विज्ञानाचे स्वरूप सांगणारा विशेषांक फारच चांगला झाला आहे. त्यात दिलेली माहिती प्रत्येक सुविद्य माणसाला माहीत हवीच.
सामान्य माणसाच्या जीवनात मात्र विज्ञान फारसे शिरत नाही. त्यातले काही न समजताही तो फोनची बटने दाबून, स्कूटरला किक मारून, कम्प्यूटरचा ‘उंदीर’ चालवून आपला कार्यभाग साधत असतो. त्याची बुद्धी स्थल-काल, द्रव्यगुण या पारंपारिक संकल्पनांशी जुळलेली असते. या सर्वच कल्पना जिथे विलय पावतात, ऊर्जेचा पुरावा असतो पण द्रव्याचा पुरावा नसतो, तरीही गुरुत्वाकर्षण शक्ती असते, स्थल-काल हे स्वतंत्र पदार्थ नसून ते एका जटिल गणिती संबंधाने जुळलेली कशाचीतरी रूपे असतात अशा ‘नेति, नेति’ कल्पना सामान्य मनुष्याच्या पचनी पडत नाहीत. त्या त्याने मानायच्या म्हणजे अंधश्रद्धेचेच एक रूप होईल. Uncertainties च्या पातळीवर विज्ञान त्याच्या मनात गोंधळच निर्माण करील. अंधश्रद्धानिर्मूलनाकरता त्याला विज्ञानाच्या जुन्या certainties देणेच उचित होईल.
ते विज्ञान समजल्यावरही माणसाला जीवनाची दिशा पूर्णपणे सापडत नाही. विज्ञान थोडेबहुत समजल्यावर तो सूर्याला अर्घ्य देणार नाही, मृतांना पिंड देणार नाही, राहुकाळ अमंगल मानणार नाही इतकेच. त्याचे प्राणिजीवन जुन्या आहार-निद्रा-भय-मैथुन या चौकटीतच चालू राहणार. ‘माणूस’ म्हणून जगण्याकरता त्याला जी मूल्ये जोपासायची असतात, भावनांना जी दिशा द्यायची असते, सौंदर्य पाहावयाला शिकायचे असते, या सगळ्याचा तात्त्विक आधार त्याला विज्ञानातून मिळत नाही. तर्कशास्त्रातूनही मिळत नाही. कारण तर्कशास्त्र ही कोणत्यातरी आधारभूत गृहीतकृत्यावर करायची प्रक्रिया आहे. प्रक्रियेतून आधार सापडत नाही मग जीवनाची दिशा सापडायची कशी? यावर अनेकांनी अनेक विचार मांडले आहेत. त्या चर्चेत इथे शिरणे अप्रस्तुत होईल.
भ.पां. पाटणकर, 3-4-208,काचीगुडा, हैदराबाद — 500 027
14.10-11 ह्या विशेषांकात जरी सर्व शास्त्रशाखा समाविष्ट झाल्या नसल्या तरी हरकत नाही. कारण विज्ञान, विशेषतः वैज्ञानिक विचारसरणी सामान्य जनांपर्यंत नेण्याचे महत्त्वाचे कार्य त्याने साधले आहे. बऱ्याच वेळा माणूस कठीण समस्येचे उत्तर ‘क्ष’ मानून स्वतःचे समाधान करतो. तो ‘क्ष’ आत्मा/देव/सैतान/दैव काहीही असू शकते. ही फक्त पळवाट आहे./ किंवा अतिसुलभीकृत उत्तर आहे. पण समस्येचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे कारण त्यामुळेच प्रगती साधेल व आज ‘हाताबाहेर’च्या गोष्टी उद्या ‘हातचा मळ’ होऊ शकतील. या प्रक्रियेतून काढलेले उत्तर हे सध्याच्या आकलनाच्या व ज्ञानाच्या स्तरावर अवलंबून असेल. परिणामी कालपरत्वे या उत्तराचा देखील फेरविचार करावा लागेल. कोणत्याही उत्तरास व समजुतीस कायमचे चिकटून बसणे उचित नाही. यामुळे सर्व शास्त्रीय/ धार्मिक विचारांची पुनर्मांडणी होणे जरूर. यासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास, आकलन, पृथक्करण करण्याची सवय सामान्यांपर्यंत पोचली पाहिजे. यांतील ‘शास्त्रीय’ शब्दांत फक्त भौतिकशास्त्रासारख्या शाखा अंतर्भूत नसून तार्किक विश्लेषक दृष्टी गृहीत आहे; व ही प्रक्रिया सामाजिक आर्थिक व वर्तनाबाबतच्या समस्या सोडविण्यास उपयुक्त आहे.
