खांदेवाले यांनी एका अहवालाचा परिचय वाचकांना करून दिला आहे तेव्हा काय टीका करायची असेल ती माझ्यावर नको हे खांदेवाल्यांचे म्हणणे बरोबर आहे. अहवालात समस्यांची सोडवणूक सुचवली असती तर टीका किंवा समर्थन करता आले असते. पण अहवालात नुसते भाराभर प्रश्न आहेत. पुष्कळशा “विद्वत्तापूर्ण’ लिखाणाची हीच गत असते. एका अहवालाचा आधार घेऊन दुसरा कोणी एक प्रबंध लिहितो. मग तिसरा कोणी एक ‘शोध-प्रबंध’ लिहितो. अशा त-हेने अहवालांचे आणि प्रश्नांचे ‘पीक’ निघत जाते. उपाय कोणी सुचवत नाही. प्रश्न खूप विचारले की दुसरा मनुष्य नालायक आहे असे सूचित होते.
आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कुठलाही बरावाईट परिणाम भारतातील गरीब शेतकऱ्यांवर होणारा नाही. पोटापुरते उगवणाऱ्या लोकांचा बाजाराशी संबंधच काय ? पण पुष्कळसे लोक बाजारात माल आणतात आणि आपल्या इतर गरजा भागवतात हा गुंजाळांचा मुद्दा बरोबर आहे. त्यातले जे थोडे लोक निर्यात करू शकतील, त्यांचा फायदा होईल. तो “थोड्यांचा” होईल म्हणून तो नाकारायचा हे मला बरोबर वाटत नाही कारण त्या थोड्यांच्या फायद्याने इतरांना कामधंदा व उत्पन्न मिळू शकते. उलट प्रवाहात परदेशी माल मोठ्या प्रमाणावर येऊन एतद्देशीय लोकांचा धंदा बुडेल का ? फारसा नाही. कारण आयात करायची म्हणजे भारताजवळ परदेशी चलन हवे. म्हणजे आपण जितकी निर्यात करतो तीच आपली आयातीची मर्यादा. या मर्यादेमुळे प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे की परदेशी माल येऊन आपले भाव घसरलेले नाहीत, शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही. या मुद्द्याच्या बाबतीत सरकारही सजग आहे.
भारताच्या गरिबीचा प्रश्न व्यापाराच्या जागतिकीकरणाशी फारसा जुडलेला नाही. तो आपल्याच देशातील दरडोई उत्पादनाशी जुडलेला आहे, म्हणजे (१) शेतीत दरडोई व दरएकरी उत्पन्न वाढायला हवे. (२) बरीचशी माणसे गैरकृषि उद्योगात जाऊन त्या क्षेत्रातही उत्पन्न वाढायला हवे. हे घडवून कसे आणायचे याचे किंवा एका निराळ्या अंगाने प्रश्न विचारायचा म्हणजे शहरी माणसाचे किती उत्पन्न ग्रामीण उत्पादनावर खर्च होऊ शकते, ग्रामीण लोक आपापसात काय विनिमय करू शकतात याची स्पष्ट उत्तरे कोणाजवळ नाहीत. यावर चर्चा चालू असते. जे उपाय सुचतात त्यांची अंमलबजावणी होत असते.
(२) आ.सु.च्या ऑगस्ट व डिसेंबरच्या अंकात मीरा नंदा यांनी “आधुनिकोत्तर विचारांमधून वैदिक विज्ञानाच्या हिंदुत्ववादी प्रचाराचे समर्थन” हा विषय घेऊन हिंदुत्ववादी लोकांवर जी टीका केली आहे तिचे मी पूर्णपणे समर्थन करतो. ‘वेगळी संस्कृती, वेगळे विज्ञान’ या कल्पनेचाही विरोध करतो. पण त्यामुळे ‘आधुनिकोत्तर विचार” पूर्णपणे बाद होत नाही कारण तो विचार निर्जीव सृष्टीबद्दल नसून जाणीवयुक्त सजीवांबद्दल आहे.
मीरा नंदा म्हणतात की ‘आधुनिक विज्ञानातून जे काही कळते ते ठामपणे नैतिक गुण आणि शक्तींना फार कशाला, निसर्गातील जाणिवेला खोटे ठरवते.’ विज्ञान काहीही म्हणो, माणसाला ‘जाणीव” नक्कीच असते. विज्ञान सुद्धा माणसाच्या जाणिवेतच आहे. विज्ञान ही नैसर्गिक वस्तू किंवा घटना नव्हे. अठराव्या-एकोणिसाव्या शतकात विज्ञानाची प्रचंड वाढ झाली. छोट्या घटकांच्या सखोल निरीक्षणातूनच झाली. त्यातून मिळालेले वस्तुज्ञान कोणी नाकारत नाही. हिंदुत्ववादी उरी किंवा Telephone अशी कल्पना कोणी काढलेली नाही. प्रश्न असा आहे की घटकांचे वेगवेगळे ज्ञान झाले म्हणजे समुच्चयाचे ज्ञान झाले का ? याचे ‘नाही’ असे उत्तर काही वैज्ञानिकच देतात.
Craige Holdrege हा जीवशास्त्रज्ञ म्हणतो, “Any purely genetic cosideration of the human being becomes inhuman by virtue of its narrowness.’ वनस्पतींसारख्या दुसऱ्या सजीवांबद्दल तो म्हणतो, “Depending on how, when and where you plant the seed, a limitless variety of forms can arise,… (Which) are not of course, stored in the seed.” म्हणजे समुच्चय हे छोट्या घटकांचे यांत्रिक एकीकरण नव्हे. अठराव्या एकोणिसाव्या शतकातले विज्ञान समुच्चयाला यांत्रिक एकीकरण मात्र मानते. त्यामुळे इतके input टाका म्हणजे इतके आणि असे असे output मिळेल असे तंत्र मान्यता पावले. मग प्रश्न गहू पिकवायचा असो, कोंबड्या पाळण्याचा असो, बालसंगोपनाचा असो किंवा जनतेच्या व्यवहाराला वळण लावण्याचा असो. पण यातून मानवाच्या वैयक्तिक किंवा सामाजिक समस्या सुटलेल्या नाहीत. विज्ञानातून त्या सुटणाऱ्याही नाहीत. त्या सोडवण्याकरता माणसांच्या इच्छा, आकांक्षा, भावना यांचा विचार करावाच लागतो. आणि या गोष्टी संस्कृतिसापेक्ष असतात. स्त्रियांची स्वतःबद्दलची ओळख (self-identity) संस्कृतीबरहुकूम कशी बदलते हे Yasmin Alibhai Brown या ब्रिटिश लेखिकेने विस्तृतपणे दाखवले आहे. माणसाच्या स्वतःबद्दलच्या कल्पना त्याच्या शरीरावरही परिणाम करतात हे सर्वमान्य आहे. गळा Corbette ने तर एक घटना अशी सांगितली आहे की “आपण मरणार आहोत’ अशा श्रद्धेमुळे त्याचा एक नोकर खरोखरच अचानक मेला. म्हणजे मानवी भावनेचा ‘वैज्ञानिक सत्या’ वर ही परिणाम होतो !
