२८ एप्रिलच्या इंडियन एक्सप्रेस मधील पहिल्याच पानावरील बातमी रांची युनिव्हर्सिटीतील बी.ए. च्या प्रश्नपत्रिकेत पुढील प्रश्न विचारले गेले. “(१) सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेल्या झारखंड पोलीस डिपार्टमेंटमधील इन्स्पेक्टर जनरलचे नाव काय ? (२) झारखंडामध्ये उद्योगप्रकल्पाच्या उभारणीसाठी जमीन बळकविण्याच्या विरोधात पोलीस आणि आदिवासी ह्यांच्यात कोणत्या ठिकाणी झटापट झाली ? (३) आपण राधा आहोत असे म्हणणाऱ्या उत्तर प्रदेशातील इन्स्पेक्टर जनरलचे नाव काय?”
रांची विद्यापीठाचे कुलपति राझी यांनी ही प्रश्नपत्रिका कोणी काढली ह्याबद्दल तीन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी अशा प्रश्नांनी करणे योग्य नाही असे मतही काही आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. उपकुलगुरुंनी केलेल्या चौकशीअंती सामाजिक शास्त्राचे डीन असलेले मानसशास्त्रज्ञ एस. के. सिन्हा यांनी ही प्रश्नपत्रिका काढली होती हे स्पष्ट झाले. ह्या सर्व प्रकरणात काही प्राध्यापक ठामपणे प्रा. सिन्हाच्या पाठीशी उभे राहिले. रांची विद्यापीठातील परीक्षाविभागाचे नियंत्रक ए.के. महातो ह्यांनी ह्या घटनेचे स्पष्टीकरण करताना असे म्हटले की जर पाकिस्तानचे प्रेसिडेंट परवेझ मुशर्रफ झारखंडातील इन्स्पेक्टर जनरलच्या सेक्स स्कँडलबद्दल युनो जनरल असेंब्लीत चर्चा करू शकतात तर बी.ए. च्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारल्यास त्यात गैर काय ? ह्या सर्व घटनेचे फलित काय ? युनिव्हर्सिटीच्या अॅकॅडेमिक कौन्सिलने ‘सामान्य ज्ञान’ हा पेपर अभ्यासक्रमातून काढून टाकला व त्याऐवजी ‘नीतिशास्त्र व पर्यावरण’ हा नवीन विषय पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकविला जाईल असे जाहीर केले. हा बदल आदेशानुसार केलेला आहे, अशी पुस्ती उपकुलगुरू खान यांनी जोडली.
ह्यानंतर काही दिवसांनी म्हणजे १६ मे ला मुंबई मिरर मध्ये आलेली बातमी सेंट जोसेफ येथे औद्योगिक तंत्रज्ञान शिकविणाऱ्या एका शाळेतील शिक्षक मायकेल मॅक्सवेल ह्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न दिला “तुम्हाला कोणाला जिवे मारावेसे वाटेल आणि हे काम तुम्ही कोणत्या पद्धतीने कराल?” पालकांनी ह्याबद्दल तक्रार केल्यानंतर, विद्यार्थ्यांना काल्पनिक लिखाण करण्यास उद्युक्त करणे हा आपला हेतू होता असे सांगून त्या शिक्षकांनी सर्वांची क्षमाही मागितली. स्टीव्ह हफ् ह्या शाळेच्या प्रवक्त्याने सांगितले की ही घटना मॅक्सवेलला नोकरीतून काढून टाकण्याएवढी गंभीर नाही.
वरील दोनच उदाहरणे लक्षात घेतल्यास शिक्षण आणि समाज ह्यातील परस्परसंबंधाबद्दल पुनर्विचार व्हावयास हवा असे वाटते. विशेषतः रांची विद्यापीठातील घटनेचे विश्लेषण केल्यास आपल्याकडे विद्यापीठ अनुदान मंडळांसारख्या शासनप्रणीत यंत्रणांकडून भरमसाठ पैसा खर्च करून मूल्यशिक्षणाचा प्रचंड गाजावाजा करून जे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव इ. च्या साहित्यातील सुविचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत. ह्या योजनेबरोबर एक टीप जोडली की मुस्लीम, ख्रिश्चन इ. धर्माच्या विद्यार्थ्यांना ह्यातून सूट द्यावी. धार्मिक क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड होत असतानाच बाबा, बुवा, महाराज, बापू ह्यांचेही महत्त्व वाढत आहे. ह्यापरते दुर्दैव कोणते ? मूल्यशिक्षण ही काही फक्त शिक्षणक्षेत्राची जबाबदारी व तत्त्ववेत्त्यांची मक्तेदारी नाही. विविध व्यवसायातील लोकांनी फार पूर्वीपासून आपल्या क्षेत्रातील व्यावसायिकांनी काय करावे व काय करू नये ह्यासंबंधी विवेचन केलेले आढळते. इ.स.पू. ४ थ्या शतकातील हिपॉक्रिटस्ने आपल्या मुलाला केलेला उपदेश आजही वैद्यकक्षेत्रातील व्यक्तींना मार्गदर्शक ठरणारा आहे.
समाजजीवन खिळखिळे करणारे गुन्हेगार जोपर्यंत उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत तोपर्यंत नीतिशास्त्र, मूल्यशिक्षण इ. योजना निष्फळच ठरणार.
द्वारा श्रीमती इनामदार, रामनिवास, गोखले रोड, नॉर्थ दादर, मुंबई ४०० ०२८