संपादकीय

प्रिय वाचक
पुनश्च हरि:ओम्

हे टिळकांनी म्हणणे ठीक आहे, पण सुधारकाला ही शब्दावली घेण्याचा अधिकार आहे का, असा विचार क्षणभर मनात चमकून गेला. सुधारकाला ‘श्री’वरही हक्क नाही असे बऱ्याच मंडळींना वाटते. ते पत्राच्या अग्रभागी ‘श्री’कार घालत नाहीत. पण लिखाणात ‘अथश्री’, ‘इतिश्री’चा प्रयोग वा मानत नसतील अशी आशा आहे.
‘भाषा बहता नीर है’ हा मुखपृष्ठावरचा विचार कसा वाटतो?
श्री. नंदा खरे ह्यांना काही एका अत्यावश्यक कामासाठी निदान वर्षभर सुटी हवी आहे त्यामुळे मला पुनश्च हरि:ओम् म्हणावे लागले आहे.
संपादकाच्या व्यक्तित्वातले उणेअधिक नियतकालिक उतरणे स्वाभाविक आहे. मग ते पत्र विशिष्ट विचारधारेला वाहिलेले का असेना. तसे आता होईल. आपल्या अवतीभोवतीच्या महत्त्वपूर्ण घडामोडींची दखल घेऊन फक्त आ. सुधारकाशी विसंगत नसलेली भूमिका घेऊन जर कोणी काही लिहिले तर ते हवे आहे. उदाहरणार्थ, उत्तरप्रदेशातील निवडणुकींचा इत्यर्थ, किंवा गुजरातमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची अटक आणि आरोपित खोट्या चकमकीतील मृत्यू. एकूणच भ्रष्टाचार मग तो राजकारण्यांचा असो की प्रशासकांचा जो भारतातील न्यायपद्धतीसमोर एक डोकेदुखी होऊन बसला आहे यावरील वाचकांचे चिंतन हवे आहे. आपली लोकशाही, आपल्या निवडणुका ह्यांना लागणारे प्रचंड द्रव्यबळ कमी करता येईल असा काही दुसरा उपाय आहे का ? राजकीय अभ्यासकांनी विचार प्रगट करावेत असे त्यांना आवाहन आहे.
लोकसंख्यावाढीचा भस्मासुर म्हटले तर आर्थिक, म्हटले तर सामाजिक प्रश्न आहे. जग खाऊन टाकणारे जन-अरण्य, हा सारंग दर्शने ह्यांचा मटा तून घेतलेला लघुलेख-वाचकांस अंतर्मुख करील.
‘स्त्रीवादी-साहित्यासंबंधी डॉ. विजया डबीरांनी भावग्राही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांना अनुलक्षून काही चर्चा झाली तर हवी आहे. इ.स.२००७ हे वर्ष दोन महत्त्वपूर्ण घटनांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. १८५७ म्हटले की, ‘पहिले स्वातंत्र्यसमर’ ही आठवण मनात जागी होते.
भारतीय डाक खात्याचा प्रारंभही त्याच वर्षी झाला. पुढे ही गोष्ट आधुनिक भारताला जोडणारी एका सूत्रात गोवणारी ठरली. हे लक्षात घेण्यासारखे आहे. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाबद्दल का फारसे लिहिले जात नाही, असा प्रश्न उपस्थित करून एका विचारवंताने सुचविले आहे की, आमचा इतिहास आम्हीच लिहिला पाहिजे. ह्या कामी आमचे जे औदासीन्य तेच आम्हाला भोवते आहे. मग ते जेम्स लेनलिखित शिवचरित्र असो की १८५७ चे स्वातंत्र्यसमर ! प्रसिद्ध स्कॉटिश पत्रकार, प्रवासवृत्तकार, राजकीय भाष्यकार विल्यम डाल रिंपल ह्याने द लास्ट मुघल (बहादूरशहा जफ़र) बद्दल लिहिले आहे. वर्तमान जगात रमणाऱ्यांच्या चित्तात दीडशे वर्षांपूर्वी ह्या युगप्रवर्तक घटनेबद्दल औत्सुक्य जागृत करावे असे त्याला वाटणे हे बरेच बोलके आहे. इ.स. १६१२ त व्यापाराच्या सवलती मुघल बादशहाकडून मिळविणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीने दीडशे वर्षांच्या आत, २३ जून १७५७ रोजी प्रसिद्ध पलाशीची (प्लासी) लढाई जिंकून ब्रिटीश साम्राज्याचा पाया घातला. शंभर वर्षांनी म्हणजे १८५७ च्या मार्चमध्ये उद्भवलेला स्वातंत्र्य-भावनेचा उद्रेक हां हां म्हणता उत्तरेत भारतभर पसरला, तो दोन वर्षांनी १८५९ मध्ये शमला. जेथे सैनिकांनाच आपले सेनापती बनावे लागले त्या युद्धाची इतिश्री झाली तशीच होणार होती. अभ्यासकांना व वाचकांना विनंती की, त्यांनी ह्याही विषयावर लिहावे. विवेकीजनी ह्या मज जागवीले ह्या पुस्तकाचा प्रा. ह. चं. घोंगे ह्यांनी लिहिलेला लहानसा परिचयलेख ह्या अंकात आहे. आजचा सुधारक मधील निवडक लेखांचा हा संग्रह ग्रंथाली, मुंबई ह्यांनी काढला आहे.
