‘लमाण’ नुकतेच प्रसिद्ध झाले. रूढार्थाने ज्याला आत्मचरित्र म्हटले जाते, तसे प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप नसून ‘मनोगता’त म्हटल्याप्रमाणे त्यांच्या एकूण नाट्यप्रवासाचा तो धावता आढावा आहे. आपले खाजगी जीवन चित्रित करण्यात लेखकाला स्वारस्य नाही. साडेतीनशेहून अधिक पृष्ठसंख्या असलेल्या ह्या पुस्तकात कौटुंबिक उल्लेख अपवादात्मकच आहेत. नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यावसायिक जीवन शब्दबद्ध करण्यासाठी, सुहृदांच्या आग्रहानुसार ‘लमाण’ची निर्मिती झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या जडणघडणीत किंवा व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला, त्यांच्याविषयीच्या आठवणींनी पुस्तकाची सुरुवात होते. आई-वडिलांपासून निघून भालबा केळकर, प्रा. दीक्षित, वसंत कानेटकर, इंदिरा संत, पु.शि. रेगे, जी.ए. कुलकर्णी इत्यादींपर्यंत वाचक पोहोचतो. के. नारायण काळे, शंभू मित्रा, कुमार गंधर्व इत्यादींकडून डॉक्टरांनी जे घेतले, त्याचा ते कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. मढेकरांचा कलाविचार समजून घेऊन तो नाट्यक्षेत्राला लागू करतात. रसेलने चाचपडत, लटपटत जाणाऱ्या वैचारिकतेला पोलादी कणा दिल्याचे सांगत असतानाच ‘कधीकधी रसेलच्या पंजातून निसटून पळायला मजा वाटते’ (पृ.४७) हेही मान्य करतात.
फ्रेंच जोडप्याचे मद्यप्राशनविषयक विचार, नाटकातील व सिनेमातील अभिनयात असणारा फरक, लॉरेन्स ऑलिव्हिए व अलेक गिनेस यांच्या अभिनयशैलीतील फरक, ॲरिस्टॉटल व ब्रेख्ट यांचा नाट्यविचार व एकंदरीतच पाश्चात्त्य रंगभूमीचा, नाटकांचा, सिनेमांचा परिचय वाचकाला होतो, तो डॉक्टरांची लेखणी अशा कित्येक विषयांना स्पर्श करून जाते म्हणून. ‘जगन्नाथाचा रथ’, ‘देवांचं मनोराज्यं’, ‘यशोदा’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ इत्यादी नाटकांच्या जन्मकहाण्या कळतात. तालमींच्या, नाट्यप्रयोगांच्या वेळी कसे बाके प्रसंग उद्भवू शकतात नि त्यातून सहीसलामत सुटल्यावर कशी अवस्था होते, त्याचे प्रत्ययकारी चित्रण डॉक्टरांची लेखणी करते. नाटकाची संहिता न वाचता, प्रयोग न बघता नाटक कळल्याचे समाधान, अल्पांशाने का होईना, पण खचितच मिळते. ‘वेड्याचे घर उन्हात’, ‘गिधाडे’, ‘मी जिंकलो मी हरलो’, ‘हिमालयाची सावली’, ‘गार्बो’ इत्यादी नाटकांच्या ‘थीम्स’चे डॉक्टरांनी केलेले वर्णन थीमच्या गाभ्याबरोबरच वाचकाच्या मनाच्या गाभ्यालाही स्पर्श करून जाण्याइतके प्रभावी आणि तरीही अल्पाक्षरी आहे. ते वाचकाच्या जाणिवेच्या कक्षा रुंदावण्याचे कार्य करते.
‘लमाण’ केवळ जाणिवा समृद्ध करण्याचे कार्य करत नाही, तर वाचकाला विचारप्रवृत्त करते, विचारांना चालना देते. परखडपणे व सुसंगतपणे डॉक्टरांनी मांडलेली सेन्सॉरविषयकची मते, जिी आम्ही छापत आहोत सें., पाचव्या वेतन आयोगाच्या परिणामांचा विचार, आणीबाणी व विचारस्वातंत्र्य ह्यातील विरोध ह्या विषयांवरील डॉक्टरांचे चिंतन मूलगामी आहे. ‘समाजप्रबोधना’ची संकल्पना स्पष्ट करून त्याची निकड त्यांनी अधोरेखित केली आहे. ‘मी भूमिका कोणत्या निकषांवर स्वीकारतो किंवा नाकारतो’, ‘अभिनय कला आहे की कारागिरी’ अशा प्रश्नांचा गंभीरपणे विचार करून त्यांनी आपली वैचारिक भूमिका निःसंदिग्धपणे मांडली आहे.
