मी ज्यावेळी एकटा बसून असतो त्यावेळी सतत माझ्या डोक्यात एकच विचार घोळत असतो : माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे ऊर्जेवरचे परावलंबित्व कमी कसे करता येईल ? खास करून खनिज तेलावरचे (Fossil Fuel). सायकल वापरता येईल, खाजगी गाडी न वापरता सार्वजनिक वाहतुकीचा आश्रय घेता येईल, Compact Fluorescent Bulbs वापरता येतील, विजेवर चालणारी उपकरणे कमी करता येतील, सूर्यचूल, सूर्यबंब वापरता येईल. . . . . पण एक माहिती मिळाली आणि माझे धाबेच दणाणले एक अन्न उष्मांक (food calorie) मिळविण्यासाठी अमेरिका १० खनिज उष्मांक वापरते ! म्हणजे माझ्यात रोजच्या २००० उष्मांक आहारासाठी २०,००० उष्मांक खर्ची पडतात ? आपल्या रोजच्या समजणाऱ्या भाषेत सांगायचे, तर ४ जणांच्या आमच्या कुटुंबाच्या वार्षिक अन्नाच्या गरजेपोटी हा देश ३४००० कि.वॅट/तास वापरतो किंवा साधारण ४२५०० लिटर खनिज तेल वापरावे लागते [आजच्या भारतातील रु.४५/लिटर भावाप्रमाणे याचे रु. २.० लाख होतात.]
सर्वसाधारण अमेरिकन कुटंब वर्षाकाठी १०,००० कि.वॅट तास वीज वापरते साधारण ५००० लिटर खनिज तेल. म्हणजे जवळ-जवळ अन्नासाठी जेवढे खनिज तेल खर्ची पडते तेवढेच खनिज तेल रोजच्या व्यवहारालाही लागते. अमेरिकेच्या एकंदर ऊर्जेच्या वापरापैकी १५% ऊर्जा पीकपाणी, पशुपालन, अन्नप्रक्रिया आणि पॅकेजिंग यावर साधारण समसमान खर्ची पडते. सर्व जगाने अमेरिकेसारखे राहायचे ठरवले तर सात वर्षांत जगातील सर्व खनिजतेलाचा साठा फस्त होईल. जगातील हरितगृह वायूप्रदूषणात शेतीचा हिस्सा २०% आहे त्यात २०% हून जास्त कार्बन डायऑक्साईड, ५५% मिथेन, आणि ६५% नॉयट्रस ऑक्साईडस्चा समावेश आहे. याशिवाय आजची ऊर्जा खाणारी यांत्रिक शेती मातीची धूप, पाण्याचे प्रदूषण, वन्यप्राण्यांच्या आवासाची हानी करते ते वेगळेच.
सरळ-सरळ गाजरे, मका, सफरचंद खाल्ले तर आपल्याला त्या कॅलरी सरळ मिळतात. पण आधी डुकरांना, जनावरांना खायला घालून मग त्यांचे मांस खायचे ठरविले तर १० पट कॅलरी खर्ची पडतात. जनावरांना स्वतः जगण्यासाठी ऊर्जा लागतेच ना? मांसाद्वारे फार थोडा भाग आपल्या मुखी पडतो. १ कॅलरी पोर्कसाठी ६८ कॅलरी उष्मांक आणि १ कॅलरी बीफ (गोमांस)साठी ३५ कॅलरी उष्मांक खर्ची पडतात. अमेरिकेत ८०% धान्य पशुखाद्यासाठी खर्च होते. तेव्हा शक्यतो मांस मटण कमी खा. खायचेच झाले तर मुद्दामहून पोसलेल्या जनावरांचे मांस खाऊ नका. बाहेर मोकळ्यावर चरणाऱ्या जनावरांचे मांस खा. शक्यतो ताजे असंस्कारित अन्न खा. जितक्या जास्त प्रक्रिया, संस्करण तितकी जास्त ऊर्जा खर्ची पडणार. शक्यतो स्थानिक जवळपास पैदा झालेले अन्न खा. अमेरिकेत शेतावरून ताटात हा प्रवास २५०० कि.मी. होतो. चिलीची द्राक्षे, हवाईचे अननस, कित्येक हजार कि.मी. प्रवास करून आपल्या टेबलावर येत असतात. काही शास्त्रज्ञ तर असे सुचवतात की प्रत्येक खायच्या पॅक्ड वस्तूवर तिची पर्यावरणीय माहिती कार्बनडायऑक्साईड एनिशन, अन्नसाखळी, प्रवाससाधन…. माहिती द्यावी.
आमच्या पोर्टलँड गावात आता परस्पर शेतावरून माल घेणे, सेंद्रिय शेतीचा माल घेणे, शेतकऱ्यांबरोबर भागीदारी करणे याचा विचार होऊ लागला आहे. ताज्या ताज्या वस्तू लागतातही स्वादिष्ट. शेवटी तुम्ही जे खाता तसे होता.
टीपः रासायनिक खते, कीटकनाशके, शेतीची यंत्रसामुग्री (ट्रॅक्टर, टेलर) वाहतूक, शीतगृहे इ.साठी खूप ऊर्जा खर्ची पडत असते. आजची आपली अर्थव्यवस्था ही ‘डिझेल अर्थव्यवस्था’ आहे.
(Solar Today मधून)