प्रा. र. ग. दांडेकरांनी ‘काही न्याय-संकल्पना’ अनुवादल्या आहेत. त्या आपल्या भाष्यविषय व्हाव्यात.
येणेप्रमाणे, साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म ह्यांचे मेलन साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. वाचकांनी दिलेली दाद-भली, बुरी कशीही असो, जाहीर करू. मात्र ती आली तरच ! कळावे,
प्र. ब. कुळकर्णी

पायवा
आजचा सुधारक च्या सुरुवातीच्या काळात (एप्रिल १९९० ते एप्रिल १९९२) संस्थापक संपादक दि. य. देशपांडे यांची ‘विवेकवाद’ या विषयावरील वीस लेखांची एक मालिका ‘पायवा’मधून पुनःप्रकाशित होत आहे. पहिल्या वर्षांतील इतर काही लेखही पुनःप्रकाशित होतील. आजचा सुधारक ची भूमिका पायवा मधून स्पष्ट होईल असे वाटते. सं.] विश्वरूपदर्शन आणि ईश्वराचा शोध (प्रथम प्रकाशन ऑगस्ट १९९१ अंक २.५, लेखक : दि. य. देशपांडे)
या लेखमालेच्या दुसऱ्या लेखांकात ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करू पाहणाऱ्या बहुतेक सर्व प्रमुख युक्तिवादांचे परीक्षण केलेले वाचकांना आठवत असेल. आज त्याच विषयाचा पण वेगळ्या दृष्टिकोणातून विचार करण्याचा विचार आहे.
भगवदीतेच्या नवव्या अध्यायात भगवान कष्णांनी अर्जनाला विश्वरूपदर्शन घडविल्याची कथा आहे. आज एक वेगळ्या प्रकारचे विश्वरूपदर्शन वाचकांना घडविण्याचे ठरविले आहे. विज्ञानाने आतापर्यंत विश्वाचा जो अभ्यास केला त्यातून विश्वाच्या स्वरूपाचे एक चित्र निश्चित झाले आहे. त्याचे संक्षेपाने वर्णन येथे करावयाचे आहे. हेतू हा की विज्ञानाने घडविलेल्या विश्वरूपदर्शनात आपल्याला कुठे ईश्वर सापडतो का, आणि सापडल्यास त्याचे स्वरूप काय आहे ते आपल्याला सांगता पुढे जी माहिती दिलेली आहे ती अधिकृत ग्रंथातून मिळविलेली आहे असे आश्वासन मी देतो. शिवाय तिच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करण्याची मोकळीक कोणालाही आहेच. त्यामुळे ती विश्वसनीय मानायला हरकत नाही. (अ) विश्वाचा विस्तार The Mysterious Universe (रहस्यमय विश्व) या आपल्या ग्रंथात सर जेम्स जीन्स हे विख्यात ज्योतिःशास्त्रज्ञ म्हणतातः
काही तारे आपल्या पृथ्वीएवढे आहेत. परंतु बहुतेक सर्व तारे एवढे विशाल आहेत की त्यांपैकी प्रत्येकात लाखो पृथ्व्या मावून शिवाय जागा ठरेल. एखादा तारा तर इतका मोठा असतो की त्यात कोट्यवधि पृथ्व्या मावतील. आणि विश्वातील एकूण ताऱ्यांची संख्या पृथ्वीवरील सर्व सागरकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांच्या बेरजेइतकी भरेल. जगातील समग्र द्रव्याच्या तुलनेत पृथ्वीचे परिमाण असे अतिशय क्षुद्र आहे. हे अतिविशाल तारे अवकाशात भ्रमण करीत असतात. त्यांच्यापैकी काहींचे समूह तयार होतात, आणि ते समूहानेच प्रवास करतात. परंतु बहुतेक सर्व तारे एकाकी प्रवासी आहेत. आणि ते एवढ्या अफाट अवकाशातून प्रवास करीत असतात की ते सहसा एकमेकांच्या जवळ येत नाहीत. अवकाशाला समुद्र कल्पून तारे ही जहाजे आहेत असे मानले तर दोन जहाजातील अंतर सरासरीने १०,००,००० मैलांच्यावर सहज असेल. आणि म्हणूनच एक जहाज दुसऱ्या जहाजाच्या हाकेच्या टप्प्यात क्वचित येते. अशा प्रकारची एक अतिशय विरळ घटना अदमासे दोन अब्ज वर्षांपूर्वी घडून आली. आपल्या सूर्याजवळ एक दुसरा तारा आला. त्याच्या गुरुत्वाकर्षणाने आपल्या सूर्यावर एक भली मोठी भरती (tide) आली, आणि तो दुसरा तारा आपल्या मार्गाने पुढे जायच्या आतच ती भरती फुटून तिचे शेकडो लहानमोठे तुकडे झाले. ते तुकडे सूर्यापासून फुटले खरे, पण सूर्याच्या आकर्षणाच्या बाहेर मात्र गेले नाहीत, आणि फुटून निघताना मिळालेल्या गतीमुळे