‘मराठी भाषेला वाचवा!’ अशा प्रकारची हाकाटी हल्ली केली जात आहे. या हाकाटीतले आवाहन जसे सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय नेतृत्वाला केलेले असते तसेच ते थेट लोकांनाही केलेले असते. त्यापुढे जाऊन, मराठी भाषा कशी वाचवायची याबद्दल लोकजागृती करणे, काही धोरण स्वीकारणे, आणि निरनिराळे नियम बांधणे अशाप्रकारचे कार्यक्रम आखले जातात. मराठी भाषा कशापासून वाचवायची याही प्र नाची विविध उत्तरे दिली जातात –इंग्रजीच्या किंवा हिंदीच्या आक्रमणापासून वाचवायची, अरबी-फार्सीच्या प्रभावापासून भाषा शुद्ध करायची, अगदी संस्कृत भाषेच्या अतिरेकी प्रभावापासून तिला वाचवायची अशी काही उत्तरे मिळत असतात. मराठी-भाषकांना कोणत्या न्यूनगंडाने पछाडले आहे याची चिंता केली जाते. पण सगळ्यात महत्त्वाचा प्र न मात्र विचारला जात नाही आणि मग साहजिक तो प्र न अनुत्तरित राहतो. असे जरी असले तरी माझ्या अटकळीनुसार तो परखड प्र न आजच्या तरुण पिढीच्या मनात रेंगाळत असतो, आणि तो म्हणजे—मराठी भाषेला वाचवायचे तरी का? काय बिघडणार आहे ती वाचली नाही तर? पण या अनुत्तरित प्र नाची चाहूल लागून भयभीत झालेली काही मंडळी मग मनाला दिलासा देत राहतात—कसली काळजी करताय मराठी भाषेची? ही एवढी प्रजा खेड्यांतून, शहरातल्या गल्लीवस्त्यांमधून पसरलेली आहे ती काय उद्या इंग्रजीत वा हिंदीत बोलायला लागणार आहे थोडीच? काही मरत नाही आपली मराठी!
कळीचा प्र न आहे तो म्हणजे मराठी भाषेने कोणत्या पातळीवर जिवंत राहायचे? आज मराठी भारतामधल्या डझन दीडडझन विकसित भाषांपैकी एक समजली जाते, उद्या ती भारतातल्या शेकड्यांनी मोजता येतील अशा अविकसित भाषांपैकी एक मानली जाऊ लागली तर कसे? तर ती वाचली ना आपोआप असे म्हणून समाधान मानायचे? ‘मराठीला वाचवा’ असे केवळ तोंडादेखले आवाहन करणाऱ्या मंडळींचे त्यात समाधान होईलही! पण जे असे आवाहन कळकळीने करीत आहेत ते यात समाधान कसे मानतील? माणसाच्या जगण्याबद्दल विचार करताना आपण जीवनाच्या गुणवत्तेचा, क्वॉलिटी ऑव्ह लाइफ’चा विचार करतो, तसाच भाषिक जीवनाच्या गुणवत्तेचा विचार करायला नको का?
निराळ्या शब्दांत हा मुद्दा मांडायचा तर मराठी भाषेला का बरे वाचवायची, कशासाठी आणि कुणासाठी वाचवायची याचा विचार नेटाने करायला पाहिजे—आणि तो विचार प्रादेशिक टप्प्यावर, भारतीय टप्प्यावर, आणि जागतिक टप्प्यावर करायला पाहिजे. प्र नापासून पळून जाता कामा नये! मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास प्रादेशिक टप्प्यावर विचार करायचा तर एक आठवण करून द्यायला हवी. महाराष्ट्र सरकारने पुरस्कृत केलेल्या राज्य मराठी विकास संस्थेचे ब्रीदवाक्य आहे—-‘मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास’. महाराष्ट्र प्रदेशातले माणसाचे जीवन; इथला मुख्य भाषिक व्यवहार आणि त्याचे नियमन करणारी मराठीची भाषाव्यवस्था; मराठी भाषेतले ललित, वैचारिक, आध्यात्मिक अशा विविध प्रकारचे वाङ्मय; आणि प्रादेशिक जीवनातून आकार घेणारी आणि त्याचबरोबर त्या जीवनाला आकार देणारी संस्कृती असे एक चार गोष्टींचे संकुल आपल्यासमोर आहे. या संकुलाचा समग्रपणे विकास इथे योजायचा आणि साधायचा आहे. मराठी भाषा आणि मराठी वाङ्मय (केवळ मराठी ललित वाङ्मय म्हणजे ‘मराठी साहित्य’ नव्हे) यांचे या संकुलात महत्त्वाचे स्थान आहे. प्रादेशिक जीवन आणि प्रादेशिक संस्कृती यांमधून प्रादेशिक भाषा आणि वाङ्मय आकार घेतात हे जितके खरे आहे तितकेच प्रादेशिक भाषा आणि वाङ्मय प्रादेशिक जीवन आणि संस्कृती यांना आकार देतात हेही खरे आहे. या संकुलाचा समग्रपणे विकास होणे म्हणजे त्याला इष्ट दिशेने आकार मिळत राहणे.
