नागरी प्रश्नांचे स्वरूप

“सर्व प्रकारच्या कृतींसारखेच विचार करण्याचेही डावपेच असतात. प्रश्नांच्या प्रकारानुरूप विचार करूनच त्यांची उत्तरे मिळू शकतात. आपल्याला कसा विचार करायला आवडेल यापेक्षा विषयाचे स्वरूप काय आहे त्यावरच विचारांची, उत्तरे शोधण्याची पद्धत ठरत असते.
विसाव्या शतकातल्या अनेक क्रांतिकारक बदलांमध्ये जगाच्या तपासासाठी वापरायच्या विचारपद्धतींमध्ये खूप महत्त्वाचे बदल झाले.

विश्लेषणाच्या आणि विचारांच्या नवनव्या धोरणांचा शोध मुख्यतः वैज्ञानिक पद्धतींमधून घेतला गेला. या जागृतीचे परिणाम इतरही क्षेत्रांत पसरले. पूर्वी नाठाळ वाटणारे प्रश्न नवनव्या दिशांनी सुटण्याजोगे वाटू लागले. तर काही प्रश्न आधी वाटले होते तसे नाहीतच असे आढळून आले.

या नव्या विचारांचा नगरांशी संबंध काय हे वैज्ञानिक विचारांच्या इतिहासावरून समजून घेता येईल. डॉ. वॉरेन वीव्हर यांनी विज्ञान विचारांच्या तीन अवस्था नोंदल्या आहेत. १) सुलभ प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता. २) विस्कळीत व्यामिश्रतेचे प्रश्न सोडवायची क्षमता. ३) सुरचित व्यामिश्रतेचे प्रश्न सोडवायची क्षमता.

दोन घटकांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांचे प्रश्न हे सुलभ प्रश्नांच्या गटातील असतात. ढोबळ मानाने सतराव्या, अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांमध्ये भौतिक विज्ञान दोन घटकांच्या प्रश्नांचे विश्लेषण करायला शिकले. उदा. वायूचा दाब हा त्याच्या आकारमानाशी निगडित असतो. असे प्रश्न सोडवायची प्रायोगिक आणि विश्लेषक तंत्रे तीनशे वर्षांत सापडली. या प्रश्नांच्या तपासातूनच प्रकाश, ध्वनि, उष्णता, वीज या शास्त्रांचा पाया घडला. त्यांच्या आकलनाने टेलिफोन, रेडिओ, मोटारी, विमाने, फोनोग्राम्स, चित्रपट, टर्बाइन्स, डिझेल इंजिन्स, जलविद्युत असे खूप काही मिळाले. काही सुपीक डोकी मात्र दोन चार घटक असलेले प्रश्न सोडविण्याऐवजी ‘दोन अब्ज बदलणारे घटक’ हाताळणाऱ्या विश्लेषण पद्धती शोधण्याच्या मागे लागली. भौतिकी शास्त्रज्ञांनी गणितींच्या मदतीने संभाव्यता-तत्त्वावर बेतलेली सक्षम तंत्रे घडवली. या तंत्रांचा उपयोग करून विस्कळीत व्यामिश्रतेचे प्रश्न सोडविता येऊ लागले. उदाहरणार्थ मोठ्या टेलिफोन एक्सचेंजमध्ये सरासरी किती वेगाने कॉल्स येतात, एकाच नंबरवर दोन किंवा जास्त कॉल्स एकाच वेळी येण्याची शक्यता किती, असे प्रश्न या तंत्रांनी सोडविता येतात. विमा कंपन्या, अणूंची गती, ताऱ्यांची गती, या साऱ्यांना ही तंत्रे उपयुक्त ठरतात. आनुवंशिकता आणि उष्मागतिकीसाठी ही सांख्यिकीय तंत्रे उपयोगी पडतात.