अशी ही सजीवांमधील जाणीव नाकारायची आणि वर computers मध्ये intelligence (म्हणजे यांत्रिक एकीकरणापेक्षा काहीतरी जास्त) निर्माण करण्याची भाषा बोलायची हे पाहून कबीरसुद्धा ‘देख कबीरा रोया’ असेच म्हणाला असता.
(१) ‘निसर्गातील जाणिवेला’ हे ‘निसर्ग’ नावाच्या रचनेला व्यक्तिरूप मानून तिला जाणीव असते या मताविषयी आहे. भाषांतरातील संदिग्धतेबद्दल क्षमस्व सं.
(२) पण आजच्या विज्ञानविचारांत ‘समुच्चय म्हणजे घटकांचे यांत्रिक एकत्रीकरण’, असे मानले जात नाही. नागरीकरण विशेषांकातील जेन जेकब्स चा लेखही हे स्पष्ट करतो. सं.
टॉयन्बी व इकेडा यांच्या चर्चेत जे म्हटले आहे ते माझ्या मतांशी खूप जुळणारे आहे. जानेवारीच्याच अंकातील निखिल जोशी यांच्या पत्रातील बऱ्याचशा मुद्द्यांची उत्तरे वरील चर्चेत आहेत.
इकेडा “अंतःप्रेरणेतून उपजलेल्या शहाणपणाचा” उल्लेख करतात. टॉयन्बी म्हणतात की अभ्युपगमांचा उदय होतो तो अंतर्मनाच्या, नेणिवेच्या पातळीवर. म्हणजे माहितीचे संकलन आणि त्यावर केलेली तर्काची प्रक्रिया यांपेक्षा काहीतरी जास्त आवश्यकता असते ज्ञानाची निष्पत्ती होण्याकरिता. टॉयन्बी व इकेडा दोघांच्याही मते, शास्त्र व धर्म हे जीवनाकडे पाहण्याचे परस्परपरक मार्ग आहेत. टॉयन्बी यांच्या मते धर्म हा आपल्या जाणिवेचाच एक गूढ नकाशा आपल्यासमोर ठेवतो व त्याशिवाय “आपला निभाव लागणार नाही.” या गूढ नकाशात ज्या “आदिप्रतिमा असतात त्यांची मानसिक ताकद मोठी असते” हेही टॉयन्बी म्हणतात. फक्त या ताकदीची फायदेशीर बाजू त्यांनी विस्ताराने मांडलेली नाही. त्याशिवाय आपला निभावच लागणार नाही” यात सर्व आले. ‘जाणीव” अशी वस्तूच नाही असे म्हणणाऱ्याला मी विचारतो की तू जी काही धडपड करतोस, राग-लोभ धरतोस, प्रेम करतोस, आपली मते आग्रहपूर्वक मांडतोस हे काय सर्व रेणुपुंजांचे यांत्रिक कार्य आहे, त्यात इच्छा-अनिच्छा, जाणीव वगैरे काही नाही असे तुला वाटते का ? बहुतेक लोक याचे “नाही’ असे उत्तर देतील. प्रभाकर नानावटी यांनी आपल्या पत्रासोबत नगररचनेत उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांची यादी दिली आहे पण त्यात महत्त्वानुसार क्रम लावलेला नाही. आज नगरवासीयांना अग्रक्रमाने जे हवे आहे ते म्हणजे सुकर वाहतूक व्यवस्था, पाणी व वीज यांचा पुरवठा आणि घाणीचे निःसारण, निरनिराळ्या स्तरावरच्या शासनांनी या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात. घरे बांधणे व शाळा, रुग्णालये, खानावळी, सिनेमागृहे, दुकाने वगैरे चालविणे हे सर्व खाजगी क्षेत्रातच व्हायला पाहिजे.
नगररचनेचा आराखडा बनवणे व निरनिराळ्या हेतूंसाठी जमिनी उपलब्ध करून देणे एवढेच शासनाला करता येईल.
१) ‘अंतःप्रेरणा’ आणि ‘शहाणपण’ या दोन शब्दांच्या अर्थांना उत्क्रांतीतून रुजलेल्या मेंदूच्या तार्किक कार्याचेच टप्पे मानता येते.
२) ‘नेणीव’ ही देखील तर्कशुद्ध क्रियांमधून येणारी पण मेंदूच्या व्यामिश्रतेमुळे तर्कपरंपरा क्रमवार मांडून दाखवता येत नसलेली बाब आहे. अगदी जाणिवेच्या पातळीवरील अभ्युपगमांच्या उद्भवासाठीही पॉपरने ‘वर्ल्ड थ्री’ ही संकल्पना वापरली आहे (पॉपर, मॅगी, फाँटाना, १९७३).
३) ‘जाणीव’ ही अर्थातच ‘वस्तू’ नाही हे आपणही मान्य करालसे वाटते! टॉयन्बी-इकेडा विचारवंत तर खरेच, पण त्यांपेक्षा वेगळ्या त-हेने इहवादी-जडवादी विचारही केले जातात. ‘उद्भव’ (emergence), व्यामिश्रता (complexity), कोलाहल (chaos), स्वयंसंघटन (self-organization) या संकल्पना अशा विचारांमधूनच उद्भवल्या आहेत. आजचा सुधारक मध्ये यांपैकी काही कल्पनांची तोंडओळख करून द्यायचे प्रयत्न झाले आहेत, होत असतात, होत राहतील, पण ती तोंडओळखच असेल. आपण मेकॅनिक्स ऑफ द माइंड (Colin Blakemore, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस १९७७), कोलाहल, अपूर्णमित आणि स्वयंसंघटन (मूळ लेखक अरविंद कुमार, मराठीत भाषांतर चिंतामणी देशमुख, नॅशनल बुक ट्रस्ट, १९९०/२००१), उत्क्रांतिमानसशास्त्रावरील पुस्तके वगैरे वाचल्यास आपण ‘दुसरी बाजूही समजून घेऊन आणि ‘काहीतरी जास्त’ च्या ‘आवश्यकते’ची गरज नाही हे मतही ग्राह्य असू शकते हे कबूल करालसे वाटते. ते तोंडओळखीच्या पुढे जाणे ठरेल. ___नानावटींच्या पत्राबद्दल आपण शासनाच्या कर्तव्यांना ओझरता हात घातला आहे तो तपशिलात घालावा, ही जुनी विनंती नव्याने करतो.