बऱ्याच वेळा विज्ञान (science) व ज्ञान (arts, humanities, अध्यात्म) या दोन गोष्टी परस्पर विरोधी असल्याचे भासविले जाते. हा व्यर्थ उपद्व्याप काळाचा व शक्तीचा अपव्यय आहे. या दोन्हीमध्ये भिंत नाही. Unbiassed logical thinking व analysis नंतर याचे मर्म ध्यानी यावे. केवळ अध्ययनाच्या सोयीसाठी व उपयोजितेनुसार विषय वेगळेपणाने मांडले जातात. वस्तुतः सर्व ज्ञानसाधना एकसंधच आहे ही भावना रुजली पाहिजे. या अंकातील मिलिंद वाटवे यांच्या लेखाबद्दल — एप्रिल 02 च्या आजचा सुधारक अंकात माझा ‘वैसार्थ’ हा निबंध प्रकाशित झाला. या दोन्ही निबंधांचा theme तोच असून ‘वैसार्थ’ मध्ये मी ‘आत्मा नाही’ या बीजास अनुसरून होणारे सामाजिक परिणाम/फायदे व परिवर्तन नमूद केले आहेत. त्यास अनुसरून ‘परमार्थ’ यास पर्यायी असा वैसार्थ’ हा सामाजिक परिवर्तनाचा विचार सुचविला आहे.
श्रीधर दामोदर मेहेंदळे, 15, मेघदूत, टिळक नगर, डोंबिवली (पूर्व) — 421 201
माझ्या लेखावर दि. य. देशपांडे यांची प्रतिक्रिया वाचली. (नोव्हें 2003) मानवेतर प्राण्यांना यातना होत नाहीत या गृहीतावर माझी प्रामुख्याने भिस्त आहे असे देशपांडे म्हणतात. परंतु माझ्या लेखात वैज्ञानिक काय म्हणतात, कोणते संशोधन चालू आहे याचा फक्त उल्लेख आहे, ते माझे म्हणणे नाही. वैज्ञानिक जगतात प्राण्यांना यातना होतात काय याविषयी वादविवाद होत आहेत हे मी ही नमूद केले होते. माझ्या युक्तिवादाची मुख्य भिस्त प्राण्या-प्राण्यांमध्ये त्यांच्या मानसिक क्षमतांनुसार भेद असतो. आणि त्यांच्यामध्ये एक श्रेणीबंध (hierarchy) आढळतो यावर होती. त्याची उदाहरणे ही मी माझ्या लेखात दिली आहेत. निसर्गातील बहुतांश प्राण्यांना हळूहळू, घुटमळत, यातनामय मरण येते ही वस्तुस्थिती आहे आणि वन्य प्रदेशात राहणारे फारच थोडे प्राणी त्यांच्या उतारवयापर्यंत पोहचतात. कृमि-कीटकांना न मारता मनुष्याला जंगलातच नव्हे तर इतरत्रही एक पाऊल ही पुढे टाकता येणार नाही. डास, उंदीर, झुरळे, ढेकूण इ. अपायकारक ठरणाऱ्या प्राण्यांना न मारता जगणे मानवाला अशक्य आहे म्हणन जेम्स रचेलस ह्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाने जो यक्तिवाद केला आहे त्यावर माझी जास्त भिस्त आहे.
टी. बी. खिलारे, 23/7 शिंदे नगर बावधन पुणे — 411 021
उंबरठा हा बोलपट एक वास्तवदर्शी कलाकृती आहे. त्यापासून प्रेरणा काय मिळेल ते पाहाणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. सध्याच्या समाजघडीत स्त्रीने उंबरठा ओलांडून समाजकार्य करण्याच्या भलत्या भानगडीत पडू नये अशी प्रेरणा घेतली जाण्याचा संभव जास्त. याउलट ज्यांनी समाजकार्यात पडून आपले हात भाजून घेतले आहेत अशांना मात्र हा बोलपट समदुःखी भेटल्याचा आनंद देईल. त्यांना दिलासा मिळेल असे या बोलपटांत काही नाही. सुनीती देव यांनी ‘उंबरठा’च्या निमित्ताने ‘जर-तर’च्या स्वरूपाचे प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरे देत बसत नाही. परंतु त्यांच्या प्रश्नांच्या दुसऱ्या बाजू काय असू शकतील ते ध्यानात आणून देण्याचा प्रयत्न करतो.
1. सासूला स्वतःची भूमिका हट्टी वाटत नसणार. तिला प्रामाणिकपणे वाटू शकते की सर्वंकष हित सुनेने घरच्या संस्थेत समाजकार्याचे काम करण्यात आहे. (सुनेच्या आयुष्यांत पुढे घडलेल्या घटनांमुळे असे वाटणे वावगे नसल्याचे सिद्ध होते.) यामागे आपण निवृत्त व्हावे व तरुण सुनेला वाव द्यावा असाही विचार असू शकेल. आपण सासूच्या, घरच्यांचा वागणुकीवर एकाधिकारशाही, असमंजस, हट्टी असे छाप का मारायचे?
2. करिअर या शब्दाचा अर्थ मी कारकीर्द असा समजतो. कर्तबगार गृहिणी हीसुद्धा एक कारकीर्द असू शकते. विवाह करतेवेळी परस्परांकडून काय अपेक्षा होत्या हे महत्त्वाचे आहे. प्राधान्याने पत्नीने घराबाहेर लक्ष द्यावे अशी अपेक्षा असेल व पत्नीलाही ती मान्य असेल तर? नंतर स्त्रीच्या मनास येईल तेव्हाही परस्पर अधिकार आहे काय?
