‘एखादा प्राणी क्लेशात असणे शक्य आहे का?’ हे कसे ठरवावे याबद्दल दोन ब्रिटिश प्राणिशास्त्रज्ञांनी एक मत मांडले आहे. ते म्हणतात की उत्क्रांतीतून जर एखादा प्राणी एखादी परिस्थिती भोगण्यास ‘लायक’ अशा शरीररचनेला पोचला असेल, तर ती परिस्थिती क्लेशकारक असण्याची शक्यता आपण कल्पनेने मान्य करण्याइतकी जास्त नसणेही शक्य आहे. आणि जर क्लेश होत असतील अशा परिस्थिती शेतांत किंवा प्रयोगशाळांमध्ये असतील तर अशा परिस्थिती याप्रमाणे (क्लेश न देणाऱ्या त-हेने) बदलणे शक्य आहे. इमूळ वाक्ये आहेत —- To discover whether an animal is likely to be suffering , they say, you need to ask if evolution has designed it to deal with such conditions. If it has, then the risk of suffering may not be merely as great as we might imagine. And if there is suffering, at least where d labs are concerned, it may be possible to alter the animal’s living conditions accordingly, मुळातील अनेकानेक बचावात्मक शब्दरचनांचे भाषांतर क्लिष्ट, काहीसे निरर्थकही वाटेल, म्हणून मूळ उताराही देत आहोत.
क्रिस बर्नार्ड (प्राणिवर्तनाचे प्राध्यापक) आणि जेन हर्स्ट (वर्तनात्मक परिसर-शास्त्राची प्राध्यापिका) हे नॉटिंगहॅम विद्यापीठातील दोन वैज्ञानिक सुचवतात की एखादा प्राणी आपले तगणे (survival) आणि सुखात असणे (well-being) यांना काही मूल्य देण्यासाठी उत्क्रांत कसा झाला, हे समजणे क्लेशाचे कोडे सोडवण्यास आवश्यक आहे. ‘अॅनिमल बिहेवियर’ या तांत्रिक नियतकालिकात (नोव्हें. १९९६ चा अंक) बर्नार्ड व हर्ट अशी मांडणी करतात की परिस्थिती वाईट आहे असे आपल्याला कितीही वाटले तरी त्यामुळे त्या परिस्थितीतला प्राणी क्लेशात असेलच असे मानता येत नाही — पण मुळात उत्क्रांतीतून तो प्राणी ती परिस्थिती ‘हाताळायला’ सक्षम झालेला असायला हवा. कोल्ह्यापासून स्वतःला वाचवत पळणारा ससा क्लेशात असेल असे आपोआप मानता येत नाही, कारण तो उत्क्रांतीतून सवयीच्या झालेल्या परिस्थितीत असतो. कोल्ह्याला मात्र शिकारीचे लक्ष्य असण्याचा अनुभव उत्क्रांती इइंग्लंडात तरी!ट देत नाही, त्यामुळे त्याला सशासारखे ‘शिकार’ होण्याने क्लेश होऊ शकतात. सशांना ‘शिकारले’ जात असताना व्यक्तिनिष्ठ भीती वाटेलही, पण ती भुकेसारखीच एखादी क्रिया करायला प्रवृत्त करणारी भावना असेल– भूक लागली? खा. तुझी शिकार होते आहे? पळ. हे उत्क्रांतीतून शिकलेले, प्राण्यांना परिस्थित्यनुरूप करणारे भाव जर विफल ठरले, तरच क्लेशाचा प्रश्न उद्भवतो. हा तरल फरक बर्नार्ड हर्टना कळीचा मुद्दा वाटतो.
क्लेश होत आहेत का ते ठरवायला वेगवेगळी तंत्रे संशोधक वापरतात. प्राण्यांची वागणक: रक्तदाब. ताणप्रणीत हॉर्मोन बदल, प्रतिरक्षा-व्यवस्थेची क्षमता वगैरे क्रियावैज्ञानिक मोजमापे, अशी ही तंत्रे असतात पण अशा साऱ्या मापनानंतरही ‘नकोसे वाटणे’ म्हणजे ‘क्लेशात असणे’, ‘दुःख होणे’ असे खात्रीलायकपणे कसे म्हणता येईल?