भारतीय उपखंडात जीवन-भाषा-वाङ्मय-संस्कृती यांचे महाराष्ट्र हे काय एकच प्रादेशिक संकुल थोडेच आहे ? अशी इतरही अनेक संकुले आहेत; भारताचे एक विशिष्ट प्रादेशिक विभाजन आज आपल्या ओळखीचे झालेले आहे ते इतिहासाच्या ओघात आणि एका विशिष्ट कालखंडात झालेले आहे. आज दिसणारी ही संकुले इसवी सनाच्या सातव्या ते दहाव्या शतकांत उपस्थित झाली आणि भारताचे एक प्रादेशिक पुनर्विभाजन झाले. अगोदरची स्थिती काहीशी निराळी होती. ही घडामोड कशी काय झाली? एक म्हणजे इसवी सनाच्या चवथ्या ते दहाव्या शतकांत प्राचीन भारतीय नगरे आणि नागर जीवन यांचा क्रमाने -हास झाला. उदाहरणार्थ, शुआन-त्सांग या सातव्या शतकातल्या चिनी विद्वानाला आपल्या भारत-दर्शनात अनेक उजाड झालेली वा मोडकळलेली नगरे आढळली. दंडीच्या दशकुमारचरितात वर्णिलेल्या लांबलेल्या दुष्काळाचाही या घडामोडीत हात असावा. पुन्हा हळूहळू अकराव्या ते पंधराव्या शतकांत नगरे वाढीस लागली. मात्र भारत हा खेड्यांचा देश बनला हे चित्र समूळ बदलले नाही, जीवनाला आलेली एक खेडवळ कळा नव्या शहरांतून ही पुरती गेली नाही. पुनर्विभाजनाला कारण झालेली दुसरी गोष्ट म्हणजे लोकसंख्या वाढली आणि विखुरली आणि त्याबरोबर इतिहासक्रमाने भाषांचे विभाजन झाले आणि बोलींचे संधान झाले. एका बाजूला तमिळमधून मलयालम किंवा राजस्थानीमधून गुजराती वेगळी झाली (जशी डॉइचपासून डच किंवा स्पॅनिशमधून पोर्तुगीज वेगळी झाली). दुसऱ्या बाजूला विविध बोलींचा तेलुगु भाषा हा बोलींचा गट बनला(जसा विविध बोलींचा फ्रेंच भाषा हा बोलींचा गट बनला). वेगळ्या झालेल्या भाषांना किंवा बोलींच्या एकत्र येऊन झालेल्या गटाला राजकीय आणि सांस्कृतिक प्रतिष्ठा यथावकाश मिळेलही किंवा मिळणारही नाही, पण ती एक वेगळीच प्रक्रिया आहे–वाङ्मयनिर्मिती, सत्तासमतोल इत्यादी विविध कारणांनी आकार घेणारी ही प्रक्रिया असेल. या प्रादेशिक पुनर्विभाजनाच्या काळातच किंवा जरा मागेपुढे जातिव्यवस्था बळकट होण्याची आणि स्त्रिया व अतिशूद्र यांना वेगळे पाडण्याची प्रक्रिया चालू होती. (इरावती कर्वे आठवण करून देतात की, आजही भारतीय व्यक्तीची ओळख प्रथम भाषानिहाय आणि मग जातिनिहाय होते. ‘स्त्रीशूद्रादिक’ हा अभद्र शब्दप्रयोग कितव्या शतकापासून वापरात आला याचा शोध घ्यायला पाहिजे.)