3. सुलभा पदवीधर झाली म्हणजे ती विशीची—फार तर लग्न होईपर्यंत पंचविशीची असू शकते. इतक्या तरुण मुलीला मी तरी प्रौढ म्हणायला तयार नाही. पदवी मिळाली म्हणजे व्यवहारातले खाचखळगे समजतात असे मानण्याचे कारण नाही. शिकताना अभ्यास करताना सामाजिक संस्थांची गोंडस रूपे दिसतात. संस्थाचालक तीच विद्यार्थ्यांना दाखवतात. संस्थेतले अंतःकलह, त्यांची उग्रता लक्षात आणून देणारी काकदृष्टी विद्यार्थ्यांना शिकविली जात नाही. मुंबईकर सुलभाने खेड्यातल्या वातावरणांत ठोकरा खाल्या नसत्या तरच नवल! खेडे म्हणजे भाबडे-भोळे असे समजण्याचे काहीच कारण नाही. आत्ताचे सगळे राजकारणी खेड्यातूनच आले आहेत. उदारणार्थ शरद पवार- बारामती. प्रमोद महाजन मराठवाड्यातल्या कुठल्या तरी खेड्यांतले आहेत. शिवसेना तेवढी मुंबईकर शहरी म्हणता येईल. द.मा. मिरासदार, विजय तेंडुलकर, स्वा. सावरकर यांना त्यांच्या लेखनांत खेड्यातील माणसांचा बेरकीपणा भरपूर दाखवलेला आहे.
4. सुलभा नोकरीत अपयशी आहेच. वाईट याचे वाटते की ती कार्यकर्ती म्हणूनसुद्धा अपयशी ठरली. तिथल्या समस्यांना तोंड देऊन संस्थेला स्वतःचे काही योगदान करू शकली नाही. पण असा नायिकेची शोकांतिका दाखविणारा चित्रपट काढूच नये असे म्हणता येणार नाही. विजय तेंडुलकरांच्या एक हट्टी मुलगी या नाटकाची नायिका देखील अशी पराभूतच आहे. सुलभा ही नायिका खचलेली मात्र दाखवलेली नाही. नोकरी, कार्यकर्तेपण, संसार सर्व ती उंबरठ्याबाहेरच्या असुरक्षित जगाकडे वाटचाल करू लागते. हे स्पृहणीय वाटते.
5. सुभाष सुलभाची आश्रमातली व्यस्तता समजून घेत नाही असे का म्हणायचे? उलट त्याला ती चांगली समजलेली आहे. म्हणूनच तर तो चार दिवसांचा मुक्काम दोन दिवसांत गुंडाळतो. सुलभाला जर तिच्या स्वतःच्या कारकीर्दीसाठी घरातल्या सर्वांची मते दुखावून उंबरठा ओलांडण्याचा अधिकार असेल तर, सुभाषला त्याला नको असलेले वातावरण सोडण्याचा का नाही? सासू वागते तो हट्टीपणा व सून वागते तो घट्टपणा असे ठरवूनच टाकायचे का? उंबरठा बोलपट यथार्थ आहे. सुनीतीबाईंच्या प्रतिक्रिया अभिनिवेशपूर्ण आहेत.
रवीन्द्र खडपेकर, 20,पार्वती, पाटीलवाडी, सिद्धेश्वर तलाव मार्ग, ठाणे — 400 601
ऑक्टोबर 2003 च्या अंकात टी. बी. खिलारे यांचा लेख आणि नोव्हेंबरच्या अंकात गेल व्हाइन्स यांचा लेख वाचून आश्चर्य वाटले. बर्नार्ड-हर्स्ट यांनी उत्क्रांतीची मूलभूत संकल्पनाच चुकविली आहे. स्वतःला टिकविणे हा उत्क्रांतीच्या लढ्याचा अत्यावश्यक भाग आहे. ‘स्वतःला धोका झाला आहे’ याची प्राथमिक सूचना वेदनेमुळेच होत असल्यामुळे वेदना ही जाणीव जीवनावश्यक आहे. जे गुणधर्म सजीवाची प्रजा वाढवतात तेच उत्क्रांतीमध्ये टिकतात, म्हणून उत्क्रांतीमध्ये टिकलेल्या प्राण्यांना वेदना होणारच. या एका मुद्दयावरच बर्नार्ड-हर्स्ट यांचे विचार आणि खिलारेंच्या लेखातील एक भाग बाद ठरतात.
‘प्राण्यांच्या दृष्टिकोनातून एखादे दृश्य वेगळे दिसू शकते’ हे बर्नार्ड-हर्स्ट यांचे म्हणणे गैरलागू आहे. ‘तोंडात टाकण्याआधी साखर खारट असते’ असा दावा करण्यासारखे हे आहे. ज्या वस्तूचे अस्तित्व मानवाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गांनी कधीच कळणार नाही. ती वस्तू अस्तित्वातच नाही असे जाहीर करायचे असते. अशास्त्रीय लेखन आ.सु.मध्ये वाचून मला फार वाईट वाटले. आजच्या अन्नसाखळीत तरसाला सिंहाने खाणे मान्य असून तरसाला वेदना होत नाहीत, असे म्हणायचे झाले तर म्हाताऱ्या सिंहाला तरसाने खाल्ले की सिंहाला वेदना होतील की नाही? सिंह, मगरीने माणसाला खाणे अन्नसाखळीत बसले पाहिजे कारण माकडांना हे प्राणी खातातच. मग मानवाला वेदना होतात की नाही? पाड्यातील मुलांवर अभयारण्यातील बिबळ्यांनी हल्ले केले तर त्या मुलांना आत्मिक समाधान मिळते काय?
