राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (१)

गेलनर ह्यांनी राष्ट्रवाद हा औद्योगिकीकरणाच्या आणि भांडवलशाहीच्या आवश्यकतेतून जन्मल्याचे मांडले आहे. त्यामुळे राष्ट्रवाद ही आधुनिक संकल्पना आहे व तिचा जन्म औद्योगिकीकरणापासून झाला असा त्यांचा सिद्धान्त त्यांनी Nations & Nationalism ह्या १९८४ साली प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात मांडला आहे. औद्योगिकीकरणाची परमसीमा गाठली आणि भांडवलशाही पूर्णपणे विकसित झाली तर राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनावर काय परिणाम होतील हा त्यावेळी त्यांच्यापुढे संभाव्य (हायपोथेटिकल) प्रश्न होता.१ पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आज जग अशा एका टप्प्यावर आहे की त्यांचा संभाव्य प्रश्न आज खराच आपल्यापुढे उभा आहे. राष्ट्राचे सार्वभौमत्त्व आणि राष्ट्राच्या सीमा हे दोन आधुनिक राष्ट्राचे निकष मानले जातात. ह्या दोन्ही वैशिष्ट्यांवर आज मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सांस्कृतिक आणि अल्प प्रमाणात राजकीय आक्रमण होत असल्याने बऱ्याच अभ्यासकांना राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे आकर्षण क्षीण होत आहे असे वाटते. जागतिकीकरणाच्या सुनामी लाटेत ह्या संकल्पना टिकणे शक्य नाही असे काहीजण खात्रीपूर्वक सांगत आहेत. आधुनिकोत्तर तत्त्वज्ञानाचे भाष्यकार बोमन ह्यांनी तर ‘राष्ट्र संपले आहे. लहान गटांनी प्रवेश केला आहे.’ (Exit nation, Enter tribes)’ अशी घोषणाच केली आहे. हॉबस्बॉम ह्यांनी राष्ट्रवादाच्या अस्ताचे भाकीत केले होते९ “”–the study and analysis of nations and nationalisms suggest that, as so often, the phenomenon is past its peak. The Owl of Minerva which brings wisdom, said Hegel, flies out at dusk. It is a good sign that it is now circling round nations and nationalism”2 OmoZ ~«wB©br omMonu_V VgoM Amho. “”–in most of the world nationalism as a genuine politics (rather than the rhetoric employed by all national governments) was disappearing”3. बेनेडिक्ट अँडरसन हे मात्र ह्या भाकितांशी सहमत नाहीत. दरवर्षी युनोच्या सदस्यांच्या संख्येत होणारी वाढ आणि अनेक देशांत होणारे विभाजन बघता, ह्या भाकिताला फारसा अर्थ नाही असे त्यांना वाटते. “The reality is quite plain : the’ end of the era of nationalism’ so long prophesied, is not remotely in sight.”13 पण बऱ्याच अभ्यासकांच्या मते ह्या संकल्पनांवर परिणाम जरूर झाला असला तरी ह्या संकल्पनाचा अस्त होईल असा कोणताही पुरावा नाही. त्यामध्ये काही बदल जरूर होतील, हे संभवते ४,५ असेच गेलनरप्रमाणे १ अनेकांचे मत आहे. मायकेल मानसारखे अभ्यासक राष्ट्र ही कल्पना जुनी झालेली आहे, मोडकळीला आलेली आहे, असे मानत नाहीत. “”The nation state is not hegemonic, nor is it obsolete as a reality or as an ideal.”4 राष्ट्रवाद हे जसे औद्योगिकीकरण आणि भांडवलशाही ह्यांचे अपत्य मानले जाते, तसाच त्याचा जन्म प्रबोधनाच्या चळवळीतून निघालेल्या आधुनिकतेच्या तत्त्वज्ञानात आहे.३ राष्ट्रवाद हे आधुनिकतेचे अपत्य मानले जाते. १९८० नंतर आधुनिकोत्तर काळाला सुरुवात झाली असे मानले जाते. आधुनिकोत्तरता, Postmodernism हा शब्द प्रथम १९६० साली वापरला गेला असला तरी १९८४ साली लायोटार्ड (Lyotard) ह्याच्या Postmodern Condition ह्या ग्रंथानंतर आधुनिकोत्तर काळाची मांडणी सुरू झाल्याचे मानले जाते. आधुनिकतेचे तत्त्वज्ञान आणि आधुनिकोत्तर तत्त्वज्ञान ह्यांत मूलभूत फरक आहे. साहजिकच समाजाचे तत्त्वज्ञान आधुनिकतेकडून आधुनिकोत्तर तत्त्वज्ञानाकडे वळल्यानंतर राष्ट्रवाद ह्या संकल्पनेवर परिणाम होणार. हे परिणाम दोन प्रकारे दिसून येतात. एक म्हणजे आधुनिक काळातील राष्ट्र म्हणजे एक सीमांकित प्रदेश, ह्या कल्पनेला मोठा धक्का बसला. माझा देश, माझी मातृभूमी ह्या जाणिवा क्षीण होऊ लागल्या. हा धक्का आर्थिक, सांस्कृतिक ह्या दोन्ही क्षेत्रांत दिसून येत आहे. दुसरे म्हणजे आधुनिकोत्तर काळातील तत्त्वज्ञानातून अस्मितेचे नवे राजकारण सुरू झाले. ह्या अस्मिता पूर्वीसारख्या राष्ट्रांच्या न राहता आता त्या अधिक प्रादेशिक, स्थानिक होऊ लागल्या.

