1979 साली मिसिआ लँडो (Misia Landau) ही येल विद्यापीठाची इतिहास-संशोधक पुरामानवशास्त्राचा इतिहास तपासत होती. आपली (म्हणजे माणसांची) उत्क्रांती गेल्या शतकाभरातल्या वैज्ञानिकांनी कशी समजावून सांगितली, त्याचा हा अभ्यास. वैज्ञानिक ज्या कोरड्या वस्तुनिष्ठतेचा उदोउदो करतात, तिचा या उत्क्रांतीच्या वर्णनांमध्ये मागमूस नव्हता, हे लँडोला जाणवले. त्याऐवजी एखाद्या मिथ्यकथेसारख्या रूपात आपल्या पूर्वजांपासून आपण कसे घडलो याचे वर्णन केलेले लँडोला आढळले. कोणत्याही लोककथेत भेटणारा घटनाक्रम—-‘होमो’ वंशाचे गरिबीतले बालपण, त्याच्यापुढे एकामागून एक येणाऱ्या अडचणी, त्यांच्यावर मात करताना ‘नायक’ तावूनसुलाखून अखेर ‘होमो सेपियन्स’ या ‘जाणत्या मानवा’च्या पदाला पोचणे. (काही वैज्ञानिक कथांमध्ये तर या नायकाला आपणच कर्ते-करविते आहोत, आपले यश आपल्याच कर्तृत्वामुळे आहे, असा गर्व झाला, आणि गर्वाचे घर खाली या न्यायानुसार तो नष्ट झाला, असेही भविष्य वर्तवले आहे!)
लँडोच्या या निरीक्षणाला मानववंशशास्त्रज्ञ तीन प्रकारचे प्रतिसाद देतात. या प्रकारांचे उत्कृष्ट वर्णन रॉजर लूविनच्या ‘बोन्स ऑफ कंटेन्शन’ मध्ये भेटते. काही जणांचा प्रतिसाद होता, “छ्याः! विज्ञान वस्तुनिष्ठच असते आणि आम्ही त्याच वृत्तीने तथ्ये ‘निवडून’ उत्तरे काढतो!’ इतर काही जण हादरले. आपण वस्तुनिष्ठेवर पोसलेले लोक जे काही वस्तुनिष्ठ मानत आलो, त्यापैकी अनेक मांडण्यांमध्ये लँडो सांगते तसे ‘साहित्यिक’ अंगही आहे, हे जाणवून त्यांना आपण स्वतःच स्वतःला फसवले, हे जाणवले. आपणा इतरां-प्रमाणेच वैज्ञानिकांनाही पूर्वग्रह आणि ठोकळेबाज (stereotype) वर्णने टाळणे कठिण जाते. आपल्या मनात आधीच असलेली एखादी गोष्ट सहजच आपण जे पाहतो त्यावर कब्जा करते. —- मग आपण साधी माणसे अस नाहीतर वैज्ञानिक!
तिसरा एक गट मात्र लँडोने दिलेल्या धक्क्यातून सावरला. त्यांची प्रतिक्रिया होती, “खरे की काय? बरे, तर मग — तसेच असो!” तथास्तु! मला हे पटते. मला हे विज्ञानाच्या आधुनिक तत्त्वज्ञानाशी जुळणारे वाटते. वैज्ञानिकांनी कितीही प्रयत्न केला तरी विज्ञान ‘वादातीत,’ ‘वस्तुनिष्ठ’ सत्यांबद्दलच बोलू शकत नाही, जरी परंपरेने विज्ञानाचे क्षेत्र तसे मानले जाते, तरी. विज्ञान काही विशिष्ट प्रकारच्या कल्पनांचे क्षेत्र आहे–अशा कल्पना की ज्या तपासता येतात आणि तत्वतः बादही करता येतात. पण अगदी न्यूटनच्या गतिकीच्या नियमांसकट सारी वैज्ञानिक तत्त्वे ही तात्पुरती, हंगामी, प्रोव्हिजनल, अशीच मानली जायला हवीत. प्रत्येक वैज्ञानिक संकल्पनेत ती चुकीची असू शकेल, हेही अंतर्भूत असतेच. तर्कसंगत राहायचे असेल तर आजच्या कल्पना सदोष आहेत आणि खरी ‘तथ्ये’ पुढ्यात आलेलीच नाहीत, ही शक्यता मानावीच लागते.