पण सगळ्याच प्रकारच्या प्रश्नांना सांख्यिकीय उत्तरे शोधता येत नाहीत. जीवशास्त्राच्या आणि वैद्यकाच्या क्षेत्रात या पद्धती लागू पडत नाहीत. सजीवांच्या विज्ञानातले प्रश्न ना सुलभतेचे आहेत ना विस्कळीत व्यामिश्रतेचे, याची जाणीव प्रामुख्याने जीवशास्त्रज्ञांना झाली.सजीवांच्या प्रश्नांचे प्रकारच वेगळे आहेत कारण येथे विस्कळीतपणा नसून सुरचित व्यामिश्रतेचे गुणधर्म आहेत. सूर्यफूल सूर्याकडे ‘तोंड’ का वळविते? खाऱ्या पाण्याने तहान का भागत नाही? जैवरासायनिक दृष्टीने म्हातारपणाचे वर्णन कसे करता येईल? ‘जीन’ म्हणजे काय आणि मूळ जेनेटिक रचना सजीव रचनेत कशी व्यक्त होते ? हे सगळे व्यामिश्र प्रश्न आहेतच पण ते सांख्यिकीच्या टप्प्यातील विस्कळीत व्यामिश्रतेचे प्रश्न नाहीत. एकमेकांशी संलग्न अशा संख्येने भरपूर घटकांचे प्रश्न आहेत आणि त्यांचा विचार एकाचवेळी करावा लागतो. असे प्रश्न सोडविण्याची तंत्रे एकदा सापडली की ती रूपकांसारखी वापरून मानवी वर्तन आणि समाज यांच्या क्षेत्रांना लागू करता येतील.

१९३२ नंतरच्या पाव शतकात जीवशास्त्रांत प्रचंड आणि नेत्रदीपक प्रगती झाली. माहिती तर जमा झालीच पण तत्त्वांच्या आणि तंत्रांच्या सुधारित आकृत्याही घडल्या. त्यांतून नवे प्रश्न तर पडलेच पण किती मोठे ज्ञान कमावण्याजोगे आहे याचे दृश्य दिसू लागले. हे सर्व घडले याचे एकुलते एक कारण म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत ते ओळखून जीवशास्त्रज्ञांनी सुरचित व्यामिश्रतेच्या विश्लेषणाला सुरुवात केली. ही प्रगती आता इतर क्षेत्रांनाही महत्त्वाची ठरते आहे. या गोष्टीचा नगरांशी काय संबंध आहे ? नगरांचे प्रश्न हे सजीवांच्या, जीवशास्त्रातल्या सुरचित व्यामिश्रतेसारखे प्रश्न आहेत. अर्धा वा एक डझन घटक एकाच वेळी एकमेकांशी संलग्न प्रकारांनी बदलत असण्याची ती उदाहरणे आहेत. जीवशास्त्राप्रमाणेच नगरांबद्दलही ‘एक प्रश्न सुटला की इतर सगळे सुटले’ असे होत नाही. एका प्रश्नाला अनेक उपप्रश्नांमध्ये विभागता येते, पण तेही एकमेकांशी संलग्न असतात. घटक वेगवेगळे असतात पण ते सुटे-स्वतंत्र नसून एकमेकांत गुंतलेले असतात.

नगरातल्या एखाद्या बगिच्याचे उदाहरण बघू. बगिच्याचा वापर किती होतो हे त्याच्या रचनेनुसार ठरते. बगिचा कोण, केव्हा, कशासाठी वापरतात. यानुसार त्याचा व्यवहार ठरत असतो. आणि हा वापर नगराच्या इतर व्यवहारांशी सुद्धा निगडित असतो. प्रत्येक घटक सुटा-सुटा परिणाम करताना एकमेकांवरही प्रभाव टाकत असतो. बगिच्यापलिकडील इमारती, त्यांच्या निर्मितीचा काळ, त्यांचा वापर या साऱ्यांचे परिणाम बगिच्यावर होत असतात. बगिच्याच्या वापराचे विश्लेषण बदलते. वस्ती, लोकसंख्या, बगिच्याचे क्षेत्र यांच्या सरळसोट गुणोत्तरापेक्षा हा प्रकार खूप वेगळा आहे. अशा वेगळ्या स्वरूपांच्या प्रश्नांना सोपे प्रश्न समजणे व्यर्थ आहे. कारण बगिच्यांचे वर्तन सुरचित व्यामिश्रतेच्या प्रश्नासारखे असते. हेच तत्त्व नगरांच्या इतर प्रश्नांना, विभागांनाही लागू पडते. त्यांचे सर्वांचे संबंध व्यामिश्र स्वरूपाचे असतात.

