प्रा. नोम चोम्स्की (जन्म १९२८) हे अमेरिकन भाषावैज्ञानिक दोन कारणांसाठी जगप्रसिद्ध आहेत. भाषाविषयक त्यांच्या संशोधनाने या क्षेत्रात क्रांतिकारक पॅरॅडाइम बदल घडवून आणला, तसेच १९६०-७० च्या दशकात व्हिएतनाम युद्धकाळात अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सरकारच्या विरोधात जो उठाव केला त्याला मार्गदर्शन करण्यासाठीही ते उभे राहिले. तेव्हापासून सातत्याने त्यांनी उदारमतवादी, लोकशाहीवादी भूमिकेतून डाव्या चळवळीचे वैचारिक प्रवक्ते म्हणून कामगिरी बजावली आहे. आदर्श अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकशाहीवर आधारित समाजवादी समाजरचना उभारण्याचे ध्येय ते वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावरही बाळगून आहेत, आणि तशी मांडणी करत आहेत.
जानेवारी १९७१ मध्ये चोम्स्कींना ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, इंग्लड येथे ‘बर्हाड रसेल स्मृती व्याख्यानां’साठी आमंत्रित केले गेले. जग समजून घेण्यासंबंधी’ (On Interpreting the World) आणि ‘जग बदलण्यासंबंधी’ (On Changing the World) ही दोन भाषणे ‘ज्ञान आणि स्वातंत्र्य यांचे प्रश्न’ (Problems of Knowledge and Freedom) या शीर्षकाखाली पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहेत. (पीरपर, १९७२) तीन दशकांचा काळ उलटल्यानंतर ही भाषणे वाचताना जग इतक्या झपाट्याने बदलले आहे आणि बदलते आहे तरी कितीतरी गोष्टी तश्याच राहिल्या आहेत, अशी एक जाणीव झाली. म्हणून हे विलंबित परीक्षण. माणसाचा मूळ (खपीळपीळल) स्वभाव आणि सर्जनक्षमता याबद्दलची रसेल यांची ‘मानवतावादी संकल्पना’ चोम्स्कींनाही मान्य आहे. आणि रसेल यांच्या उदारमतवादी आणि मानवतावादी (Liberal and humanistic) भूमिकेचा पाठपुरावा हे चोम्स्की यांच्या दोन्ही भाषणांमधील मूलभूत समान सूत्र आहे पहिले भाषण खूप तात्त्विक स्वरूपाचे असून प्रस्तुत लेखकाच्या समजेच्या फार पलिकडचे आहे, त्यामुळे विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाशी निगडित काही मुद्द्यांचा उल्लेख करून थांबणार आहे. दुसरे भाषण जास्त समजणारे असल्याने त्याचे आताच्या काळातले महत्त्व मात्र काहीसे आश्चर्यचकित करणारे आहे. त्यावर थोडे अधिक लिहावेसे वाटते. पहिल्या भाषणात चोम्स्कीनी प्रत्यक्षदर्शीवाद (empiricism) आणि उद्गमन तत्त्व (induction) याबद्दलच्या रसेल यांच्या भूमिकेवर चर्चा केली आहे. ज्ञानसंपादना-बाबतच्या प्रत्यक्षदर्शीवादाच्या मर्यादा रसेल मान्य करतात. माणसांचा बाह्य जगाशी येणारा संपर्क इतका अल्प, वैयक्तिक पातळीवरचा आणि मर्यादित असूनहि त्यांना जगासंबंधी एवढे ज्ञान कोठून येते, हा त्यांच्यापुढील प्राथमिक प्रश्न आहे. त्यांनी म्हटले आहे की, “एकतर माणसाला अनुभवाशिवायच काही ज्ञान प्राप्त असते, किंवा विज्ञान ही अर्थहीन बडबड (moonshine) आहे.’ उद्गमनाच्या जोडीलाच अ-प्रात्यक्षिक अनुमानाची (non demonstrative inference) काही तत्त्वे मानली पाहिजेत, त्यांखेरीज वैज्ञानिक अनुमान स्वीकारणे कठीण होईल असे त्यांचे मत होते. ही तत्त्वे माणसाच्या अनुभवावर आधारित असू शकत नाहीत; मात्र त्यावर आधारित निष्कर्ष अनुभवाद्वारे तपासता येतात. प्रत्यक्ष अनुभवाने तपासल्यावर खरे निघतात तेच निष्कर्ष मान्य करावे या मर्यादित अर्थानेच रसेल प्रत्यक्षदर्शीवाद मानतात.
माणसाला उपजतच काही पूर्वज्ञान असू शकते. ही संकल्पना चोम्स्कीना अजिबात गैर वाटत नाही. भाषेच्या बाबतीत त्यांनी मानवजातीची (human species) विशिष्ट अशी भाषारचनेची उपजत तत्त्वे (innate principles of language structure) असतात असे गृहीतक मांडले आहेच. याबाबत त्यांनी जॅक्कस मोनोद (जीवशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते) यांना उद्धृत केले आहे : “ह्या (चोम्स्कींच्या) संकल्पनेने काही तत्त्वज्ञांना किंवा मानववंशशास्त्रज्ञांना फार घोटाळ्यात टाकले आहे. कारण यात कार्टेशियन मेटॅफिजिक्सचे पुनरागमन झाल्याचे त्यांना वाटते. परंतु या गृहीतकात अभिप्रेत असलेला सुप्त जीवशास्त्रीय अर्थ लक्षात घेतल्यास यात मला काहीच धक्कादायक वाटत नाही.”
