आयुर्वेदाच्या ऱ्हासाची कारणे बरीच असली तरी मोगल आणि इंग्रजांचे आक्रमण हा यातील एक मोठा घटक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मोगल आक्रमणापासून आयुर्वेदाचा राजाश्रय खंडित झाला तो आजतागायत पुन्हा आयुर्वेदाला पूर्णपणे प्राप्त झालेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्येदेखील आयुर्वेदाला मिळणारा वाटा हा एकंदर स्वास्थ्यावर खर्च होणाऱ्या रकमेच्या दोन ते तीन टक्केच होता. परंतु आयुर्वेदाचे खरे नुकसान झाले ते इंग्रजांच्या काळात. त्यांनी आपल्याबरोबर आपले वैद्यकशास्त्र आणले, जे आज ‘आधुनिक वैद्यक’ म्हणून ओळखले जाते. याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु याचबरोबर त्यांनी एक समज प्रचलित केला की पाश्चात्त्य विचारपद्धतीच एकमेव शास्त्रीय विचारपद्धती आहे. अन्य कुठल्याही पद्धतीने केलेला विचार हा अशास्त्रीय व त्याज्य आहे. त्यामुळे पौर्वात्य विचारपद्धतीतून निर्माण झालेली शास्त्रे त्यांनी मोडीत काढली. त्यांनी आमची शिक्षणपद्धतीदेखील स्वतःच्या स्वार्थासाठी, अर्थात् भारतावर राज्य करणे सोपे जावे म्हणून बदलवली. त्यामुळे अनेक भारतीय शास्त्रे लयाला गेली. आयुर्वेद, योग यांसारखी शास्त्रे टिकून राहिली तरी त्यांना जबर झटका बसला व परिणामस्वरूप आयुर्वेद हा अशास्त्रीय आहे, यामध्ये संशोधन नाही, याला काही वैज्ञानिक आधार नाही, यांचे ग्रंथ म्हणजे निव्वळ औषधांच्या याद्या आहेत असा प्रचार सातत्याने सुरू झाला.
१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावरही यामध्ये फारसा बदल झाला नाही. परंतु आयुर्वेदाचे व आधुनिक वैद्यकाचे शिक्षण, त्यांची विचारपरंपरा भिन्न आहे हे लक्षात न घेता त्यांना एकत्र करून एक इंटिग्रेटेड कोर्स तयार करण्यात आला. २५-३० वर्षांच्या कालावधीनंतर हा प्रयोग फसला असे लक्षात आल्याने दोन्ही वैद्यकाचे शिक्षण स्वतंत्र करण्यात आले. गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक स्तरावर आल्याने शास्त्रज्ञांचे व सामान्य जनांचे लक्ष वैकल्पिक उपचारपद्धतींकडे वळले व या वातावरणात आयुर्वेदाविषयी लोकांची व शास्त्रज्ञांची रुची वाढू लागली. त्यानंतर जागतिकीकरणाच्या दबावामध्ये ‘पेटंट’चे युग आपला प्रभाव दाखवू लागले. आपल्याला पहिला झटका बसला तो हळदीच्या पेटंटचा. भारतसरकारने युद्धपातळीवर हा मुद्दा कसा हाताळला हे आपल्याला या प्रकरणाला मिळालेल्या प्रसिद्धीवरून कळले आहेच. मात्र या प्रकरणात खरे साहाय्य झाले ते आयुर्वेदीय ग्रंथांचे. पाश्चात्त्य शास्त्र, पेटंट ऑफिस तथा न्यायालय या सर्वांनी आयुर्वेद ग्रंथामध्ये असलेली माहिती शास्त्रीय आहे हे मान्य केले व त्या आधारे हळदीचे पेटंट भारताला परत मिळाले. हीच कथा कडुनिंबाची. आयुर्वेद म्हणजे औषधांच्या याद्या असत्या तर ही पेटंट आपल्याला परत मिळाली नसती हे आपण समजून घेतले पाहिजे. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये उपलब्ध असलेली माहिती ही शास्त्रीय आहे हे लक्षात आल्याने ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या आयुर्वेदीय औषधांच्या गुणधर्माचे पेटंट कुणालाही घेता येऊ नये यासाठी भारतसरकारने डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या नेतृत्वात Traditional knowledge digital library (TKDL) हा महाकाय प्रकल्प सुरू केला व अल्पावधीतच पूर्ण केला. या प्रकल्पामध्ये वीस प्रमुख आयुर्वेद ग्रंथातील ३६ हजार श्लोकांचे सहा परकीय भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. यामध्ये शेकडो वनस्पती, औषधे, त्यांचे ग्रंथांतील गुणधर्म, रोगनाशनाचे कार्य यांचे वर्णन आहे. पेटंट हे नवीन संशोधनाला दिले जाते. परंतु हे प्राचीन संशोधनच