तसेच सामाजिक व्यवहारात मानसिक, आर्थिक, (दलित, स्त्रिया इत्यादींचे) सामाजिक शोषण होते. माणूस स्वतः निसर्गाचा भाग असला तरीही मानवाने हा निसर्गनियम एकमेकांना लावणे चूक आहे असे सुसंस्कृत समाजाचे मत आहे. ‘निसर्गनियमानुसारचे शोषण होताना शोषिताला यातना होत नाहीत’ असे मानले तर मानसिक, आर्थिक, सामाजिक शोषणाला खतपाणी मिळेल. शेकडो वर्षे शोषण झाल्यावर उत्क्रांतीने स्त्रिया किंवा दलितांमध्ये शोषणाची आवड तयार झाली काय?
वेदनारहित हिंसाचार कोणाला मान्य आहे? प्रयोगशाळेत प्राण्याला वेदनारहित मृत्यू देताना फक्त त्याच्या मेंदूचा शरीराशी संपर्क तोडलेला असतो. त्याच्या मेंदूच्या वेदना बाहेर दिसत नाहीत आणि हे बघणाऱ्या माणसाच्या भावनिक वेदना थांबतात. ऑक्टोबर 2003 च्या अंकाच्या संपादकीयात दिले आहे, “मानवी जीवनात … सामाजिक दुष्परिणाम … आ. सु. चे मुख्य कार्य … इ.” मानवी फायद्यासाठी (फायदा म्हणजे भौतिक फायदा — भावनिक फायदा नव्हे) प्राण्यांना क्लेश दिले तर मानवी जीवनात काय दुष्परिणाम होतात? प्राणी कधीही बंड करणार नाहीत उलट इतर माणसांशी कसे वागू नये याचे प्रत्यक्ष उदाहरण प्राणी आहेत.
ऑक्टोबरच्या अंकातील खिलारे यांच्या लेखाविषयी अन्नसाखळीत प्रथिनांची उधळपट्टी होण्याचा जो दावा केला जातो तेवढी उधळपट्टी वास्तवात मांसाहाराने होत नाही हे सिद्ध करणारी आकडेमोड अभिनंदनास्पद आहे. पण असले प्रयत्न फोल आहेत. अन्नसाखळीत ऊर्जेची (कॅलरीची) उधळपट्टी प्रथिनांच्या उधळपट्टीपेक्षा आधिक असते. म्हणूनच अन्नसाखळी पिरॅमिड आकाराची असते. पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा बघता, एन्ट्रॉपीच्या दृष्टीने या विषयातील उधळपट्टी ही संकल्पनाच फोल असल्याचे मी ऑगस्टच्या अंकात लिहिले आहे. त्याविषयी हवे तर विस्ताराने लिहीन. ‘स्व’ चे अस्तित्व मानणे, ‘स्व’ चा आणि वेदनेचा संबंध फक्त मज्जासंस्थेशीच जोडणे मानव-माकड-उंदीर-माशी अशी उतरंड लावणे, भावनाप्रधान आहे. विवेकी नाही. वनस्पतींच्या भावना, यातनांची व्याख्या, उतरंडीची अवास्तवता, वनस्पतीनीही प्राण्यांचे शोषण करणे इ. विषयी मी ऑगस्टमध्ये दिले आहे. एखाद्या प्रजातीची कत्तल करायची की नाही या प्रश्नाचे उत्तर शोधताना, प्रजातीच्या अस्तित्वाचे आणि कत्तलीचे मानवी समाजाला होणारे फायदेतोटे विचारात घ्यावेत असे मला वाटते. त्यावर शोषणाची उतरंड रचावी. त्यांचे अन्नसाखळीतील, उत्क्रांतीमधील स्थान हे दुय्यम मुद्दे आहेत. ता.क. उत्क्रांती आणि वेदनांचा बादरायण संबंध असा लावता येईल.
प्रोकॅरिऑट (prokaryote) सजीवांना (उदा. जीवाणू) ऊर्जेसाठी ग्लुकोजचा वापर ऑक्सिजनशिवायच करावा लागतो. ग्लुकोजमधील बरीच ऊर्जा या प्रक्रियेत वाया जाते. युकॅरिऑट (eukaryote) सजीवांना, म्हणजे अमिबापासून माणसापर्यंत सर्वांना ऑक्सिजनचा वापर करता येतो कारण त्यांच्या पेशीमध्ये तंतुकणिका (mitochondria) हा भाग असतो. एका अनुमानानुसार पूर्वी तंतुकणिका हे स्वतंत्र जगणारे सजीव होते. ज्या प्रोकॅरिऑटनी तंतुकणिकांना स्वतःमध्ये आसरा आणि अन्न दिले त्यांना ग्लुकोजचा कार्यक्षम वापर करता आला आणि युकॅरिऑटची वाढ वेगाने झाली. अशाच प्रकारे पुरातन (primates) पासून मानव तयार होताना त्याने अनेक विषाणूंना पेशीकेंद्रकात आसरा दिला. ज्यांना उपयुक्त विषाणू मिळाले त्यांच्यापासून आजचा मानव बनला. अशाच प्रकारे एका अनुमानानुसार काही शतकांनी कुष्ठरोगाचे जीवाणू मानवी पेशीचा अविभाज्य भाग बनू शकतील. कुष्ठरोगाच्या रुग्णांना संवेदना जाणवत नाहीत. वेदनांचा नाश किंवा इतर काही गुणधर्म जर मानवाला फायदेशीर असेल तर असे मानव निश्चितच टिकून राहतील.
