पत्रसंवाद

आसु च्या नोव्हें.०६ च्या पत्रसंवादातील प्रदीप पाटील यांचे पत्रातील शेवटच्या परिच्छेदांत माझ्या नावाचा उल्लेख व उल्लेखाचे कारण वाचून मी आश्चर्यचकित झालो. प्रदीप पाटील लिहितात की “डॉ.देशकर यांना धर्म म्हणजे नीती या अर्थाने त्यांचे विवेचन अभिप्रेत असेल तर मी (प्रदीप पाटील) आस मध्ये पूर्वीच लिहिले आहे. आणि धर्माविषयी आस ने दि.य.देशपांडेंचे अनेक लेख छापले आहेत तीच माझी भूमिका आहे.” माझी प्रदीप पाटलांच्या मेंदूतील देव’ ह्या मूळ (जुलै ०६) लेखावर प्रतिक्रिया ऑक्टो.०६ च्या पत्रसंवादात प्रसिद्ध झाली होती. त्यात कुठेही मी नीती हा शब्द वापरला नव्हता. प्रदीप पाटीलनीसुद्धा धर्म ही एक संकल्पना आहे. देव ही संकल्पना आहे असेच लिहिले आहे. त्यातही नीती हा शब्द नाही. मी धर्माचा नीतीशी संबंध दाखविला नव्हता. तसा प्रश्नच नव्हता. प्रदीप पाटीलनी माझी प्रतिक्रिया बारकाईने वाचावी. माझ्या प्रतिक्रियेत दि.यं.च्या लेखाचा उल्लेख नव्हता व तशी आवश्यकताही नव्हती.
दि.यं.च्या धर्म व नीतीसंबंधींच्या विचारांशी मीसुद्धा सहमत आहे. दि.यं.च्या धर्मनीती विचारांवर माझे मत आजपर्यंतच्या आसु च्या कुठल्याही अंकात माझी इच्छा असूनही प्रसिद्ध झाले नाही हेही खरे आहे. [पृष्ठमर्यादा! सं.]
भा.वि. देशकर, ४१, समर्थनगर (प.), वर्धा रोड, नागपूर – ४४० ०१५.

नोव्हें. २००६ च्या आसु मध्ये डिझायनर मुले या शीर्षकाचा लेख प्रकाशित झाला आहे. त्यासंबंधी काही प्रतिक्रिया खाली देत आहे.
“उत्तम मुलाचे लक्षण गोरे घाऱ्या डोळ्यांचे.” घारे डोळे सुन्दर असे निदान भारतातील चित्रपटनिर्माते समजत नाहीत हे अर्चना जोगळेकर या घाऱ्या डोळ्याच्या नटीला त्यांनी आपले घारे डोळे लपविण्यासाठी पापणीच्या आत काळ्या बुबुळाची भिंगे वापरायला सांगितले यावरून स्पष्ट आहे. घारे डोळे सुन्दर समजले जातात हे मी पूर्वी ऐकले नाही. निळे डोळे सुन्दर ही समजूत मात्र बरीच प्रचलित आहे कारण युरोपीय समाजात तसे डोळे उच्च समजल्या जाणाऱ्या वर्गात आढळतात. गोरा वर्ण सुन्दर ही कल्पना भारतात आठव्या शतकापूर्वी नव्हती. याच सुमारास झालेली विज्जका ही कवयित्री म्हणते :
नीलोत्पलदलश्यामां विज्जकां मामजानता ।
वृथैव दण्डिना प्रोक्तं सर्वशुक्ला सरस्वती ।। “सरस्वती गोरी आहे असे दण्डी म्हणतो. त्या पामराने नील कमलाप्रमाणे श्यामल असलेल्या विजकेला पाहिले नव्हते. नाही तर तो असे म्हणालाच नसता.” एक स्त्री आपल्या काळेपणाचे एवढ्या अभिमानाने वर्णन करते त्याअर्थी तिच्या काळी गोऱ्या वर्णाचे सौन्दर्याशी समीकरण स्थापित झाले नव्हते हे स्पष्ट आहे. याच्याही पूर्वीच्या कालिदासाने सुन्दर स्त्रीचे “तन्वी श्यामा…” असे वर्णन केले आहे. श्याम वर्णाचे तप्तकाञ्चनवर्णाभा म्हणजे तप्त काञ्चनाचा वर्ण असलेली अशी व्याख्या केली असल्यामुळे काही लोक श्यामा याचा अर्थ काळा असा नाही असे म्हणतात. पण सोने शुद्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याला तापवितात तेव्हा ते काळेच दिसते कारण अगदी शुद्ध असे सोने बहुधा नसते.