अनेकदा शहरांतील काही विभाग चांगले चाललेले असतात तर काही विभागांचे व्यवहार चांगले चाललेले नसतात. एखाद्या रस्त्यावर रहिवासी सुरक्षितपणे व्यवहार करू शकत असले तरी त्या रस्त्याचा एकूण शहराशी असलेला संबंध नीट असतोच असे नाही. कधी कधी एखादा रस्ता दुकाने, घरे या सर्वांमुळे गजबजलेला, सुरक्षित वाटतो. तर काही रस्त्यांचा वापर करायला लोक बिचकत असतात. अशा वेळी त्यांचे प्रश्न सोडवणे सोपे नसते. कारण त्याचे वास्तव प्रत्यक्ष अनुभवातूनच जाणून घेता येते. तसा विचार न करताच उत्तरे शोधण्याचा प्रयत्न हा वास्तवाला टाळण्याचा प्रकार ठरतो आणि प्रश्न सुटत नाहीत.

सजीवांचा अभ्यास करणाऱ्यांना आपले प्रश्न, सुरचित व्यामिश्रतेचे आहेत हे सहज समजत घडलेले दिसत नाही, असे का?

नगरनियोजनशास्त्राला प्रश्नांचा प्रकारच ओळखता आला नाही असे तर नसेल? आधुनिक जीवशास्त्र आणि आधुनिक नगरशास्त्र यांचे इतिहास वेगवेगळे आहेत. प्रचलित नगररचनाशास्त्रज्ञांनी नेहमीच नगरांचे प्रश्न सुलभ संबंधांचे किंवा विस्कळीत व्यामिश्रतेचे आहेत असे मानले. ते अजाणतेपणाने केलेले भौतिकशास्त्राचे अनुकरण होते. ही चूक सहज घडली आहे असे वाटत नाही. पण या चुकीच्या धारणांना ओढून उजेडात आणायला, त्यांचा त्याग करायला नगरनियोजकांना भाग पाडायला हवे. कारण त्यांच्या धारणाच नागरीनियोजनात अडसर ठरत आहेत.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस एबक्झर हावर्डने नगररचनेचे प्रश्न त्या शतकातल्या भौतिकशास्त्रांसारखे दोन घटकांचे प्रश्न असल्याचे समजून सोडवायचे प्रयत्न केले. त्याने उद्याननगर रचनेचे तत्त्व मांडले. घरे-माणसे यांची संख्या आणि उपलब्ध नोकऱ्या, हे दोन प्रमुख नागरी घटक मानून इतर सर्व घटकांचे (जमीन, रस्ते, बागा, मैदाने, शाळा वगैरे) प्रमाण त्यांच्याशी साध्या, सोप्या, थेट नियमांनी निगडित आहे, असे मानले. एकूण नगरातही मोकळे आणि बांधकामांखालील क्षेत्रफळ यांचे सरळ संबंध त्याने जोडले. नागरी व्यवस्थेसाठी इतकेच विश्लेषण पुरेसे मानले. या सरधोपट आधारावर त्याने स्वयंपूर्ण शहरे घडविण्याची तत्त्वे रचली. नागरी विभागांचे नियोजन त्यामधून साधेल अशी त्याला आशा होती. मोठ्या नगरांनाच काय पण छोट्या शहरांनादेखील अशा तत्त्वांमध्ये कधीच बसवता .येत नाही. छोटी गावे, जी महानगरांच्या संपर्कात येतात त्यांनाही ही तत्त्वे लागू पडत नाहीत. नगररचनाकार आणि वास्तुशास्त्री आजही त्यांच्या क्षेत्रातील प्रश्नांबाबत शहरांचा गाभा सोपा, दोन-घटकांच्या सरळ संबंधाचा समजतात. मोकळी जमीन आणि बांधकामांचे क्षेत्र यांचे लोकसंख्येशी गुणोत्तर काढत बसतात.

