बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या न्यूयॉर्क येथील अधिवेशनात ख्यातनाम साहित्यिक-नाटककार विजय तेंडुलकर यांनी अध्यक्षपदावरून एक भाषण केले. त्यावर महाराष्ट्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी दैनिकांमधून अमेरिकेतील भाषणाचे जे त्रोटक वार्तांकन झाले त्यावर विसंबून आपल्याकडे टीकाटिप्पणी होत आहे. त्यामुळे तेंडुलकर ज्या मुद्द्यांकडे लक्ष वेधू इच्छित आहेत त्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष होताना दिसत आहे. कान बंद ठेवून ऐकण्या-वाचण्याचे हे भाषण नव्हे. म्हणूनच संपूर्ण भाषण आम्ही येथे प्रसिद्ध करीत आहोत. ते वाचावे आणि मग ठरवावे की या भाषणाचे काय करावे!
उपकार आणि औदार्य या विषयावर तुमचा पाठ या व्यासपीठावरून आज मी घेणार म्हणतो. हा विषय माझ्या डोक्यात कसा आला? आयुष्याचा निम्मा अधिक काळ उपकारात काढावा लागला. उरलेला निम्मा औदार्य बघण्यात चालला आहे. मीही वेळप्रसंग बघून आणि खिशांचा अंदाज घेऊन अधून-मधून औदार्याची चैन करतो. म्हणजे भिकाऱ्याला भीक, काही न खपणाऱ्या नियतकालिकांना वर्गणी. कोणत्या तरी कामाला आर्थिक मदत. हे करताना, त्याहून अधिक, केले जाताना बघताना, मनात विचार येतात, प्रश्न उभे रहातात. त्यातले काही इथे मांडण्याचे धाडस करणार आहे. चूकभूल द्यावी घ्यावी. एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही हे सांगण्याची गरज नाही.
समाज देवाण-घेवाणीवर चालतो. कुणी तरी देत असते आणि कुणी तरी घेत असते. देणाराने कधी तरी घेतलेले असते आणि घेणाऱ्याचे देण्याचे दिवस येतात. देण्याघेण्याच्या या परंपरेतून याविषयी काही ठोकताळे आणि रीतिरिवाज समाजात तयार होतात. ते पाळण्याची कायद्याने सक्ती नसली तरी आणि कितीही अर्थहीन असले तरी लोक ते सवयीने आणि कसल्या तरी सक्तीने—कसली माहीत नाही—पाळतात. कुणी पाळले नाहीत तर त्याच्याविषयी चर्चा असते.
हे रीतिरिवाज समाजागणिक वेगळे असतात. आपलेही काही रीतिरिवाज या दोन विषयांच्या बाबतीत आहेत. आपण म्हणजे अमेरिकेचे नागरिक आपण नव्हेत; आपण, महाराष्ट्रीय किंवा मराठी संस्कृतीचे वारस, उरलो उपकारापुरता असे कोण संत म्हणाला माहीत नाही पण संत नसलेले मामुली जीवही उपकारापुरते जगताना दिसतात. ते तसे पोटार्थी. पण निमित्ताने कणा ना कणावर उपकार करीत असतात. ते लग्न करतात. ते पत्नीवर उपकार. जन्म देतात. ते मुलांवर उपकार. नोकरी करतात, ते सरकारवर किंवा नोकरी खासगी असेल तर कंपनीवर उपकार. मुळात जन्म घेतात ते देखील जन्मदात्यांवर उपकार. कुणाला कसलीही मदत केली की ते झाले, त्या कुणावर उपकार. कुणाला पैसे उसने दिले, उपकार. प्रवासात कुणाला हात दिला तरी उपकार. कधी कधी एखादी देणगी देण्याची इच्छा त्यांना होते. संस्थेवर उपकार. एखाद्या सामाजिक कामावर उपकार. कार्यकर्त्यांवर उपकार. उपकारापुरतेच ते उरलेले असतात पण संत न होता.