कालिदासाच्याही पूर्वी रामाच्या व कृष्णाच्या काळी श्यामल रंग हाच सुन्दर समजत हे रामकृष्णांच्याच नव्हे तर त्रैलोक्यसुन्दरी द्रौपदी ही “कृष्णा’ होती यावरून स्पष्ट आहे. गोरा रंग सुन्दर हे तत्त्व फक्त मानवाच्या बाबतीतच वापरले जाते. काळा घोडा असुन्दर व पांढरा सुन्दर असे कोणीही म्हणत नाही. काळा रंग सुन्दर मानणाऱ्या काळाकडे लक्ष दिले की असे दिसून येईल की हा काळ अरब, तुर्क, अफगाण व मुघल या गोऱ्या वा पिवळ्या लोकांचे साम्राज्य भारतावर स्थापित होण्याच्या पूर्वीचा आहे. म्हणजे रणाङ्गणावरील विजय व त्याने प्राप्त झालेली सत्ता यांच्या साहचर्यामुळे गोरा रंग सुन्दर वाटू लागला.
मनोवैज्ञानिकांनी रंग व सौन्दर्यदृष्टि यावर प्रयोग करण्यासाठी निरनिराळ्या रंगांच्या पाट्या तयार केल्या. त्यात असे आढळून आले की कोणताही एक रंग दुसऱ्या रंगापेक्षा सुन्दर असे प्रयोज्य व्यक्तींचे मत नव्हते. हे कळून आल्यावर त्या रंगाच्या पृष्ठभागाचा गुळगुळीतपणा व कान्तिमत्ता यांच्यात फरक करण्यात आला. तेव्हा असे दिसून आले की फिक्या पृष्ठभागापेक्षा कान्तिमान् पृष्ठभाग व खडबडीत पृष्ठभागापेक्षा गुळगुळीत पृष्ठभाग सुन्दर दिसतो असे म्हणण्याकडे प्रयोज्य व्यक्तींची प्रवृत्ति होती. म्हणजे मानवी व्यक्तींच्या बाबतीत असे म्हणता येईल की त्वचेच्या रंगावर सौन्दर्य अवलम्बून नसून आरोग्यामुळे चेहऱ्यावर येणारी कान्ति व सुरकुत्यांचा अभाव हे सौन्दर्याचे सर्वमान्य घटक आहेत. जास्त खोलात जाऊन हे घटक जास्त सुन्दर का दिसतात याचा विचार केला तर आरोग्याशी त्यांचे असणारे साहचर्य हे मूलभूत कारण आहे असे दिसून येते. तसेच निकोप प्रकृतीच्या व्यक्तीचा चेहरा सुरकुत्या पडलेला नसतो. अशक्तपणामुळे वा वार्धक्यामुळे सुरकुत्या पडतात. म्हणजे सौन्दर्यानुभव हा मनावर पूर्वी झालेल्या संस्कारांचा परिणाम आहे. आरोग्य व यौवन सुखदायक असल्यामुळेच त्यांच्याशी सम्बद्ध असलेल्या गोष्टी सुखद म्हणूनच सुन्दर वाटू लागतात.
चांगल्या गुणधर्मात हुषारी म्हणजे बुद्धि या गुणाचा अन्तर्भाव श्री पाटील यांनी केला आहे. इथे ते जास्तच अडचणीत पडणार आहेत. कारण बुद्धिमत्तेचे निदान १२० प्रकार गिल्फर्ड या मनोवैज्ञानिकाने मानले आहेत. या प्रकारातले साहचर्य शून्य असेल तरच त्यांना वेगळे प्रकार मानता येईल. गिल्फर्डच्या संशोधनाच्या आधारे या प्रकारांच्या कसोट्या शुद्ध केल्या की त्यातील साहचर्य शून्य होऊ शकते. म्हणजे बुद्धिमत्ता मोजण्याची ही १२० स्वतन्त्र परिमाणे आहेत असे मानता येते. बुद्धिमत्तेची परिमाणे स्वतन्त्र आहेत असे मानल्यावर ‘अ’ हा ‘ब’पेक्षा जास्त बुद्धिमान आहे असे म्हणायचे असेल तर साऱ्या परिमाणांवरील गुणामांची बेरीज करावी असे म्हणण्यात येईल. पण बेरीज करताना प्रत्येक परिमाणाचे महत्त्व सारखे मानावे की वेगळे मानावे हा पश्न उपस्थित होतो. सारखे मानण्यास वा वेगळे मानण्यास आधार काय ? अविकसित समाजात रामानुजन्च्या शुद्ध गणितातील बुद्धिमत्तेची किंमत शून्य राहील. आजच्या समाजात ती अत्यन्त मोठी आहे. १२० प्रकारांपैकी कोणत्या प्रकाराचे महत्त्व केव्हा किती होईल हे सांगता येत नाही. तेव्हा बुद्धिमत्ता हा सुप्रजननाचा आधार असू शकत नाही.