हाच धागा चोम्स्की पुढे नेतात. जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता मनासंबंधित काही अंगभूत, उपजत तत्त्वे उत्क्रांतिक्रमात तयार झाली असावीत असे त्यांना वाटते. या तत्त्वांमुळे एका बाजूने ज्ञान आणि विश्वास /श्रद्धा (Knowledge and Belief) प्राप्त करणे माणसाला शक्य होते, तर दुसऱ्या बाजूने या ज्ञानप्राप्तीच्या आवाक्याच्या मर्यादाही त्यांच्यामुळेच ठरतात. मनाच्या घडणीतील ही उपजत तत्त्वे आपल्याला आश्चर्यचकित करणारी असून यावर अधिक संशोधन केले पाहिजे असे चोम्स्कींचे प्रतिपादन होते. असे बरेच संशोधन दरम्यानच्या काळात झालेलेही आहे.
उत्क्रांतिप्रक्रियेत मानवी मेंदूची जी जडणघडण झाली त्यातून माणसाची जाणीव आणि आत्मभान उदयास आले. आणि यातूनच माणसाची जग समजून घेण्याची प्रक्रिया मार्गी लागली. विज्ञान हा त्याचाच एक भाग त्यामुळे विज्ञानप्रक्रिया, विज्ञानाचे तत्त्वज्ञान यांचा विचार करताना मनाच्या रचनेत अंतर्भूत अशी काही उपजत तत्त्वे गृहीत धरल्यास जास्त बोध होऊ शकेल का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. विज्ञानाच्या मर्यादा’ या बाबत तर हे नक्कीच महत्त्वाचे ठरेल.
चोम्स्कींचे दुसरे रसेल-भाषण ‘जग बदलण्यासंबंधी’ तीस वर्षांच्या कालावधीनंतरही ताज्या घडामोडींवरचे आजचे भाष्य वाटावे अशी एक शिरशिरी भरवणारी जाणीव निर्माण करते. या भाषणातील राजकीय घडामोडींचे संदर्भ १९६०-७० च्या दशकातील व्हिएतनाममधील युद्धाचे असले तरी तेथे व्हिएतनाम ऐवजी अफगणिस्तान वा इराक लिहिल्याने फार फरक पडणार नाही. या भाषणाची सुरुवातच चोम्स्कींनी रसेल यांच्या मानवतावादाच्या संकल्पनेने केली आहे. ती थोडक्यात अशी : एखादा बागवान ज्याप्रमाणे वृक्षाच्या रोपाकडे बघतो, त्याप्रमाणे लहान मुलाकडे बघावे. म्हणजे स्वतःची अंगभूत, उपजत विशिष्ट गुणवत्ता असलेले काही एक की ज्याला योग्य माती, हवा आणि प्रकाश उपलब्ध करून दिल्यास त्याची वाढ त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार मोठ्या विशिष्ट स्वरूपाच्या वृक्षात होईल.
यावर चोम्स्कींचे भाष्य आहे की जसजशी आपल्याला माणसाच्या अत्यंत साध्या आणि दैनंदिन व्यवहारांतील कृतींमागील (म्हणजे भाषा, संवाद, हाताने काम करणे, सामाजिक व्यवहार इत्यादि) अचल (Invariant) संरचना आणि तत्त्वे यांची समृद्ध प्रणाली संशोधनाद्वारे सापडत आहे, तसतशी माणसासंबंधीच्या ह्या संकल्पनेला अधिक सखोलता आणि अर्थगर्भता प्राप्त होत आहे.
ह्या संकल्पनेनुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त स्वरूपात खूप सर्जनक्षमता अस्तित्वात असते. आदर्श समाजरचनेत योग्य स्वरूपाचे शिक्षण आणि समाजसंघटन व संस्थारचना यांच्याद्वारे ही क्षमता मुक्तपणे फुलारू शकेल. हिंसा वा क्रांतिकारक उलथापालथ यांच्याऐवजी शांततापूर्ण, लोकशाहीवादी मार्गाने लोकशिक्षणाद्वारे हा शहाण्या नागरिकांचा समाज निर्माण करायचा आहे. प्रत्येकाच्या मनात आपल्याकडे आहे ते जपण्याची वा इतरांकडे आहे ते मिळविण्याची हाव न राहता नवीन निर्मिती करण्याची ऊर्मी धगधगत असावी असा बदलही अपेक्षित आहे. ह्या आदर्श रचनेची तुलना वास्तव परिस्थितीशी केली की समाज बदलण्यासाठी काय व्हायला पाहिजे ते स्पष्ट होते. हे कसे घडवून आणायचे हाच खरा कठीण प्रश्न आहे. शिवाय त्या दिशेने थोडीबहुत पावले पडत आहेत अशा आशावादालाही फार वाव नाही, तरीही…
समाजवादासाठी लोकशाहीशी वचनबद्ध असलेल्या प्रगत औद्योगिक समाजव्यवस्थेतील संस्थारचना अस्तित्वात असणे गरजेचे आहे, अशी रसेल यांची भूमिका होती. त्याशिवाय समाजवादाची यशस्वी उभारणी शक्य नाही. औद्योगिक समाजातील समाजवाद एक प्रकारचा ‘राज्य समाजवाद’च (State Socialism) असू शकतो. अशीही त्यांची धारणा होती. मात्र ही प्रक्रिया हिंसक राजकीय क्रांतीची नसून धिम्या आणि शांततापूर्ण पद्धतीने घडून आली पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणावर मतपरिवर्तन आणि शिक्षणाचे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. अमेरिका हे जगातील सर्वांत पुढारलेले भांडवलशाही राष्ट्र असल्याने समाजवादी विचारांचा ह्या प्रकारचा प्रचार तेथेच करण्याची सर्वाधिक गरज आहे, असेही त्यांचे मत होते.