भ. पां. पाटणकर, काचीगुडा , हैद्राबाद ५०० ०२७
चिरतरुण जातिव्यवस्था
भारतात आजही जातीनुसार लग्ने ठरवली जातात व ठरतात ह्यात वावगे असे काहीच नाही कारण दोन्ही घराण्यांची कमीत कमी दोन पिढ्यांची शैक्षणिक, आर्थिक, बौद्धिक इ. माहिती मिळते. त्यांचे सांस्कृतिक-सामाजिक विचार, संस्कार व रीतीरिवाज कसे आहेत ह्याची माहिती ठरवून केल्या जाणाऱ्या लग्नांमध्ये मिळते. अनेक उच्चशिक्षित व्यक्तींचे विजातीय व्यक्तीशी प्रेमविवाह होतात. कौटुंबिक परिचय व घसट निर्माण होते. आणि तसे विवाह यशस्वी होतात. केवळ दुसऱ्या जातीतलेच अशा प्रकारचे विवाह यशस्वी होतात असेच नाही तर भिन्नधर्मीयांचे विवाहही यशस्वी होतात. जातीजातीत किंवा त्यांच्यातील पोटजातीतच लग्ने होण्याचे कारण असे की त्यांच्यातील रीतीरिवाज, परंपरा, कुळाचार हे बरेचसे एकसारखे असतात, ज्यामुळे नववधूला सासरी सहजपणे सामावणे सोयीचे होते. उच्चशिक्षित तरुण पिढीत जातिव्यवस्था मान्य नसते, पण संस्कार व परंपरा मान्य असतात
म्हणून ते जात पाहून लग्न जुळवतात, ठरवतात व करतात आणि वैदिक पद्धतीने किंवा नोंदणी पद्धतीने लग्ने करतात, कारण त्यामुळे त्यांच्या दांपत्य जीवनात व्यत्यय येण्याची किंवा खंड पडण्याची शक्यता कमी होते.
इंग्रजीत प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांत ख्रिश्चन, शीख, बौद्ध, हिंदू धर्मीयांची उच्चशिक्षित, उच्चपदस्थ मंडळींची विवाहविषयक विज्ञापनाच्या विभागात त्याच्या शाखा-पोटशाखांसहित माहिती येते. त्यांच्या जातीतील, पोटजातीतीलच व्यक्ती त्यांना हवी असते. ख्रिश्चनामध्ये कॅथलिक व प्रोटेस्टंट ह्या दोन शाखा आहेत. गोव्याच्या ख्रिश्चनाला वसईचा ख्रिश्चन चालत नाही. त्याच्यात अनेक चर्चभेद आहेत, प्रोटेस्टंट व कॅथलिक ह्यांच्यात अनेक लढाया झाल्या व अजूनहि वैर आहे. हीच गोष्ट इस्लामची. त्यांच्यात शिया, व सुन्नी हे दोन पंथ आहेत. भारतात लखनौमध्ये ह्या दोघांत इतके वैर आहे की मोहरमच्या ताबुताच्या मिरवणुक काढताना हमखास दंगली होतात. ह्यात शेकडो मुसलमान मरण पावले म्हणून सतत चाळीस वर्षे ह्या मिरवणुकींवरती बंदी घालण्यात आली होती. त्यांच्यातही पोटभेद आहेत बोहरी, खोजा, दाऊदी, शेख, सय्यद, सैद, सिद्दिकी, कुरेशी, खान, पठाण, हैद्राबादच्या मुसलमानाला दिल्लीचा मुसलमान आणि लखनौच्या मुसलमानाला पाटण्याचा मुसलमान चालत नाही. शिखांमध्ये लाहोरी हे पेशावरी शीख हे अमृतसर-लुधियानाकडच्या शिखांना कमी प्रतीचे समजतात. बौद्धांमध्ये महायान व हीनयान हे प्रकार असले तरी बावणे बौद्धास सोमन्स बौद्ध चालत नाही. सर्व भिन्नधर्मीयांची सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती उत्कृष्ट प्रकारची असते. जगभर थोड्याफार फरकाने जातिव्यवस्था ही अस्तित्वात आहे.
हल्ली नवीन सुशिक्षित तरुणांमध्ये पत्रिका पाहणे, कम्प्यूटरवरती ती जमते की नाही हा प्रकार वाढत चाललेला आहे. हे हिंदुधर्मीयांमधे जास्त दिसत असले तरी इस्लाम व ख्रिश्चन ह्या धर्मांमध्येही आहे, हे ‘इन्किलाब’ व ‘उर्दू टाईम्स’, तसेच ‘टाईम्स ऑफ इंडिया’ व ‘द हिंदू’ वाचताना समजते. आणि समाजातील सर्व धर्मांतील उच्चशिक्षित मध्यम वर्गांमधे ह्याचे प्रमाण वाढत आहे ही चिंतेची बाब आहे.
हिंदी चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या नायकनायिका ह्यांच्यातील सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, विषमता ही टोकाची दाखवतात व त्यांचे प्रेमविवाह होऊन त्यांचा संसार सुखाचा दाखवतात. वास्तवात असे एकही उदाहरण माहीत नाही.
ब्राह्मण ही जात समाजात सर्वश्रेष्ठ समजली जाते. त्यांच्यातील पोटशाखांमध्ये सगोत्र विवाह होत नाही. त्याला थोडासा शास्त्रीय आधार ब्लडग्रुप मानला जात असे. पण आता ब्लडग्रुप तपासला जातो, व ते सयुक्तिक आहे. ब्राह्मणांमध्ये इतके पोटभेद आहेत की त्यांच्यात बेटी व्यवहार होत नसे. पण रोटीव्यवहार होत असे. अर्थात ही परिस्थिती साधारण पाऊणशे वर्षांपूर्वीची होती. आता परिस्थिती बदलली असून एक ब्राह्मण हीच जात तयार होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. कुणबी, मराठा, पाटील, देशमुख यांच्यातील काही भेद दूर होऊन लग्ने लागत आहेत. पोटभेद नष्ट होणे ही जातिभेद नष्ट होण्याची पहिली पायरी आहे आणि ती हळूहळू निर्माण होत आहे. ही पहिली पायरी निर्माण झाल्यावर जातिभेद मोडण्याची दुसरी पायरी निर्माण होण्याची शक्यता आहे. मनुष्य कितीही श्रीमंत झाला तरी तो स्वतःला गरीबच समजतो, पण गरीब व्यक्ती ही कितीही गरीब झाली तरी आपली जात पोट जात श्रेष्ठ मानत असतो. नुकताच अमरावती येथे मराठा, कुणबी, पाटील, देशमुख इ. एकत्र येऊन ब्राह्मणशाहीच्या विरोधात शिवधर्म स्थापन झाला आहे. सर्वच आपल्याला मराठा समजतात. ह्यात उच्चशिक्षित मंडळी आहे. पण मराठा ही जात लिहून कुणब्यांना मिळणाऱ्या ज.इ.उ सवलती नाकारणारे किती आहेत, हा एक संशोधनाचा विषय होईल.
