[शहरे टिकवावयाची असतील तर त्यासाठी शहरी प्रक्रियांकडे सर्वाधिक लक्ष द्यावे लागेल. कारण या प्रक्रियांचे प्रवाही स्रोतच शहराचे स्वरूप आणि भवितव्य ठरवितात.]
स्पिरो कोस्तोफ –1992
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत विकसित प िचमी जगांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. त्यामागे लपलेल्या आर्थिक कारणांचा शोध पा चात्त्य अभ्यासक नानाविध प्रकारांनी घेत असतात. अमेरिकेतील रीगनचा अध्यक्षीय काळ आणि इंग्लंडमधील मार्गारेट थैचर यांची राजवट एकाच वेळी तेथील आर्थिक धोरणांना मोठेच क्रांतिकारी वळण देणारी होती. सर्वप्रथम खाजगीकरणाची हाक त्यांनी दिली आणि बघता बघता जगातील बहुसंख्य देशांत ती लाट पसरली. तिच्या धडका भारतीय किनाऱ्यावर बसत होत्याच आणि शेवटी 1991 साली भारतही या लाटेवर स्वार झाला. त्याआधीच समाजवादी देशांचे विघटन घडून आले होते. या लाटेने त्यांनाही घेरले होते. घट्ट, बंदिस्त अर्थव्यवस्था उदारीकरणाकडे वाटचाल करू लागल्या. मागे वळून बघता खाजगीकरण– उदारीकरणाचे हे धोरण म्हणजे तत्कालीन आर्थिक अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी शोधलेला मार्ग होता, असे अनेकांना वाटते. पण मुळात हे अरिष्ट कशामुळे उद्भवले होते? केवळ तत्कालीन घडामोडींच्या संदर्भात त्याची कारणे दिसत असली तरी त्याची पाळेमुळे काळात खूप दूरवर रुजली असावीत या भूमिकेतून ती पाळेमुळे शोधण्याचे जटिल काम ग्रॅहम आणि मार्टिन या इंग्लंडमधील दोन संशोधकांनी केले आणि त्याचाच परिपाक म्हणून Splintering Urbanism’ हे या शतकाच्या प्रारंभालाच प्रकाशित झालेले एक अतिशय महत्त्वाचे पुस्तक त्यांनी लिहिले.
आधुनिक, औद्योगिक, नागरी ‘आदर्श’ विकास-संकल्पनेच्या आधारे सबंध जगात मानवी समाज घडविण्याचे प्रयत्न झाले. त्या समाजाला आधार पुरविणाऱ्या तांत्रिक आणि नागरी पायाभूत व्यवस्थांची उभारणी हा या काळातला सर्वांत मोठा मानवी उपक्रम होता. या आदर्श उपक्रमाच्या पाठपुराव्याच्या ध्यासातूनच जगभरच्या सर्वच अर्थव्यवस्था कशा कशा अरिष्टात सापडत गेल्या याचा शोध या पुस्तकातून लेखकांनी फार प्रभावीपणाने घेतला आहे. औद्योगिक क्रांती आणि त्यावर आधारित सामाजिक संरचना यांना असंख्य आयाम होते. 1850 ते 1960 या शंभर वर्षांच्या कालखंडात युरोप, अमेरिकेतील आणि सबंध पा चात्त्य देशांतील संस्कृती क्रांतिकारीपणे बदलल्या. शेती, अन्नोत्पादन, भौतिक साधनांचे उत्पादन, अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था या सर्वच क्षेत्रांत खूप परिवर्तन आले. शेतीआधारित खेड्यांची रचना निकालात निघाली आणि औद्योगिक शहरे उदयाला आली. शेती उत्पादकांचे औद्योगिक कामगार झाले आणि त्या कामगारांचे पुढे सेवा क्षेत्रातील सफेद कॉलर कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये स्थित्यंतर झाले. शेती उद्योग-सेवा या अर्थ-स्थित्यंतराचा पाया होता नागरी पायाभूत सुविधा, आणि या समान नागरी सुविधांचा डोलारा चार आदर्श खांबांवर उभा राहिला होता. हे चार खांब होते,
1. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान आणि बुद्धिवादावर आधारित भौतिक तत्त्वज्ञान.
2. आधुनिक नागरी-शहरी सामाजिक समानता.
3. सर्व नागरिकांना स्वतंत्र, स्वच्छंद, आरामाचे जीवन आणि संपन्नतेची, उपभोगांची साधने पुरविण्याचे स्वप्न.
4. आणि वरील सर्व गोष्टी निर्माण करण्यासाठी, त्यांचे सातत्य आणि पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी करावयाचे आर्थिक-सामाजिक-नागरी व्यवस्थापन.