निखिल जोशी, तत्त्वबोध, हायवे, चेकनाक्याजवळ (रायगड) — 410 101
आसुच्या जाने-फेब्रु 2004 च्या विशेषांकातील ‘भौतिकशास्त्रातील अनिश्चितता तत्त्व’ या लेखातील काही भागाची चर्चा मी त्याच अंकातली ‘आजचे विज्ञान व अध्यात्म’ या लेखात केला आहे. स्टीफन हॉकिंग यांच्या ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम’ या पुस्तकाच्या ‘काळाचा छोटासा इतिहास’ या शीर्षकाने केलेल्या माझ्या अनुवादित पुस्तकातील (मौज प्रकाशन, 2003) एक परिच्छेद त्या लेखात उद्धृत केला आहे, तो या संदर्भात बोलका आहे. कण मानल्यामुळेच अनिश्चिततेचा उगम होतो, कदाचित असतील त्या केवळ लहरीच असतील, असा त्या अवतरणाचा भावार्थ आहे.
कण-लहर द्वित्व, अनिश्चितता तत्त्व, निश्चितता—संभाव्यता, यांची सैद्धांतिक—-गणितीय—- संख्याशास्त्रीय स्पष्टीकरणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतीलही; परंतु (एका वेगळ्या संदर्भात) निश्चितता व संभाव्यता या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा असू शकतात, ते नाणेफेकीच्याच साध्यासोप्या उदाहरणावरून पाहणे शक्य आहे. नाण्याच्या नेमक्या कोणत्या बिंदूवर, कोणत्या दिशेने व किती जोराने टिचकी मारली हे समजले, तर न्यूटनीय रिजिड-बॉडी-डायनॅमिक्सचे नियम वापरून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाखाली नाण्याचा पुढील सर्व प्रवास कसा होईल, व शेवटी छाप पडेल की काटा, हे सांगता येईल हे निश्चित. (गणित अवघड, पण शक्य कोटीतले; संगणकप्रणाली वापरून सुकरही होईल.) म्हणजेच या एका प्रयोगाचे फलित निश्चितपणे सांगण्याजोगे आहे. अर्थातच, असे ओळीने कितीही प्रयोग केले, तरी त्यातील छाप किती पडतील व काटे किती, त्याचेही निश्चित भाकीत करता येईल.
पण असे जितके जास्त प्रयोग करावेत, तितक्या त्यातल्या छाप-काट्यांच्या संख्या अधिकाधिक सम्पन्न होऊ लागतात; दुसऱ्या शब्दांत म्हणजे त्या संख्या समान असण्याची संभाव्यता वाढत जाते, हे आपल्यापैकी बहुतेकांना संख्याशास्त्राचा सुरुवातीचा भाग म्हणून माहीत आहे. म्हणूनच, व्यवहारात जर आपल्याला फार मोठ्या संख्येने होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांच्या समुच्चयातच रस असेल, तर प्रत्येक घटनेसाठीच्या निश्चित परंतु अवघड विश्लेषणाची कास सोडून आपण संभाव्यता-संख्याशास्त्र यांचा वापर करतो, इतकेच. 2. जीवशास्त्रातील आजच्या प्रगतीविषयी फार महत्त्वाची माहिती याच अंकातील ‘आत्मा हवा का?’ या मिलिंद वाटवे यांच्या लेखातून मिळाली. परंतु ‘आजचे जीवशास्त्र . . . सजीव पूर्णतः भौतिक-रासायनिक नियमांवरच चालतात ही गोष्ट ठामपणे मांडते’ असा त्यांनी काढलेला सारांश मात्र, लेखातील चर्चेच्या अनुरोधाने पाहिले तर डळमळीत पायावर आधारलेला आहे. रचनाच सजीव पेशींचे नियंत्रण करते हा लेखातला प्रमुख निष्कर्ष आहे. या निष्कर्षाप्रत ते मुख्यतः दोन प्रकारे पोचतात. एक, विजेवर चालणाऱ्या यंत्राविषयीचा ‘तर्क जसाचा तसा’ निव्वळ शून्य अंशाजवळ गोठवलेल्या पेशीसाठी वापरून; आणि दोन, पेशीच्या रचनेतील बदलाबरोबर गुणधर्मातही बदल होतात या निरीक्षणावरून. वास्तविक, यंत्राची रचना माणसाने केलेली असते. बटन दाबले म्हणजे विजेचा दाब (पोटेन्शियल डिफरन्स) निर्माण होतो, व त्यामुळे इलेक्ट्रॉन्सचा जो प्रवाह सुरू होतो, तो वीजप्रवाह. या प्रवाहाचा उपयोग विशिष्ट कार्यासाठी करून घेण्याच्या उद्देशानेकोणत्याही यंत्राची रचना केलेली असते. पेशीची मूळ रचना माणूस करीत नाही हे तर नक्की ! तिच्यात नेमके कोणकोणते घटक आहेत याचे संपूर्ण ज्ञानही माणसाला अजून झालेले दिसत नाही. बाहेरून ऊर्जा दिली म्हणजे पेशीतील नेमके कोणते घटक (यंत्रातल्या इलेक्ट्रॉन्ससारखे) कार्यान्वित होतात हे माहीत आहे? दोन अंश निव्वळ तापमानाला ‘पेशीमध्ये रचना होती, पण ऊर्जा, कार्यशक्ती जवळजवळ शून्य होती असे लेखक म्हणतात (पृ. 