असल्यामुळे कोणत्याही ग्रंथोक्त गुणधर्माचे पेटंट कुणालाही घेता येऊ नये यासाठी या प्रकल्पाची रचना केली गेली आहे. हजारो पदार्थांचे गुणधर्म नुसत्या निरीक्षणाने नोंदविता येत नाहीत. त्यासाठी काही मूलभूत अध्ययनपद्धतीची व प्रयोगांची आवश्यकता असते. एवढेच नव्हे तर त्यांतील काही पदार्थ एकत्र केल्यावर ते एकत्रित कुठला परिणाम मनुष्यशरीरावर घडवून आणतील हे सांगणेदेखील किती कठीण आहे हे कुठलाही शास्त्रज्ञ सांगू शकेल. शास्त्रीय अध्ययनाविना हे अशक्यच आहे. आयुर्वेदीय ग्रंथांची प्रमाणभूतता सिद्ध होण्यासाठी या प्रकल्पाचा आधार पुरेसा आहे. म्हणजेच आयुर्वेदीय ग्रंथांमधील ज्ञानाची यथार्थता आणि शास्त्रीयता याद्वारे स्पष्ट झाली आहे. ग्रंथांमध्ये सांगितलेल्या गुणधर्माची पुनःप्रचीती घेणे कुणाला आवश्यक वाटल्यास त्याने ते अवश्य करावे. परंतु ते गुणधर्म सिद्ध झाल्याशिवाय आम्ही त्याला शास्त्रीय म्हणून संबोधणार नाही ही भूमिका अशास्त्रीय ठरेल.
या शतकाच्या प्रारंभाला अजून एक घटना आयुर्वेदाला शास्त्रीय ठरवून गेली. इंग्लंडमध्ये ‘हाऊस ऑफ लॉर्डस’ने इंग्लंडमधील प्रचलित चिकित्सापद्धतींचे अध्ययन करून त्या शास्त्रीय आहेत अथवा नाहीत हे समजण्यासाठी एक समिती गठित केली. या समितीसमोर आयुर्वेदाची बाजू मांडण्यासाठी भारतसरकारने कै. डॉ. शरदिनी डहाणूकर यांच्या नेतृत्वाखाली एक तज्ज्ञ समिती इंग्लंडला पाठविली होती. या समितीशी चर्चा केल्यावर व आयुर्वेदाची माहिती करून घेतल्यावर हाऊस ऑफ लॉर्डसच्या समितीने आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकाप्रमाणेच शास्त्रीय वैद्यकाचा दर्जा दिला आहे. याच आधारावर इंग्लंडमध्ये आयुर्वेद महाविद्यालय सुरू करण्याची तयारी सुरू आहे. अमेरिकेतदेखील तेथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या वैकल्पिक उपचार पद्धतीच्या संशोधन विभागात आयुर्वेदाचे अध्ययन व संशोधनदेखील केले जाते. आम्ही तसेही वैचारिकदृष्ट्या इंग्रजांचे गुलाम असल्याने आयुर्वेद शास्त्रीय आहे हे त्यांचे मत आपण स्वीकारण्यास हरकत नसावी.
आयुर्वेदावर अजून एक आक्षेप घेतला जातो. तो म्हणजे आयुर्वेदिक त्रिदोष सिद्धान्त व त्यावर आधारलेली निदानपद्धती. दाखवा तुमचे वात, पित्त, कफ असे म्हटले की आपण जिंकलो असे अनेक लोक समजतात. संपूर्ण भारतीय चिंतनपरंपरा, विचारपद्धती पंचमहाभूत सिद्धान्तावर आधारित आहे. हा पंचमहाभूत सिद्धान्त एकदा नीट समजला की त्रिदोष, औषधांचे गुणधर्म, त्यांचे गामित्व म्हणजे ते शरीराच्या नेमक्या धातूत का व कसे जातात इत्यादी गोष्टी समजणे सोपे होते. आता आतापर्यंत ह्याला प्रत्यक्ष प्रमाण कसे शोधावे हा एक प्रश्नच होता. आपल्या पूर्वजांनी कसा विचार केला म्हणून ते या निष्कर्षाप्रत पोहोचले हे समजत नव्हते. परंतु Indian Institute of Chemical Technology हैदराबादमधील एक शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार यांनी 3D-HPTLC या प्रगत तंत्राचा वापर करून आयुर्वेदीय सिद्धान्ताप्रमाणे पदार्थ व औषधांचे प्रमाणीकरण करण्याची पद्धत शोधून काढली आहे. म्हणजे त्या पदार्थांतील पंचमहाभूतांचे प्रमाण, त्यांचे रस, गुण, वीर्य, विपाक, तो कुठल्या दोषावर काम करतो इत्यादी माहिती हे तंत्र अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने सांगते. सध्या याचे पेटंट घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रारंभिक स्थितीत असला तरी हा एक वेगळा प्रयत्न आहे हे निश्चित. आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान करण्यासाठी C-DAC आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे या दोन्ही ठिकाणी सॉफ्टवेअर तयार झाली आहेत. त्याच्या वापराचे प्रयोग सुरू आहेत.