संताने कधी कल्पनेत देखील पाहिली नसेल अशी सुस्थिती त्यांना प्राप्त झालेली असते. फ्लॅट, गाडी, कधी गाड्या, नोकर चाकर. अत्याधुनिक सुखसोयी. एकीकडे जोडोनिया धन उत्तम, आणि वेवहारे ते वाढवीत त्यांचे उपकाराचे व्रत बाजूला चालू असते. संत उपकार घेत असत. आपण आहोत. आपल्यासाठी ही सृष्टी आहे, अन्न आहे, पाणी आहे हाही ईश्वराचा उपकार मानीत ते आजन्म लीन राहून जगत. असे जगताना इतरांसाठी, गरजूंसाठी, अगदी कीडमुंगीसाठी जे हातून घडे तेही ‘त्याची’ इच्छा असे ते मानीत. ही सृष्टी, हे आयुष्य, हा देह आणि जे जे जवळ असे ते ‘त्याचे’ असे मानल्याने हे देण्यासाठीच आहे असे त्यांना साहजिकपणे वाटे आणि गरजू भेटला की ते देणे हे त्यांच्या लेखी काहीच विशेष नसे. त्यांच्या देण्याला उपकाराचा स्पर्श नसे. दिल्याच्या बदल्यात परत काही मिळावे ही अपेक्षा नसे. न मिळाले तर खंत नसे. तक्रार तर नसेच नसे.
नवे उपकारी नव-संत आपल्याला जे मिळालेले असते, आणखी मिळत असते ते कुणाचे उपकार नव्हेत तर ते आपलेच कर्तृत्व असे मानतात. ते आपण अक्कलहुशारीने मिळवलेले आहे असे मानतात. त्याविषयी अभिमान बाळगतात. कधी आत्मप्रौढी तर कधी तिचाच दुसरा आविष्कार अशी औपचारिक शालीनता मिरवतात. मधून मधून उपकार करणे ही त्यांची आणखी एक चैन असते. मग आईवडिलांच्या स्मृत्यर्थ देणगी किंवा आपल्याच नावाची पाटी लागेल अशी देणगी समारंभाच्या अटीसह. त्या निमित्ताने देणगीचा उपकार ज्यांच्यावर केला त्यांच्याकडून उपकारभावनेच्या जाहीर अभिव्यक्तीची अपेक्षा. तीही एकदाच नव्हे तर पुन्हापुन्हा
आणि देणगी मोठी असेल तर तहहयात.
म्हणजे दिल्या देणगीच्या बदल्यात एखाद्या संस्थेला कायमचे आपल्या उपकारात बांधून टाकणे. याहून, व्यवहार ज्यांना कमी जमला आणि धन जोडणे तितके उत्तम झाले नाही म्हणजे जे खाऊन पिऊन सुखी आहेत, त्यांचा उपकार याहून वेगळा असेल तर तसे नसते. त्यांचा उपकार लौकिक दृष्ट्या तुलनेने छोटा पण तितकाच डिमांडिंग असतो. अपेक्षा तितक्याच मोठ्या असतात. माझ्या लहानपणी माधुकरीची पद्धत होती. मुंबईत देखील ती होती. माझे कोकणातून मुंबईत शिक्षणासाठी आलेले गरीब घरातले वडील एका त्या काळच्या व्याख्येने खाऊन पिऊन सुखी घरात वारावर जेवले. त्या गृहस्थांनी केल्या उपकाराचा फायदा घेऊन त्यांची मुलगी वडलांना देऊ केली. वडील नाही म्हणू शकणार नाहीत हा त्यांचा हिशेब आणि वडिलांनी घेतल्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून नाही म्हटलेही नाही. वास्तविक लग्नाची त्यांची इच्छा नव्हती, त्या वयात तर नव्हतीच नव्हती. त्यांना पुढे शिकायचे होते पण घेतल्या उपकारांनी त्यांच्या या इच्छेचा बळी घेतला. गळ्यात अकाली संसाराचे दावे अडकले. माझ्या आईचे वडील तसे मोठे सधनही नव्हते पण उपकार करू शकले आणि केल्या उपकाराचा मोबदला त्यांनी संधी येताच वसूल केला.