भारताच्या प्रादेशिक पुनर्विभाजनातून मराठी बोली-गट उपस्थित झाला. प्रथम मध्यदेशीय बोलींपासून प िचम दक्षिण बोली वेगळ्या झाल्या, त्यांचे पुन्हा गुजराती-राजस्थानी गट आणि मराठी-कोकणी गट वेगळे पडले. याच्यानंतरचा मराठीचा इतिहास हा तिच्या प्रतिष्ठेसाठी केलेल्या प्रयत्नांचा इतिहास आहे. पहिली काही शतके मराठीला संस्कृत भाषेशी टक्कर द्यावी लागली. ‘माझा मराठाचि बोलु कौतुकें’ हे ज्ञानेश्वरांचे साभिमान उद्गार आणि ‘संस्कृत भाषा देवें केली प्राकृत काय चोरापासोनि झाली’ हे एकनाथांचे जळजळीत उद्गार या एकाच संघर्षाच्या दोन बाजू दिसतात. यादव राजांनी मराठीला राजभाषा बनवली आणि मराठीत रचना करणाऱ्या पंडितांना उत्तेजन दिले. हा संघर्ष सफल होतो आहे तो अरबी-फार्सीचा प्रभाव वाढला. शिवाजी महाराजांनी मराठीला पुन्हा एकदा राजभाषा बनवले आणि मराठी व्यवहार-भाषा अरबी-फार्सीमध्ये गुदमरून जायची थांबली. पुढे यथाकाल भारतामध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषा पुढे आल्या. या सगळ्या संस्कृत आदी प्रतिष्ठित भाषांबरोबर त्या त्या वाङ्मयीन परंपराही मराठी भाषकांना परिचित झाल्या. या सगळ्या प्रतिष्ठेसाठी केलेल्या संघर्षात, मराठीची कमाई अशी की त्यात नाउमेद न होता त्या त्या भाषा आणि वाङ्मयपरंपरा यांच्यापासून मराठीने स्वतःला समृद्ध आणि विकसित करून घेतले. उदाहरणार्थ, ऐष, आराम, हौस, ईमान, दोस्ती, जमाना, नशीब अशा नवी वृत्ती आणि दृष्टी आणणाऱ्या कल्पना मराठीने जवळ केल्या. संस्कृत प्रशस्ती आणि अरबी-फार्सी तवारीख यांच्या संकरातून मराठी बखर जन्माला आली. मराठी जीवन, भाषा, वाङ्मय, आणि संस्कृती केवळ विकसित आणि समृद्ध नव्हे तर वैशिष्ट्यपूर्ण व्हायला कारणीभूत झालेला हा पहिला महत्त्वाचा घटक: प्रतिष्ठेच्या संघर्षातून झालेले पोषण.
अशाच इतर घटकांबद्दलही खूप सांगण्यासारखे आहे, पण आपण फक्त धावता आढावा घेऊ या. दुसरा सहज लक्षात येणारा घटक म्हणजे महाराष्ट्राचे भारतीय उपखंडातले उत्तर आणि दक्षिण भारत यांच्या मधले स्थान. या प्रदेशात दैनंदिन राहणीपासून तो भाषासरणी, भावजीवन आणि जीवनदृष्टीपर्यंत उत्तर आणि दक्षिण यांचा एक समन्वय आढळतो. तिसरा एक घटक म्हणजे वैदिक आणि अवैदिक, ब्राह्मण आणि श्रमण प्रकृतीच्या विचारसरणी आणि वृत्ती यांचा एक सर्जनशील संघर्ष महाराष्ट्रात होत राहिला. त्याचे एक फल म्हणजे भारतीय भक्ति-परंपरेत मराठीने शरणागतीच्या जोडीला देवाशी सख्यत्व, सामाजिक प्रबोधन, भावव्याकुलतेला आध्यात्मिक चिंतनाची जोड अशी नव्याने भर घातली, स्त्रीपुरुषसमतेचा विचार पेरला.(मराठी स्त्री कधी नवऱ्याच्या पाया पडत नाही, आपण नारायणाची लक्ष्मी आहोत, भोळ्या सांबाची पार्वती आहोत हे ती कधी विसरत नाही.) याच्या जोडीला चवथा घटक म्हणजे जमीनधाऱ्यासाठी जमीनदारी पद्धतीपेक्षा रैयतवारी पद्धतीचा प्रभाव असणे, परिणामी सामान्य श्रमिकाचा पाठीचा कणा शाबूत राहिला. जातिभेद आणि स्पृश्यास्पृश्यभेद यांची धार थोडी कमी झाली. भारतीय स्तरावरच्या आधुनिकतेकडे नेणाऱ्या नवजागरण (1820 ते 1920), पददलितजागरण (1920 ते 1970) या चळवळी आणि भारतीय अस्मितेचा उदय (1770 ते 1930) या घडामोडींमध्ये मराठीभाषक केवळ कालदृष्ट्या अग्रेसर राहिले एवढेच नाही, तर ते अधिक खोलवर जातात (धर्माची चिकित्सा इथे एकोणिसाव्या शतकातच सुरू झाली), अधिक रोखठोक आहेत (दलितांना दया नको, हक्क पाहिजेत), त्यांच्याकडून हलवून खुंटा बळकट केला जातो (सामाजिक सुधारकांशी सनातन्यांनी बौद्धिक प्रतिवाद केला). मराठी भाषा वाचवायची म्हणजे हे सगळे मराठी कर्तृत्व आणि कमाई वाचवायची. या आढाव्यात तुम्ही तपशील भरले तर मुद्दा अधिक स्पष्ट होईल, मात्र अशा आढाव्यामागे एक वेगळ्या प्रकारची इतिहासाची दृष्टी हवी—जिला वास्तवाचे भान आहे, आणि तेही समग्र मानवी वास्तवाचे भान, प्रसंगी गैरसोयीचे वाटणाऱ्या वास्तवाचेही भान.
