होमिओपॅथीचे बिंग फोडल्याबद्दल लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकाचे आभार. परंतु अशीच काहीशी परिस्थिती आयुर्वेदाची आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील ८०% लोक रोगप्रतिबंधासाठी वैकल्पिक उपचारपद्धती वापरतात. त्यांपैकी आयुर्वेद एक महत्त्वाची उपचारशाखा असल्यामुळे या विषयाला विशेष महत्त्व आहे. सामाजिक आरोग्याच्या विषयावर प्रबोधन करणे हे डॉक्टरांचे कर्तव्यच असल्यामुळे हा लेखनप्रपंच केला आहे. आमच्या ज्ञानशाखेला ‘ॲलोपॅथी’ असे चुकीचे नाव पडले आहे. रोगाच्या परिणामांच्या विरुद्ध परिणाम घडविणारे उपचार (रोगाचे कारण न शोधता) करणे म्हणजे ॲलोपॅथी होय. वैज्ञानिक वैद्यक ॲलोपॅथीपेक्षा भिन्न आहे. वैज्ञानिक वैद्यकाचा एक भाग ‘लक्षणांवर आधारित उपचार’ (सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट) आहे. उदा. ताप आल्यावर डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, अतिसार झाल्यावर क्षारसंजीवनी देणे, बेगॉन प्यायल्यावर ॲट्रोपिन देणे, इत्यादींचा त्यात समावेश होतो. “निरोगी माणसात रोगाच्या लक्षणांसारखी लक्षणे निर्माण करणाऱ्या पदार्थाने रोग बरा होतो’. या होमिओपॅथीच्या तत्त्वांपेक्षा भिन्न असल्यामुळे ‘वैज्ञानिक वैद्यक हे फक्त ॲलोपॅथीच आहे’. असा गैरसमज होतो. वैज्ञानिक वैद्यकामध्ये रोगाच्या कारणांचाही शोध घेतला जातो.
आयुर्वेदाविषयीचे आक्षेप पुढे क्रमवार दिलेले आहेत.
१) डॉक्टर आणि केमिस्टः आयुर्वेद आणि इतर पॅथीचे समर्थक हिरिरीने सांगतात की त्यांच्या औषधांचे प्रभाव शास्त्रीय चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले आहेत. औषधांची निव्वळ नावे माहिती असणे डॉक्टरला पुरेसे नाही. अशा यादीला फार्माकोपिया म्हणतात. औषधाचा प्रभावही आयुर्वेदिक सिद्धान्तानुसार हवा. औषधाचे गुणधर्म आणि त्याचे शरीरावर प्रभाव होण्याचे कारण इत्यादींचे ज्ञान फार्माकॉलॉजीमध्ये मिळते, तर याशिवाय शरीररचना, रोगोद्भव, रोग आणि शरीराची वर्तणूक, इत्यादी सर्व विषयांचे ज्ञान डॉक्टरला असते. आयुर्वेदात उल्लेखिलेले एखादे औषध रुग्णांना उपयुक्त ठरले तरी ते ‘आयुर्वेदिक’ ठरण्यासाठी औषधाच्या कार्याचे तसेच रोगोद्भवाचे आयुर्वेदिक सिद्धान्त सिद्ध होणेही आवश्यक आहे. उदाहणार्थ, समजा आयुर्वेदात उल्लेखिलेल्या ‘क्ष’ रोगावर आयुर्वेदात उल्लेखिलेले ‘य’ हे औषध प्रभावी ठरले तरी ते औषध ‘आयुर्वेदिक’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी दोन मुद्द्यांची स्वतंत्रपणे शहानिशा करणे आवश्यक आहे. पहिले म्हणजे ‘क्ष’ हा रोग आयुर्वेदिक शरीरविकृतिशास्त्रानुसार (पॅथॉलॉजी) होत असल्याच्या दाव्याचे साधार विवेचन झाले पाहिजे, उदा. रोगाची तीव्रता आणि त्रिदोषांचे असंतुलन एकमेकांशी प्रमाणबद्ध असणे. दुसरी अट अशी की ‘य’ या औषधाचा परिणाम आयुर्वेदिक औषधशास्त्रानुसार असला पाहिजे. आयुर्वेदिक त्रिदोष पद्धतीच्या आधारे एकाही रोगाचे स्पष्टीकरण होत नसल्यामुळे आयुर्वेद एक फार्माकोपिया उरतो. आयुर्वेदिक संशोधनांमध्ये औषधे आयुर्वेदातील असली तरी आधुनिक मापदंडांच्या निकषांवरच गुणवत्तेचा दावा केला जातो. उदा. हिमोग्लोबिन, रक्तदाब इत्यादींतील सुधारणा. (असा युक्तिवादही होमिओपॅथीविषयी करता येत नाही कारण त्यांनी उल्लेखिलेल्या द्रव्यांचे औषधी गुणधर्म वैज्ञानिक चाचण्यांमध्ये सिद्धच होत नाहीत. बिचारे होमिओपॅथ नशीबवान आहेत.) बोकडाचा बळी दिल्याने कमजोरी बरी होण्याचे कारण गरीब रुग्णाला बोकडातून ब जीवनसत्त्व मिळून ॲनिमिआ बरा होणे असेल तर श्रेय मांत्रिकाला नसावे, कारण रोगोद्भवाची कारणमीमांसा, उपचारांचे गुणधर्म इत्यादींची मांत्रिकाची मांडणी चूक असते.