प्रत्यक्षात शहरे अशा प्रकारच्या नियोजनात अपेक्षित परिणाम साधत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच शहरे ही गूढ आहेत असेच त्यांना वाटते. १९२० च्या दशकात युरोपात आणि अमेरिकेमध्ये संभाव्यतेच्या कल्पना नगरनियोजनाच्या क्षेत्रात वापरात येऊ लागल्या. नगरांचे प्रश्न विस्कळीत व्यामिश्रतेचे आहेत असा समज रूढ झाला. सांख्यिकी, संभाव्यता आणि सरासरी यांच्या टप्प्यांमध्ये नगरांचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न सुरू झाले. ली कार्बुझिएच्या ‘तेजोमय नगर’ कल्पनेला हे सुट्यासुट्या स्वतंत्र घटकांचे चित्र सोईचे होते. त्याने स्वतः सांख्यिकीय विश्लेषणाचा प्रयत्न जेमतेमच केला. त्याचे मोठ्या बागेत उंच मनोरे उभे करण्याचे स्वप्न हे विस्कळीत व्यामिश्रतेचे उदाहरण होते. केवळ कलेच्या दृष्टीने काढलेले, पाहिलेले ते एक सांख्यिक सरासरीचे सुरम्य चित्र होते. प्रत्यक्षात दोन-घटकी प्रश्नांनाच, एका अधिकच तर्काधिष्ठित विस्कळीत व्यामिश्रतेच्या साच्यात बसविण्याचा तो अट्टाहास ठरत होता. नियोजनाच्या या नियमांनुसार नगरे वसविताना कोणत्या आकाराची घरे, कोणत्या वर्गातील किती माणसे ‘उन्मळून’ पडतील याची संभाव्यता काढणेही या तंत्रामुळे शक्य झाले. लोकांना मोठ्या प्रमाणात इकडून तिकडे हलविण्याचे नियोजन, त्यांची आकडेवारी या आकड्यांच्या खेळात माणसे, मुले, कुटुंबे यांना बिलियर्डच्या चेंडूप्रमाणे टोलविण्याचे प्रयत्नही केले गेले. नगरनियोजकांची तीच भूमिका बनली. जितकी माणसे अधिक तितके त्यांना सरासरीत बसविणे सोपे वाटू लागले. झोपडपट्ट्या हलवून त्यांना नव्याने बसविणे ‘बौद्धिक पातळीवर’ शक्य झाले. त्यासाठी किती का वेळ, पैसा, श्रम लागेना, त्याची तमा नियोजनकारांनी केली नाही!

यांमधूनच राजकीय पक्षांच्या मागण्यांमध्ये वेगवेगळ्या मागण्या येऊ लागल्या. अल्प, मध्यम उत्पन्न गटांतील लोकांसाठी घर योजना, गृहनिर्माण या गोष्टी कायद्यांमध्ये समाविष्ट कराव्यात अशाही राजकीय मागण्या पुढे आल्या. तपशीलवार आणि महत्त्वाची भासणारी सर्वेक्षणे करून त्यांचे जाडजूड अहवाल तयार करण्याची प्रथा सुरू झाली. असे अहवाल कोणीही वाचत नसे. त्यांच्यात सांख्यिकीय माहिती आणि नकाशे काढता येत. ते वास्तवाला जवळचे वाटत. वास्तव तसे नसले तरी तसे ते अहवालांमध्ये बनविता येते. या तंत्रांनी माणसे, त्यांची उत्पन्ने, क्रयशक्ती यांना विस्कळीत व्यामिश्रतेत बसवता येऊ लागले. आकड्यांचा विस्तार वापरून वाहतूक, उद्योगधंदे, शाळा आणि सांस्कृतिक व्यवहारही या प्रकाराने सुलभ केले जाऊ लागले.

