जवळजवळ सर्व जगात धार्मिक असहिष्णुता आणि दहशतवाद यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक विचारवंत या दोन्ही अनर्थकारक घटनांची चिकित्सा करून त्यांना प्रतिबंध कसा घालावा, याविषयी अभ्यासपूर्ण लेखन करीत असतात. या विचारवंतां-मध्ये समाजशास्त्रज्ञ, विज्ञानाचे अभ्यासक, पत्रपंडित, राजकीय मुत्सद्दी, विविध धर्मांच्या अनुयायांचे नेतृत्व करणारे धुरीण, इत्यादींचा समावेश असतो. परंतु अशा विचारवंतां-मध्ये मानसोपचारतज्ज्ञ सामील झालेले क्वचितच दृष्टोत्पत्तीस येते. वस्तुतः माणसाच्या मनातील वैरभाव, द्वेष आणि चिंता यांच्यासारख्या विघातक भावनांचे उच्चाटन करून, त्याला सहनशीलतेची व परमतसहिष्णुतेची कास धरून समाजातील इतर माणसांबरोबर गुण्यागोविंदाने राहण्यास मदत करणे, हे मानसोपचारशास्त्राचे एक उद्दिष्ट असते. तेव्हा प्रस्तुत लेखात, माणसाच्या मनातील असहिष्णुतेबद्दल मानसोपचारतज्ज्ञ कोणते निदान करतो आणि कोणती उपाययोजना सुचवितो, याचा ढोबळ आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मनिरपेक्षतेला वाहिलेले नियतकालिक अमेरिकेमध्ये ‘फ्री इन्क्वाइअरि’ नावाचे एक नियतकालिक प्रकाशित होत असते. ते धर्मनिरपेक्षतेला वाहिलेले एक अग्रगण्य नियतकालिक आहे, असे म्हणता येईल. सामान्यतः या नियतकालिकाचे वाचक धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांची कार्यक्षेत्रे परस्परांहून पूर्णतः वेगळी असली पाहिजेत, या विचारसरणीचे समर्थक असतात. त्यांचे म्हणणे असेही असते, की शिक्षणसंस्थामधून जनसामान्यांना विज्ञानाचे शिक्षण कसे द्यावे या प्र नापासून ते गर्भपातासंबंधी नागरिकांना कोणते अधिकार असावेत या प्र नापर्यंतची धोरणे ठरविण्याच्या प्रक्रियेत, धार्मिक विचारांना कोणताही लुडबूड करून देता कामा नये. शिवाय, माणूस स्वतःला जो जीवनक्रम अर्थपूर्ण वाटत असेल,
त्यानुसार जीवन जगण्यास मुखत्यार असावा. त्याने आपले जीवन जगत असताना, इहलोकी आणि परलोकी मिळू शकणाऱ्या शाश्वत स्वरूपाच्या कडू अथवा गोड फळांवर किंवा कोणत्याही आध्यात्मिक चिरकालीन सत्यविषयीच्या संकल्पनांवर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. त्याने याच जगात, स्वतःहून निवडलेला मार्ग अनुसरून आपले जीवन जगावे, म्हणजे झाले. संपादकांची दूरदृष्टी धर्मनिरपेक्षतेला आणि मानवतावादाला वाहिलेल्या या नियतकालिकाच्या संपादकांना एक प्र न चिंताजनक वाटत असतो. तो म्हणजे, झपाट्याने बदलत चाललेल्या राजकीय व सामाजिक परिस्थितीमुळे धर्मनिरपेक्षतेला आणि मानवतावादाला भविष्यकाळात कोणत्या विरोधाला सामोरे जावे लागेल? शालेय अभ्यासक्रमात धर्मशिक्षणाचे व प्रार्थनेचे स्थान, विज्ञानाच्या अभ्यासक्रमात होणारी प्रगती, इत्यादी घटनांमुळे शिक्षणक्षेत्रात अधिकाधिक विभाजन होऊ शकेल. आणि लोकमताच्या कल असा दिसू लागला आहे, की नजीकच्या काळात खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातही दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या सहिष्णुतेमुळे, पाखंडी विचारसरणीचा मार्ग जास्त कष्टदायक होईल.