राजशेखर ह्यांच्या लेखामध्ये जातिव्यवस्था मोडायला पाहिजे असे ध्वनित होते पण तसे घडण्याचे प्रमाण ह्या शताब्दीच्या उत्तरार्धात वाढेल व पुढच्या शताब्दीमध्ये प्रमाण वाढतच जाईल; पण संपूर्ण जातिव्यवस्था मोडण्यास किती वर्षे लागतील हे कोणीच सांगू शकत नाही. उच्चशिक्षित लोक जातिबाह्य लग्न करत नाहीत हे अर्धसत्य आहे, कारण मागच्या अनेक वर्षांत अशी लग्ने झाली व यशस्वीही झाली. जातीतच लग्न करणे हे जुनाट व बुरसटलेले आहे असे म्हणणे योग्य आहे का ?
ब्राह्मण हे बहुसंख्यकामधील अल्पसंख्यक व हिंदू हे सहनशील त्यामुळे त्याच्यावरती टीका-टिप्पणी करणे धोक्याचे नसते. अशाच प्रकारचे लेख इतर धर्मीयांमध्ये असलेल्या जातिभेदासंबंधी लिहिण्याची हिम्मत करायची राजशेखर ह्यांना विनंती करतो.
अब्राह्मणाच्या मुलाने जर ब्राह्मण मुलीशी प्रेमविवाह केला तर त्या मुलास ह्या कृतीचा अभिमानच नव्हे तर गर्व वाटतो हे त्याच्या बोलण्यात अनेकदा येत असते. म्हणजे तो ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व अप्रत्यक्ष रीतीने मान्य करत नाही का ?
खरीच चिरतरुण आहे, जातिव्यवस्था!
दिलीप भट, माऊली, भटवाडी, श्रीधर नगर, पो. साईनगर, अमरावती-४४४ ६०७.
म. गांधीचा खून झाला त्यावेळी एक निर्णय बेळगावच्या सेवादलाच्या बैठकीत झाला, प्रत्येक महिन्याच्या ३० तारखेला संडास सफाई करायची, असा. आम्ही डबा व टोपली ओढून काढू. संडासच्या गाडीत असलेल्या मोठ्या डब्यात ओतू. हा अनुभव घेत राहू. आम्हाला बऱ्याच त्रुटी जाणवल्या. संडासाच्या डब्यात वा टोपलीत फक्त मैलाच असत नसे, तर फुटलेल्या काचा, घरातील कचरा, नको असलेल्या वस्तू असत त्याचा अनुभव आम्हाला विपरीत होता. प्रत्येक वेळी आम्ही ३०-४० संडास साफ करू. शेवटी आम्ही नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो आणि आमच्या अडचणी सांगितल्या. हा अनुभव मेहतरांना पण येई. त्यांच्याही बऱ्याच तक्रारी होत्या. अप्पासाहेब पटवर्धन आले होते. त्यांच्याशीही चर्चा झाली. ते म्हणाले, सब चीजों का फायदेशीर इस्तेमाल, म्हणजे सफाई, असा अर्थ. आम्ही त्याचीही माहिती घेतली, तेव्हा कळले गावाबाहेर मोठे चर काढलेले खड्डे होते. तेथे तो मैला टाकला जाई व त्याचे सोनखत तयार होई. त्याची विक्रीही होत असे.
आता नगरपालिकेने एक समिती बनवली. प्राचार्य इ.सी. रेड्डी हे प्रमुख आणि आम्हीच त्या समितीचे सभासद होतो. एक दिवस पाहणी करावी आणि मग अहवाल द्यावा असे ठरले. मैल्याची एक मोटार होती. तीवर उभे राहून शहरातील सर्व संडासांची पाहणी आम्ही जागरुकतेने केली. काही ठिकाणी संडासासाठी वापरलेल्या टोपल्या तुटक्या होत्या. त्या घेताना अंगावर घाण पाणी पडे. डबे तुटके असत. ते बदलले जात नसत. अनेक प्रकारचे अनुभव येत होते. घरातील तुटलेल्या चपला पण त्यात होत्या. संडास आहे, कसाही वापरावा, ही वृत्ती फारच खटकली. आम्ही चालवलेला हा उद्योग अनेकांना आवडत नसे. आम्ही कॉलेजचे विद्यार्थी. आम्ही हा असला प्रकार करावा याबद्दल नाराजी होती. अगदी घरच्या लोकांचीही होती. त्यांना हे सर्व खटकायचे. पण आम्ही आमच्या निष्ठा बदलल्या नाहीत. पाहणी पूर्ण झाली. आम्ही आमचा अहवाल तयार केला. मेहतरांना ‘गम बूट’ द्यावेत, हातांत गमचे हातोपे द्यावेत, बेळगावच्या सर्व घरमालकांना समज द्यावी, की टोपल्या नकोत डबे वापरावेत. तसे न केल्यास क्रम योजिले जातील, असे आम्ही स्पष्टपणे म्हटले. समितीची बैठक झाली. प्राचार्य रेड्डी आमच्या बाजूने उभे राहिले. अहवाल मंजूर झाला. त्याची अंमलबजावणी झाली. असे आम्हाला यश मिळाले.
वासु देशपांडे, कमलकुंज, पानमळा – ६, दत्तवाडी, पुणे ४११ ०३०.
माझे पत्र आसुच्या १५.९ (डिसेंबर ०४) च्या अंकात छापून त्यावरील खांदेवालेंची प्रतिक्रिया छापली आहे. तीवर माझे मत.
(१) माझी काही विधाने तिरकस वाटणारी आहेत. मात्र तसा हेतू ठेवून मी ती विधाने केली नाहीत. एक खेड्यातील सामान्य कार्यकर्ता (अॅकेडेमीशियन नाही) म्हणून खांदेवाल्यांनी सदरहू अहवाल-परिचयात केलेल्या किंवा अहवालात असलेल्या हास्यास्पद वाटलेल्या काही निष्कर्षांमुळे विवेकवादी आसु ची लेखनशिस्त मोडून माझ्याकडून चूक झाली. मी शिस्तीने लिहिणारा, लेखक, तज्ज्ञ नाही त्यामुळे गैरसमज नसावा.