चोम्स्कींना रसेल यांचा हा मार्ग अतिशय योग्य आणि वाजवी वाटतो. आतापर्यंत झालेल्या समाजवादी क्रांत्या (रशिया, चीन, क्यूबा, इत्यादी) या दृष्टीने पाहता यशस्वी होणाऱ्या नव्हत्याच. त्या क्रांत्यांमागील साम्राज्यवादविरोध सर्वांनीच पाठिंबा देण्याजोगा होता. तेथील मागास आणि गरीब समाजांचा विचार करता त्यांनी केलेली प्रगती, तेथील नागरिकांच्या क्षमतावाढीस मिळालेला वाव हे बऱ्यापैकी कौतुकास्पद होते आणि आहे. त्याबद्दल त्यांना सहानुभूती आणि पाठिंबा देणेही जरूर आहे. मात्र तेथील संस्थारचना आणि राज्यकारभारव्यवस्था बघता त्यांना समाजवादी रचना म्हणणे शक्य नाही.
औद्योगिकदृष्ट्या प्रगत रचना असलेल्या समाजातच खरा समाजवाद येणे शक्य आहे, हे म्हणताना रसेल तसेच चोम्स्की मूलतः मार्क्सची भूमिकाच अधोरेखित करताहेत हेही लक्षात ठेवले पाहिजे. मानवतावादाविषयीच्या मार्क्स आणि रसेल यांच्या संकल्पनांतील साम्येही चोम्स्कीनी नोंदली आहेत. ‘सुरुवातीच्या’ (Early) मार्क्सने श्रमाची प्रतिष्ठा आणि महत्त्व याबद्दल मांडलेले विचार रसेलना पटणारेच होते. ‘मुक्तपणे जाणीवपूर्वक केलेले काम’ (Free conscious activity) आणि ‘उत्पादक जीवन’ (Productive life) ही मानवाची ‘जातिवैशिष्ट्ये’ (डशिलळशी उहरीरलींशी) आहेत असे मार्क्सने सांगितले. अधिक प्रगत पातळीवरच्या समाजात तर ‘श्रम फक्त जगण्याचे साधन राहणार नाहीत, तर जीवनातील सर्वोच्च गरज होईल’ असेही म्हटले.
अर्थात सध्याच्या पार्श्वभूमीवर बघता रसेल यांनी पुरस्कारलेला मार्ग योग्य असला तरी प्रत्यक्षात ते ध्येय साध्य करणे पूर्वीइतकेच दूर आहे हे चोम्स्की मान्य करतात. आणि तीस वर्षांपूर्वीचे ते सांगणे आजमितीसही तितकेच खरे आहे.
याचे कारण म्हणजे रसेलना अभिप्रेत असलेले संस्थात्मक बदल घडवून आणण्यात आलेले अपयश. व्यक्तीच्या सर्जनशीलतेला मुक्तपणे प्रकट व्हायला वाव मिळेल अशा प्रकारे संस्थांची पुनर्रचना रसेलना हवी होती. जुन्या संस्थांच्या जागी येणाऱ्या नव्या संस्थांनी नव्या प्रकारे अधिकार गाजवणे अभिप्रेत नव्हते. मात्र काळाच्या ओघात अनेक बदल झाले त्यांची दिशा काही व्यक्तिस्वातंत्र्याला वाव देणारी नव्हती. सरकार, राज्यसत्ता, खाजगी भांडवली संस्था यांची मक्तेदारी व केंद्रीभूत सत्ता कमी व्हायच्या ऐवजी अधिकाधिक बळकटच होत गेली. सध्याच्या जागतिकीकरणाच्या धडाक्यात तर राष्ट्रीय सीमा ओलांडून हे केंद्रीकरण आंतरराष्ट्रीय होत चालले आहे.
साम्राज्यवादी/नवसाम्राज्यवादी राष्ट्र-राज्ये, खाजगी भांडवलाच्या हातातील बहुराष्ट्रीय कार्पोरेशन्स, माध्यमांची साम्राज्ये इत्यादींमुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकाधिक संकोच होत गेला. व्यक्तीच्या दैनंदिन व्यवहारातील अधिकाधिक अवकाश राज्यसत्ता, खाजगी भांडवल, प्रसारमाध्यमे स्वतःच्या फायद्यासाठी यशस्वीपणे व्यापत आणि वापरत आहेत. व्यक्तीच्या आंतरिक क्षमतेला फुलारण्यास वाव मिळण्याऐवजी समाजाची मानसिकता जाहिरातबाजी, प्रसारमाध्यमे यांच्याद्वारे अशाप्रकारे घडविली जात आहे की व्यक्ती एक ग्राहक म्हणून नफ्याचा स्रोत बनावी, नागरिक म्हणून आज्ञाधारक, दिलेला हुकूम पाळणारी बाहुली बनावी, आणि हीरींश छशु थीश्रव, १९८४ वगैरेतील परिस्थिती साहित्यातील बंडखोर टीकेऐवजी वास्तवातील गोष्ट व्हावी.