सूर्याभोवती भ्रमण करू लागले. तीच आपली सूर्यमाला ! ज्यावेळी हे तुकडे फुटून निघाले त्यावेळी ते अतिशय उष्ण होते. त्यांवर जीवन जगणे अशक्य होते. पण हळूहळू ते थंड झाले, आणि कालांतराने त्यांपैकी एकावर (म्हणजे पृथ्वीवर) जीवाची उत्पत्ती झाली. हे पहिले जीव अत्यंत साधे असून प्रजोत्पादन आणि मृत्यू यापेक्षा त्यांची जीवनकृत्ये फारशी जास्त नव्हती. परंतु तो जीवनप्रवाह काळात जसजसा पुढे जाऊ लागला तसतशी त्यातील प्राण्यांची शरीररचना आणि व्यापार अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊ लागले; आणि शेवटी त्यांचे पर्यावसान धर्म, कला, विज्ञान इत्यादि गोष्टींचे स्तोम माजविणाऱ्या मानवप्राण्यात झाले आहे. __या संबंध विश्वात एक गोष्ट प्रामुख्याने नजरेत भरते आणि ती म्हणजे विश्वाचे जीवसृष्टीविषयीचे कमालीचे औदासीन्य. अव्याप्त (रिक्त) अवकाश बहुतांशी इतका थंड आहे की त्यात जीवन गोठून जाईल; आणि बहुतेक सारेच द्रव्य (matter) इतके उष्ण आहे की त्यावर जीवन जळून भस्म होईल. याशिवाय अनेक प्रकारचे विनाशकारी किरण अवकाशातून भ्रमण करीत अवकाशस्थ पिंडावर मारा करीत असतात.
या प्रतिकूल जगतात जीवनाची उत्पत्ती अपघाताने किंवा योगायोगाने (byaccident) झाली असली पाहिजे असे दिसते. प्राण्यासारखे आश्चर्यकारक यंत्र योगायोगाने उत्पन्न झाले असावे हे म्हणजे अयोग्य दिसते. पण त्यांत अशक्य असे काही नाही. आपले विश्व जर पुरेशा दीर्घकाळापर्यंत टिकले, तर आपल्याला कल्पिता येईल ती प्रत्येक घटना योगायोगाने घडू शकेल. अब्जावधि तारे अब्जावधि वर्षे अवकाशात भटकत राहिले तर सर्व प्रकारच्या घटना योगायोगाने घडू शकतील. त्यांपैकी काही ताऱ्यांच्या भोवती ग्रहमाला उत्पन्न होण्याची घटना घडून येईल हेही तितकेच निश्चित आहे.
‘मात्र गणिताने असे दिसून येते की ग्रहमालांची उत्पत्ती ही अतिशय विरल घटना आहे. शिवाय आपल्याला ज्ञात असलेला एकमेव जीवप्रकार पृथ्वीसारख्या ग्रहावरच संभवतो. त्याकरिता आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे द्रव्ये द्रव स्थितीत राहू शकतील इतकीच उष्णता होय. अशाप्रकारची समशीतोष्ण परिस्थिती संबंध अवकाशाच्या एक अब्जांश एवढ्या भागातच काय ती आहे असे स्थूल गणनेने दिसते.
‘ह्याच कारणास्तव हे विश्व आपल्यासारखे जीव उत्पन्न व्हावेत म्हणून निर्माण केले गेले असावे हे अतिशय असंभव दिसते. जीवन हा या विश्वातील एक अतिशय क्षुद्र आणि अनपेक्षित असा परिणाम दिसतो.’ (आ) विश्वाचे वय
विश्वाचे वय किती आहे हे ठरविण्यासाठी गणित इतके विराट आहे की ते अजून आपल्या आटोक्यात आलेले दिसत नाही. उलट विश्व अनादि असावे असाच संभव फार आहे. कारण अमुक एका क्षणी ते अस्तित्वात आले असे मानल्यास त्याच्या अगोदर काहीच नव्हते, आणि विश्व शून्यातून निर्माण झाले असे मानावे लागले, आणि ते अयुक्तिक दिसते. यास्तव अनादि असावे हाच तर्क बरोबर दिसतो. परंतु हा प्रश्न आपण सोडविण्यास अशक्य म्हणून सोडून देऊन फक्त सूर्यमालेचा विचार करू. सूर्यमालेच्या घटकांविषयी ज्योतिःशास्त्राने पुरविलेली माहिती, पृथ्वीच्या निरनिराळ्या थरांतून काढलेल्या प्रस्तरांपैकी पुराणमत अशा प्रस्तरांच्या वयाविषयीचे गणित, आणि उल्कांविषयीचे नवीन संशोधन या सर्वांवरून सूर्यमालेचे वय दोन ते तीन अब्ज वर्षे असले पाहिजे असे अनुमान निघते. सूर्यमालेच्या उत्पत्तीसंबंधीची वर सांगितलेली ‘भरतीची उपपत्ती’ (tidal theory) न मानली तरी ज्योतिःशास्त्रीय आणि भूस्तरशास्त्रीय गणितांच्या साह्याने पृथ्वीचे वय दोन ते तीन अब्ज वर्षे इतके असावे असेच दिसते. त्याचप्रमाणे भूस्तरशास्त्रीय