(२) म्हणून आसु सारख्या नियतकालिकांची गरज आहे. दुसऱ्या मुद्द्याबदद्दल केलेली वक्तव्ये दखल घेण्याइतकी व उत्तर देण्याइतकी वजनदार नाहीत. खरोखरीच सगळी वाचनालये, विद्यापीठे, शिक्षण संस्था, संशोधन संस्था बंद करून टाकायच्या का ? ह्यासारखी खांदेवाल्यांची तिरकस व माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कार्यकर्त्याला, त्याच्या मताला, मुद्द्याला अदखलपात्र ठरविणारी वृत्ती योग्य नाही. त्याला मी ब्राह्मणी f ? सं अहंगंड समजतो.
(३) खांदेवाल्यांचे यापूर्वीचे आसु मधील लेखन, अहवाल-परिचय हे सातत्याने जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था, उदारीकरण या विचाराच्या विरोधी आहे. आसु मध्ये कुठल्याही विषयावरील लेखन, चर्चा बाजूने व विरोधी व्हावी. कुठल्या तरी एका विचारसरणीचे मुखपत्र होऊ नये. नाहीतर आसु चा जीवनमार्ग, सामना होऊ शकतो.
(४) अहवाल व अहवाल-परिचय करून देणाऱ्या खांदेवाल्यांच्या मते ‘जागतिकीकरणात कृषिव्यापाराला पूर्णतः मोकळीक मिळाल्यास तौलनिकरित्या मोठे निर्यातक शेतकरी व छोटे कौटुंबिक शेतकरी ह्यांच्यापैकी व्यापाराचा जास्त फायदा कोणाला मिळेल ?. . . भविष्यातील जागतिकीकरणात दक्षिण आशियायी शेतकरी कुटुंबांची उत्पन्ने अपुरी असल्यास ह्या देशामधील मानव विकासाचे काय होणार ? आणि जर आपल्याला ह्या देशातील संपूर्ण ग्रामीण जनतेचे जीवनमान वरील निर्देशांकांच्या स्वरूपात प्रगत व उन्नत असावे असे वाटत असेल तर त्यासाठी शेतमालाची केवळ बाजारयंत्रणा पुरेशी आहे की काही शासकांस धोरणांची चौकट आवश्यक आहे ?” या संदर्भात तौलनिकरीत्या योग्य निर्यातक शेतकऱ्यांना व्यापाराचा फायदा जास्त मिळेल हे खरे असले तरी दक्षिण आशियायी देशांनीही मोठे निर्यातक झाले पाहिजे. त्यासाठी सक्षम बाजारयंत्रणा उभी करावी लागेल.
शेतमालावर दक्षिण आशियायी देशांत गेली ५०-६० वर्षे तालुका, जिल्हा, प्रांत, देश व निर्यातबंदी, भ्रष्टाचार, राजकीय स्वार्थासाठी केलेली शेतमालाची आयात, झोनबंदी, लेव्ही, कोटापद्धती, लायसेन्स-परमिट अशा कृत्रिम बंधनांमुळे दक्षिण आशियायी देशांतील शासन धोरणांनी शेतीची वाट लावली आहे. हे एक शेतकरी म्हणून ३० वर्षे प्रत्यक्ष अनुभवतो आहे.
दक्षिण आशियायी देशांच्या शेतीमधील सरप्लस, वाढावा या शासन धोरणांनी काढून घेतले नसते तर दक्षिण आशियायी देशांतील मानवविकास युरोप अमेरिका देशांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापुढे राहिला असता. भरपूर सूर्यप्रकाश, अमेरिकेच्या तिप्पट जलसंपत्ती, चांगले हवामान यामुळे युरोप-अमेरिकेसारख्या मोठ्या निर्यातक देशांना खुल्या बाजारपेठेत दक्षिण आशियायी देश मागे टाकू शकतात.
(५) मी ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’चा संचालक आहे. “बाजारसमित्या ह्या खरेदीदारांनी संगनमत करून, भाव पाडून, विक्रेत्या शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये म्हणून निर्माण केल्या गेल्या आहेत त्यामुळे व्यापारस्वातंत्र्याच्या नावाखाली त्या बरखास्त केल्या जाऊ नयेत” या खांदेवाल्यांच्या मताशी मी सहमत नाही. कारण ‘कृउबास’ची निर्मिती कितीही गोंडस, शेतकरीहिताच्या रक्षणाची भाषा बोलत असली तरी व्यवहारात, वस्तुस्थिती तशी नाही, हे मी बाजार समितीचा संचालक असूनही अनुभवतो आहे.
गेली दोन वर्षे कापसाची व्यापारी खरेदी (एकाधिकार फेडरेशनशिवाय) सुरू आहे. खेडोपाडी व्यापारी शासकीय खरेदीपेक्षा जास्त भाव व रोख चुकारा करीत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस विकत आहे. मात्र ‘मार्केट कमेटी फी’ वसुलीची यंत्रणा खेडोपाडी उभी करता येत नाही म्हणून ‘कृउबास’ने व्यापारी खरेदी बंद करण्याचा प्रयत्न केला. ‘कृउबास’ ची ‘फी’ महत्त्वाची की व्यापारीखरेदीत २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळणे महत्त्वाचे ? मी संचालक असूनही या शेतकरीविरोधी बाजारसमितीच्या प्रयत्नांविरुद्ध मला लढावे लागले. अशी अनेक उदाहरणे (शेतकरीहितविरोधी काम ‘कृउबास’कडून होते.) याबाबत देता येतील. कृउबास’ शेतकऱ्यांचे शोषण बंद करणाऱ्या संस्थांऐवजी शेतकऱ्यांची अडवणूक करून मार्केट फी वसुली करणाऱ्या, फी वसुलीतून भ्रष्टाचार करणाऱ्या, राजकीय सत्ताकेंद्रे म्हणून वापर होणाऱ्या, अशा संस्था उरल्या आहेत. “कृउबास’ कायम ठेवून खरेदीदार व विक्रीदार शेतकरी यांना मार्केटकमेटी बाहेरही खरेदीविक्रीची मुभा असावी ह्यामुळे ‘कृउबास’ व खुला व्यापार, यांच्यात स्पर्धा होऊन शेतकऱ्यांचा फायदा होईल. ज्या व्यवस्थेत शेतकऱ्यांचा फायदा राहील तेथे शेतकरी माल विकतील. ह्या मध्यममार्गाचा अवलंब करावा.
