पत्रसंवाद

कुमुदिनी दांडेकर यांच्या महानगराची वाढ = झोपडपट्टीची वाढ ह्या लेखात त्यांनी मुंबई आणि ग्रामीण भागातील गरिबांच्या परिस्थितीची तुलना मांडली आहे. पाणी, वीज, संडास या भौतिक सोयी नगरांमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत अगोदर आणि जास्त प्रमाणात मिळतात हे त्यावरून दिसते. भारतामधील गरिबी कमी होण्याच्या वेगातही अशीच नागरी आणि ग्रामीण भागात तफावत आढळते आहे. १९८७ ते २००० या काळात भातामधील गरिबी कशा प्रमाणात कमी होत आहे ते पुढील (पान ३०१ वरील) तक्त्यावरून दिसेल. नागरीकरणाचे प्रमाण जास्त असणाऱ्या राज्यांत गरिबीचे प्रमाण कमी असलेले दिसते. बिहारसारख्या राज्यात नागरीकरण कमी आणि गरिबी जास्त दिसते. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची तुलना केली तर नगरे नसणारे तालुके हे गरिबीच्या क्रमात अग्रेसर दिसतील.
नागरीकरण हे गरिबी घटविण्यासाठी आवश्यक असते असा निष्कर्ष या आकडेवारीवरून निघतो. वरील तक्त्यावरून तसेच इतर काही आकडेवारीतून खालील निष्कर्ष काढता येतील.
१. १९८७ ते २००२ या काळात भारतामधील गरिबीचे प्रमाण ३२.५ टक्क्यांवरून २१.७ टक्के झाले म्हणजेच १०.८ टक्के भारतीय लोकांची गरिबी या कालात कमी झाली.
२. ग्रामीण भागातील गरिबांचे प्रमाण ३९.० टक्क्यांवरून २६.३ म्हणजेच १२.७ टक्क्यांनी कमी झाले तर नागरी क्षेत्रातील गरिबांचे प्रमाण २२.५ टक्क्यांवरून १२ टक्के झाले. नागरी गरिबी कमी होण्याचा दर हा ९.५ टक्के होता. याचाच अर्थ असा की ग्रामीण गरिबी कमी होण्याचा दर नागरी गरिबी कमी होण्याच्या दरापेक्षा जास्त होता.
३. असे असले तरी ग्रामीण भागातील गरिबांचे प्रमाण नागरी भागातील गरिबांपेक्षा दुप्पट आहे.
४. नागरी भागात मुंबई आणि दिल्ली या महानगरांतील गरिबीचे प्रमाण ९ टक्के आणि ७ टक्के इतके कमी झालेले आढळले. (१९७२-७३ मध्ये नवी दिल्लीमधील ४८ टक्के लोक गरीब होते.) पहिल्या वर्गातील नगरात सरासरीने १० टक्के लोक गरीब आहेत. तर पाचव्या वर्गातील (लहान) नगरात गरिबीचे असलेले प्रमाण हे ग्रामीण गरिबीइतकेच आहे. याचाच अर्थ मोठी नगरे लोकांची गरिबी कमी करण्यात जास्त यशस्वी होताना दिसत आहेत. (संदर्भ : ३०.१०.०४, डॉ. अमिताव कुंडू यांचे मुंबईमधील भाषण, 3410 Class | Cities consumption expenditure and NSS data.
५. महानगरातील आणि नगरातील गरिबीचे प्रमाण कमी होत असले तरी झोपडपट्ट्यांच्या आसऱ्याने राहणाऱ्या लोकसंख्येतही वाढ होते आहे. याचा अर्थ झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या बहुसंख्य लोकांचे आर्थिक उत्पादन आणि उपभोग वाढला असला तरी त्यांना राहण्यासाठी परवडतील अशी घरे मात्र बांधली गेलेली नाहीत.
६. नगरे आणि नागरीकरण गरिबी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत हे नक्की. मात्र महानगरे वाढली की झोपडपट्ट्यांची वाढ होणे अपरिहार्य आहे असे नाही. झोपडपट्ट्या वाढू न देण्यासाठी नागरी घरबांधणीचा वेग घरांच्या मागणीपेक्षा जास्त होईल असे धोरण असावयाला हवे. लहान आकाराच्या, तसेच भाड्याच्या घरांना चालना देणारे हे धोरण असावयाला हवे. गरीब असंघटितांना घरासाठी कर्ज मिळवून देणारे आर्थिक धोरणही महत्त्वाचे ठरेल.
सुलक्षणा महाजन, ८ संकेत अपार्टमेंटस्, उदयनगर, पाचपाखाडी, ठाणे ४०० ६०२

आपल्या देशातील विचारवंत व अर्थतज्ज्ञ गरिबीची व्याख्या, ती मोजण्याची शास्त्रीय पद्धत व गरिबी हटवण्याचे उपाय यावर विचारमंथन करतात. मात्र गरिबी दिवसेंदिवस वाढतच आहे. एखाद्या व्यक्तीने वा देशाने किती श्रीमंत व्हावे याची सीमा-रेषा ठरत नाही, त्यावर मर्यादा घातल्या जात नाहीत, तोवर गरिबी हटवण्याची चर्चा व्यर्थ आहे. दि.य. देशपांडे यांची विवेकवादावरील जी लेखमाला चालू आहे. ती पुस्तक रूपाने उपलब्ध आहे का ? असल्यास तपशील कळवावा.
बालकामगार आणि वेठबिगार या संबंधाने एकूणच गुलामीच्या प्रश्नावर चर्चा होण्याची गरज आहे. या अनुषंगाने एखादा विशेषांक काढावा. आम्हाला सहभाग घेता येईल.
[आज ती लेखमाला पुस्तकरूपाने उपलब्ध नाही – परंतु तशी ती उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या परिचयातील व्यक्ती वा ग्रंथालयाने पहिल्या चौदा वर्षांच्या बांधीव खंडांचा संच घेणे, हाही एक पर्याय आहे. बालकामगार/वेठबिगार यावर विशेषांक सध्या नियोजित नाही. पण आपण लिहिल्यास स्वागतच होईल.]
श्रीनिवास कुलकर्णी, बचपन बचाओ आंदोलन, डाक बंगल्यामागे, मु.पो. गंगाखेड-४३१५१४, जि.परभणी