दुसरे असे की निरनिराळे चांगले गुणधर्म एकमेकांच्या विरोधी असू शकतात. आपण लोकमान्य टिळकांचे उदाहरण घेऊ. लो. टिळकांना बी.ए.च्या परीक्षेत गणितात प्रावीण्य मिळाले होते पण एम.ए.च्या गणितात ते दोनदा नापास झाले व कधीच एम.ए. होऊ शकले नाहीत. याची कारणमीमांसा टिळकांच्या कोणत्याच चरित्रकाराने केली नाही. जी माहिती उपलब्ध आहे तिच्या आधारे मी या गोष्टीची उपपत्ति अशी करतो : टिळकांच्या व्यक्तिमत्त्वात गणिती बुद्धिमत्तेबरोबर हट्टीपणा हा दुसरा गुण होता. एखादे गणित सुटले नाही की ते सुटेपर्यन्त त्यांच्या मनात विचार येणे कठिण होते. व त्या एकाच गणिताचा दोन दोन दिवस ध्यास घेऊन ते त्याची सोडवणूक करीत. गणिताच्या एम्.ए.चा अभ्यास करताना हे असे करून कसे चालणार ? एम्.ए.च्या परीक्षेसाठी गणिताची डझनावारी पुस्तके अभ्यासावी लागतात. त्यांतले इतरांना सोडविता न येणारे प्रत्येक गणित आपल्याला सोडविताच आले पाहिजे असा आग्रह धरल्यास पुरा अभ्यासक्रम अभ्यासून होणे शक्य नाही. ही गोष्ट टिळकांच्या आड आली असली पाहिजे. एखादे गणित सुटले नाही की त्यावर दिवसानदिवस खर्च केल्यास साऱ्याच अभ्यासक्रमातील नेहमी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावर अभ्यास केन्द्रित करणे कसे जमेल ?
प्रस्तुतच्या विषयाच्या दृष्टीने या उदाहरणाचा बोध असा की हट्टीपणा हा नेहमीच सद्गुण व नेहमीच दुर्गुण ठरेल असे नाही. हट्टीपणा उद्दिष्टाची पूर्ति करण्यास मदत करणारा असेल तर चांगला, त्याच्या आड येत असेल तर वाईट. ज्यांच्या चांगल्या वाईटाबद्दल सरळसोट मत देता येत नाही असे अनेक गुण आहेत. मग सुप्रजनन करू पाहणारे जैविक या गुणांचे काय करणार? एखाद्या दुःसाध्य गुणाच्या साहचर्याने कधी कधी एखादा लोकोत्तर सद्गुण वावरतो. याबाबतीत स्टीफन हॉकिंग या वैज्ञानिकाचे उदाहरण बोलके आहे. या वैज्ञानिकात न्यूटन व आइन्स्टाइन यांच्या तोडीची वैज्ञानिक प्रतिभा आहे. पण तो बाकी सर्व दृष्टीने अपंग आहे. अपंग जन्मणार म्हणून त्याची भ्रूणहत्या केली असती तर जग एका महान् वैज्ञानिकाला मुकले असते!
तात्पर्य सुजनन हे फक्त पशुंच्या बाबतीत शक्य आहे कारण तेथे कोणत्या गुणांचे संवर्धन करायचे हे निश्चित असते. घोड्यांचे सुजनन करायचे म्हणजे जास्तीत जास्त वेगवान घोडे जन्माला घालायचे, गायींचे सुजनन करायचे म्हणजे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायींची पैदास करायची मग इतर बाबतीत ते घोडे व त्या गायी कशाही असेनात! पण मानवाच्या बाबतीत कोणत्या गुणधर्मावर जोर द्यायचा ? केवळ वैज्ञानिक बुद्धीवर जोर दिला व ज्या समाजात सगळेच आइनस्टाइन आहेत असा समाज निर्माण केला तर तो समाज टिकू शकेल काय ? समाजात सगळेच वैज्ञानिक झाले तर योद्ध्याचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे, व्यापाऱ्यांचे व राजनीतिज्ञांचे काय ? यांच्याशिवाय कोणता समाज राहू शकेल ? तेव्हा हे गुण समाजात पाहिजेत. पण हे गुण जनुकांच्या अभ्यासाने जन्माच्या आधीच ओळखता येतील असा दावा आज सांगता येत नाही. व्यापारी व सावकार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्यू लढवय्ये बनले आहेत व लढवय्ये म्हणून गाजलेले जर्मन व्यापार करू लागले आहेत…
नी.र.व-हाडपाण्डे, ३८ हिन्दुस्तान कॉलनी, अमरावती मार्ग, नागपूर – ४४० ०३३. दूरभाष २५२२८०८.