(६) “सगळी वाचनालये, विद्यापीठे, शिक्षण, संशोधनसंस्था बंद करून टाकायच्या का ? तो विवेकीपणा होईल का ?” या खांदेवाल्यांच्या मताबाबत असे वाटते की, विद्यापीठ, शिक्षण, संशोधन संस्थांवर होणारा अवाढव्य खर्च व त्यामधून समाजाला मिळणारा फायद्याचा विचार जरूर झाला पाहिजे. या संशोधनसंस्था, विद्यापीठे अगदीच सर्वच्या सर्व बंद करण्याच्या लायकीची आहेत असे माझे मत नाही पण त्यांचे मूल्यमापन व्हावे या मताशी तरी खांदेवाले सहमत होतील काय ? तूर्तास एवढेच. या वर्षाअखेरी ‘माणूस, जमीन व पाणी’ याबद्दल एक विशेषांक काढणार आहोत. श्री गुंजाळांनी त्या संदर्भात लेख लिहिल्यास त्यांचे स्वागतच होईल.
मोहनराव कारभारी गुंजाळ, पटेल कॉलनी, विंचूर रोड, येवला, जि. नाशिक.
‘शुद्धलेखनातील अराजक: परिणाम आणि उपाय’ या दिवाकर मोहनी यांच्या ऑगस्ट-सप्टेंबरच्या आसुमधील लेखातील काही मुद्द्यांच्या निमित्ताने लिहीत आहे.
२. शुद्धलेखनातील अराजक हे शास्ते नियम नसल्यामुळे झालेले नाही, तर अस्तित्वात असलेले नियम सर्वत्र पाळले जात नसल्यामुळे झालेले आहे. माझ्यासमोर ‘भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन’ यांनी १९८७ मध्ये प्रसिद्ध केलेली ‘शुद्धलेखन नियमावली’ ही पुस्तिका आहे. स्पष्टीकरणांसहित एकूण १८ नियमांची ही नियमावली विस्तृत स्थल-काळ-व्यक्तित्वे-संस्था यांतून झडलेल्या वाद/चर्चा इत्यादींच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्य महामंडळ व महाराष्ट्र शासन यांनी मान्य केलेली आहे. आज मराठीतील मौज-पॉप्युलर-कॉन्टिनेन्टल-मेहता-राजहंस इत्यादी प्रतिष्ठित प्रकाशक, सकाळ-लोकसत्ता इत्यादी प्रतिष्ठित वृत्तपत्रे, आणि आसुसहित प्रतिष्ठित नियतकालिके याच नियमांचे पालन करताना दिसतात. त्यातून राहिलेल्या त्रुटी या प्रतिष्ठितांसाठी मुद्रितशोधन करणाऱ्यांच्या नजरेतून निसटल्या असेच म्हटले पाहिजे. (मोहनींच्या लेखातील अनुच्चारित अनुस्वार नक्कीच मुद्रितशोधकाने खास सूचनांनुसार राहू दिले असणार !) त्याचप्रमाणे, शासननिर्मित पाठ्यपुस्तके, कोश, शासनव्यवहार इत्यादींमधूनही याच नियमांचा वापर दिसतो. आजची तिशी-विशीतली तरुण आणि मध्यमवयीन मंडळी, तसेच त्यांची शाळा कॉलेजात शिकणारी मुले, यांचे शिक्षणही याच नियमांनुसार झालेले आहे आणि होत आहे. गेली पंचवीस-वीस वर्षे तरी प्रमाणित मराठी भाषेसाठी शुद्धलेखनाचे हेच प्रमाणित नियम आहेत.
३. या परिस्थितीत आता हे नियम बदलणे हे मात्र मोठ्या अराजकाला कारणीभूत होईल. काहीही करून ते टाळले पाहिजे. आधीच इतर अनेक कारणांमुळे मराठीची स्थिती अधिकाधिक दयनीय होत चालली आहे.
या नियमांसंदर्भात मुख्यत्वेकरून पुढील तीन गोष्टींना विरोध व्यक्त होतो. (मोहनींच्या लेखातही यांची बरीच चर्चा आहे.)
उच्चारानुसारी लेखनाची आवश्यकता, अनुच्चारित अनुस्वार गाळणे आणि संस्कृतामधून सरळ मराठीत आलेले ‘तत्सम’ हस्व इकारान्त व उकारान्त शब्द दीर्घान्त लिहिणे.
४. उच्चारानुसारी लेखनाच्या संकल्पनेचा अतिरेकी वापर अयोग्य खरा, पण काही प्रमाणात तो भाषेच्या जडणघडणीचाच भाग म्हटला पाहिजे. अगदी पूर्वीच्या काळीच विह्वल, आह्वान, प्रह्लाद, या मूळ संस्कृत शब्दांचे अगदी प्रमाण मराठीत विव्हल, आव्हान, प्रल्हाद का झाले ? (विनोबांचा अपवाद!) पण अगदी गंभीर लेखनातदेखील ‘झाले आहे’ याऐवजी ‘झालंय’ वापरणे हा या संकल्पनेचा अतिरेकी अंमल आहे. (शिवाय नियमांकरवी एका दाराने बाहेर पाठवलेले अनुच्चारित अनुस्वार आणि पायमोडकी अक्षरे दुसऱ्या दाराने आत शिरतात ते वेगळेच!)
५. अनुच्चारित अनुस्वार गाळल्यामुळे (नियम ४) काही ठिकाणी संदिग्धता येते, पण ती संदर्भानुसार नाहीशी होते हे खरे. संदिग्धतेची इतरही उदाहरणे देता येतील. दिवस, कागद, उपाय, मूर्ती एक की अनेक ? संदर्भच जाणे.
६. स्थिती, गती, मती, वस्तू, बिंदू इत्यादी तत्सम शब्द दीर्घान्त लिहिण्याच्या नियम-५ मुळे मात्र अनेकांना अस्वस्थ केले आहे. विशेषतः ‘गुरुं’ बद्दल तर फारच वेदनादायक! उच्चारानुसारी लेखनाच्या संदर्भात बहुजन समाजाचा, जातिवाचक इत्यादी उल्लेख मात्र सर्वस्वी अनाठायी आहे. अगदी पटवर्धन आणि कुलकर्णी आडनावांची मुले आपली नावे रविंद्र आणि दिपा लिहितात. असा हा काळ आहे.