२) बौद्धिक चाचेगिरीः तहान, भूक आणि लघवी वाढल्यास मधुमेहाची केवळ शंका येऊ शकते. मधुमेहाचे ठाम निदान रक्त आणि लघवीतील साखरेवरूनच होते. मधुमेह ‘बरा’ करण्याचे महान दावे करणाऱ्या आयुर्वेदानुसार साखर मोजणारी फोलिनवू पद्धत चांगली की ग्लूकोज ऑक्सिडेज? की नाडीपरीक्षेचे अचाट दावे करणारे वैद्य उपकरणांशिवाय रोगाचेही मापन करीत? प्रमाणीकरण नसलेल्या गुंज/शेर अशा एककांमध्ये मधुमेहाचे मापन होईल काय? मुळात साखरेचे ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज असे रासायनिक वर्गीकरण ज्ञात होते काय? त्यांच्या मापनातील ॲस्कॉर्बिक आम्ल, युरिक आम्ल यांचे अडसर ज्ञात होते काय? या सर्व प्रश्नांची नकारार्थी उत्तरे मिळत असल्यामुळे आयुर्वेदाचा दावा खोटा असल्याचे सिद्ध होते.
जसे युरेनस, नेपच्यून, प्लूटो, पॉसिडॉनचा शोध लागण्याआधी देशी-विदेशी ज्योतिष्यकलांनुसार त्यांचा मानवावर परिणाम होत नसे, शोध लागल्यावर मात्र त्यांनाही मानाचे स्थान मिळाले. त्याचप्रमाणे चषयाचाही शोध न लागलेल्या वेदकालीन औषधांमध्ये सूक्ष्मदर्शकातूनही न दिसणाऱ्या विषाणूंना नाशक पदार्थांचे उल्लेख सापडतात हे आश्चर्यकारक आहे. की हे पदार्थ काही रोगांमध्ये कसे उपयोगी पडतात याचे आयुर्वेदात ‘ज्ञान’ नाही? ‘कॅन्सर’ या शब्दाचे नेमके कर्करोग हे शाब्दिक भाषांतर आयुर्वेदात कसे? निर्जन्तुकीकरणाची विविध आधुनिक रसायने न वापरता जंतुसंसर्ग बरा करणे आयुर्वेदाला जमेल काय? प्रेशर कुकरचा शोध न लागलेल्या काळात लिहिलेल्या वेदांमध्ये ऑटोक्लेव्हचाही उल्लेख आहे का? विमानाआधी सायकलचा शोध लागतो.