हाच प्रकार मोठ्या, व्यापक प्रदेशांबाबत वापरण्यातही बौद्धिक अडचणी तंत्रज्ञांना आल्या नाहीत. उलट प्रदेश जितका मोठा तितके त्याला या साच्यांत बसविणे सोपे. अशा नगरांचे प्रादेशिक नियोजन म्हणजे “नागरी क्षेत्रात न सुटलेल्या प्रश्नांचीच आणखी मोठी आवृत्ती’! हे विधान उपहासगर्भ नाही, तर सत्यकथनच आहे. नगरनियोजन असे विस्कळीतपणाच्या दलदलीत रुतत असताना जीवशास्त्रे आपले प्रश्न ओळखण्यात घोटाळे न करता विकास करत होती. सुरचित व्यामिश्रतेचे प्रश्न हाताळायची तंत्रे आणि धोरणे, नगरयोजनेला लागू पडतील अशा संकल्पना, घडवत होती. जास्त लोकांच्या बौद्धिक अवजारांमध्ये ही तंत्रे सामील होऊ लागली आणि त्यांना नगरनियोजनाचे व्यामिश्र रूप समजू लागले.

हा दृष्टिकोन वास्तुशास्त्री आणि नगररचनाकारांमध्ये विस्तृतपणे वापरात नाही. शिक्षणक्षेत्रातही तो वापरला जात नाही. नगररचनाशास्त्राचा प्रवाह कुंठित झाला आहे. आजही नागरी नियोजन त्याच त्या जुन्या नगररचनांच्या नकाशांच्या आकृत्यांमध्येच घोटाळते आहे. उलट १९३० सालच्या तुलनेत अधोगतीच दिसते आहे. जोवर नगररचना हा भौतिक शास्त्रातला प्रश्न आहे अशी समजूत आहे तोवर नगरनियोजन सुधारणार नाही. जीवशास्त्रे आणि नगरे यांचे प्रश्न एकाच प्रकारचे असतात म्हणजे ते एकच असतात असे नाही. पण प्रश्न सोडवण्याचे एकसारखे डावपेच वापरावे लागतात. दोन्हीकडे सूक्ष्म, तपशीलवार चित्रे तपासावी लागतात. नागरी प्रश्नांच्या बाबतीत एखाद्या घटकाची निवड करून त्याचे इतर घटकांशी असलेले तरल-किचकट संबंध तपासावे लागतात. नुसते त्यांचे अस्तित्व मान्य करून भागत नाही. त्यांचे प्रत्यक्ष वर्तन तपासावे लागते. त्यासाठी ‘सामान्य’ दृष्टिकोन पुरत नाही. दोन-घटकी संबंधांच्या तपासण्याही त्यात कराव्या लागतात, पण ते दुय्यम डावपेच असतात. तत्त्वतः नगरांचा विचार करताना वेगळे डावपेच वापरावे लागतात. नगरांच्या अभ्यासात खालील मानसिक-वैचारिक सवयी महत्त्वाच्या असतात असे मला वाटते.

१) नागरी प्रक्रियांचा विचार करायला हवा.
२) विशेषाकडून सामान्याकडे जाणारी इंडक्टिव्ह पद्धत वापरावी. उलटी डिडक्टिव्ह पद्धत नको.
३) मोठ्या सरासरी क्रियाशील घटकांऐवजी छोट्या-छोट्या, सरासरी मोजमापांमध्ये न बसणाऱ्या घटकांची मोजमापे वापरावी.

या तीन गोष्टींचे थोडे स्पष्टीकरण करायला हवे.

प्रक्रियांचा विचार नगराच्या संदर्भात महत्त्वाचा ठरतो कारण नगरातल्या इमारती, रस्ते, मोकळ्या जागा, बाजारपेठा, कारखाने यांसारख्या वस्तू परिस्थितीनुसार बदलत असतात. नगरांमधील घरांचा वापर विशिष्ट काळात विशिष्ट असतो. या अर्थाने घरे नागरी प्रक्रियांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रीतीने भाग घेत असतात. िगिरगावातील अनेक चाळींमधील घरांचा कार्यालये, कार्यशाळा, दवाखाने, क्लासेस, माल-साठवण यांसाठी उपयोग होताना दिसतो. हे ‘प्रक्रिया’ दिसण्याचे उदाहरण ठरते. सं.