राष्ट्रवादाचा तिसरा टप्पा हा १९६० पासून सुरू होतो. (पहिला १७८० ते १९१४, दुसरा १९१४ ते १९६०) व्हिएतनाम युद्धाचे दूरचित्रवाणीवर दाखवले जाणे आणि ह्याच सुमारास रशियाने चेकोस्लोव्हाकियावर केलेले आक्रमण, ह्या दोन घटनांचे फार दूरगामी परिणाम जगावर झाले. पहिल्या घटनेने प्रसारमाध्यमांच्या सामर्थ्याचे महत्त्व लक्षात आले आणि दुसऱ्या घटनेमुळे रशियन पतनाला प्रारंभ झाला. रशियाच्या पतनाचीही प्रक्रिया १९९१ साली पूर्ण झाली. १९६८ साली अमेरिकेत मानवी हक्कांच्या मागणीकरता चळवळ सुरू झाली. त्यातूनच अमेरिकेत नीग्रोंचे आंदोलन सुरू झाले. ह्याच काळात स्त्रीवादी चळवळींनी सर्व जगभर मूळ धरले. समलिंगी लोकांची चळवळसुद्धा ह्याच काळात सुरू झाली. युरोपात युरोपीय महासंघाच्या स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले. ह्याच काळात पाकिस्तानमधून फुटून निघून बांगला देशाची निर्मिती झाली. थोडक्या काळात घडलेल्या ह्या घटनांचा स्पष्ट अर्थ कळण्यास १९८० साल उजाडावे लागले. १९९० ला जर्मनीचे एकीकरण झाले. १९९१ साली साम्यवादी राष्ट्र असलेल्या सोव्हिएत रशियाचे विघटन सुरू झाले. रशियांतर्गत असलेल्या अनेक बाल्कन राष्ट्रांनी आणि इतरांनी स्वातंत्र्य मागण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता सोळा नवीन राष्ट्रांची निर्मिती झाली. रशियाच्या पतनापूर्वीपासूनच आर्थिक जागतिकीकरणाला सुरुवात झाली होती. ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्यावर परिणाम करणाऱ्या काही मुद्द्यांचा परामर्श खाली घेतला आहे. १)आर्थिक जागतिकीकरण
भांडवलशाही हेच राष्ट्रवादाचे मूळ समजले जाते. गेलनर ह्यांचा सिद्धान्त हेच मांडतो. दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि नंतर भांडवलदारीचा वेग वाढला आणि राष्ट्रांनी आपला व्यापारात राष्ट्रवादाला महत्त्व दिले. त्यातूनच आर्थिक राष्ट्रवादाची निर्मिती झाली. राष्ट्रीय अर्थकारण, छरींळेपरश्र एलेप चे महत्त्व वाढले. परदेशी मालांवर आयात कर लावून आणि निर्यात मालावर करमाफी किंवा सवलती देऊन व्यापार आपल्या राष्ट्राला कसा फायदेशीर ठरेल हे पाहिले जात होते. इंग्लंड, फ्रान्ससारखे वसाहतवादी देश आपल्या वसाहतींचा वापर हुकमी बाजारपेठ आणि कच्च्या मालाची खाण असा करत होते. वसाहतींच्या आर्थिक पिळवणुकीवरच ह्या राष्ट्रांची सुबत्ता होती. वाढत्या भांडवलशाहीबरोबर हा आर्थिक राष्ट्रवाद बळावला. तंत्रज्ञानातील विकासामुळे जे उत्पादन वाढते त्याला स्थानिक बाजारपेठा कमी पडतात, त्यामुळे त्या उत्पादनाकरिता नवीन ग्राहकपेठा शोधाव्या लागतात. १९७० ते १९८० च्या दशकात तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्यानंतर सर्वच देश संकटात सापडले. त्यातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकन अध्यक्ष निक्सन आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेंचर ह्यांनी पुढाकार घेतला. १९८० नंतर आर्थिक क्षेत्रात अमेरिका आणि ब्रिटन ह्यांनी जागतिकीकरणाचे धोरण राबविण्यास सुरुवात केली. केन्शियन अर्थशास्त्रातील कल्याणकारी राज्याची कल्पना आता त्याज्य ठरली. हे एक भांडवलशाहीच्या विकासातील आवर्तन होते (late capitalism). ह्या आर्थिक धोरणात तीन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात.