रसेलना अभिप्रेत मुक्त उदारमतवादी समाजाऐवजी व्यापारी-धंदेवाईक वृत्तीची सामाजिक जडणघडण निर्माण होत आहे. ज्ञानाचे अवकाश माहितीच्या महापुरात बुडविले जात आहे.
हे सर्व वर्णन तीस वर्षांपूर्वीइतकेच आजही चपखल लागू पडणारे आहे, किंबहुना अधिकच. मात्र तेव्हाच्या व आजच्या परिस्थितीत एक फार मोठा फरक आहे. तेव्हा शीतयुद्धाचा काळ होता. अमेरिका आणि सोविएत युनियन ह्या दोन महासत्ता होत्या. जगाची विभागणी वरवर तरी भांडवली लोकशाही आणि समाजवादी हुकुमशाही अशी झाली होती, आणि व्हिएतनाम युद्धही चालू होते. शीतयुद्धाच्या धुरात तेव्हा बऱ्याच गोष्टी धूसर झाल्या होत्या, स्पष्ट जाणवत नव्हत्या. एका बाजूस भांडवलशाही, साम्राज्यवादी परंतु तरीही अंतर्गत लोकशाहीवादी गट; तर दुसरीकडे समाजवादी परंतु पक्षीय हुकुमशाहीवाला, लोकशाही नसलेला गट असे विभाजन दिसत होते. भांडवलशाही/व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजवाद/व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप असे ध्रुवीकरण मांडले जात होते. भांडवलशाही राष्ट्रांचा साम्राज्यवादी, नववसाहतवादी दृष्टिकोन वाईट असला तरी तेथे लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य असल्याने सोविएत समाजवादी हुकुमशाहीपेक्षा ते बरे, दगडापेक्षा वीट मऊ अशी काहीशी धारणा जगभरातील उदारमतवाद्यांमध्येही होती. लोकशाही आणि समाजवाद ही दोन टोके असल्याचेही कळत-नकळत मोठ्या प्रमाणावर मानले जात होते. इतकेच नव्हे तर अनेक साम्यवादीही लोकशाही स्वातंत्र्य म्हणजे भांडवलशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी पक्षीय हुकुमशाही म्हणजेच समाजवाद अशी धारणा झाल्यासारखे वागत होते.
या ध्रुवीकरणाबद्दल चोम्स्कींचा शेरा महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की व्यक्तिस्वातंत्र्यवादी, मानवतावादी अशा रसेलप्रणीत सामाजिक अवकाशाचा विचार केला तर सर्वसामान्यपणे दोन विरोधी ध्रुवांसारख्या वाटणाऱ्या या दोन समाजपद्धती कदाचित एकाच ध्रुवाजवळचे दोन फार अंतर नसलेले बिंदू ठरतील. सोविएत युनियनमध्ये समाजवाद आहे असे म्हणणे जितके चूक, तितकेच पाश्चात्त्य राष्ट्रांत खरीखुरी उदारमतवादी लोकशाही आहे असे म्हणणेही चूकच. कॉर्पोरेट भांडवलशाही आणि पक्षीय राज्य समाजवाद यांमध्ये खूप साम्य आहे. पक्षाच्या समाजवादी नेतृत्वाप्रमाणेच कॉर्पोरेट अधिकाऱ्यांचीही ठाम समजूत असते की आपण आणि आपली संस्था व्यापक समाजाच्या हिताचेच खरे प्रतिनिधित्व आणि रक्षण करत असतो. सध्या तर खाजगीकरणाचे पुरस्कर्ते विद्वानही हीच भाषा करतात. चंद्राबाबूंसारखे मुख्यमंत्री आणि माशेलकरांसारखे वैज्ञानिक स्वतःला उ.ए.ज. म्हणवणे पसंत करतात.
व्हिएतनाम युद्धाच्या संदर्भात चोम्स्कींनी पाश्चात्त्य संस्कृतीमधील दुटप्पीपणा, लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मुखवट्याआड झाकली गेलेली सत्य परिस्थिती उघड करून मांडली आहे. आणि मुख्यतः अमेरिकन समाजव्यवस्थेतील परिस्थितीवर प्रखर प्रकाश टाकला आहे. जगातील सर्वाधिक प्रगत समाजातील ही स्थिती अर्थातच सर्व जगाच्या स्थितीविषयीच चिंता निर्माण करणारी आहे. सध्याच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगाच्या घोडदौडीत ‘व्यवस्था’ (system) कोणत्या चाकोरीत अडकली आहे हे यातून स्पष्ट होते.
एकंदरीत चोम्स्कींचा रोख खाजगी कॉर्पोरेशन आणि राष्ट्र-राज्य या संस्थांवर आहे. उदारमतवादी, मानवतावादी समाजवादाच्या बांधणीसाठी या संस्थांच्या जागी वेगळ्या प्रकारच्या संस्थांची उभारणी करणे गरजेचे आहे.
