समाजरचना–विचार

समाजरचनेचा विचार करताना तळागाळातील व्यक्तीपासून ‘उच्च’ वर्गातील व्यक्तींसकट सर्वांच्या हितासाठी नेमके काय हवे याचे भान हवे. जोडणारे बंध व्यक्ती-व्यक्तीमध्ये वा एकूण समाजामध्ये वितुष्ट आणणारे असल्यास त्यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. सामान्यपणे कुठलाही वाद व विशेषकरून टोकाचा राष्ट्रवाद व अशा राष्ट्रवादांच्या संकेत-संज्ञा वापरण्यावर दुराग्रह या कुठल्याही सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजाला हितावह ठरणाऱ्या नाहीत. भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घेणारी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे. समाजातील अभिजन वर्गाकडे role-model म्हणून इतर बघतात. त्यांचे सही सही अनुकरण करतात. म्हणून या अभिजनवर्गाने आपले आचार-विचार, वर्तणूक, सोई-सुविधा, छंद-सवयी इत्यादींबद्दल जास्त जागरूक व संयमित असणे गरजेचे आहे. कदाचित त्यासाठी त्यांना त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला मुरड घालावी लागेल. कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना विवेक बाळगणे गरजेचे आहे कारण त्याचे दूरगामी परिणाम अनिष्ट ठरण्याची शक्यता असते.
समाज हा व्यक्तींचा असतो. व्यक्तीचे सर्व गुण समाजाला चिकटलेले असतात. मुळातच समाजातील व्यक्तींना (शारीरिक वा बौद्धिक) श्रमांतून आनंद, ही संकल्पनाच मान्य नसल्यास तो समाज आळशी बनत जातो. सर्जनशीलतेपेक्षा फुटकळ मनोरंजनातच धन्यता मानणारा समाज पुढे जाणार नाही. श्रम न करता पैसे मिळवण्याच्या वृत्तीमुळे शोषणव्यवस्था बळकट होत जाते. अशा गोष्टींना समाजिक मान्यता मिळता कामा नये. अशा गोष्टींसाठी केलेल्या कायद्यात पळवाटा असतात म्हणून कायदाच नको हे योग्य नाही. प्रबोधनातन व प्रशिक्षणातन माणसात बदल घडवणे शक्य आहे. समता, अहिंसा, बाबतींत तडजोडीला वाव असता कामा नये. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, रोजगार, शिक्षण या मूलभूत सुविधा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी अग्रक्रम द्यायला हवे. मूठभर लोकांसाठी इतर सर्वजण राबत आहेत हे चित्र बदलायला हवे. श्रीमंतांना जास्त श्रीमंत केल्यास संपत्ती गरिबांपर्यंत झिरपत जाईल या तत्त्वावर आर्थिक व्यवहार नसावेत.
छंद वा सवयी या पूर्णपणे वैयक्तिक बाबी आहेत. आपापल्या आवडीनिवडीनुसार छंद निवडताना त्यांचा समाजाला उपयोग होणार आहे का? याचाही विचार करायला हवा. आपण निवडलेल्या छंदामुळे कुटुंबीयांना, इतरांना त्रास होत असल्यास अशा छंदाचा पुनर्विचार करावा. व्यक्तिहितापेक्षा समाजहिताला प्राधान्य हवे. शक्यतो शारीरिक वा मानसिक वाढ करू शकणाऱ्या छंदांची निवड करावी. छंद जास्त खर्चिक वा जास्त वेळेची मागणी करणारा नसावा. सर्व उत्पन्न गटांतील, सर्व वयोगटातील व्यक्तींना सामावून घेणारा छंद असल्यास समाजातील सलोखा वाढू शकतो. छंद असावा परंतु छांदिष्ट होणे टाळावे.
