काही दिवसांपूर्वी वाचनात आले की मानवी गर्भाला सुद्धा उचकी लागते. पुढे शास्त्रज्ञाचे मत दिले होते की ‘उचकी लागणे’ हा उत्क्रांतीचा एक टप्पा असू शकतो. त्याचा सखोल अभ्यास अजून व्हायचा आहे. वाचून मजाही वाटली अन् आ चर्यही. नंतर लक्षात आले की हे सोदाहरण सिद्ध व्हायला अनेक वर्षे लागतील. तोपर्यंत आपण कुठे असणार?
उत्क्रांती म्हणताच नाव समोर आले, ‘डार्विन’, आणि पुढे ‘बलिष्ठ अतिजीविता’, म्हणजे Survival of the fittest! पण मुळात डार्विनने ‘बलिष्ठ अतिजीविता’ ही संज्ञा वापरलीच नव्हती. त्याचे म्हणणे होते की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्राण्यांमध्ये एका विशिष्ट क्रमाने बदल होत असतात. वातावरणाशी किंवा पर्यावरणाशी जुळवून घ्यायला किंवा केवळ जगण्यासाठी असे बदल आवश्यक असतात. हे बदल काही एका रात्रीत घडून येत नाहीत. या क्रियेला अनेक वर्षे लागतात. मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आणि थोड्या सुधारणेसह त्यापुढच्या पिढीकडे असा ‘बदलांचा’ प्रवास सुरू असतो. या प्रक्रियेत पर्यावरणाशी किंवा निसर्गाशी जो सर्वांत लवकर जुळवून घेईल तो जगण्यास योग्य! डार्विनने यांसाठी ‘नैसर्गिक निवड’ (Natural selection) ही संज्ञा वापरली होती. नंतर स्पेन्सरने ‘नैसर्गिक निवड’ या संज्ञेच्या जागी ‘बलिष्ठ अतिजीविता’ ही संज्ञा वापरायला सुरुवात केली.
जीवाश्मांच्या अभ्यासाने असे लक्षात आले आहे की साठ दशलक्ष वर्षांच्या क्रमविकासी बदलांनंतर घोड्याला आजचे, पठारांवर वास्तव्यास योग्य, लांब मान, एकच अंगठा (toe) असलेले, शाकाहारी (गवत खाणारा) असे रूप प्राप्त झाले आहे. पूर्वी एके काळी घोडा हा कुत्र्याच्या आकाराचा, पाच बोटे असलेला प्राणी होता. डार्विनच्या मते ज्या प्राण्यांत किंवा जीवांमध्ये, त्यांच्या कोशिकांमध्ये (cell) विभिन्नता असते त्यांचीच नैसर्गिक निवड होते. तेच परिवर्तनास सक्षम असतात. तेच निसर्गातील चढ–उतारास तोंड देऊन तग धरू शकतात.
डार्विनने कधी क्रमा-क्रमाने (step by step) अशी परिवर्तने किंवा उत्क्रांती बघितली नव्हती. ते शक्यही नव्हते. पण 19 व्या शतकात उत्क्रांतीचे एक उदाहरण बघायला मिळाले ते ‘टायपिका’ नावाच्या पाकोळीचे. या पाकोळीचे पंख काळे–पांढरे आणि त्यांचे निवासस्थान म्हणजे दगडफुलांचे (lichens) आवरण असलेले झाडांचे बुंधे. त्यामुळे या पाकोळ्यांचे मायावरणही (camouflage) तसेच, झाडाला साजेसे. काही काळानंतर ‘कार्बोनेरिया’ नावाची, गडद (काळी) रंगाची पाकोळी प्रथमच दिसली. त्यांची एकूण संख्याही फारच कमी होती. पण 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत मँचेस्टर किंवा लिव्हरपूल सारख्या औद्योगिक शहरांत या पाकोळ्यांची संख्या फारच वाढली. आणि टायपिकाची संख्या कमी होत गेली. दोन्ही प्रकारच्या पाकोळ्यांच्या संख्येत लक्षणीय बदल झाला होता.
असे का झाले असावे?
शहरांच्या औद्योगिकीकरणामुळे कारखान्यांमधून सतत धूर निघायचा. धुराने झाडे काळी व्हायची आणि दगडफुले मरून जायची. काळी व्हायची. काळ्या झाडांवर गडद रंगाची कार्बोनेरिया पक्ष्यांना दिसायची नाहीत आणि म्हणून ती जगू शकली, तर फिक्या रंगाची टायपिका चटकन पक्ष्यांचे भक्ष्य ठरत असे, म्हणून त्यांची संख्या घटली. ही उत्क्रांती केवळ औद्योगिकीकरणामुळे झाली असल्याचे सिद्धच झाले आहे. कारण 1963 नंतर या शहरांत ‘क्लीन एयर लॉ’ लागू करण्यात आला. त्यानंतर कार्बोनेरियाची संख्या घटल्याचे नोंदले गेले आहे.
