आजचा सुधारक चा जाने.-फेब्रु. ०४ (अंक १४.१०) हा आधुनिक विज्ञानाच्या स्वरूपावरचा विशेषांक होता. अभ्यागत संपादक होता चिंतामणी देशमुख, उर्फ ‘सीडी’. अंक वाचकांपर्यंत पोचताच मौज प्रकाशनगृहाचे श्री. पु. भागवत यांचा दूरध्वनी आला अंकाचे पुस्तक काढावे, आणि यात मौज मदत करेल! पुस्तक निघायच्या बेतात असताना सीडीचे २ डिसें. ०५ ला निधन झाले.
भागवतांचा निरोप सीडीला कळवल्यावरची त्याची प्रतिक्रिया मजेदार होती’चांगलं झालं असं समजायचं ना?” सीडी ‘डावा’, मार्क्सवादी, पण कर्मठही नव्हे आणि सहज ढळणारा लेचापेचाही नव्हे. त्याच्या विचारांचा पाया होता तो विज्ञानात. विज्ञानाची मूळ प्रेरणा माणसाच्या ऐहिक सुखाच्या ओढीतून येते, हे पूर्णपणे आत्मसात करून, त्याला सामाजिक भानाची जोड देऊन सीडी वाट चालत असे. साधारण मराठी विचारवंतांपेक्षा सीडीचे वेगळेपण हे वाट चालणे. सतत आपल्या धारणा, त्यांची मांडणी तपासत; अद्ययावत् ज्ञानाची, विचारांची दखल घेत राहणे. त्यामुळेच एका अग्रगण्य प्रकाशनसंस्थेकडून आपल्या कामाची दखल घेतली जाते आहे, कौतुक होते आहे, याने तो हुरळला नाही. उलट त्यातून आपण ‘बन चुके’, ‘प्रस्थापित’ तर होणार नाही ना, हा धोका त्याला जाणवला!
तो विशेषांक घडवायला सीडीने भरपूर मेहेनत घेतली. आय.आय.टी., टी.आय.एफ.आर. या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संस्थांमधील ‘ज्ञात्यांना वारंवार भेटत राहून शक्यतो ताजी मांडणी करायची धडपड केली. नंतरच्या अंकावरील प्रतिक्रियांवर अधिकारवाणीने उत्तरे न देता विज्ञानप्रेमींमधली मतभिन्नता सहजगत्या मान्य केली. एक मात्र सीडीला करावे लागले नाही, प्रस्थापितांच्या, मान्यवरांच्या विज्ञानविषयक लिखाणातले उतारे ‘शोधावे’ लागले नाहीत ते त्याच्या मनात सतत तपासले जात होतेच!
काही फ्रेंच गणिती आपले संशोधनपर लिखाण ‘सही’ न करता, बूरबाकी (इजणठइअघख) या नावाने प्रकाशित करत. त्यांच्या आद्याक्षरांवरून घडवलेला हा शब्द. बरेचदा लिखाणाचे मूल्यमापन ते कोणी केलेले आहे यावरून केले जाते अगदी गणित आणि विज्ञानातही हे घडते. हा अप्रत्यक्ष ‘बाबा वाक्य’ परिणाम टाळायचा बूरबाकी चा प्रयत्न सीडीला मोहवत असे. त्याला बहतेक सर्व लिखाण या तत्त्वानुसार लेखक अज्ञात राहून व्हावे, असे वाटत असे. निगर्वी मराठी विचारवंत या वर्गात असलेल्या माणसांची संख्या नगण्य आहे पण सीडी ठामपणे ‘तिथे’ बसतो.
जसा सीडी माणसांना, बाबा वाक्यांना दबत नसे तसाच तो विचारांमधील पंथांनाही दबत नसे. आधुनिकोत्तरवाद, पोस्टमॉडर्निझम, या पंथाबाबत त्याच्या मनात अनेक शंका होत्या. “त्यांची डीकन्स्ट्रक्शन ठीक आहे उपयोगी पडते, आपल्यालाही __ पण ते ज्ञानही संस्कृतिसापेक्ष असते म्हणतात तेव्हा …. ” माणसांच्या धारणा त्यांच्या इतिहासातून, संस्कृतीतून येणार हे उघडच आहे. पण त्यांतला ज्ञानाचा भाग निसर्गच ठरवतो. आधुनिकोत्तरांचे ज्ञानालाही संस्कृतिसापेक्ष मानणे, एपिस्टेमिक रिलेटिव्हिझम, हे सीडीला पटत नसे. पण आधुनिकोत्तर वाद आणि त्याची युक्तिवादाची शैली ‘फॅशनेबल’ आहेत ! तो प्रकार व्यर्थ आहे हे दाखवून देणारे फॅशनेबल नॉन्सेन्स हे पुस्तक सीडीला पाठ होते, आणि तो त्याचा जोरदार पुरस्कार करत असे. ज्ञानाला निसर्गसापेक्षच मानणारा, संस्कृतिनिरपेक्ष मानणारा सीडी हा एकटाच नाही. आणि ही भूमिका स्पष्ट करायची त्याची इच्छाही होती माझीही आहे, इतरही आहेत. या भूमिकेवर लेखमाला घडवायचा सीडीचा प्रयत्न होता. नोव्हेंबर २००५ अखेरीला त्याबद्दल सीडीला एक पत्र लिहिले पण पाठवणे झाले नाही. त्यातला काही भाग असा “जरी प्रफांवर ‘संपादकीय’ असे लिहिले असले तरी माझ्या मनात बूरबाकी तत्त्वच आहे. …. मी प्रत्येकाच्या ‘ताकदी’ वेगवेगळ्या समजतो. ही आवळ्याभोपळ्याची मोट बांधून ही लेखमाला घडायला हवी…. आधुनिक विज्ञानाच्या स्वरूपावरच्या विशेषांकाच्या हे पुढे जाईल, कारण त्या तात्त्विक विश्लेषणाचा व्यवहारी उपयोग आणि फॅशनेबल नॉन्सेन्स ला विरोध आपण नोंदतो आहोत. तू मला सर्वांत तटस्थ, संयत, ‘शहाणा’ वाटतोस, म्हणून नेतृत्व तुझ्या माथी मारतो आहे.” हे तोंडी बोलून झाले होते. पण माझे लेखी आर्जव पोचायच्या आतच सीडी वारला. एक चौकस, सगळ्या जगाच्या सगळ्या व्यवहारांत रस असणारा, प्रेमळ, ज्ञानी मित्र हरवला.