397). यातील ‘जवळजवळ’ या शब्दाने मला, कडाक्याच्या थंडीत हायबरनेशनमध्ये कित्येक महिने राहणाऱ्या (पुष्कळ गुंतागुंतीच्या शरीररचना असणाऱ्या) प्राण्यांची आठवण झाली. मोजता येणे कठीण अशा हृदयस्पंदनांच्या आधारे, इतर सर्व शरीरक्रिया थंडावलेले ते प्राणी ‘जवळजवळ’ मृतावस्थेत पडून असतातच ना? दोन निव्वळ अंशांपर्यंत थिजलेल्या पेशींत उपलब्ध उपकरणांना मोजता न येणारे कोणतेच ‘स्पंदन’ चालू नसेल असे ठामपणे कसे म्हणता येईल? बाह्य ऊब मिळाल्यावर हायबरनेशनमध्ये तेला प्राणी ‘जागा’ होऊन आपले नेहमीचे व्यवहार करू लागतो, अगदी तशीच बाह्य ऊर्जेने ती पेशी पुन्हा ‘जागी’ कशावरून होत नसेल? लक्षात घ्या, हे जागे होणे केवळ भौतिक प्रक्रिया असणार. असेच वाटव्यांप्रमाणेच मीही मानतो, पण त्याचे कारण त्यांच्याप्रमाणे केवळ पेशीच्या रचनेतच साठवलेले आहे असे (निदान लेखकाने पुरवलेल्या सर्व माहितीच्या आधारे) मानणे मला रास्त वाटत नाही. ते कारण दोन अंशावरही शिल्लक असलेल्या पेशीच्या ‘जिवंत’पणातच साठलेले असले पाहिजे. तो जिवंतपणा म्हणजे तथाकथित ‘आत्मा’ आहे का, हाच लेखातील कळीचा प्रश्न आहे. तसा असल्याचा काहीच भौतिक पुरावा अजून मिळालेला नाही; त्याचप्रमाणे तो ‘जिवतं’पणा नेमका कशात (कोणत्या भौतिक गोष्टीत साठलेला आहे, ते जीवशास्त्राला अजून कळलेले नाही; असेच निष्कर्ष या चर्चेतून मी काढतो. पैकी दुसरा निष्कर्ष बदलावा लागेल तो सुदिन.) रचनेतील बदलाबरोबर पेशीचे गुणधर्मही बदलतात; आणि अशा प्रकारच्या आणखीही काही उदाहरणांवरून पेशीची रचनाच पेशी सजीव बनवते आणि त्यासाठी ज्ञान भौतिक–रासायिनक घटकांखेरीज दुसऱ्या कुठल्याही शक्तीची गरज नाही (पृ.400) हे कसे काय ठरते? रचनेच्या बदलाबरोबर यंत्राचे गुणधर्मही बदलतातच, म्हणून काही यंत्र सजीव आहे असे ठरत नाही.
पृ.400, परिच्छेद 4 मधील केंद्रीभूत वाक्य ‘जर हा आत्मा भौतिक नसेल, तर त्याला भौतिक गोष्टींचे नियंत्रण करता येणार नाही’ हे (पुरावाविरहित) विधानही ‘बेगिंग द क्वेश्चन’ या प्रकारचे वाटते. कारण सर्व भौतिक गोष्टींच्या पलीकडे असलेला (‘नेति, नेति’) आत्माच (वेगवेगळ्या संदर्भात ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा इत्यादी नावांनी संबोधलेला) सर्व भौतिक गोष्टींचे नियंत्रण करतो, हाच तर आध्यात्मिकांचा दावा आहे, तो पुराव्यानेच खोडून काढला पाहिजे. आत्मा, पुनर्जन्म, ‘वासांसि जीर्णानि . . . ‘ इत्यादी सर्व गोष्टी सृष्टिकर्माच्या निरीक्षणांच्या स्पष्टीकरणासाठी मानवाने मांडलेले केवळ सिद्धांत आहेत हे जाणून घेतले, तर ‘आत्मा हवा का?’ किंवा ‘आत्मा आहे का?’ असे प्रश्नच गैरलागू होतील. (भौतिक भाकितांनी हे सिद्धांत कधीही सिद्ध झालेले नाहीत, पण ते ‘पूर्ण सत्या’चे वर्णन करतात असे समजण्याची चूक आध्यात्मिक श्रद्धाळू मंडळी करीत असतात, तसेच अनेक उपसिद्धान्त (उदा. कर्मसिद्धान्त) मांडून मग त्या सर्वांतून ‘तर्कशुद्ध’ उत्तरे काढीत असतात.