मराठीभाषकांची आद्य काळातली प्रतिमा ते दृढ, श्यामल, सधीर, अभिमानी, आणि कलहशील आहेत अशी होती. मराठी भाषकांची आजच्या काळातली स्व-प्रतिमा याहून फारशी वेगळी नाही! प्रादेशिकतेचा विकास: भारतीयतेचा विकास
दुसऱ्या म्हणजे भारतीय टप्प्यावर आपण आलो म्हणजे या प्र नाची आणखी काही अंगे आपल्या नजरेत भरतात.
मुलूखगिरी, तीर्थयात्रा, चाकरमानी आणि मतप्रसार या निमित्ताने मराठी माणूस भारताच्या इतर भागात गेला. उलट इतर भारतातले काही लोक व्यापारउदीम, धर्मप्रसार, चाकरमानी आणि आधुनिक शिक्षण-संशोधनाच्या महाराष्ट्रातील केंद्रांचा लाभ या निमित्ताने महाराष्ट्रात आले. भारताच्या इतर भागात जाणारा मराठी माणूस कुरकुऱ्या उपरा, किंवा राजसत्तेचा उर्मट हस्तक म्हणून ओळखला गेला नाही, उलट त्याने त्या त्या प्रादेशिक संकुलात आपापल्या आवडीकुवतीनुसार भरच घातली. महाराष्ट्रात येणाऱ्या इतर भारतीयांना महाराष्ट्राने सामावून घेतले. परिणामी आपण भारतीय आहोत याचे भान मराठी माणसाने ठेवले—बिहारच्या आपत्प्रसंगी मराठी माणूस धावला. आज महाराष्ट्राची प्रादेशिक संस्कृती म्हणजे केवळ मराठीभाषकांची, केवळ बहुसंख्यक समाजाची संस्कृती राहिलेली नाही. ती अखिल भारताच्या संस्कृतीप्रमाणेच बहुजिनसी आहे, आणि हा बहुजिनसीपणा केवळ मराठी लोकांच्या जेवण्याखाण्यापुरता मर्यादित नाही ! या बहुजिनसी महाराष्ट्रीय जनतेमधील बहुविध घटकांचे एकमेकांशी नाते जोडणारी संपर्क-भाषा मात्र मराठीच आहे. हिंदी किंवा इंग्रजी मार्फत संपर्क होतो, पण तो नाते जोडणारा संपर्क ठरत नाही. शालान्त परीक्षेला प्रादेशिक भाषा म्हणून मराठी आवश्यक केली ते योग्यच झाले.
भारतीयतेचा विकास हा प्रादेशिकतेचा विकास झाल्याशिवाय होणार नाही. इंग्रजीवर किंवा हिंदुस्तानी या संपर्क-भाषेवर हुकमत पण प्रादेशिक भाषा नीट येत नाही असा एक नेतृत्वाचा वाण भारताच्या प्रदेशांतून कुठेकुठे दिसतो. राजीव गांधी, नवीन पटनायक, उमर फारूख ही राजकीय क्षेत्रातली काही उदाहरणे. इतर सामाजिक क्षेत्रांतून किंवा सांस्कृतिक क्षेत्रात देखील अशी मंडळी कुठेकुठे दिसतात. हा हानिकारक अपवाद उद्या सामान्य नियम तर होणार नाही ना?
या टप्प्यावर आणखी एक गोष्ट नजरेत येते. ती म्हणजे भारत हा एकजिनसी होणे किती धोक्याचे आहे ही गोष्ट. या बहुजिनसी भारताला जोडणारी संपर्क-भाषा असणे केवळ उपयुक्त नाही तर आजच्या संपर्क-युगात आवश्यक आहे; तीच गोष्ट अनुवादकार्याची. अनुवादकार्याची आपल्याकडे होणारी उपेक्षा खेदजनक आहे. भारतीयतेच्या समृद्ध विकासा-मधला तो एक अडसर होऊ शकेल. पण हिंदीमय झालेला किंवा इंग्रजीमय झालेला आणि म्हणून अनुवादाची गरज संपलेला भारत कंटाळवाणा तर होईलच, पण तो दुबळाही होईल. व्यावहारिक पातळीवर बोलायचे तर भारतातल्या मनुष्यबळाची बहुविधता एक जमेची बाजू आहे—मग तो लष्करभरतीचा प्र न असो, की श्रमिक कौशल्याचा प्र न असो, की बौद्धिक-भावनिक क्षमतांचा प्र न असो. ब्रिटिश प्रशासकांनी हे जसे अचूक हेरले होते तसेच ते अर्वाचीन भारतीय उद्योजकांनीही हेरलेले आहे. भारताच्या प्रशासनाला आणि अर्थव्यवस्थेला याचा नक्कीच लाभ होत असणार. व्यावहारिक पातळीच्या पलीकडे वैचारिक किंवा कलात्मक सर्जकतेच्या पातळीवरही हे लागू आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताकडे वळून बघितले तरी ही मनुष्यबळाची विविधता भारतीय सर्जकतेच्या वैभवात कशी परिणत होते हे दिसून येते. संस्कृतविद्येचा विचार केला तर व्याकरण महाराष्ट्रात, सामवेदी परंपरा गुजरातेत, न्याय-परंपरा बंगालमध्ये, साहित्यशास्त्र काश्मिरात, वेदान्ताच्या परंपरा दाक्षिणात्यांमध्ये फुललेल्या दिसतात. त्यात्या प्रदेशाची तीती बलस्थाने दिसतात. अशीच स्थिती मध्ययुगीन आणि अर्वाचीन प्रयोगजीवी आणि प्रदर्शनजीवी कलापरंपरांच्या संबंधाने असल्याचे दिसून येते. मात्र ही विविधता जमेची बाजू केव्हा ठरेल? प्रादेशिक संकुलाचा काही विशिष्ट दिशेने विकास हा एकांगी असण्याचा दुबळेपणा न ठरता समग्र भारतीय संकुलाचे बलस्थान केव्हा ठरेल? भारतीय एकतेचे भान सतत जपायला पाहिजे. आपापल्या प्रदेशाच्या सीमा ओलांडून भारताच्या इतर प्रदेशाशी संपर्क साधत रहायला पाहिजे. (आपला शुद्धलेखनाचा प्र न संपवायला गुजरातीने 1929 मध्ये ‘जोडणी-कोश’ बनवला. मराठीला याची दादच नव्हती आणि तीच युक्ती सापडायला 2001 साल उजाडलं!