पा चात्त्य देशांत निर्माण झालेल्या या आदर्शाची आयात त्यानंतर जगातील सर्वच देशांनी केली. या आदर्शाना प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतानेही स्वातंत्र्यानंतर नियोजनाची कास धरली. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानच्या पद्धतशीर विकासाच्या प्रक्रियेतून ऊर्जा, पाणी, वेगवान दळणवळणाची साधने, दूरसंवाद साधने आणि माध्यमे, आरोग्य सेवा इत्यादींची निर्मिती झाली. शेतीचे उत्पादन प्रचंड वाढले आणि समाजातील सर्वच लोकांना संपन्न जीवन देता येईल हे स्वप्न मानवजातीला पडले. ते साकार करण्याची क्षमताच जणू गवसली होती.
प्रमाणीकृत (standardized), सर्वसमावेशक, सामाजिक आणि समान नागरी सुविधा मध्यवर्ती नियोजनातून निर्माण करणे, पुरविणे ही संकल्पना रुजली. सुरुवातीला विस्कळीतपणे सुरू झालेल्या ऊर्जा, पाणी, वाहतूक साधनांच्या छोट्या-छोट्या प्रयत्नांना एकत्र एकाच मोठ्या व्यवस्थेत आणण्याच्या निकडीमधूनच मोठ्या प्रमाणाचे मध्यवर्ती, नियोजन यशस्वी करण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी प्रचंड भांडवली खर्च आवश्यक होता. यातूनच खाजगी किंवा सार्वजनिक मक्तेदारीची गरज पुढे आली.
या सर्वांचे नीट नियोजन, व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नांतूनच नागरी नियोजनशास्त्राचीही वाढ झाली. यंत्रवत शिस्तीने शहरांतील सर्व व्यवहार, लोकांच्या हालचाली, उत्पादन, काटेकोरपणे नियंत्रित करता येईल हा प्रचंड आशावाद त्या काळात निर्माण झाला होता. इंजिनीयर-तंत्रज्ञ हा जणू देवदूत होता. प्रचंड मोठे लांब कालवे, पूल, पाणी योजना, धरणे, वीज केंद्रे, पेट्रोल प्रकल्प, रेल्वे, ट्राम, बस, टेलिफोन, तसेच नंतरच्या काळातील विमानसेवा, मोटारीचे रस्ते आणि प्रचंड जहाजातून होणारी जागतिक व्यापार उभारणी यात प्रचंड मानवी श्रम, बुद्धी, तसेच भौतिक साधने गुंतली. भव्य, दिव्य, मोठे, उत्तुंग, वेगवान, अशा ध्यास-संकल्पनांमुळे असंख्य लोक भारावले. त्याचबरोबर घाण, अनारोग्य, बेशिस्त, अंदाधुंदी, दुर्गंध, गर्दी, गोंधळ यासारख्या व्यवस्थांना पद्धतशीर-पणे नेस्तनाबूत करण्यात आले. आणि हे सर्व करण्यासाठी मध्यवर्ती, एकछत्री, सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञानही निर्माण झाले. यांत्रिकता, अचूकता आणि शिस्तबद्धता यांना आदर्शाचे स्वरूप आले. या आधारेच सुट्या, एकेकट्या व्यक्तीलाही सामाजिक आधार वा संघटनेशिवाय सर्व भौतिक गोष्टींचा उपभोग घेता येईल, अशी ही आदर्श समाजसंकल्पना होती. आणि या आदर्शाचा वेध घेत घेतच खेड्यांतून विखुरलेले मानवी समूह मोठ्या मोठ्या शहरांत एकत्र आले. या महानगरांची प्रचंड महाव्यवस्था करणे आवश्यक बनले. या अव्यवस्थेची व्यवस्था लावण्यासाठी घरे, कारखाने, कार्यालये यांचे विभाग वेगळे करून त्यांना वाहतूक यंत्रणांनी जोडण्याचे काम शहरां तील नियोजनकारांनी चांगलेच यशस्वी केले. उपभोग, आर्थिक वाढ, विकास यांच्यामागे धावणाऱ्या या सर्व काळातील व्यवहारांना शंभर वर्षे तरी काहीच मोठे अटकाव आले नव्हते.