आयुर्वेद हा ग्रंथाधिष्ठित आहे, त्यामध्ये प्रगतीची सोय नाही असाही एक आक्षेप आयुर्वेदावर घेतला जातो. परंतु ज्याने चिकित्सक बुद्धीने आयुर्वेद ग्रंथाचे परिशीलन केले आहे त्याला हा आक्षेप खोटा आहे हे ताबडतोब लक्षात येईल. परंतु एवढा खटाटोप कोण करेल ? त्यापेक्षा आपली मते ठोकून देणे जास्त सोयीचे आहे. आयुर्वेदीय संहितांची एकूण रचना बघितली तर त्यामध्ये चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगसंग्रह व अष्टांगहृदय, त्यानंतर रसशास्त्रावरील ग्रंथ, त्यानंतर वनस्पतीविषयक निघंटूची रचना, आयुर्वेद-ग्रंथांवरच्या टीका अशी चढत्या क्रमाने प्रगतीच्या दिशेने शास्त्राची वाटचाल झालेली दिसते. निघंटूंची रचना तर आजतागायत सुरू आहे. अष्टांग आयुर्वेद आज प्रत्यक्षात सोळा अंगांमध्ये शिकविला जातो हे प्रगतीचे लक्षण नाही काय? TKDL मध्ये जवळजवळ ४६ हजार कल्पांची नोंद आहे तरीही वैद्यांचे नवीन कल्पांचे प्रयोग व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात सुरूच आहेत. बाजारात नवीन येणारी आयुर्वेद औषधे याच प्रगतीचा परिपाक आहेत. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये ज्याचा उल्लेख नाही अशा रोगांना अनुक्त रोग म्हणतात. अशा रोगांचा विचार कसा करावा याचे मार्गदर्शन चरकाचार्यांनी करून ठेवले आहे. त्याचा विचार करून आयुर्वेदाच्या पद्धतीने त्यांचा विचार कसा करावा यावर ग्रंथ निर्माण झाले आहेत. ही प्रगती नव्हे काय?
‘आयुर्वेदात संशोधन’ हा शब्दप्रयोगच काही लोकांना चुकीचा वाटतो. परंतु आयुर्वेदाच्या सुदैवाने जगभरातील शास्त्रज्ञांना हे मत अमान्य आहे. भारतसरकारनेही Indian Council of Medical Research च्या धर्तीवर सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद अॅण्ड सिद्ध (CCRAS) ची स्थापना केली आहे. याद्वारे आयुर्वेदामध्ये संशोधन सुरू असते. CSIR व ICMR द्वाराही अनेक शोधप्रकल्प राबविले जातात. परंतु हे सर्व संशोधन आयुर्वेद आधुनिक विज्ञानाच्या भाषेत समजण्यासाठी खर्च होते. आयुर्वेदामध्ये कुठलीही भर त्यामुळे पडत नाही. खरे म्हणजे संशोधन हे शास्त्रात भर पाडण्यासाठी असते. आयुर्वेदाच्या संशोधनामध्ये आयुर्वेदात भर पडणे अपेक्षित आहे. एक साधे उदाहरण घेऊ. गुळवेल या वनस्पतीवर हजाराच्या जवळ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. परंतु त्यामुळे आयुर्वेदाच्या ग्रंथात वर्णन केलेल्या गुळवेलीच्या माहितीमध्ये कवडीचीही भर पडलेली नाही. भविष्यात जर गुळवेलीच्या गुणधर्मात २-४ गुणधर्मांची भर पडली तर वैद्यवर्गाला आनंदच होईल. आयुर्वेदातील अनेक औषधे ही curative नसून preventive असतात. उदाहरणार्थ द्राक्षासवाचा एक पाठ हृदयाला हितकर आहे व हृदयरोग होऊ नये म्हणून वापरला जातो. हे आपल्या ‘अशास्त्रीय’ पूर्वजांनी कसे शोधून काढले कोण जाणे कारण औषधाने एखादा रोग बरा होतो हे सांगण्यापेक्षा एखाद्या औषधाच्या नित्य सेवनाने एखादा रोग होणार नाही हे सांगणे कठीण आहे. परंतु मला याची शहानिशा करावयाचा असल्याने मी फ्रान्समधील बर्गंडी विद्यापीठाच्या वाइन रीसर्च इन्स्टिट्यूट बरोबर काम केले व त्यामध्ये ‘रिस्व्हेरेट्रोल’ नामक एक पदार्थ जो हृदयाचे रक्षण करतो, उपस्थित असतो हे सिद्ध केले. यावर शोधपत्रदेखील प्रसिद्ध झाले आहे. आयुर्वेदीय औषधांमध्ये याही प्रकारे संशोधन होऊ शकते.