‘ईश्वराला रिटायर करा’ असा आग्रह धरणाऱ्या डॉक्टरांचा विवेकवाद आपणा सर्वांच्या परिचयाचा आहे. मात्र विवेकवादी दृष्टिकोण त्यांच्यात कसकसा विकसित होत गेला, हे त्यांनी जाता-जाता स्पष्ट केले असते, तर ते अस्थानी झाले नसते, असे वाटते. संपूर्ण ‘लमाण’मधून व्यक्त होते, ते डॉक्टरांचे खानदानी, सुसंस्कृत, कर्तृत्वसंपन्न, रुबाबदार, सामर्थ्यशाली, प्रतिभावान, प्रभावी व्यक्तिमत्त्व. . . . अॅरिस्टॉटलचा ‘मॅग्नॅनिमस’. . . जगातील सर्वोत्तम गोष्टींचा मनःपूर्वक आस्वाद घेण्याचा त्यांना असणारा ध्यास. . . कनवाळूपणा, कणव, आर्द्रता, हळवेपणा अशा सौम्य, नाजूक, मुलायम किंवा माणसाला दुबळे, कमकुवत करणाऱ्या भावभावनांना त्यांच्या जीवनात थारा नसतो. अपवाद एखाद्याच माईंसारख्यांचा! त्यांच्या कपाळातून डोळ्यावर रक्ताची लागलेली धार आज सत्तर वर्षांनंतरही डॉक्टर विसरू शकत नाहीत. दुसऱ्यांच्या वेदनांनी व्यथित होणारे संवेदनशील मन काळाच्या ओघात बधिर झाले की काय, अशी शंका येते कारण पुढे असे उल्लेख जवळजवळ नाहीतच.
डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे मेडिकल कॉलेजमध्ये नाटकाच्या धुंदीत, नशेत व स्वतःच्या मस्तीत, कैफात ते दंग होते, त्यावेळी जागतिक महायुद्ध झालं, संपलं, हिरोशिमा-नागासाकी बेचिराख झाले, गांधीजींचा सत्याग्रह, ‘चले जाव’चा ठराव, . . . इतके काय-काय झाले पण डॉक्टरांच्या मानगुटीवर ते म्हणतात त्याप्रमाणे फक्त नाटकाचे भूत होते
(सतत आत्मविकासात मग्न म्हणून गांधीजींवर अशाच प्रकारचा आरोप ‘इंडिया : अ वुन्डेड सिव्हिलायझेशन’ ह्या पुस्तकात व्ही. एस. नायपॉल यांनी केला आहे, त्याची येथे आठवण होते.)
खाजगी तसेच व्यावसायिक जीवनात येणाऱ्या सुखदुःखांची, चढउतारांची, खाचखळग्यांची त्यांना म्हणूनच फिकीर नाही. डॉक्टर वारंवार म्हणतात त्याप्रमाणे अपयशाने नाउमेद होण्याइतकाही त्यांना वेळ नाही. उत्तमोत्तम चिजांचा ध्यास घेऊन त्याद्वारे आपली परिपूर्णता साधण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यामुळे फॅशन्सचे, विकारवासनांचे समूळ उच्चाटन न करता त्यांना आवर घालून अधिकाधिक सर्जनशील होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच नियंत्रित मद्यपानाचा विचार येणे क्रमप्राप्त ठरते. मन कमकुवत करणाऱ्या ऋणात्मक भावनांना त्यांच्या आयुष्यात स्थान नसते पण ज्यामुळे आयुष्य समृद्ध होते, त्या अनुभवांना सर्व शक्तीनिशी सामोरे जाण्याची तयारीच नव्हे तर जिद्द असते व पॅशन्सना पुरून उरण्याचे सामर्थ्य किंवा त्यांवर मात करण्याचा विवेकही असतो अशांना नित्शे ‘सुपरमॅन’ म्हणतो. स्वतंत्र बुद्धीचा, प्रतिभावान, ताकदवान, धैर्यशाली मनुष्य विवेकाच्या आधारे मनुष्यत्वाच्या सीमा पार करून ‘जीवाचा गाभा उजळून’ टाकण्याच्या दुर्दम्य इच्छेने प्रेरित होतो, अंतिमतः ‘सुपरमॅन’ होतो नि त्याचे जीवन सार्थकी लागते. पाशवी वृत्तींवर मात करून मनुष्य हिंस्र श्वापदांपासून निराळा ठरतो, तर वासनांवर काबू ठेवून तो इतर सामान्य माणसांपासून वेगळा ठरतो.