लिव्हरपूल विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक स्टीफन क्लार्क क्लेश (pain and suffering) या विषयावरची वेगवेगळी मते नोंदून असा निष्कर्ष काढतो की प्राण्यांना क्लेश होतच नाहीत असे मानता येत नाही. आणि क्लेश होणे योग्यच (always appropriate) असेही म्हणता येत नाही. व्यक्तिनिष्ठ दुःख किंवा क्लेश या भावना प्राण्यांना जीव वाचवायला उद्युक्त करण्यासाठी उत्क्रांतीतून घडल्या–पण या भावना केव्हा विफल होतात किंवा विफल होतात का, याचा विचार व्हायलाच हवा—असे ऑक्सफर्डचे प्राणिशास्त्रज्ञ एम.एस. डॉकिन्स म्हणतात.
बर्नार्ड-हर्स्ट मात्र व्यक्तिनिष्ठ भावभावनांना तेवढे महत्त्व देत नाहीत. त्यांच्या मते स्वतःला टिकवायला मानवासारखे दीर्घजीवी/दीर्घायुषी प्राणी जसे महत्त्व देतात, तसेच महत्त्व इतर प्राणी देत असतील असे मानणे हे या मानवी दृष्टिकोनातून (anthropomorphic) प्राण्यांकडे पाहणे आहे. प्राण्यांच्या दृष्टिकोनातून चित्र कसे असेल, असा विचार करून पाहणे त्यांना जास्त योग्य वाटते.
एखादी उत्तम रेसिंग कार कधीच वेगाने न हाकणे आणि नैसर्गिक वर्तन करणाऱ्या प्राण्यांना क्लेश होताहेत असे मानणे बर्नार्डना समरूप वाटते.
एखाद्या वेदनाशामक औषधाच्या चाचणीसाठी ते औषध दिलेल्या प्राण्याला तापत्या तव्यावर ठेवणे, असल्या क्रिया मात्र त्या प्राण्याच्या उत्क्रांतिदत्त संरचनेच्या विरोधात असल्याने बर्नार्डना चुकीच्या वाटतात. प्राण्यांचे हक्क मानून प्राण्यांचे भले चाहणाऱ्यांनी
आजच्या पशुसंवर्धनाच्या पद्धतींवर जास्त रोख ठेवावा, असे बर्नार्डना वाटते. पिंजऱ्यातले प्राणिजीवन आणि मुळात प्राणी मुक्त वातावरणात राहण्यासाठी उत्क्रांत झालेले असणे यावरही हे संशोधक बरीच उदाहरणे व तपशील देत खल करतात.
पण हे सारे लक्षात घेऊनही एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. जर उत्क्रांतीतून घडलेले वर्तन विना अडथळा करू देणे हीच कल्याणकारी वाट असेल, तर ती वनस्पती व जीवाणू (bacteria) यांनाही लागू करायला हवी — कारण ‘स्व’ ची जाणीव असलेल्या प्राण्यांप्रमाणेच हे जीवही उत्क्रांतिदत्त वागणुकी व संरचना दाखवतात.