संशोधनावरून असे दिसून येते की १,२०,००,००,००० वर्षांपूर्वीच्या प्रस्तरात जीवनाचे अवशेष मुळीच दिसत नाहीत. त्यावरून या ग्रहावरील जीवनाचे वय अदमासे १,२०,००,००,००० वर्षे असले पाहिजे असे दिसते. ज्यांचे मनुष्यत्व संशयित आहे अशा प्राणिजातींनाही संशयाचा फायदा देऊन मानव मानले तरी मानव जातीचे वय १०,००,००० वर्षे असावे असा अंदाज आहे. आणि नागरण (civilisation) या शब्दाचा अतिशय उदार असा अर्थ घेतला तरी ते तीनचार हजार वर्षांहून अधिक नसावे असे दिसते. (इ) विश्वाचे भविष्य आणि थर्मेडायनॅमिक्सचा दुसरा नियम
हे भूतकालाविषयी झाले. आता भविष्याकडे वळू. सूर्य सतत कमी कमी उष्ण होत आहे हे सर्वांच्या परिचयाचे आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग सध्या बराच थंड झालेला असल्यामुळे येथे वनस्पती आणि प्राणी यांच्या जीवास आवश्यक उष्णता फक्त सूर्यापासूनच मिळते. परंतु जसजसे सूर्याचे तापमान कमी होईल तसतशी पृथ्वीवर कमी उष्णता पोचेल, आणि एक काळ असा येईल की त्यावरून पृथ्वीला मिळणारी उष्णता जीवनास अपुरी पडेल. असा काळ येण्यास अजून सुमारे १२०० अब्ज वर्षे अवकाश आहे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र पृथ्वी अतिशय थंड होईल आणि तीवर असलेले जीवन थंडीने गारठून नष्ट होईल.
परंतु ही अतिदूर भविष्यात घडणार असलेली घटना घडण्यापूर्वीच एखाद्या जोतिःशास्त्रीय अपघाताने पृथ्वीवरील जीवन केव्हाही नष्ट होऊ शकेल. एखादा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ आला तर त्याच्या आकर्षणामुळे पृथ्वी ओढली जाऊन त्याच्यावर आदळेल, आणि त्या आघातामुळे आणि धूमकेतूच्या उष्णतेमुळे तिच्यावरील जीवन जळून खाक होईल. आता थंडावणाऱ्या सूर्याबरोबर पृथ्वी च्या अगोदरच दसऱ्या एखाद्या सर्यमालेच्या ग्रहावर प्रयाण करणे अशक्य नाही. परंत अशा अन्य ग्रहमाला असल्या आणि त्यांपैकी एखाद्या ग्रहावर हवा आहे असे मानले तरीदेखील तेथेही सारे जीवन नष्ट करणारी एकशक्ती विश्वात आहे, आणि ती म्हणजे थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम. या नियमाचे स्वरूप थोडक्यात असे आहे. ज्याप्रमाणे पाणी नेहमी समपातळी शोधत असते, त्याचप्रमाणे उष्णता आणि सर्व प्रकारची शक्ती (energy) यांचीही गती सर्वदा साम्यावस्थेकडे असते. ज्याप्रमाणे पाणी सखल भागांतून उंच भागाकडे नैसर्गिकपणे जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे उष्णताही कमी तापमानाकडून अधिक तापमानाकडे जाऊ शकत नाही. तिची गती सदैव उष्ण पदार्थांकडून कमी उष्ण पदार्थाकडे असते. याचा अर्थ असा की अतिदूर भविष्यात सबंध विश्वातील उष्णता (आणि इतर सर्व ऊर्जाही) सगळीकडे सारखी वाटली जाऊन साम्यावस्था निर्माण होईल. परंतु विश्वात एकंदर अवकाशाच्या मानाने उष्णता फक्त द्रव्यातच आहे, आणि तिची समान वाटणी झाल्यामुळे विश्वाचे, तापमान फारच कमी होईल, इतके की त्यावर कसलेही जीवन अशक्य व्हावे. सारांश, भविष्यात साऱ्या जीवसृष्टीचा नाश होणार हे भवितव्य निश्चित आणि अपरिहार्य आहे. (ई) जीवोत्क्रांती आणि मानव
पृथ्वीवरील सर्व जीवजाती (वनस्पती आणि प्राणी एका किंवा काही थोड्या अगदी साध्या (simple), एकपेशीय जीवांपासून क्रमाक्रमाने उत्पन्न झाल्या आहेत असे प्रतिपादणाऱ्या सिद्धान्ताला ‘जीवोत्क्रांतीचा सिद्धान्त’ (the theory of evolution) थंडावण
असे नाव आहे. जर एखादा सिद्धान्त हजारो वेळा पुनःपुन्हा सिद्ध झाला असेल तर तो जीवोत्क्रांतीचा सिद्धान्त होय असे वैज्ञानिक जगतात मानले जाते. तो नाकारणे तर राहूच द्या, पण त्याविषयी संशय व्यक्त करणेसुद्धा अशक्य आहे.