छोट्या माणसांनाही उपकाराची चैन आवडते कारण एरवी घेता या निमित्ताने दाता होतो आणि दात्याचे चोज पुरवून घेतो. बदल्यात नावाची पाटी. ती नसली तर अहवालात ठळक अक्षरांत नाव आणि तेही नसेल तर काही तहहयात सवलती मागतो. यावर एक वाक्य सतत कानांवर असते. मग? पैसे काय फुकट येतात काय? कष्टाचे पैसे आहेत. हे झाले मुख्यतः संस्थांना दिल्या जातात त्या देणग्यांचे. व्यक्तींवर केले जातात ते उपकार ही आणखीच एक वेगळी कहाणी असते. इथे उपकाराचा मोबदला पाटी लावण्याची अट असू शकत नाही. पाटी लागणार? उपकार केलेल्याच्या पाठीवर? मग उपकार घेणाराकडून अपेक्षा उपकाराच्या जाणिवेची. ही जाणीव अधून-मधून नाही. सतत दिसली पाहिजे. समोर हवी आणि मागेही हवी. वाचेने हवी तशी कृतीने हवी. मधून-मधून घरी येऊन पाया पडणे. काही भेटवस्तू देणे. उपकार घेणाराकडून तर ही हवीच पण त्याच्या वंशजांकडूनही हवी. ती त्यांनी खासगीत बोलून पुरेसे नाही. जाहीर कृतज्ञता दिसली पाहिजे. यात चुकले की देणाराला क्लेश. बघा इतके केले पण जाणीव कशी ती नाही. समोर आला, पाया पडणे सोडा पण साधा वाकून नमस्कार नाही. ओळख दिली, हेच नशीब, कुणासाठी केल्या गोष्टीचे चीज म्हणून नाही. यातून उपकार आर्थिक असले तर अपेक्षा परतफेडीची. हे वेळेवर झाले नाही तर उपकार घेतलेल्याला दूषणे. कधी कधी मनाशी पण कधी ‘आल्या गेल्याकडे’.
आचार्य अत्र्यांचे उदाहरण मनाशी येते. ‘वासू नाका’ या भाऊ पाध्ये यांच्या कथासंग्रहावर नेहमीप्रमाणे कडाडून हल्ला करताना ‘मराठा’च्या अग्रलेखात पहिले वाक्य भाऊंच्या पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च आपण केल्याचे. याचा भाऊंच्या कथा-संग्रहाशी काय संबंध? हा खर्च आपण केल्याचे काही कारण नसताना त्या अग्रलेखात सुरुवातीलाच जाहीर करण्यामागची आचार्यांची गरज काय असेल?
मी एकदा एका प्रकाशकाकडून घर थाटण्यासाठी पैसे घेतले होते. घर विकत घेण्याची कुवत नव्हती. अकरा महिन्यांच्या कराराने काही अनामत रक्कम दिली की जुने-पाने घर तेवढ्यापुरते मिळे. हजारभर असतील. बदल्यात भाषांतराचे काही काम करणार होतो. ते काम रद्द झाले. पैसे परत करण्याला वेळ लागला म्हणून या एरवी बिझी प्रकाशकांनी मला रोज एक तगाद्याचे उघडे कार्ड मोठ्या अक्षरांत रंगीत शाईत पाठवण्याचा क्रम मी पैसे परत करीपर्यंत ठेवला होता. माणसे चांगली, सुसंस्कृत, मोठ्या मनाची. पण उपकाराचा प्रश्न येताच त्यांची एरवी मोठी मने छोटी झाली.
पैशाच्या गोष्टी सोडून बोलू या. कुणाला नोकरीत चिकटवला, कुणाचे लग्न जमवले, कोणत्या तरी कोर्सला अॅडमिशन मिळवून दिली तर त्याने याची परतफेड म्हणून उलट काही केले पाहिजे असे अनेकांना मनातून वाटते आणि तसे घडले नाही की ते दुःखी होतात. नाखूषही होतात. परतफेड झाली नाही हे शल्य त्यांना कायमचे लागून राहते. आपल्या अनुभवातल्या उपकाराविषयीच्या गोष्टी आठवन पहा.
मी म्हणतो की, हा दुःखाचा मार्ग आहे. घेणारापेक्षा देणाराला क्लेश. म्हणून शहाण्या माणसांनी उपकार करणे बंद केले पाहिजे. उपकार घेणाऱ्याचा प्रॉब्लेम नाही, उपकार करणाऱ्यांचा आहे हे लक्षात घ्या. मुंबईच्या टाटा समाज-विज्ञान संस्थेत व्हिजिटिंग प्रोफेसर होतो त्या काळात समाज-कार्यासाठी खेडोपाडी किंवा रानावनात आदिवासी भागात जाणारांना निरोप देण्याचे समारंभ होत. कधी मला अशा वेळी बोलण्यासाठी बोलावले जाई. माझे भाषण प्रसंगानुरूप बदलत असे पण त्याचा आरंभ एकच असे. मी म्हणे, तुमचा बेत चांगला आहे, पण तुम्ही जात आहात ते कशासाठी जात आहात हे ठरवा. ज्या भागात तुम्ही निघाला आहात तिथून तुम्हाला बोलावणे आलेले नाही. ते तुमची वाट पाहात नाहीत. तुमच्याशिवाय ते जगताहेत आणि जगतील. त्यांच्यावर उपकार म्हणून तुम्ही जात असाल तर इथेच तुमचे जाणे रद्द करा. तुम्ही कसल्या तरी भ्रमात फसून भलत्या फंदात पडलात तर पश्चात्तापाची वेळ येईल. कुणाची तरी गरज म्हणून शहरातले चांगले जिणे सोडून या त्रासात आलो आणि इथल्या लोकांना तर याबद्दल काहीच नाही, असे तुम्ही म्हणाल. केल्या उपकाराच्या बदल्यात काही करण्याइतकी कृतज्ञता या लोकांत नाही असा निष्कर्ष काढून तुम्ही परताल. अशा कामात उपकार म्हणून पडलेले अनेक असे पस्तावले आहेत. जाणार असाल तर तुमची गरज म्हणून जा. तुम्हाला ते काम करण्यात आनंद वाटणार असेल, ते न केले तर मनाला लागून राहणार असेल, न जाण्याने तुमचे जगणे दुःखी होणार असेल तरच जा. गरज तुमची असेल तर एखादी गोष्ट करा, कुणावर उपकार म्हणून केलीत की पस्तावलात समजा.
