अनेक कारणांनी शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्याचा प्रश्न आज पूर्णपणे धोक्यात आला आहे. विशेषतः अन्नधान्ये, फळभाज्या व फळफळावळे या क्षेत्रामध्ये आज जागतिकीकरणाचा फायदा घेऊन परदेशी कंपन्यांनी भारतीय बियाणे उत्पादन व्यवसाय आपल्या कब्ज्यात घेण्याचे हरत-हेचे बरेवाईट प्रयत्न चालविले आहेत. परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या देशातील सॉफ्ट ड्रिंक्स तयार करणाऱ्या सर्व कंपन्या भरमसाठ किंमती देऊनच विकत घेतल्या व सॉफ्ट ड्रिंक्सच्या धंद्यातून हिंदुस्थानला हद्दपार केले आहे. आपण यापासून कोणताही धडा घेतलेला नाही. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये बीजोत्पादन करणाऱ्या भारतीय कंपन्या होत्या. परंतु या सर्व कंपन्या आज परदेशी कंपन्यांनी विकत घेतल्या आहेत. त्यातल्या काही कंपन्यांची माहिती खाली दिली आहे.
याशिवाय औरंगाबादच्या अजित सीडस् कंपनीशीही परदेशी कंपन्यांच्या विकत घेण्याच्या वाटाघाटी चालू आहेत. अंकुर बीज कंपनी, नागपूर व अजित सीडस् कंपनी, औरंगाबाद या दोन्ही कंपन्यांचे एकत्रीकरण करण्याचे प्रयत्नही परदेशी कंपन्यांनी चालू केले आहेत. बीजोत्पादन करणाऱ्या भारतीय कंपनी विकत घेणाऱ्या परदेशी किती टक्के शेअर्स घेतले त्यासाठी दिलेली किंमत कंपनीचे नाव
कंपनीचे नाव १. महाराष्ट्र हायब्रिड सीडस् । मोनसँटो कंपनी, अमेरिका ३० टक्के रु. १३० कोटी कंपनी लि., जालना २.महिंद्र बीजोत्पादक अमर्जंद कंपनी, अमेरिका १०० टक्के रु. ११० कोटी कंपनी, जालना ३. हिंदुस्थान लिव्हरचा अमर्जंद कंपनी, अमेरिका १०० टक्के रु. १०० कोटी बियाणे-उत्पादक विभाग ४. पायोनियर बीज कंपनी ___ ड्यु पाँट कंपनी, अमेरिका विकत घेतली आहे ५.अंकुर बीज कंपनी, नागपूर ड्यु पाँट कंपनी, अमेरिका विकत घेतली आहे
महाराष्ट्रातील बीजोत्पादन कंपन्या विदेशी मल्टीनॅशनल कंपन्यांनी भरमसाठ किंमती देऊन आपल्या घशात घेण्याचा जो यशस्वी प्रयत्न केला आहे तो लक्षात घेतला तर, आपल्या देशातील एकूणच बीजोत्पादन क्षेत्र आपल्या हातातून निसटत चालले आहे व ही वाटचाल अशीच चालू राहिली तर, नजीकच्या भविष्यकाळात हिंदुस्थानला बीजोत्पादनासाठी व बीज-पुरवठ्यासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागेल. याशिवाय एकाच बीजावर आपल्या शेतकऱ्यांनी शेकडो वर्षे जे अनेक प्रयोग केले, त्यातून एका बीजाच्या जाती व प्रजाती निर्माण झाल्या आहेत. हे शेतकऱ्याचे शेकडो नव्हे तर हजारो वर्षे प्रयोग करून आत्मसात केलेले ज्ञान आहे. या परंपरागत ज्ञानाला जगातल्या कोणत्याही महासत्तेला पेटंट अॅक्टचा अधिकार लावता येणार नाही.