आता उत्क्रांती कशी होते ते पाहू.
अपत्ये ही आईबापांसारखी असतात हे सर्वपरिचित आहे. तसेच त्यांचे साम्य पूर्ण कधीच नसते हेही प्रसिद्ध आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक प्राण्यात (आपण सोयीकरिता केवळ प्राण्यांचा विचार करू) स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये किंवा वैयक्तिक भेद असतात. आता या वैयक्तिक भेदांपैकी काही असे असतील की ते विद्यमान परिस्थितीत जगण्यास उपकारक असतील; उलट काही भेदांमुळे जगणे अधिक कठीण होत असेल, तर काही भेद उपकारकही नसतील आणि अपकारकही नसतील.. उदा. चांगली दृष्टी, सशक्तपणा. चपळपणा इत्यादि गण जीवनोपयोगी आहेत. तर अध दष्टी. अशक्तपणात इत्यादि गण जीवनविरोधी आहेत. उलट सौंदर्याचा जीवनाशी अर्थाअर्थी काही संबंध दिसत नाही. हे एक झाले. दुसरे असे की प्राणिसृष्टीत सदैव जीवनसंग्राम, जीवनार्थ कलह
सिसश्रश षी शुळीींशपलश) चालू असतो. याचे कारण असे आहे की अन्नाची वाढ आणि प्राण्यांची वाढ यांमध्ये अन्न नेहमीच मागे राहते. अन्नाची वाढ गणितश्रेणीने होते, तर प्राण्यांची वाढ भूमितिश्रेणीने होते. अर्थात् अन्नाचा पुरवठा नेहमी मर्यादितच असतो. आणि जगण्याकरिता अन्न अपरिहार्य असल्यामुळे ते मिळविण्याकरिता प्राण्यांचा अहोरात्र झगडा चालू असतो. एवढेच नव्हे, तर कित्येक प्राणी अन्य प्राण्यांवर जगत असतात.
आता हा जीवनकलह आणि वर निर्देशिलेले वैयक्तिक भेद हे विचारात घेतले तर असे अनुमान सहज निघते की ज्या प्राण्यांचे वैयक्तिक भेद जीवनाला अपकारक असतील ते, ज्यांचे भेद अपकारक असतीलत्या प्राण्यांपेक्षा जीवनकलहात अधिक अयशस्वी होऊ शकतील. त्यांना दीर्घ आयुष्य जगता येऊन पुरेसे प्रजोत्पादन करता येईल. उलट दुसऱ्या गटांतील व्यक्तींना अल्पवयात अपमृत्यु येईल आणि त्यांना प्रजोत्पादन पुरेसे, किंवा मुळीच करता येणार नाही. आणि प्रजा ही मातापित्यांसारखी असल्यामुळे टिकून राहिलेल्या प्राण्यांची प्रजा त्यांच्यासारखीच, म्हणजे त्यांची उपकारक वैशिष्ट्ये असलेली अशी निपजेल. परंतु याही प्रजेमध्ये उपकारक, अपकारक आणि उदासीन असे भेद असतीलच, आणि म्हणून त्याही पिढीतील व्यक्तींची चाळण होईल. अशा प्रकारे प्रत्येक पिढीतील व्यक्तींची चाळण अव्याहत चालू असते. याच चाळणीला ‘नैसर्गिक निवड किंवा क्षमता (natural selection or survival of the fittest) असे नाव आहे. ही प्रक्रिया जर काही हजार वर्षे चालू राहिली तर विद्यमान परिस्थितीत जगण्याला लायक अशी नवीन प्राणी जाती हळू हळू तयार होत जाते.
वर ज्या वैयक्तिक भेदांचा उल्लेख केला आहे. त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावरचे बदल प्राण्यांमध्ये मधूनमधून आकमिस्मकपणे होत असतात. त्यांना “mutations’ असे नाव आहे. हे बदलही विद्यमान परिस्थिथीत जगण्याला उपकारक, अपकारक किंवा उदासीन असतील. अर्थातच पहिल्या प्रकारचे भेद नैसर्गिक निवडीत टिकून राहतील, आणि दुसऱ्या प्रकारचे बदल वगळले जातील. म्यूटेशन्स का होतात हे कोडे आहे. परंतु ती झाली ण्हणजे ती जर उपकारक असतील तर नवीन प्राणिजाती निर्माण होण्याची प्रक्रिया त्वरेने घडते.