“ध्यानधारणा किंवा मेडिटेशन – वास्तव काय आहे ?’ हा श्री प्रदीप पाटील यांचा (आ.सु.जुलै २००५) लेख सगळा कळला नाही तरी विचारप्रवर्तक वाटला. त्यांना काही शंका विचाराव्याश्या वाटतात.
(१) ध्यानधारणा आणि स्वसंमोहन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वसंमोहनात विशिष्ट स्वयंसूचना दिल्या जातात. ध्यानाचे माझ्या मते तीन प्रकार होऊ शकतील. १) स्वयंसूचनाः उदाहरणार्थ ‘विश्रांती घ्या’ (“Relax’) असे शरीराला किंवा प्रत्येक अवयव वेगळे करून सांगणे. २) एखाद्या ‘लक्ष्या’ वर मन केंद्रित करणे. उदाहरणार्थ हसरी, प्रसन्न बुद्धमूर्ती मनापुढे आणणे. किंवा श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करणे. लक्ष केंद्रित करायचे ते दूरस्थपणे किंवा साक्षीभावाने ; श्वसनक्रियेत विक्षेप येता कामा नये. ३) मन शून्य’ करणे. प्रारंभी हे क्षणमात्रच शक्य होते पण ‘अभ्यासाने तो क्षण लांबविता येतो.’ असे ध्यान करणाऱ्या एका मित्राचे म्हणणे आणि मला तसा अनुभवही आला. (टिळकांनी मंडालेमधून लिहिलेल्या पत्रात, मन ‘शून्य’ करण्याचा प्रयत्न करतो, असे लिहिले आहे.)
पहिल्या दोन क्रियांत झटापट करावी लागत नाही. त्या सहजासहजी होतात. तिसऱ्या क्रियेत मात्र मनात शिरू पाहणारा विचार बाहेर काढून टाकणे ये प्रयत्नपूर्वक करावे लागते. ‘झटापट’ म्हणतो ती या अर्थाने. येथे मला पडणारा प्रश्न असा की एका बाजूने मन शून्य करणाऱ्या प्रयत्नात खर्ची होणारी ऊर्जा आणि मनःशांती मिळाल्यावर होणारी ऊर्जेची बचत यांचा हिशेब नेहमीच निव्वळ लाभदायक ठरतो का? की ही अडचण केवळ प्रारंभीच जाणवते ?
२) एखादा मंत्र, तांत्रिक उच्चार …. यांची गरज पडतेच असे नाही.
(३) मनोविज्ञानाचे निकष लावल्यास ताण-काळजी व तत्सम मनोविकार व समस्या यांच्या मुळाशी अनेक कारणे असतात. ही कारणे ध्यानाने नाहीशी होत नाहीत. हे म्हणणे अगदी बरोबर आहे. तरीही एक शंका : कुठलाही जीवनविषयक प्रश्न सोडविताना मनाची समधात अवस्था अवश्य असते. संकटाच्या वेळी माणूस गांगरून किंवा घाबरून जातो; तसे झाले तर संकटाचे निवारण करताना जो शांत विवेक हवा तो राहणार नाही. तेव्हा मुळातला प्रश्न असा की ध्यान करीत राहिल्याने मनाची ही विश्वब्ध, शांत, विवेकी अवस्था तयार होण्याला मदत होते की नाही? टिळकांना तशी मदत झाल्याचे दिसते.
(४) दुसरा दावा असा केला जातो की ध्यानाने समस्या सुटण्यास मानसिक बळ प्राप्त होते.
कदाचित वरचाच प्रश्न दुसऱ्या भाषेत मी मांडीत असेन. तरीही या बाबतीत एक उदाहरण देण्यासारखे आहे. असे बळ आपणाला मिळाले असा सावरकरांचा ‘दावा’ आहे. सावरकर जाहिरातबाजी करण्यापासून (जिचा उल्लेख पाटील यांनी पहिल्या व शेवटच्या परिच्छेदात केला आहे.) दूर होते हे मान्य व्हावे. किंबहुना या विषयासंबंधी बोलण्यासही ते तयार नसत. ‘बंदिशाळेत मी कुंडलिनीचा उबारा अनुभवला आहे’, असे त्यांचे उद्गार आहेत. (उद्धृत, शेषराव मोरे, सावरकरांचा बुद्धिवाद, अभय प्रकाशन, नांदेड, १९९२) अर्थात् संकटांनी डगमगून न जाण्याची वृत्ती सावरकरांमध्ये पूर्वीच, म्हणजे योगाभ्यास सुरू करण्याच्या अगोदरच, होती असेही म्हणता येईल. या म्हणण्याला सावरकरांचाच आधार देता येईल. “… माझ्या स्वभावाचा लहानपणापासून हाच विशेष की संकट येताच माझे मन दगडासारखे होऊन उलट एक प्रकारचे कर्तृत्वाचे अवसान चढे.” (उद्धृत, अरविंद गोडबोले, सावरकर विचारदर्शन, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८३)
स. ह. देशपांडे,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.