पण कधी कधी तिच्या मनात येते, आपण कशासाठी देश सोडला ? राहिलो असतो चीनमध्येच तर काय फरक पडला असता? तिचे आई-वडीलही तिकडे असाच विचार करत असतात. कशाला गेली ही पोरगी लंडनला? इंग्लंडभर अंगमेहनत करणाऱ्या तीस लाख कामगारांच्या आई-वडिलांनाही हेच वाटत असेल.
जेफ्री साक्स यांनी लोकसंख्येच्या स्फोटाबाबत दिलेला इशारा जगातल्या मुत्सद्दयांनी ऐकला तर माणसांना निर्वासित वहवे लागणार नाही. शिंपले वेचताना बेवारस वाहून जावे लागणार नाही. नाना प्रकारच्या शोकांतिकांचे अटळ तडाखे जगाला खात बसावे लागणार नाही!
[ दि. २१ एप्रिल २००७ च्या महाराष्ट्र टाइम्स मधून साभार ]