सारांश, अपत्ये आणि मातापितरे यांचे साम्य, प्रत्येक पिढीतील प्रजेचे वैयक्तिक भेद, जीवनकलह, आणि म्यूटेशन्स या गोष्टी मान्य केल्या की प्राणिसृष्टीत बदल होणार, आणि काही प्राणिजाती (species) नष्ट होऊन नवीन जाती निर्माण होणार हे अटळ आहे. याच प्रक्रियेला ‘जीवोत्क्रांती’ (organic evolution) असे नाव आहे. आणि याच प्रक्रियेने पृथ्वीवर १,२०,००,००,००० वर्षांपूर्वी जीवन निर्माण झाल्यानंतर असंख्य प्राणिजाती क्रमाने निर्माण होत होत, शेवटी आपण मानवप्राणी उत्पन्न झालो आहोत. (ठ) नागरणाचा (Civilisation) इतिहास नागरण म्हणजे काय या प्रश्नाच्या विशेष खोलात न शिरता, त्याचे स्थूल वर्णन आपण करून आपण पुढे जाऊ.
स्थूलमानाने बोलायचे तर नागरण म्हणजे मूल्यांची जाणीव आणि त्यांच्या जपणुकीकरिता प्रयत्न. ज्ञान, कला, न्याय, स्वातंत्र्य, समता इत्यादि मूल्यांची जाणीव जेव्हा मानवाला झाली तेव्हा त्याच्या नागरणाला सुरवात झाली असे म्हणता येईल. वर सांगितल्याप्रमाणे नागरणाचे वय जेमतेम तीनचार हजार वर्षे इतकेच आहे. या कालावधीत मानवाने नागरण कितपत प्राप्त केले आहे, आणि नागरणाची वाटचाल कशी झाली त पाहू. वन्य मानवाच्या पशुतुल्य जीवनापासून नागरित जीवनाकडे मानवाची जी काय प्रगती झाली आहे तिचे स्वरूप काय आहे ? मनुष्यास त्याच्या पाशवी पूर्वजांपासून मिळालेला जो पाशवी प्रवृत्तिसंच मिळाला आहे त्याच्याशी नागरणाची प्रगती म्हणजे एक निरंतर झगडा राहिला आहे. मानवाची बुद्धी नैसर्गिक प्रवृत्तींनी सामान्यपणे बद्ध असते. तिची वाढ किंवा विकास फार हळू होतो. प्रथम ही वाढ काही तुरळक व्यक्तींच्या ठिकाणी होते. त्यांना ज्ञान, कला, न्याय त्यांची मातब्बरी वाटू लागते, आणि ती ते बोलन दाखवितात. पण त्यांचे बोलणे समजण्याची पात्रता सामान्य माणसात नसते. आणि म्हणन त्यांना विरोध होतो. त्यांना समाजाचे शत्रू म्हणून संबोधण्यात येते आणि त्यांचा सर्वप्रकारांनी प्रतिकार केला जातो. त्यांना त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात येतो, प्रसंगी त्यांना प्राणांचे मोलही द्यावे लागते. सॉक्रेटिसला विषाचा प्याला स्वीकारावा लागला, येशू ख्रिस्ताला क्रॉसवर खिळ्यांनी ठोकण्यात आले, गॅलिलिओला तुरुंगात मरावे लागले, आणि असेच हजारो लोकांना ज्ञान, सौंदर्य, न्याय यांच्यामागे लागल्याबद्दल अत्याचार सहन करावे लागले. विज्ञान, कला आणि सामाजिक न्याय यांची प्रगती अतिशय मंद गतीने झाली आहे. एवढेच नव्हे, तर महत्प्रयासाने संपादन केलेले विजय सर्वभक्षी कालाच्या उदरात गडप झाले आहेत. सध्याही सबंध मानवजातीचा नाश करू शकणाऱ्या अणुयुद्धाची भीती मानवासमोर उभी असून, तिच्यातून आपण सहीसलामत बाहेर पडू अशी खात्री देणे अशक्य झाले आहे.