याबाबत त्यांनी अमेरिकेतील परिस्थितीसंबंधी मारलेले शेरे महत्त्वाचे आहेत:
राष्ट्र-राज्य कधीही पूर्णतः लोकशाहीचे नव्हते ; लोकशाही पद्धतीच्या कमी-जास्त जवळ येणे इतपतच यश या संस्थेने प्राप्त केले आहे. अमेरिकेत तर प्रजासत्ताकाचे (republic) रूपांतर घटनात्मक हुकुमशाहीत (constitutional dictatorship) करणे ही युद्धकाळातील नेहमीची युक्तीच झाली आहे. यावेळी शासकीय आणि अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या हातात प्रचंड घटनाबाह्य सत्ता एकवटली जाते. आणि ही गरज तशी कायमस्वरूपी झालेली आहे.
चोम्स्की म्हणतात की अमेरिकेत खाजगी आर्थिक सत्तेचे प्रचंड केंद्रीकरण झालेले आहे, आणि त्या सत्तेचेच प्रतिनिधी शासनयंत्रणेत महत्त्वाची पदे सांभाळत असतात. येथे नुकताच येऊन गेलेला मायकेल मूरचा फॅरनहाइट ९/११ माहितीपट आठवावा!
अमेरिकन शासनव्यवस्थेतील संरक्षणविषयक पेंटगॉन रचना’ अमेरिकन समाजात खूप खोलवर रुजलेली असून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य व्यवस्थापन (state management) म्हणून तिची गणना होत होती. आता ती प्रथम क्रमांकावर आहे. ही आहे ‘मुक्त’, ‘खुल्या’ समाजव्यवस्थेतील खरी कहाणी ! येथे पुन्हा फॅरनहाइट ९/११!.शीतयुद्धाबद्दल चोम्स्की म्हणतात की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अमेरिकन समाजात शीतयुद्धाचे वातावरण तापवले जाण्यामागे एक महत्त्वाचा उद्देश होता. तो काही सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेल्या अनाकलनीय आणि विकृत भीतीचा प्रकार नव्हता. युद्धानंतर अमेरिकन राज्यसत्ता साम्यवादविरोधी झेंड्यामागे अतिशय हुशारीने वळविली गेली होती. मानसिक आणि राजकीय पातळीवरची ही व्यूहरचना तशी नेहमीच्या वापरातील होती आणि ती यशस्वीही झाली. बहुसंख्य अमेरिकन नेत्यांच्या लक्षात आले होते की युद्धकाळात ज्याप्रमाणे अमेरिकन जनतेने अंग झोकून काम केले तो कामाचा वेग टिकवायचा असेल आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत जनतेकडूनच मोजून घ्यायची असेल तर जनतेला पुन्हा चेतवावे लागेल. त्यासाठी अमेरिकन जनतेला धास्तावून टाकण्याची गरज आहे. (It would be necessary to scare the hell out of the American people.) साम्यवादाचा बागुलबोवा या कामी आला होता. शीतयुद्धाच्या या वातावरणनिर्मितीने सर्वसाधारण अमेरिकन जनतेची मानसिकता तर राज्यसत्तेला आणि आर्थिकसत्तेला अनुकूल अशी घडविलीच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे समाजातील बुद्धिजीवी आणि सर्जनशील वर्गालाही आपल्याला उपयुक्त अशा साच्यात बसविण्याचे काम केले. सुरुवातीच्या मॅकार्थीवादाच्या झंझावातात डाव्या, पुरोगामी, उदारमतवादी व्यक्तींना झोडपून काढताना जी दहशत निर्माण केली गेली त्यामुळे हा वर्ग मग घाबरून जाऊन सत्ताधाऱ्यांच्या खेळात स्वतःचे सामिलीकरण करून घेण्यात (cooptation) मोठ्या प्रमाणात सहभागी झाला.
याचा महत्त्वाचा परिणाम झाला तो संशोधन-शैक्षणिक जगतात. अमेरिकन विद्यापीठांचे मोठ्या प्रमाणावर राजकीयीकरण झाले. व्हिएतनामयुद्धविरोधी आंदोलनाने शिक्षणक्षेत्रातील प्रस्थापित एकवाक्यतेला तडा गेला. या काळात बंडखोर, प्रस्थापितविरोधी विचारसरणीचे अनेक तरुण, कनिष्ठ प्राध्यापक विद्यापीठक्षेत्रातून बाहेर फेकले गेले, विशेषतः ‘न-अभिजन’ (non-elite) संस्थांतून. चोम्स्कींच्या मते महायुद्धोत्तर राज्यकर्त्यांच्या भूमिकेशी असलेली जनतेची एकरूपता पुनःप्रस्थापित करण्यासाठी जी सर्वसाधारण मोहीम आखली गेली होती त्याचाच हा एक भाग होता. अमेरिकेतील ही ‘वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थापना’ (Scientific and Educational Establishment; गॅलब्रेथनी यासाठी ‘इस्टेट’ शब्द वापरला आहे) फार महत्त्वाची आहे, आणि प्रस्थापित सत्तासमतोलाच्या जाळ्यात बऱ्यापैकी घट्ट विणली गेलेली आहे.
