जॉर्ज ऑरवेलची नॅशनॅलिझमवरची टीका ही समूहवादाला उद्देशून होती, राष्ट्रवादाला नव्हे हे मी सप्टें. ०४ च्या अंकातील पत्रात स्पष्ट केले होते. तशीच चूक मीरा नंदा ह्यांच्या ‘आधुनिकोत्तरवाद’ ह्या लेखात दिसते. भारतात इ.स. १३०० पासून मुस्लिमांनी जिहादच्या नावाने प्रचंड कत्तली घडवून आणल्या आहेत. ह्याची प्रतिक्रिया म्हणून शिवाजीच्या वेळेपासून हिंदू समाजाचे संघटित होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच परिणाम टिळक, सावरकर, हेडगेवार यांच्या राष्ट्रवादाच्या पुरस्कारात झाला आहे. ही तथ्ये नाकारली आहेत.
हे मुस्लिम दहशतवादी अत्याचार आजही चालू असून त्याविरुद्ध राष्ट्रवादी शक्ती उभ्या करणे ही काळाची गरज आहे. वेदात विज्ञान आहे की नाही ह्याच्याशी कत्तलींचा संबंध नाही. हा सर्व इतिहास नजरेआड करून, बंगाली भावुक विद्वत्तेच्या आश्रयाने विवेचन करणे सुधारकी परंपरेला धरूनच आहे. इतिहासाची यथार्थ जाण ठेवून अभ्यास व्हावा ही अपेक्षा. वेदकालासंबंधी यथार्थ माहिती माझे पुस्तक “India through the Ages’ मध्ये मिळेल. २) नागरीकरण विशेषांक (१०-११-०४) उत्तम पण झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनावर लेख हवा होता. नंतर द्यावा.
१) ऑर्वेल समूहवादावर लिहीत नाही तर ‘विचारवंतांमधील नॅशनॅलिझम’वरच लिहितो. या ‘वादा’चा एक गुण म्हणजे एकूण एक घटना आपल्याला ‘हृद्य’ वाटणाऱ्या संस्थेच्या उत्थान-पतनाच्याच रूपात पाहणे. खुद्द फडके अशा विचारांचे उत्कृष्ट उदाहरण पुरवतात. त्यांना ‘वस्तुनिष्ठ वैज्ञानिक तथ्ये असतात की नाही?’ या प्रश्नापासून ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या चुकीच्या अवतरणापर्यंत साऱ्यातच इस्लामी दहशतवाद दिसतो.
२) मोठाल्या मानवी समूहांना एकच गुण सरसकट चिकटवणे, हा नॅशनॅलिझमचा गुणही फडक्यांमध्ये आहेच. नाहीतर ‘बंगाली भावुक विद्वत्तेच्या आश्रयाने विवेचन करणे’ त्यांना सुधारकी परंपरेत दिसले नसते, ना सर्व बंगाली भावुक असतात, ना सुधारकी परंपरा एकसंध आहे, ना तिचा इस्लामी दहशतवादाशी संबंध आहे.
मला तरी हा निरीक्षणाधिष्ठित विवेकी विचारमंथनासाठी आ.सु.ने घडवलेला अवकाश व्यापण्याचा फडक्यांचा प्रयत्न दिसतो. शक्य तितके कमी औद्धत्य दाखवून झाले आहे. – नंदा खरे
पु. नी. फडके, एस-१५-भारतनगर, नागपूर-४४० ०३३.
सर्वप्रथम आ.सु.ने सुरू केलेल्या विशेषांकाच्या उपक्रमाबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो. माझ्या मते विशेषांकाद्वारे जिव्हाळ्याच्या विषयावर, पृष्ठसंख्येच्या मर्यादेत राहून, सर्व बाजूने चर्चा घडवून आणता येते व त्या विषयासंबंधीचे सर्व विचार जाणून घेता येतात. त्या क्षेत्रात नेमके काय घडत आहे याची कल्पना अंक वाचताना येते. एकाच मुद्द्यावरील अनेक मान्यवरांचे व तज्ज्ञांचे लेख छापत असल्यामुळे विषयाची व्याप्ती जाणून घेण्यास मदत होते. त्या दृष्टीने आसुचे मागील दोन्ही विशेषांक वाचताना काही त्रुटी राहिल्या आहेत असे प्रकर्षाने जाणवते, म्हणून हा लेखनप्रपंच. विज्ञानविषयक विशेषांक वाचत असतानाच विशेषांकाच्या मर्यादांची जाणीव होऊ लागली. नागरीकरणावरील पुस्तकवजा भरगच्च विशेषांक वाचत असताना मात्र मनात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
* विशेषांकाच्या लेखकांचा परिचय वाचत असताना सुजाता खांडेकर यांचा एकमेव अपवाद वगळता इतर सर्व वास्तुविशारद, नगरनियोजक वा स्थापत्यशास्त्रज्ञ आहेत. या विषयावरील त्यांचा अधिकार मान्य करत असतानाच या विषयावर आसक्ती असणारे समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, कार्यकर्ते यांचीही मते अंकात हवी होती. अंक केवळ नगररचनाशास्त्रातील तज्ज्ञांच्याच लेखांनी भरला असून इतरांनाही या विषयावर सांगण्यासारखे भरपूर आहे याचा विसर पडला की काय असे वाटते.