कसेही असो, एकंदरीत नियम-५ आवश्यकच आहे असे माझे मत आहे निदान त्यातून मराठीची अस्मिता तरी प्रकट होते असे म्हणू ! परंतु याच नियमाने सिद्ध होणाऱ्या दोन अनवस्थांविषयी आजपर्यंत कुणी लिहिलेले मला आढळले नाही. त्या अशा :
एकतर, नियमानुसार ‘स्थिती’ शुद्ध, पण ‘स्थितीशील’ अशुद्ध, ते ‘स्थितिशील’ पाहिजे, कारण स्थिती हा तत्सम शब्द आहे. संस्कृत न जाणणाऱ्या मराठी माणसाच्या पचनी हे पडणे कठीण आहे. विद्यार्थी’ शुद्ध पण ‘विद्यार्थिमंडळ’ का लिहायला पाहिजे, हे कळायला तर आधी संस्कृत शिकून मगच मराठी शिकले पाहिजे. मराठी माणूस म्हणेल की ‘स्थिती’, ‘गती’ हे शुद्ध असतील, तर ‘स्थितीशील’, ‘गतीमान’ हेच शुद्ध समजले पाहिजेत. नाहीतर मग ‘स्थिति’, ‘गति’ हेच शुद्ध समजा. दोन्हींपैकी कोणतेही स्वीकारायचे असेल, तरी नियम बदलावा लागेल.
पण मी या दोन्हींचाही आग्रह धरणार नाही, कारण ‘गती’ व ‘गतिमानता’ हे शब्द शुद्ध असल्याची गेल्या पंचवीस-तीस वर्षांची परंपरा आहे व ती जागृत प्रकाशक आदींमध्ये व आबालतरुणांमध्ये रुजली आहे. (उरलेले बहुसंख्य निद्रिस्त आहेत आणि तेच अराजकाला कारणीभूत आहेत.)
खरा अद्भुत प्रकार या नियमाच्या स्पष्टीकरणातील शेवटल्या परिच्छेदात आहे. तो मराठी कोशांशी संबंधित आहे. आधीच समाजात कोश पाहण्याची उत्सुकता कमी, त्यातून अ ते ज्ञ ओळीने, तसेच बाराखडी पाठ नसणारेच असंख्य सुशिक्षित मग कोश कसा पाहणार ? अशा परिस्थितीत या परिच्छेदाकडे दुर्लक्ष होणे साहजिकच म्हटले पाहिजे. तो परिच्छेद असा :
“मराठी शब्दकोशात मात्र तत्सम (हस्व) इकारान्त व उकारान्त शब्द -हस्वान्त लिहिणे इष्ट ठरेल. जसे पद्धति, अनुमति, प्रतिकृति, दृष्टि, अणु, वायु, हेतु वगैरे. परंतु असे शब्द कोशाबाहेर वापरताना दीर्घान्त लिहिले पाहिजेत.”
कोशात एक व कोशाबाहेर दुसरेच, हा प्रकार जगातल्या इतर कोणत्या भाषेत असेल असे मला वाटत नाही. या प्रकाराचे एक ‘स्पष्टीकरण’ काहीजण असे देतात की कोशात ‘गति’ असे पाहिजे म्हणजे ‘गती’ असे आपण लिहीत असलेला शब्द तत्सम आहे असे माणसाला कळेल, व त्याला ‘गतिमान’ मान्य होईल. वेगळे बि-हाड थाटायचे, पण आईचा पदर सोडवत नाही असा हा प्रकार आहे. आजवर लिहिण्या-बोलण्यातल्या भाषांतील फरकाचीच चर्चा होत होती, आता कोशातली भाषा व लिहिण्याची भाषा असाही भेद निर्माण झाला. शिवाय ‘गती’ या (शुद्ध) शब्दाचा नेमका अर्थ पाहण्याची इच्छा असलेल्या शहाण्या माणसाला तो शब्द कोशात (बाराखडीनुसार) ‘गतिमान’ नंतर शोधून सापडणार नाही हे नक्की.
. . . (कोशात) हस्वान्त लिहिणे इष्ट ठरेल’ असे सुचवणारा हा परिच्छेदच इष्ट नाही व तो नियमाच्या स्पष्टीकरणातून गाळावा, म्हणजे हा अनवस्था प्रसंग टळेल असे माझे मत आहे. असे करण्यामुळे ‘नियमावली’तील मूळ नियमांना बाधा येत नाही हे मुद्दाम नमूद करतो. जिथे जिथे मराठी शब्द येतात त्या सर्व प्रकारच्या कोशांमध्ये हे (तत्सम) शब्द स्थिती, गती, मती असेच फक्त आले पाहिजेत.
७. मराठीतली सामान्य रूपे, लिंग-वचन-विभक्ती, हस्व-दीर्घ, जोडाक्षरे आणि एकंदरीतच मराठी शुद्धलेखन, ही अनेकांना फार जाचक वाटतात. वास्तविक ही मराठीची स्वभाववैशिष्ट्ये व अलंकार आहेत हे सर्व मराठीप्रेमींनी जाणले पाहिजे. सर्वपरिचित म्हणून इंग्रजीचे उदाहरण घेऊ. maintain वरू maintenance शब्द येतो, तेथे रळ च्या जागी श येतो; का? attend वरू attendance येतो, पण depend वरून मात्र dependence येतो एकात र तर दुसऱ्यात श का ? या प्रश्नांची उत्तरे भाषाशास्त्रज्ञ देऊ देत; आपण त्यांना विचारायला जात नाही, ऑक्सफर्डसारखी डिक्शनरी प्रमाणभूत मानतो. इंग्रजी शुद्धलेखनात (पुस्तके, वृत्तपत्रे, दूरदर्शन, जाहिराती, दुकानांवरच्या पाट्या इत्यादींतून) मराठीतल्यासारखे अराजक दिसत नाही, याचे निदान एक महत्त्वाचे कारण म्हणजे बालवयापासून स्पेलिंगबद्दल शब्दांतून घेतली जाणारी खबरदारी सक्त दंडक व दंड यांची योजना. मराठी शब्दांतून अशुद्ध लेखनासाठी कान धरणे, अथवा छडी, अथवा मार्क कापणे, अथवा अनेकबार लिहायला सांगून घोटवून घेणे, सर्व केव्हाच हद्दपार झाले. दीर्घकाल हे होत राहिल्यामुळे शुद्ध काय व अशुद्ध काय हे माहीत असणारे शिक्षकही आता नसल्यातच जमा आहेत.
८. मराठी शुद्धलेखनातील अराजक दूर होण्यासाठी उपाय काय ? पहिली गोष्ट म्हणजे असलेले नियम आता बदलू नयेत; ते दीर्घकाल जागरूक असणारी माणसे वापरीत आहेत. या नियमांनुसार मुद्रितशोधन करणारी सध्या जी (अगदी कमी संख्येने) माणसे आहेत, त्यांच्या मदतीने नव्या प्रशिक्षित मुद्रितशोधकांची फळी उभारावी. त्यांच्याकरवी शाळांमधील मराठी शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे. बालवर्ग-पहिलीपासून शुद्ध कसे लिहावे हे, ते शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवू शकतील व त्यांच्याकडून घोटवून घेऊ शकतील. सर्वांच्या मार्गदर्शनासाठी, ज्यात सामान्यरूपे, अनेकवचने, उच्चार, व्युत्पत्ती, प्रादेशिक बोलीभाषांतले शब्द, या सर्वांचा अंतर्भाव असणारे प्रमाणभूत शब्दकोश निर्माण करावेत. त्या कोशांमध्ये शुद्ध म्हणून गती व गतिमान यांचाच अंतर्भाव असेल, आणि कोशाबाहेरही हेच शब्द लिहायचे, छापायचे व उच्चारायचे असतील. हे सर्व झाल्यानंतर कित्येक वर्षांनी सुधारणा दिसू लागेल. दुखणे खूपच जुने व मुरलेले आहे.