स्त्रीजन्माची जैविक कहाणी या लेखात प्रभाकर नानावटी यांनी पुढील विधान केले आहे. ‘मेंदूची रचना व वर्तन यांचा अन्योन्य संबंध आहे असे क्षणभर मान्य केले तरी या गोष्टी उपजत आहेत असे विधान आपण करू शकणार नाही. आतापर्यंतचे सर्व संशोधन प्रौढ व्यक्तींच्यावर झाले आहे. वर्तनातील फरकांना केव्हापासून सुरुवात होते याची अजून कल्पना नाही.’ स्त्रीपुरुषांतील वर्तनभेदाविषयी वरील विधान आहे. ते उपजत आहेत असेही विधान आपण करू शकतो. आपण उदाहरण घेऊ या डठध जीनचे. हा जीन आणखी एका डजद९ नावाच्या जीनला ‘जागे’ करतो. तो पुढे वृषणातील पुरुष बीजांडास ‘आज्ञा’ देतो. आणखी ९ प्रकारचे जीन्स ‘जागे’ होतात. हे सारे मिळून संप्रेरके निर्माण करतात. ही संप्रेरके शरीराची वाढ आणि अन्य जीन्सना नियंत्रित करतात. ते जे करतात, त्यापैकी एक असते पुरुषत्व. त्यामुळे डठध ला “पुरुषत्वासाठीचा जीन’ असे म्हटले जाते. यातून टेस्टेस्टेरॉन नावाच्या संप्रेरकाचे नियंत्रण होते. पुरुषात ते पुरुष-बीजांडात तर स्त्रीत ते अधिवृक्क-ग्रंथीतून पाझरते. कुमारवयात व नंतर टेस्टेस्टेरॉनचे ‘वर्तन’ खून, आत्महत्या, अपघात व हृदयरोग यांतून दिसू लागते. स्त्रीत टेस्टेस्टेरॉनचे प्रमाण कमी असते. ‘हिंसक’ वर्तन या संप्रेरकाशीही निगडित आहे. अल्झायमर्स रोगात स्त्रियांचे मरण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते हे ‘उपजत’ गोष्टींमुळे घडते.
आतापर्यंतचे सर्व संशोधन प्रौढ व्यक्तींबरोबर भ्रूण, गर्भ, शिशू, बालक, कुमार, तरुण यांच्यावरही झाले आहे. पुरुषांस स्त्रीपासून ‘वेगळे’ करणाऱ्या टेस्टेस्टेरॉन संप्रेरकाचेच उदाहरण घेऊ. ८ ते २४ आठवड्याच्या गर्भाच्या मेंदूच्या वाढीवर गर्भातील ‘स्टेरॉईडस्’चा परिणाम होतो. एक उदाहरण देतो. अएड नावाचे कृत्रिम संप्रेरक औषध म्हणून गर्भपातप्रतिबंधासाठी ज्या स्त्रियांनी वापरले त्यांपैकी बहुतांश स्त्रियांना त्याच वेळी जन्मलेला मुलगा ‘स्त्री वर्तन’ करणारा आढळला. उदा. बाहुल्यांचा खेळ खेळणे. ‘नेचर’मध्ये या विषयीचा अधिक तपशील आहे. याच्या उलटेही उदाहरण आहे. अधिवृक्क ग्रंथीच्या संप्रेरकाचे प्रमाण (अँड्रोजेन) वाढलेल्या गर्भवती स्त्रियांनी जन्म दिलेल्या मुली ‘पुरुषी वर्तन’ करताना आढळतात. खेळात ट्रक-कार्स वापरणे, रचना करणे, ‘रफ’ वर्तन असणे, काहींत उभयकामक्रिया (Bisexual) वा समलिंगी वर्तन आढळले. ‘सायन्स’ मध्ये एहरहार्ड व मेयर यांनी या भिन्न वर्तनप्रकाराबद्दल स्त्री पुरुषांच्या ‘उपजत’ गोष्टी आणि सर्व वयोगटातील संशोधन सांगितले आहे.