(१) उत्पादनात आंतरराष्ट्रीयता : पूर्वी फोर्ड कंपनी मोटारीचे सर्व भाग आपल्याच कारखान्यात तयार करून घेत असे. आता तीच कंपनी इंजिनचा एक भाग भारतातून तर दुसरा चीनमधून तर तिसरा जपान किंवा कोरियातून करून घेते. तीच गत मोटारीच्या बाह्यांगाची. काम उत्तम दर्जाचे आणि कमी किंमतीत होत असेल, तेथेच ते काम कंपन्या करून घेऊ लागल्या आता फोर्ड किंवा तत्सम मोटार कंपनी आपल्या कारखान्यातच मोटारीची जोडणी करत असली तरी ती खऱ्या अर्थाने ती मोटार ही एक आंतरराष्ट्रीय उत्पादन असते, कारण त्या मोटारीचे सुटे भाग जगाच्या निरनिराळ्या राष्ट्रांत बनवलेले असतात. जवळजवळ सर्व क्षेत्रांत उत्पादनाचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे.

(२) आर्थिक कामकाजाचे आंतरराष्ट्रीयीकरणः भाडवलपुरवठा ही नेहमीच उत्पादनक्षेत्रात महत्त्वाची बाब मानली जाते. अतिरिक्त भांडवल श्रीमंत देशांकडे म्हणजेच औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांकडे असणार हे उघड आहे. औद्योगिकदृष्ट्या मागास देशांपुढे भांडवलपुरवठा ही नित्याचीच मोठी समस्या असते. पूर्वी हा भांडवलपुरवठा मदत किंवा कर्ज ह्या रूपात होत असे. म्हणजे श्रीमंत राष्ट्र गरीब राष्ट्रांना कर्ज किंवा मदत रूपाने भांडवल देत असत (जरी हे प्रमाण कमी झाले असले तरी आजही देतात.). श्रीमंत राष्ट्रांच्या परराष्ट्रीय धोरणावर हे अवलंबून असे. आता भांडवलपुरवठा हा राष्ट्रीय नीतीशी न जोडता भांडवलदारावर सोडण्यात आला आहे.

भांडवलदाराला फायदा जेथे जास्त असेल आणि जेथे आपले भांडवल सुरक्षित वाटत असेल तेथे तो गुंतवण्यास मुक्त आहे. त्यायोगे प्रगत देशातील भांडवल मागासभागात किंवा विकसनशील देशांत येऊ लागले आहे. गेल्या काही वर्षांत परदेशी भांडवल भारतातही येत आहे. चीनमध्ये तर ते १९७० पासूनच येत आहे. चीनमध्ये अमेरिकेची बरीच गुंतवणूक आहे. परकीय भांडवल आमंत्रित करण्यासाठी पूर्वी केंद्रीय मंत्री जात असत. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिगणही जात आहेत. भांडवल-गुंतवणूक भांडवलदाराच्या इच्छेवर अवलंबून असल्याने, ती गुंतवणूक तो भांडवल सुरक्षित आहे आणि फायदा आहे तोपर्यंतच ठेवतो. भांडवल थोडेसेदेखील असुरक्षित वाटले तर एका रात्रीत ते काढून घेतले जाऊ शकते. त्यात राष्ट्रांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. मध्यंतरी १९८७ साली झालेल्या आशियाई आर्थिक संकटामागे हेच कारण होते. त्यामुळेच त्याला कॅसिनो अर्थशास्त्र म्हटले जाते. (जुगाराचे अर्थशास्त्र).