कुठलेही शास्त्र स्वतंत्रपणे, एकटेच प्रगती करू शकत नाही. जसे आजच्या आधुनिक वैद्यकातील यंत्रे ही भौतिकशास्त्राच्या प्रगतीमुळे आज आपल्याला उपलब्ध आहेत तर औषधे ही रसायनशास्त्राच्या प्रगतीमुळे. अशा शास्त्रांना समकालीन शास्त्रे म्हणतात. आयुर्वेदाच्या दीर्घ वाटचालीत कुठल्या काळामध्ये कुठल्या समकालीन शास्त्राने आयुर्वेदाचे कसे उपबृंहण केले याचा जर आपण अभ्यास केला तर आयुर्वेद अधिक चांगल्या तऱ्हेने समजण्यास मदत होईल. नागपुरातील डॉ. सौ. संयुक्ता गोखले यांनी आयुर्वेदामध्ये वेळोवेळी गणिताचा जो वापर झाला त्यावर संशोधन केले आहे व अर्वाचीन गणिताचे नियम आयुर्वेदामध्ये कसे लागू होतात हेदेखील दाखवून दिले आहे. सध्याच्या आधुनिक विज्ञानाच्या सर्व शाखा वर्तमान आयुर्वेदाच्या समकालीन आहेत. त्यामुळे आयुर्वेदाच्या प्रगतीसाठी त्यांचाही उपयोग करून घेण्यास हरकत नाही. तसा आधुनिक वनस्पतिशास्त्राचा चांगला उपयोग सध्या आयुर्वेदाला होतो.
सर्वसाधारणपणे आधुनिक वैद्यकीय तज्ज्ञांकडून आयुर्वेदावर टीका दोन कारणांनी केली जाते. त्यापैकी पहिले कारण म्हणजे एकच विचारपरंपरा वैज्ञानिक आहे हा गैरसमज व दुसरे म्हणजे आयुर्वेदाविषयी अज्ञान अथवा आकस. परंतु याला अपवादही बरेच आहेत. स्वातंत्र्यपूर्वकाळात डॉ. गद्रे यांनी अष्टाङ्गहृदयाचे सांगोपांग अध्ययन करून त्याचे सुंदर मराठी भाषांतर केले, डॉ. घाणेकरांनी सुश्रुतसंहितेच्या शारीरस्थानाचे केलेले इंग्रजी भाषांतर प्रसिद्धच आहे. डॉ. शरदिनी डहाणूकरांची पुस्तकेदेखील चांगली आहेत. भारतामध्ये न्युक्लिअर मेडीसीनची रुजुवात करणाऱ्या डॉ. लेल्यांनीदेखील आयुर्वेद व मॉडर्न मेडीसीनचा तुलनात्मक अभ्यास करून पुस्तक लिहिले आहे. गेल्या दोन वर्षात प्रसिद्ध हृदयशल्यविशारद डॉ. वेलायुधन यांनी चरकसंहितेचा अभ्यास करून The legacy of Charvaka या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. तर मुंबईचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पालेप यांनी आयुर्वेदाचे सिद्धान्त आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. आज खरी गरज आहे ती आयुर्वेदाकडे निकोप दृष्टीने बघण्याची. याच विचारपरंपरेतून निर्माण झालेल्या योगाला सर्व जगाने आत्मसात केले आहे हे आपण विसरता कामा नये. यानंतर पाळी आयुर्वेदाचीच आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.