* अंक वाचताना सर्वाधिक भाग खासगीकरणाच्या उदात्तीकरणासाठी खर्ची पडल्यासारखे वाटतो. हेमंत नाईकनवरे, विद्याधर फाटक, प्र.ल. बोंगिरवार, अलेक्झांडर ग्रॅव्हिन यांच्या खाजगीकरणावरील आग्रही मतांवर प्रतिवाद नक्कीच करता येईल.
* बोंगिरवारांचा लेख शासकीय अहवालाची सुधारलेली प्रत वाटत असून त्यात फक्त माहितीची जंत्री आहे. खासगीकरणाला पर्याय नाही, असेच ध्वनित करण्याचा हा प्रयत्न आहे. लेखभर ‘निरंतर’ शब्दाची पेरणी केल्यामुळे लेख अर्थपूर्ण होऊ शकतो हा भ्रम आहे.
* चिं. मो. पंडितांचा अर्धाअधिक लेख समाज व तंत्रज्ञान यांचा आढावा घेणारा आहे. संपर्कमाध्यमांची अरेरावी व त्यामधून बोकाळलेले एकाकीपण यावर लेखकाने समर्पकपणे टिप्पणी केली आहे. नगरनियोजनाविषयी त्यांच्या मनातही शंका आहेत. पूर्ण लेख (किंवा विशेषांक) वाचताना नगर म्हणजे नेमके काय हेच स्पष्ट होत नाही. नगर म्हणजे आधुनिक ‘खेडे’ नव्हे एवढे मात्र खरे.
* सुजाता खांडेकरांचा ‘आटपाट नगर’ हा एकच लेख नागरीकरणाचा बोजवारा उडवण्यास पुरेसा आहे. लेखिका आपण अभियंता होतो/आहोत या दृष्टीने विचार न करता, स्वतः एक मनस्वी कार्यकर्ती आहे, हे लेख वाचताना जाणवते. सर्व वस्तुस्थिती लक्षात आली, परंतु त्यावर उपाय काय असेल, उपायाची दिशा काय असेल यावर लेखिकेची वा संपादकीय टिप्पणी हवी होती. याचप्रमाणे भाडेनियंत्रण कायदा, नागरी कमाल जमीन नियंत्रण कायदा यांच्या त्रुटीवर भर देऊन लेख लिहिलेला असला तरी त्याची एक दुसरी पण बाजू आहे, याचाही उल्लेख हवा होता.
* ‘नागरी नियोजनाच्या मर्यादा’ हा सुलक्षणा महाजन यांचा लेख व विशेषांकाची प्रस्तावना म्हणून, अतिथी संपादक म्हणून लिहिलेला लेख यांची तुलना केल्यास लेखिका म्हणून त्यांची जाण चांगली आहे हे लक्षात येते व विशेषांकाच्या संपादनात काही उणीवा राहिल्या आहेत असे वाटते.
* सेसिलिया टाकोली किंवा उल्हास राणे यांचे लेख अपूर्ण असल्यामुळे निष्कर्ष काय असतील याची कल्पना येत नाही. परंतु सेसिलिया यांनी स्थलांतरितांच्या प्रश्नांचा ओझरता उल्लेख केला आहे. खरे पाहता शहराच्या बकाल स्वरूपाला प्रशासनाच्या हलगर्जीबरोबरच स्थलांतरितांच्या समस्या हेही कारण असू शकेल. मग हे स्थलांतर नैसर्गिक आपत्ती (पूर, भूकंप, दुष्काळ. . .) युद्धजन्य परिस्थिती (बांगलादेशींचा प्रश्न, जम्मूमधील हिंदूंचे स्थलांतर. . . ) विकास कार्य (धरण, महामार्ग, अणुप्रकल्प) वा परिस्थिती (सामाजिक बहिष्कार, बेरोजगारी, उपासमार. . .) यापैकी कुठल्याही कारणामुळे झाले असेल. लेखकांनी जास्त खोलात जाऊन या विषयावर भाष्य करायला हवे होते. उल्हास राणे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे नागरी व ग्रामीण असे वेगवेगळे जैविक वैविध्य मानू नये. मुळातच जैविक वैविध्याच्या हासाला तंत्रज्ञानाच्या वापराचा अतिरेक व चंगळवाद कारणीभूत आहेत. हा प्रश्न केवळ नागरी नियोजनाच्या दृष्टिकोनातून न बघता त्याकडे व्यापक दृष्टीने बघायला हवे. जनसामान्यांमध्ये या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात आल्यास आपापल्या परीने सर्वजण हातभार लावू शकतील. शहरात मोठमोठे बागबगीचे उभारून हा प्रश्न सुटणार नाही व त्यासाठी शहरीकरणाला दोष देण्यात अर्थ नाही.
* नगरविकास ही प्रक्रिया संपूर्ण विकासप्रक्रियेतून वेगळी करता येत नाही. नगरविकासाला जोडून ग्रामविकास होत गेल्यास नगरविकासाला गती व नियोजनाला योग्य दिशा मिळू शकते. ग्रामविकासांकडे दुर्लक्ष केल्यास नागरीविकास व नियोजन फरफटत जाऊ शकते. या दृष्टिकोनातून विचार केल्यास २१ व्या शतकातील नगरविकास व ग्रामविकास यांच्या संदर्भातील प्रमुख घटक काय असतील याचे काही मुद्दे चर्चेसाठी वेगळ्या टिपणांच्या स्वरूपात जोडले आहे.