विज्ञानाशी स्पर्धा करणारी स्वतंत्र वैद्यकीय उपचारशाखा असे अस्तित्व मिळविण्यासाठी स्टेथोस्कोप, ब्लडप्रेशर यंत्र, क्ष किरण आणि विविध रासायनिक चाचण्यांशिवाय रोगनिदान आणि रोगोपचार करू शकणे आयुर्वेदाला आवश्यक आहे. ते आयुर्वेदाला शक्य नाही. पदार्थांचे औषधी गुणधर्म अथक परिश्रमांनी नोंदणाऱ्यांचे विज्ञान ऋणी राहील. परंतु विज्ञानाच्या कुबडीवर आयुर्वेदाला स्वतंत्र उपचारपद्धती अशी मान्यता मिळणे चूक आहे. याउलट आयुर्वेदातील याद्यांचा विज्ञानाला फायदा होईलच असेही नाही. काही उपयोगी आणि काही घातक अशा पदार्थांची यादी तपासण्यापेक्षा नव्याने सुरुवात करणेसुद्धा विज्ञानाला शक्य आहे. आयुर्वेदातील उपयुक्त औषधांचा शोध विज्ञानाला नव्याने, चुकतमाकत लागेलच. तरीही आयुर्वेदात उल्लेखिलेल्या ज्या पदार्थांचा फायदा सिद्ध होईल ते आधुनिक वैद्यकात वापरले जातातच. रक्ताची गुठळी होण्यास प्रतिबंध करणारे एक प्रभावी औषध हिरुडिन, जळवांच्या लाळेमध्ये सापडते. अफूचा वेदनाशामक म्हणून वापर मान्यताप्राप्त आहे. सर्पगंधा वनस्पतीपासून मिळणारे रिसर्पिन हे औषध उच्च रक्तदाब आणि काही मानसिक रोगांसाठी वापरले जाते. परंतु म्हणूनच आयुर्वेदात उल्लेखिलेले पण वैज्ञानिक चाचण्यांमध्ये सिद्ध न झालेले पदार्थ वापरण्याचे, ग्रंथप्रामाण्य अयोग्य आहे.
हळद, कडुनिंब इत्यादी वनस्पतींमध्ये जंतुनाशक गुणधर्म असले तरी त्यांचा फारसा उपयोग नसतो. जीवाणूंमध्ये औषधांना प्रतिरोध निर्माण होतो. त्यावर मात करण्यासाठी औषधाचे रासायनिक स्वरूप बदलावे लागते. रसायनशास्त्राचे अतिप्रगत ज्ञान असल्याशिवाय उपचारपद्धती स्वयंपूर्ण नसते. आयुर्वेदात जीवाणूंचे अस्तित्वही अज्ञात आहे. जीवाणूंवरील औषधांच्या परिणामाची चर्चाही आयुर्वेदात शक्य नाही.
३) निराधार सिद्धान्तः आयुर्वेदातील केवळ औषधेच निराधार आहेत असे नाही. त्यातील रोगोद्भव, रोगोपचार इत्यादींचे सिद्धान्तही भयंकर आहेत. पूर्वजन्मातील पापाची शिक्षा म्हणून पाप्म या वर्गीकरणाखालील रोग होतात. शासन आणि शिस्तपालनाच्या मूलभूत तत्त्वानुसार कोणत्या गुन्ह्यासाठी शिक्षा मिळते आहे त्याचे गुन्हेगाराला ज्ञान देणे आवश्यक आहे. पुनर्जन्मच आठवत नाही त्याला गुन्हा कसा आठवेल? गुन्हा करण्याआधी गुन्हेगाराला पकडल्यास पोलिसांचे विशेष कौतुक होते. मग गुन्हा घडल्यावरसुद्धा साठ, सत्तर वर्षे सर्वशक्तिमान जगन्नियंता का थांबतो? देवाची इच्छा म्हणून उद्भवलेले रोग बरे करण्याचा प्रयत्न कसा केला जाऊ शकतो? या तत्त्वज्ञानातून रोग, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, जातिभेद अशा समाजविघातक संकल्पनांना खतपाणी मिळते आणि जनमत दैववादी बनते.
उष्ण आणि शीत पदार्थ हे वर्गीकरण तर उष्मागतिकी (थर्मोडायनामिक्स)च्या नियमांची ऐशीतैशी करते. दूध आणि मासे एकत्र खाऊ नयेत याला आधार काय? कफ, पित्त, वात, या त्रिदोषांचे शाब्दिक अर्थ घेणे तर बालिश ठरेल, कारण शरीरात कोणताही वायू जमलेला नसूनही सांधेदुखीपासून ते अनेक मानसिक आजारांना ‘वात’ म्हणतात. तर मग या पदार्थांचे स्वरूप काय, त्यांचे रासायनिक सूत्र काय, त्यांचे मापन कसे केले जाते, अशा मूलभूत प्रश्नांचे उत्तर आयुर्वेदिक सिद्धान्तांमध्ये नाही.