अशा संभाव्य परिस्थितीचा विचार करून श्री. पॉल कुर्ट्झ या वरील नियतकालिकाच्या संपादकांनी एक प्रबोधनात्मक उपक्रम हाती घेण्याचे ठरविले. तो म्हणजे ‘धर्मनिरपेक्षतेचे अमेरिकेतील भवितव्य’ या विषयावर 1992 साली उन्हाळ्यात एक विशेष अंक प्रकाशित करणे. यासाठी प्रथम त्या विशेष-अंकाचा विषय नक्की करण्यात आला.
विद्वानांना एक लेख लिहिण्यास विनंती केली. ज्या विद्वानांना 400 शब्दांची मर्यादा पाळून वरील विषयावर लेख लिहिण्याचे आवाहन करण्यात आले होते, ते विविध क्षेत्रांत तर कार्यरत होतेच; पण त्यांची वैचारिक पार्श्वभूमीही विभिन्न होती. आणि श्री. पॉल कुर्ट्झ यांनी त्यांना लेख लिहिण्यास पाचारण करण्यासाठी जे पत्र लिहिले होते, त्यात दोन प्र न सुचविले होते. पहिला प्र न म्हणजे, पुढील दहा वर्षांच्या कालावधीत अमेरिकेत धर्मनिरपेक्षतेविषयी कोणते बदल घडून येतील, असे आपल्याला वाटते? आणि दुसरा प्र न म्हणजे, वरील क्षेत्रात पुढील दहा वर्षांच्या कालावधीत अमेरिकेत कोणते बदल घडून येणे आपल्याला रुचेल? श्री. पॉल कुर्ट्झ यांच्या विनंतीला मान देऊन ज्या नामवंत विद्वानांनी नियोजित विषयावर लेख लिहिले, ते लेख ‘फ्री इन्क्वाइअरि’ नियतकालिकाने 1992 सालच्या उन्हाळ्यात प्रकाशित केलेल्या विशेष-अंकात प्रसिद्ध केले.
एका मानसोपचारतज्ज्ञाचा समावेश
वरील विशेष-अंकात ज्या विद्वानांचे लेख प्रसिद्ध करण्यात आले होते, त्यांपैकी एक म्हणजे सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचे प्रवर्तक असलेल्या या मानसोपचारतज्ज्ञांच्या खात्यावर, हजारो मनोरुग्णांवर उपचार करण्याचा सुमारे चार दशकांचा अनुभव जमा होता. खेरीज, अनेक पुस्तके, शोधनिबंध, व्याख्याने, कार्यशाळा व चर्चासत्रे यांच्याद्वारे त्यांनी आपल्या मानसोपचारशास्त्राचा जगभर प्रसार केला होता. तसेच मानसशास्त्रज्ञांना व इतर संबंधित व्यावसायिकांना विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचे प्रशिक्षण देण्याच्या कामातही ते कार्यरत होते.
विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राची निर्मिती व वृद्धी धर्मनिरपेक्ष आणि मानवतावादी जीवनतत्त्वज्ञानावर आधारित असल्यामुळे, डॉ. अल्बर्ट एलिस यांना ‘फ्री इन्क्वाइअरि’ या नियतकालिकाच्या उद्दिष्टांबद्दल आणि त्या नियतकालिकाच्या ‘धर्मनिरपेक्षता टिकून राहील काय?’ या विषयावरील विशेष-अंकाबद्दल आत्मीयता वाटणे साहजिकच होते. अखेर इतके सांगितले म्हणजे पुरे, की ‘अमेरिकन ह्यूमनिस्ट असोसिएशन्’ या धर्मनिरपेक्षतेला व मानवतावादाला वचनबद्ध असलेल्या संस्थेने; 1971 साली त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट मानवतावादी विचारवंत म्हणून डॉ. अल्बर्ट एलिस यांची निवड करून, त्यांना सन्मानित केले होते. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचा एक सिद्धान्त
विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचा एक मुख्य सिद्धान्त असा आहे, की माणसाच्या इच्छा-आकांक्षा—-अगदी तीव्र इच्छा-आकांक्षाही—-त्याच्या भावनिक प्रक्षोभाला क्वचितच कारणीभूत होत असतात. परंतु माणूस जेव्हा आपल्या मनातील इच्छा-आकांक्षांचे रूपांतर अविवेकीपणे कमालीच्या हट्टी व दुराग्रही मागण्यांमध्ये करतो, तेव्हा तो स्वतःला भावनिक-दृष्ट्या अस्वस्थ करून घेतो. उदाहरणार्थ, माणूस जेव्हा कळत नकळत आपल्या मनात असा दृष्टिकोण बाळगतो, की मी अंगीकारलेल्या कामात यशस्वी झालोच पाहिजे आणि माझ्या सभोवतालच्या निदान महत्त्वाच्या व्यक्तींची प्रशंसा व मान्यता मिळविलीच पाहिजे, तेव्हा तो स्वतःला चिंताग्रस्त व विमनस्क करून घेतो. होय, तो स्वतःच स्वतःला अशा तापदायक भावनांच्या झंझावातात ढकलून देतो.