आपल्या विषयांशी संबद्ध अशा शास्त्रांनी सृष्टी आणि मानवप्राणी यांच्याविषयी उपलब्ध केलेल्या माहितीपैकी अवश्य तेवढ्या माहितीचा त्रोटक सारांश येथे संपला. तिच्या योगाने आपल्या या अफाट विश्वाच्या समग्र रूपाची आणि त्यातील मानवाच्या स्थानाची स्थूल कल्पना येऊ शकेल असे वाटते. भगवान कृष्णाने अर्जुनाला विश्वरूपदर्शन घडविले असे गीतेत म्हटले आहे. ते खरे असो वा नसो, पण काहीशा निराळ्या अर्थी एक विश्वरूपदर्शन विज्ञान आणि इतिहास यांनी आपल्याला घडू शकते. आता या विश्वरूपदर्शनाने आपल्या प्रस्तुत विषयावर काय प्रकाश पडतो ते पाहू. ईश्वराचा शोध वर सारांशरूपाने उद्धृत केलेली माहिती समग्ररूपाने मनासमोर आणली असता त्यात उद्भवणारी पहिली भावना म्हणजे भीती. कारण त्या माहितीचा भयंकर अर्थ चटकन् आणि स्पष्टपणे आपल्या ध्यानात येतो. आणि तो हाच की हे विश्व आम्हा मानवप्राण्यांकरिता उत्पन्न केले गेले असेल हे अतिशय असंभव, खरे म्हणजे अशक्य आहे. एकंदर विश्वाचा जीवन हा अतिशय क्षुद्र भाग आहे असेच म्हणावे लागते. अनंत अवकाशाच्या एका कोपऱ्यात एका चिमुकल्या मृत्पिंडावर जीवन नावाची एक अतिशय नाजूक वस्तू राहते. इतरत्र ती कोठे आहे की नाही याची आपल्याला कसलीही माहिती नाही. ज्योतिःशास्त्र सांगते की ग्रहमालांची उत्पत्ती ही विश्वाच्या इतहिासातील एक अतिशय विरळ घटना आहे, आणि जीवोत्पत्ती तर त्याहून कितीतरी अधिक विरळ घटना आहे. आणि जीवन इतके नाजूक आणि दुबळे आहे की अवकाशातील एखादा लहानसा अपघातही त्याचा संपूर्ण नाश करू शकेल. निदान सूर्य थंड झाल्यावर तरी ते थिजून नाहीसे होणार यात शंका नाही. इतर एखाद्या ग्रहावर वातावरण असेल तर त्यावर वसाहत करून हे भवितव्य काही काळ टाळता आले तरी थर्मोडायनॉमिक्सच्या दुसऱ्या नियमाच्या कचाट्यातून सुटणे मात्र केवळ अशक्य आहे. अशा स्थितीत जीवोत्पत्ती ही ईश्वरी योजना असून मनुष्यप्राणी जीवसृष्टीचा राजा आहे, आणि त्याच्याकरिताच सारे विश्व निर्माण केले गेले, आणि त्याकरिताच उत्क्रांती ही घडविली गेली हे धार्मिकांचे म्हणणे कितपत सयुक्तिक दिसते? किंवा भूस्तरशास्त्राच्या निष्कर्षांचा विचार करा.
विश्वाच्या एकंदर वयाच्या म्हणजे अनादि कालाचा कितवा हिस्सा पृथ्वीचे आयुष्य आहे ? आणि पृथ्वीच्या आयुष्यात जीवनाचे आयुष्य किती आहे ? हे कोट्यवधि अब्जावधि वर्षांचे गणित लक्षात यावयास कठीण आहे. पण ते लहान प्रमाणात कल्पिता येईल. प्राणिसृष्टीचे आतापर्यंतचे एकंदर वय शंभर वर्षे कल्पिले तर मानवजातीचे वय एक महिना भरते, आणि नागरणाचे वय सात ते आठ तास इतकेच भरते. तेव्हा हे अनादि विश्व विधात्याने अत्यल्प कालापूर्वी जन्मास आलेल्या मानवप्राण्याकरिता निर्माण केले आणि त्याकरिताच त्याचा इतिहास घडविला हे म्हणणे कितपत समंजस दिसते याचा विचार वाचकांनीच करावा.
अथवा जीवोत्क्रांतीच्या इतिहासातून काय निष्पन्न होते पाहा. ‘नैसर्गिक निवडी’चा विचार करा. जे कोणी सृष्टीच्या प्रत्यही बदलत राहणाऱ्या परिस्थितीत जगावयास आणि प्रजोत्पत्ती करावयास असमर्थ असतील त्यांचा निर्वंश होणे हा नैसर्गिक निवडीचा अर्थ आहे. काही झाले तरी जन्माला आलेल्या सर्व प्राण्यांना जिवंत राहणे आणि अपत्योत्पत्ती करणे सर्वथा अशक्य आहे, कारण पृथ्वीवरील अन्नाचा पुरवठा मर्यादित आहे; काही विशिष्ट मर्यादांच्या पलीकडे पृथ्वीची सुपीकता वाढणे शक्य नाही. उलट प्राण्यांची संख्या मात्र चक्रवाढीने वाढते; तिला स्वतःच्या अशा कोणत्याच मर्यादा नाहीत. अशा स्थितीत एकाचे पोट भरणे म्हणजे इतर अनेकांची उपासमार झालीच पाहिजे. एवढेच नव्हे. प्राणी एकमेकांवर उपजीविका करतात. सृष्टीचे हे सार्वत्रिक कमालीचे रक्तरंजित दृश्य पाहून टेनिसनचे कविहृदय कळवळले आणि त्याच्या तोंडून “Nature red in tooth and claw’ असा उद्गार बाहेर पडला, आणि वास्तविक उत्क्रांतीच्या भयानक आणि निष्ठुर इतिहासाला योग्य असे वर्णन दुसरे सापडणे कठीण आहे. यात कोठेही दैवी योजना अथवा व्यवस्था दिसते असे म्हणणे शक्य आहे काय? तसेच जीवोत्क्रांती मानवप्राणी जन्माला यावा म्हणून घडविली गेली असे म्हणणेही शक्य आहे काय ? जीवोत्क्रांती ही या ग्रहावर १२ कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेली एक प्रक्रिया आहे. तिच्या आतापर्यंतच्या इतिहासात तिला कोठेही बुद्धिमान मार्गदर्शन झाल्याचे दिसत नाही. ती एक अंधपणे चाचपडत, धडपडत चालणारी प्रक्रिया आहे. बरे, ही प्रक्रिया थांबलेली नाही; ती चालूच आहे. तिच्यातून पुढे कोणत्या नवीन प्राणिजाती निर्माण होणार आहेत ते आज कोणीच सांगू शकत नाही. मनुष्याहून अधिक बुद्धिमान प्राणी कशावरून निर्माण होणार नाहीत ? आणि तसे झाले तर मनुष्यप्राणी हा प्राणिसृष्टीचा मुकुटमणी आहे, आणि त्याच्याकरिताच ही सृष्टी ईश्वराने निर्माण केली या आपल्या तत्त्वज्ञानाची विल्हेवाट कशी लावायची ? मनुष्यांचे आत्मे अमर असून आपल्या कृतकर्माची फळे भोगण्याकरिता ते मृत्यूनंतर परलोकात प्रवेश करतात, किंवा ते कोणत्यातरी योनीत पुन्हा जन्म घेतात हे म्हणणे अजूनही सयुक्तिक दिसते काय?