केंब्रिजचा प्राणिकल्याणाचे प्राध्यापक डॉन ब्रूम म्हणतात की कल्याणकारी वागणूक देणे (welfare) ही कल्पना प्राण्यांना लागू पडते, हे बहुधा सर्वमान्यच असेल. इतर सजीवांपेक्षा प्राण्यांचा प्रतिकूल परिस्थितीला प्रतिसाद वेगळा असतो — ते पळू शकतात, परिस्थिती बदलायला धडपडतात, त्यांना भावना असतात, इत्यादी. ब्रूम डॉकिन्ससारखे भावनांच्या मोजमापाच्या गरजेवर लक्ष केंद्रित करायचे सुचवतात. बर्नार्ड हे मान्य करून पुढे म्हणतात की ‘कशाला, कोणाला भावना असतात’, यावर या मांडणीने वाद उत्पन्न होतात. त्यांच्या मते जीवांमध्ये व्यक्तिनिष्ठ भेदाभेद करण्याने अनेक संशोधक वेळ वाया घालवतात. ते प्राण्यांच्या मज्जासंस्थेच्या क्लिष्टतेचा आधार घेऊ पाहतात. एखाद्या जीवाला क्लेश होतात की नाही हे ठरवायचा वस्तुनिष्ठ निकष मात्र तो जीव स्वतःची परिस्थिती नियंत्रित करू शकतो का, आणि त्याची ही क्षमता विफल होते का, हाच असू शकतो. “एखाद्या जीवाचे परिस्थित्यनुरूप निर्णय घेण्याचे नियम आपल्याला त्या प्राण्यांच्या परिस्थितीशी जुळते घेण्याच्या यंत्रणांचे दर्शन घडवतात.’ बर्नार्डच्या मते क्लेश/दुःख मोजता येण्याची आशा फक्त या मांडणीनेच घडवता येते.
टी.बी. खिलारे यांनी गेल्या अंकात पीटर सिंगरच्या दि.य. देशपांडे अनुवादित ‘सर्व प्राणी समान आहेत’ (अंक १४.३) या लेखावर दिलेल्या प्रतिक्रियेत न्यू सायंटिस्ट च्या २२ मार्च १९९७ मधील एका लेखाचा उल्लेख केला होता. गेल व्हाइन्स यांचा ‘हू इज सफरिंग नाऊ?’ हा तो लेख —आणि हा त्याचा संक्षेप— (संपादक) — यावर दि. य. देशपांडे लिहितात —
आजचा सुधारकच्या ऑक्टोबर २००२ च्या अंकात मी अनुवादलेला पीटर सिंगर यांचा ‘सर्व प्राणी समान आहेत’ हा लेख प्रकाशित झाला आहे. त्या लेखासंबंधी श्री टी. बी. खिलारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
ते म्हणतात की अनुवादक आपल्याला पटणाऱ्या विचारांचाच अनुवाद करतो असे मी गृहीत धरतो. त्यांचे म्हणणे स्थूलमानाने बरोबर आहे. सिंगर यांचा लेख मला पटतो हे मी मान्य करतो. तसेच सर्व प्राणी सोडा, सर्व माणसे समान आहेत हेही सर्वांना मान्य नाही असे माणसांच्या कृती पाहून मान्य करावे लागते हेही खरे आहे. चोऱ्या, खून, धनवंतांकडून गरिबांवर केले जाणारे अत्याचार, गिरणीमालकांच्या हातून होणारी मजुरांची पिळवणूक, छळछावण्या, इ. त्याची साक्ष आहेत. पण सामान्यपणे हे गैर आहे असे मानले जाते हीही वस्तुस्थिती आहे. खिलाऱ्यांनाही हे मान्य असावे अशी माझी कल्पना आहे. पण मनुष्यांचे प्रत्यक्ष आचार सर्व माणसे समान आहेत याशी विसंगत आहेत म्हणून सर्व प्राणी समान आहेत या विधानाच्या सत्यतेला बाधा कशी पोचते हे मला कळले नाही. खिलारे म्हणतात की सिंगर यांच्या लेखातून अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यांची उत्तरे लेखात मिळत नाहीत. त्यांचा पहिला प्रश्न प्राणी समान आहेत असे म्हणताना सर्व प्राण्यांत कृमि-कीटकांचाही समावेश अभिप्रेत आहे काय असा आहे. मला वाटते सिंगर यांचे उत्तर असे असावे की निम्न कोटींच्या प्राण्यांनाही क्लेश, वेदना, यातना होत असतील तर त्यांनाही मारणे गैर आहे. शेवटी प्रश्न तारतम्याचा आहे. म्हणजे प्राण्यांना क्लेशदायी वागणूक कशाकरिता देतो हे पाहून ठरवावे लागेल. केवळ आपल्या मनोरंजनासाठी तसे करणे योग्य होणार नाही.