धर्मनिरपेक्षतेचा व मानवतावादाचा मार्ग अनुसरणारा विवेकनिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ त्याच्याकडे मानसोपचार करून घेण्यासाटी आलेल्या लोकांना आणि स्वप्रयत्नाने स्वतःचे मानसिक आरोग्य सुधारून स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांना, मुख्यतः दोन गोष्टी शिकवितो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनातील भावनिक उद्रेक निर्माण करणारे हट्टी, एककल्ली, दुराग्रही, कडवे व हेकेखोर दृष्टिकोण कसे शोधून काढावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, त्या दृष्टिकोणांची वैज्ञानिक दृष्टिकोणातून छाननी करून, त्यांचे रूपांतर वास्तववादी व विवेकी दृष्टिकोणांमध्ये कसे करावे. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र असेही सांगते, की मानसोपचारतज्ज्ञ स्वतःही असा धर्मनिरपेक्ष व मानवतावादी दृष्टिकोण अंगीकारील, तर तो स्वतः व त्याच्याकडे येणारे मनोरुग्ण भावनिकदृष्ट्या कमी प्रक्षुब्ध होऊन जीवन अधिक आनंदाने व सर्जनशीलपणे व्यतीत करू शकतील. शिवाय, तो स्वतःला व इतरांना राजकीय, सामाजिक आणि आरोग्यविषयक प्र नांसंबंधी अधिक चांगल्या रीतीने साह्य करू शकेल.
विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या वरील प्रमुख सिद्धान्ताच्या आधारे एका उपसिद्धान्ताची मांडणी करता येते. तो उपसिद्धान्त असा, की मानसिक आरोग्याचे एक मुख्य लक्षण म्हणजे दृष्टिकोणांमधील लवचीकता. मानसिकदृष्ट्या सुदृढ असलेला माणूस कोणत्याही विचारांना मोकळ्या मनाने सामोरा जाण्यास तयार असतो. त्यामुळे कोणतीही एककल्ली, कट्टर विचारसरणी माणसाच्या दृष्टिकोणांमधील लवचीकपणा व परिवर्तनीयता नष्ट करण्यास हातभार लावून, त्याला हट्टी, दुराग्रही व असहिष्णु बनविते. कट्टर विचारांची अभेद्य झापडे एकदा डोळ्यांवर बसविली, की माणूस असहिष्णू न होईल तरच नवल. परिणामी त्याच्या मनातील दृष्टिकोणांची परिवर्तनीयता लयाला न जाईल, तरच आ चर्य! डॉ. अल्बर्ट एलिस यांचा प्रतिसाद विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या एका प्रमुख सिद्धान्ताची आणि त्यातून उद्भवणाऱ्या एका उपसिद्धान्ताची ओळख करून घेतल्यानंतर आता डॉ. अल्बर्ट एलिस यांनी श्री. पॉल कुर्ट्झ यांच्या आवाहनाला दिलेला प्रतिसाद समजावून घेण्यास हरकत नाही. श्री. पॉल कुर्ट्झ यांनी उपस्थित केलेल्या पहिल्या प्र नाला डॉ. अल्बर्ट एलिस यांनी गेली सुमारे चाळीस वर्षे ती उपचारपद्धती उपयोगात आणून माझ्याकडे येणाऱ्या मनोरुग्णांना त्यांच्या भावनिक अस्वास्थ्यावर मात करण्यास शिकवीत आलो आहे. त्यामुळे मला अत्यंत खेदाने असे नमूद करावे लागते आहे, की येत्या दहा वर्षांत धर्मनिरपेक्षतेला विरोधी असणाऱ्या उपचारपद्धतींमध्ये वाढ होत जाईल. धार्मिक व आध्यात्मिक पद्धतींचे लक्षावधी माणसे उत्साहाने स्वागत करतील. आणि अशी माणसे कोणत्यातरी गुरूंवर अथवा अतिमानवी शक्तीवर भार टाकतील. पण आपल्या समस्यांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोणातून विचार करण्यास राजी होणार नाहीत.