* मुंबई शहराला जागतिक दर्जा हवा असल्यास नेमके काय काय करायला हवे याचा एक आलेख सोबत जोडला आहे. हा आलेख इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीतील मुंबईच्या संदर्भातील लेखावरून घेतला आहे. प्रतिक्रिया फार लांबलेली आहे. परंतु गुणदोष दाखवल्याशिवाय सुधारणेला वाव नाही. यानंतर आ.सु. अजून विशेषांक काढणार आहे. अंक दर्जेदार व्हावेत म्हणून असे लिहिण्याचा प्रयत्न. माझी सर्व मते पटतील असा आग्रह नाही. परंतु चर्चेला वाव असतोच.
नागरी विकास प्रक्रिया: आर्थिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक/सामाजिक निरंतर विकास: काही टिपणे
आर्थिक प्रगती / व्यवहारः
* वृद्धिंगत वाढ : भोवतालच्या परिस्थितीस अनुसरून प्रतिक्रियात्मक बदल, आर्थिक आणि सुधारण्यास वाव असलेल्या संधी
* सहजीवनयुक्त उपभोग: किरकोळ व्यवहार, कार्यालयीन व्यवस्था,
– खाद्यपदार्थ विक्री केंद्रे, निवास, मनोरंजन, कम्युनिटी हॉल
– खासगी किंवा ग्राहकोन्मुखतेला वाव असलेला वापर
– किरकोळ विक्रीच्या दुकानासाठी तळमजल्यावरील जागा (भिंतींना चिकटून केलेली मांडणी), नंतरच्या मजल्यावर ऑफिसेस, वरच्या मजल्यावर फ्लॅट्स (समोरासमोर नको!)
– आल्हाददायी लँडस्केप्स, आकर्षक चैतन्यदायी रचना
पर्यावरण संरक्षणः
* सौरऊर्जेची व्यवस्था, नैसर्गिक हवा खेळण्यासाठी केलेली रचना,
* पावसाच्या पाण्याचा वापर * नैसर्गिकररीत्या निवासस्थान थंड ठेवण्यासाठी केलेली उपाययोजना
* उष्णतारोधक भिंती व छतांचे बांधकाम
* वाहते पाणी व सौर धुराडे
* झाडांच्या सावलीचा उपयोग पूर्व-पश्चिम दिशेने जाणारे पॅसेजेस व रस्ते. यामुळे इमारतींच्या व झाडांच्या गडद सावलीचा पूरेपूर उपयोग
* भरपूर प्रकाश असलेली दुकाने व ऑफिसेस
* पक्ष्यांसाठी वेगवेगळ्या स्तरावरील ‘हरितमार्ग’
प्रदूषण कमी करणः
* प्रदूषण कमी करण्यासाठी एकाच ठिकाणी व्यापारी संकुल
* प्रदूषण कमी करणारे बांधकाम साहित्य
* झाडांच्या सावलीत किंवा फोटोव्होल्टाइक छताखाली पार्किंग व्यवस्था
* इलेक्ट्रिक कार्ससाठी चार्जिंग व्यवस्था
* इमारतींना ध्वनी कवच, ८०-९० टक्के मोकळी जागा.
जल संवर्धनः
* पावसाच्या पाण्याचा वाहते पाणी म्हणून किंवा सिंचनासाठी वापर
* कमी दाबाचे नळाचे फिटिंग्स * बागकाम व सिंचनासाठी पावसाच्या पाण्याचा मुबलक वापर
* बहु-उपयोगी ओढा * पाण्याची बचत करणारी स्वयंपाकाची भांडी
सामाजिक / सांस्कृतिक व्यवहार:
* सांस्कृतिक कार्यक्रम, व्यापार व्यवहार व कलाप्रदर्शन किंवा प्रदर्शन-विक्रीसाठी मध्यवर्ती जागा
* शिबिर-विक्रीसाठी मध्यवर्ती जागा * कंटाळा घालवू शकणारी आकर्षक अशी निवांत जागा
* पादचारी मार्गांचा सामाजिक कार्यक्रमांसाठी नियमित वापर
* १८-२४ तास चालणारे मोक्याच्या ठिकाणी असलेले खाद्यपदार्थ विक्री केंद्र
* लपून बसण्याच्या जागा नसाव्यात. कोपऱ्यावरील वा रस्त्याच्या वळणावरील जागेवर तळे किंवा काटेरी झाडझुडपांचे बागबगीचे.
* सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेवर भर
* तळमजल्यावरील पार्किंगच्या जागेत भरपूर प्रकाश-प्रकाशविहीर, आकर्षक सजावट, पाण्याचा छोटा धबधबा किंवा तळे
* पादचारी मार्गावर ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे, पोस्टाची पेटी, टेलिफोन/इंटरनेट बूथ इत्यादी.