चोम्स्की म्हणतात की, ‘राज्यकर्त्यांचे राजकारण आणि उद्योगधंद्यांचे अर्थकारण यांची आज्ञाधारकपणे अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य भौतिकी वैज्ञानिक आणि इतिहासकार या दोघांनीही बऱ्याच अंशी स्वीकारले आहे.’ म्हणजे विज्ञान आणि समाजशास्त्रे या दोन्ही क्षेत्रातील बुद्धिजीवी, विचारवंत राज्यकर्त्यांना सामील आहेत. येथे कलावंत, माध्यमांतील तारे/तारका यांचा उल्लेख चोम्स्की का करत नाहीत हे कळत नाही ! वैज्ञानिक शस्त्रास्त्रे,संरक्षणविषयक अन्य गरजेचे विषय, नफा कमावण्यासाठी उपयुक्त तंत्रे व साधने अशाबाबत उत्साहाने, किमान विनातक्रार, संशोधन करतात. समाजशास्त्रज्ञ राज्यसत्ता आणि प्रस्थापित अर्थकारण यांना देशी-परदेशी उपयुक्त ठरेल असेच संशोधन करतात. यापलीकडचे संशोधन करण्यास फारसा वाव दिला जात नाही, प्रसंगी विरोधही होतो. परंतु याबाबत फार तक्रारीचा सूर या ‘इस्टेट’मधून उमटत नाही. याचे एक उदाहरण चोम्स्कींनी दिले आहे. ते चिंतन करण्याजोगे, तसेच चिंतित करणारे आहे.
स्टॅन्डर्ड ऑईल ऑफ न्यू जर्सी, ही तेल कंपनी प्रचंड मोठा कारभार असलेली. जगातील अनेक देशांच्या उलाढालीपेक्षाही तिची आर्थिक उलाढाल मोठी. जगभर पसरलेले जाळे, स्वतःची मोठी निमलष्करी सुरक्षाव्यवस्था वगैरे बाळगणारी ही कंपनी साहजिकच अमेरिकन राजकारणात आणि अर्थकारणात फार महत्त्वाची. परंतु ‘स्टॅन्डर्ड ऑईल ऑफ न्यू जर्सीचे अमेरिकन समाजातील स्थान आणि प्रभाव’ अशा प्रकारचा अभ्यास एखाद्या विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात झाला आहे का याचा शोध घेता त्यांच्या हाती शून्यच लागले. उलटपक्षी अनेक विद्यापीठांत थायलंडविषयक खूप तपशीलवार संशोधन झाल्याचे त्यांच्या ध्यानी आले. थाय संस्कृती, इतिहास, भूगोल, सामाजिक व आर्थिक परिस्थिती अशा विविध प्रकारच्या अभ्यासांचे मुबलक अहवाल उपलब्ध होते. थोडे खोल जाताच त्यांच्या लक्षात आले की अमेरिकन सरकारकडून थायलंडला बरीच मदत जात होती. आग्नेय आशियातील अमेरिकन राजकीय वर्चस्वासाठी थायलंडमधील विद्यमान सरकार महत्त्वाचे ‘मित्र-सहकारी’ होते. त्यामुळे तेथील सत्ता-नियंत्रणासाठी गरज असल्याने थाय समाजाच्या विविधांगी अभ्यासासाठी अमेरिकन विद्यापीठांना मुक्तहस्ते संशोधन-अनुदाने मिळत होती. स्टॅन्डर्ड ऑईल ऑफ न्यू जर्सीच्या अमेरिकन समाजावरील तसेच जगावरील प्रभावासंबंधी मात्र फार माहिती उपलब्ध होणे प्रस्थापितांना नको होते.
अनेकदा भारतीय शिक्षण-संशोधन क्षेत्रातील दारिद्र्याबद्दल बोलताना ‘अमेरिकन संशोधन-विद्यार्थी आपल्याकडील या प्रश्नावर जेवढे तपशीलवार आणि सखोल संशोधन करतो तेवढे आपलेच ज्येष्ठ प्राध्यापकही करत नाहीत’ अशी टीका आपण करतो. अशावेळी वरील गोष्टीचे भान ठेवणे महत्त्वाचे ठरावे.
आज तीन दशके उलटून गेल्यावरही यात फरक पडलेला नाही. सोविएत युनियन कोसळल्यावर अमेरिका एकमेव महासत्ता उरली. परंतु त्यामुळे अमेरिकन राज्यकर्त्या वर्गाच्या दृष्टिकोनात, विचारसरणीत आणि वागणुकीत फारसा बदल झाला नाही. बाह्य शत्रू असणे ही अंतर्गत सत्ताकारणाची गरज असल्याने, तसेच ‘व्यवस्था’ तीच असल्याने नव्या शत्रूचा शोध घेणे चालू झाले. त्यांच्या सुदैवाने इस्लामी मूलतत्त्ववादी देवदूतासारखे चालून आले. साम्यवादी हुकुमशाहीच्या भीतीखाली वावरणारा अमेरिकन समाज इस्लामी दहशतवादाच्या दडपणाखाली आणला गेला. व्हिएतनामची जागा अफगाणिस्तान व नंतर इराकने घेतली आणि भविष्यात कदाचित इराण घेईल. वसाहतवाद आणि साम्राज्यवाद राबविण्यात जुन्या आणि जाणत्या असलेल्या ब्रिटनने या कामी जरूर ती मदत कशी केली हे आपण पाहतोच आहोत. ओसामा आणि सद्दाम यांना सुरुवातीस अमेरिकेनेच पाठिंबा देऊन बळकट केले होते. नशीब एवढेच की सोव्हियत युनियनमध्ये स्तालिनला पुढे आणण्यात अमेरिका/ब्रिटनचाच हात होता असे अजूनपर्यंत तरी कोणी म्हटलेले नाही.