समाजाच्या विकासात सार्वजनिक संघ-संस्थांचे महत्त्व असाधारण आहे. परंतु संघ-संस्था म्हणजेच समाज असा याचा अर्थ नव्हे. समाजव्यवस्था सुरळित चालण्यासाठी अनेक संघ-संस्थांचा हातभार लागतो त्यामुळे शिस्त व नीतिनियमांचे काटेकोर पालन संघ संस्थांनी करायलाच हवे. या संस्थांनी एकमेकांना पूरक असे काम केल्यास समाजगाडा व्यवस्थितपणे चालू शकतो. संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी-सभासदांनी इतर ठिकाणी काय चालले आहे, कशा प्रकारची सुधारणा केल्यामुळे उद्दिष्टपूर्ती होईल याचाही विचार करावा व त्या अनुषंगाने कृती करावी. व्यक्तिप्रधान संस्थांपेक्षा कृतिप्रधान संस्था बांधण्यात याव्यात. एकाच उद्देशासाठी अनेक संस्था उभारून लोकांच्या मनात गोंधळ माजवण्यापेक्षा या समविचारी व सम उद्देश असलेल्या संस्थांनी परस्पर-समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्यास समाजहित साधू शकते. आपल्या संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी इतर संस्थेला बळी देणे वा इतरांच्या कार्यात आडकाठी आणणे, त्यांचे नुकसान करणे योग्य नव्हे. संकुचित उद्दिष्टासाठी उभारलेल्या संस्था अल्पजीवी ठरतात. संस्थेचा उपयोग व्यक्तींच्या स्वार्थासाठी होत असल्यास इतर सभासदांनी जागृत राहून कडाडून विरोध करावा. आर्थिक लाभापेक्षा उद्देशपूर्तीला महत्त्व द्यावे. साधनशुचितेला महत्त्व द्यावे. संस्थेकडे एक कुरण या दृष्टिकोनातून न बघता सामाजिक कार्य करण्याची संधी म्हणून बघावे. स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्याची गरज आहे. त्यांचे कौतुक करण्याची गरज आहे.
जीवनाच्या गुणवत्ता वाढीपेक्षा (quality of life) माणूस म्हणून गुणवत्तेत (Quality of Human beings) वाढ झाली पाहिजे. विवेकी विचार, वैज्ञानिक मनोवृत्ती, गोष्टी समजून घेण्यासाठी उत्सुकता, उद्योजकता, सर्जनशीलता, नावीन्याची हौस, कृतिशीलता, कुशलता, परिपूर्णता, वैचारिक सुस्पष्टता या गुणांची वाढ व्हायला हवी. पहिल्याच प्रयत्नात अचूक काम करून ते वेळीच पूर्ण करणे, छोट्या मोठ्या तक्रारीकडे वैयक्तिक लक्ष देणे, वेळेचा सदुपयोग, ऊर्जेची बचत, पर्यावरण रक्षण, संयमित जीवनशैली, संवाद-कुशलता, नेमकेपणा, नेमस्तपणा, परस्पर सहकार्य, इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. या गुणांच्या वाढीसाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. यासाठी प्रबोधन व्हायला हवे. या गुणांना उत्तेजन द्यायला हवे.
संपत्तीची बचत ही एका अर्थी संपत्तीची वृद्धी असते. सार्वजनिक मालमत्तेचा अपव्यय होता कामा नये. अधिकारांचा दुरुपयोग टाळण्यासाठी उपाय योजले जावेत. व्यक्तिपूजेला वाव असता कामा नये. कुठल्याही गोष्टीचे उदात्तीकरण करू नये. व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेपेक्षा गटांना (team) प्राधान्य असलेली व्यवस्था हवी. गुणवंतांची कदर असलेल्या समाजाचा विकास होत राहतो. समान संधी उपलब्ध असल्यास सर्व व्यक्तींचा समाज विकासात सहभाग होऊ शकतो. तळागाळातल्यांना विशेष संधी दिल्यास अंतर कमी होऊन समाज प्रगतिशील बनतो. नियोजनपूर्वक कामांची आखणी केल्यास वेळ, श्रम व पैसा यांची बचत होऊ शकते. अप्रामाणिकपणा, भ्रष्टाचार, हिंसक वृत्ती, हेकेखोरपणा, फसवणूक यांना कायद्याचा बडगा दाखवण्याइतकी राजकीय इच्छाशक्त हवी. यासाठी दबाव गट हवेत. अभ्यास गट हवेत.