बियाणे-निर्मितीचा हा व्यवसाय भारतीय कंपन्यांच्या हातून पूर्णपणे गेला तर, हिंदुस्थानातील संपूर्ण शेती व्यवसाय परदेशी कंपन्यांच्या बियाण्यावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे योजनापूर्वक बियाणे मिळाले नाही तर देशाचे जीवन धोक्यात येऊ शकते. डॉ. माशेलकर यांनी हळद, आले, बासमती तांदूळ व गोमूत्र यांवरील पेटंट राईटस् जागतिक कोर्टातून भारताला मिळवून दिले. त्यामध्ये त्यांनी मुख्यतः असा दावा केला होता की, हिंदुस्थानच्या शेतकऱ्याने हजारो वर्षे निरनिराळ्या पद्धतीने प्रयोग करून एकाच बियाण्यापासून जैविक विविधता (बायोडायव्हर्सिटी) निर्माण केली आहे व त्यांनी ती प्रत्यक्षात वापरली आहे. त्यामुळे हे भारताचे पारंपरिक ज्ञान असल्याकारणाने अशा पारंपरिक ज्ञानावर जगाला अधिकार सांगता येणार नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या घुस खोरीमुळे आमचा बियाणे-निर्मितीचा धंदा परदेशी कंपन्यांच्या हातात गेला तर, प्रथम बियाणे-पुरवठ्याच्या बाबतीत आपला देश धोक्यात येईल व त्याचाच स्वाभाविक परिणाम म्हणून आमच्या देशातील जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) हीसुद्धा मारली जाईल व पर्यायाने हिंदुस्थानचे शेतकरी व सामाजिक जीवन हे उदध्वस्त होण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे आपले जनुकशास्त्र विकसित करणे, मूलभूत जनुकांच्या बँका स्थापन करणे, जैवविविधतेची परंपरा व प्रयोगशीलता टिकवून धरणे, आपल्या सर्व वनस्पतींचे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या ‘प्लँट ॲण्ड ब्रीडर्स अॅक्ट’पासून संरक्षण करणे, या गोष्टी कटाक्षाने कराव्या लागतील आणि हे काम डॉ. माशेलकर यांची ‘भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक महामंडळ’ अगर पुण्याची ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ अशा संस्थाच करू शकतात. जगातल्या महाकंपन्यांच्या या आक्रमणाविरुद्ध भारतीय शेतकऱ्याने कोणती भूमिका घ्यावी व त्याचे कोणते सहकार्य या क्षेत्रातील भारतीय संशोधकांना हवे आहे, ते देण्यास भारतीय शेतकरी मागे राहणार नाही, याची ग्वाही आम्ही या निमित्ताने देत आहोत.
भारतामध्ये सर्वसामान्य शेतकरी वर्गात आणखी एका कारणाने असंतोष वाढत चालला आहे. त्या असंतोषाचे मुख्य कारण जनुकशास्त्राचा वापर. जनुकशास्त्र पिकाला व मानवी जीवनाला उपकारक असेल तिथपर्यंत वापरण्यास कोणाचाही विरोध नाही. परंतु जनुकशास्त्राचा वापर करून टर्मिनेटेड बियाणे म्हणजे वंशक्षय केलेले बियाणे निर्माण करावयाचे, म्हणजे शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी नवीन बियाणे घ्यावेच लागेल आणि ते आम्हीच देऊ, अशा त-हेची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न, बियाणे-क्षेत्रातील बहु राष्ट्रीय कंपन्यांकडून सर्रासपणे होऊ लागला आहे. या संबंधात जगाच्या पातळीवरील जी थोडीफार माहिती उपलब्ध झाली आहे ती अशी —-
(१) जगातील एकूण बियाणे-व्यापाराच्या ३० टक्के व्यापार परदेशी दहा कंपन्यांच्या हातात आहे.
(२) जैवतंत्रज्ञानाच्या बाजारावर (ह्यामध्ये टर्मिनेटेड बियाण्यांचा समावेश होतो.) ‘मॉन्सेंटो’ या अमेरिकन कंपनीचे ९४ टक्के नियंत्रण आहे. याच कंपनीने महिको बियाणे कंपनी खरेदी केली आहे.
