प्रास्ताविक:
M.B.B.S.च्या अभ्यासक्रमात रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र नावाचा विषय आहे. याच विषयाला इंग्रजीमध्ये प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडीसीन असेही संबोधण्यात येते. दंतवैद्यक, होमिओपॅथी, आयुर्वेद, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, सार्वजनिक आरोग्य परिचारिका पदवी व पदविका अभ्यासक्रम ह्यांसारख्या वैद्यक व पूरक अभ्यासक्रमातही हा विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे. समाजशास्त्र, गृहशास्त्र, आहारशास्त्र, पोषणशास्त्र, रुग्णालय व सार्वजनिक आरोग्य-प्रशासन, व्यवसाय-आरोग्य, आरोग्य-शिक्षण अभ्यासक्रम, आरोग्य-कर्मचारी-अभ्यासक्रम, स्वच्छता-निरीक्षक-अभ्यासक्रम ह्यांसारख्या विद्यापीठांतर्गत व विद्यापीठाबाहेरील इतरही बऱ्याच अभ्यासक्रमांत रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र हा विषय अंतर्भूत करण्यात आलेला आहे. वर नमूद केलेल्या बहुतेक अभ्यासक्रमांमध्ये हा विषय राष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून अनिवार्य विषय म्हणून शिकविण्यात येतो. अशाप्रकारे सर्वच वैद्यक व आरोग्यशास्त्रांमध्ये सर्वसमावेशक असा हा विषय आहे. या विषयाचे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणही अनेक वैद्यकीय महाविद्यालये व सार्वजनिक आरोग्य संस्था ह्यांमधून देण्यात येते.
उद्दिष्टेः
वैद्यकीय शिक्षणाचे उद्दिष्ट व्यक्ती, कुटुंबाच्या व समाज ह्या सर्वांना प्राथमिक आरोग्य-सेवा देणारा प्रथम संपर्क वैद्यकव्यवसायी निर्माण करणे हे होय. रुग्ण, कुटुंब किंवा समुदाय त्यांच्या आरोग्यव्यवस्थेशी प्रथम संपर्कामध्ये पदवीप्राप्त वैद्यकव्यावसायिकाने रुग्णाला प्राथमिक रोग प्रतिबंधात्मक, आरोग्य-संवर्धक, उपचारात्मक व पुनर्वसनात्मक आरोग्य वैद्यक सेवा देता येणे अपेक्षित आहे. मूलभूत व प्राथमिक आरोग्य सेवा योग्य तऱ्हेने देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये काही मूलभूत कौशल्ये विकसित व्हावीत यादृष्टीने वैद्यकीय शिक्षणाची रूपरेषा ठरवली असते. विविध वैद्यकीय विषयांमार्फत संबंधित ज्ञान व कौशल्ये शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे अपेक्षित आहे. मानवी शरीररचना व क्रियांच्या अभ्यासापासून ते रोगनिदान व रोगोपचाराच्या अभ्यासापर्यंत अनेक विषयांमधून वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यास होतो. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या उदयापासून रोगनिदान व रुग्णोपचार हा वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय सेवांचा गाभा राहिला आहे. औषध वैद्यकशास्त्र, शल्यक्रियाशास्त्र, स्त्रीरोगशास्त्र हे मूळ विषय व या विषयांशी संबंधित इतर विषयांमध्ये रोगनिदान व रोगोपचाराच्या विविध पद्धतींविषयी ज्ञान व कौशल्ये विकसित केली जातात. वैद्यक-व्यावसायिकांची जबाबदारी ही फक्त व्यक्तिगत रुग्णांपुरतीच मर्यादित नसून समुदायाचे आरोग्य हाही त्याच्या कार्यकक्षेचाच एक भाग आहे, हे लक्षात आल्यामुळे रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यक या तुलनेने नवीन विषयाचा उदय झाला. रुग्णालय व रुग्णकेंद्रित वैद्यकीय शिक्षणाच्या मर्यादा लक्षात आल्यामुळे वैद्यकीय शिक्षण हे समाजाभिमुख असावे यावर जागतिक-आरोग्य-संघटना, भारतीय आयुर्विज्ञान परिषद यांसारख्या संस्था व शिक्षणतज्ज्ञांनी शिक्कामोर्तब करून सामाजिक औषधवैद्यकशास्त्र हा विषय सर्व वैद्यकीय व संबंधित अभ्यासक्रमांमध्ये अनिवार्य विषय केला.
रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्रामध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण (एम.डी.) प्राप्त केल्यानंतर व या विषयात वैद्यकीय शिक्षक म्हणून काम करताना, ‘तुम्ही कोणत्या रोगांचे तज्ज्ञ आहात?’ असा अवघड प्रश्न आजपर्यंत अनेकांनी विचारला आहे. अनेकदा ह्या प्रश्नाला समोरे जाऊनही आजही हा प्रश्न आल्यास माझी अजूनही अवघड अवस्था होते. माझ्या अवघडलेल्या परिस्थितीची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे या विषयासंदर्भातील सर्वसामान्यांमध्ये असलेली अनभिज्ञता व उदासीनता हे आहे. सर्वसामान्यपणे विशिष्ट प्रकारच्या रोगांवर उपचार किंवा विशिष्ट प्रकारचे उपचार करणारा तो वैद्यकतज्ज्ञ असा समज सगळीकडे अस्तित्वात आहे. यात काहीही वावगे नाही. कारण वैद्यक गरजा पूर्ण करणारा तो वैद्यक व्यावसायिक हे समीकरण अर्थशास्त्राच्या गरज-पुरवठा या तत्त्वावर आधारित आहे. आजारांचे निदान व त्यावर उत्कृष्ट उपचार हीच समाजाची मूलभूत गरज असल्यामुळे हा प्रश्न निर्माण होणे यात काहीही अयोग्य नाही. माझ्या अवघडलेल्या परिस्थितीचे दुसरे कारण म्हणजे ‘तुम्ही कोणत्या रोगांचे तज्ज्ञ आहात ?’ या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर आजही माझ्याकडे नाही. नियमित योगासने करणाऱ्या व्यक्तीला ‘तुम्ही कोणत्या आजारांसाठी योग करता ?’ असे विचारल्यास त्याची होणारी अवस्था माझ्या या प्रश्नानंतर होणाऱ्या अवस्थेप्रमाणे आहे. योगाभ्यास ज्याप्रमाणे सर्वांगीण आरोग्य-संवर्धक-जीवनशैली आहे त्याचप्रमाणे रोगप्रतिबंधक व सामाजिक आरोग्यशास्त्र हा विषय सर्वांगीण सामाजिक आरोग्याची वैद्यकशैली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये वैद्यक स्नातकांत कौशल्य निर्माण होणे या विषयाच्या अध्ययनानंतर अपेक्षित आहे.
रोगांचा प्रतिबंध करणारी व जीवनमान वाढविणारी कला व विज्ञान अशी या विषयाची व्याख्या करण्यात येते. रोगप्रतिबंधक व आरोग्य-संवर्धक-उपाययोजनांद्वारे समाजाला निरोगी ठेवणे हे या विषयातील उपचारांचे उद्दिष्ट आहे. समाजाच्या आरोग्याचे निदान करणारे शास्त्रीय सर्वेक्षण व शास्त्रशुद्ध सामुदायिक संशोधन ही या विषयाची शस्त्रे आहेत. सामाजिक आजारांच्या मुळावर घाव घालणाऱ्या समाजप्रबोधन, लोकसहभाग, सक्षमीकरण, प्रतिबंधात्मक जीवनशैली, पर्यावरण स्वच्छता, लोकसंख्या-नियंत्रण ह्या सगळ्या या विषयांतील विविध उपचारपद्धती आहेत. व्यक्ती, कुटुंब व समाजाच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या सगळ्याच घटकांचा अभ्यास व नियंत्रण ही या विषयाची शिकवण असल्यामुळे या विषयाचा परिघ प्रचंड मोठा आहे. संवेदनशील व्यक्तींना सामाजिक जाणिवांचे समाधान देणारे हे शास्त्र आधुनिक वैद्यकशास्त्राच्या वृक्षाला लागलेले सुवासिक सुंदर पुष्प आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने सामाजिक आरोग्याची जाण निर्माण करून देऊन अर्थपूर्ण चिरस्थायी उपाययोजनांसाठी मार्गदर्शन करणारे हे शास्त्र कल्याणकारी समाजरचनेचे अविभाज्य अंग आहे.
दशाः
इतके सारे असूनदेखील वैद्यकीय शिक्षणाच्या व व्यवसायाच्या झगझगाटात समाजाशी नाळ जोडू पाहणारे हे शास्त्र वैद्यकीय शिक्षणातील ‘सावत्र पोर’ आहे. बहुतेक वैद्यकीय विद्यार्थी व व्यावसायिकांसाठी हे शास्त्र शिकणे ही प्राथमिकता नसून फक्त अनिवार्यता आहे. आर्थिक मोजमापाची फूटपट्टी लावल्यास वैद्यक व्यावसायिकाच्या झोळीला ‘ओव्हरफ्लो’ करण्याची या विषयाची क्षमता नगण्य आहे. सामाजिक विकृतींच्या मुळाशी जाऊन त्यावर उपचार करणारा विषयांमध्ये असून विशिष्ट शस्त्रक्रिया किंवा उपचार पद्धतीद्वारे ठराविक आजार बरा करून तात्काळ समाधान देणे त्याच्या कार्यकक्षेत नाही. या सर्व कारणांमुळे वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय व्यवसायात हा विषय दुर्लक्षित आहे. विषयाचे महत्त्व कळूनही वैद्यकीय विद्यार्थ्यांना वैद्यक-व्यवसाय म्हणून हा विषय नको आहे. या विषयाचे शिक्षण वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फक्त एक अनिवार्य औपचारिकता उरली असल्यामुळे विषयाच्या अपेक्षित प्रगतीचा वेग मंद आहे.