‘पोटात आग लागल्यासारखे दुखून उलटी होणे’ याचा अगदीच कमीवेळा पित्ताशयाशी संबंध असतो. त्याला बहुदा मानसिक तणाव, मसाले किंवा हेलिकोबॅक्टर पायलोरी जंतू कारण असतात, त्याचे पूर्वीच्या काळी चुकून आम्लपित्त असे नामकरण झाल्याचे गृहीत धरले तरी अजूनही त्यावर ‘पित्तशामक औषधेच का दिली जातात? मलेरिया दूषित हवेमुळे होतो असे वाटल्यामुळे त्याचे तसे नाव पडले. आता मात्र मलेरियाच्या रुग्णाला शुद्ध हवेचे डोस दिले जात नाहीत.
शरीरातील प्रतिकारक्षम पांढऱ्या रक्तपेशींचे ज्ञान नसल्यामुळे ॲलर्जीची संकल्पना आयुर्वेदात असणे शक्यच नाही. त्यामुळे ‘कफ प्रवृत्ती बळावते’ हे सर्दीचे एक कारण असल्याचा आयुर्वेदात समज आहे. ज्या पदार्थाची ॲलर्जी असेल तो टाळून इतर सर्व पदार्थांचे सेवन सुरक्षित असते. आंबट पदार्थ सेवन केल्याने सर्दी होते हा दावा निराधार आहे. कफ हे सर्दीचे कारण नसून लक्षण आहे हेसुद्धा ज्ञान नसलेला हा सिद्धान्त असफल आहे. त्वचेच्या ॲलर्जीला मात्र पित्त असे संबोधिले जाते. वास्तविक ही दोन्ही एकाच रोगाची लक्षणे आहेत. ‘फक्त रोगलक्षणांवर मलमपट्टी न करता आम्ही रोगावर समूळ उपचार करतो’ हा आयुर्वेदाचा पोकळ डौल आहे.
४) इतिहासाची साक्षः स्थिर समाजात जन्म आणि मृत्यूंचे दर समान असावे लागतात. ते दोन्ही कमी असणे आदर्श असते. त्याला लो स्टेशनरी लोकसंख्या म्हणतात. परंतु गेल्या हजारो वर्षांमध्ये भारतात लोकसंख्या हाय स्टेशनरी होती. बालविधवा, बिजवर या समस्या भारतात होत्या. सरासरी आयुष्यमान चाळीसपेक्षा कमी होते. पूर्वीचे लोक ऐंशीव्या वर्षीसुद्धा खणखणीत असल्याचे दावे करण्याआधी अशा वृद्धांची किती तान्ही भावंडे दगावली याचा शोध घ्यावा. गेल्या दोनशे वर्षांत आयुर्वेदाची वाढ झालेली नसून केवळ विज्ञानाच्या वाढीमुळे सरासरी आयुष्यमान साठीपर्यंत पोचले आहे. पेनिसिलीन, टिटॅनस टॉक्सॉईड, अर्गोमेट्रिन इत्यादी वैज्ञानिक औषधांनी कोट्यवधींचे आयुष्य वाढविले आहे. सामान्य, गरीब लोकांचे सोडा पण शिवाजी महाराजांचा अल्सरेटिव्ह कोलायटिस, थोरल्या माधवरावांचा राजयक्ष्मा आणि लोकमान्यांचा मधुमेह, हे रोग आयुर्वेदाने बरे करता आले असते तरी इतिहास बदलला असता.