(३) जनावरांच्या औषध-निर्मितीतील ६० टक्के व्यापार दहा परदेशी कंपन्यांच्या हातांत आहे.
(४) जैवतंत्रज्ञानाच्या बाबतीत जगात सध्या (मे २००१ अखेर) ३६१ कंपन्या काम करीत आहेत. यांतील ६० टक्के म्हणजे २७० कंपन्या अमेरिकन लोकांच्या मालकीच्या आहेत आणि याच २७० कंपन्यांतील दहा कंपन्यांच्या हातांमध्ये जैव तंत्रज्ञाना-तील बियाण्यांचा ५५ टक्के बाजार आहे.
(५) कृषि-रसायने या क्षेत्रात —- १. सेंजेटा, २. फार्मको (मॉन्सेंटो), ३. अॅव्हेंटीस, ४. बी.ए.एस.एफ., ५. ड्यूपॉन्ट, ६. डोव्ह अॅग्री सायन्सेस, ७. सुमिटोमो.
अशा निरनिराळ्या फक्त दहा परदेशी कंपन्यांच्या हातांत कृषि-रसायनांचे उत्पादन आहे. जीवशास्त्र, बियाणे-उत्पादन, कीटकनाशके, जनावरांची औषधे, टर्मिनेटेड बियाणे अशा शेतीला आनुषंगिक असणाऱ्या सर्व क्षेत्रांमध्ये वरील परदेशी कंपन्यांचा प्रभाव आहे व ही सर्व उत्पादने व त्यांचा व्यापार आपल्या हातांत असला पाहिजे व या बाजाराच्या आधारावर जगातील लहानमोठ्या देशातील सरकारांची उलथापालथ करण्याची शक्तीही आपल्यात निर्माण झाली पाहिजे, अशी त्यांची ईर्षा आहे. हा सर्वच विषय केवळ भारताला नव्हे तर जगातल्या सर्व विकसनशील देशांना धोकादायक पद्धतीने हाताळला जात आहे.
जैवतंत्रज्ञानाबद्दलची माहिती, निरनिराळे शोध यांबद्दल मराठी वृत्तपत्रांतून बरीच माहिती येत असते. सर्वसामान्य शेतकऱ्याला वाटते, हे तंत्रज्ञान व त्यातून निर्माण होणारे निरोगी बियाणे, या बियाण्यापासून उत्तम दर्जाचे व हेक्टरी भरपूर उत्पादन देणारे पीक यावे, उत्तम पीक, उत्तम चारा, उत्पादन क्षमता वाढल्याने नफ्याची खात्री व त्यामुळे अन्न, चारा व वस्त्र या बाबतीत आपले जीवन लवकर सुखी होईल असे स्वप्न शेतकरी पाहात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. माशेलकर यांच्यासारख्या तज्ञांनी याची उत्तरे शोधून समाजाची सोडवणूक केली पाहिजे.
सुमारे दीड वर्षापूर्वी ‘महिको मॉन्सेंटो’ या मल्टीनॅशनल बियाणे कंपनीने, आंध्रातील शेतकऱ्यांना भुरळ पाडून टर्मिनेटेड केलेले बी.टी. कापसाचे बियाणे घेण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांना भरपूर पीक व भरपूर पैसा याचे गाजर दाखवून हे बियाणे शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले. बियाण्याचे दर महागडे, त्यासाठी लागणारी कीटकनाशके महागडी, कष्टपूर्ण मशागतीतून होणारा खर्च महागडा व एवढे करून उत्पादन आले नाही. या सर्व प्रकारामुळे कर्जबाजारी झाल्याने आंध्र प्रदेशातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या, हे या गोष्टीचे बोलके उदाहरण आहे.
‘बळीराजा’ च्या ऑगस्ट २००३ च्या अंकातील बापूसाहेब भाऊराव पुजारी (सांगली सहकारी बँक लि., सांगली) यांच्या ‘कैफियत बळीराजाची!’ या लेखातील हा उतारा.
‘लुट गया माल तेरा, लुट गया माल ओय पगडी सम्हाल जठ्ठा, पगडी सम्हाल ओय’