ध्वनिप्रदूषणः
* टेकड्यांचे संवर्धन, त्यावर झाडे-झुडपे
* ध्वनी निरोधक पार्किंगचा वापर
* रस्त्यापासून लांब असलेली घरे
कम्युनिटी सेंटरः
* सामाजिक कार्यक्रमासाठी वाहतूक नसलेली विस्तीर्ण हिरवळ
* सामूहिक पार्किंगची व्यवस्था – सुसंवादाला पोषक वातावरण
* सांस्कृतिक कार्यक्रम किंवा प्रदर्शन-विक्रीसाठी मध्यवर्ती जागा
* याच जागेचा शिबिर वा पाळणाघरासाठी नियमित वापर
पाळणाघर / बालोद्यानः
* वाहतूक विरहित हिरवळ (अपवाद: रुग्णवाहिका, तातडीची सेवा, अपंगासाठी वाहन इत्यादी)
* हिरवळीच्या भोवती निवासी जागा – यामुळे लहान मुलांवर लक्ष ठेवणे सोपे.
मानवी मोजमापः
* प्रामुख्याने एकमजली इमारती – रस्ता किंवा हिरवळीसमोर दरवाजे
* दुमजली घर असल्यास निमुळते किंवा गोलाई असलेले छत. अशा छतामुळे इमारत उंच वाटणार नाही.
* फार लांबचे दिसणार नाही अशी झाडांची वा लँडस्केपिंगची रचना
* छताखालील जागेचा पार्किंगसाठी वापर
* समस्तरतेला (हॉरिझांटॅलिटी) प्राधान्य देण्यासाठी चिकटून बांधलेल्या इमारती, दोन इमारतीमधील पोकळीतून व छताच्या आकारामुळे दृश्य परिणामकारकतेत वाढ.
ऊर्जेची बचतः
* सौर ऊर्जा (अवकाश व पाण्याचा योग्य वापर)
* जैव-इंधनाचा (बायो-फ्युएलचा) वैयक्तिक व सामूहिक वापर
* सुटसुटीत इमारती व ऊर्जा वाचवणारे बांधकाम * कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या, व कमीत कमी कार्बन धूर सोडणाऱ्या वस्तूंचा वापर
* दीर्घकाळ टिकू शकणाऱ्या वस्तूंमधून बांधकाम
वाहतूक कमी करणेः
* घरी राहूनच उत्पादन करता येणे
* मिनीबससारख्या गाड्यांमधून आवश्यक प्रवास
पादचारीकेंद्रित मार्गरचनाः
* १० किलोमीटर प्रती तास वेगमर्यादा
* वेगमर्यादेला अनुकूल अशी रस्त्यांची (वळणांची) रचना
* शाळा, दुकान, पाळणाघर, बस स्टॉपसाठी कमीत कमी अंतर, चालण्यासाठी पायवाट
सोई, सुविधाः
* कारखाने/ऑफिसेसचा सोईस्कर वापर
* पाहिजे तेव्हा विस्तार करण्यासारखी घराची रचना – (ज्यादा असलेल्या वस्तूंच्या संग्रहासाठी – काम संपल्यानंतर काढून टाकता येण्यायोग्य)
* निवास व उत्पादन या दोन्हीसाठी सामाईक अशी घराची रचना
* पाळणाघराचा सामूहिक कार्यक्रमासाठी वापर
इमारतींची रचनाः
* बिनविषारी वस्तूंचा वापर * विद्युत चुंबकीय बलांचे न्यूनीकरण
* नैसर्गिक विभाजनांना धक्का न लावणे
* घरात कमीत कमी धूर
* बाहेरच्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग
* नैसर्गिक वायुवीजन उर्फ झाडे-झुडुपातून येणारी हवा
* स्थानिक वनस्पती-प्राणी कीटक यांचे संवर्धन/संरक्षण
* बोर, करवंद यासारख्या झाडांची लागवड व वाढ
* वादळ निरोधक झाडे-झुडपे
जैवक्रम विकासः
* कला कलाने वाढणारी क्षमता
* सामाजिक व्यवस्था – दुकाने, उत्पादन केंद्र, पाळणाघर-पायी चालण्याइतक्या अंतरावर.
* प्रत्येक घरामध्ये अपंगासाठी व्यवस्था-व्हीलचेअर घरात आणता येईल असे फ्लोअरिंग, अपंगाच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी दरवाज्यात व्यवस्था
जाणीवपूर्वक रचना व व्यवस्थापनः
* पहिल्या फेजचे काम मालकांकडून व पुढील काम हस्तांतर केलेल्या निवासीकडून
* व्यवस्थापनांचे हस्तांतर टप्प्याटप्प्याने करणे.
आर्थिक कुवतः
* आर्थिक कुवत व अपेक्षा यांचे योग्य मिश्रण
* काही काळासाठी भाडेतत्त्वावर घर देणे
* प्रत्येक कुटुंबाकडे एकापेक्षा जास्त वाहन असू नये, मिनीबसची सुविधा, पायी जाणाऱ्या अंतरावर सोई-सुविधा, घरात किंवा घराजवळ उत्पादन केंद्र
सेंद्रिय आहारः
* सेंद्रिय शेतीसाठी राखीव जागा
* सामूहिकपणे कंपोस्ट खताचे उत्पादन
* सेंद्रीय आहार पदार्थांच्या खरेदीविक्रीसाठी जवळचे केंद्र/बाग.