एवढेच नव्हे, शारीरिक आक्रमकपणा, कुमारवयातील बंडखोरपणा, गणिती क्षमता, दृष्टित्रिमितीय आणि वाचाक्षमता हेसुद्धा लिंगभिन्नतेवर अवलंबून असल्याचे आढळले आहे. ‘दि इसेन्शियल डिफरन्स’ या पुस्तकात बॅरोन-कोहेन यांनी हे मांडले आहे. मेंदूच्या दोन्ही गोलार्धाच्या विकासावर गर्भावस्थेत टेस्टेस्टेरॉनचा परिणाम होतो. असेही दिसून येते की पुरुष गर्भातील उजवा गोलार्ध टेस्टेस्टेरॉनमुळे चांगला’ वाढतो. (स्त्री गर्भात डावा गोलार्ध वाढतो.) उजवा गोलार्ध रचनात्मकता आणि त्रिमितीशी निगडित असतो तर डावा ‘माया’ आणि भाषाकौशल्य याशी निगडित असतो. यास ‘लॅटरॅलिटी इफेक्ट’ म्हणतात.
मूल जन्मल्यानंतर पाचव्या महिन्याच्या आसपास टेस्टेस्टेरॉन जास्त प्रमाणात स्रवते. ‘आक्रमकता’ हा स्वभावातील गुणधर्म टेस्टेस्टेरॉनशी निगडित असतो हे उंदरांवरील प्रयोगांवरून सिद्ध झालेले आहे. ‘ब्रेन अँड कॉग्निशन’ या मासिकांतून या विषयीची अनेक संशोधने प्रसिद्ध झाली आहेत.
प्रदीप पाटील, चार्वाक, २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली.

सप्टेंबर २००६ चा आरोग्यविशेषांक वाचून घोर निराशा झाली. रुग्ण, डॉक्टर्स (सर्व पॅथींचे) व शासन ह्या सर्वांना मार्गदर्शक ठरेल व विचारप्रवृत्त करू शकेल अशा आरोग्यविशेषांकाची अपेक्षा असताना वृत्तपत्रीय स्वरूपाचे लेख (योग्य-अयोग्य यातला भेद स्पष्ट न करता) देऊन ‘विवेकवादी विचाराला वाहिलेले मासिक’ ह्या बोधवाक्यास छेद दिला गेला. विवेकवादी विचाराला वाहिलेले मासिक आहे हे संपादकीयात अतिथी संपादकांनी मान्य केलेले असताना अविवेकी विचाराचे लेख, अविवेकी व अर्थबोध न होणारी विधाने विशेषांकात न येण्याची काळजी घ्यायला हवी होती. पृष्ठमर्यादेमुळे काही विषयांवरचे लेख देता आले नाहीत, परंतु एड्ससारख्या विषयाला ८ पाने देणे कितपत योग्य होते? मुळात एड्स ह्या विषयावर सरकारचे व जागतिक अनुदान मिळते म्हणून काम करणाऱ्या
असंख्य सामाजिक संस्थांची निर्मिती झाली आहे. ह्या संस्थांनी अनेक पुस्तिका, जाहिरात, शिबिरे, प्रसारमाध्यमे यांद्वारे नको इतकी जनजागृती केलेली असताना तोच विषय सुधारकसारख्या मासिकात, विषयात नावीन्य नसताना टाकणे योग्य नव्हते. तीच बाब आहार ह्या लेखाविषयी. मुळातच आहाराचा आणि रोगांचा संबंध ठामपणे अजूनही प्रस्थापित झालेला नाही. अमुक प्रकारचा आहार खाल्ल्याने तमुक प्रकारचा रोग होतो, किंवा अमुक प्रकारच्या आहाराने तमुक प्रकारच्या रोगाला प्रतिबंध होतो असे काहीही ठामपणे म्हणता येत नाही. आहारावरील लेख वाचताना मला तर मी शालेय पाठ्यपुस्तके तर वाचत नाही ना, अशी शंका आली. संपूर्ण लेख वाचल्यावर एकवेळ पाठ्यपुस्तके परवडली अशी म्हणायची वेळ आली. अनेक अविवेकी, शास्त्रीय आधारहीन विधाने लेखात आहेत. उदा. ‘तुम्ही जे खाता त्याप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्त्व घडते. माणसाचे आचार-विचार, बुद्धिमत्ता, स्वभाव हे सारे आहारावर अवलंबून असते.’ ह्या विधानांना मला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रीशन ह्या संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकात किंवा मान्यवर अशा विदेशी प्रकाशकांच्या पुस्तकातही आधार सापडला नाही. काय खावे नि काय खाऊ नये ह्यांची जंत्रीच लेखिकेने दिली आहे. भारतातील विविध धर्म, भाषा व जाती व त्यांची वेगवेगळी संस्कृती पाहता एका विशिष्ट वर्गाविषयी लिहिणे योग्य नव्हते. भारतातील दारिद्र्यरेषेखाली असलेल्या ३२.५ कोटी जनतेचे पुरेसे अन्न न मिळाल्याने कुपोषण होते. त्यांपैकी ५ कोटी जनता भूकबळीची शिकार होण्याच्या सीमारेषेवर आहे. परंतु लेखिकेला अनैसर्गिक स्वरूपात पिष्टमय पदार्थ, रिफाइन्ड तेले खाऊन कुपोषण(?) होणाऱ्यांची चिंता वाटते. ‘पितळेची भांडी (कल्हई न करता ?), ‘मातीची भांडी वापरावीत,’ ‘जेवताना पाणी पिऊ नये’, अशी अनेक न पटणारी विधाने लेखात आहेत. प्रथम दर्जाची प्रोटीन्स घ्यावीत असे लेखिका एकीकडे म्हणते, परंतु खाण्याच्या जंत्रीमध्ये अंडी, मांस, मासे, इत्यादींचा उल्लेखही नाही. अलिकडेच छखछ द्वारे केलेल्या सर्वेक्षणात भारतातील ६५% नागरिक मांसाहारी आहेत असे आढळले आहे. दक्षिणेकडील राज्यांत तर हे प्रमाण ९२% टक्के आहे.