या सिद्धांतांना मोडीत काढणारा, भौतिक निरीक्षणांद्वारे निर्विवाद असा, पुरावा जीवशास्त्राला अजून मिळालेला नाही असेच वाटव्यांच्या लेखातील माहितीवरून माझे मत झाले. त्याचबरोबर, ‘पुढच्या एका फारतर दोन शतकांत माणूस जिवंत पेशी तयार करू शकेल याची मला तरी खात्री वाटते’ (पृ. 398) या त्यांच्या विधानामुळे, एक विज्ञानप्रेमी म्हणून मला अपार आनंद झाला. हा काळ पुष्कळसा कमी करता आला असता तर बरे!
वि. शं. ठकार, ‘स्वप्न’, 44 विजयनगर कॉलनी, 2096 सदाशिवपेठ, पुणे — 411 030
पुढील अंकात विज्ञानाच्या मर्यादांबद्दलही एक लेख असावा. उदा. 1) विज्ञानाने आपल्याला जीवनाचा हेतू ठरवता येत नाही, चांगलेपणाच्या, नीतीच्या व्याख्या मिळत नाहीत, सौंदर्य, प्रेम, परोपकार, बंधुभाव, यांबद्दल विज्ञान उदासीन आहे. 2) विज्ञान विलक्षण परिणामकारक आहे. पण हे परिणाम उलटवण्याचे (Reversing the effects) त्याचे सामर्थ्य फार तोकडे आहे. एवढेच नव्हे तर विज्ञानाच्या साहाय्याने आपण केलेल्या कृतींचे परिणाम काय होतील — विशेषतः दूरगामी परिणाम काय होतील हेदेखील विज्ञानाने पूर्णतः भाकीत करता येत नाही.
सुभाष आठले, कोल्हापूर
मदर तेरेसांच्या संतपदाच्या अंतिम घोषणेस आता थोडाच अवधी राहिला. बरीचशी वाटचाल पूर्ण झाली. चमत्कार सिद्ध झाले, पोप महाशयांनी स्वीकृती दिली—-अशा सर्व बातम्यांना प्रसार माध्यमांनी प्रचंड प्रसिद्धी दिली आणि त्या जनसामान्यांपर्यंत कर्तव्यभावनेने पोचविल्या. दोन महिने वाट पाहिली. अंकाच्या पृष्ठसंख्येबद्दलसुद्धा न चुकता जागरूकपणे सूचना देणाऱ्या आ.सु.च्या संपादक-सेनापतींपासून विविध विषय खणून काढून घणाघाती लिखाण करणाऱ्या इतर लेखक-सरदारांपर्यंत कोणीतरी या विषयावर लिहील असे वाटले होते. निराशा झाली.
या देशातील हिंदूंचे प्रबोधन गेली दीडशे वर्षे सुरू आहे, ते होणे अत्यावश्यक होते, अजूनही आवश्यकता संपलेली नाही, आणि कोणत्याही समाजाची प्रबोधनाची आवश्यकता तशी संपतही नाही. परंतु भारतात आजवरच्या समाजसुधारकांनी प्रामुख्याने हिंदू समाजाला समोर ठेवूनच कार्य केले. त्याचा फार मोठा फायदा हिंदू समाजाला झाला हे मान्य करावे लागेल. हिंदू समाज टीका सहन करण्याच्या सुधारणा स्वीकारण्याच्या स्थितीत आला. याचे श्रेय आजवरच्या सुधारकांना आहे. या देशात ख्रिश्चन व मुस्लिम धर्मीय जे फार मोठ्या संख्येने आहेत त्यांच्यामध्ये सुधारणेची आवश्यकताच नाही, ते सुधारलेलेच आहेत, अशी स्थिती आहे का? तसे असेल तर मदर तेरेसांचे चमत्कार आणि संतपद याबद्दल काय म्हणावे लागेल? मुस्लिमेतर पुरुषांनाही मशीद, दर्यात प्रवेशास परवानगी पण 50 टक्के मुस्लिम जनता म्हणजे सर्व मुस्लिम स्त्रियांना मशीद दर्गा प्रवेशास बंदी, बुरख्याची जबरदस्ती. याचा विचार कसा करायचा? वास्तविक हिंदूपेक्षा अधिक, निदान हिंदूइतकीच सुधारणेची, प्रबोधनाची गरज या दोन प्रमुख गटांना आहे, हे वास्तव मान्य व्हावे. आम्ही धर्मच मानत नाही असे म्हणून सुधारकांना जबाबदारी झटकता येणार नाही. या समाजांचे प्रबोधन व्हावे असे आ.सु.ला व आ.सु.च्या लेखकांना वाटत नाही का? वास्तविक मदर तेरेसांचे चमत्कार आणि संतपद या ताज्या विषयाच्या निमित्ताने काही लिहिता आले असते, लिहिणे कर्तव्य होते. आ.सु.चा व आ.सु.च्या लेखकांच्या समाजसुधारणाविषयक लेखांचा विषय प्रामुख्याने हिंदू समाज राहिला आहे. हे चांगलेच आहे. पण वर नमूद केल्याप्रमाणे ख्रिश्चन व मुस्लिम समाजांचा विचार केला जात नाही. पर्यायाने त्यांचे हित दुर्लक्षिले जाते. लेखकांवरही एकांगीपणाचा, केवळ हिंदूंवर टीका केल्याचा आक्षेप येतो. यात व्यापक समाजहिताचा मुळ हेतू साध्य होत नाही.