उत्क्रांती म्हणजे केवळ काही प्राण्यांची संख्या वाढणे आणि काहींची घटणे असे नव्हे. अनेकदा प्राणी कसे वागतील किंवा ‘विशिष्ट’ परिस्थितीत ‘असेच’ का वागतात यांची उत्तरेही उत्क्रांतीत सापडू शकतात. यांसाठी जमिनीत राहणाऱ्या एका अमीबाचे (एकपेशीय जीवांचे) उदाहरण पाहू. या जातीतील अमीबा एकटे राहणारे, मातीतील जीवाणूंवर जगणारे असतात. हे जीवाणू जेव्हा कमी होतात किंवा अमीबांची जेव्हा उपासमार होऊ लागते तेव्हा नवीन निवासक्षेत्र शोधून तिथे रहायला जाणे हा सोपा उपाय/पर्याय अमीबाला उपलब्ध असतो. पण वैयक्तिकरीत्या ते असे करू शकत नाहीत. म्हणून मग जिवंत राहण्यास ते एका प्रवस्थेतून जातात. सगळे अमीबा रासायनिक संदेशाने एकत्र येतात. त्यांच्यातील काही पेशी मृत होतात. हा एक प्रकारे परहितवाद (altruism) असतो. या अचेतन पेशींवर अनेक बीजाणू (spores) जगतात. बीजाणूंची रचना अशी असते की ते दूरवर विखुरले जाऊ शकतात. नवे निवासक्षेत्र शोधणे त्यांना फार अवघड नसते. नव्या जागी गेल्यावर बीजाणूंचे एकपेशीय अमीबा होतात. आणि जीवनचक्र सुरू राहते. अमीबा एकत्र येण्याचे कारण काय, यासाठी दोन वेगळी कारणे सांगितली जातात. क्रियावैज्ञानिकांच्या (physiologist) मते उपासमार झाल्याने अमीबा सायक्लिक अॅडिनोमोनोफॉस्फेट नावाचे रसायन सोडतात. या रसायनाने ते एकमेकांकडे आकृष्ट होतात आणि मग पुढची क्रिया सुरू होते. उत्क्रांतीचे अभ्यासक म्हणतात की सगळ्याच अमीबा कोशिकांकडे रसायनाने आकृष्ट होऊन एकत्रित येण्याची क्षमता नसते. ज्यांच्याकडे अशी क्षमता असते त्यांच्यातले बीजाणू नवीन निवासक्षेत्री जाऊ शकतात. अर्थात् ज्यांच्याकडे अशी क्षमता असते तेच जगतात. त्यांचीच जगण्यास ‘नैसर्गिक निवड’ होते.
सैबेरियन क्रौंचांच्या स्थलांतराचे वि लेषणही अशाच पद्धतीने केले जाते. क्रिया वैज्ञानिक याचे कारण देतात की उत्तर अक्षांशात दिवस लहान होतो आहे हे तृतीयनेत्र ग्रंथीच्या (pineal gland) लक्षात येते. त्यामुळे संप्रेरकांमध्ये बदल घडून येतो आणि पक्ष्यांमध्ये स्थलांतराचा आवेग निर्माण होतो. दक्षिण अक्षांशात हिवाळा उत्तरेपेक्षा सौम्य असतो तेव्हा तिथे जिवंत राहण्याची शक्यता जास्त असते म्हणून स्थलांतर घडून येते. अशावेळी स्थलांतरादरम्यान काही नुकसान झाले तरी ते नगण्यच असते असे मत उत्क्रांतीचे अभ्यासक व्यक्त करतात. प्राण्यांची जगण्याची, वागण्याची, विशिष्ट कालावधीतच विशिष्ट संकेत देण्याची कारणे उत्क्रांतीतही सापडतात. नैसर्गिक निवडीवर ती अवलंबून असली तरी ‘नैसर्गिक निवड’ फक्त एका विशिष्ट स्तरावरच काम करते असे नव्हे. डीएनए, जनुके, कोशिका, कोशिकांगे, अवयव, प्राणी, प्राणीसमूह अशा आणि अनेक ऊर्जा प्रतलांवर कार्य सुरू असते.
जगण्याच्या शक्यता जरी नैसर्गिक निवडीवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असल्या तरी मोठ्या प्रमाणावर जनुकीय चलनशीलता असल्याशिवाय उत्क्रांतीय बदल घडून येत नाहीत. जगण्याची धडपड तर कोणीच सोडत नाही. जगण्यासाठी, निवासक्षेत्रांसाठी फार तीव्र स्वरूपाच्या स्पर्धांना प्राणी सतत समोरे जात असतात. विविध ऊर्जा पातळ्यांवर या स्पर्धा होत असतात. जगण्यासाठी अनेक उपाय शोधले जातात. अनेक अनुयोजना (adaptations) स्वीकारल्या जातात. कधी त्यात परहितवाद असतो, कधी परजीविता तर कधी सहजीवन असते. हा सुद्धा अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय आहे.
असे असले तरी क्रियाविज्ञानाकडे किंवा शरीरातील रसायनांकडे, त्यांच्यातील बदलांकडे आणि रसायनांतील बदलांमुळे शरीरात किंवा स्वभावात, वागण्यात जे बदल होतात त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उत्क्रांतीने बदल घडून येतात पण सगळ्याच बदलांकडे ‘उत्क्रांति’ म्हणून बघणेही योग्य होणार नाही. रसायनांमुळे सूक्ष्मातिसूक्ष्म बदल घडून येतात आणि त्यावरच वागणे–बोलणे–स्वभाव इ. अवलंबून असते. ‘उत्क्रांति’ जरी अनेक बदलांचे स्पष्टीकरण देऊ शकत असली तरी अनेकदा रासायनिक समीकरणे जास्त समर्थपणे बदलांचे वि लेषण करू शकतात. तेव्हा उत्क्रांतीच्या संदिग्धतेत अडकायचे की क्रिया विज्ञानाचा अभ्यास करून परस्पर मेळ साधून विज्ञानाच्या अधिक जवळ जायचे हे विचार करूनच ठरवावे लागेल.