झोपडपट्ट्या वसणे, उठणे, विविधता घडणे, मोडणे, अशा प्रक्रियांमध्ये घरा-इमारतींच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. नगरांचा ‘प्रक्रिया’ हा गाभा असतो. आणि या प्रक्रियांचा विचार करताना उत्प्रेरकांचा, कॅटॅलिस्ट्सचा विचारही करावा लागतो. आणि असा विचार सामान्य लोकही करू शकतात, समजू शकतात. ते कार्यकारणसंबंधांचा खोलवर विचार न करताच प्रक्रियांना दिशा देण्याचे कामही करीत असतात. एक घरमालक कार्यालयासाठी जास्त किंमत घेऊन जागा विकतो. हे दिसताच इतरही लोक त्याचे अनुकरण करतात. सं.

इंडक्टिव्ह विचार करणे आवश्यक ठरते. कारण अशा विचार-पद्धतींच्या अभावी आपले तज्ज्ञ सामान्यीकरण करून विक्षिप्त आणि अवास्तव उत्तरे शोधत असतात. इंडक्टिव्ह पद्धतींनी नगरांच्या जीवनातले ताणतणाव आणि प्रक्रिया ओळखणे, समजून घेणे. त्यांचा विधायक वापर करणे शक्य होते. आणि निरर्थकता आपोआप टाळली जाते. सामान्य सूत्र विशिष्ट घटकांना लागू पडते असे नाही. दरवेळी घटकांचे काही विशिष्ट मिश्रण घडते आणि त्याचा तपशील तपासावाच लागतो. ही पद्धत वापरून सामान्य लोकांना नगरांची रचना घडविण्यात सहभाग घेणे शक्य होते, हा मोठा फायदा आहे. याउलट नगर-नियोजकांचे सारे प्रशिक्षण डिडक्टिव्ह तंत्रांचे असते. त्यांच्या चुकीच्या प्रशिक्षणामुळे अनेकदा तज्ज्ञांपेक्षा सामान्य, अप्रशिक्षित माणसांची तपशील समजून घेण्याची बौद्धिक क्षमता जास्त वाटते. एका तंत्राला बांधलेले तज्ज्ञ मुक्त आणि “विशिष्ट’ पद्धतीचा विचार करण्यात दुबळे असतात.

लहानलहान गोष्टी का तपासायच्या ? मोठे सांख्यिकीय अभ्यास कधी कधी उपयोगी असतात. विशेषतः कालक्रमात छोट्या, मध्यम, मोठ्या काळांतील बदलांचा अभ्यास सरासरीच्या माध्यमातून पुढे येतो. सरासरी कशी बदलते आहे ते यातून कळते. शहराची लोकसंख्या वाढते आहे, वाढीचा दर कमी-जास्त होतो हे यातून नक्की समजते. पण सुरचित व्यामिश्रतेने वागणाऱ्या रचनांमध्ये घटकांचा तपशील समजत नाही. उदाहरणार्थ शहरात स्थलांतरित होणारे वा बाहेर जाणारे लोक कोणत्या वर्गाचे आहेत, हे लोकसंख्या पाहणीतून कळत नाही. सं.

शहराच्या पाहणीतील सरासरी, मोठ्या आकड्यांमधून विविध विभागांचा तपशील समजत नाही. त्यामुळे विशिष्ट प्रश्न सोडविण्यात त्यांचा फारसा उपयोगही होत नाही. नगरनियोजकांना त्यांच्या अभ्यासविषयाबद्दल अनादर असतो. तसेच नगरे आणि माणसे यांच्या निसर्गाशी असलेल्या संबंधांबद्दल त्यांना एक भ्रम झालेला असतो. माणसे इतर सजीवांप्रमाणेच निसर्गाचा भाग आहेत आणि त्यांनी उभारलेली नगरे हीसुद्धा मधमाश्यांच्या पोळ्यांइतकीच नैसर्गिक आहेत. जगभर मानवाला नगरप्रेमी, नागर प्राणी मानले गेले आहे. नगरांतही निसर्गाची निरीक्षणे करता येतातच. पण काही जणांना यंत्रज्ञ कारागिरांची नगरे नाकारून मुक्त स्वावलंबी शेतकऱ्यांचे गणराज्य कल्पिण्याची फार हौस असते तेसुद्धा नगरांना अनैसर्गिक ठरवून. वास्तवात शेतकरी आणि ग्रामीण लोक अतिशय अल्प प्रमाणात ‘मुक्त’ असतात. परंपरा, जाती, अंधश्रद्धा, नावीन्याची भीती आणि शंकेखोरपणा यांच्या विळख्यात ते अडकलेले असतात. ‘नागरी हवा मुक्ती देते’ असे मध्ययुगात तरी मानले जात असे, कारण पळून आलेला वेठबिगार शहरात मुक्त होत असे. आजही ग्रामीण भागातून शहरांत येणाऱ्यांना नगरे मुक्ती देत असतात.