दीडशे वर्षे ज्याची मशागत होत आली आहे आणि त्यामुळे जो विविध विचार व सुधारणा स्वीकारण्यास बराचसा तयार झाला आहे त्या हिंदू समाजाला समोर ठेवून आजचे सुधारक आपली लिखाणाची आणि प्रबोधन करण्याची हौस भागवून घेणार की हा जो फार मोठा वर्ग सुधारणेपासून वंचित राहता आला आहे त्याचाही विचार करून काही लिहिणार याचा अंतर्मुख होऊन, खुल्या दिलाने, प्रामाणिक हेतूने विचार करावा असे कळकळीने सुचवावेसे वाटते. आ. सु. चे बहुतांश वाचक या विचारांशी सहमत होतील, किंबहुना बहुतेकांच्या मनात हा विचार आला असेल अशी खात्री आहे.
1. वरील पत्र वाचल्यावर सहज हाती लागले तेवढे ताजे आ.सु.चे अंक (14.5 ते 14.9) तपासून प्रामुख्याने हिंदु समाजावर रोख खरेच राहिला आहे का, असा प्रश्न पडला. मला तसा रोख जाणवला नाही. अगदी ‘आज अगर खामोश रहे . . . (पृ. 348) हा लेखसुद्धा धार्मिक उन्मादापासून दूर हटण्याबाबत आहे. ‘मानवतेविरुद्ध गुन्हा’ हा भाषांतरित लेखांचा संचही शासन प्रशासन या संस्था नजरेसमोर ठेवूनच लिहिलेला आहे. आता जर कोण्या हिंदूला आपणच लक्ष्य आहोत असे वाटले, तर ‘इफ द शू फिट्स, वेअर इट’—-किंवा जास्त तिरसटपणाने खाई त्याला खवखवे म्हणून सोडून द्यायचे ठरवले!
2. चमत्कार आणि संतपद हे हास्यास्पद प्रकार आहेत, यात शंका नाही—-पण अंधश्रद्धा निर्मूलन हा मला तरी प्रतिक्रियात्मक आणि ‘त्याऐवजी काय?’ या प्रश्नाचे उत्तर नीटसे न देणारा प्रकार वाटतो. त्याऐवजी आजच्या भौतिक आयुष्यात विवेकवादी विचारसरणी वापरणे कसे योग्य, हे ठसवणे योग्य वाटते. हे आम्ही धर्मच मानत नाही म्हणून हात झटकणे नव्हे. हे आहे आम्ही असे जगू नये, तसे जगावे असे मानतो, असे म्हणणे आहे. त्यातही पहिला खंडनात्मक वाक्यांश क्षीण करून दुसऱ्यासाठी उपयुक्त लिखाण पुरवण्याकडे माझा कल आहे.
3. तिसरा एक मुद्दा एखादवेळी फारसा विवेकी नसेल—आपण ठरवा, काय ते. 1973 साली कलकत्त्यात एक मित्राची वाट पाहत पदपथावर उभा होतो. अत्यंत गर्दीच्या रस्त्यावर एक देह पडला होता, हाडे-कातडे, चिरगुटे मिळून पंधरा किलोचा, व बहुधा स्त्रीचा. फार वेळाने जराशी हालचाल दिसल्याने ते प्रेत नाही हे जाणवले. एक त्या काळच्या दृष्टीने अद्ययावत वेशभूषेतली तरुणी (मिनिस्कर्ट, तंग ब्लाऊज, काळा चष्मा, रंगरंगोटी) उंच टाचांवर खाडखाड चालत रस्त्यातला दगड किंवा डबके ओलांडावे तसा तो देह ओलांडून गेली. त्यावेळी तीव्रतेने वाटले की जिवंतांना तर सन्माननीय जीवन दिले जातच नाही आहे, पण मरताना तरी ही व्यक्ती होती याची किमान दखल तरी घेतली जावी? तसे करणाऱ्या मदर तेरेसांच्या पाठीराख्यांच्या मूर्खपणावर लिहावेसे आज वाटले नाही. इतर जागी दोन्ही बाजूंनी लिहिले गेले आहेच. असो!
4. पृष्ठसंख्येबद्दलची कोपरखळी दुखली नाही! मध्ये एका अनिवासी ॥रतीय वाचकाने आजचा केसरी का नाही? असे विचारले होते. त्याचा रोख दैनिक करण्यावर होता. तेवढा चांगला मजकूर उपलब्ध करण्यात आम्ही अयशस्वी ठरलो आहोतच—- पण त्याबाबतीतली क्षमता मी तपासत असतो. त्याचे प्रतिबिंब पृष्ठसंख्येबद्दलच्या सूचनांमध्ये दिसते.
अनंत बेडेकर, कोसला, शांतिसागर सोसा, भारत नगर, मिरज — 416 410