विज्ञानाशी संबंधित एखादा विशेषांक काढावा असे फार दिवस मनात होते, पण विषय फार मोठा. आज आयुष्याच्या सर्व भागांना तो स्पर्श करतो, व्यक्तिगतही आणि समाजिकही. मग मर्यादा काय घालाव्या?
‘सुरुवात तर करू’ अशा भूमिकेतून ‘विज्ञान : स्वरूप आणि मर्यादा’ हा मथळा निवडला. योग्य अतिथि-संपादकाचाही विचार होत होताच. अशात चिंतामणी देशमुख भेटले. त्यांनी सुचवले, “आधुनिक विज्ञान म्हणा, कारण आजची शिस्त पूर्वी नसायची.” योग्य! “आणि ‘मर्यादा’ म्हटले की लोक गोंधळ घालतात. त्याऐवजी ‘क्षितिजे’ जास्त नेमके ठरेल.’ यावर उत्तर सोपे होते, “तुम्हीच का नाही अतिथि-संपादक होत?” आणि होकार आला! पण एवढ्याने भागले नाहीच. क्षितिजापर्यंत पोचता येणार नाही. नुसते ‘स्वरूप’च सांगायचा ‘प्रकल्प’ही फार मोठा आहे, असे दिसू लागले—-तर ती मर्यादाही मान्य केली.
लेखक निवडणे, विषयाच्या अंगा-उपांगांना न्याय देणे, काटेकोरपणा आणि आकलनीयतेचा तोल साधणे, हे सारे देशमुखांनी केले. पण तरीही आ.सु.च्या जोड-अंकाच्या आकाराची मर्यादा अगदी सहजपणे मोडली गेली. या अंकात हेमचंद्र प्रधान आणि रघुनाथन यांच्या लेखांचे ‘पहिले भाग’च आहेत. उत्तरार्ध पुढच्या अंकात, मार्च 2004 मध्ये येतील. आणखीही एकदोन लेख अपेक्षित आहेत. महत्त्वाचे आहेत. पुढे येणार आहेत.
आणि भविष्यासाठी विज्ञानाची क्षितिजे, मर्यादा, शिक्षणतंत्रे, विज्ञानाला होणारा विरोध, विज्ञानावरच्या सामाजिक नियंत्रणाची गरज आणि त्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा, असे सारे विषय शिल्लकच आहेत. हा भारतीय विज्ञान संमेलनाचा महिना असतो, हाही एक योगायोग. या वर्षी हे संमेलन चंदीगढला भरणार आहे.
आजचा सुधारक ने काही पुस्तिका काढाव्या असा एक जुनाच विचार आहे. काही लेखमाला, काही चर्चा, यांच्या पुस्तिका उपयुक्त ठरू शकतात. आणि त्यांना मागणीही असेल, असा हा विचार.
हा आधुनिक विज्ञानाच्या स्वरूपावरील अंक, पुढे येणारे लेख, निवडक पत्रे, वगैरेंचेही पुस्तक घडवायचा विचार आहे. हा अंक पाहून जर कोणास पुस्तक घेण्याची इच्छा झाली तर कळवावे. किंमत साधारणपणे आठ पानांस रुपया, बांधणी खर्च व टपालखर्च वेगळा, या आकाराची असेल. — नंदा खरे
संपादकीय टिपण