पण 1970 च्या दशकात मात्र या सर्व गती-प्रगतीला अचानक मोठे-मोठे धक्के बसायला लागले. आखाती तेलाचा धक्का मोठा होता. नंतर पर्यावरणाच्या प्र नाने मोठेच आव्हान मिळाले. पण तोपर्यंत सर्व पा चात्त्य जग ऊर्जा, दळणवळण, संपन्नता आणि उपभोगाच्या अत्युच्च पातळीवर गेले होते आणि तेथून घसरगुंडी होण्याचे संकेत मिळताच प्रचंड अस्वस्थता आली. प्रचंड खर्चिक, मध्यवर्ती, महाकाय सेवा-व्यवस्था या स्वतंत्र वाटल्या तरी त्या प्रचंड प्रमाणावर एकमेकांवर अवलंबून असतात, याचे भान याच काळात यावयाला लागले. वीजपुरवठा खंडित झाला तर पाणी, दळणवळण, वाहतूक, उद्योग आणि सर्वच व्यवहार एकदम ठप्प होतात. ऊर्जा साधनांवरच्या अवलंबित्वामुळे अर्थव्यवस्था धोक्यात येतात. जेव्हा सर्व सेवा-व्यवस्था सुरळीत चालत असतात तेव्हा त्यावरचे पराकोटीचे अवलंबन लक्षातही येत नाही.
पण एखाद्या व्यवस्थेत बिघाड होताच सर्वच व्यवस्था अरिष्टात सापडतात, याचा अनुभव वाढत्या प्रमाणात विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत यावयाला लागला. या मानवनिर्मित व्यवस्था जणू नैसर्गिक आहेत आणि अक्षय आहेत. असा जो भ्रम निर्माण झाला होता त्याला मोठाच धक्का या काळात बसला. टिकाऊपणाचा केवळ ‘आभास’ होता याची कल्पना या काळात बळावयाला लागली. भांडवलशाही देशांत तसेच समाजवादी देशांतही सर्वच नागरी व्यवस्थांच्या निर्मिती, व्यवस्थापन, नियोजन आणि अर्थव्यवहारावर त्या त्या देशांतील सरकारांचे चांगलेच नियंत्रण होते. सहभाग होता. समाजवादी देशांत तर सर्वच व्यवहार सरकारी होते. यामुळेच नागरी सेवांचे दर कृत्रिमपणे नियंत्रित असत आणि सर्वांना समान दरानेच सेवा मिळत असत. सरकारी तिजोरीतून त्याचा भार उचलणे हा सर्वसाधारण नियम होता. पण अर्थव्यवस्था धोक्यात येण्यास तेही एक कारण होते. अनेक कारणांनी अर्थव्यवस्थेवर दबाव येताच अनेक क्षेत्रांतून सरकारला सहभाग कमी करण्यासाठी खाजगीकरणाचा मार्ग धरावा लागला. पण त्यामुळे तुलनेने अधिक फायदा देणाऱ्या सेवा खाजगी क्षेत्रांत आणि तोट्यातल्या सरकारकडे असेही चित्र दिसायला लागले.
खाजगी सेवा भरवशाच्या पण महाग व्हावयाला लागल्या. सरकारलाही अनेक सेवादर वाढवावयाला लागले. अनुदाने बंद झाली. तोट्यातल्या सेवाच रद्द करावयाची वेळ आली आणि या सर्वांमुळे ‘समान दराने सेवा’ हे मूलभूत तत्त्व कोलमडले. त्यातच जुन्या सेवांच्या नूतनीकरणासाठी खाजगी-सरकारी भांडवलाचा तुटवडा वाढायला लागला. अधिक नफ्यासाठी भांडवल स्वतंत्र तिसऱ्या जगाच्या दिशेने जायला लागले. दळणवळण, प्रवास यांचे खर्च वाढले तसे लोक स्थलांतर करून कामाच्या जागेजवळ जाण्याचा प्रयत्न करायला लागले. मध्यवर्ती शहरांतून आधी कारखाने आणि नंतर सेवा उद्योग बाहेर पडले. पाठोपाठ लोकवस्ती बाहेर पडली. शहरांची लोकसंख्या कमी होताच सेवांचे व्यवस्थापन खर्चिक झाले. दर वाढले. एकंदरीत वाढ-विकासाच्या शंभर वर्षांत एका दिशेने फिरणारे अर्थचक्र 1970 नंतर उलटे फिरायला सुरुवात झाली होती आणि सबंध नागरी समाज, शहरे अस्थिरतेच्या तडाख्यात सापडली. शहरे ही स्थिर असणाऱ्या तसेच समाजाला स्थैर्य देणाऱ्या रचना आहेत, या कल्पनेलाच मोठे तडे गेले. शहरांचे नियोजन, नियंत्रण हाताबाहेर जावयाला लागले तेव्हा शहरांच्या गतिमानतेची वाढती जाणीव नगर-नियोजन करणाऱ्यांना तीव्रपणे होऊ लागली.