नगरांच्या मध्यस्थीमुळे निसर्ग उदात्त, शुद्ध आणि कृपाळू वाटायला लागला. म्हणून खेडूतही नैसर्गिक वाटू लागला, तर नगरे मात्र दुष्ट आणि निसर्गविरोधी दिसू लागली. अमेरिकेत तोंडाने निसर्गावर प्रेम करत कृतीने निसर्गाचा सर्वाधिक संहार करणारा नागरी समाज निर्माण झाला हा काही योगायोग नाही. आपण, आपली नगरे निसर्गाचेच भाग आहोत हे न जाणल्याने, नगरांवरच्या अविश्वासातून ती कृती येते. या अविश्वासातून आपण अमेरिकेतील लोक विरळ वस्तीच्या उपनगरांत निसर्गाचा उपभोग घेता यावा म्हणन जातो खरे. पण त्यासाठी अमल्य शेतजमीन नष्ट करतो: गाड्यांच्या धराने वातावरण प्रदषित करतो आणि उद्योगांनी नद्यांचे पाणी विषारी करतो, आणि हे करताना काल्पनिक साहित्यिक निसर्ग आणि ‘कृत्रिम’ नगरांच्या बाता मारतो.नगरांविरुद्धची निसर्गकल्पना प्रामुक्याने हिरवळ आणि शुद्ध हवा यापुरतीच मर्यादित असते. अशी भावविवशता हात लावेल तिथे अनैसर्गिकतेला जन्म देते. मोठी नगरे आणि ग्रामीण भाग एकमेकांना पूरक असतात. दोघांनाही एकमेकांची गरज असते. माणूस म्हणून जगणे मुळात सोपे नाही. त्यामुळे कोणतीही मानवी वसाहत समस्याग्रस्त असतेच. नगरांचे प्रश्न मोठे असतात. पण जिती-जागती नगरे प्रश्न सोडविण्यात असमर्थ मात्र नसतात. ती निसर्गविरोधी नसतात आणि परिस्थितीमधील बदलांची बळीही नसतात. अडचणी समजून घेणे, समजावून देणे, शोध घेणे, त्यांच्या पद्धती काढणे अशा साऱ्या बाबतीत नगरे खास सक्षम असतात. एकेकाळी साथीच्या व इतर रोगांनी झोडपली जाणारी शहरे आज रोगांवर मात करण्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या आरोग्यसेवांवर ग्रामीण जनताही अवलंबून असते. नगरांशिवाय त्यांची कल्पना करता येणार नाही. गरजांपलिकडचे उत्पादक, अनेक मानवी कौशल्यांचा शेजार, यामधूनच समाज प्रगती साधू शकतो. मोठ्या दाट शहरांच्या लोकवस्तीतूनच हे घडते.

ग्रामीण सुस्तपणा किंवा अकृत्रिम भोळ्या आदिवासी समाजाच्या प्रश्नांची उत्तरे शोधणे रोमँटिक असेलही पण तो वेळेचा अनुत्पादक अपव्ययही आहे. वास्तवाचे प्रश्न सरमिसळ, एकरंगी वसाहतींमधून सुटणार आहेत का ? निर्जीव, एकसुरी वस्त्यांमध्येच त्यांच्या विनाशाची बीजे असतात. पण विविधता असलेली, तीव्र भावना असलेली शहरे स्वतःच्या नवनिर्माणाची बीजेही बाळगतात आणि आजूबाजूचे प्रश्न सोडवण्याइतकी ऊर्जाही त्यांच्या खात्यात शिल्लक राहते.

संदर्भ:
Jecobs J. The Death and Life of Great American Cities, (1961) Random House

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.