विज्ञान संकल्पना, अभ्युपगम (hypotheses) सुचवते — ह्या संकल्पनांचा तपास करता येतो. आणखी विस्तृत, सामान्य मांडणी करायची असेल, तर आपण म्हणू की विज्ञान ‘स्वमार्गदर्शक’ (heuristic) म्हणता येतील अशी तत्त्वे सुचवते. कोणत्याही क्षेत्रातील अशी तत्त्वे शब्दशः खरी नसली तरी समजून घेण्याच्या क्रियेला उपयुक्त असतात. प्रत्यक्ष व्यवहारात एखादे तत्त्व तपासता येण्याजोगे नसले तरी ते मार्गदर्शक, पथदर्शक म्हणून विज्ञानात ग्राह्य मानले जाऊ शकते. असे होण्यासाठी त्या मार्गदर्शक तत्त्वापासून तपासण्याजोगे अभ्युपगम सुचायला हवेत. कार्ल पॉपरच्या मांडणीनुसार अशी तत्त्वे विज्ञानाला ‘कार्यक्रम’ (agenda) पुरवतात. यामुळे पुरामानवशास्त्रज्ञांनी लँडोच्या निरीक्षणाने हबकून जायचे कारण नाही — पण ती जे काही म्हणते आहे त्याचा पूर्ण अर्थ मात्र त्यांनी समजून घ्यायला हवा.
त्यांनी हबकून जायला नको, कारण प्राचीन मानवांना शोकांतिकेचे नायक मानणे हे मार्गदर्शक आहे. अशा वर्णनाने संशोधनाला सुरुवात करता येते. उपलब्ध तथ्यांची सुसंगत सांगड घालून ‘त्या’ काळी काय घडत होते, ते समजू लागते. मग या चौकटीत अशा संकल्पना उपजतात की ज्यांना तपासता येते. आणि त्यांच्या चूक-बरोबर ठरण्यानुसार मुख्य ढाच्यात बदल करून घेता येतात. आपल्या मनातले चित्र आणि वास्तव विश्व यांच्या द्वंद्वातूनच प्रगती होऊ शकते.
इतर मार्गच नाहीत. आणि माणसांचा इतिहास एखाद्या कथेसारखा सांगण्यात एक मोठा फायदा आहे—-माणसांचे मेंदू (संगणकांचे नव्हेत!) कथा समजून घेण्याला अनुरूपतम असतात! सुरुवात, मध्य आणि शेवट असलेल्या कथा.
सेंट जॉन आपल्या शुभवर्तमानाची सुरुवात करतो, “आधी होता शब्द’. याचे देवशास्त्रीय संदर्भ असतील ते असोत—-पण मानवी मनाचे वर्णन म्हणून हे चुकीचे आहे. आधी होती कथा! आपल्याला सहजपणे आठवते, ती. पण यातच एक मोठा धोकाही आहे. तो धोका जाणून घेतला तर मात्र तो टाळणे अवघड नाही. धोका हा, की आपण एखादी छान, रंगवून सांगितलेली कथा हे एक कामचलाऊ प्रतिमान (model) न मानता ते सत्यच आहे असे समजू लागू. अनेक वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या संदर्भात ह्या (धोकादायक) चुका केल्या आहेत. कथांना मार्गदर्शक न मानता तेच वास्तव मानण्याची चूक अनेकांनी केली आहे.
मला मानवाची उत्क्रांती एका रंजक, संस्मरणीय पद्धतीच्या मिथ्यकथेसारखी सांगणे धोक्याचे वाटत नाही —- पण मीही लक्षात ठेवतो आणि तुम्हीही स्वतःला आठवण करून देत रहा, की ती कथा हे सत्य, वास्तव नव्हे. ती फक्त अशी चौकट आहे की तिच्यावर पुढे आपण बहुधा सत्य टांगू शकू! [‘द डे बिफोर यस्टरडे’ —- कॉलिन टज् (Colin Tudge)] (पिम्लिको 1996), या पुस्तकातून. ऊष्मागतिकीचे तीन नियम आहेत
एक, ऊर्जेची अक्षय्यता – ऊर्जा निर्माण वा नष्ट होत नाही. फक्त तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होते.
दोन, एन्ट्रॉपी कमी होत नाही. (एन्ट्रॉपी हे अव्यवस्थेचे माप असते.) तीन, निव्वळ (अॅबसोल्यूट) शून्य तापमान गाठता येत नाही. (हे एकदम तळाचे तापमान, उणे 273 अंश सेल्सियस)
हे तीन मूलभूत नियम नेहमीच्या भाषेत सारांशरूपाने असे सांगता येतील : पहिला नियम सांगतो की, ‘तुम्ही जिंकू शकत नाही’; दुसरा सांगतो की ‘तुम्ही बरोबरीही साधू शकत नाही’; आणि तिसरा सांगतो की ‘तुम्ही या खेळातून अंग काढून घेऊ शकत नाही’.
अधिक चेष्टेच्या सुरात असे म्हटले गेले आहे की तुम्ही जिंकू शकाल या खोट्या आधारावर भांडवलशाही उभारली आहे, आणि तुम्ही बरोबरी साधू शकाल या खोट्या आधारावर समाजवाद. या त्रयीतील तिसरी चुकीची धारणा गूढवाद पूर्ण करतो, कारण त्यानुसार तुम्ही या खेळातून अंग काढून घेऊन मोक्षप्राप्ती करू शकता. —- जॉन बॅरो, 1988