प्रभाकर नानावटी, ८, लिली अपार्टमेंट्स, वरदायिनी को ऑ. हौ. सोसायटी, पाषाण-सूस रोड, पुणे ४११ ०२१.
केवळ वादग्रस्त विषयांवरच सुधारकांनी बोलण्याची आवश्यकता आहे असे माझे मत आहे. सप्टेंबरच्या अंकात असे अनेक विषय आहेत. जून २००४ च्या अंकातील मिलिंद वाटवे यांच्या लेखावर मी लगेच टीका केली नाही याचा मला पश्चात्ताप होतो आहे. “विश्वव्यापक मी’ ही संकल्पना निराधार आहे. तेथेच दगडाच्या आमटीची सुरुवात आहे. वॉन न्यूमॅन यंत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेणुसमूहाला सजीव म्हणता येते. विश्वातील इतर सर्व रेणूंपेक्षा भिन्न असा या समूहाचा एक गुणधर्म म्हणजे या समूहाची एन्ट्रॉपी घटते. स्वार्थ, ‘मी’ ही भावना, सजीवत्व असे त्याचे वर्णन केले जाते. अशी एन्ट्रॉपी घटविण्यासाठी या यंत्रामध्ये स्वतः विरुद्ध सभोवताल’ असा भेद बनविणारी यंत्रणा असते. अशी यंत्रणा असल्याशिवाय सभोवतालच्या रेणूंचे शोषण शक्य नसते. ही यंत्रणा नष्ट झाली तर हे यंत्र चालणार नाही. विजिगीषु वृत्ती ठेवण्यात काहीच अडचण नाही. केवळ असहाय्य परिस्थिती ओळखून त्यावेळी त्रागा करू नये कारण त्याचा फायदा नसतो. रेणुसमूह टिकविणे हा एकच उद्देश ठेवला की ट्रॅफिक जॅममध्ये स्थितप्रज्ञता येते. चिडचीड करून हृदयाच्या रक्तवाहिन्या अरुंद करणे रेणुसमूहाला तोट्याचे आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक अपघातजन्य भाग म्हणून नास्तिकता स्वीकारली पाहिजे. तर्क, वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यावरील मानवी मनाने श्रद्धा ठेवलेली असल्याचे मानण्याचीही गरज नाही. विवेकाचे आणि मनाचे अद्वैत आहे. प्रत्येकाचे मन म्हणजेच त्याचा स्वतःचा विवेक होय. नास्तिकता हा धर्म झाला तर बीफ अॅण्ड पोर्क पार्टी सुरू होतात. मांसाहार आरोग्य किंवा चवीसाठी करावा. विरोधासाठी आत्मक्लेश करून घेऊ नयेत.
”मी म्हणजे काय, माझा आणि विश्वाचा संबंध… अस्तित्व म्हणजे काय यासारख्या प्रश्नांचा शोध…” (पान १११) या वाक्यात साधनेतून ज्ञान मिळविण्याचा दावा केलेला आहे. बोधिवृक्षाखाली बसून ज्ञान प्राप्त झाल्याचा दावा करणारा गौतम आणि प्राणायामातून स्पंद, ज्ञप्ति मिळविण्याचा दावा सारखेच आहेत. रेणुसमूह सभोवतालचे निरीक्षण करून ज्ञान मिळवितो. डी.एन.ए.ची व मेंदूची रचना सांगणारी पुस्तके वाचणे हा या विषयावरील ज्ञान मिळविण्याचा मार्ग आहे.
मी शंभर सेकंदांपर्यंत श्वास रोखून धरल्यावर माझ्या एवढेच लक्षात आले की मी सजीव आहे. ‘मी’चे नैसर्गिक स्फुरण वगैरे काही मला चढले नाही. पान १०७ ओळ ५ वर दिलेले असे काहीच नसते. किंबहुना विश्व निर्हेतुक असल्याचा पुरावा हाच की असे सजीवत्व नाही. सजीव रेणुसमूहांच्या सर्व प्रक्रिया सहेतुक असतात. मी सजीव आहे असे म्हणता येते कारण माझा एक मज्जातंतू आणि दुसरा मज्जातंतू यांची एकमेकांशीची वागणूक दोघांनाही फायद्याची असते. पेशीकेंद्रक आणि तंतुकणिका यांची अशी मैत्री झाली म्हणून आता त्यांच्या समूहाला एक सजीव असा दर्जा मिळाला आहे. दगडफुलांचे उदाहरणही शालेय पुस्तकांमध्ये असते. मी आणि वाघ यांना एकत्रित सजीव म्हणता येत नाही. हे विश्व एक सजीव आहे असे गृहीत धरले तर मला उजेड मिळावा म्हणून सूर्य प्रकाश देतो असा निष्कर्ष निघेल.