पर्यावरणाचा प्र न उग्र होत गेला तसे हा प्र न आधुनिक नागरी आदर्शाच्या पाठपुराव्यातून निर्माण झाला आहे याचेही भान वाढावयाला लागले.
एकविसाव्या शतकात प्रवेश करण्यापूर्वीच विसाव्या शतकाचे आदर्श खांब हलावयाला सुरुवात झाली होती. नव्या सहस्रकात विरलेले आदर्श आणि त्यांची उरली-सुरली वस्तुस्थिती यासोबत पा चात्त्य जगाने प्रवेश केला आहे. पण विकसनशील, नवस्वतंत्र भारतासारख्या देशात तर आधुनिक आदर्शाचे रोपण पूर्णांशाने होण्याआधीच सर्वांसंबंधी चिंता निर्माण झाली आहे. स्वप्नभंग झाला आहे. आणि नवीन दिशा, नवीन आदर्श मात्र हाताशी नाहीत. परिणामी एक संभ्रमाची, अस्थिरतेची व्यवस्था सर्वच जगभर पसरली आहे.
ग्रॅहम आणि मार्टिन यांनी या शंभर वर्षांत आधुनिक औद्योगिक आदर्शाची आणि व्यवस्थांची छकले कशी कशी झाली याचा एक विस्तृत पटच असंख्य उदाहरणातून उलगडत नेला आहे.
पुढे काय? “The very idea of struggle against inequality, which at the world level has never stopped growing since the end of the nineteenth century, has now been called into question”.
अशासारख्या वेगवेगळ्या भावना प्रकट करणाऱ्या अभ्यासकांचे मोहोळच गेल्या वीस वर्षांत पा चात्त्य विद्यापीठांतून निर्माण झालेले दिसते. गतकाळाचा अर्थ लावून मार्ग काढण्याचे प्रयत्न यातून दिसतात. गेल्या शतकात पा चात्त्य विकासप्रक्रिया इतकी प्रभावी आणि वेगवान होती की त्यांच्याच मार्गाने जाऊन जगातील इतर सर्व देश, लोकसमूह आपला विकास साधू शकतील असा विश्वास निर्माण झाला होता. पा चात्त्य जगाने विकासाची संकल्पना निर्यात केली तेव्हा जगातील देशांतील परिस्थितीची, समाजाची संस्कृतीची वैशिष्ट्ये या गोष्टी दुय्यम मानल्या गेल्या होत्या. पण आता खुद्द पा चात्त्य विकासप्रक्रिया जेव्हा अरिष्टात सापडली त्याच वेळी विकासाचे आयाम आणि आकलनही वाढले आहे. मुख्य म्हणजे सर्व देश, समाज विकासाच्या एकाच मार्गाने, एकाच दिशेने, एकाच पद्धतीने जाणे आता दुरापास्त आहे हे समजले आहे. किंबहुना आदर्श समाजाची संकल्पना प्रत्येक समाजाची स्वतःची असेल. अशा अनेक समाजांचे, देशांचे वैविध्य जपणारी एक नागरी रचना असू शकेल का? एका नागरी नेटवर्क पद्धतीची रचना त्यातून उभी राहू शकेल, असा आशावादही लेखक व्यक्त करतात.
आज आपल्या देशात अस्थिरता, अस्वस्थता, असमानता, अशांतता आणि अविश्वासाची जाणीव खूपच वाढली आहे. राज्या-राज्यांत, विविध समाजांत तणाव निर्माण झाले आहे. आपल्याही नागरी सेवांची छकले होत आहेत. उदा. विजेचा प्र न सोडविण्यासाठी निर्मिती, पारेषण आणि वितरण असे तीन कंपन्यांत विभाजन होणे हे याच प्रक्रियेचा भाग आहे असे लक्षात येते. त्यातच नव्या माहितीक्रांतीने ही छकले एकत्र जोडण्याची संधीही निर्माण झाली आहे. अशा वेळी जुन्या आदर्शाच्या संकल्पना मोडकळीला आल्या असताना त्या घट्ट धरून ठेवण्यापेक्षा लवचीकपणा प्राप्त करून नवीन वाटा शोधावयाची गरज या पुस्तकातून अधोरेखित होते. निराशेने घेरलेल्या पुरोगामी चळवळींनी आणि विचारवंतांनी अशा पुस्तकांतून वास्तवाचे आकलन करून घेणे, हा एक चांगला अनुभव ठरावा.
8 संकेत अपार्टमेंटस्, उदयनगर, पांचपाखाडी, ठाणे — 400 602