भारताचे मानसिक आरोग्यः आज आणि उद्या ह्या सुधीर भावे ह्यांच्या लेखातही अनेक त्रुटी आहेत. अमेरिकेतील व भारतातील मानसिक रोगांच्या सर्वेक्षणाद्वारे केलेली टक्केवारी त्यांनी दिली आहे व अमेरिकेपेक्षा भारतात मानसिक रोगांचे प्रमाण कमी आहे असे अनुमान काढले आहे. भारतासारख्या देशात मद्याचे व्यसन, डिप्रेशन व न्युरोसिस हे आजार शेवटच्या थराला जरी गेले तरी बहुतांश रुग्ण व त्यांचे नातेवाईक डॉक्टरकडे वा मानसोपचारतज्ज्ञाकडे जात नाहीत. गेलेच तर ते जातात देवऋषी, बुवा-महाराजांकडे. खेड्यांत व तालुक्याच्या ठिकाणी मानसोपचारतज्ज्ञ बघायला मिळणे अवघड. अशा स्थितीत केलेल्या सर्वेक्षणात निश्चितच कमी आकडेवारी मिळणार हे उघड आहे. शिवाय हे सर्वेक्षण किती सॅम्पलवर घेतले ह्यावरही बरेच अवलंबून आहे. ‘दैवी शक्तीवरील विश्वास’, धर्म व अध्यात्म ह्या गोष्टींमुळे मानसिक रोग आटोक्यात ठेवण्यात मदत होते किंवा त्यामुळेच मानसिक रोगांचे प्रमाण कमी आहे’, ही लेखकाची विधाने म्हणजे सायकियाट्री ही शाखा किती बाल्यावस्थेत आहे हेच दर्शवते.
‘नजीकच्या काळातील भारतीय आरोग्यसेवा’ व ‘सध्याचे वैद्यक-शिक्षण आणि डॉक्टर विद्यार्थी’ ह्या लेखातही अपुरेपणा जाणवतो. नजीकच्या भविष्यातील भारतीय आरोग्यसेवा कशी असायला हवी, अशा अंगाने लेख लिहिला असता तर शासन, डॉक्टर व रुग्ण ह्या सर्वांना तो मार्गदर्शक ठरला असता. अनंत फडके ह्यांनी दाखवून दिले आहे की औषध कंपन्या प्रचंड प्रमाणात नफेखोरी करीत आहेत व त्यावर नियंत्रण आणून सरकारने किमती कमी करावयास हव्यात. टाईम्स ऑफ इंडिया च्या (१६ नोव्हें. २००६) संपादकीयातही म्हटले आहे की औषधाच्या किमती ह्या येथील लोकांच्या आवाक्याबाहेर आहेत. सामान्यांसाठी आरोग्य-विमा-नेटवर्क व सार्वजनिक आरोग्य- व्यवस्था जवळपास अस्तित्वात नसल्यासारखीच स्थिती असल्याने औषधांच्या किमती सामान्य माणसाच्या आटोक्यात आणणे गरजेचे आहे. परंतु लेखक काय म्हणतात पाहा : ‘परवडणाऱ्या किमतीत विकाव्या लागणाऱ्या स्पर्धेतून औषधाच्या किमती ठरतील आणि या फार महाग असणार नाहीत.’ अतिथि-संपादक म्हणतात की, ‘माझे नफ्याचे प्रमाण मी ठरवीन”, हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. त्या किमतीत ते औषध घ्यायचे की नाही हे ग्राहकाने ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याचे आहे.’