सुख मिळविण्यासाठी सुखाचा त्याग ही विसंगती आहे. वैराग्यात सुख असते असे गाजर दाखवून त्यामागे धावणे हाही सुखाचा हव्यासच आहे. जर या वैराग्यरूपी सुखाकडे अधीरतेने धावण्यावर रेणुसमूहाचे नियंत्रण ठेवणे शक्य असेल तर तसे नियंत्रण इतर कोणत्याही सुखाकडे धावण्यावर ठेवता येईल. वैराग्यरूपी सुख हे एक अनावश्यक गृहीतक आहे. मुख्य मुद्दा असहाय्यता ओळखण्याचा आणि त्रागा न करण्याचा आहे. वाटवे यांचे विचार बौद्ध धर्माला फार जवळ जातात. ___ललिता गंडभीर यांनी अशरीरी अनुभवांविषयी केलेले लिखाण अपुऱ्या माहितीवर आधारित आहे. मेंदूमधील विशिष्ट भागांना आम्लता (pH), क्षारता (osmolarity), ऑक्सिजनचे प्रमाण, इजेमुळे झालेले विद्युतप्रवाहातील बिघाड यांमुळे असे अनुभव येतात. मरायला टेकलेल्या रुग्णांमध्ये असे अनुभव येत असल्यामुळे त्यांना निअर डेथ अनुभव असेही नाव आहे. प्रयोगादरम्यान मेंदूच्या त्या विशिष्ट भागांना विजेचे झटके दिल्यावर स्वयंसेवकांना असे अनुभव आल्यामुळे या अनुभवांमध्ये काहीही जगाबाहेरचे (हा गंडभीर यांचा शब्द आहे) नाही.
पाय फाकून खाली वाकून जग उलटे बघता येते. त्यात नावीन्य असल्यामुळे गंमत वाटते, मात्र त्यात विशेष असे काहीच नाही. तसे बघितले तर ‘डेजावू’ या नावाने ओळखला जाणारा एक अनुभवसुद्धा गमतीदार आहे. हा अनुभव रोगाचे लक्षण नाही. आपल्याला कधीकधी वाटते की आपण एखादी घटना पूर्वी तपशीलवार अनुभवली आहे.एखादे ठिकाण किंवा एखादी वस्तू पूर्वी नीट न्याहाळली आहे. मात्र स्मरणशक्ती सांगते की ही घटना प्रथमच अनुभवली जात आहे. या प्रकाराचे पूर्ण स्पष्टीकरण उपलब्ध नसले तरी मला काही अंदाज नक्कीच बांधता येतात. मेंदूमध्ये एखादे मज्जातंतूंचे जाळे (circuit) असावे जे चालू अनुभवांशी स्मरणसाठ्याची तुलना करून चालू अनुभव पहिल्यांदा येत आहे की जुन्यासारखा आहे याचा निर्णय घेते. इतर कोणत्या सर्किटमुळे किंवा अंतर्गत बिघाडामुळे किंवा नव्या अनुभवातील काही क्षुल्लक घटक पूर्वीच्या अनुभवातील घटकांशी जुळते असल्यामुळे त्याच घटकांना महत्त्व देऊन तुलनेसाठी त्यांचा वापर करून हे सर्किट नव्या अनुभवातही कार्यान्वित झाले तर नवा अनुभव पूर्वी अनुभवला असल्याची जाणीव होते असा माझा अंदाज आहे.
‘बुद्धिमत्तेवर नीती ठरत नाही’ या विधानाचा भ.पां. पाटणकर पुरस्कार करीत आहेत. स्वार्थ महत्तम करणे या ध्येयाने आणि इतरांच्या स्वार्थापासूनच्या सुरक्षिततेच्या इच्छेने नीतिनियमांचे लेखन शक्य असते. ते तसेच केले जाते. जशास तसे हे तत्त्व पूर्णपणे अंकगणितावर आधारलेले असल्याचे सुधारकने छापलेले आहे. मग नीतिमत्तेला निरपेक्ष (absolute) दर्जा का द्यावा याचे उत्तर पाटणकर देत नाहीत तोवर त्यांचे विचार ग्राह्य ठरणार नाहीत.
कलेमधून मिळणारा आनंद किंवा कोणताही आनंद ही मेंदूतील एक रासायनिक प्रक्रिया आहे असे गृहीत धरण्याइतपत प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध आहे. फेरोमोन्स या हॉर्मोन्सवर प्राण्यांमधील लैंगिक प्रेम ठरते. केवळ एका विशिष्ट (functional fos B) जीनच्या प्रभावामुळे उंदीर मादी पिलांवर प्रेम करते आणि हा जीन काढलेली मादी पिलांकडे दुर्लक्ष करते असे जेम्स वॉटसन (डी.एन.ए.ची रचना शोधणाऱ्या वॉटसन-क्रिकपैकी) च्या ‘डी.एन.ए. सीक्रेट ऑफ लाईफ’ या पुस्तकात दिलेले आहे. मातृप्रेमसुद्धा जर रासायनिक असेल तर गाण्यातून मिळणारा आनंद काय चीज आहे ? खूपच सुलभीकृत चित्र असले तरी सिरोटोनिन या रसायनाच्या कमतरतेमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती बळावते आणि गाबा (gamma amino butyric acid) या रसायनामुळे चिंता (anxiety) कमी होते असा संशय आहे. संक्षेपणवादाची (reductionism) सार्वत्रिकता आणि अपरिहार्यता नाकारण्याचा प्रयत्न फोल आहे. मानवी मेंदूमध्ये केवळ १२५०० ऋइ एवढीच माहिती मावू शकते असा अंदाज कार्ल सेगनने कॉस्मॉस या पुस्तकात मांडला आहे. म्हणून जगाचे ज्ञान केवळ छोट्या नियमांच्या आकलनातून होऊ शकते. माहितीचे भरताड कितीही सत्य असले तरी मेंदूच्या क्षमतेबाहेरचे आहे. ते जमविण्याचा प्रयत्नसुद्धा होऊ नये. त्याचा फायदा होण्याची शक्यता नाही. कारण त्यात पुनरावृत्ती नसते.
