पाकिस्तानात १९५३ साली अहमदिया पंथाविरुद्ध धर्मवादी गटाने आंदोलन केले. या आंदोलनाचे पर्यवसान लाहोर येथे अहमदियाविरोधी क्रूर दंगली होण्यात झाले. या दंगलींची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने न्या.मू. महंमद मुनीर आणि न्या.मू. कयानी यांची नियुक्ती केली. पाकिस्तानातील धार्मिक नेत्यांना श्री. मुनीर यांनी भारतीय मुसलमानांसंबंधी एक प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर भारतीय मुसलमानांनी कसे वागावे ? सर्वांनी भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या हिताच्या विरुद्ध वागता कामा नये असे उत्तर दिलेले आहे. मौ. मौदुदी म्हणाले, भारतीय मुसलमानांनी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या विरुद्ध वर्तन करता कामा नये. त्यांची निष्ठा पाकिस्तानलाच असली पाहिजे. (पहा – Munir Report, pp.218,227-30) जे मौदुदी कालपर्यंत जमाते इस्लामीचे नेतृत्व करीत होते आणि ज्यांचे सर्व लिखाण भारतीय जमाते इस्लामी मानत असते त्यांचे हे मत (मात्र) भारतीय जमाते इस्लामीला मान्य नाही ह्यावर भारतीय जनतेने विश्वास ठेवावा अशी भारतातील जमाते इस्लामी लोकांची भाबडी कल्पना आहे.
[हमीद दलवाई यांच्या राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान , साधना प्रकाशन, पुणे, २००२) या ग्रंथातून