दुसरा प्रश्न. उंदीर, घुशी इ. प्राण्यांवर वैद्यकीय कारणांसाठी केले जाणारे प्रयोग बंद करावेत काय?
याही प्रश्नाचे उत्तर तारतम्यानेच द्यावे लागेल. प्रयोगांचे स्वरूप किती गंभीर आहे यावर अवलंबून असेल. एक उत्तर असे असू शकेल. जिवंत प्राण्यांचे विच्छेदन करण्यापूर्वी त्यांना क्लोरोफॉर्मसारख्या औषधाने बेशुद्ध करणे हा उपाय मोठ्या प्रमाणावर वापरता येईल. या उपायाने
वैद्यकीय प्रयोगांतील क्रौर्य बहुतांशाने आटोक्यात आणता येईल.
तिसरा प्रश्न. या प्रश्नात ‘मानवाचा उत्क्रांतितत्त्वानुसार असलेला आहार’ असे शब्द आहेत. तो आहार म्हणजे मिश्राहार, सर्वभक्षी. तो बदलावा काय?
या प्रश्नाचे उत्तर असे देता येईल की उत्क्रांतितत्त्वानुसार ठरलेल्या गोष्टी बदलणे श्रेयस्कर आणि शक्य असेल तर तसे करण्यात गैर काही नाही, उलट ते अवश्य आहे. उत्कांतितत्त्वानुसार आरंभी माणूस माणसाला खात होता. पण आपण आज ते निषिद्ध ठरिवले असून त्यानुसार आपला आचारही आहे. खिलाऱ्यांची भिस्त प्रामुख्याने मानवेतर प्राण्यांना यातना होत नाहीत या गृहीतावर आहे. सर्व प्राण्यांना दु:ख होते असे आपण सामान्यपणे मानतो. पण खिलाऱ्यांच्या मते ते चूक आहे. ते म्हणतात की मानवेतर प्राण्यांना यातना होत नाहीत असे मानण्यास जागा आहे. नॉटिंगहॅम, विद्यापीठातील बर्नार्ड आणि हर्ट या वैज्ञानिकांच्या संशोधनावर त्यांचा भर आहे. या वैज्ञानिकांनी असे मत व्यक्त केले आहे की, (खिलाऱ्यांच्या शब्दांत), नैसर्गिक निवडीनुसार प्राणी अशा रीतीने उत्क्रांत झाले आहेत की ते एकमेकांचे भक्षण करीत असले तरी त्यांना यातना होत नाहीत. कारण उत्क्रांति-अनुसारच त्यांचे वागणे असते. . . . कोल्हा कोणाचे भक्ष्य होऊ शकत नाही. पण ससा कोल्ह्याचे भक्ष्य होऊ शकतो, आणि कोल्ह्याचे भक्ष्य झाल्यामुळे सशाला यातना होत नाहीत. कारण उत्क्रांति-तत्त्वानुसार त्यांची रचना झालेली असते.’ या युक्तिवादाचे मर्म मला कळू शकलेले नाही. सशाला कोल्हा खात असताना त्याला (म्हणजे सशाला) यातना होत नाही हे मानणे उघडच चूक वाटते. प्राण्यांची रचना उत्क्रांतितत्त्वानुसार होत असेल, पण त्यामुळे खाल्ल्या जाणाऱ्या प्राण्याला क्लेश होत नाहीत हे म्हणणे अनाकलनीय आहे. ते मांसाहार करणाऱ्या माणसांना सोयिस्कर
आहे हे मात्र खरे.
विज्ञानावर गैरविश्वास दाखविणे अर्थात् गैर आहे. पण प्रस्तुत संशोधन ‘विज्ञान’ या संज्ञेस पात्र नाही. ते अजून संशोधनावस्थेत आहे. त्याबद्दल मतभेद आहेत. त्याविषयी वाद चालू आहेत. म्हणून ते अजून विज्ञानाच्या पदवीस पोचलेले नाही. ते जणू काही प्रस्थापित झाले आहे असे मानणे अवैज्ञानिक आहे.
कर्मयोग, प्लॉट नं. ४, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२