आता श्री. पॉल कुर्टझ यांनी विचारलेल्या दुसऱ्या प्र नाला डॉ. अल्बर्ट एलिस यांनी काय उत्तर दिले ते पाहू. ते म्हणतात, की मला अर्थातच असे वाटते की जर मानसोपचारतज्ज्ञ व सर्वसामान्य लोकही विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राकडे अगर तत्सम धर्मनिरपेक्ष आणि मानवतावादी मानसोपचारशास्त्राकडे वळतील, तर बरे होईल. पुढील दहा वर्षांत जर खरोखरच असे झाले, तर मला आनंद होईल. कारण विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र माणसाला असे शिकविते, की त्याचा भावनिक उद्रेक त्याच्या मनातील केवळ इच्छा-आकांक्षांमुळे—-अगदी तीव्र अशा इच्छा आकांक्षांमुळेही—-जन्माला येत नसतो. त्याच्या भावनिक उद्रेकाचे मुख्य कारण असे असते, की तो आपल्या मनातील इच्छा-आकांक्षांविषयी एक हेकट, एकांगी, दुराग्रही व हट्टी दृष्टिकोण आपल्या मनात बाळगून असतो. त्याच्या
मनातील अशा ताठर दृष्टिकोणामुळे तो स्वतःची अशी समजूत करून घेतो, की आपल्या मनातील इच्छा-आकांक्षांची पूर्ती झालीच पाहिजे. आणि त्याच्या ह्या दुराग्रही भूमिकेमुळे तो स्वतःला भावनिकदृष्ट्या अस्वस्थ करून घेत असतो. डॉ. अल्बर्ट एलिस यांच्या भाकिताचा आढावा
‘फ्री इन्क्वाइअरि’ या नियतकालिकाने 1992 च्या उन्हाळ्यात अमेरिकेतील धर्मनिरपेक्षतेचे भवितव्य या विषयावर जो विशेष-अंक प्रकाशित केला होता, त्याला आता दहा वर्षे होऊन गेली आहेत. तेव्हा डॉ. अल्बर्ट एलिस यांनी त्या विशेष-अंकात पुढील दहा वर्षांत अमेरिकेत धर्मनिरपेक्षतेची काय स्थिती झाली असेल याविषयी जे भाकीत वर्तविले होते, ते कितपत खरे ठरले आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी या संदर्भात अमेरिकेतील परिस्थितीविषयी जे भाकीत केले होते, ते अजाणता भारतातील परिस्थितीविषयीही कितपत खरे ठरले आहे, याचाही आपण विचार करू शकतो. आणि आपण तसा विचार केला तर सामान्यतः असा निष्कर्ष काढू शकतो, की अमेरिकेत आणि भारतातही धर्मनिरपेक्षतेला प्रतिकूल असणाऱ्या नाना त-हेच्या उपचार पद्धतींचा गेल्या दशकात जोमाने फैलाव झाला आहे. त्या उपचारपद्धती कोणत्यातरी तथाकथित आध्यात्मिक तत्त्वांवर आधारलेल्या असतात; नाहीतर त्या कोणत्यातरी बाबा, गुरू अथवा बापूंच्या दिव्यदृष्टीतून निर्माण झालेल्या असतात.
असहिष्णुता भयावह
यापूर्वी म्हटल्याप्रमाणे मानसिक आरोग्याचे एक प्रमुख लक्षण म्हणजे माणसाच्या विचारांमधील, दृष्टिकोणांमधील किंवा जीवनदृष्टीमधील लवचीकता. मानसिकदृष्ट्या निरोगी असलेला माणूस कोणत्याही नव्या कल्पनांना डोळसपणे सामोरा जाण्यास तयार असतो. उलट माणसाचे कोणतेही धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक विचार जेव्हा हट्टी, आत्यंतिक व एकांगी स्वरूप धारण करतात, तेव्हा माणूस परमताविषयी कमालीची असहिष्णुता दाखवू लागतो. आणि अशा कट्टर, कडव्या विचारसरणीतून उद्भवलेल्या असहिष्णुतेमुळे माणसाचे मानसिक आरोग्य साहजिकच धोक्यात येऊ शकते. माणसाच्या मनातील असहिष्णुतेच्या अशा प्रकारच्या दुष्परिणामांकडे आजवर विचारवंतांनी फारसे लक्ष दिलेले आढळून येत नाही.