जी गोष्ट उत्क्रांतीची तीच गोष्ट नागरणाच्या इतिहासाची. तो सबंध इतिहास इतका करुण आहे की त्याला थळपेव ठशरवश ने दिलेले “The Martyrdom of Man’ हे नाव अतिशय अन्वर्थक वाटते. प्रगतीचे प्रत्येक पाऊल अनन्वित हाल, अपेष्टा, छळ, दुःखे यांतून पडले आहे. त्यात ईश्वराचे किंवा अन्य कोणाचेही साह्य मानवाला झाल्याचे चिह्न दिसत नाही. उदाहरणार्थ असे पाहा की युरोपात इसवीसनापूर्वी (ग्रीक संस्कृतीच्या भरभराटीच्या तीनचार शतकांत विज्ञान, कला, तत्त्वज्ञान यांचा खरोखर जन्म झाला होता आणि त्यांनी बाळसेही धरले होते. परंतु त्यानंतर जवळजवळ बाराशे वर्षे असा काळ आला की त्यात ही सारी मृतप्राय झाली. ग्रीक संस्कृती नामशेष झाली, आणि प्रगतीचे पाऊल मागे पडले. आणि असेच भारतातही झाले आहे हे सर्वश्रुत आहे. एकंदरीने पाहता मानवाची नैतिक प्रगती अतिशय संथपणे झाली आहे. किंबहुना त्याची नैतिक प्रगती झालीच नाही असे अनेक विचारवंताचे मत आहे. मनुष्य अजून पशूइतकाच स्वार्थी राहिला आहे. त्याला भल्याबुऱ्याची, न्याय-अन्यायाची जाणीव झाली आहे, पण तिचे स्वार्थापुढे काही चालत नाही. आदिमानव आणि आजचा मानव यांत फरक आहे यात शंका नाही, पण त्याचा मूळ स्वभाव अजून फारसा बदललेला नाही. उदा. न्यायाचे प्रमुख तत्त्व समता, स्वतःइतकेच इतरांनीही महत्त्व देणे. पण हे फक्त तोंडाने त्याची फक्त जपमाल ओढण्यापुरते अस्तित्वात आहे. प्रत्यक्ष आचरण पाहिले तर स्व-पुढे अन्य कशाचीही पर्वा आढळून येत नाही. न्यायाच्या प्रस्थापनेकरिता केलेले कायदे कागदावरच राहतात; त्यांचे पालन अपवादानेच होते. भांडवलशहा आणि व्यापारी मजुरांना आणि गि-हाइकांना पिळून काढण्यात काडीचीही कसूर करीत नाहीत. समाजाच्या फार मोठ्या वर्गाला जागेपणीचा सर्व वेळ दोन जेवणे मिळविण्याकरिता राबावे लागून पशुतुल्य जिणे जगावे लागते; आणि दुसऱ्या एका अशाच मोठ्या वर्गाला दर दहावीस वर्षांनी इतर देशांतील निरपराध मानवांना जिवे मारण्यात आणि त्यांच्या हातून मरण्यात जीवनाची इतिश्री मानावी लागते. खरोखर अशा स्थितीत मानवेतिहास ईश्वरप्रेरित असून त्याच्या योजनेप्रमाणे तो प्रगत होत आहे असे कोणी म्हणाला तर तो धर्माच्या दारूने चांगलाच झिंगला असला पाहिजे असे म्हणावे लागेल. एरव्ही असे म्हणणे शाबूत डोक्याच्या कोणत्याही बुद्धिमान व्यक्तीला अशक्य आहे.
सारांश, विज्ञान आणि इतिहास यांनी आपापल्या क्षेत्रात जे ज्ञान संपादन केले आहे त्यात कोठेही ईश्वराचा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, आणि सर्वथासाधु अशा ईश्वराचा मागमूसही दिसत नाही उलट त्याचे एकंदर स्वरूप असे आहे की अशा ईश्वराचे अस्तित्व त्यामुळे अतिशयच असंभव होते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.