वैज्ञानिक वैद्यकाचा इतिहासही फारसा रोमहर्षक नाही. किंबहुना प्रबोधनकाळापूर्वी जे काही उपचार चालत ते अघोरीच असत. ग्रीकांची चतुर्दोष पद्धती आयुर्वेदिक त्रिदोष पद्धतीसारखीच आहे. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राने ग्रीक उपचारपद्धतींशी नाळ तोडून आधुनिकतेची कास धरल्यामुळेच त्यांची प्रगती झाली. ‘डॉक्टरांनी आपली विद्या गुरूंच्या मुलांना फुकट शिकवावी, गर्भपात करू नये.’ ही आधुनिक वैद्यकाचा जनक समजल्या जाणाऱ्या हिप्पोक्रॅटिसची मतेही आज नाकारलेली आहेत. गॅलेनच्या चुकासुद्धा विज्ञानाने दाखविल्या आहेत. परंतु ‘चरक आणि सुश्रुत यांचे लिखाण’ अशी आयुर्वेदाची व्याख्या साचेबंद असल्यामुळे त्यामध्ये सुधारणा केल्यास त्यांचा अपरिवर्तनीय आयुर्वेदात समावेश करता येणार नाही. शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याची औषधे नसल्यामुळे बलदंड व्यक्तीने रुग्णाला धरावे असे सुश्रुत सुचवितो. किती आयुर्वेदिक डॉक्टर स्वतःसाठी आयुर्वेद आचरतील?
विज्ञान चुकांतून शिकते. आज वैज्ञानिक समजले जाणारे उपचार अधिक चांगल्या चाचण्यांमध्ये अवैज्ञानिक ठरले तर ते टाकून देण्यात येतील. ‘ते उपचार वैज्ञानिक नाहीत’ असे जाहीर करण्यात येईल. ग्रंथाधिष्ठित आयुर्वेदामध्ये अशी सोय नाही. आयुर्वेदिक डॉक्टरांना ‘बॅचलर ऑफ आयुर्वेदिक सायन्स’ ही पदवी मिळते. परंतु आयुर्वेदात विज्ञान किती सापडते या प्रश्नाचे उत्तर निराशाजनक आहे. ‘आयुर्वेदात संशोधन’ हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. आयुर्वेदात जितकी माहिती आहे तिचा वापर म्हणजे आयुर्वेदिक वैद्यक होय. त्या माहितीच्या आधारे कोणी संशोधन करून वैज्ञानिक ज्ञान मिळविले तर त्या ज्ञानाचा अंतर्भाव वैज्ञानिक वैद्यकात होतो. ब्रह्मयाकडून चरकाकडे आलेल्या दैवी ज्ञानात बदल केल्यास आयुर्वेद संपतो. ॲस्पिरिनचा शोध लागून शंभरी लोटली तरी संशोधन चालूच असते. दाव्याची, सिद्धान्ताची वारंवार तपासणी आवश्यक असते.
अर्थात चुकीच्या सिद्धान्तांवर आधारित अशी अनेक आयुर्वेदिक औषधेही चुकीचीच आहेत. अनेक औषधांमध्ये पारा, शिसे अशा मूलद्रव्यांचे घातक प्रमाण आढळते. रसायनांवर कोणतेही संस्कार केले तरी त्यातील मूलद्रव्ये बदलत नाहीत हा रसायनशास्त्राचा मूलभूत नियमच आयुर्वेदाला मान्य नाही. बाबा वाक्यं प्रमाणम् ही वृत्ती समाजाला घातक आहे.
वैकल्पिक उपचारपद्धतींना वैज्ञानिक, आधुनिक वैद्यकाच्या अभ्यासक्रमात (न्याय्य असेल तेवढे) स्थान देण्याचा केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी उपलब्ध असलेले संपूर्ण ज्ञान वैज्ञानिक वैद्यकाच्या ज्ञानशाखेत जमा होईल आणि एकापेक्षा अधिक प्रकारचे वैद्यकीय शिक्षण देण्याची गरजच नष्ट होईल. जर एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला अत्याधुनिक ज्ञानासोबतच आयुर्वेदातील उपयुक्त ज्ञान असेल तर केवळ आयुर्वेदाचे ज्ञान असेलला डॉक्टर अनावश्यक होईल आणि सर्व रुग्णांना अधिक फायदा होईल.
‘आमच्या देशात पूर्वी सोन्याचा धूर निघत असे आणि अणुबाँबपासून रॉकेटपर्यंत सर्व शोध आमच्या बापजाद्यांनी लावले’ ही भावना नक्कीच सुखकर आहे. परंतु या अफूच्या गोळीखाली धुंद होऊन वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना काळ माफ करणार नाही. भारताला महासत्ता बनविण्याची स्वप्ने बघणाऱ्यांसाठी असे प्रश्न हा एक धोक्याचा इशारा आहे.