संपादकांनी पान १९१ वर आणि मी पान १४४ वर असा प्रश्न विचारला आहे की वैज्ञानिक निर्णयप्रक्रियेव्यतिरिक्त इतर कोणती निर्णयप्रक्रिया फायदेशीर आहे ते कळवावे. धर्म ही अशी प्रक्रिया असल्याचे पाटणकर सुचवीत आहेत. धर्माधिष्ठित विचारसरणीमधून भावना कशा नियंत्रित करता येतात ते पाटणकर यांनी स्पष्ट करावे.
डिसेंबर ०४, अंक १५.९ मधील ‘चाहूल’ ही पाहावी. सं.
निखिल जोशी, ‘तत्त्वबोध, हायवे, नेरळ, (रायगड), ४१० १०१.
म. गांधींच्या व्यक्तिमत्त्वाची नेभळट म्हणून भारतातील काही गटांनी संभावना केली आहे. समाजात भिनलेल्या विषाची कल्पना नथुराम गोडसेवरील नाटकाच्या यशावरून कशी दिसून येते याची चर्चा कुमार केतकर यांनी केली आहे. (लोकसत्ता दि. १७ मे २००४). हिटलरचे प्रच्छन्न उदात्तीकरण करण्याची आता मजल गेली आहे. या मानसिकतेचे विश्लेषण होणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सुखसोयी वाढतात हे शाळकरी मुलालासुद्धा समजते. तंत्रज्ञानाने आर्थिक प्रगती होते हेसुद्धा चटकन समजते. तंत्रज्ञान (= उत्पादनाची साधने) यानुसार (Primitive Tribal) साम्यवाद, सामंतशाही, आणि भांडवलशाही ही राजकीय स्थित्यंतरे कशी यावर कार्ल मार्क्सने प्रकाश टाकला आणि पुढील घटनांबाबत काही आडाखे मांडले. तंत्रज्ञानामुळे राजकीय बदल होतात हे साम्यवादी पक्षांना पटते. परंतु तंत्रज्ञानाच्या केवळ आर्थिक-राजकीय परिणामांपुरते विश्लेषण मर्यादित न ठेवता मार्क्सने तंत्रज्ञानाच्या मानसिक-सामाजिक परिणामांचासुद्धा आढावा घेतला. जमीनदार, सामंत, भांडवलदार, कामगार, मध्यमवर्गीय (Bourgeois) यांची मनोवृत्ती आणि उत्पादन-संबंध (= तंत्रज्ञान) यांची मार्क्सने संगतवार मांडणी केली. नवीन उत्पादन संबंध निर्माण झाल्यावर या मानसिकतेत कसा बदल होईल, किंवा सामाजिक स्थित्यंतर कसे असेल याची साम्यवादी पक्ष मीमांसा करीत नाहीत. तंत्रज्ञानातील बदल आणि समाजाच्या घटकांची मानसिकता याबाबत ते चर्चा करीत नाहीत. विचारवंत याबाबत क्वचितच चर्चा करतात. या प्रश्नाबाबत इतर साहित्याची निर्मितीही होत नाही.
मेकॅनो या खेळण्याचा समाजावरील प्रभाव याचा जॅन गुन्नर मिर्डाल यांनी अभ्यास करून निष्कर्ष काढला की, या खेळण्यामुळे मुलेच काय परंतु संपूर्ण समाजच सर्जनशील आणि उद्योगी झाला, आणि या खेळण्याचा प्रभाव कमी झाल्यावर “बुद्धिनिष्ठेपासून दूर भुताखेतांच्या, ज्योतिष्यांच्या व धार्मिकतेच्या दुनियेत स्वतःला रमवू पाहण्याची प्रवृत्ती वाढली.
प्रा. पी.व्ही. पानट यांनी नागपूर विद्यापीठात, थत्ते स्मृती व्याख्यानात तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेताना मानसिकतेच्या अंगाला स्पर्श करताना नमूद केले आहे की, “नव्या तंत्रज्ञानाचा… रेटाच इतका आहे की तो तुमचे मानसिक स्थित्यंतर घडवून आणतो’. (आसु एप्रिल २००१ पान २०). प्रा. पानट यांनी असे विश्लेषण केले आहे की, “या तंत्रज्ञानाचा… जीवनात अर्थविहीन झाले आहेत.” (कित्ता पान १८, १९). “त्यावेळच्या साहित्यात त्यामुळे (औद्योगिक क्रांतीमुळे) निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांचा ऊहापोह आहे”. असे प्रा. पानट यांनी आवर्जून नमूद केले आहे. (कित्ता पान २०) परंतु आता हे क्वचितच आढळते.
“प्रवाहाविरुद्ध पोहण्यापेक्षा प्रवाहाबरोबर राहावे.” (कित्ता पान २०) असे प्रा. पानट यांचे प्रतिपादन आहे. परंतु हा प्रवाह नेमका कसा चालला आहे याची मीमांसा त्यांनी केलेली नाही.