या परिस्थितीशी मुकाबला करण्याचा मार्ग कोणता ? परिणामकारकतेबद्दल चोम्स्कींना शंका असली तरी मार्ग त्यांच्यासमोर स्पष्ट आहे. अर्थात याचे कारण दुसरा कोणता मार्ग समोर नाही हेही आहेच! उदारमतवादी, पुरोगामी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी, वंशभेद-धर्मभेद विरोधी आणि तृणमूल लोकशाहीला बळकटी आणतील अशा संस्था आणि संघटना वाचवणे, बळकट करणे आणि व्यापक प्रमाणावर उभ्या करणे, याला पर्याय नाही. विज्ञान-तंत्रज्ञान, संपर्कसाधने यांच्यामुळे अपरिहार्य झालेल्या जागतिकीकरणाच्या या दुसऱ्या फेरीत (पहिली फेरी जुन्या वसाहतवाद/साम्राज्यवादाची होती) अशा संस्थांचा व संघटनांचा आवाकाही जागतिकच असला पाहिजे. मात्र यात मोठा वाटा प्रगत जगातील म्हणजे सध्याच्या पाश्चात्त्य जगातील नागरिकांनाच उचलणे शक्य आहे आणि भागही आहे. असा चोम्स्कींचा मथितार्थ आहे. त्यांनी लेनिनचे १९२२ मधील उद्गार उद्धृत केले आहेत अनेक प्रगत देशांतील कामगारवर्गाचे एकजुटीचे प्रयत्न समाजवादाच्या विजयासाठी गरजेचे आहेत हे मार्क्सवादातील एक प्राथमिक सत्य आहे.’ त्या काळात हे घडले नाही. प्रगत देशातील कामगारवर्ग तेथील राष्ट्रीय सरकारे आणि भांडवलशाहीशीच जखडून राहिला. आता खाजगी कॉर्पोरेट जागतिकीकरण की समाजवादी जागतिकीकरण असे पर्याय उभे असताना काय शक्यता आहेत ? पाश्चात्त्य देशांत समाजवाद कोण आणणार?
चोम्स्कींना जाणवणारी शक्यता आहे : वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थापना ! प्रगत औद्योगिक समाजात ही इस्टेट सामाजिक प्रगतीतील एक कळीचा (crucial) घटक बनू शकते असे त्यांना वाटते. मात्र त्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. या ‘तांत्रिक बुद्धिजीवी’ (technical intelligentsia) वर्गाने स्वतःला कष्टकरी वर्गाचाच एक भाग मानावे आणि नवीन लोकशाही शक्तिकेंद्रे निर्माण करण्यासाठी स्वतःला वाहून घ्यावे. असे झाल्यास त्याचा सामाजिक परिणाम खूपच महत्त्वाचा ठरू शकेल. चोम्स्कींच्या मते समाजवादी क्रांती फसण्यामागील एक घटक हा होता की ह्या वर्गाने नवीन सत्ताधारी वर्गात स्वतःचे सामिलीकरण होऊ दिले. पाश्चात्त्य लोकशाही भांडवलशाही राज्यांत सरकारी व्यवस्थापनाचा प्रभाव वाढू लागल्यावर जसा याच वर्गानी त्यात मोठ्या उत्साहाने आपला सहभाग दिला, त्याच तोडीचा हा गुन्हा होता.
‘तांत्रिक बुद्धिजीवी’ वर्गाने ही चूक टाळली आणि बुद्धिजीवींचे रूपांतर कष्टकऱ्यांत झाले (श्रिशीरीळूरींळेप ष हिश ळपींशश्रश्रशीरश्री) तर समाजवाद स्थापनेच्या दृष्टीने ते फारच महत्त्वाचे ठरेल. कारण लेनिनवादानुसार सर्वसामान्य जनतेत क्रांतिकारी जाणीव नसल्याने, आणि जनतेला ती व्यक्त करता येत नसल्याने जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आघाडीचा पक्ष (vanguard party) आणि त्यातील व्यावसायिक (professional) क्रांतिकारी बुद्धिवंतांना स्वीकारावी लागली होती. ते प्रतिमान काही यशस्वी ठरले नाही. तांत्रिक बुद्धिजीवी वर्गच जर कष्टकरी वर्गात सामील झाला तर अशा प्रकारच्या पक्षाची आणि व्यावसायिक क्रांतिकारकांची गरज उरणार नाही.
म्हणजे शेवटी चोम्स्की वर्तुळ पूर्ण करून मूळ जागीच परततात. मुळात साम्यवादी पक्षातील व्यावसायिक क्रांतिकारी बुद्धिवंत, तसेच प्रगत भांडवलशाही समाजातील वैज्ञानिक व तंत्रज्ञ आपापल्या समाजातील राज्यकर्त्या वर्गात सहजपणे सामील कसे आणि का झाले हा प्रश्न शिल्लक राहतोच. त्यावेळी न जमलेले काय यावेळी करायला पाहिजे ? तेव्हाही असे प्रयत्न झाले होतेच. ते का फसले ? मुख्य म्हणजे एवढी सर्वसाधारण प्रगती भौतिक पातळीवर झाली असतानाही आम जनता अजूनही, निदान प्रगत राष्ट्रांत तरी, प्रस्थापित राजकीय तसेच आर्थिक सत्ताकेंद्रांच्या प्रभावापुढे मान कशी झुकवते ? असो!