असे स्वातंत्र्य ग्राहकाला असते का ? सामान्यांच्या स्वास्थ्याबद्दल किती काळजी आहे हे यातून दिसून येते. संजीव केळकरांचा आरोग्याच्या विमापद्धतीवर विश्वास दिसत आहे. संपादकीयात म्हटले आहे की भविष्यकाळातील सेवा जितकी अधिक विमापद्धतीवर वा प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या सुसंघटित वैद्यक सेवेचा घटक होईल त्यावर काही प्रमाणात सुटेल. परंतु संजीव केळकरांच्याच लेखात भारतीय जीवन विमा निगम कंपनीचा अधिकारी म्हणतो की, ‘आमचा आरोग्याच्या विमापद्धतीवर विश्वास नाही.’ लोकांचाही मेडीक्लेम व इतर तत्सम पद्धतींवर विश्वास दिसत नाही. तसे असते तर आतापर्यंत अनेक आरोग्य-विमा-पॉलिसी भरभराटीला आल्या असत्या. दुसरी गोष्ट म्हणजे विमा कंपनीचा घटक बनायला सामान्य लोकांकडे पैसे कोठे आहेत ? ‘लॅन्सेट’मधील एका अभ्यासानुसार सामान्य लोकांच्या खर्चातील आरोग्यावरील खर्च जर त्यांच्या उत्पन्नातून वजा केला तर आशिया खंडातील सुमारे ७ कोटी ८० लाख नागरिक दारिद्र्यरेषेखाली जाऊ शकतात. त्यांतील भारतातील आणखी साडेतीन कोटी लोकांची भर पडून एकूण दारिद्रयरेषेखालील लोकांची संख्या ३६ कोटी होईल. थकज च्या अंदाजानुसार भारतातील ६५ कोटी जनतेला आवश्यक औषधे गरजेनुसार नियमित मिळत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय रुग्णालये ह्याची स्थिती पाहता सामान्य नागरिक खाजगी रुग्णालयात जातो. परंतु ही रुग्णालये भरमसाठ फी आकारून रुग्णांना नागवे करून सोडतात. ज्या रुग्णालयाची सार्वजनिक न्यास म्हणून नोंदणी झाली आहे अशा रुग्णालयांबाबत नुकताच एक आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. एकूण रुग्णांपैकी पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या दहा टक्के रुग्णांना मोफत तर वार्षिक पन्नास हजार रुपये उत्पन्न असलेल्या रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार देण्याचे
आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुण्यातील रुग्णालयांची माहितीच्या अधिकाराखाली एका संस्थेने पाहणी केली असता ९० टक्के रुग्णालये ह्याची अमलबजावणी करीत नाहीत असे लक्षात आले. सर्वत्र बहधा अशीच स्थिती असावी.
कमी शुल्कात औषधोपचार करणारे पुण्यातील आनंदपूर चॅरिटेबल ट्रस्ट हे एकमेव रुग्णालय आहे असे दिसते. अनंत फडकेंनी लो-कॉस्ट विकत असलेली स्वस्त औषधे बरीच वर्षे बाजारात आहेत असे म्हटले आहे. ती कुठे मिळतात हे जर सांगितले तर सामान्य लोकांना त्याचा लाभ घेता येईल.
शेवटी आयुर्वेदाच्या लेखाकडे येतो. एकाच अंकात आयुर्वेदाचे समर्थन करणारा व आयुर्वेदाच्या मर्यादा सांगणारा असे दोन लेख देऊन अतिथि-संपादकाने त्यातील योग्य व वैज्ञानिक विधाने कोणती यावर टिप्पणी केली असती तर वाचकांना योग्य मार्गदर्शन झाले असते व ते सुधारकाच्या विवेकवादी परंपरेलाही शोभले असते. जयंत देवपुजारी म्हणतात की आयुर्वेदाच्या ह्रासाचे मुख्य कारण मोगलांचे आणि इंग्रजांचे आक्रमण हे आहे. इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल वीकलीमधील (१९ ऑगस्ट ०६) लेखात दया वर्मा हे लेखक म्हणतात की आयुर्वेदाच्या ह्रासाची कारणे बाह्मणी संस्कृतीत आहेत. केवळ आयुर्वेदीय ज्ञानच नाही तर विज्ञानाच्या इतर क्षेत्राचाही ह्रास होण्यात ब्राह्मणी संस्कृतीचा मोठा वाटा आहे. ब्राह्मणी संस्कृतीचे एक तत्त्व होते की ज्ञान फक्त काही विशिष्ट उच्चवर्गीय लोकांनाच दिले पाहिजे. सामान्य लोकांपर्यंत