१) त्यासाठी भारतीय संपर्क-भाषांची उपेक्षा करून चालणार नाही. माझ्या आयुष्याची पुष्कळशी वर्षे इंग्रजी शिकण्यात वाया गेली असे घोकणाऱ्या टिळकांनी मराठी भाषकांना चुकीचा संदेश दिला. बांगलाभाषकांनी बांगला भाषेची जोपासना केली पण इंग्रजीवरही प्रभुत्व मिळविण्याचे सोडले नाही. टिळकांनी सुरू केलेले ‘Mahratta’ पत्र अल्पगामी आणि अल्पायुषी ठरले; त्यांचा अखिल भारतीय लोकसंग्रह मौखिक संवादावर अवलंबून राहिला. आंबेडकरांनी इतर भारतीय प्रदेशांतील दलित कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवल्याचे आढळत नाही. हिंदी भाषिक प्रदेशातील दलितांपर्यंत आंबेडकरांचे नावही वेळेवर पोचले नाही, मग कार्य आणि विचार यांची गोष्ट तर दूरच. मराठी अस्मिता फुलते फळते ती भारतीय परिदर्शातच, स्वतःला कोंडून घेऊन नव्हे तर जोडून घेऊन. उगीच नाही पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील काटेतोल पण खुल्या मनाची रसिकता आणि अनौपचारिक पण उत्स्फूर्त शिस्त बाहेरच्या कलाकारांना आणि रसिकांना भुरळ घालत,
थोडक्यात सांगायचे तर मराठी भाषेला वाचवायचे ते केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठी नव्हे तर ते एकंदर भारताच्या भल्यासाठी एवढेच मला म्हणायचे आहे. अर्थातच असे म्हणताना ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेलें । मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले ।।’ असा काही भाबडा अभिनिवेश मला मुळीच अभिप्रेत नाही. भाषिकतेचा विकास: माणसाचा विकास
आता तिसऱ्या म्हणजे जागतिक टप्प्यावर यायला हरकत नाही.
मानवी जीवनाची विविधता, भाषिक-वाङ्मयीन-सांस्कृतिक विविधता विकासाला कशी उपकारक होते हे भारतीय संदर्भात दिसते तसे ते जागतिक पातळीवरसुद्धा दिसते. मनुष्यजातीच्या इतिहासात जागतिकीभवन फार पूर्वीपासून सुरू झालेले आहे. प्राचीन युगात माणसे आणि त्याच्या जगण्याच्या रीती इकडून तिकडे आणि तिकडून इकडे दीर्घ अंतरावर जाऊ लागल्या. अर्थव्यवहार आणि सत्ताव्यवहार यांची कक्षा विस्तारू लागली. संस्कृत, चिनी, लॅटिनसारख्या भाषांना विस्तीर्ण प्रदेशात अभिजात भाषांचे स्थान मिळायला लागले. भारतीय उपखंडात जागतिकीभवनाचा ‘जगा आणि जगू द्या’ या अनेकान्तग्राही वाणाचा छोटेखानी प्रयोग (उदाहरणार्थ) झाला, तर रोमन साम्राज्यात आणि नंतर रोमन कॅथलिक चर्चमध्ये (उदाहरणार्थ) ‘जे आपल्याबरोबर नाहीत ते आपले बांधव नाहीत’ या एकान्तग्राही वळणाचा जागतिकीभवनाचा आणखी एक छोटेखानी प्रयोग झाला. (जगाच्या परिदर्शात यांना ‘छोटेखानी’च म्हणायला पाहिजे!) आधुनिक काळात जग व्यापणाऱ्या युरोपीय सत्ताकारणामधून आणखी एक प्रयोग होऊ घातला आहे. एकान्तग्राही आर्थिक नगाऱ्यापुढे विविधतेतून विकास हे जागतिकीभवनाचे एक महत्त्वाचे अनेकान्तग्राही अंग अक्षम्य रीतीने दुर्लक्षित राहिले आहे. निराशेपोटी काहीजण हा नगारा फोडून टाकू पाहतात. तर काहीजण अनेकान्तग्राही तुणतुणे फेकून द्यायला निघाले आहेत. दोघांच्याही लक्षात यायला पाहिजे की हे जागतिकीभवन आहे, जागतिकीकरण नाही. ते जसे टाळता येणार नाही तसे लादताही येणार नाही. दुसरे म्हणजे ही जागतिकीभवनाची क्रिया एकान्त-ग्राहीच व्हायला पाहिजे किंवा अनेकान्तग्राहीच व्हायला पाहिजे असा दुराग्रह न धरता त्यांचा काही समन्वय होतो का हे पहायला पाहिजे. (वाहतुकीची साधने बहुविध असू देत, पण वाहतुकीची शिस्त एकविध पाहिजे हे अशा समन्वयी प्रयोगाचे एक छोटेखानी उदाहरण.)