डॉ. अल्बर्ट एलिस यांनी माणसाच्या मनातील हेकेखोर, कट्टर विचारांच्या वरीलसारख्या दुष्परिणामाचा ऊहापोह करण्यासाठी 1962 साली ‘द केस अगेन्स्ट रिलिजन—-अ सायकोथेरपिस्टस व्ह्यू’ नावाचा एक लेख प्रकाशित केला होता. परंतु काही वर्षांनी त्यांच्या असे लक्षात आले, की आपला मुख्य आक्षेप माणसाच्या धार्मिक विचारांवर नसून त्या विचारांमधील एकांगी, दुराग्रही, हट्टी व कट्टर असहिष्णुतेवर आहे हे अधिक स्पष्टपणे मांडावयास हवे. कारण सर्वच धार्मिक माणसे काही असहिष्णुतेच्या अधीन गेलेली नसतात. म्हणून आपला मुद्दा अधिक स्पष्टपणे मांडण्यासाठी त्यांनी 1983 साली आपल्या वरील लेखाची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली. त्या सुधारित लेखाचे शीर्षक आहे, ‘द केस अगेन्स्ट रिलिजॉसिटी’. या शीर्षकातूनच असे स्पष्ट होते, की त्यांची मुख्य कैफियत धर्माविरुद्ध नसून धर्मोन्मादाबद्दल आहे.
वरील सुधारित लेखातील मध्यवर्ती कल्पना अशी आहे, की माणूस केवळ धार्मिक असेल, तर त्याचे मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका संभवत नाही. परंतु तो जेव्हा आपल्या मनातील धार्मिक, राजकीय, सामाजिक किंवा इतर कोणत्याही मतप्रणालीला अट्टहासाने, उग्रपणे व अविवेकीपणे कवटाळून बसून कट्टरपंथीय होतो, तेव्हा त्याच्या दृष्टिकोणांमधील लवचीकता नष्ट होते. म्हणजे त्याची अशी धारणा होऊन बसते, की आपण स्वीकारलेली विचारप्रणाली म्हणजेच संपूर्ण सत्य आणि इतर कोणतीही विचारप्रणाली म्हणजे तद्दन असत्य! याचा परिणाम असा होतो, की तो आपल्या विचारप्रणालीच्या विरुद्ध असलेली विचारप्रणाली स्वीकारून जे लोक त्या विरुद्ध विचारसरणीनुसार जीवन जगतात, त्यांचा द्वेष व तिरस्कार करू लागतो. म्हणजे थोडक्यात असे म्हणता येईल, की माणसाच्या मनात कोणत्याही कट्टर विचारांचा अंमल जारी झाला, की त्याला आपल्यापुढील समस्येकडे वैज्ञानिक दृष्टिकोणातून पाहणे कठीण होऊन बसते. आणि म्हणून त्याच्या मनात खऱ्या अर्थाने परमतसहिष्णुतेला जागा उरत नाही. या कारणास्तव धर्मनिरपेक्ष व मानवतावादी मानसोपचारतज्ज्ञांनी अंतर्मुख होऊन, समाजात धार्मिक, राजकीय व सामाजिक सहिष्णुता जोपासण्यासाठी आपल्याला काय करता येईल, याविषयी चिंतन करणे हितावह ठरेल.
लवचीकतेचा वस्तुपाठ
अखेर एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वाचकांचे लक्ष वेधून घेऊन या लेखाचा समारोप करणे उचित होईल. आपल्या विचारांविषयी लवचीक दृष्टिकोण स्वीकारणे हे मानसिक आरोग्याचे एक प्रमुख लक्षण आहे, असे डॉ. अल्बर्ट एलिस म्हणतात. आणि ते आपल्या उक्तीनुसार स्वतःही कृती करतात. उदाहरणार्थ, त्यांनी 1962 साली एका मानसोपचारतज्ज्ञाची धर्माविरुद्ध कैफियत विशद करणारा लेख प्रसिद्ध केला खरा; परंतु त्यामुळे काही गैरसमज पसरण्याची शक्यता लक्षात आल्यावर आपल्या त्या लेखाला हेकटपणे चिकटून न राहता कालांतराने त्यांनी त्या लेखाची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली, हे आपण पाहिलेच आहे. तेव्हा अशा प्रकारे कृती करून त्यांनी आपल्या विचार-सरणीची लवचीकता वाचकांच्या प्रत्ययास आणून दिली!
44/डी/116 मनीषनगर, जयप्रकाश रोड, अंधेरी (प िचम), मुंबई — 400 053