ते पोचायला नको. आयुर्वेदाचा ह्रास होण्यात दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याकडील असलेल्या ज्ञानाबद्दल गुप्तता बाळगणे. आपल्याकडील ज्ञान दुसऱ्याला दिले तर त्याचा तो फायदा उठवेल ही भीती. तिसरे ह्रासाचे कारण म्हणजे आयुर्वेदाची औषधे कोणीही तयार करून विकू शकतो. त्यामुळे रामदेवबाबासारख्या मंडळींनी आयुर्वेदाच्या नावाखाली कोणत्याही पदार्थांचे मिश्रण करून त्यांची टेस्ट न करताच विक्री सुरू केली. घरगुती आयुर्वेदाचे कारखाने निघू लागले. जाहिरातीवर काही बंधन उरले नाही. चौथे ह्रासाचे कारण म्हणजे आजचे आयुर्वेदीय शिक्षण. पदवी आयुर्वेदाची, पॅक्टीस मात्र अॅलोपॅथीची. ह्याबद्धल देवपुजारींनी काही लिहिले नाही ना संजीव केळकरांनी. अॅलोपॅथीचे डॉक्टर्स व पूर्ण आयुर्वेदीय ग्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स हे दोन्हीही ह्या गैर-कानूनी प्रकाराबद्दल मूग गिळून गप्प बसणे पसंत करतात. जयंत देवपुजारी ह्यांनी पंचमहाभूत सिद्धान्ताचा व आयुर्वेदातील वात, पित्त, कफ ह्यांचा उल्लेख केला आहे. आधुनिक वैद्यकीय पद्धतीमधील शास्त्रीय सिद्धान्ताची परिमाणे आयुर्वेदाला लावू नयेत, असे देवपुजारी ह्यांचे म्हणणे आहे. त्यांनी आयुर्वेदात सरकारची Central Council for Research in Ayurveda & Siddha (CCRAS) ही संस्था संशोधन करते ह्याचा उल्लेख केला आहे.
पुण्यामध्ये नुकतीच आयुर्वेदावर एक जागतिक परिषद भरली होती. त्यामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. अंबुमणी रामदास, डॉ. माशेलकर व विदेशातील वैज्ञानिक नियतकालिकाचे संपादक डॉ. एडविन कूपर ह्या सर्वांनी असे सांगितले की आयुर्वेदाचे विज्ञानाधारित प्रमाणीकरण करावयास हवे. ह्याचा अर्थ प्लॅसिबो परिणाम, नियंत्रित क्लिनीकल चाचण्या, त्याही रिपवाळीशव पद्धतीने केलेल्या, सिंगल ब्लाईंड-डबल ब्लाईंड पद्धती वापरून केलेल्या चाचण्या इ. गोष्टी लक्षात घेऊन औषध परिणामकारक आहे का व ते सुरक्षित आहे का हे ठरविले जायला हवे. त्याप्रमाणेच आयुर्वेदीय औषधाची चाचणी केली पाहिजे. पंचमहाभूत सिद्धान्त व वात, कफ, पित्त असल्या अवैज्ञानिक गोष्टींद्वारे केलेल्या चाचण्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात छापल्याच जाणार नाहीत. उउठअड ही संस्थादेखील क्लिनिकल चाचण्यांचा आधार घेते.
देवपुजारी ह्यांनी डॉ. रा. द. लेले ह्यांनी लिहिलेल्या ‘आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक’ ह्या पुस्तकाचा तुलनात्मक अभ्यास’ म्हणून उल्लेख व गौरव केला आहे. परंतु डॉ. लेले ह्यांनी कालबाह्य आणि अनुपयुक्त बराच भाग आयुर्वेदामध्ये आहे ह्याची कबुली देऊनही त्याविषयी पुस्तकात चर्चा करण्याचे टाळले आहे.
Selfish Gene ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व वैज्ञानिक रिचर्ड डॉकिन्स त्यांच्या A Devil’s Chaplain ह्या पुस्तकात म्हणतात की वैद्यकीय क्षेत्रात प्लॅसिबो परिणामाचे फार महत्त्व आहे. निष्कर्ष पूर्वग्रहदूषित नसावेत म्हणून औषधाची डबल ब्लाईंड व प्लॅसिबो नियंत्रित क्लिनिकल चाचणी घेतल्यास औषध परिणामकारक व सुरक्षित आहे की नाही ते ठरेल. अशा चाचण्या आयुर्वेदाच्याही घेतल्या तर ‘पर्यायी’ असे काही उरणारच नाही. सर्व औषधे मुख्य प्रवाहात, आधुनिक वैद्यकशास्त्रात येतील.
टी.बी.खिलारे, ठक-४, राजविमल टेरेस, रामनगर कॉलनी, बावधन, पुणे-२१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.