त्यागवाद लयाला जाऊन भोगवाद आला की चंगळवादाची वाढ अपरिहार्य आहे. त्यागवाद बाजूला पडल्यानंतर संपत्तीचे न्याय्य वाटप शक्य नाही. संपूर्ण अर्थव्यवस्था केवळ ५-१०% च्या हितसंबंधांचे संरक्षण करते, असहिष्णुता वाढते आणि गोध्रा गुजरात सारखे उद्रेक होणे अपरिहार्य ठरते. समाजाच्या बदललेल्या मानसिकतेची कल्पना येईल. त्यागवाद या मूल्याची आवश्यकता हा स्वतंत्र विषय आहे. परंतु आजपर्यंत त्यागवाद इ. विचारसरणींना समाजात उच्च स्थानी मान्यता मिळाली आहे.
“त्याचे (मार्क्सचे) अनुकंपाशील हृदय पशुतुल्य गुलाम मानवजातीच्या गाढ सहानुभूतीने हेलावले होते.” असे नरहर कुरुंदकर यांना जाणवले. (‘जागर’, पा.८६) ते पुढे म्हणतात “त्याच्या स्वप्नसृष्टीच्या आपण जवळ असलो, म्हणजे मार्क्सच्या शब्दाशब्दामधून ख्रिस्तबुद्धांच्या करुणेचे पडसाद निनादत असताना आढळून येतात. (पा. ८७). सर्वच संत, महंत, विचारवंतांनी या उच्च विचारसरणीचा आग्रह धरला.”
प्रवाहाबरोबर राहणे (=प्रवाहपतित होणे) ही बाब या प्रवाहाबाबत तरी भयावहच आहे. “इंग्लंडचा मजूर पक्ष बदलला आहे, चीनदेखील बदलला आहे’ असे प्रा. पानट म्हणतात (कित्ता पान २०) परंतु प्रा. वि. द. घाटे यांच्या शब्दात सांगायचे झाले तर, “उपमा (=तुलना) अर्धवट असतात आणि म्हणून त्या फसव्या असतात.” इंग्लंडमधील वातावरण अर्वाचीन आहे. मध्ययुगीन नाही. “दे हॅव नथिंग टु लूझ बट देअर चेन्स” अशी त्यांची परिस्थिती नाही. त्यामुळे तेथील पक्ष बदलला तरी ती वेगळी बाब आहे. जनसामान्यांच्या भावना चोंबाळत बसण्याची चीनमधील राजकीय नेतृत्वाला गरज नाही. तसेच चंगळवादावर नियंत्रण ठेवणे, संपत्तीच्या वाटपातील समतोल राखणे हुकूमशाही वातावरणात अशक्य नाही. भारतातील वातावरण मध्ययुगीन आहे. जनसामान्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव तर काय, माहितीसुद्धा नाही. राजकीय नेतृत्व अधिकाधिक दिशाहीन होत आहे. देवळे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च येथे हे नेतृत्व समभावाने पूजा करते आणि सर्वच धर्मीयांचा कट्टरपणा वाढवते.
कुरुंदकर, “समन्वयवाद हा एक प्रकारचा वैचारिक अप्रामाणिकपणा असतो. दोन परस्परविरोधी भूमिका खरोखरी विरोधी नाहीत. त्या सुसंगतच आहेत, असा आग्रह. . . धरण्यात आला. . . वंदनीय ठरलेल्या सर्वच माणसांचे म्हणणे एकच होते, हे सांगण्याचा अट्टाहास म्हणजे कुणालाच काही म्हणावयाचे नव्हते हे सिद्ध करण्याचा अट्टहास असतो’. (‘जागर’, पा.३२)
कुमार सप्तर्षि म्हणतात, “विचारशून्यता हेच राजकीय पक्षांचे बळ झालेले आहे”. तसेच “विचारांची ओळख ठेवण्याची पद्धत काँग्रेसच्या खानदानात कधीच संपुष्टात आली आहे”. (‘उन्मादी राजकारणाचा माहोल’. लोकसत्ता दि. ०५ सप्टेंबर २००४).
त्यामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय इ. समतेची अपेक्षा करावयाची असेल तर नवीन तंत्रज्ञानामुळे येऊ घातलेल्या झालेल्या स्थित्यंतराबद्दल वाययनिर्मिती होत राहणे आवश्यक आहे. चंगळवाद, कर्मठ-मूलतत्त्ववाद, असहिष्णुता यांना विरोध केला पाहिजे, पुन्हा पुन्हा टीका करून मानसिक स्थित्यंतर पुरोगामी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात, आजवर मानवाने जपलेली त्यागवाद इ. मूल्ये जोपासण्याची इच्छा असेल तर! अन्यथा प्रवाहपतित होऊन नव्या गोध्रा-गुजरात जंक्शनला प्रवाह पोहोचण्याची वाट बघत बसावे.
राजीव जोशींना मार्क्सवर लेख वा लेखमाला लिहिण्यासाठी खाजगी पत्रातून केलेली विनंती आता जाहीरपणेही करतो.
डॉ. राजीव जोशी, ‘तत्त्वबोध, हायवे, नेरळ, (रायगड), ४१० १०१.