आधी म्हटल्याप्रमाणे लोकशाही समाजवाद आणण्याचा दुसरा काही पर्याय दिसत नाही, तेव्हा मग या दिशेनेच अधिक प्रयत्न करणे एवढेच हाती राहते, असेही असू शकेल. मात्र परिस्थिती कठीण असली तरी पूर्ण निराशाजनकही नाही. एकीकडे अमेरिकन आधिपत्याखाली ज्या वेगाने भांडवली, कॉर्पोरेट जागतिकीकरण चालू आहे त्यामुळे केंद्रीभूत राज्यसत्ता आणि अर्थसत्ता अधिकाधिक बळकट होणार हे दिसतेच आहे. अधिकाधिक राष्ट्र-राज्यांची सार्वभौमता काही मोजक्या प्रगत राष्ट्र राज्यांपुढे ढासळू लागली आहे.
दुसरीकडे या व्यवस्थेच्या विरोधात उभ्या ठाकणाऱ्या संस्था व चळवळीही जागतिक, आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या होत आहेत. ‘जागतिकीकरणविरोधी’ चळवळही अपरिहार्यपणे जागतिक स्वरूपाचीच झाली आहे. पर्यावरण संरक्षण, मानवाधिकार, शांततावादी, युद्धविरोधी अशा बिन-सरकारी संस्थाही जागतिक पातळीवर कार्यरत आहेत. जगातील कामगारांऐवजी जगातील नागरिकांना एका झेंड्याखाली आणणारी ही प्रक्रिया आहे. शिवाय उच्च तंत्रज्ञान वापरत असतानाच कल्याणकारी राज्यव्यवस्थाही टिकवून ठेवण्याचे प्रयोग काही युरोपीय राष्ट्रांत (उदा. फिनलंड) चालू आहेतच.
तांत्रिक बुद्धिजीवी’ वर्गावर चोम्स्की अवाजवी भिस्त टाकताहेत असेही समजण्याची गरज नाही. ही कल्पना तशी फोफावलेली नसली तरी नक्कीच रुजलेली आहे. १९९९ साली युनेस्कोतर्फे २१व्या शतकातील विज्ञान’ या विषयावर जी परिषद झाली त्यात नोबेल शांतता पारितोषिक विजेते जोसेफ रोटब्लाट यांनी वैज्ञानिकांनी ‘हिपोक्रटिक शपथ’ (Hippocratic oath) घ्यावी अशी सूचना मांडली होती : प्रत्येक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्याने पदवी घेताना शपथ घ्यावी की, ‘मी माझ्या ज्ञानाचा उपयोग माणसे मारण्यासाठी वा माणसाचे शोषण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सशोधनात व प्रकल्पात होऊ देणार नाही.’
अर्थात अंतिम जाहीरनाम्यात ही सूचना बाजूला सारली गेली, परंतु त्यावर उलट-सुलट चर्चा तरी झाली. येथे लक्षात ठेवले पाहिजे की १६३३ मध्ये, आधुनिक-तंत्रज्ञानाच्या प्राथमिक काळात सर्वकालीन थोर गॅलिलिओला रोमच्या कॅथालिक इन्क्विझिशनच्या भीतीने माघार घ्यावी लागली होती. आणि २० व्या शतकातही आइनस्टाइन, ओपेनहाइमर, कापित्सा, सखारोव अशा दिग्गजांना आधुनिक इन्क्विझिशनचा हिसका बसला होता. त्यामुळे अशा प्रकारची सक्षमता सामान्य वैज्ञानिकालाही कायदेशीर प्राप्त होणे सोपे नाहीच. त्यासाठी दीर्घकाळ लढा द्यावा लागेल.
सध्या नागरिकांना ‘माहिती मागण्याचा अधिकार’ बऱ्याच देशांत कागदावर तरी आहे. तसेच “शिटी वाजवणाऱ्यांना’ (whistle blowers) कायदेशीर संरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणीही पुढे येत आहे, चर्चेतही आहे. हे सर्व थोडाफार आशेचा कवडसा दाखविणारे आहे.
आणखी एक गोष्टही आहे.
तीस वर्षांपूर्वी चोम्स्कींनी नवरचनेची जबाबदारी मुख्यत्वे प्रगत पाश्चात्त्य जगातील बुद्धिजीवींच्या वर टाकली होती. दरम्यानच्या काळात भारत व चीन या दोन राष्ट्रांनीही बरीच मजल गाठली आहे. एकंदरीत हे देश मागासच असले तरी त्यांच्या प्रचंड लोकसंख्येचा विचार करता येथील आधुनिक बुद्धिजीवींची संख्याही प्रचंड आहे. पाश्चात्त्य तांत्रिक बुद्धिजीवी वर्गाच्या जोडीला भारत व चीनमधील तांत्रिक बुद्धिजीवींची कुमक लाभली तर बरेच काही होऊ शकेल. मात्र यासाठी सर्वत्रच अधिक चोम्स्की निर्माण व्हावे लागतील आणि अर्थातच तांत्रिक बुद्धिजीवींनी त्यांना स्वीकारावे लागेल.
२१-सी, शुभेच्छा, विवेकानंद रस्ता, नौपाडा, ठाणे-४०० ६०२.