पण खरी गोष्ट अशी आहे की विविधता केवळ एक साधनमूल्य नाही तर एक स्वतंत्र साध्यमूल्य देखील आहे. आज पर्यावरणाचे संगोपन आणि संवर्धन कसे करायचे याचा विचार करताना जैविक बहुविधता संवर्धित करण्याचा, निदानपक्षी आहे ती टिकवण्याचा विचार पुढे आलेला आहे. भोवतालचे बदलते वातावरण, जलावरण, मृदावरण आणि तसेच भोवतालची बदलती सजातीय-विजातीय जीवसृष्टी मिळून पर्यावरण बनते आणि ते आतून बदलत्या जीव-जातीला वेढून असते. काळाच्या ओघात निसर्गक्रमाने जुन्या जाती नष्ट होतात आणि नव्या जाती उत्पन्न होतात. गेल्या काही शतकांत या निसर्गक्रमात मनुष्यजातीचा हस्तक्षेप खूपच वाढला आहे. त्यामुळे जीवजाती आणि जीव-उपजाती यांची एकूण विविधता नको इतकी कमी होत आहे. (शहरांतल्या चिमण्या कुठे गेल्या? बिबट्या गावात का येतो? चित्ता नामशेष कसा झाला? तांदुळाच्या, केळ्यांच्या काही उपजाती कुठे गेल्या? देवराया वाढवल्या नाहीत तर औषधी वनस्पती मिळेनाशा होणार का?—अशासारखे प्र न ही केवळ एक चुणूक आहे.) मग या जैविक बहुविधतेचा दाखला काही प्रमाणात मनुष्यसृष्टीला, तिच्यामधल्या जगण्याच्या रीतींना, आचारविचारांचे संकेत आणि आस्थाविषय यांना, माणसांच्या समाजरीतींना आणि व्यक्तिमत्त्वातील क्षमता आणि प्रेरणा यांना लावता येईल. (जगातल्या भाषा आणि उपभाषा यांची संख्या रोडावते आहे त्याचे काय? काही दशकांनी जगभराची मुले तेच ते कपडे घालणार, तेच ते खेळ खेळणार, तीच ती कॉमिक्स वाचणार का? एकच एक कुटुंबरचना सगळीकडे पसरणार का?—-अशासारखे प्र न विचारता येतील.) जीवसृष्टी काय किंवा मनुष्यसृष्टी काय, विविधता म्हणजे शंभर फुले फुलणे. शंभर फुले फुलणे हे केवळ विकासाचे साधन नाही तर जीवनाचे स्वतंत्र वैभव आहे—निदानपक्षी मनुष्यजीवनाचे वैभव आहे आणि (निदान निसर्गावर प्रेम करणाऱ्यांच्या नजरेत) पर्यावरणाचे वैभव आहे. (प्रेमाचा विषय असणे म्हणजे नितान्त आस्थेचा विषय असणे.) निसर्गातील विविधता म्हणजे केवळ जैविक तंत्रज्ञांची किंवा उद्योजकांची सोय नव्हे. मनुष्यजीवनातील विविधता म्हणजे केवळ आर्थिक व्यवस्थापनाची किंवा प्रशासनाची सोय नव्हे.
सगळा भारत एकजिनसी, भाषेच्या क्षेत्रात केवळ हिंदीमय किंवा केवळ इंग्रजीमय झाला तर? तर भारतीय जीवन नीरस आणि कंटाळवाणे होईल. भारतीय समुदाय मग नितान्त आस्थेचा म्हणजे प्रेमाचा विषय राहणार नाही. भारतीय विविधतेचे मोल अतिपरिचया-मुळे भारतीयांच्या कधीकधी ध्यानातही येत नाही. (उपयुक्ततावादी मंडळींना तर विविधतेचे वैभव म्हणजे केवळ रोमँटिक स्वप्नरंजन वाटते किंवा आर्थिक विकासातला एक नसता अडथळा वाटतो.) भारतीयांनी एकजिनसी जीवनाला कंटाळलेल्या आणि भारताच्या प्रेमात पडलेल्या विदेशी मंडळींकडून भारताच्या विविधतेचे वैभव कळवून घ्यावे. तर मग मनुष्यजीवनातल्या ह्या विविधतेला जपायचे कसे आणि जोपासायचे कसे?