९. मोहनींनी आपला लेख आधीच साहित्य महामंडळाकडे पाठवलेला दिसतो. वाचकांच्या प्रतिक्रियाही एकत्रितपणे तिकडे पाठवाव्यात असे सुचवण्याचे धाडस करतो.
वि.शं. ठकार, ‘स्वप’, ४४, विजयानगर कॉलनी, २०९६, सदाशिवपेठ, पुणे
शुद्धलेखनाबाबत मराठी भाषेत आज अराजक आहे, हे मोहनींचे निरीक्षण (‘शुद्धलेखनांतील अराजक’ अंक १५.५ व ६) कोणाही वाचकाला मान्य होईल. प्रश्न आहे तो याच्या दुष्परिणामांचा. विज्ञानाच्या क्षेत्रातही अराजकासारखी स्थिती आहे. हे पॉल फेयराबेंडच्या ‘सब चलता है’, “एनीथिंग गोज’ या वाक्यातून दिसलेच होते. (हेमचंद्र प्रधानांचा अंक १४.९/१० व १४.११ मधील लेख). पण विज्ञानात नव्या व टिकाऊ विचारांची उणीव नाही. मोहनी आपल्या समाजात नव्या, टिकाऊ विचारांच्या निर्मितीत घसरण झाल्याचे नोंदतात, आणि त्याचा संबंध उच्चारानुसार लेखनाच्या मागणीशी असल्याचे सुचवतात.
आपण ‘पूर्वी’ लिहिलेला, छापलेला मजकूर समजावून घ्यायला वाचनाची कला किंवा विद्या वापरतो, हे मान्य. पण ‘पूर्वी’ म्हणजे किती जुने, याबद्दल जरा विचार करू. बहुतांश लोकांना मागील एक-दोन पिढ्यांचे लिखाण समजावून घेणे पुरते. दोन पिढ्यांपेक्षा जुने वाचून, समजावून घेण्याची गरज मूठभर विद्वानांनाच भासते. इतरांना जुन्या ‘भोज्यां’ना स्पर्श करणे आवश्यक नसते. ज्यांना जुने वाचावे लागते, त्यांना वेगवेगळ्या शब्दरचना, शब्दांचे वेगवेगळे लेखन घाबरवत नाही (मोहनीच ‘ज्ञानेश्वर’ हा शब्द सात तहांनी लिहून दाखवतात). उलट लेखनपद्धती आणि शब्दरचनेतून हे विद्वान लेखनाचा काल आणि त्याकाळच्या समाजधारणांचे संशोधन करतात. म.वा.धोंडांचे ज्ञानेश्वरीबाबतचे लेखन पाहावे.
नवशिक्षितांना पूर्वशिक्षित ब्राह्मणांपेक्षा कमी मानू नये, हे मोहनी आवर्जून नोंदतात. पण काहीसे तसे ‘कमी मानणारे’ विधानही करतात, की ‘लेखन-नियमांशी, लिपींशी खेळणारी मंडळी जुनी पुस्तकें कधीच कोणी वाचूं शकणार नाहींत’ आणि याबाबत दुःख व्यक्त करतात. (मला तरी) वरील वाक्यांशातील शेवटच्या पाच अनुस्वारांपैकी काही (किंवा सर्व!) गाळल्याने अर्थात बदल होतो किंवा आकलनात अडचण येते असे वाटले नाही. प्रत्येकच वाचकाने याबाबत स्वतःचे मत तपासावे. जुनी पुस्तके कोणी वाचूच शकणार नाही, ही भीती कितपत खरी मानावी ?
मोहनी दोन (तरी) ठिकाणी ‘शास्त्रपूत’ लेखन दंडार्ह मानू नये, असे सांगतात. मला तसे कोणी करताना दिसत नाही. उलट ‘यद्यपि बहु नाधीषे’ (पृष्ठ २२१) या श्लोकात व्याकरण येणारा आढ्यतेने व्याकरण न येणाऱ्याला हिणवून ‘दंडिताना’ दिसतो.
आज मराठी समाज अपार गोंधळलेला आहे. तो नि यकी, अराजकी, अशा स्थितीत आहे. त्यात नवीन, टिकाऊ विचार घडत नाही आहेत. जुन्या (बरेचदा टाकाऊ) विचारांचे पुनरुत्थान, परक्या (बरेचदा टाकाऊ) विचारांची विकृत आयात, असे सारे घडत आहे. सोबतच जुन्या व परक्या विचारांतून नवी टिकाऊ रूपे कमावण्याचे प्रयत्नही होत आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये संवाद घडूनच वेगाने बदलणारी जीवनशैली समाज पचवू शकेल.
आणि यात काटेकोर, प्रमाण, शास्त्रपूत बोलणेही अडथळे आणते. असे माझे निरीक्षण आहे. ‘शास्त्रपूत’तेत कमी पडणाऱ्यांना आपल्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हिणवले जात आहे, असे वाटते. ह्याची उदाहरणे (लांबण टाळण्यासाठी) देत नाही. पण हे समोरासमोर बोलण्याबाबत, एकाच पिढीच्या लोकांमध्ये घडते. आणि हे टाळायला हवे. त्यासाठी जर प्रमाणीकरणावरचा आग्रह सोडावा लागत असेल, तर आमीन, लश ळी, तथास्तु !
विज्ञानाचे व्यवहार ‘विज्ञान म्हणजे काय ?’ या प्रश्नाला ‘प्रमाण’ उत्तर न देताच होत आहेत, हे पुन्हा एकदा नोंदतो. त्यामुळे समाजव्यवहाराचे एक विज्ञानापेक्षा वेगळे अंग, भाषा, यातही प्रमाणीकरणावरचा आग्रह मला अनावश्यक वाटतो.
पण शुद्धलेखन हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही मी माझी निरीक्षणे नोंदली, ती विचारात घ्यावी. माझी मते अपूर्ण, चुकीची असतील, ही शक्यता आहेच!
नंदा खरे, नागपूर