निकडः
रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र हा विषय भारतासारख्या गरीब व विकसनशील देशासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. प्रतिबंधात्मक वैद्यक म्हणजे रोग होऊ नयेत व समाजात पसरू नयेत ह्यासाठी करावयाच्या उपाययोजना होत. भारतासारख्या गरीब, अज्ञानी व अमाप लोकसंख्येच्या देशात अनेक रोग अत्यंत सहजपणे उद्भवतात व झपाट्याने पसरतात. त्यामध्ये अपरिमित हानी तर होतेच, पण वेळेचा व पैशांचा अपव्यय होतो. त्यामुळे असे रोग होऊच नयेत व पसरू नयेत, अशी उपाययोजना असणे समाजाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र या विषयात नेमके हेच शिकविले जाते. वाढत्या वैद्यकीय शिक्षणासोबत वैद्यकीय उपचारांचा खर्चही वाढतो हे सिद्ध झाले आहे. अनावश्यक खर्चिक उपचारांना लादणाऱ्या विशेषज्ञांपेक्षा प्राप्त साधनसामुग्रीमध्ये कमी खर्चाच्या शास्त्रशुद्ध उपचारपद्धतींना अवलंबिणाऱ्या सामाजिक वैद्यकाची आपल्या समाजाला अधिक गरज आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या सामाजिक उद्दिष्टांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्यास आपला समाज अनिर्बंध वैद्यकीय लुटमारीला बळी पडण्यास वेळ लागणार नाही. सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याच्या गरजांपासून दूर नेणारे अनावश्यक खर्चिक वैद्यक तंत्रज्ञान ते अंधश्रद्ध वैद्यकीय भोंदूगिरी, शहरी पंचतारांकित उच्चभ्रू ते बकाल झोपडपट्टीतील श्रमिक, फास्ट फूडचे डोहाळे लागलेला नवश्रीमंत ते कुपोषणग्रस्त आदिवासी या सर्वांना उभा छेद देणारे वैद्यकशास्त्र विकसित होणे ही आपल्या समाजाची अनिवार्यता आहे.
शिक्षणाने वैद्यकीय विद्यार्थी समाजापासून दुरावून अधिक आत्मकेंद्रित होतो आहे ही आपल्या शिक्षणप्रणालीची शोकांतिका आहे. विद्यार्थ्यांना समाजाभिमुख करणाऱ्या शैक्षणिक तंत्राचा विकास व्हावयास हवा. समाजातील बुद्धिवंतांनी नवशिक्षित वर्ग समाजापासून दुरावत तर नाही ना, ह्याचा डोळसपणे विचार करून या वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्याचे मार्ग सुचवावयास हवेत. जर एखादा उपक्रम अपेक्षित परिणाम करीत नसेल तर त्या उपक्रमाची दिशा तपासून बघावयास हवी. प्रथम संपर्क प्राथमिक वैद्यक व्यावसायिक निर्माणाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या वैद्यकीय शिक्षणानंतर जर ग्रामीण भागासाठी वैद्यक व्यवसायी मिळत नसतील तर अधिक डोळसपणे आत्मपरीक्षणाची गरज आहे. खर्चिक नववैद्यक तंत्रज्ञान व औषधी कंपन्यांच्या मोहजालामुळे वैद्यकोपचार दिवसेंदिवस खर्चिक होतो आहे. अशक्त व्यवस्थापनाला बळी पडलेल्या सार्वजनिक वैद्यक संस्थांमुळे सर्वसामान्य ग्राहकाला खर्चिक खाजगी वैद्यकाशिवाय पर्याय नाही. या सर्व घटना दिशाहीन शिक्षणपद्धतीचे तर द्योतक नाहीत?