हे खरे आहे की लोक चोवीस तास आणि महिन्याचे तीस दिवस कुणाचे उपकार मानून त्या ओझ्याखाली जगणार नाहीत. तसे पाठीवर उपकाराचे ओझे वागवीत जगणे कुणालाच आवडत नाही. माणसाला मोकळे जगायचे असते. त्याला दारिद्र्य चालेल, अनेक गोष्टींची उणीव चालेल, तो एक वेळ जेवून जगेल पण उपकारकर्त्यापुढे कायम लोटांगण घालीत, त्याचे हुकूम पाळीत, तो म्हणेल तेच खरे म्हणून नंदीबैलाप्रमाणे मान डोलवीत आणि उपकाराची जाणीव सतत दिली जात जगणे तो पत्करणार नाही. पहिल्या संधीला तो उपकारकर्त्याशी कृतघ्न होईल. तो मनाने त्याचा द्वेष करील. कारण उपकारात जगणे हे माणसाचे जगणे नाही. ते कुत्र्याचे जगणे आहे. हे कुत्र्याचे जगणेही मध्ययुगीन परंपरेने आपल्या देशात आणि महाराष्ट्रात गरिबी रेषेखालच्या माणसांच्या सवयीचे केले होते, पण माणसे आता अशी राहिली नाहीत. राहणार नाहीत. माणूस बदलतो आहे. म्हणून मी माझ्या एका शहाण्या आणि सुखी मित्राचा सदरा हल्ली पहेनला आहे. उपकार बंद.
हा माझा सुखी मित्र कुणी पैसे मागितले की खिशात हात घालतो. त्यातले किमान जवळ ठेवून बाकीचे देतो. शक्य असले तर नंतर आणखीही देतो. मात्र ते देताना घेणारा काही बोलण्याआत तो म्हणतो, परत करण्याचा वायदा करू नकोस. तू हे परत करणार नाहीस असे मी मानतो. परत केलेस तर हवेच असतील; पण वायदा करून तू परत करत नाहीस, परत करशील की नाही, कधी करशील, भेटलास तर हा विषय तू कसा टाळलास, समोर येऊन बोलला नाहीस, हा नसता त्रास मला नको आहे. मी दिले हे मी विसरणार आहे. तू काय करणार आहेस हा यानंतर तुझा प्रश्न असणार आहे. माझा नाही. गुड बाय. भेट परत. यामुळे उपकाराच्या नसत्या ओझ्यातून तो घेणाराला मोकळे करतोच पण देणाराला नित्य होणारा त्रास संपवून टाकतो. नाहीतर पैसे द्यायचे आणि वर त्रास विकत घ्यायचा हा कसला व्यवहार? रामदासस्वामी उत्तम वेवहारें म्हणाले तो माझा मित्र करतो तोच असावा. कमीतकमी मनस्तापाचा तो उत्तम वेवहार. मग तो देण्याचा असो की घेण्याचा असो. या व्यवहार-नीतीमुळे माझ्या मित्राचे सर्व मित्र पैसे उसने घेऊनही त्याचे मित्रच राहिले आहेत आणि त्याची तब्येतही उत्तम आहे. हे जमणे, आधीच्या संस्कारांमुळे, मला कठीण जाते. मध्येच मी कुणासाठी काहीतरी केल्याची आठवण येते आणि याच्यासाठी इतके करून लेकोचा हल्ली साधा एक फोनही करत नाही, यासाठी त्रास करून घेतो.
(अपूर्ण)
बद्रीधाम, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पू.) मुंबई — ४०० ०५७