संघटित धर्मसंस्थांची समाजावरील पकड सैल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आता गरजेचे बनले आहे. व्यक्तिात धर्मपालनाला वाव देत असतानाच त्याच्यामुळे समाजहितास बाधा येत असल्यास धर्मस्वातंत्र्य संकुचित करण्याची तयारी ठेवावी लागेल. धर्मव्यवहार व सामाजिक व्यवहार यात गल्लत करू नये. धर्माचे व्यवहार अनेक वेळा मनोरंजन, उत्सवप्रियता वा विरंगुळा म्हणून केले जातात. त्यामुळे हजारो man-hours वाया जातात. सार्वजनिक पैशांची उधळपट्टी होते. समाज अनेक गटांत विभागला जातो. त्यातून हिंसाचार होतो. आतंकवादाला पुष्टी मिळते. म्हणून या गोष्टींना वेळीच पायबंद घालणे जरूरीचे आहे. दैनंदिन व्यवहारात या धार्मिक सण समारंभांची अडचण होते. यासाठी समाजातील प्रमुख व्यक्तींनी एकत्र येऊन कायदा, प्रबोधन, प्रशिक्षण, पर्यायी उपक्रम इत्यादीतून धर्माचरणावर अंकुश ठेवण्याची गरज आहे. यासाठी केवळ चर्चा नको. मतभेदांचे जाहीर प्रकटन नको. एकमेकांचे उणे काढत बसण्यापेक्षा समाजव्यवहारात अशा गोष्टींना कुठल्याही प्रकारे उत्तेजन देता कामा नये. यात बहुसंख्यकांनी पुढाकार घेतल्यास अल्पसंख्यकांचे प्रबोधन करणे सुलभ होईल. यासाठी चळवळ उभी केल्यास युवक-युवतींचा नक्कीच सहभाग मिळेल.
मराठी समाजाचाच वेगळा विचार केल्यास या समाजात आणखी सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. मराठी समाज म्हणजे मराठी भाषेचा उपयोग करणारा समाज या स्थूल अर्थाने तो वापरला आहे. सामाजिक व्यवहारासाठी भाषा जास्तीत जास्त प्रगल्भ असावी लागते. विज्ञान तंत्रज्ञान, व्यापार-उद्योग, उत्पादन-वितरण याबद्दलचे नेमकेपणाने विचार/आशय संबंधितांपर्यंत पोचवण्यासाठी मराठी भाषेतील लिपी अद्ययावत हवी. भाषेत लवचीकपणा हवा. भाषेचा अभ्यास लहानपणापासून होत असल्यामुळे त्यातील बोजडपणा टाळणे गरजेचे आहे. भाषेचे update वेळोवेळी होत राहिले पाहिजे. इतर भाषेतील पारिभाषिक शब्द आहेत तसे वापरण्याची क्षमता मराठी भाषेत हवी. प्रगत गणितातील सिद्धान्त, संगणक शास्त्र, अवकाश विज्ञान, माहिती तंत्रज्ञान जनुक विज्ञान इत्यादी विषयातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी प्रचलित मराठी भाषा तोकडी पडते. यासाठी मराठी भाषेच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न करायला हवे.
मराठी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये अगदी लहानपणापासून रुजवलेले ज्ञान, अक्षरओळख, विचार करण्याची पद्धत यावर धर्माचा फार मोठा प्रभाव आहे. यामुळे समाजात दुही माजण्याची शक्यता आहे. यासाठी आपल्याला शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. पाठ्यपुस्तकातून, अंकलिपीतून, रोजच्या अभ्यासातून धार्मिक संज्ञा-संकल्पनांना शिक्षणसंस्थेच्या बाहेर ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज भासत आहे. डी II – 18/4, आर्मामेंट इस्टेट, डी. आर. डी. ओ. कॉम्प्लेक्स, ए डी ए रोड, पाषाण, पुणे — 411 021

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.