दिशाः
सामाजिक जाणिवा पुस्तकी किंवा महाविद्यालयीन शिक्षणाने निर्माण होणे अशक्य आहे. समाजाभिमुख अभ्यासक्रम व समाजाभिमुख शिक्षणपद्धतींचा विकास व्हावयास हवा. वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयाच्या चार भिंतीच्या बाहेर पडून समाजाच्या प्रयोगशाळेत जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाभिमुख वैद्यकीय शिक्षण अशक्य आहे. आरोग्याच्या व आजारांच्या सामाजिक कारणांचा तपास व त्यावर उपलब्ध साधनसामग्रीत चिरस्थायी लाभ देणारे उपचार करण्याचे कौशल्य महाविद्यालयाच्या आत होणाऱ्या व्याख्यानकेंद्रित शिक्षणाने साध्य होणे शक्य नाही. रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्राचे अध्यापन करणे म्हणजे पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे नसून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा व रोगप्रतिबंधक उपचारांवरील श्रद्धा समृद्ध करणे हे होय. समाजाच्या प्रत्यक्ष गरजांपासून कित्येक योजने दूर असलेल्या पारंपरिक पुस्तकी अध्यापन-अध्ययन-पद्धतींमुळे आमच्या अपेक्षित उद्दिष्टपूर्तीत बाधा तर येत नाही ना याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. ज्ञानकेंद्रित शिक्षणपद्धतींना तिलांजली देऊन कौशल्यावर आधारित समुदाय शिक्षण-पद्धतींचा अवलंब हे शास्त्र जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत अपेक्षित परिणामांची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. पारंपरिक महाविद्यालयकेंद्रित पुस्तकी शिक्षणपद्धतींची कात टाकल्याशिवाय या अर्थपूर्ण विषयाच्या गर्भातील सामाजिक कौशल्ये व मूल्यांची रत्ने दृष्टिक्षेपात येणे अशक्य आहे.
आरोग्याचे व आजारांचे सामाजिक संदर्भ कळण्यासाठी रुग्णालय-केंद्रित वैद्यकीय शिक्षणपद्धतीची जागा समुदायकेंद्रित वैद्यकीय शिक्षणाने घ्यावयास हवी याविषयी मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण धोरणात आग्रहाने नमूद करण्यात आली आहेत. दर्जात्मक समुदायकेंद्रित वैद्यकीय शिक्षणावर आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती यांची कालानुरूप वारंवार गुणात्मक चिकित्सा करणारी यंत्रणा अजून जागरूक व सशक्त व्हावयास हवी. मार्गदर्शक तत्त्वे फक्त कागदांवरच न राहता त्यांचा प्रत्यक्ष शिक्षणात अंमल व्हावयास हवा. विद्यापीठांनी फक्त परीक्षा घेण्याव्यतिरिक्त वैद्यकीय शिक्षणाची समाजाभिमुखता वारंवार तपासून घ्यावयास हवी. निरंतर वैद्यकीय शिक्षणाद्वारे वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान प्रशिक्षण अद्ययावत होणे अत्यंत गरजेचे आहे. वैद्यकीय शिक्षकांचेही शिक्षण-तंत्रज्ञान व बदलत असलेले आरोग्य-विज्ञान यावर वारंवार प्रशिक्षण होणे गरजेचे आहे.
माणसाला सामाजिक प्राणी संबोधण्यात येते. निरोगी समाजजीवन हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे द्योतक आहे. आपल्या आरोग्यामध्ये कुटुंबे व समुदाय सहभागी झाल्याशिवाय सर्वांना आरोग्य मिळणे शक्य नाही. स्वतःच्या आरोग्यामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी समाजात जाऊन आरोग्यचिंतनाचे व निरामयतेचे प्रयोग व्हावयास हवेत. सद्यःशिक्षणपद्धतीने विद्यार्थ्यांच्या विचारप्रक्रियांना बांध तर पडत नाही ना याचा विचार व्हावयास हवा. समाजाच्या सद्यःस्थितीत सामाजिक जाणिवा नसलेले वैद्यक व्यवसायी निर्माण होणे समाजाच्या आरोग्याला घातक आहे. समाजाच्या मूलभूत गरजांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केल्याशिवाय प्रगल्भ चिरस्थायी वैद्यक अध्ययन होणे शक्य नाही. समाजाच्या आरोग्य समस्या व गरजा समजून त्यांवर समाधान शोधल्याशिवाय आरोग्यदायी समाजाचे स्वप्न पाहणे म्हणजे भ्रमात राहण्यासारखे होय. सामाजिक वैद्यकशास्त्र हे वैद्यकीय संस्थेमधील फक्त एका विभागापुरते मर्यादित न राहता ती सर्वच आरोग्यशाखांची उपचारशैली व्हावयास हवी. अन्यथा उपचारासाठी आलेल्या रुग्ण व्यक्तींचे व कुटुंबांचे सामाजिक अंतरंग कळल्याशिवाय केलेला शुष्क उपचार हा फक्त उपचारच ठरेल.