जीवनातल्या कृती आणि आचार, जाणीव आणि विचार काही वळणांनी, काही संकेतांनुसार चालतात. कशाची दखल घ्यायची याचा या कृती आणि जाणिवा शोध घेतात आणि तो शोध कुठे संपणार याचा वेध घेतात म्हणजेच त्यांना संकेतांबरोबर आस्थाविषय लागतात. (लहान मुलांसाठी कपडे निवडताना ते मळखाऊ आहेत ना, खेळताना तंग होणार नाहीत ना, वाढीच्या मापासाठी त्यांना टक घातले आहेत ना अशी आस्थेवाईक चौकशी होते. पोटाची खळगी हा आस्थाविषय आणि त्यात कोणता घास घालायचा हा देखील आस्थाविषयच.) या संकेतांना आणि आस्थाविषयांना संस्कार वळण देतात. हे संस्कार परंपरेला अनुसरतात किंवा प्रतिभेला अनुसरतात. ह्या संस्कारांतून परिणत होते ती संस्कृती.
माणसाच्या जीवनाला, आचारविचारांना वळण देणारे असंख्य संस्कार असतात—बुद्धिगम्य, कल्पनागम्य, भावनिक, आणि आध्यात्मिक म्हणजे जीवनदृष्टिविषयक संस्कार. (परातत्त्व न मानणाऱ्या नास्तिकाचे सुद्धा एक अध्यात्म असते.) या विविध संस्कारांचे एक महत्त्वाचे वाहन म्हणजे ललित, वैचारिक, आध्यात्मिक, तांत्रिक असे विविध प्रकारचे वाङ्मय. वाङ्मय म्हणजे त्यात्या समाजात वारंवार पारायण होण्याजोगा मानला जातो असा सर्व मजकूर.
वाङ्मयीन व्यवहारामार्फत आणि दैनंदिन शब्दव्यापारातून संस्कारांना आकार देणारे भाषा हे एक माध्यम आहे. भाषाव्यवहार व्यवहारसापेक्ष असू शकतो, परभाषा-सापेक्ष असू शकतो, किंवा शैलीसापेक्ष असू शकतो.
संस्काराचे माध्यम ठरू शकणारी ती भाषा, संस्कारांचे वाहन ठरू शकणारे ते वाङ्मय, आणि संस्कारांची बांधणी करणारी ती संस्कृती यांचे एक भाषाकेंद्री संकुल बनू शकते. महाराष्ट्र हे असेच एक संकुल आहे हे आपण पाहिलेलेच आहे. मनुष्यजीवनातली विविधता जपताना आणि जोपासताना अशा प्रादेशिक संकुलांना किती महत्त्वाचे स्थान असेल हे एव्हाना वेगळे सांगण्याची गरज नाही. पण हा प्र न केवळ मराठी, हिंदी, इंग्रजी, जपानी इत्यादी भाषांची शंभर फुले फुलू देण्याचा नाही. हा आजच्या जगात भाषिकतेचे फूल जपण्याचाच प्र न उपस्थित झाला आहे. कसे ते पहा. माणसाचा विकास आणि भाषिकतेचा विकास परस्परांशी निगडित आहेत. हल्ली असे मराठीचे पक्षपाती भेटतात की ज्यांना मराठीचे सोयरसुतक नसते आणि असे इंग्रजीचेही पक्षपाती भेटतात की ज्यांना इंग्रजीचे सोयरसुतक नसते. त्यांना त्यातून फक्त अर्थकारण वा सत्ताकारण साधायचे असते. (इथे मराठीच्या दुय्यम-तिय्यम स्थानाबद्दल खंत करणाऱ्या कुसुमाग्रजांची आठवण होते. ते जसे मराठीचे प्रेमी होते तसे इंग्रजीचेही प्रेमी होते.) एके काळी आपल्या साम्राज्यापेक्षा आपल्या शेक्सपियरविषयी गर्व वाहणारे इंग्रज अलीकडे शेक्सपियरला विसरत चालले होते; मध्यंतरीच्या दोन गाजलेल्या शेक्सपियरविषयक चित्रपटांनी त्यांच्या विस्मरणशक्तीवर हात चालवला नसता तर इंग्लंडमध्ये शेक्सपियरचे जरा कठीणच होते! विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून पर्यावरण समजावून घेणे आणि त्याची सुयोग्य हाताळणी करणे म्हणजे भाषेला सोडचिठ्ठी देणे नव्हे. विज्ञानव्यवहार आणि तंत्रज्ञानाव्यवहार यांत मुरलेल्या मंडळींना विचारा; विशेषतः परंपरेचे अनुसरण न करता प्रतिभेचे अनुसरण करणाऱ्या वैज्ञानिकांना आणि तंत्रज्ञांना विचारा म्हणजे भाषेबद्दलचा हा भ्रम दूर होईल. ‘काय बिघडणार आहे मराठी भाषा नाही वाचली तर?’ असा प्र न निरागसपणे अज्ञानापोटी विचारणाऱ्या तरुणाईचे एक वेळ सोडा. (त्यांना हा लेख वाचायला देता येईल.) पण हाच प्र न उर्मटपणे विचारणाऱ्या चंगळ, करियर, जमल्यास सत्ता यांच्यामागे लागलेल्या तरुणाईचे काय? (अशा तरुणतरुणींचा वाङ्मयीन व्यवहार आणि शब्दव्यापार किती तुटपुंजा असतो आणि त्यांचे आस्थाविषय किती तोकडे असतात ते पाहण्याजोगे ठरेल.) त्यांच्यापासून भाषेचे फूल वाचवायचे आहे. केवळ मराठी भाषा वाचवायची नाही आहे, तर मुदलात भाषिकताच वाचवायची आहे. मराठी जेमतेम तगवायची नाही आहे. तर समृद्ध आणि विकसित रूपात जगवायची आहे. एकंदर भाषिक जीवनाची गुणवत्ता जोपासायची आहे, मग ते भाषिक जीवन कोणत्याही भाषेतले असो.
मराठी वाचवण्याच्या या सर्वच प्र नाचा पैस किती विस्तृत आहे याची कल्पना एव्हाना यावी. दुर्दैवाने ही कल्पना ना आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, किंवा राजकीय नेतृत्वाला असते की जे या प्र नाच्या सोडवणुकीसाठी काही भरीव काम करू शकतात; ना सामान्य जनतेला असते, की जिला या प्र नाची दूरगामी झळ पोचणार असते. हा संस्कृत, अरबी-फार्सी, इंग्रजी, हिंदी या सत्तासूचक भाषांना हटवायचा किंवा त्यांचा उदोउदो करण्याचा मुद्दा नाही, तर आपल्याला ग्रासणारा न्यूनभाव काढून टाकून त्या त्या भाषांचा सदुपयोग करून घेण्याचा आहे. हा केवळ कुणाकुणाच्या नोकऱ्या वाचवण्याचा प्र न नाही, तर भाषेशी निगडित अशा त-हेत-हेच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा प्र न आहे. हा केवळ या गल्ल्यावस्त्यांतून पसरलेल्या प्रजेमध्ये मराठी तगेल यावर पोकळ समाधान मानण्याचा मुद्दा नाही, तर मराठीच्या वापराची गुणवत्ता वाढवण्याचा आणि तिची प्रतिष्ठा सुस्थिर करण्याचा मुद्दा आहे. हा महाराष्ट्रातील अ-मराठी महाराष्ट्रीयांवर मराठी लादायचा कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्राच्या प्रादेशिक जीवनाशी त्यांचे नाते मराठीच्या मार्फत जोडण्याचा कार्यक्रम आहे. हा केवळ जागतिकीकरण लादायचा जे उद्योग करीत आहेत त्यांच्याशी लढण्याचा किंवा त्यांना शरण जाऊन मोकळे होण्याचा प्र न नाही, तर इतिहासातून दीर्घ काळ चालत आलेली जागतिकीभवनाची क्रिया आहे तिला सर्वांना अनुकूल आणि हितकारी वळण लावण्याचा प्र न आहे, केवळ आर्थिक-राजकीय परिणामांवर न विसंबता या क्रियेला इतर परिमाणे कशी लाभतील हे पाहण्याचा प्र न आहे. या चालीवर आणखी कितीतरी सांगण्यासारखे आहे किंवा जे इथवर सांगितलेलं आहे त्यावरून ताडण्यासारखे आहे
असे काही न करता फक्त आपल्या नाकापुढचे पाहणे हे एक तर पढतमूर्खलक्षण आहे किंवा करंटलक्षण आहे.
संदर्भ टीप:
1. *पहा “मराठीतील पहिला जोडणी-कोश: ‘मराठी लेखन कोश’ “, भाषा आणि जीवन 19:4 दिवाळी 2001 इतिकथन
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (पूर्वीची डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी), पुणे यांनी लेखकाच्या मराठी भाषेच्या सेवेखातर सन्मान केला. त्या प्रसंगी केलेल्या भाषणाचा हा लिखित विस्तार, भाषा आणि जीवनच्या उन्हाळा 2003 ह्या अंकातून पुनर्मुद्रित केला आहे.
7 धनंजय, 759/83, भांडारकर रस्ता, गल्ली 6 द्वारा, पुणे — 411 004