अशा स्वतंत्र व असामान्य प्रज्ञेच्या प्रभृतींना अर्थातच नीतिमत्तेच्या ठोकळेबाज, चाकोरीबद्ध, रूढ, पारंपरिक संकल्पना मान्य नसतात. ‘दारूची नशा करी देहाची दुर्दशा’, ‘नाटकात काम करणं अप्रतिष्ठेचं’ हे डॉक्टरांना अर्थातच पटणार नाही. नैतिक मूल्यांचे निर्धारण आपण स्वतःच करावयाचे व त्या आदर्शाबरहुकूम जगायचे, हा अस्तित्ववादी विचार ते पुरेपूर आचरणात आणतात; परंतु अस्तित्ववाद्यांनी रंगवलेल्या माणसाचे पुसटसे दर्शनही ‘लमाण’मध्ये दिसत नाही. विवेकाला प्राधान्य नि भावनांना गौणत्व दिल्याने येथे ‘सिसिफस’ नाही नि ‘बेलाक्वा’ तर नाहीच नाही. अमर्याद स्वातंत्र्याच्या जाणिवेने कासावीस झालेल्या, मृत्यूचे सतत भान राखणाऱ्या, नातेसंबंध तुटल्यामुळे उन्मळून पडणाऱ्या एकाकी, आत्मदुरावा (एल्यनेशन) सहन करणाऱ्या, पश्चातापदग्ध, सोशीक, व्याकुळ, तगमगणाऱ्या जिवाचा येथे मागमूस नाही. एकंदरीत, जिवंत, हाडामांसाचा ‘श्रीराम लागू’ नामक माणूस ‘लमाण’मध्ये दिसत नाही; उलट दर्शन होते ते निव्वळ ‘डॉक्टर श्रीराम लागू’ यांचे.
जीवन उद्ध्वस्त करणारे, आदर्शाची उलटापालट करणारे, मुळांपासून उखडून टाकणारे, शतशः विदीर्ण करणारे, ‘मी जिंकलो मी हरलो’ पद्धतीचे, जयापजयाच्या सीमारेषा पुसून टाकणारे, दारुण पराभवाचे, अपयशाचे, तेजोभंगाचे, मानहानीचे अनुभव त्यांच्या वाट्याला आलेच नसतील असे मानणे भाबडेपणाचे ठरेल पण अशा जीवनानुभवाची पुसटशीही झलक ‘लमाण ‘ मध्ये नाही. कटु अनुभवांची उजळणी न करता, दुःख उगाळत न बसता ते खिशात घालून पुढे जातात, ते ‘सुपरमॅन’ श्रीराम लागू!
डॉक्टरांचा आत्मशोध व जीवनचिंतन विचारात घेतले तर त्यांनी स्वतःला ‘लमाण’ म्हणवून घेणे हा निश्चितपणे त्यांच्या विनयाचा भाग आहे, असे म्हणावेसे वाटते. नाटककाराचा माल प्रेक्षकाकडे नेऊन टाकणाऱ्या निव्वळ लमाणाची भूमिका डॉक्टरांनी कधीही केली नसावी. जरी भूमिकेशी संपूर्ण तादात्म्य पावून अभिनय करणे त्यांना मान्य नसले तरी अभिनयतंत्राचा त्यांचा अभ्यास एकंदरीत नाट्यप्रकाराची त्यांना असलेली जाण, प्रयोगावरील त्यांची पकड, आपत्काली त्या त्या लेखकाच्या शैलीत पदरचे शब्द उत्स्फूर्तपणे घालून जो संवाद पुढे नेऊ शकतो, इतक्या अप्रतिमरीत्या सिंहावलोकन करून नाट्यप्रवासाचा आलेख मांडू शकतो, त्याला ‘लमाण’ म्हणणे अन्यायकारक वाटते.
बी-२, ७०४, लोकमीलन, चांदिवली, मुंबई-७२.