(३) कामगारांच्या श्रमाची अनेक राष्ट्रांत विभागणी : हा एक आधुनिक युगाचा मानबिंदू ठरला आहे. औद्योगिक भांडवलशाहीत फोर्ड कंपनीने अंमलात आणलेल्या असेंब्ली लाईन उत्पादन निरनिराळ्या उत्पादनव्यवस्थेमुळे आता उत्पादन एकाच ठिकाणी न करता मूळ वस्तूच्या सुट्या भागांचे उत्पादन निरनिराळ्या ठिकाणी करण्याचे तंत्र विकसित झाले. तिसऱ्या जगातील स्वस्त श्रमशक्तीचा वापर करणे पाश्चात्त्य देशांना फायदेशीर ठरले. त्यातूनच दक्षिण कोरिया, तायवान, सिंगापूर हे लहान लहान देश औद्योगिक क्षेत्रात नकाशावर आले. कमी पगारात काम करणारा कामगार विकसनशील देशांत मिळू लागला. मागास देशांनाही बेरोजगारीची समस्या सोडवण्यास ही सुसंधी वाटली. ही व्यवस्था उभयपक्षी फायद्याची ठरल्याने जागतिकीकरणाला वेग आला. ज्या देशात कामगाराची उत्पादकता अधिक असेल त्या देशात भांडवल जाईल. पण भौगोलिक, सांस्कृतिक किंवा अन्य कारणाने एखाद्या ठिकाणचे कामगार उत्पादन अधिक चांगल्या रीतीने करत असतील, तर ते काम त्या देशांकडे सोपवण्यात येते. भारतातील सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे लोक अधिक कार्यक्षम ठरल्यामुळे ते काम भारताकडे येत आहे. कॉम्प्युटरक्षेत्रात आऊटसोर्सिंग हा परवलीचा शब्द बनला आहे. त्याचा अर्थच किफायतशीर असेल तर ते काम बाहेरून करून घेणे.
आर्थिक धोरणे ठरवणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या अमेरिका, जपान आणि युरोपियन संघराज्य ह्यांच्या आधिपत्याखाली आहेत. तोंडी लावण्यापुरते एकदोन मागास देशांना बोलावले जाते. आपल्या फायद्याचीच धोरणे अंमलात आणली जातात. आंतरराष्ट्रीय बँका, आयएमएफ, गॅट इ. अनेकरिपरींळेपरश्र संघटना (राष्ट्रातीत) निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या योजना, त्यांची धोरणे, विकसनशील राष्ट्रांना आपली धोरणे बदलण्यास लावतात. खचक्र च्या दडपणाखाली आपण आपली आर्थिक धोरणे बदलली हा इतिहास अगदी ताजा आहे. नवीन आर्थिक धोरण हे आपल्यावर लादले गेले आहे (त्यांचे चांगले-वाईट परिणाम हा मुद्दा वेगळा). आर्थिक जागतिकीकरणाच्या परिणामी प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय अटींप्रमाणे आपल्या आर्थिक नीतीत बदल करून घेणे सक्तीचे झाले. आर्थिक नीतीत बदल करून घेऊन प्रगतीच्या शर्यतीत राहणे अगत्याचे झाले. एकीकडे जागतिकीकरणाचा फायदा करून घेण्याचे गाजर दाखवले जात होते तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बँका, खचक्र ह्यांसारख्या संस्थांमार्फत देशाचे आर्थिक धोरण सक्तीने बदलावे लागत होते. एक प्रकारे जागतिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक सार्वभौमत्वालाच आच लावली जात होती.

संदर्भ:
१) गेलनर
2) E.J.Hobsbawm – Nations And Nationalism since 1780 Programme, Myth, Reality – Cambridge University Press – 1900 page 112
3) John Breuilly – Approaches to Nationalism – Mapping the Nation – Ed. by Gopal Balkrishnan – Verso London – 1996.
4) Michael Mann – Nation States in Europe and Other Continents – Diversifying, Developing, Not Dying – Mapping the Nation – Ed. by Gopal Balkrishnan – Verso London – 1996.
5) David Held – Decline of Nationalism – Becoming Nation – Ed by Geof Eley and Ronald Grigor Suny – Oxford University Press – 1996
6) Martyn Oliver – History of Philosophy – Hamlyn – 1997.
7) Michael Billig – Banal Nationalism – Sage – 1995. 13)Benedict Anderson – Imagined Communities – Verso New York – 1991. page 3
देशमुख हॉस्पिटल, उदगीर (जि.लातूर) ४१३ ५१७.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.